बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा केनियामध्ये जाऊन एका रिपोर्टरने त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भातली बातमी केली होती... ही बातमी अल जझीरा (इंग्लिश)च्या माध्यमातून प्रसिद्ध झाली आणि मग सीएनएन या वृत्तवाहिनीने या वार्ताहराला शोधलं... टॉड बेअर त्याचं नाव... अल जझीरा या कतारच्या वाहिनीचा तो मध्यपूर्व देशांचा प्रतिनिधी होता... मग त्याने पुण्यात साम टीव्ही, सीएनएन आयबीएन या चॅनल्सच्या वार्ताहरांना प्रशिक्षण दिलं. त्याची भेट मागच्याच आठवड्यात प्रहारच्या ऑफिसमध्ये झाली आणि ते दोन दिवस आम्ही दोघे एकत्र होतो... त्याच्याशी संवाद साधणं म्हणजे एक नवीनच जग उलगडल्यासारखं वाटलं... रोजच्या बातम्यांना एक्स्लुझिव्हचा टॅग लावून त्या पेश करणार्या मीडियाची शरम वाटली...
टॉड प्रहारच्या ऑफिसमध्ये आला आणि त्याच्याशी प्रथम बोलताना आपण आधी कधी भेटलो नाही आहोत असं वाटलंच नाही... वर्षानुवर्षांची ओळख असावी असं त्याचं बोलणं...
अल जझीराच्या माध्यमातून त्याने अनेक गोष्टी कव्हर केल्या.. त्यात बेनझीर भुत्तोंचं हत्याकांड, कराचीमध्ये एका गोळी लागलेल्या आणि मरणपंथाला असलेल्या माणसाचा "बाईट" कुणीतरी घेतल्यावरून जगभरात निर्माण झालेला वाद, गाझा पट्टीत झालेलयुद्ध्, मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला असं एक ना अनेक त्याने कव्हर केलं... या सगळ्यांचा व्हिडिओज त्याने दाखवल्याच पण त्याचबरोबर हे रोमांचक अनुभव शेअर करताना त्याने पत्रकारितेबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या... गाझा पट्ट्यात युद्धाच्या दरम्यान तरुणांचा दुर्दम्य आशावाद त्याने जगासमोर आणला... कदाचित आपल्याकडच्या लोकांना अगदीच छोटी वाटणारी बातमी अगदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कशी महत्त्वाची ठरते हे त्यातून दिसलं...
भारतातली पत्रकारिता हत्या, चोर्या, बलात्कार, गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांच्यापलीकडे गेलेली दिसत नाही.. हे नाही तर मग चॅनल्सवर सीरियल्स आणि सिनेमांचे प्रीमीयर... बातमी कधीपासून मनोरंजन होऊ लागलीय? पहिल्याच प्रश्नावर मी अवाक... भारतातली चॅनल्स अजिबात गंभीर नाहीत. बातमी कशी सादर करायची त्याचं त्यांना गांभीर्य नाही... बातमीदारी हा एक गंभीर व्यवसाय आहे आणि तो तितक्याच गांभीर्याने करायला हवा... पण हे जरा कठीणच दिसतं... कारण योग्य माहिती देण्यापेक्षा ती सनसनाटी कशी होईल याकडे लक्ष दिलं जातं, तो पुढे म्हणाला...
मग विषय वळला पेड न्यूजकडे... पश्चिमेकडच्या देशांमध्ये पत्रकारांनी गिफ्ट किंवा रकमेच्या स्वरूपात काय स्वीकारावं याचे काही लिखित नियम आहेत का?- इति मी... हो आहेत तर!! तिथे पत्रकारांना १०० डॉलर्सपेक्षा जास्तीचं गिफ्ट स्वीकारायचं असेल तर डायरेक्टरची परवानगी घ्यावी लागते... तसं केलं नाही तर पत्रकाराला एका वर्षासाठी नोकरीतून बाहेर राहावं लागतं आणि दुसरा कुठलाही पेपर किंवा चॅनल्स त्यांना नोकरी देत नाही... भारतात पत्रकारांनी कुठल्याही कंपनीने कुठे व्हिजिटला नेलं तर जाऊ नये... स्वखर्चाने जावं... टॉड... पण भारतात पत्रकारांना इतका पगार दिला जात नाही की त्यांना कुठेही स्वखर्चाने जाता येईल... पण तरीही कुठलाही पत्रकार कंपनीने नेलं म्हणून त्यांच्याबद्दल चांगलंच लिहिल असंही नाही... त्यांना जे दिसतं तेच लिहिलं जातं... हे माझं उत्तर...
