की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 April, 2011 - 03:13

राळेगणसिद्दीचा नि:शस्त्र योदधा पुन्हा एकदा उपोषणाचे शस्त्र घेवून रणांगणात उतरला आहे. पण यावेळेस तो एकटा नाही तर सामान्य जनतेबरोबर इतरही काही दिग्गजांची साथ त्याला लाभली आहे.

AnnaHazare.jpg

यावेळेस मात्र लढत केवळ राज्यपातळीवर नसून थेट केंद्रसरकारच्या विरोधात आहे. भ्रष्टाचारी राजकारणी-सरकारी अधिकारी-न्यायाधीश यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी तयार होत असलेल्या जन लोकपाल विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीतील ५० टक्के सदस्य देशातील सामाजिक कार्यकतेर् व विचारवंतांमधून नियुक्त करावेत, ही अण्णांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी मध्यंतरी त्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती. मात्र पंतप्रधानांच्या सूचनेवरून या विधेयकासाठी नेमलेल्या मंत्रीगटाशी चर्चा करूनही या मागणीबाबत नकारात्मक सूरच निघाला.

त्यामुळेच अण्णांनी थेट दिल्लीत धडक दिली. अण्णांच्या आंदोलनाला सर्वस्तरातून पाठिंबा मिळू लागल्याने हादरलेल्या पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी रात्री पत्रक काढून त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. पण आपल्या लढ्यावर ठाम असलेल्या अण्णांनी आता माघार नाही, असा निर्धार करीत सकाळी असंख्य कार्यकर्त्यांसह 'राजघाट'वरील महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेवून भ्रष्टाचाराविरुद्ध आमरण उपोषणाचे रणशिंग फुंकले आहे.

काय आहे जन-लोकपाल विधेयक?

लोकपाल विधेयक हे एकप्रकारे माहिती अधिकाराच्या कायद्याचे पुढचे पाऊल आहे. माहिती अधिकारानुसार सर्व-सामान्य जनतेला भ्रष्टाचाराची माहिती मिळवता येते, पण माहिती अधिकाराच्या कायद्यामध्ये संबंधीत भ्रष्टाचारी संस्था किंवा व्यक्तीविरुद्ध तक्रार करून संबंधितांना तुरूंगात पाठवण्याची तरतुद नाहीये. त्यासाठी म्हणुन लोकपाल विधेयकाची मंजुरी अत्यावश्यक ठरली आहे. लोकपाल विधेयक सर्वसामान्य नागरिकाला देशाचे पंतप्रधान, मंत्रीमंडळ. आमदार-खासदार तसेच संसदेच्या सभासदांविरुद्ध भ्रष्टाचाराशी संबंधीत आणि विरोधात तक्रार करण्याचा हक्क प्रदान करते. या आयोगाची निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र यंत्रणा असावी, तसेच राजकीय व्यक्ती, नोकरशहांवर भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद असावी, अशीही मागणी करण्यात आली होती. लोकपाल विधेयकाचा पुरस्कार करताना तत्कालीन प्रशासकीय सुधार समीतीने मान्य केले होते की यामुळे न्यायव्यवस्थेबद्दल सर्वसाधारण नागरिकांच्या मनात निर्माण झालेली अविश्वसनीयतेची भावना दूर होवून त्यांचा यंत्रणेवरील, न्यायावरील विश्वास दृढ व्हायला मदतच होइल. त्यानुसार पहिले लोकपाल विधेयक १९६८ मध्ये ४ थ्या लोकसभेच्या दरम्यान म्हणजे मांडण्यात आले होते तिथे ते पासही झाले पण राज्यसभेत मात्र त्याला स्विकृती मिळाली नाही. त्यानंतर सलग १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ मध्ये तेच लोकपाल विधेयक पुन:पुन्हा मांडण्यात आले. पण ते तसेच बासनात गुंडाळाले गेले. अद्यापही ते मंजूर झालेले नाही. त्यामुळेच सध्या भ्रष्टाचारविरोधी कोणताही कायदा नाही.

गेल्या वर्षी काही नव्या मागण्यांसह जन लोकपाल विधेयकासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आणि डिसेंबर २०१० मध्ये नव्या विधेयकाचा मसुदा सरकारला सादर करण्यात आला.

आत्तापर्यंत मांडण्यात आलेल्या विधेयकांपेक्षा या वेळच्या "लोकपाल विधेयकाचे" वेगळेपण काय?

महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी लोकपाल विधेयक हे "जन-लोकपाल विधेयक" या नावाने मांडण्यात आले आहे. यावेळेस विधेयकात काही नवीन मागण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. आता भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत केंदीय पातळीवरील मंत्र्यांचा समावेश व्हावा, ही या नव्या विधेयकाची मुख्य मागणी आहे. मात्र मसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे असा आग्रह अण्णा हजारे, किरण बेदी इत्यादींनी केला आहे आणि उपोषणातील हा प्रमुख मुद्दा आहे.

जन-लोकपाल विधेयकातील काही महत्त्वाच्या मागण्या...

- भ्रष्टाचारविरोधी नवी आणि प्रलंबित खटल्यांचा तात्काळ निवाडा व्हावा.
- भ्रष्ट अधिकार्‍यांना हटविण्याचे अधिकार
- कोणत्याही न्यायाधीशाच्या, अगदी भारताच्या सरन्यायाधीशांच्याही विरोधात थेट चौकशी आणि कारवाई करण्याचा अधिकार मिळावा. सध्या कोणत्याही न्यायाधीशाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारताच्या सरन्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागते.
- लोकपाल समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा हस्तक्षेप असू नये.
- दोषी व्यक्तीला पाच वर्ष ते जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा असावी. सध्या ही शिक्षा सहा महिने ते सात वर्ष इतकी आहे.

विधेयकाचा मसुदा कोणी तयार केला?

यामध्ये श्री. शांती भूषण, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, निवृत्त न्या. संतोष हेगडे, अ‍ॅड. प्रशांत भूषण, माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह प्रभुतींचा समावेष आहे.

निवड समितीमध्ये दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष, सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश, हायकोर्टाचे दोन वरिष्ठ मुख्य न्यायाधीश, भारतीय वंशाचे नोबेल विजेते, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष, भारतीय वंशाचे दोन मॅगसेसे पुरस्कार विजेते, भारताचे महानियंत्रक आणि लेखापाल इत्यादींचा समावेष असावा अशी मागणी या जन-लोकपाल विधेयकाद्वारे करण्यात आली आहे. याविधेयकानुसार लागू केल्या जाणार्‍या कायद्यांन्वये संबंधीत कायद्यात भ्रष्टाचार नियंत्रण कायदा, गैरव्यवहार या अंतर्गत केल्या गेलेल्या तक्रारींचा समावेश करण्यात यावा तसेच या गैरव्यवहारांची माहिती देणार्‍यांना संरक्षण देण्यात यावे अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. काही राजकीय पक्ष, नेते, समाजातील मान्यवर तसेच प्रत्यक्ष सामान्य जनतेचाही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा लाभल्याने पहील्या दिवसापासूनच हे विधेयक चर्चेत आले आहे.

यावरची सरकारची प्रतिक्रिया मोठी मजेशीर आहे. सरकार म्हणते की त्यांच्याजवळ विधेयकांच्या प्रस्तावाची प्रतच उपलब्ध नाही. केंद्र सरकार यावर्षी पुन्हा एकदा लोकपाल विधेयक संसदेत सादर करणार आहे. सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सल्लागार समितीसमोर विचारार्थ मांडले जाईल. पण मसुदा समितीत लोकांच्या थेट समावेशाला पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणजेच केंद्र सरकारचा यांचा ठाम नकार आहे.

आ. आण्णा हजारे यांनी आत्तापर्यंत वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आमरण उपोषणाचे शस्त्र उभारले आहे, पण ते यशस्वी ठरल्याची उदाहरणे खुप कमी आहेत. आण्णांनी उपोषण पुकारले की कोणीतरी नेता, मंत्री त्यांची भेट घेतात. नेहमीप्रमाणे आश्वासने देवून आण्णांना त्यांचे उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाते आणि नंतर दिलेली आश्वासने कालौघात सोयिस्करपणे विसरली जातात. त्यामुळे यावेळेस आण्णांनी केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवून आपले उपोषण मागे घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यावेळी किरण बेदी, स्वामी रामदेव, श्री श्री रवीशंकर, स्वामी अग्निवेश, मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल, कपिल देव, मनेका गांधी इत्यादींचाही या आंदोलनात समावेष / पाठींबा असल्यामुळे यातून काहीतरी चांगले निष्पन्न होइल अशी आशा करायला हरकत नाही.

शेवटी एक सामान्य नागरिक म्हणून आण्णांना एवढेच सांगावेसे वाटते...

"आण्णा, तुमच्या समाजसेवी वृत्तीबद्दल, तुमच्या देशभक्तीबद्दल आम्हा सर्वसामान्यांच्या मनात कायमच आदर होता आणि राहील. फक्त यावेळेस ही लढाई नेहमीप्रमाणे लुटूपुटीची ठरू नये तर आर-पारचा लढा सिद्ध व्हावी हिच अपेक्षा आणि शुभेच्छा. तूम्ही आवाज द्या, आमची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, फक्त नेहमीसारखा अवसानघातकीपणा करू नका.

