सर्वांचे एकमत - ज्योती मेहता

Submitted by बेफ़िकीर on 11 April, 2011 - 08:34

अचानक कुत्र्याचे एक अत्यंत गोंडस पिल्लू मिळालेल्या चार मैत्रिणी एकमेकींशी तावातावाने भांडत होत्या. या पिल्लाला कसे वाढवायचे यावर त्यांचे वाद चालले होते. एक म्हणाली की हे सुदृढ व्हायला हवे. दुसरी म्हणाली हे शिकारीत तरबेज म्हणजे हुषार व्हायला हवे. तिसरी म्हणाली याने आपल्याच लोकांवर भुंकता कामा नये. आणि आपल्याच लोकांनी याला खायला दिलेच पाहिजे. चौथी म्हणाली याला खायला रोज एक गुबगुबीत कोंबडी मिळाली पाहिजे. त्या भांडणांमध्ये निर्णय काहीच न झाल्यामुळे जी ती आपापल्या मर्जीप्रमाणे कुत्र्याला वागवायला लागली. परिणामतः कुत्रे कायम चार तक्रारी करत राहिले. मी सुदृढ नाही, मला शिकार मिळत नाही, मला आपले लोक खायला देत नाहीत आणि दररोज एक गुबगुबीत कोंबडी मिळावी ही माझी इच्छा पूर्णच होत नाही.

ते सुदृढ व्हावे म्हणणार्‍या मत्रिणीचे नांव होते काया! शिकार करावी म्हणणारी होती मती! आपल्या लोकांनी याला खायला द्यायलाच पाहिजे म्हणणारीचे नाव होते मन! आणि रोज एक कोंबडी मिळावी म्हणणारी होती कामना!

काया, मती, मन आणि कामना या चार मैत्रिणींना ते कुत्र्याचे पिल्लू, म्हणजे एक आयुष्य मिळालेले होते. एक जन्म मिळालेला होता.

मी माझ्या आयुष्यात या चार मैत्रिणींना कधीच एकत्र आणत नाही. म्हणजे कोणत्याही दोघींनाही एकत्र आणत नाही. त्या एकमेकींना कधी भेटलेल्याच नाही आहेत.

शरीर सुदृढ असावे असे म्हणणार्‍या कायेला मी मतीचा स्पर्शच होऊ देत नाही. त्याचमुळे मला व्यसने करताना कसलीही फिकीर नसते. माझी काया तेव्हा बोंब मारत नाही. कारण तेथे मती नसल्याने तिला समजतच नाही की तिच्यावर काय परिणाम होतो आहे. मतीला कायम वाटते की माझी बढती व्हावी, माझे राहणीमान सुधारावे, माझ्या सर्व भौतिक इच्छा पूर्ण व्हाव्यात! पण तिच्याशी 'कामना' य मैत्रिणीचा कधी संबंधच आलेला नसल्याने 'आपल्याला अजून काय हवे' हे तिला समजतच नाही. आहे तेच खूप मानते ती! याचाच परिणाम म्हणून माझी नोकरीतील प्रगती नियमीतपणे होत असूनही मला कधी असे वाटत नाही की मागे पडलो. किती ग्रेट आहे नाही मी? या चौघींपैकी माझी सर्वात लाडकी मैत्रिण आहे मन! मी मनाप्रमाणे वागतो. मनाच्या कार्यात मी इतर काहीही येऊ देत नाही. मनाला तोषवणे यासाठी मी मला मिळालेला वेळ वापरतो. आणि कामना? इतर सर्वांप्रमाणेच कामना ही माझ्याही बाबतीत ज्या चार मैत्रिणी आहेत त्यातील सर्वात प्रबळ मैत्रिण आहे. तिला जे हवे ते ती सतत घोकत असते. उठता बसता ऐकवते. पण मी तिचा काया आणि मती यांच्याशी संबंध येऊ देत नाही. त्यामुळे तिची अवस्था एखाद्या उपचारांविना घरघर लागलेल्या रुग्णासारखी आहे. कधी चुकून जर कामनेचेच मत मनानेही मांडले तर मात्र मी कामनेची कामना पूर्ण करतो, पण तीही माझ्या मनाची इच्छा म्हणून, तिची इच्छा म्हणून नव्हे!

ज्योती मेहताच्याबाबतीत मात्र चारही मैत्रिणी इतक्या जिवाभावाच्या होत्या, की दृष्टच लागावी त्यांच्यातील प्रेमाला!