पाश्चिमात्य देशांमध्ये राजकीय नेत्यांना वृत्तपत्र किंवा चॅनल्स चालवण्याची, त्यात गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. एकतर तुम्ही मंत्री असता किंवा मग तुम्ही व्यावसायिक असता... दोन्ही एकाच वेळी करता येत नाही... टॉड म्हणाला... पण भारतीय मीडियामध्ये नोकरी बदलणं जितकं सोपं आहे तितकं तिकडे सोपं नाही... खूप कडक नियम आहेत. या नियमांचं उल्लंघन करणं म्हणजे करिअरचं नुकसान करण्यासारखं आहे...
आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता करताना नेमक्या काय काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते? यावर टॉड म्हणाला, सर्वात पहिलं- तुमची कागदपत्रं क्लिअर असणं महत्त्वाचं... माझ्याकडे दोन अमेरिकन पासपोर्ट आहेत आणि दहा देशांचे व्हिसा आहेत... त्यांची तारीख उलटली तर नाही ना, हे तपासणं, ती सतत दुरूस्त करून घेणं आवश्क. मग तुम्ही नेमकं काय कव्हर करायला जाताय त्याचा अंदाज घेणं... एखादं हत्याकांड किंवा तत्सम काही कव्हर करायचं असेल, युद्ध असेल तर तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवावं लागतं... त्याची जबाबदारी दुसरं कुणीही घेणार नाही... त्यानंतर असेल त्या परिस्थितीत संयम ठेवून बातमीदारी करणंही महत्त्वाचं... तुम्ही जगाला काय दाखवू इच्छिता हेही महत्त्वाचं... "मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा संपूर्ण जगातला मीडिया त्यात किती अमेरिकन मेले आणि किती परदेशी मेले हेच दाखवत होता. पण माझा एक ऑस्ट्रियन मित्र म्हणाला, हा हल्ला भारतावरचा हल्ला आहे. त्यात १५० भारतीय मेले आहेत... माझंही तेच मत होतं. एकट्या अल जझीरा ने जगासमोर ही गोष्ट स्पष्ट केली" टॉडने आपला अनुभव सांगितला... गाझाच्या पट्टीत खूप धोका होता. तिथे बॉम्ब कुठे लावून ठेवला आहे, भूसुरूंग कुठे आहे तेच कळत नव्ह्ततं... एक पाऊल टाकायचो आणि ठार व्हायची भीती, हे ऐकताना अंगावर काटा उभा राहिला होता...
हल्ली या आंतरराष्ट्रीय चॅनल्सची मानसिकता बदलली आहे... त्यांना युरोपिय किंवा गोर्या चेहर्याच्या लोकांनी भारतात वगैरे येऊन बातमीदारी करावी असं वाटत नाही... मी लेबनीज अमेरिक्न आहे पण तरीही मला लेबनॉनमध्ये जाऊन बातमी सांगणं त्यांना फारसं रूचत नाही... भारताची बातमी भारतीयांनी सांगावी, असं त्यांना वाटतं. पण भारतीय तरुणांकडे तो दृष्टिकोन दिसत नाही... हे जाणून टॉड आणि त्याच्या काही सहकार्यांनी दिल्लीत आयएमआयआय नावाची एक संस्था सुरू केलीय आहे. अल जझीरा, सीएनएनसारख्या चॅनल्स, टॉड जिथे शिकला त्या युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रासाकाने त्याला पाठबळ दिलंय... आता पुढची दोन वर्षं टॉड भारतीय तरूणांना हे प्रशिक्षण देणार आहे... आंतरराष्ट्रीय दर्जाचे पत्रकार घडवण्याचा वसा मी घेतलाय, टॉड आवर्जून सांगतो...
