न्यू इंग्लिश स्कूल व शुभंकरोती दोन्ही ठिकाणी नेमेची भरणारी प्रदर्शने भरली होती. बऱ्याच वर्षांनी हा योग आलेला. मी संचारल्यासारखी आईला घेऊन निघाले. मला सगळ्या प्रकारच्या प्रदर्शनांना, सेलला जायला आवडते. आर्ट गॅलरी असो, फोटोंची मनोहरी पकड, तैलरंग, रांगोळी, हस्तकला, यात तर अनेक लक्षवेधक प्रकार, किंवा नेसणे किती होते हा प्रश्न कानामागे टाकून साड्यांचे ढीग उपसणे असो. उत्साहाने सळसळणारे वातावरण कधीनुक आपल्यालाही त्या भरात खरेदी करायला लावते ते बरेचदा कळतही नाही. घेतलेली वस्तू कशी स्वस्त व मस्त मिळाली या आनंदात मशगुल आपण घरी येतो. हातपाय धुऊन केलेली खरेदी कौतुकाने घरातल्यांना दाखवायला जातो आणि कोणीतरी पटकन म्हणते, " अगं, पुन्हा मरूनच कलर घेतलास? आधीच पाचसहा साड्या पडल्यात ना ' मरून '? त्यात पुन्हा हिची भर? " खरे तर साडी घेतानाच हा विचार मनात चमकून गेलेला असतोच पण जीव फिरून फिरून मरून शीच अडकलेला. एखाद्या भुताने पछाडल्यासारखे या मरून ने नं मला पछाडलेय. लिंबू, मोतिया, अबोली, चिंतामणी, गर्द हिरवा किती सुंदर सुंदर रंग खुणावत होते. पण नाही, दहा स्टॉल्स फिरून पुन्हा पावले तिकडेच वळली. मग, बोलणारीला कारणे दिली जातात. अगं, ब्लॉउज तरी किती शिवायचे? याचे पर्फेक्ट मॅचिंग आहेच माझ्याकडे. किंवा, मरूनच असला तरी याचे काठ पाहिलेस का? जर नाहीये ती. रेशीम आहे रेशीम. किती सुंदर दिसतेय ना? ना ऐकणारीचे समाधान होते ना आपले. मात्र आधीच्या पाचसहा मरूमरूत अजून एक दाटीवाटीने विराजमान होते.
दिवाळीच्या आसपास दरवर्षी आकाशकंदील, पणत्या, फटाके, अनेकविध गोष्टी नवे रूप धारण करतात. गेल्या वर्षीच्या हौसेने आणलेल्या सगळ्याच गोष्टी वापरून झालेल्या नसतात. काहींचे तर पॅकिंग ही सोडलेले नसते. कारण त्या आधीच्या वर्षी आणलेल्या वस्तू त्यांचे अस्तित्व दाखवत राहतात. तरीही नवे काही दिसले की लगेच आपल्याला ते उचलण्याचा मोह होतोच. स्वाभाविकच आहे ते. पण कळत नकळत आपण वेळेचा, पैशाचा, जागेचा ( आजकालच्या सुपरबिल्टअपच्या जमान्यात तर कितीही असली तरी टीचभरच वाटू लागलीये ) अपव्यय करत राहतो. दिवाळीच्या आधीच्या साफसफाईतून दरवेळी आपल्या मोहाची फळं जागोजागी दिसतात. मग, " अय्या! कधीपासून मी ही बरणी शोधत होते. इथे लपली होती का? "यासारखे व्यक्ती व्यक्तिनुरूप चित्कार घराघरातून ऐकू येत असतात. बरेच दिवस कुठेतरी मागे दडलेली, हरवली की काय? या सदरात मोडलेली गोष्ट दुसरेच काहीतरी करताना अचानक समोर आली की घबाड मिळाल्याचा आनंद होतो. म्हणजे मुळात ती आणली तेव्हाही घबाडच होती. पण, मग अशी कुठेतरी मागे कशी गेली???
अगदी लहानपणापासूनच संग्रहाची लागण होते. पोस्टाचे स्टँम्प्स, चांद्या, गोळ्यांचे रॅपर्स, बुचे, गोट्या, कवड्या, काड्यापेट्या, जियाजो, पेन्सिली, बाहुल्या, कॅलेंडर्स, कात्रणे, मोरपिसे, गणपती, एक ना दोन... एखाद्या छोट्याश्या पेटीत, चपलेच्या खोक्यात, फोल्डरमध्ये ही अलीबाबाची गुहा तयार होते. जरा वेळ मिळाला किंवा नवीन भर पडताना, या संपत्तीचा आढावा, आस्वाद घेतला जातो. एखाद्या घारीसारखी नजर अचूक आवडत्या गोष्टीचा मागोवा घेत असते. पुन्हा हा अनमोल खजाना कोणी घेऊ नये म्हणून जीवापाड जपणूक सुरू असते. मग हळूहळू जसजश्या इयत्ता वाढत जातात तसतसे संग्रहाच्या कक्षाही विस्तारतात. कुत्री, मांजरी पाळण्याचा प्रकारही होतो. माझी धाकटी भाची जिथे मनीमाऊ दिसेल तिथे तिथे रेंगाळत राहते. दूध, पोळी भरवते. घरीही आणते अधून मधून.