"इस बार अब हो ही जाये, या तो हम नही या फीर भ्रष्टाचार नही...! भ्रष्टाचार समुळ बिमोड ही कल्पना फारच भाबडी आणि अशक्य वाटली तरी निदान त्या दृष्टीने सुरूवात तर झालीये आणि आम्ही खात्री देतो की या वेळी शेवटपर्यंत आम्ही प्राणपणाने तुमच्या सोबत लढत राहू !"

संदर्भ:

१. अण्णांचा 'आवाज' देशभर

२. भ्रष्टाचाराविरोधात तलवार परजा!

३. खोट्या आश्वासनांना बळी पडणार नाही!

४. जन लोकपाल विधेयक म्हणजे काय?

५. लोकपाल विधेयक (विकीपिडीया)

जयहिंद ! जय महाराष्ट्र !!

हा लेख माझ्या जालनिशीवर इथे उपलब्ध आहे.

विशाल कुलकर्णी.

गुलमोहर: 

कुठलीही क्रांती एका दिवसात होत नसते महेशजी. तिला युगे उलटावी लागतात. आण्णांनी प्रारंभ केलाय. आपणही प्रयत्न करूया. कोण जाणे कदाचित या वृक्षाची गोड फळे आपल्या पुढच्या पिढ्या चाखतील. हा भाबडा आशावाद असेल सद्ध्या पण आशा करायला काय हरकत आहे?

विशाल बरोबर आहे, क्रांती एका दिवसात होत नाही. भारतातल्या अनेक प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे सर्व लोकांची मानसिकता बदलली जाणे. जसे स्वातंत्र्याच्या आधी सर्वजण एकाच ध्येयाने प्रेरित झाले होते. तसे आता जर सुराज्यासाठी झाले तरच काही चांगले होऊ शकेल.

हा हा हा..
विशाल पोस्ट चांगली आहे.. आणी अण्णांचा प्रयत्न पण चांगला आहे..
पण मला नाही वाटत गेंड्याची कातडी असलेले काँग्रेस सरकार काही करेल..
हा प्रस्ताव लोकसभेतुन पास होणे म्हणजे स्वता:च्या पायवर धोंडा मारुण घेण्यासारखे आहे..
मला तरी नाही वाट्त की कुठलाही नेता (जरी शिकलेला नसला तरी हरामखोरी करण्यात १ नं आहे आणी भ्रष्टाचारा मधे सुध्दा) बिल पास होऊ देईल..

लोकशाहीचे २ नियम आहेत..
नियम १: ह्या मधे प्रजा फक्त होरपळली /लुटली जाते.. श्रींमंत होतो तो राजकारणी आणी भांडवलदार आणी सत्ता फक्त त्यांचीच असते..

नियम २: जर तुम्हाला वाटत असेल तर की तुमच्यावर अन्याय होतोय आणि ही लोकशाही नाही.. तर नियम नं १ परत वाचावा Happy

तरी सुध्दा ... लेट्स होप फॉर बेस्ट .. आणी पुढील निवडणुकीत काँग्रेस ला तरी निवडुन देऊ नका Happy
अ‍ॅट लिस्ट व्हेन यु नो.. सी. डब्लु. जी. / २ जी. आणी आदर्श स्कॅम...

पुढील निवडणुकीत काँग्रेस ला तरी निवडुन देऊ नका>>>> मग काय जातीयवादी भाजपला निवडुन द्यायचे का??
विशाल छान माहीती... अण्णांसारख्या लोकांचा खरेच अभिमान वाटतो..अण्णांच्या कार्याला मनापासुन शुभेच्छा... Happy