एक भेट टॉड बेअरशी
Submitted by ठमादेवी on 18 April, 2011 - 09:35
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठमे चांगलं लिहिलय्स.. कंटाळून
ठमे चांगलं लिहिलय्स..
कंटाळून परत जाईल तो टोड, कारण ह्यासाठी वृत्ती बदलणं मुळात गरजेचं आहे..
समीर टॉड दोन वर्षं आहे
समीर टॉड दोन वर्षं आहे भारतात... कॉलेज चालवायला आलाय तो!!!
कंटाळून परत जाईल तो टोड, कारण
कंटाळून परत जाईल तो टोड, कारण ह्यासाठी वृत्ती बदलणं मुळात गरजेचं आहे..>>> हीच ती वृत्ती!

हीच ती वृत्ती! >>
हीच ती वृत्ती! >> पत्रकारांची आणि पत्रकार होउ घातलेल्यांची.. :p
ठमे सुट्टी घालवायची त्याची आयडीया आवडली पण मला.. :p
टॉड बेअर , खरेच बोलला, पण
टॉड बेअर ,
खरेच बोलला,
पण आपल्या कडे खरे बोलण्यारांचे काय हाल होतात सर्वानाच ठाऊक आहे.
आपण फक्त छान लेख म्हणावे.
सम्या...
सम्या...
रॉज आपल्याकडचा नाहि तो..
रॉज आपल्याकडचा नाहि तो..
ठमा, लेख चांगला आहे.
ठमा, लेख चांगला आहे.
भारतातली पत्रकारिता हत्या, चोर्या, बलात्कार, गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांच्यापलीकडे गेलेली दिसत नाही.. हे नाही तर मग चॅनल्सवर सीरियल्स आणि सिनेमांचे प्रीमीयर... बातमी कधीपासून मनोरंजन होऊ लागलीय? पहिल्याच प्रश्नावर मी अवाक... भारतातली चॅनल्स अजिबात गंभीर नाहीत. बातमी कशी सादर करायची त्याचं त्यांना गांभीर्य नाही... >>> हे मात्र पटलं नाही. भारतातच नव्हे पण इकडेही बव्हंशी प्रमाणावर अशाच बातम्या असतात आणि हे लोण इकडुनच (प्रगत देशांतुन) तिकडे (भारतात) गेलं आहे. अलीकडेच भारतात मोठ्या मुक्कामाच्या दरम्यान बातम्या बघताना हे जाणवलं.
आपल्या देशांत पत्रकारांवर
आपल्या देशांत पत्रकारांवर सेन्सॉरशिप नाही, हे आपल्यासाठी भाग्याचे आहे.
नायजेरियातल्या माझ्या साडेतीन वर्षापेक्षा जास्त झालेल्या वास्तव्यात मी एकदाही तिथे स्थानिक वर्तमानपत्र वाचले नाही. प्रचंड बंधने असल्याने, त्यात काही वाचण्यासारखे नसायचेच. खूप वेळा तिथल्या अपघाताच्या वगैरे बातम्या, भारतातील वर्तमानपत्रात वाचायला मिळायच्या पण तिथल्या नाही.
ओमानमधे तर बातम्या देण्यासारखे काही घडायचेच नाही. भारतातल्याच बातम्या असायच्या तिथे.
पण तरिही मला भारतातील बातम्यांची भाषा / त्या वाचून दाखवायची भाषा यात खूप फरक पडलाय असे जाणवतेय. अगदी दूरदर्शनच्या बातम्यात देखील एक आब असायचा. (कुणाला वंदना पंडीत ने दिलेली जयप्रकाश नारायण यांच्या मृत्यूची बातमी आठवतेय का ? तिने ते दहा मिनिटाचे वार्तापत्र पूर्ण तोंडपाठ करुन, आणि डोळ्यातील पाणी प्रयासाने थोपवून सादर केले होते.) आताचे वाचक इतके एक्साईट का झालेले असतात तेच कळत नाही. शिरा ताणून बोलल्याने, तूमच्या बातमीची व्हॅल्यू वाढणार आहे का ?