आजोळी गेलो की सुटीतला जिव्हाळ्याचा व न चुकता होणारा कार्यक्रम म्हणजे आजीची शिसवी काळी ट्रंक उघडून, तिच्या आजीपासून जपलेल्या वस्तूंचा खजिना आ वासून भारलेल्या नजरेने पाहत राहणे. आजीच्या आईची अंजिरी डबल पदराची, मोराची पैठणी. तिच्यावरचा खऱ्या सोन्याचा जर, अंगभर बुंदे, खोप्यात खोवायची सुवर्णफुले, हस्तिदंती फणी, चांदीची मेणाची व कुंकवाची डबी. सोनसळी कद. गौरींचे खरे दागिने. बाबांना शिवलेली कुंची, टोपडी. अजूनही न उसवलेली आजोबांना आजीने विणलेली बंडी. बंदे रुपये, सगळ्यांच्या लग्नाच्या पत्रिका, खूप खूप जुने फोटो. श्रीखंडाच्या, सुंठेच्या वड्या. काय काय निघे तितून. शिवाय दरवर्षी भरही पडलेली असे ती वेगळीच.
यातले काही संग्रह कालाच्या मर्यादा ओलांडून कायमचे मनात घर करून राहतात. कित्येक वर्षांनी अचानक बेडच्या आत, ट्रंकेच्या तळाशी, माळ्यावरच्या मोठ्याश्या बोचक्यातून हळूच डोकावतात. मग पसारा तसाच टाकून त्यातच फतकल मारून आपण बसतो. हळुवार हाताने, अनेक आठवणींच्या गर्दीत तो खजिना डोळेभरून पाहतो. प्रत्येकीची अनोखी सुरस कथा असते. तित आपले बालपण, शैशव, तर कधी पहिल्या वहिल्या एकतर्फी प्रेमाच्या खुणा दडलेल्या असतात. आजचे आपण दंग होऊन कालच्या आपल्याला पाहण्यात रममाण होऊन जातो. तास दोन तास या तल्लीनतेत पसार होतात. मन तरल तरंगत असते. अचानक वास्तवाचे भान येते. नकळत थरथरत्या हाताने आपण तो खजिना नीट ठेवतो. पुन्हा काही वर्षांनी ' त्या ' आपल्याला पाहण्यासाठी...
अरेच्य्या! पण मुळात आपण पसारा आवरायला काढला होता ना? काय ठरवले होतेस तू? जी गोष्ट वर्षाचे तीनही ऋतू उलटून गेले तरी लागली नाही याचा अर्थ यापुढेही ती लागणार नाही. अपवादात्मक काही गोष्टी वगळता सर्वसाधारणपणे सर्रास हा निष्कर्ष सत्य असतो. पण... इथेच सगळे घोडे अडते. काहीत जीव गुंतलेला तर बऱ्याच गोष्टींना अपवादात्मक लेबल लावले जाते. त्यातून आजी-आजोबा आसपास असले की उघडलेले बोचके तसेच पुन्हा बांधून माळ्यावर रवाना होते. वर पसाभर बेजबाबदार व उधळेगीरीची लेबले आपल्यावर लावली जातात. थोडक्यात कमीअधिक प्रमाणात आपण सगळेच काही ना काही तरी संग्रह करत राहतो. घराघरातून ठासून भरलेले माळे, कात्रणांच्या चळती, मासिकांच्या थप्प्या, कॅसेट्स, जोडे, पंखे, रेडिओ, लोकरीचे गुंडे, रंग, दोरे, खवले, अश्या कित्येक, " मला पाहायचेय, दुरूस्ती करणार आहे मी, वेळ मिळाला की सगळ्या ऐकेन ना... अश्या निरनिराळ्या कारणांनी जमा केल्या जातात. फक्त जमाच होतात. वेळच नाही ही कायमची पळवाट.( खरीच आहे ती काही काळापुरती... ) नंतर जेव्हां वेळ असतो तेव्हां इतका उत्साह उरलेला नसतो. पण म्हणून इतक्या वर्षांची स्वप्ने टाकवत नाहीत आणि पुरीही होत नाहीत. उरते ती रद्दी, भंगार,धूळ, जळमटं.... परिणाम, अपुरी जागा, सर्वत्र जमवलेल्या वस्तूंचे आक्रमण, त्यापायी वाढणारा कचरा, धूळ... अस्थमा.