पुणे विद्यापीठासारखा अवजड उद्योग दुसरा नाही. इकडून तिकडे जायचे म्हणजे गावाला गेल्यासारखे वाटावे. काय एकेकाचे गंभीर चेहरे! काय एकेके दगडी इमारती! काय ती शोकसभेला आल्यासारखी झाडे! आणि काय तो.... काय तो रस्ता!

ज्यावरून चालताना पाऊस लागत असल्यामुळे कुणी आपल्याला सोडतंय का हे बघण्यासाठी अर्धवट भिजलेली ज्योती मेहता सतत मागे वळून पाहात होती.

मी तिथून चाललेलो नसतो तर मी या जगातच कशाला असतो असे मला वाटते.

ज्योतीने हात दाखवणे हे मला का कुणास ठाऊक, पण त्या क्षणी आकाशातून पुष्पवृष्टी झाल्यासारखे वाटले. पुढेमागे माझ्यावर कधी पुष्पवृष्टी झालीच तर मला ज्योती मेहताने हात दाखवणे नक्की आठवेल.

"नळस्टॉप"

"फाईन"

गिअर लिव्हरवर चुकून पडलेली ओढणी तिने पटकन ओढून घेताना मी तिच्याकडे आणखीन एकदा पाहिले. गाडीत त्यावेळेस पंकज उधास दारूचे महत्व मधूर आवाजात पटवून देत होता. त्याला मी त्या रसयुक्त भेटीतून कट करून टाकला. जे नंतर करता येते ते नंतर करावे या विचाराचा मी माणूस आहे.

"आप कहा जा रहे है??"

तिसरा गिअर टाकल्यानंतर तिला हा प्रश्न सुचला.

"आपको छोडनेके लिये नळस्टॉप जा रहा हूं"

"अं? लेकिन वैसे जाना कहा है आपको?"

"अब लगने लगा है मुझेभी नळस्टॉपही जाना था"

मला काहीकाही नाजूक प्रसंगात प्रचंड पंचिंग वाक्ये सुचतात अन बोलता येतात. त्याचे अभिप्रेत असलेले परिणामही होतात. आत्ताही झाला. कुणा कंजूष माणसाला पार्टी कबूल करावीच लागावी आणि त्याच्या पार्टीला त्याने जेवण झाल्यावर चक्क काहीही अपेक्षा नसताना फ्रूट सॅलड विथ आईस क्रीम मागीतल्यावर वाटावे तसे ज्योती मेहता हासल्यावर त्या रुक्ष वातावरणात मला वाटले.

असली वाक्ये मला चार मैत्रिणींपैकी मन ही मैत्रिण सुचवते. हे मी मती, कामना आणि काया यांना आजतागायत सांगीतलेले नाही.

"आप कहांसे?"

हा प्रश्न कुणीही कुणालाही विचारू शकत होतं. विचारला कुणीच नाही. दोघांची कारणे वेगवेगळी, हा प्रश्न न विचारण्याची! तिच्यामते 'दहा पंधरा मिनिटांनी संबंध संपणार आहे, कशाला विचारायचंय' हे कारण! माझ्यामते 'आप कहांसे हा सर्वात रुक्ष प्रश्न आहे' हे माझे कारण!

मी काही काही प्रश्नांना बगलच देतो बर्‍याचदा! जन्माला आल्यावर आईबापांना विचारतो का आपण?

"काय कसं काय? पोटाबाहेरचं जग कसं काय आहे? आपण कुठले मुळचे? लग्न वगैरे कधी झालं?"

अनेक प्रश्नांची गरजच नसते. प्रवासात तर आपण उगाचच्या चौगाच ओळखी बिळखी करून घेतो. मी आपला गाडीबाहेर बघत बसलेला असतो. एकटेपणा हा माझा सर्वात चांगला व एकमेव मित्र आहे. टू बी लोनली इज लाईक संजीवनी फॉर मी! मी पुन्हा नव्याने जिवंत होतो एकटा असलो की!

समजा आपण बसमध्ये बसलो आहोत आणि चार तासांचा प्रवास आहे. तिकीटाबाबत आणि हॉल्टबाबत कंडक्टरशी बोलल्यानंतर कशाचीही जरूर भासते का बोलायची? मला तरी नाही. तो व्यत्यय वाटतो मला.

