गानभुली - काळ देहासी आला खाऊ

Submitted by दाद on 2 May, 2011 - 03:46

गानभुली - काळ देहासी आला खाऊ
मूळ - http://www.youtube.com/watch?v=26kme13XX2U

कशी गंमत असते बघा... जीव जन्माला आल्यावर फक्तं जी एकच गोष्टं अटळ, तिच आपण किती ’नाकारलेली’ असते. आपलं आपल्यालाच किती शिकवलेलं असतं... घडणं महत्वाचं.... ’न घडणं’ नाही....
हे म्हणजे कसं तर नुस्ता श्वास घेत रहा... आणि टाकत रहा... मध्ये उसंत नको क्षणाचीही... काहीतरी होत राहिलं पाहिजे... त्याशिवाय जगल्यासारखं वाटत नाही. काहीतरी सारखं घडत राहिलं पाहिजे.... मनासारखं, किंचित मनाविरूद्ध, बरचसं सुखाचं, पेलता येईल इतपत दु:खाचं... पण घडणं.... होत रहाणं महत्वाचं.... हे इतकं इतकं रुजतं आत आत खोलवर की, ’त्याने’ खांद्यावर हात ठेवला की आयुष्यातलं सगळं ’घडायचं’ काय ते थांबणार... ह्या कल्पनेने आपला थरकाप उडतो...

मृत्यू हे सुद्धा एक घडणंच आहे, बिघडणं नाही हे का विस्मरतो आपण? आपल्या जन्माच्या क्षणापासून बरोबर तो चालतोच आहे... आपण जाऊ तिथे, जाऊ त्या वेळी त्याची आपल्याबरोबर फरपट चालूच असते... असं प्रेम त्याचं आपल्यावर! फक्तं एकदाच.. एकदाच तो, ’अरे चल यार’ म्हणून खांद्यावर हात ठेवून ओढून नेतो.... हक्काने, ते एक कधी नेईल तेव्हढं एक माहीत नाही आपल्याला. आपल्या दृष्टीने हे घडणं नाही ’बिघडणं आहे... आपलं आपलं जे म्हटलं त्या सगळ्यापासून ’विघडणं’ आहे...

त्याचं खरं खरं कारण असं की जे काही आपण ’घडणं’ म्हणतोय ना, ते आपण स्वत: ’घडवत’ असल्याचा गंभीर गैरसमज!...
"मग? आपण गेल्यावर कोण घडवणार हे सगळं? कसं चालणार आपल्यावाचून त्यांचं?" हा जो ’स्वत:’ सगळं घडवत असल्याचा ’स्व’भाव किती म्हणजे किती नडतो... तर सगळ्याच जन्माला आलेल्याचं अगदी नैसर्गिक क्रमाने जे शेवटचं ’घडणं’... ते आपल्या हातात नाही, त्यावर ह्या ’स्व’चा काहीही हक्क नाही... ही कल्पनाच सहन होत नाही माणसाला. हे घडवणारा ’अहं’ नाही ’सोहं’ आहे... हे एकदा नक्की पटलं की ’त्या’नं खांद्यावर टाकलेला हात परका वाटत नाही, त्याचा दचका उरत नाही... ते ही एक ’घडणं’ म्हणून स्वीकारतो...

कसं? ते नामदेवांनी इतकं अचूक टिपलय!
अरे, ही ’त्या’ची संगत सर्वत्र आहे, सतत आहे... हे कळल्यावर नाचतात ते, आनंदाने... गातात...
आहा, हा दुसरा तिसरा कुणी नसून प्रत्यक्ष भगवंत आहे.. माझा सखा-सांगाती होऊन सदा-सर्वदा माझ्या बरोबर वावरतोय. हा पथ त्याच्या बरोबरीने चालणे आहे... नव्हे तर त्यानेच हाती धरून चालवलेला हा पथ आहे मग दु:ख कशाचे गड्यांनो?

काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ

कोणे वेळे काय गाणे
हे तो भगवंता मी नेणे

नामदेवांचे दृष्टान्त बघा तरी... किती अचूक

टाळ मृदुंग दक्षिणेकडे
माझे गाणे पश्चिमेकडे

पहिल्यांदा ऐकला तेव्हा चक्रावले... टाळ-मृदुंग दक्षिणेकडे आणि गाणं पश्चिमेकडे कसं?
गाण्यात टाळ-मृदुंग काळ किंवा साध्या भाषेत गाण्याची लय ठरवतात... आणि पाळतात. गाणं एकाच ठेक्यात, लयीत पुढे सरकत रहातं.... गाणार्‍याने कितीही प्रयत्नं केला तरी तालाची सम त्याला घ्यावीच लागते, ती लय संभाळूनच गावं लागतं... ती चौकट सोडता येत नाही.