छंदासाठी संग्रह व पछाडले जाऊन गोष्टी जमवणे यातली सीमारेषा अतिशय धूसर आहे. छंदात भारलेपण असावेच लागते. भारलेपण पछाडलेपणाकडे झुकले की ताळतंत्र सुटतो. बऱ्याच जणांना जुन्याबाजारात जाऊन अँटिक लेबल लावून निरनिराळ्या वस्तू जमा करण्याचा षौक असतो. त्या घेतांना होणारी किमतीची घासाघीस, वस्तूंची काळातीत महती, भूरळ पाडते. पण छंद हा विरंगुळेच्या पलीकडे गेला की अपरिहार्यतेचे रूप धारण करतो. अपरिहार्यता विकृतीचे. ( Obsessive Compulsive Disorder ) आपण सगळेच काही वेळा वस्तू घरात असूनही तीच पुन्हा घेतो. आधीची जुनी झाली म्हणून, नवीन सुधारीत आवृत्ती आली म्हणून, घाट, रंग वेगळा आहे म्हणून, आधीची सापडत नाही म्हणून, कारणे बरीच पुढे केली जातात पण खरे तर तिची बरेचदा गरज नसतेच. काही वेळा, पुढे कधीतरी लागेल आणि त्यावेळी जी किंमत असेल ती देऊन घ्यावी लागेल, हे एक अतिशय सोयिस्कर व पटणारे ( स्वतःला ) कारण देऊन अनावश्यक वस्तू विकत घेतली जाते. बरेचदा तो दिवस उगवतच नाही. आणि उगवलाच तरी त्यावेळी नेमकी ही वस्तू हाताशी सापडतच नाही. त्यामुळे मिळेल त्या किमतीला विकत घ्यावीच लागते. एकदा ठेच लागली की लगेच शहाणपण, हा प्रकार अशक्यच असल्यामुळे या अश्या त्यात्या वेळी अनावश्यक व नंतर आवश्यक वस्तूंचा भरणा नित्यनेमाने चालू राहतो. सेलमधे स्वस्तात मिळून गेली हेही एक हमखास दिले जाणारे कारण आहेच.
आपल्याकडे सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा जागेची टंचाई व महागाई या दोन्हींच्या कृपेने पछाडलेपणालाही मर्यादा पडतातच. सर्वसाधारण घरांत पाचसहा गोण्यांपलीकडे भंगार जमूच शकत नाही. क्वचित काही घरांत प्रचंड जुने सामान, रद्दी सापडू शकेलही. पण निदान शहरांत तरी फारसा वाव नाहीच. अशी पछाडलेली माणसे सगळ्यांच्या कुचेष्टेचा, तक्रारीचा विषय बनतात. जपून नीट ठेवलेल्या वस्तू ऐनवेळी आठवल्या नाहीत की घरातले चिडचिड करू लागतात. भाराभार वस्तू आणायची घाई नुसती, वेळेला एकतरी मिळेल तर शपथ. कशाला इतके सामान जमवलेत? घड्याळं घड्याळं तरी किती आणायची? कधी दुरुस्तं करणार आहात ती? डोळे फुटतील अशाने. अशी वाक्ये सारखी ऐकू येतात. पण हे सारे वरवर दिसणारे रूप. मुळात हे पछाडलेपण सुरू होण्यामागे अनेक कारणे दडलेली असतात.
माझ्या ओळखीत एकट्या राहणाऱ्या एक आजी आहेत. त्यांचे घर म्हणजे कबाडखानाच. घरात आलेली कुठलीच गोष्ट कचऱ्यात जात नाही. कित्येक वर्षांच्या दुधाच्या पिशव्या, कार्डबोर्डचे खोके, प्लॅस्टिक, वर्तमानपत्रे, काय काय जमवलेय त्यांनी. सगळेजण त्यांना नावे ठेवतात. पण यासगळ्या मागे जीवघेणे दुःख दडलेय ते कोणी लक्षात घेत नाही. त्यांचा मुलगा त्यांना विचारत नाही. मावशीचे सगळे करतो पण आईशी बोलत नाही. नवरा असताना तो म्हणेल तीच पूर्वदिशा होती. सततचे दबलेपण व भावनिक गळचेपीमुळे आजींचे सगळे उभारीचे, उमेदीने, आनंदाने जगण्याचे दिवस भीतीत, घुसमटण्यात गेले. आपले, आपल्यासाठी कोणी आहे ही भावनाच कधी अनुभवता आली नाही. आता निर्जीव वस्तूंमधून आजी ते मिळवण्याचा प्रयत्न तर करत नसतील??
इथे अमेरिकेत, तीस लाखापेक्षा जास्ती लोकं या विकृतीचे बळी आहेत. मोठीमोठी घरे, मागेपुढे अंगण, स्टोरेज, गॅरेज, बेसमेंट, यामुळे या पछाडलेपणाची सुरवात कधी झाली हे कळतच नाही. सुरवातीला बेसमेंट, गॅरेज, क्लोजेटपर्यंत सीमित सामान लिव्हिंग रूमच्या आढ्याला पोचते तेव्हां कळले तरी आवर घालणे अशक्य होऊन बसते. एखादी गोष्ट आवडली की ती आणल्याशिवाय चैनच पडत नाही. ज्यांच्याकडे पैसे नसतात ते लोकांनी कचऱ्यात टाकलेल्या वस्तू उचलून आणतात. प्रत्येक वस्तूच्या आवश्यकतेची ठळक कारणमीमांसा यांच्यापाशी असतेच असते. घरातल्या लोकांच्या विरोधाला, तक्रारींना, त्यांना होणाऱ्या गैरसोयींवर, प्रेमावर, सोबत राहणाऱ्यावरही हे पछाडलेपण मात करून जाते. अनेकदा अशी माणसे एकटीच राहताना आढळतात. जोडीदार बरोबर असले तरी ते हताश, अलूफ, तटस्थ, कोरडे झालेले आढळून येतात.