ज्योती मेहताशी न बोलणे हे बोलण्यासारखे होते.

आणि तिचे न बोलणे हेही बोलण्यासारखेच!

चारचौघींमध्ये उठून दिसणारी होती ती! इतकेच!

पण त्या शेजारी बसण्यात, त्यातील अंतरात आणि संवादहीनपणात एक मोठा संवाद जाणवत होता मला.

पाऊस अनेक विचार करायला भाग पाडतो आपल्याला! मनस्थितीच पालटवतो. पावसामु़ळे जशी मनस्थिती पालटते तसे गझलेत शेर रचणे जमायला हवे.

ज्योती मेहताचे भिजलेले असणे, गाडीत गार वाटत असल्यामुळे ओढणी पांघरल्यासारखी घेणे, मधेच ओढणीने हात वगैरे पुसणे आणि तिच्या मोतिया कलरच्या अंगाला येणारा एक जादुई सुगंध! हे संवादच होते.

मोतिया! व्वा! च्यायला ऐन वेळेला काय रंग सुचलाय मला! खरे तर या रंगाचे अंग नसतेच! सुगंध वगैरेही जादुई नसतो. त्या आपल्या अ‍ॅडजस्टमेन्ट्स असतात प्रसंगानुरूप परिस्थितीशी केलेल्या. समजा ज्योती मेहता दारू पिऊन गाडीत बसली असती तर मला तिच्या तोंडाला येणार्‍या वासाचे वर्णन करणे न सुचता तिचे डोळे नशीले वाटले असते.

मधुचंद्राचेही हेच असते.

सरासरी पन्नास वर्षांचे सहजीवन सुरू करताना सुखाच्या सर्वोच्च शिखरावर सुरू करायचे. आणि मग घसरण्याचीच क्रिया 'मी नाही घसरलो' असे म्हणत दोघांनी पार पाडायची आणि शेवटी दु:खाच्या दरीत आधी एकाने जायचे अन मग दुसर्‍याने! एक गेला की दुसर्‍याने रडायचे. सहजीवन असह्य झाले तर घसरता घसरताच हात सोडायचे, घटस्फोट घ्यायचा. मुले झाली तर 'स्वतःहून घसरण्याची क्षमता त्यांच्यात येईपर्यंत' त्यांना आपल्याबरोबर घेऊन घसरायचे.

वैवाहिक जीवन ही मला सुखाच्या शिखरापासून दु:खाकडे चालू असलेली घसरणच वाटते.

घसरताना हजारो क्षण असे येतात की जे अविस्मरणीय असतात. त्यामुळे ते सहजीवन आपल्याला सदाहरित व मधूर वाटू शकते. पण शेवटी मृत्यू असतोच! मग तो काय सहजीवनातच असतो की काय? एखादा एकटा राहिला तरी मरणारच की, असा युक्तिवाद इथे चालत नाही. सहजीवनात आपला पार्टनर जाणं हे दु:ख आपण मरण्यापेक्षा जास्त आहे. 'पुन्हा' एकटे होणे हे दु:ख अपरिमित आहे. त्यामुळे फक्त लग्नातून आलेल्या सहजीवनाचाच प्रवास सुखाच्या शिखरापासून दु:खाच्या दरीकडे असतो.

मग शिखरावर असताना पत्नीच्या केसांना येणारा मादक गंध वैवाहिक जीवनाच्या मध्यावर आल्यानंतर 'डिझर्व्ह्स टू बी इग्नोअर्ड फोर द टाईम बिईंग' स्वरुपाचा ठरू लागतो. सासू सासरे आणि नणंद घरात असतानाही काही ना काही निमित्ते काढून स्वयंपाक घरात येऊन मागून मिठी मारून एक चोरटे चुंबन घेणारा नवरा वैवहिक आयुष्याच्या मध्यावर स्वतःच्या आणि आपल्या शरीराच्या गरजा भागवून कुटुंबाला आर्थिक आधार देणारा पुरुष वाटू लागतो.

हे असेच होते असेही नाही. पण... नवरा बायकोंच्या मनात वर्षानुवर्षे काही गोष्टी राहतात आणि शेवटी त्या अपूर्णच राहतात. मग त्यांना स्वप्ने म्हणावे लागते.

तर ज्योती मेहताचा सुगंध ही एक अ‍ॅडजस्टमेन्ट होती.

"आप क्या?? स्टुडन्ट?"