आताच्या 'जन-लोकपाल' विधेयकामध्ये नेमक्या कोणत्या बदलांची मागणी होतेय हे कळण्याकरता १९९६ आणि सुधारीत १९९८ च्या लोकपाल विधेयकामध्ये काय तरतूदी होत्या ते बघणे आवश्यक आहे.
-उद्दीष्ट होते नागरीकांना जलद आणि स्वस्तात न्याय मिळवून देणे
-’लोकपाल’ ला मदत करण्याकरता दोन सदस्य देण्यात ये‌ऊन, त्या तिन्ही लोकांची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या समितीत खालील लोक असावेत-
उपराष्ट्रपती-चे‌अरमन, पंतप्रधान, लोकसभेचा स्पीकर आणि राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीचे विरोधी प़क्षनेते.
ही १९९८ ची तरतूद आहे. (१९९६ मध्ये या समितीत राष्ट्रपती वरील सर्वांची मतं ग्राह्य धरुन लोकपालासकट ३ सदस्यांची नेमणूक करत असे)
-लोकपालाला पदावरुन काढून टाकण्याविषयीची चौकशी ही फक्त सुप्रीम कोर्टचा चिफ जस्टीस आणि २ जेष्ट वकीलच करु शकतील
-चालू वर्षाच्या १० वर्षं मागील केसेस मधली चौकशी करता ये‌ऊ शकेल. त्या आधीची नाही.
- मेंबर ऑफ पार्लामेंट्स नी आपली संपत्ती शपथविधी झाल्यानंतरच्या ९० दिवसात लोकपालाकडे जाहीर करावी. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी तसे करणे अपेक्षित आहे.
(१९९६च्या तरतूदीत पंतप्रधान सुद्धा लोकपालाच्या नजरेखाली होतं)

लोकपालाचं अधिकारक्षेत्र खालीलप्रमाणे-
-लोकपाल धरपकड आणि शोधसत्र जारी करु शकतो
-मेंबर ऑफ पार्लामेंट्स नी आपली संपत्ती शपथविधी झाल्यानंतरच्या ९० दिवसात लोकपालाकडे जाहीर करावी(वर लिहील्याप्रमाणे). त्यानंतरची प्रत्येक वर्षी तसे करणे अपेक्षित आहे. हे सर्व'इन् कॅमेरा' होणे आवश्यक. जाहीर वाच्यता हा दंडनीय अपराध.
-भ्रष्टाचारविरोधी तक्रार खोटी आहे असे निदर्शनास आल्यास तक्रारदार शिक्षेस पात्र ठरतो.
-तक्रार खरी असेल आणि सिद्ध् झाली तरी लोकपाल त्यावर कार्यवाही किंवा कारवाई, यापैकी काहीही करु शकत नाही. त्याचे काम फक्त अहवाल बनवून याबद्दल कार्यवाही आणि कारवाईचे अधिकार असलेल्या कार्यकारीणीकडे पाठवणे.
-सरकारी सचिव एखाद्या गुन्ह्याच्या तपासात अडथळा आल्याच्या किंवा मंत्रिमंडळाच्या कार्यात बाधा होऊ शकण्याच्या कारणाखाली तो अहवाल राखून ठेवू शकतात.

सगळ्यांना धन्यवाद !!

मणिकर्णिका खुप महत्वाची माहिती ! हा लेख लिहीण्यामागे माझा मुळ हेतू हाच आहे की लोकपाल किंवा जन-लोकपाल विधेयक म्हणजे नक्की काय आहे याची सगळ्यांना माहिती व्हावी. तू दिलेल्या माहितीबद्दल मनःपूर्वक आभार !!

पहिली पीडीएफ लिंक ही सरकारच्या लोकपाल विधेयकाची, ज्याला गेली ४२ वर्षे मंजुरी मिळाली नाही, पण आता कॉंग्रेस सरकार त्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

दुसरी पीडीएफ लिंक ही सरकारच्या लोकपाल विधेयकाच्या विरोधात, जाऊन मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल, शांती भूषण, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, निवृत्त न्या. संतोष हेगडे, अॅड. प्रशांत भूषण, माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह यांनी तयार केलेले जन लोकपाल विधेयक.

http://www.annahazare.org/pdf/LOKPAL%20Govenment%20draft%20Marathi.pdf

http://www.annahazare.org/pdf/JAN_LOKPAL%20%20Bill%20by%20Expert%20(Marathi).pdf

सौजन्य : सुहास झेले (एक ब्लॉगर मित्र )

आम्ही आण्णांच्या सभेत जावुन आलों। नेहमी असल्या प्रश्नां करता "हुंन मे कि कर सकतां ?"असा मत मांडनारे दिल्लीवासी अण्णा करता उभे आहेत। वजन तो है अण्णा के कहे मे.

धाक वाटला तो भारतीयांनाच, तोही निव्वळ महात्मा गांधीवंर असलेल्या असीम आदर आणि प्रेमाचा.
अण्णा करता पण लागु होते हे वाक्य.

मटा बातमी.

एकीकडे अग्निवेश व केजरीवाल समितीवरील अध्यक्षपदासाठी अण्णांच्या नावाचाच पुकारा करीत असताना खुद्द अण्णांनी मात्र त्यास नकार दिला. समितीचा सदस्य किंवा मार्गदर्शक म्हणून मी काम करण्यास तयार आहे. मात्र अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असेही अण्णांनी स्पष्ट केले.