वस्तू, कपडे, काय वाटेल ते जमा करणाऱ्यांबरोबर इथे जनावरांचाही अतिरेक सापडतो. एका माणसाची बायको चाळिशीतच अचानक अपघाताने गेल्यावर त्याने एक उंदीर पाळला. लोकं कुत्री, मांजरी सर्रास पाळतात. मला उंदीर आवडला म्हणून मी पाळला. ती उंदरीण होती. पाहता पाहता एकीचे दहा कधी झाले आणि त्या दहांचे हजार कधी झाले ते कळलेच नाही. ( अजिबात अतिशयोक्ती नाहीये ही ) उंदरांनी संपूर्ण घरच ताब्यात घेतले. सगळ्या भिंती कुरतडल्या, प्रत्येक कपाट, पलंग, गाद्या, काही काही म्हणून सोडले नाही. शेवटी अशी वेळ आली की या माणसाला घरात राहणेही अशक्य झाले. नाईलाजाने व आजूबाजूवाल्यांनी तक्रारी केल्यामुळे याने मदत मागितली असता याला मानसिक धक्का न बसू देता प्रत्येक उंदीर अतिशय काळजीपूर्वक हाताळून त्याला नवीन घर मिळवून दिले जाईल असे आश्वासन देत उंदीर पकड मोहीम सुरू झाली. शेवटी ते उंदीरच. चला बरं शहाण्या मुलासारखे पटापट डब्यात चढा असे थोडेच होणार होते. सुरवातीला प्रचंड संख्येमुळे भरभर हाताशी लागत होते. नंतर मात्र त्यांनी लपाछपी व पकडापकडी खेळायला सुरवात केली. किमान पंचवीस वॉलेंटियर्स उड्या मारून मारून पकडता आहेत आणि उंदीर चकवून पळत आहेत. शेवटी घराची एक ना एक भिंत, कपाट, अगदी बाथटबही फोडला, तेव्हां कुठे ८०% प्रजा हाती लागली. त्यांची संख्या भरली दोन हजारापेक्षा जास्त. ती टीम निघून गेल्यावर पुढे पंधरा दिवस त्याने स्वतः चारशे पेक्षा जास्त उंदीर पकडून सिटीकडे दिले. या साऱ्या प्रकारात अनेकदा तो ढसढसून रडला, ही धरपकड व वियोग सहन न होऊन निघून गेला. बायको गेल्याचे सत्य तेव्हां व आजही पचवू न शकल्याने सोबतीचा हा मार्ग त्याने शोधला होता.
अनेकदा हे ' जमा करणे ' आरोग्यास धोकादायक होऊन बसते. जिकडे तिकडे धूळ, स्वयंपाकघरातील सडलेल्या अन्नामुळे झुरळे, माश्या, किडे, वाळवी, सततची ओल, मांजरे, उंदीरांची शिशू यामुळे लहान मुलांच्या प्रकृतीला प्रचंड अपाय होतो. अशावेळी चाइल्ड सर्विसेस मुलांना घरापासून दूर करतात. थोडक्यात या विकृतीमुळे मुले आईवडीलांना व आईवडील मुलांना मुकतात. घटस्फोट होतात. समाजात मिसळणे कमी होत जाते. कोणालाही घरी आणणे शक्य नसल्याने संपर्क व संवाद टाळण्याची प्रवृत्ती बळावत जाऊन एक वेळ अशी येते की अशी व्यक्ती संपूर्णपणे एकटी होते. कळत असूनही वळत नाही. प्रयत्न करावेसे वाटतात परंतु आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली असल्याने शेवटी तेही बंद होतात. उरते ते भंगार व भकास जीवन.
ही विकृती बळजोरीने दूर होऊ शकत नाही. यामागची दडलेली कारणे शोधून त्यांचे समूळ उच्चाटन केले गेले तरच काही प्रमाणात यश मिळू शकते. काही प्रमाणात ही विकृती आनुवंशिकही आहे. जोवर ही माणसे स्वतःहून मदत घेण्यास तयार होत नाहीत तोवर मदत करूनही उपयोग होत नाही. जोरजबरदस्ती केल्यास परिणाम अजून भयावह होतात. यांच्या कलाने घेऊन, अतिशय संयम व पेशन्स ठेवून मदत करावी लागते. काही जण लवकर व स्वतःहून यातून बाहेर येतात, काही वेळ घेऊन व खूप वेळा निग्रह मोडून, थेरपी घेत घेत सुधारतात तर काही कधीच बाहेर येतच नाहीत.
सर्वसामान्यपणे प्रत्येकात असणारी संग्रही वृत्ती, मोह, मालकी हक्काची भावना आटोक्यात आहे तोवरच जीवनात त्याची मजा आहे. वस्तूसाठी आपण की आपल्यासाठी वस्तू हा तोल ढळता नयेच. आणि हा मोहाचा तोल सांभाळणे आपल्या हातात आहे. मात्र एकदा का या साऱ्याचा अतिरेक सुरू झाला की फक्त सजाच उरते. स्वतःसाठी व स्वतःच्या माणसांसाठीही.
एकदा एका बाईला पिझ्झा हट मधे
एकदा एका बाईला पिझ्झा हट मधे बघितला. ती, तीचा नवरा आणी २ मुला होते. आल्यावर आधी तीने तिचे टेबल आणी खुर्च्या ओल्या पेपर टोवेलने अगदी खालुन वरुन पुसुन काढले आणी मग ऑरडर दिली. तीची मुला शान्तपणे पेशन्स ने हे सगळे बघात होते. घरच्यान्च्या आधाराची खराच गरज आहे अश्यावेळी.
