पुष्पौषधी ( फ्लॉवर रेमिडी ) माझा अनुभव

Submitted by अवल on 17 May, 2011 - 13:02

या लेखात पुष्पौषधी बद्दलचा माझा अनुभव मी लिहिला आहे. याच्या शास्त्रीय तपासणीबाबत मला कोणतीही माहिती नाही याची कृपया नोंद घ्यावी. त्यामुळे या संपूर्ण लेखातली माहिती ही केवळ माझा अनुभव म्हणूनच फक्त ग्राह्य धरावी ही विनंती !

१.
साधारण वर्षांपूर्वीची घटना ! माझे एक जवळचे वयोवृद्ध अचानक गेले. तसं वय ८८ होतं, पण तब्बेत चांगली होती. त्यांच्या मुलाने (वय ५० ) त्यांचे जाणे जरा जास्तीच मनाला लावून घेतले. तशात ते गेले तेव्हा मुलगा त्याच्या कामानिमित्त बाहेर गावी होता. त्यामुळे आपण शेवटी त्यांच्या जवळ नव्हतो, आपण जवळ असतो तर काही करता आलं असतं . असं काहीसं त्यांनी मनाला लावून घेतलं. यातून दुसर्‍या दिवशी त्यांची इतकी वाईट परिस्थिती झाली की त्यांना आय सी यू त ठेवावं लागलं.
दोन दिवसांनी त्यांना घरी आणलं. पण आपली चूक झाली ही भावना काही त्यांच्या मनातून जाईना. आमची एक फॅमिली मैत्रिण आहे. तिने हे सगळे पाहिले अन मला विचारले की त्यांना फ्लॉवर रेमिडी देउ का ?
त्यांना पुष्पौषधी सुरू केली अन ४ दिवसात ते या सगळ्यातून हळूहळू बाहेर आला. पुष्पौषधी ची अन माझी ही पहिली ओळख !