काळाची दिशा एकच - दक्षिण... सर्व-परिचित, सर्वमान्य... मृत्यूच्या वाटचालीची दिशा - दक्षिण! हीच दिशा मुक्तीचीही. हा एकदिशा मार्ग आहे. काही कर्मं तो प्रवास लवकर घडवतात तर काही कर्मांमुळे आपण आहोत त्याच जागी तटून रहातो..... पण मागे जात नाही.
असो. पण, मग गाणं पश्चिमेकडे तोंड करून काय म्हणून?.... त्याचं उत्तर पुढल्या चरणांमधे मिळतं.
नामा म्हणे, बा, केशवा
जन्मोजन्मी घ्यावी सेवा
... जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत जीवाचा प्रवास जन्म-मृत्यूच्या चक्रात.... पूर्व - पश्चिम - पूर्व-पश्चिम होत रहाणार... पण दिशा दक्षिणेचीच, मुक्तीची.

नामदेवांना विश्वास असावा की, माझं गाणं पश्चिमेकडे आहे कारण आज अस्ताला जाणारा सूर्यं उद्या परत पूर्वेला उगवणार आहे... पुनर्जन्म आहेच ह्या जीवाला... एकच का? अनेक आहेत...
फक्तं एकच करा माझ्या जीवा-भावाच्या, ह्या जन्मी तुमच्या सेवेचं जसं करून घेतलत तसच पुढल्या जन्मीही, अन त्या पुढल्या जन्मी अन त्याच्याही पुढल्या जन्मी.... जन्मोजन्मी करून घ्या...
कसा समर्पण भाव आहे पहा... जे घडलं... ती भगवंताचीच सेवा होती.. ती सुद्धा ’मी’ केली नाही, तर त्यानं करून घेतली...

हाच अर्थं असेल असं म्हणत नाही, मी... पण हा अर्थं असेल असं वाटलं तेव्हा अन त्या क्षणापासून हा अभंग ’अ-भंग’ होऊन गेला... अव्याहत! चिरंजीव!...
धागेनधाs गदिन तागेनधाs गदिन
**********************************************
एखादं गाणं आपल्याला कुरतडतं म्हणजे काय... ते ह्या गाण्याने दाखवलं मला. नामदेवांचा अभंग आहे, श्रीनिवास खळ्यांनी अप्रतिम चाल दिलीये आणि सुरेश वाडकरांनी सुरेख गायलाय. ऐकताना सोप्पी वाटणारी चाल तालात इतकी कठीण आहे की, मी मी म्हणणार्‍या गायकांच्या नाकात दम आणते.

आता थोडं एक गाणं म्हणून मला सापडलेल्या गमती (जमती)

तालातलं फार नाही पण अगदी जुजबी कळणार्‍यांना चटकन कळेल.... की खूप गंमत केलीये चाल बांधताना. कायै, एखादं कवित्त हातात आलं की त्याचं गाणं होण्यासाठी त्यात ताल सापडावा लागतो. (चाली देणार्‍यांनी सुधारावं मला किंवा भाष्य करावं. ही चर्चा अतिशय शिकण्यासारखी आणि मजेची होईल). किंवा शब्दं तरी अशा सुरावटीत बांधावे लागतात की ताल सहजासहजी उद्धृत व्हावा.
उदा: गोरी गोरी पान... काय ठेका आहे! तालासाठी वेगळा विचार करायला नको.
आणि हे एक- ’ती येते आणिक जाते’... ह्यातल्या ओळी गाण्यात न म्हणता नुस्त्या म्हटल्या तर छंदबद्ध कविता सुद्धा वाटत नाहीत... पण हृदयनाथांनी कसली मॅड चाल बांधलीये.

तर, हा अभंग म्हणायचाच झाला तर आरतीच्या तालावर म्हणता येतो... तो एक ताल लगेच सापडतो.
’जयदेव जयदेव, जय मंगलमूर्ती’ सारखं ’काळ देहासी, आला खाऊ’
भजनी ठेका श्रीनिवास खळेंना ह्यात कसा सापडला असेल... हे एक त्यांना अणि त्या भगवंतालाच ठाऊक... अगदी नामदेवांनाही नाही.

