कवी/लेखक श्री. अरूण वि. देशपांडे यांच्या ''मन डोह'' या दुसर्या कवितासंग्रहाचे प्रकाशन थाटामाटात छत्रे सभागृहात पर पडले.
दोन व्हिडियो कॅमेरे, ऑडियो रेकॉर्डींग थिएटर साऊंड सिस्टीम तसेच ४ वादक, ५ गायक असा ताफा असल्यामुळे कार्यक्रम रंगणार यात शंकाच नव्हती. सुरुवातीपासूनच लोकांचे येणे सुरू होते. बरोबर साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू झाला तेंव्हा सर्व हॉल भरला होता.
प्रकाशन मंचावर गायक डॉ. विकास कशाळकर, डॉ. शंतनू चिंधडे, कवी अरूण देशपांडे, सुचेतानंत प्रकाशनचे प्रकाशक अजय जोशी आणि सूत्रसंचालक श्री. विनोद केंजळे होते. आपल्या धीर गंभीर आवाजाने विनोद केंजळे यांनी मंचावरेल उपस्थितांचा परिचय करून दिला. त्यानंतर कविता संग्रहाचे डॉ. कशाळकर यांच्या हस्ते औपचारीक प्रकाशन झाले.
डावीकडून अजय जोशी, डॉ. कशाळकर, डॉ. चिंधडे, अरूण देशपांडे
प्रकाशना नंतर कवी अरूण देशपांडे यांच्या 'मन डोह' य कवितासंग्रहातील काही कवितांचे गीतस्वरूप सादर झाले. उपस्थित श्रोत्यांनी अतिशय उत्तम दाद दिली.
त्यानंतर कवितेतील गाणे या विषयावर डॉ. कशाळकरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतात ते म्हणाले -
''प्रत्येक कवितेचे गाणे होत नसते आणि ते करूही नये. काही कविता अशा असतात की त्यांचे गाणे होऊ शकत नाही. मात्र जबरदस्तीने त्यांचे गाणे केले तर त्या कवितेतील भावच बिघडतो. कवितेला संगीत देताना त्यातील भाव पाहिला जातो. तो कायम ठेवला जातो. आवश्यकतेनुसार शब्द काहीवेळा बदलावे लागतात. हा, तो वगैरे शब्द जर न वापरता दुसर्या एखाद्या अधिक अर्थपूर्ण शब्दातून ते व्यक्त झाले तर आणखी चांगले गाणे तयार होते.
कवितेचा मीटर आणि गाण्याचा मीटर हे दोन भिन्न प्रकार आहेत. कवीची संवेदना गाण्यात उतरविण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या कवितेचे गाणे बनविताना त्यातील भाव ओळखून स्वररचना केली जाते. एखादा शब्द महत्वाचा वाटल्यास त्याभोवतीची स्वररचना केली जाते.
आरूण देशपांडे यांच्या कविता भावपूर्ण आहेत. त्यात मन या संज्ञेवर अधिक भर दिला आहे.''
प्रकाशक अजय जोशी आपल्या मनोगतात म्हणाले -
''माझ्यासारख्या कमी वयाचे प्रकाशक, कवी, लेखक, कादंबरीकार, कथाकार उदयास येत आहेत. अशावेळी जुन्याचे काय होणार? असा प्रश्न काहींना पडू शकतो. मात्र अरूणजींनी कवितासंग्रह प्रकाशित करून हा प्रश्नच मिटवला आहे. त्यांच्या कवितेत जुन्या-नव्याचा संगम आहे. मी एका ठिकाणी असे म्हटले आहे -
काळास बंध नाही, प्रतिभेस काळ नाही
होते नव्या जुन्याला घुसळून एक कविता
अशी तरूणांनाही आवडेल अशी कविता अरूणजींनी केली आहे.
कवी म्हटला की एक वाक्य येते. 'जे न देखे रवी, ते देखे कवी'. पण या वाक्यामुळे घोटाळा झाला. कारण त्यामुळे संध्याकाळ नंतरच्या कविता व्हायला लागल्या. कारण तेंव्हा रवी नसतो. आणि सायंकाळी ६ नंतरच्या कवितांचे पीक आले. त्यात त्या चांदण्या, त्यांचे हात, पाय, डोळे - तसेच चंद्र कमी अधिक दिसणारा, त्या तारकांचे गुच्छ, तो अंधार - त्या अंधारात घडणार्या विनोदी गोष्टी... वगैरे कवितेत फार यायला लागले. कारण त्या वाक्याचा अर्थ चुकीचा लावला गेला. जे न देखे रवी.. म्हणजे जेथपर्यंत सूर्याचे किरण पोहोचू शकत नाहीत तेथपर्यंत पोहोचतो तो कवी. सूर्य न पोचण्याची जागा म्हणजे माणसाचे मन. सूर्य आन्नातून हृदयापर्यंत या ना त्या मार्गाने पोहोचू शकतो. पण तो मनापर्यंत पोहोचू शकत नाही. तेथे कवी पोहोचतो. मन डोह या संग्रहात मनावरच्याच अधिक कविता आहेत. त्या वाचून आपल्याला नक्की आनंद मिळेल.''
या नंतर अरूणजींनी मनोगत केले. त्यात सर्वांचे आभार मानले..
शेवटी डॉ. शंतनू चिंधडे यांनी मनोगत व्यक्त केले -
'' हौssस मौssज म्हणून कविता करू नका. एक वर्षभर कवितेची वही बंद ठेवा. '' असे सांगताना दोन ओळी गाऊनही दाखविल्या.
विनोद केंजळे यांनी आभार मानले.
अभिनंदन !! छान दिलाय
अभिनंदन !!
छान दिलाय वृत्तांत..
इसकाळ मधे आला होता का हा वृत्तांत ?
(प्रकाशक अजय जोशी म्हणजे आपणच का ?)
अभिनंदन जोशीसाहेब !
अभिनंदन जोशीसाहेब !