२.
तीन महिन्यांपूर्वी माझ्या लेकाला अ‍ॅक्सिडेंट झाला. मला घरी फोन आला अन मी लगेचच तिथे पोचले. लेक रस्त्यात खाली बसला होता. डोळ्यात कसलीच ओळख नव्हती.....शर्टावर रक्त सांडलं होतं.... मी तिथे पोहचले अन मागून सायरन वाजवत अ‍ॅम्ब्युलन्स आली. आजूबाजूच्या भल्या माणसांनी मी तिथे पोहचे पर्यंत ती मागवली होती..... मी लेकाजवळ जायच्या आधीच, त्याने मला ओळखायच्या आधीच; डॉक्टरांनी त्याला अ‍ॅम्ब्युलन्स्मध्ये घेतले. मी तिथे जायला लागले तर त्यांनी अडवले. अन मला पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसायला सांगितले. तिथे काही फॉर्म्स भरणे वगैरे फॉर्मॅलिटीज पार पाडल्या. नवर्‍याला फोन करून डायरेक्ट दिनानाथमध्ये ये असे सांगितले. अन मग अ‍ॅम्ब्युलन्स निघाली. दिनानाथला अ‍ॅम्ब्युलन्समधून खाली उतरले, तो पर्यंत लेकाला स्ट्रेचरवरून आत अ‍ॅडमिट केलं होतं... अन मग मी त्याला पाहिलं. आता त्याच्या डोळ्यात ओळख होती... अन मग माझा श्वास एक क्षण अडला.... खळकन डोळ्यातून पाणी आलं..... पण लगेच सावरलं, त्याच्या जवळ गेले... डॉक्टर तपासत होते, मी लेकाच्या डोक्यावरून हात फिरवला तर हाताला रक्त लागलं.... मी डॉक्टरांना खूण केली.... अन तेव्हढ्यात माझा नवरा येऊन पोहचला.... आता फॉर्मॅलिटीज त्याने हातात घेतल्या... अन मी लेकाकडे पहायला मोकळी झाले...
मग लेकाचे सिटीस्कॅन, एम आर आय,.... वगैरे सगळ्या गोष्टी पार पडल्या....... सगळ्यांच्या शुभेच्छांतून लेक अगदी पूर्ण इनटॅक्ट हाती लागला. डोक्याला जखम असल्याने ४८ तास वाईट गेले... पण सगळ्यातून सही सलामत बाहेर पडलो.........
तीन दिवसांनी घरी आलो. हळूहळू रुटीन सुरू झाले. आमचे घर दिनानाथच्या जवळ असल्याने नेहमीच अ‍ॅम्ब्युलन्स जात येत असतात. तशीच त्याही दिवशी -घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी एक अ‍ॅम्ब्युलन्स सायरन वाजवत गेली.... अन मी मटकन खाली बसले...... हृदयाचे ठोके अगदी कानापर्यंत ऐकू यायला लागले........ वरचा श्वास वरती, खालचा खाली..... जीव गुदमरायला लागला...... खरं तर मी अतिशय धीराची बाई.... काही मैत्रिणीतर मजेत मला पाषाण हृदयीही म्हणतात.... पण या अवस्थेतून बाहेर यायला मला मिनिट्-दिड्मिनिट लागलं......लेकाला अ‍ॅक्सिडेंटनंतर डोळ्यात ओळख नसलेलं पाहिलं तेव्हाच मागून अ‍ॅम्ब्युलन्स सायरन वाजवत आली होती, तो सायरन जवळ जवळ ८ ते १० मिनिटं अगदी डोक्यावर वाजत होता.....लेक डोळ्यासमोर नव्हता......काय, किती झालं आहे हे कळत नव्हतं... अन तो सायरन......
सगळी घटना माझ्या डोक्यातून काही केल्या जाईना...... जरा कुठे सायरन वाजला की माझे ठोके आपले धाड धाड चालू....... प्राणायाम करून झाला. मनाला समजावून झालं...... डॉक्टरांशी बोलून झालं...... लेकाला जवळ घेउन झालं....... पण मला काही हे कंट्रोलच होईना.....
अन तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला पुष्पौषधी दिली. तो धक्का इतका वाईट होता की चार दिवसांनी गुण आला. हळूहळू मला परिस्थिती आटोक्यात आणता येउ लागली.
अन जाणवलं पुष्पौषधी चा कित्ती उपयोग होउ शकतो. मग दोन महिने पुष्पौषधीचा अभ्यास केला. मैत्रिणीकडून काही अडचणी आल्या, त्या स्वमजून घेतल्या. अन नव्या जोमाने पुष्पौषधीच्या औषधांचा उपयोग आता घरच्या सर्वांसाठी करू लागले.

३.
माझ्या आईच्या कला गुणांबद्द्ल मी आधी लिहिलं होतं इथे. तिची थोडी ओळख आहेच तुम्हाला.... ( http://www.maayboli.com/node/1507 )
लग्न झाल्यापासून आईनं त्या काळानुसार खुप सासूरवास भोगला, तशात खुप मोठं कुटुंब अन वडिलांचा भिडस्त स्वभाव... अनेक गोष्टी तिच्या मनात साठत गेल्या. त्या त्या वेळेस तिनं सगळं निभावून नेलं, अनेक न पटणार्‍या, मनाला लागून राहिलेल्या गोष्टी तिनं दडपल्या होत्या मनात....
पण आता ८०व्या वर्षी हळूहळू त्या वर येऊ लागल्यात.... खुप त्रास व्हायचा तिला.... सगळे समजावतात "जाउ दे झालं गेलं गंगेला मिळालं..." तिलाही समजतं , पटतं पण मन साथ देत नाही... डोळे गळतच राहतात. अन मग खुप दुखतात डोळे अन मन ही ...
मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीने, फ्लॉवर रेमिडीची काही औषधं मला दिली होती, माझ्या लेकाच्या अ‍ॅक्सिडेंटच्या धक्क्यातून बाहेर यायला मला त्याचा खुप उपयोग झाला होता. मग मी फ्लॉवर रेमिडीचा थोडा अभ्यास केला. अन काय आश्चर्य, मला आईच्या त्रासावर उपाय सापडला. गेले दोन महिने तिला ही औषधं देत्येय मी. पूर्वीची घट्ट्मुट्ट आई पुन्हा उभी राहतेय जुन्या आठवणींवर ताबा मिळवतेय अन पुन्हा नेहमी सारखी अतिशय आशावादी आई पुन्हा मिळालीय आम्हाला.

