मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आलेत असं म्हणतात.. त्याचीच पुन:प्रचिती देणारा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे नितीन देसाई निर्मित आणि रविंद्र जाधव दिग्दर्शित बहुचर्चित "बालगंधर्व".
मुळात बालगंधर्व या विषयाला हात घालण्याचं साहस करणं म्हणजे तसं कठिण. त्यात इतक्या वर्षांनंतर बालगंधर्वांना नव्या पिढीसमोर सादर करणं त्याहून कर्मकठिण. हे धनुष्य पेलायला एखाद्या ताकदवान निर्मात्याची गरज होती. आणि मराठीत सध्या नितीन देसाईंशिवाय दुसरा कोणी हे करायला धजावला देखील नसता.
नितीन देसाई नावाला शोभतील असे मोठाले सेट्स, कौशल इनामदारांचं संगीत, त्याला आनंद गंधर्व, शंकर महादेवन अशा तगड्या गायकांनी चढवलेला स्वरसाज, सर्व कलाकारांचा कसलेला अभिनय, भरगच्च दागिने, उत्तमोत्तम शालू आणि या सर्वांहून सुंदर असे बालगंधर्व साकारलेला सुबोध भावे, कुणाकुणाचं आणि किती कौतुक करावं? स्त्री वेशातला सुबोध भावे इतका देखणा दिसतो की स्वत:ला फ़ार सुंदर म्हणवणा-या स्त्रिया चक्कर येऊन पडाव्या.
कौतुक करायला शब्दसुद्धा कमी पडावे इतकी सुंदर अनुभुती देणारा हा चित्रपट अजिबात चुकवू नये...