इथे प्रतिसादांतुनही खुप
इथे प्रतिसादांतुनही खुप माहिती मिळत आहे.
मनिमाऊ डॉ. कडे तर जालच पण एक प्रयत्न करु शकता. >> एखादी गोष्ट आवरायची, जागच्याजागी ठेवण्यासाठी मन जेव्हा उसळु लागेल तेव्हा निदान १०-२० मिनिटे दुर्लक्ष करा. मग हवीतर ती वस्तु उचलुन ठेवा. तोवर वाचा,टीव्ही पहा, बाहेर जा, काहीही करा पण कसेही करुन त्या वेळी त्या "वाटण्याची" तीव्रता संपेपर्यंत ती वस्तु योग्य जागेवर ठेऊ नका. नंतर हीच वेळ हळुहळु वाढवा. तसेच दुसर्या व्यक्तिने चूकीच्या जागी ठेवली तरी त्या व्यक्तिला ते लगेच सांगण्याऐवजी असेच अर्ध्यातासाने सांगा. हळुहळु मन ताब्यात राहु लागेल. हे मी माझ्या स्वतःसाठी लागु केले आहे, कोणत्याही बाबतीत, सिंड्रोम नसताना. आणि ते काम करते.
OCD हा फार generic आजार आहे,
OCD हा फार generic आजार आहे, कोणाला कशाचे obsession होईल हे सागता येत नाही. हा त्यातला एक प्रकार. अमेरीकेत आजार ज्यास्त नाही awareness ज्यास्त आहे. केवळ परीस्थीतीने बरा होनारा हा प्रकार नाही.
अमेरीकेत आजार ज्यास्त नाही
अमेरीकेत आजार ज्यास्त नाही awareness ज्यास्त आहे. >> अगदी बरोबर. सर्वच आरोग्य विषयक बाबींबद्दल म्हणता येइल. पण ते समजूनही जास्त घेतात. कोणी थेरपीत असेल तर त्याला वेडा म्हणत नाहीत. सेन्सिटिवली घेतात.
फ्रेंड्स मधील मोनिका हे पात्र ओसीडीग्रस्त आहे.
मनिमाऊ , खरंच तुला अभिवादन ,
मनिमाऊ , खरंच तुला अभिवादन , इतक प्रांजळपणे मान्य केलस........
फार थोड्या लोकांनाच जमतं हे?
मुळात बरेच मानसिक आजार पुर्वी
मुळात बरेच मानसिक आजार पुर्वी टोकाचे स्वभाव म्हणुन accept केले जात, त्यांच्यापुडे लोक शरण जात असत. आज सुदैवाने वैद्द्यकशास्त्र खुप पुढे गेले आहे, औषधांच्या मदतीने सगळ्यांवर जालीम इलाज आहेत, माणुस पुर्ण बरा होउन अगदी normal आयुष्य जगु शकतो. दुर्दैवाने भारतात हया treatment कडे अत्यंत चुकीच्य द्रुष्टीकोनातुन पाहिले जाते, त्या कुटुंबाला मदत करण्याऐवजी gossip केले जाते,त्यांना वाळीत टाकले जाते.ते टाळावे. मधुमेह्,रक्तदाब अशा आजारांना जसे आपण स्वीकारतो तसेच मानसिक आजारांनाही स्वीकारावे.
मानसिक आजार बरा व्हायला कधी कधी १ किंवा २ वर्षाहुन अधिक काळ औषधे घ्यावी लागतात (मधुमेह आणि रक्तदाबाला नाही का आपण आयुष्यभर गोळ्या घेत) त्याचीही तयारी असावी.
OCD म्हणजे अती स्वच्छताच किंवा खरेदीच असे नाही.माझ्या नात्यातल्या बाईंना घर वास्तुज्ञाला दाखवुन सतत खोल्या पाडणे ,बांधणे,दरवाजे खिदक्यांची दिशा बदलणे असा नाद लागला होता.आर्थिक झळ बसल्यानंतर भांडणे व्हायला लागली.सुदैवाने लवकर OCD diagnos झाले, after treatment she is absolutely fine.
'काही नाही हो जरा हवा पालटाने होइल सगळे ठीक', 'ही नवीच थेर असतात आजकालच्या मुलांची आमच्यावेळी नव्हते असे' म्हणुन मानसिक आजारांकडे दुर्ल्क्ष करु नये.
बर्याच लोकांना कुठलीही allopathy ची औषधे घेण्यात प्रचंड कमीपणा वाटतो .पण काही biochemical changes असे असतात की allopathy medicinesना पर्याय नाही.त्यामुळे औषधे टाळुन आपण आपले फार मोठे नुकसान करत असतो.
वाढत्या GDP बरोबर ,स्ट्रेस आणि मानसिक आजार वाढणार आहेत, त्यांना शुरपणे सामोर जाउयात.
फ्रेण्ड्स सिरीअलमधला मिस्टर
फ्रेण्ड्स सिरीअलमधला मिस्टर हैन्क्स(?) जो रेचल / मोनिकाच्या फ्लॅटच्या खालच्या फ्लॅटमधे रहात असतो, तोही असाच दाखवलाय.
>श्रीमंती आणि पोकळी.
खरं आहे.