गुलमोहर: 

आमच्या जवळच्या नातेवैकानी हा उपाय केला होता.. .. मेडिकल कॉम्प्लीकेशंस होते त्यामुळे खूप गोळ्या चालू होत्या .. त्यात मानसिक रोग चालू झाला शिझोफ्रेनिया सारखा.. रेडीफ मध्ये आणि लोकप्रभा मध्ये मुंबईतले एक डॉक्टर ह्यावर लेख लिहायचे..नक्की नाव आठवत नाही त्या डॉक्टर कडे उपचार घेतले होते.. हि औषध घेवून त्यांना खूप फरक पडला होता..

anaani | 3 June, 2011 - 14:53 नवीन

कोणाला पुण्यात पुष्पौशधी शिकयचि असेल तर माझ्या आईचा पत्ता देउ शकेन. ति क्लास घेते.

मुंबई आहेत का?

अवल हीच अरोमाथेरपी का? कदाचित अरोमाथेरपी ही जास्त व्यापक शाखा आहे आणि पुष्पौषधी हा त्याचा एक घटक आहे. कारण अरोमा मध्ये हर्ब ऑइल्स पण वापरली जातात. लेमनग्रास ऑइल माझ्या अतिशय आवडीचे.

अरोमाथेरपी वेगळी. त्यात सुगंधी तेलाचा/द्रव्यांचा उपचार असतो. तो बहुतेक बाह्योपचार आहे. ही औषधे पोटातून बहुधा घ्यायची नसतात, असे वाटते.

फ्लॉवर रेमेडीमध्ये फुलांपासून तयार केलेले औस्शध अल्कोहोल बेसमध्ये मिसळून लिक्विड तयार करतात, ते होमिओपथिप्रमाणे शाबुदाण्या गोळ्यांवर शिंपडून त्या गोळ्या व्यवस्थित हलवून खायच्या असतात. युरोपातील कुठल्या तरी दरीत ही विशिष्ट फुले उमलतात.

फ्लॉवर रेमेडी हा होमिओअपथि अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्याशिवाय नॅचरोपथीवालेही यांचाही वापर करु शकतात. इतर लोकही याचा अभ्यास करुन वापर करु शकतात. कोणतेही कायदेशीर बंधन या औषधीना नाही. त्यांचा वापर कुणीही करु शकतो.

मी २०१४ पासुन पुष्पौषधी ( फ्लॉवर रेमिडी ) वापरत आहे आणि ईतराना मदत करत आहे. मी Bach Foundation, UK Certified आहे.
मी खालिल प्रमाने मदत करु शकतो:
1. Consultation (Marathi/Hindi/English)
2. Training
3. Original Bach Flower Remedies (I import from Bach Foundation, UK)

Facebook Link : https://www.facebook.com/RoyaleSilk.BachFlowerTherapy/
Website: https://www.royalesilk.in/

हे वाचायचे कसे काय राहिले? ?
अवल, काय काय आणि किती किती येते ग तुला..
साष्टांग दंडवत तुला _/\_
लिहीत रहा प्लीज. .
खूप छान माहिती आणि प्रतिसादही खूप उपयुक्त आहेत.
तू अजूनही ही थेरपी देतेस का? माझ्या आईसाठी हवी आहे. थोडी तुझ्या आईसारखीच परिस्थिती आहे.

Pages