"... जी नही"

"तो? युनिव्हर्सिटीमे?"

ज्योती मेहताला माझी माहिती आवश्यक वाटतच होती. कारण माझा पहिला डायलॉगच तसा होता. 'पहिल्या दृष्टिक्षेपात प्रेम घडणार्‍या प्रेमवीरासारखा'!

"औंध गया था... आप?"

"स्टुडन्ट... फिजिक्स... आप जॉब करते है??"

"जी... और पोएट्री..."

मी असे काही सांगण्याची संधी सोडत नाही. त्यात मला प्रतिष्ठा मिळाल्यासारखे वाटते. मी कविता करतो असे म्हणण्यात! लगेच लोक एका वेगळ्या नजरेने पाहू लागतात. खूप वेळ वगैरे असला तर "ऐकवा की " वगैरेही म्हणतात. मी ही संधी सोडत नाही.

"मतलब आप कवी है??"

"जी... "

"कौनसी लॅन्ग्वेजमे?"

"मराठी.."

"मला मराठी बोलता येतं..."

"मला माहीत आहे.. "

हादरलीच ती!

"आप कैसे जानते है मै मराठी बोलसकती हूं?"

"नॉन मराठी नळस्टॉपको नलस्टॉप कहेगा.. आपने सही प्रनाऊन्स किया... "

"तो अब हिंदी क्यू बोल रहे है आप??"

माझी दांडी उडली.

"तो ये सवाल आपने हिंदी मे क्युं किया? "

"अजूनही हिंदीच बोलताय तुम्ही"

ज्योती मेहताचे हसणे हे स्त्रीच्या हासण्यातील एक खूप उच्च दर्जाचा प्रकार होता. हसू दाबल्यासारखे, काहीसे सलज्ज भाव ठेवून आणि हसण्याचा हवा भरलेला 'अंहंहंहंहंहंहंहंहं' असे अनेक 'हं' असलेला मुलायम आवाज! डोळ्यांनी हासता येणे ही चांगल्या हासण्याची किमान अट आहे. आणि हसून बघता येणे हे डोळ्यांनी काहीही बघण्यापेक्षा अधिक चांगले 'बघणे' आहे.

"डॉ. पटवर्धन करके मेरे रिलेशन मे है एक.. जो फिजिक्समे सिखाते है.."

"मला माहीत आहेत ते... तेही मला चांगले ओळखतात.. "

ज्योती मला मायबोलीकडे वळवत होती.

'मला चार वर्षांची मुलगी आहे' हे विधान ऐकल्यानंतर मला एका साबणाची जाहिरात आठवली. 'मम्मी' करत एक पोरगी धावत येऊन त्या मॉडेलला बिलगते आणि पुरुष मॉडेल अवाकच होतो वगैरे!

मात्र हे मी बोललो नाही.

मझ्या घरी कोण कोण आहे इथपर्यंत गप्पा जाऊच शकत नव्हत्या. संबंधच काय?

पण नळस्टॉप जवळ आला तेव्हा ती म्हणाली.

"मला खूप आवडतात कविता.. पुर्वी करायचे... आता सगळं मागे पडलं!"

बायका असे काही बोलून दिलखुलास हासताना पाहिल्या की मला त्यांच्या डोळ्यांमध्ये एक विषण्णता असावी असे उगाचच वाटते.

"ऐकवा काहीतरी?"

नॉर्मली मला ऐकवण्यात येणारा प्रश्न आज मीच विचारला.

"छे छे.. आता आठवतही नाही... "

"तरी???"

"अंहं.. इकडे साईडला घ्या.. "

"एक मिनिट.. सिग्नल क्रॉस करून थांबतो..."

"ओके.."

हा सिग्नल क्रॉस केला नसता तर?

हा लेख कसा काय लिहीला असता?

सिग्नल क्रॉस करतानाच ती मिश्कीलपणे आणि 'आता काय तुझा अन माझा संबंध थोडीच येणार आहे, म्हणून गंमतीने विचारतीय' अशा आविर्भावात म्हणाली..

"तुम्ही कधी ऐकवणार कविता?"

"मी कधी ऐकवणार आता? तुमचा नंबर द्या.. पुस्तक पाठवतो... "

ज्योती मेहताचा नंबर मला अजून पाठ आहे.

त्या रात्रीही तसाच पाऊस होता. दोन मित्रांबरोबर मिर्च मसालाला गेलो होतो. तिथे वेगळीच डिस्कशन्स!