ठमे, वाचला गं लेख. छान
ठमे, वाचला गं लेख. छान लिहिलाय. तुम्हा पत्रकारांविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण आजही तुमच्यामुळे समाजाला कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तलवार वापरताही येते आणि म्यान ही करावी लागते. अर्थात हे परीस्थितीवर अवलंबून आहे. टॉड भारतातल्या होतकरू पत्रकारांमधे काहीतरी चेंज घडवेल आणि विद्यार्थी त्याला ते घडवू देतील अशी अपेक्षा.
रानडे आहो ते पत्रकारांविषयी काही बोलू नका. ते कधीपण आणि कुठेपण स्टींग ऑपरेशन करतात बाबा
आपल्यालातर फक्त 'टिंग ऑपरेशनच' माहिती आहे होय ना?

ठमे, टॉडचा २ वर्षासाठीचा प्लॅन काय आहे? जरा विस्कटून सांग. हवं तर त्याची मुलाखत घे. प्रश्न मायबोलीकर विचारतील.
ठमादेवी , लेख आवडला.
ठमादेवी , लेख आवडला.
ठमादेवी टॉड बेअर यांची ही भेट
ठमादेवी टॉड बेअर यांची ही भेट अतिशय त्रोटक वाटते आहे. त्यांनी केलेले काम तुम्ही आणखी सविस्तर लिहायला हवे (होते)
दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे लेखात प्रत्येक वाक्या नंतर असणारे ... वाचतांना त्रासदायक होत आहेत. तुम्ही एक पत्रकार आहात त्यामुळे माहितीपर लेख कसा असावा हे तुम्हाला आमच्या (सामान्य वाचक) पेक्षा जास्त चांगले माहित असणार.
तुमच्या या लेखामुळे सुद्धा पुन्हा बातमी/माहिती सादर करण्याबाबत पत्रकार कसे गंभीर नाही हेच दिसतेय असे माझे मत बनले.
स्पष्ट पणे लिहिलय त्याबद्दल राग मानू नये.
मस्त लेख...
मस्त लेख...
मला बरखा दत्त चे नाव ऐकले २G
मला बरखा दत्त चे नाव ऐकले २G घोटळ्यात मध्ये तेव्हा धक्का बसला होता...
ओके एचएच, ती सवय घालवायचा
ओके एचएच, ती सवय घालवायचा प्रयत्न करते आहेच मी.
टॉडची विस्तृत मुलाखत मी घेतेय... ज्यांना कुणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी ते माझ्या विपुत किंवा इथेच डकवले तरी चालतील... किंवा गटगची कल्पनाही मी समोर ठेवली आहे.
छान माहिती. थँक्स.
छान माहिती. थँक्स.
ओक्के... आत्ताच टॉडशी बोलणं
ओक्के... आत्ताच टॉडशी बोलणं झालंय... तो शुक्रवारी मुंबईत येतोय... मला त्या दोन दिवसांत भेटेल... प्रश्न ज्यांना विचारायचे आहेत त्यांनी ते येत्या शुक्रवारपूर्वी माझ्या विपूत डकवावेत...
टॉडने तुम्हा सगळ्यांचे आभार मानले आहेत... हा लेख त्याच्या फेसबुकच्या वॉलवर शेअरही केला गेला आहे...
छान माहिती. तुझ्या
छान माहिती. तुझ्या पत्रकारितेसाठी शुभेच्छा.
टॉडची विस्तृत मुलाखत मी घेतेय
टॉडची विस्तृत मुलाखत मी घेतेय >>
मायबोलीवर पण येणार का ही मुलाखत? वाचायला नक्कीच आवडेल. त्यांनी गाझा पट्टी आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी केलेल्या कामाबद्दल जमल्यास विस्ताराने लिहाल.
तसच त्यांनी दिल्लीत चालू केलेल्या संस्थेबद्दल देखील आणखी जाणून घ्यायला आवडेल.