काळ देहासी आला खाऊ.... हा ’काळ’ शब्दं भजनी तालात किती विलक्षण जागी उठलाय.
इतकच नाही तर ह्या चालीत त्यांनी भजनीच्या ठेक्याची येणारी सम कोणत्याही शब्दावर न घेता शब्दांच्या मध्ये घेतलीये. बरं... प्रत्येक वेळी ती सम त्यांनी बदललीये....
एकदा ’ळ’ आणि ’दे’ च्या मध्ये,
एकदा ’ळ’ वर
एकदा ’दे’ वर,
एकदा ’दे’ आणि ’हा’ च्या मध्ये दाखवलीये.
ऐकताना फटाके फुटतात मनात. पण कसे, आतशबाजीचे फुटतात ना, तसे.... आकाशातच पण एकाच जागी नाही... वेगवेगळ्या जागी... वेगवेगळी चमत्कृती फुलवत... एकाचं होतय तोच दुसरा... वेगळा फुलोरा आणि जर हटकून...
चालच अशी दिलीये की म्हटलं तर सम वेगवेगळ्या ठिकाणी दाखवायचं स्वातंत्र्य आहे... पण तशी ताकद (तालावर हुकुमत) हवी.

मूळ गाण्यात सुरेश वाडकरांची ’काळ’ वर तान झकास उठलीये. कडव्यात मधे ’टाळ मृदुंग दक्षिणेकडे’ वर भजनी सोडून अगदी पारंपारिक मृदुंगाचा ’धागिनधाग तिन ताकिन धाग धिन’ असलं सुरू होतं... छ्छे! ते तर थांबूच नये असं वाटतं.. इतकी ती दक्षिणेची वाटचाल वेधक आहे.

’आम्ही आनंदे’ ची थुई थुई कारंजी प्रत्येक वेळी त्याच त्या हरकती असून सुद्धा तितकीच सुखावतात. शेवटच्या कडव्यात ’बा केशवा’, हे इतकं इतकं आर्जवाने म्हटलय, इतकी आर्तं हाक आहे केशवाला की... तिथेच जीव अडकतो... पुढे काळ देहाला खाऊ आलेला जाणवतच नाही...

एक गंमत सांगते. नवर्‍याशी ह्या पूर्व-पश्चिम आणि दक्षिण बद्दल बोलले तर म्हणाला सोप्पय! हे म्हणजे "आपल्या सायनुसॉइडल वेव्ह" सारखं... साईन वेव्ह अक्षा भोवती वर खाली एकाच गतीत होते पण प्रवास अक्षाची दिशा धरून.... (त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं गणितात सापडतात... ’आपल्या’ गणितात! मला सापडलीच तर... अगणितातच!)

वाडकरांनी गायलाय छानच... पण मला पंचरत्नांपैकी "मोदकाने" (प्रथमेश लघाटे) गायलेलं अधिक आवडलं.
http://www.youtube.com/watch?v=vwBU8OT7TUo.
मूळ गाण्यात तालात गाण्यासाठी, किंवा चालीची गंमत दाखवण्यासाठी शब्दं किंचित तोडून म्हटल्यासारखे आहेत.
काळ... देss... हाss... सीss... असं.
खरतर शब्दं तोडलेले नाहीत पण त्यातली मिंड घेताना मधे आवाज इतका लहान केलाय की, "देहासी" हा शब्दं तोडल्यासारखा वाटतोय.
पण मूळ गाणं ऐकून ऐकून लोकांनी त्यावर अधिक विचार केलाय. आता, तालासाठी शब्दं तोडून न गाता एकसंध गाऊनही तालाची गंमत दाखवता येण्याइतका हा विचार प्रगल्भं झालाय. माणसं अधिक "शहाणीवेनं" हे गाणं गातायत. प्रथमेशचं हे गाणं असं शहाणं झालेलं आहे.
ह्या मुलाची तालाची समज किती प्रगल्भं आहे हे त्याचं ते एकच कडवं ऐकण्यात कळतं. प्रथम ऐकलं तेव्हा लय किंचित कमी घेऊन गातोय का काय असं वाटलं. पण नाही. लय मुळच्याच गाण्याची आहे.
त्याच्या गाण्यात भजनी ठेका, ठळक आठ (किंवा सोळा) मात्रांचा न रहाता अधिक लवचिक होतो. मात्रा तितक्याच... पण मात्रांची सैनिक-परेड न होता झुल्यावर बसल्यासारखा प्रथमेश त्या ठेक्यात खेळतो.