Mr. Monk TV series मधे हा
Mr. Monk TV series मधे हा आजार अगदी टोकाला गेलेला दाखवले आहे.
साक्षी, अगं मान्य करायला काय
साक्षी, अगं मान्य करायला काय जातंय? हा काही लपवण्यासारखा आजार नाही आणि लपवु म्हटलं तर लपवताही येणार नाही. आणि काय आहे ना कि अजुन लोकांना झळ लागेल इतकं टोकही गाठलं नाही, खुप प्रयत्नपुर्वक. त्यामुळे मला माहित आहे OCD, पण लोकांनी तो मला चिकटवलेला नीटनेटकेपणाचा गुण आहे. तो दुर्गुण आहे हे बिचार्या नवर्यालाच माहित आहे, पण त्यालाही लोकांबरोबर टाळ्या वाजवाव्या लागतात.
लोकांनो, तुम्ही सांगितलेल्या वेगवेगळ्या उपायांसाठी आणि माझ्या विपुसाठी धन्यवाद. मी जेवढे जमेल तितके प्रयत्न नक्की करुन बघणार आहे.
कित्येक दिवसांनी सापडलेय ही
कित्येक दिवसांनी सापडलेय ही लिंक.. कशी मिसली काय माहीत... या ओसीडी मुळे घरच्यां इतर सदस्यांना अधिक त्रास होतो हे मात्र खरंय. जागच्या जागी ठेवण्याची सवय खरंच चांगली (माझं स्वच्छतेचं इंद्रिय खूप डिम आहे, तोसुद्धा १ प्रकारचा गबाळग्रंथी ओसीडीच की काय? कदाचित बरेच वर्ष हॉस्टेलवासी असल्याने असावं ... तरी आता सहवासाने आणि सवयीने नवर्याने बरेच सुधारलंय मला ) पण सासरी मात्र आहे हा ओसीडी प्रकार! १ उदाहरण - गरोदरपणात सासरी गेलेले. बेडरेस्ट असल्याने जास्त काम करायचं नव्हतं. बोअर झाल्याने बसल्या बसल्या भांडी पुसत होते, पुसलेली भांडी सगळी एकत्र लावू या विचाराने.... तर साबा जोरात खेकसल्या, एक भांडं पुसलं की ते जाग्यावर लावून टाकायचं... म्हणजे १चमचा पुसला अडकवा चमचा स्टअँडला दुसरा पुसला... आणि असेच... सगळे एकत्र लावल्याने काय फरक पडणार हे अजूनही कळले नाही... बहुतेक हा जाग्यावर आणि सवतःला वाटतं तेच योग्य (आपलं तेच खरं करण्याचा) ओसीडी!
दुसरं - पिण्याचे पाणी ठेवण्याची सारख्या आकाराची आणि सारख्या धाटणीची ३ पातेली सारख्या ३ झाकणांसहीत! त्यांच्यातील फरक अजूनही ३ वर्षांनंतरही समजलेला नाहीय...
त्यातील १ २ ३ अशाच क्रमांकाने ते यायला हवेत तेही त्यांच्या त्यांच्या ठरवून दिलेल्या झाकणांसहीत... शाळकरी पोरं रांगेत उभे राहतात ना तसे... त्यातला एकही पोरगा आपलं पातेलं किंवा त्यावरचं झाकण मागेपुढे झालं तर आधी त्या पातेल्यांना मास्तरीण बाईंच्या छड्या आणि नंतर ते तसे ठेवणार्याला!!! अशी अनेक असंख्य उदाहरणे... [प्रतयेकाचा सेपरेट साबण वगैरे म्हणजे घरी सहा माणसे तर सहा साबण वर पाहुण्यांसाठीचा नवीन असे सात! हा पण स्वच्छतेच्या अतिरेकात टॉयलेटचे हात धुवायला डेटॉल लिक्वीड सोप वगैरे नाही बरं का... साबणाचं उरलेलं चिपाड सगळ्यांत मिळून १!]
सुरवातीला गंमत वाटायची, चेष्टाही केली भरपूर... पण नंतर नंतर मात्र हा प्रकार अगदीच डोक्यात जायला लागला... या स्वच्छतेच्या अतिरेकापायी दुपारच्या जेवायला वाजणारे ३-४... सगळ्यांवर निष्कारण होणारी चिडचिड, असह्य आरडाओरड, प्रसंगी कडाक्याची भांडणं... गढूळ वातावरण!!! यापेक्षा वाटतं बाई गं उकीरडा परवडला पण चिडचिड आवर! असो... एवढ्या वर्षांची सवय ती आता बदलता थोडीच येणारेय?? घरी आलेले पाहुणे पण पावलं मोजून टाकतात (चेष्टा नाही करत खरंच!) की पायाचा डागबिग पडला तर नस्ती आफत! सगळ्याना सवयीचं झालंय आता...
जर अतिरेक करणारी व्यक्ती हा
जर अतिरेक करणारी व्यक्ती हा आजार आहे हे मान्य करीत नसेल तर कॉउन्सिलरकडे किंवा डॉ कडे कसे नेणार?
दात घासणे. आमच्या हापिस मधला
दात घासणे.
आमच्या हापिस मधला मॅनेजर चहा पिला , काहीही खाल्ला , तरी आणि नाही खाल्ला तरीही पेस्ट / ब्रश घेउन दात घासतो ! दिवसातून ४-५ वेळा हापिस मधे !