नक्की एचएच. ही मुलाखत मी
नक्की एचएच. ही मुलाखत मी माबोसाठीच घेणार आहे
मायबोलीसाठी मुलाखत घेताय!
मायबोलीसाठी मुलाखत घेताय! मस्तच. वरचा एक आढावा घेणारा लेख आवडला.
हहला अनुमोदन.
ठमा, विपूत प्रश्न चिकटवले
ठमा, विपूत प्रश्न चिकटवले आहेत.
खुपच छान... आमच्यसारख्या न
खुपच छान... आमच्यसारख्या न व्या पिढीतल्या तरुणांना यातून भरपूर शिकण्यासारखं आहे.. एवढी उत्तम माहिती दिल्याबद्दल खरच धन्यवाद..!!
चान्गला लेख. एचएच चा आक्षेप
चान्गला लेख.
एचएच चा आक्षेप काही अन्शी बरोबर आहे, पण मनात बरच काही असताना, सगळेच शब्दरुपाने उलगडुन रेडिमेड मान्डण्याऐवजी काही भाग वाचकान्च्या विचारशक्तिवर सोडलाय असे मला जाणवते, प्रेझेन्टेशन मात्र अजुन सुधारता येईल.
या लेखानिमित्ताने मायबोलीवर "पत्रकारिता" हा विषय नव्यानेच मान्डला गेला ते चान्गले झाले.
माझ्यामते, आज राजकारणी / नेते म्हणले की एक प्रकारची तिडीक्/चीड सामान्यलोकान्च्या मनात सहज उभी रहाते. गेल्या साठ वर्षान्चा हा परिपाक आहे. पण पत्रकारान्चे (एकूणच मिडीया)बाबतीत देखिल अशाच प्रकारची तिडीक उमटणे वा आदर/विश्वास वाटणे यातिल सीमारेषा फारच पुसट होत चालली आहे असेही जाणवते. पत्रकार्/मिडियान्नी याबाबत काळजी घ्यायलाच हवी. टॉडची मते या दृष्टीने नक्कीच मार्गदर्शनपर ठरतील असे वाटते.
<<<त्यांना युरोपिय किंवा
<<<त्यांना युरोपिय किंवा गोर्या चेहर्याच्या लोकांनी भारतात वगैरे येऊन बातमीदारी करावी असं वाटत नाही.
हे का बरं?
बाकी लेख चांगला लिहिलाय.
छानच लेख. सविस्तर मुलाखत
छानच लेख. सविस्तर मुलाखत वाचायला आवडेल..
<<<त्यांना युरोपिय किंवा
<<<त्यांना युरोपिय किंवा गोर्या चेहर्याच्या लोकांनी भारतात वगैरे येऊन बातमीदारी करावी असं वाटत नाही.
हे का बरं?>>> outsourcing!!!
अतिशय चांगला लेख. पण थोडा
अतिशय चांगला लेख. पण थोडा त्रोटक वाटतोय. अजून माहीती येऊ दे.
लेख आवडला. टॉड बेअरचा करून
लेख आवडला. टॉड बेअरचा करून दिलेला परिचय खासच.. पण त्यापासून शिकताना आपल्याच व्यवसायाचं त्रयस्थपणे केलेलं प्रामाणिक विश्लेषण जास्त भावलं..
कोमल, चांगला लेख ! टॉड
कोमल,

चांगला लेख !
टॉड बेअरने भारतीय मेडियाचा पार कचराच केला..
एवढया मोठ्या देशातल्या मेडियाला अशी वेळ येणे हे नक्कीच शोभणारं नाही, चांगल लक्षणही नाही.
काही पेपरवाले, पत्रकार तर जातीवर आधारित, रंजित, भडकावणारे, फक्त आपल्या फायद्याच्या बातम्या छापण्यात धन्यता मानतात, आव तर खुप मोठ्या पत्रकारितेचा आणायचा आणि दुसरीकडे राजकिय नेत्यांशी हितसंबध ठेऊन आपला फायदा,लाभ मिळवत जनतेवर दबाव ठेवण्याच काम करताना दिसतात.
Pages