अनिरुद्धं जोशीनंही चांगलं गायलय - http://www.youtube.com/watch?v=oHnqIX3yp7o&feature=related
पण मूळ गाण्यापासून फार दूर न जाता प्रथमेशनं जे साधलं ते... केवळ अप्रतिम.

अगदी खरं सांगायचं तर, मला ना, हा अभंग पंडितजी कसा गातील किंवा वसंतराव कसा गातील असं मॅडसारखं वाटत रहातं... गाण्यातल्या भावाशी समरसूनही तालाशी खेळणं जमणारे हे खेळिया.... ह्याचसाठी, ह्याच अतृप्तं इच्छेसाठी... तेव्हढ्याचसाठी पूर्व-पश्चिम होणार आमचं बहुतेक.

गुलमोहर: 

दाद, अग तू कोणत्याही गाण्याची मर्मस्थळं इतकी सुरेख उलगडून सांगतेस की ते गाणं मनात नंतर कितीतरी दिवस दरवळतच राहतं. याही गाण्यातला गर्भित अर्थ फारच सुरेख सांगितलयास.

त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं गणितात सापडतात... ’आपल्या’ गणितात! मला सापडलीच तर... अगणितातच! >>> हो ग, गणित-अगणित एकच आहेत गं. कोण कोणत्या बाजूनं बघतोय त्यावर ते ठरतं एवढच.

सुंदर............!!

गाण्याचं मला ज्ञान नाही.. पण हा लेख वाचताना हे गाणं नव्याने कळालं...:)

लेख अगदी सुरेख .
संत नामदेवांच्या या अभंगाचा मला लागलेला अर्थ असा-
काळ देहावर इतका हावी झाला असतानाही आम्ही आपले आनंदात नाचत गात आहोत [आमचा धि:कार असो ,खर तर ही आमची हार आहे हेच आम्ही जाणत नाही.]
भगवंता कुठल्या वेळी कुठल गाण म्हणाव एवढही आम्ही समयोचीत असू नये?
आमच्या टाळमृदुंगात दम नाही [शेवटी ती मृत्युपंथावर असलेल्या शरीरानेच वाजवलेली]आणि आमच गाण
ते काय ,ते तर भोगवादी .
तेव्हा या सर्वात खरी काय असेल ती फक्त तुझी सेवा .जिथे जिथे व जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आमच्याकडून तुझी सेवा करून घ्यावी ही विनंती .
[गुरू गीतेत असा श्लोक आहे-
उत्तरे शांती कामस्तु ,वश्ये पूर्वमुखो भवेत
दक्षिणे मारणं प्रोक्तं ,पश्चिमेच धनागम:
त्यामुळे उत्तर ही दिशा मनःशांतीची ,पूर्व दिशा ही स्वत:कडे वश करून घेणारी ,दक्षीण दिशा ही काळाची पश्चिम ही दिशा भोगवादी :
चूक भूल देणे घेणे .

मस्त..
मी अजुन नीट ऐकला नाहिये, पण ऐकीन आता नक्कि एवढं सुंदर स्पष्टिकरणं वाचल्यावर.

अप्रतिम.... नेहमीप्रमाणेच Happy

अभंग तर सुंदरच आहे पण तु असं काही लिहीलयस की वाचताना सुद्धा अंगावर रोमांच उभे रहावेत Happy

अजुन लिही... लिहीत रहा Happy

मृत्युकडे इतक्या सकारात्मक दृष्टीने बघणारी आणि ती सकारात्मकता तितक्याच मार्मिकतेने उलगडून दाखवणारी तुमच्यासारखी व्यक्ती विरळाच! तुमची 'बाबुल मोरा' अजूनही मनात रेंगाळत असते आणि आता ही गानभुली! काहिसे बाबुल मोराशी साम्य वाटले पण "टाळ मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे पश्चिमेकडे' याचा तुम्ही लावलेला अर्थ कदम पटला! पंडीतजींनी सांगितलेला अर्थ पण पटला होता पण मग पुढच्या दोन ओळींचा अर्थ नीट लागत नव्हता आता तो पण लागला.

रच्याकने "साईन वेव' चा संदर्भ निव्वळ अफलातून. माणसाला कशात काय जाणवेल हे सांगता नाही यायचे.