माझ्या कवितांमधून सहजता जाऊन आता तेथे क्लिष्टता आलेली आहे असे कवितेशी सुतराम संबंध नसलेले पण माझा जीव की प्राण असलेले दोन शाळेतील मित्र मला परोपरीने सांगत होते. त्यांना मी कविता रचायला लागलो हेच पटत नाही अजूनही!

आणि अचानक 'ग्टंग"!

'ज्योती मेहता'

बारिशका मौसम था
वगैरे वगैरे!

शेवटी 'गुड नाईट'!

मग त्याला प्रतिसाद!

मग सकाळी उठल्यानंतर दोन्ही मेसेजेस उगाचच पुन्हा वाचून पाहणे!

मग दुपारी ऑफीसमधून एक सभ्य मेसेज माझ्याकडून! काहीतरी इंग्लीश कोटेशन वगैरे! लाईफ इज धिस, लाईफ इज दॅट!

हे असले मेसेजेस फॉरवर्ड करायला फार उपयुक्त ठरतात.

मग त्याला उत्तरच न येणे! मग ती रात्र उगाचच विचारात! च्यायला आपलं काही चुकलं की काय वगैरे! नवर्‍याने पाहिला असेल तिच्या! शिव्या बसल्या असतील तिला! पण आपलं काय चुकलं? तिने नंबर दिला, स्वतःहून काल एसेमेस केलाय वगैरे स्पष्टीकरणे आणि समर्थने ताबडतोब जागच्याजागी येऊन स्वतःहून बसणे!

नंतर मग दोन दिवसांनी अचानक अनपेक्षितपणे एसेमेस येणे! नेमका तो माझ्या पत्नीने पाहणे!

यावेळेस मात्र तिच्या चेहर्‍यावरचे भाव फार म्हणजे फारच वेगळे होते. इट वॉज क्लीअर! की तिला असे म्हणायचे असावे की 'असे लोक तुला भेटतातच कसे?'!

ज्योती मेहताचा नवरा इम्पोटन्ट होता. म्हणजे आहे. मुलगी दत्तक घेतलेली होती.

मेसेजेसची तीव्रता वाढली. सहा एक महिने नुसते इंतजार ऑफ द मेसेज इतकेच! मग ते मेसेज घरी येताना डिलीट करून टाकणे! मग मेसेजेसमधील आशय किंचितसा बदलणे! मग तिच्या एकदाच दिसलेली असताना जशी दिसली होती त्यावर मी एक मिश्कील कमेंट करणे! त्यावर तिचा चांगला स्मायली येणे वगैरे!

मग ठरवून केलेली पहिली भेट!

त्या भेटीत 'हवे ते बोलताच आले नाही' असा भाव चेहर्‍यावर सतत! माझे डोळे फिरून फिरून तिच्याचकडे वळतायत तर तिची नजर ज्यूसच्या ग्लासकडे वळताना ओठांना किंचीत विलग करून जातीय वगैरे!

ज्योती मेहताचा किस फार नमकीन असतो.

काय करावे तेच समजत नाही असा! असं होतं बरं? सुखाची एक अशी पातळी येते जिथे फक्त अनुभवत बसावे. काहीही करू नये. अगदी पुरुषानेही!

एका ओठात समर्पण आणि एका ओठात आक्रमण!

शरणागतीचे पांढरे निशाण फडकवण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काही राहात नाही.

नवरा तसा आहे यातून आलेला आवेगी आविर्भाव अजिबात नाही. शांतता म्हणावी तर तसेही नाही.

पुणे विद्यापीठ तितकेही रुक्ष नाही हे त्या दुपारी समजले मला!

आश्चर्य म्हणजे आमच्याकडच्या एका फन्क्शनला तिला बोलावले तर आले होते तिघेही! मग त्यांच्याकडेही काही निमित्ताने जाणे झाले.

माय वाईफ वॉज नॉट कम्फर्टेबल ऑफकोर्स! पण ठीक आहे. नवरेशाहीचा आणखीन एक बळी! बायको आणि आई यात फरक न राहणे या पातळीला वैवाहिक जीवन जायला पाहिजे. तर खरे लग्न म्हणावे.

माझी बायको एरवी बायको, मैत्रिण आणि अ‍ॅट टाईम्स आई होत असली तरी ज्योती मेहताच्या संदर्भात तिची मते आणि चेहरा असा काही व्हायचा की मला त्या सर्व बाबी गुप्तच ठेवाव्या लागल्या. 'सोडूनच का नाही दिल्या' याचे उत्तर माझ्यापाशी नाही.