कित्येक वेळा दात घासून झाले आणि त्याला ते स्वच्छ वाटले नाही की पुन्हा घासतो !
ओ सी डी वाले रुग्ण
ओ सी डी वाले रुग्ण स्वच्छतेच्या कल्पनेनी पछाडलेले असतात. ते सतत हात धुतात. त्यांना जंतूची भिती असते. त्यामुळे आपल्याला अपाय होईल असा भयगंड असतो.आपण करतो ते चुकीचे आहे.पण केल्यावाचून रहावत नाही.पण त्यात असेही प्रकार असतात, हे माहीत नव्हते.
मनिमाऊ... , खरंच तुला अभिवादन , इतक प्रांजळपणे मान्य केलस.....>>> खरच!
कॉउन्सिलरकडे गेलात तर मदत होऊ शकते.पण त्यांच्या म्हणण्यानुसार थोडे तरी आपल्यात बदल करावे लागतात!
सुंदर आहे लेख.
सुंदर आहे लेख.
मनिमाउ.....खरंच तुला अभिवादन
मनिमाउ.....खरंच तुला अभिवादन , इतक प्रांजळपणे मान्य केलस.....>>> +१००१
मी पण यातुन गेलोय्...जातोय....dont worry....consult a doctor.....काही जगावेगळं नाहिये हे!!
सकाळ मधील » फॅमिली डॉक्टर »
सकाळ मधील » फॅमिली डॉक्टर » बातम्या
Printer-friendly version ईमेलने पाठवा
सुटता सुटेना सवय!
- डॉ. ह. वि. सरदेसाई
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2013 - 12:15 AM IST
Tags: family doctor, dr. h. v. sirdesai, health
एखादा विचार मनात येतो आणि मग ती चिंता कमी करण्यासाठी कर्मकांड केल्यासारख्या कृती करत जातो. म्हणजे असं की, हात खराब झालेत असा विचार जाता जातच नाही. मग सतत हात धुणे सुरू होते. तीच सवय होऊन जाते. पीडित व्यक्तीला स्वतःहून हे विचार झटकून टाकणे किंवा आजार थांबविणे शक्य होत नाही.
परत परत येणाऱ्या, नको असणाऱ्या त्रासदायक विचारांना ऑबसेशन्स म्हणतात. सहसा हे विचार आपल्या अगर इतरांच्या हक्कांवर गदा आणण्यासंबंधातील, लैंगिक संबंधाबाबतीतील, धार्मिक अथवा आपल्या नुकसानीबद्दल असतात. या विचारांमुळे बरीच चिंता निर्माण होते. अशी चिंता कमी करण्याकरिता केलेल्या कर्मकांड वजा हालचालींना कंपल्शन्स म्हणतात.
कधी कधी नुसत्या चिंताजनक विचारांच्या पुनरावृत्तीनेच व्यक्ती त्रस्त होते व हालचाली करेलच असे नाही, याला ऑबसेशन्स म्हणतात. जेव्हा पुनःपुन्हा त्याच त्याच हालचाली केल्या जातात, तेव्हा त्या हालचाली केल्याखेरीज या हालचालींच्या मागे प्रेरणा देणारे विचार असतातच. या ऑबसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरची सुरवात अनेकदा लहान वयात किंवा पौगंडावस्थेत होते. सुरवातीला चिंता अगर खिन्नता जाणवते. योग्य वेळी उपचार न झाल्यास हा विकार पुढे कायम टिकू शकतो. पीडित व्यक्तीला स्वतःहून हे विचार झटकून टाकणे किंवा आजार थांबविणे शक्य होत नाही. हा विकार का होत असेल, याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींचे म्हणणे असे, की मेंदूतील काही रसायनांची निर्मिती योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात न झाल्याने हा आजार होतो. इतरांचे मत असे आहे, की लहान वयातील वैचारिक संघर्ष आणि अप्रिय अनुभवांची जाणीव नसलेल्या मनातील स्मृती यांचा हा परिणाम असतो. चिंता निर्माण करणारे विचार आणि ती चिंता शमण्याकरिता केलेली कर्मकांडे हे दोन्हीही मेंदूचे प्रतिसाद असतात. ते देण्यास मेंदू जसा शिकतो, तसे योग्य उपचारांनी मेंदूला शमवताही येते. सामान्यपणे बाह्य जगतातून आपल्या शरीरात जीवाणू-विषाणू किंवा इतर किटाणू यांचा प्रत्येक वेळी प्रवेश होऊन विकार होत नाही. अशा प्रसंगी तो होत असल्याची भीती अशा प्रकारची तक्रार फार वेळा आढळते. यासारख्या भीतीमुळे कोणाशीही हस्तांदोलन करावेसे वाटत नाही आणि जुन्यापुराण्या इमारतीत जावेसे वाटत नाही. अशा व्यक्तींशी सोबत करणाऱ्या व्यक्तीची मोठीच कुचंबणा होते. रुग्णाच्या वागणुकीची लाज वाटू लागते. अकारण पुनःपुन्हा कर्मकांडे करत बसलेल्या रुग्णाबद्दल आत्मीयता वाटेनाशी होते. मित्र-मैत्रिणी दुरावतात. त्यामुळे एकलकोंडेपणाचे जीवन वाट्यास येते. ही निरर्थक कृत्ये कधी कधी शंभर वेळा पुनःपुन्हा केली जातात. दुसऱ्या माणसाला असे करण्यात काहीच फायदा दिसत नाही. उदाहरणार्थ चालताना पावले मोजत जाणे, एखादे पाऊल मोजावयाचे राहिले तर परत पहिल्या जागी जाऊन पहिल्यापासून मोजावयाला सुरवात करावयाची. काही जण आपले हात परत परत धूत बसतात. काही जण आपली खोली पुनःपुन्हा स्वच्छ करतात, नीट लावतात. काही तरी विपरीत घटना घडू नये, या विचाराने अथवा विशिष्ट घटना घडावी, या हेतूने ही कर्मकांडे पुनःपुन्हा केली जातात. दर वेळी काही हेतू असतोच, असेही नसते.