गाणे आधीही ऐकले होते पण तितकेसे मनात उतरले नव्हते. पण प्रथमेशचे गाणे एकदम अप्रतिम झाले होते (पण यच्याहून त्याचे 'दत्तदर्शनीला जायाचं' माझे जास्त आवडते) आणि त्यानंतरचे पंडितजींचे छोटेसे निरुपण तेवढेच सुंदर होते. तेंव्हापासून हे गाणे खूप आवडायला लागले - कदाचित कळल्यामुळे असेल. आता तुमचा लेख वाचून अधिकच आवडले.

उत्तरे शांती कामस्तु ,वश्ये पूर्वमुखो भवेत
दक्षिणे मारणं प्रोक्तं ,पश्चिमेच धनागम:
त्यामुळे उत्तर ही दिशा मनःशांतीची ,पूर्व दिशा ही स्वत:कडे वश करून घेणारी ,दक्षीण दिशा ही काळाची पश्चिम ही दिशा भोगवादी :
चूक भूल देणे घेणे .

छाया धन्यवाद ! नवीन माहीती योग्यच आहे.

सगळ्यांचे पुनःपुन्हा आभार.

छायाताई, उशीराने उत्तर देतेय तुमच्या प्रतिसादाचं. तुम्हाला लागलेल्या अर्थाला तर श्लोकाचं प्रमाण आहे... सुंदर. तो ही अर्थं भावलाच.

दाद, सुंदर! विषय आपल्याला कळणे व तो उलगडून दाखवणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण तुमचा दोन्हीत हातखंडा आहे. मानलं तुम्हाला!

हे म्हणजे कसं तर नुस्ता श्वास घेत रहा... आणि टाकत रहा... मध्ये उसंत नको क्षणाचीही... काहीतरी होत राहिलं पाहिजे... त्याशिवाय जगल्यासारखं वाटत नाही.

दाद बाई, कसं जमतं हो इतकं छान लिहायला ? Happy

गाणं ऐकलेलं नाही अजून. पण आता ते ऐकून पुन्हा एकदा लेख वाचून काढावासा वाटतोय.

''ऐकताना फटाके फुटतात मनात. पण कसे, आतशबाजीचे फुटतात ना, तसे.... आकाशातच पण एकाच जागी नाही... वेगवेगळ्या जागी... वेगवेगळी चमत्कृती फुलवत... एकाचं होतय तोच दुसरा... वेगळा फुलोरा आणि जर हटकून...'
या अद्भुतरम्य गाण्यावर इतके समर्पक सखोल भाष्य,दाद,सदके जांवां..

हा अभंग खूप आधीपासून ऐकलाय आणि प्रत्येकवेळी ते दक्षिण - पश्चिम मनात वेगवेगळा अर्थ लावत बसायचं.या लेखामुळे ते प्रकट वाचतोय असा अनुभव मिळाला...:)
तालातलं विशेष कळत नाही त्यामुळे मागे एकदा म्हटलं होतं तसं याबाबतीत "दाद" यांची शिकवणी लावावी Happy
मी सारेगम घाऊक पाहते त्यामुळे खुपदा ते लक्षात राहण्याइतकं रजिस्टर होत नाही त्यात पं काही वेळा इतकं दिर्घ बोलायचे की गाणं कसं गायलं होतं ते विसरूनच जायचे Proud आता प्रथमेशचं नीट ऐकेन .. अर्थात वाडकरांचा आवाज / गाणं आवडतंच ..
खळेकाकांच्या गाण्यांबद्दल आपले लेख वाचायला नक्की आवडतील.

ग्रेट लेख
अतिशय ज्ञानवर्धक
खूप आवडला

_______________________
टाळ मृदुंग दक्षिणेकडे
माझे गाणे पश्चिमेकडे>>>>>>>>>

यावर फार सुंदर आध्यात्मिक मत दिलेत तुम्ही !!
मीही विचार केला यावर माझी मते अशी आहेत
नामदेवराय विठ्ठल मंदिरात ज्या गरुडखांबाजवळ उभे राहून कीर्तन करीत (गात) तो गाभार्याच्या बाहेर जरा दक्षिणेकडे (पूर्व -दक्षिण यांमध्ये ) आहे . देव पश्चिमेकडे आहे (पूर्वाभिमुख)
टाळ-मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे पश्चिमेकडे >>>म्हणजे देव पश्चिमेकडे मी दक्षिणेकडे असाही अर्थ असण्याची शक्यता आहे

असो हा मुद्दा महत्त्वाचा नाही

धन्यवाद
वै व कु

अहाहा! अप्रतीम!

गानभुली वाचून दिवसभराचा सगळा थकवा पार निघुन जातो हो! खरच शब्द नाहीत!

खूप खूप धन्यवाद!

Happy

Pages