आणि का सोडल्या याचेही!

नवर्‍याचे ते तिची वाट पाहत बसणे, घरातून काम करणे, मुलीला सांभाळणे, नजरेतील एक मनमिळावू आणि स्वतःकडे कमीपणा घेणारी झाक, कुणावरही प्रेम करू शकण्याची क्षमता! तुमच्या कविता हिला खूप आवडतात, सारखे सांगत असते असे म्हणणे!

माझी मती माझ्या मनावर आता प्रभाव टाकत नव्हती. माझे मनच बदलले होते.

त्याला आणि माझ्या बायकोला फसवून मी 'एका वेगळ्या स्त्रीला किस केले' या शिवाय काही फायदा मिळवत होतो का? तिच्या त्या जादुई सुगंधाचे समीप असणे याशिवाय एखादा आनंद?

माझी एखादी मानसिक गरज तेथे भागत होती? किंवा भौतिक?

काया नावाची मैत्रिण यात पडतच नव्हती. कामना केव्हापासून म्हणत होती की ज्योती मेहताला जवळ घे! मती मार्ग सुचवत होती. मन तर बसलेच होतेच तिच्यावरच! पहिल्यांदाच असे झाले होते की कुत्र्याच्या पिल्लाबाबत चारही मैत्रिणींचे एकमत झाले होते. पण तिच्या नवर्‍याला एक दोनदा भेटल्यानंतर पुन्हा त्यांचे एकमत झाले.

कायेला आता तर त्यात पडण्याची गरजच नव्हती. कामना तिथून दूर झाली होती स्वतःहून! मती आता 'टाळण्याचे' मार्ग सुचवत होती. आणि मन?

मनाला आता वाटत होते की यातून बाहेर कसे पडायचे?

पुरुष जितके धाडसी वाटतात किंवा असायला हवेत तितके नसतात. असली रिलेशन्स जमवण्यात कदाचित ते झोकूनही देतील. पण असली रिलेशन्स तोडणे हे त्यांच्या क्षमतेत असेलच असे नाही.

दोन दिवस एकाही मेसेजला उत्तर न देण्याचा परिणाम ज्योती मेहताचा फोन येण्यात झाला. आणि त्याही फोनवर मी 'छे छे, असे कुठे काय' असलीच नपुंसक उत्तरे दिली. तिच्या नवर्‍यापेक्षा नपुंसक मी होतो.

म्हंटले नव्हते, स्वतःला मुक्त करायचे असेल तर मनाने नग्न व्हावे लागते.

तिचा नवरा शरीराने असेल, मी वृत्तीने नपुंसक होतो. अजूनही असेन कदाचित!

ज्योती मेहताला कळायचे ते कळलेच शेवटी! दिवसातून एखादा येणारा माझा मेसेज, सारखी काही ना काही कारणे, टाळाटाळी! हे सगळं का? मी खूप चांगला होतो म्हणून?

अंहं! तिच्या नवर्‍याबद्दल वाईट वाटणे हे त्याचे फक्त दहा टक्के कारण म्हणावे लागेल.

मला भावनिक गुंतागुंतीची ही वाढीव व वाढणारी तीव्रता झेपेनाशी झालेली होती. माझ्यातील सामान्य, मध्यमवर्गीय, आरोपांना घाबरणारा, कुटुंबाला सर्वोच्च मानणारा नपुंसक परंतु 'मला शोभेलसा' विचार करणारा माणूस जागा झालेला होता.

दिड एक वर्षांनी मला एक एसेमेस आला...हा एसेमेस येईपर्यंत आमचे दोघांचे बोलणेही संपून चार एक महिने झालेले असावेत...

एसेमेस होता...

"थॅंक यू - नंदलाल मेहता"

माझ्या आयुष्याला कुत्र्याचे पिल्लू मानणार्‍या चारही मैत्रिणी त्या दिवशी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडल्या होत्या.

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो

(कथानायिकेचे नांव काल्पनिक आहे.)
=========================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

========================================

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

स्वाती, विनायक, नितीन, भाऊसाहेब, नानासाहेब, चातकराव, चॅम्प,

सर्वांचा मनापासून आभारी आहे.

-'बेफिकीर'!

Pages