आपल्या पाहण्यात असा दोष आढळला, तर त्या व्यक्तीला लवकरात लवकर अनुभवी तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञाची मदत लागणार आहे, हे जाणावे. अनेकदा असा आजार असणाऱ्या व्यक्तींना आपले आचार आणि विचार अयोग्य असल्याचे जाणवते सुद्धा. तथापि, त्यांना मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीची गरज आहे, हे पटवणे सोपे नसते. उपचारांविना आजार बरा होत नाही. आपले दैनंदिन व्यवहार देखील नीट पार पाडणे कठीण होते. उपचारांचा फायदा होतो. उपचार बराच काळ घ्यावा लागतो. मानसोपचार आवश्यक असतात. औषधांचाही चांगला फायदा होतो. साधारणपणे 3 महिन्यांनी औषधांचा गुण दिसू लागतो. औषधांच्या वापराने प्रामुख्याने चिंता शमण्यास मदत होते. चिंता कमी होत असताना मानसोपचारांचा फायदा अधिक होतो. रुग्णाला प्रथम मनो-शारीरिक स्वास्थ्याची स्थिती - रिलॅक्सेशन टेक्निक शिकवली जाते. ही स्थिती म्हणजे शवासनाप्रमाणे शरीरातील स्नायू व मन सैल सोडण्याचे तंत्र आत्मसात करावयास शिकवतात. या संपूर्ण सैल स्थितीत चिंता निर्माण करणाऱ्या घटनेची किंवा विचाराची स्मृती जागृत करावयास उद्युक्त करतात. हा अनुभव पुनःपुन्हा आला, तर भीतीची भावना दूर होण्यात मदत होते. क्लोमीप्रॅमिन आणि व्हेनलाफ्लेक्शिन या प्रकारच्या औषधांचा चांगला फायदा होतो. कोणतेही उपचार त्या-त्या विषयातील तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत.
हा आजार असण्याची कारणे...
हा आजार असण्याची कारणे... बालपणी झालेले मानसिक ताण... तो कशानेही असू शकतो..
जसे अतिशय कडक शिस्तीचे आई वडील..
सतत दडपणाखाली वाढलेले मूल... जिथे आई वडील एक प्रकारची भितीच निर्माण करतात...स्वच्छतेच्या नावाखाली म्हणा.. किंवा आणखी काही.
साधारण पणे घरातील कोणाला कोणाला तरी हा आजार असतो.. पण कोणालाच त्याचे माहीत नसते.
भारतात तसेही प्रॉबलेम अॅडमिट करून उपचार हा प्रकार कमीच असतो मानसिक आजांराबद्दल.
त्यात बरेच आजार येतात, OCD, BIPOLAR DISORDER वगैरे.. सगळेजणं काही नाही हो... होइल ठिक.
लग्नानंतर होइल ठिक... वगैरे फालतू युक्तीवाद...
असा पछाडलेला माणूस दुसर्याचे पन जीवन खरान करतो वा त्याला हि शिकार बनवू शकतो... असे पाहणीत आलेले आहे शास्त्रज्ञांच्या मतं...
(इती सायकोलॉजीकल डीसीज वरील एक पुस्तक)
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो!
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो!
काही सवयींचा अतिरेक कळूनही आवरता येत नाही परंतु त्यांच्यावर हळूहळू प्रयत्नपूर्वक कंट्रोल मिळवण्याचा हट्ट सोडता नये. नीटनेटकेपणाचा अतिरेक एकवेळ परवडेल पण उचलेगिरी/ तिकिटे टाळणे किंवा पैशासंबंधी अपव्यवहार ही सवय लागत नाही हेही महत्वाचे आहे.
छान आहे लेख.
छान आहे लेख.
मनोव्यापार कुणाला कळलेत?
मनोव्यापार कुणाला कळलेत? मनाचे व्यापार आहेत ते अगम्य आहेत. औषधे घेऊन बघणे ,सभोवताल बदलने,ध्यानधारणा करणे हे पर्याय आहेत. सर्व विकृतीचा गाभा हा मनासारखे न घडणे किंवा अतिअपेक्षा करणे हा आहे.
उत्तम लेख आहे. लेखांतून तर
उत्तम लेख आहे. लेखांतून तर कळलीच पण प्रतिसादांतूनही माहीती कळली.
-
मुक्ता नेने खूप मस्त प्रतिसाद दिलायत.
Pages