आता अण्णांनी कच खऊ नये म्हणजे मिळवले.
यांनी आधीच का नाही ठरवले की, कोण होणार अध्यक्ष.

आण्णांची कळकळ मान्य व त्यांना पुर्ण पाठींबा.

गणुभाऊ..ग्रेट वर्क ! मला उशीर झालाय हा धागा बघायला, पण अजुनही वेळ गेलेली नाहीये. लगेच फोन करतो आणि सहभागी होतो. धन्यवाद !!

पहिली महत्वाची मागणी तर सरकारने मान्य केलीय. दोन्ही प़क्षाचे ५-५ सदस्य असतील हे मान्य केले आहे. हा सामुहिक जनशक्तीचा विजय मानायचा का?
काहीही असो, आण्णांनी अजुन माघार घेतलेली नाहीये. सोनीयाजींच्या उपोषण मागे घ्यायच्या विनंतीला आण्णांनी विनम्रपणे नकार दिलेला आहे.

ही सुरूवात आहे पंत....
काँग्रेसचा काही भरवसा देता येत नाही. तोंडाला पाने पुसण्यात पटाईत आहेत सगळे Wink

>>जसे स्वातंत्र्याच्या आधी सर्वजण एकाच ध्येयाने प्रेरित झाले होते. तसे आता जर सुराज्यासाठी झाले तरच काही चांगले होऊ शकेल.
६ एप्रिलला मीच लिहिलेले हे वाक्य. तेव्हा लोक प्रेरित होतील की नाही ही शंका होती, पण सद्ध्या चाललेल्या आंदोलनाकडे पहाता एक सुरूवात झाली आहे असे वाटत आहे, पुढे काय होईल ये तो वक्त ही बतायेगा.

बरे... हलकट कॉंग्रेस सरकार जाऊन ३ वर्षे होऊन गेली... आता या कायद्याचे स्टेट्स काय आहे?
जर हा कायदा पास झाला असेल तर भारताच्या लोकपालाचे नाव काय?

जर अजून हा कायदा झाला नसेल तर .....
तेव्हा या कायद्या साठी पाठींबा देणारे लोक आज हा कायदा बनवण्यासाठी काही प्रयत्न का करत नाही आहेत?
अण्णा आता या आंदोलनाबद्दल किंवा इंन जनरल लोकपाल बद्दल एक अक्षर सुद्धा का बोलत नाही आहेत?
परत हेच आंदोलन त्यांनीच छेडले तर वर भारावलेल्या लोकांपैकी किती जण परत साथ देतील?

<किरण बेदी, स्वामी रामदेव, श्री श्री रवीशंकर, स्वामी अग्निवेश, मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल, कपिल देव, मनेका गांधी >

यातल्या बहुतेकांना या आंदोलनातून एक नवं करियर घडवायची संधी मिळाली.
निवृत्त लष्करप्रमुख व्ही के सिंग यांचं नाव राहिलं.
वीरेंद्र सहवाग तेव्हा क्रिकेट खेळत होता म्हणून नाहीतर तोही कुठून कुठे पोचला असता.

अंहं. अण्णा प्यादे होते. त्यांना हलवणारे पडद्यामागेच होते. आता पडद्यासमोर आल्यावर त्यांच्याच्यानी इकडची काडी तिकडे होत नाहीए.

बाबू ,
आंदोलनात भाग घेतलेल्यांना किंवा त्या बद्दल सिम्पथी असणार्यांना टोमणे मारणे हा उद्देश खरच नाही.
तेव्हा वातावरण निर्मिती इतकी जबरदस्त झाली होती कि , खरच हे दुसरे स्वातंत्र्य युद्ध आहे असे लोकांना वाटत होते. एक प्रकारचे भारावलेपण होते,
तेव्हा लोकपाल बद्दल, या आंदोलना बद्दल उपलब्ध असणाऱ्या माहिती प्रमाणे बहुतेक लोकांनी त्यांच्या कुवती प्रमाणे भाग घेतला. त्यांची भावना सच्ची होती.
पण आता ते खरेपण त्यांना टोचणी देते आहे का?
परिवर्तनाची अर्धी लढाई आपण मतपेटीतून जिंकून दिली, आता सरकारवर दबाव बनून ठेवायची जबाबदारी अण्णांची आहे , आनी त्या लढाईत ते कुठेच दिसत नाहीत , रादर त्यांनी लढाई बंद करून सन्यस्त वृत्तीने बसले आहेत असे दिसते.
आपण आपले सत्व ज्याच्या पारड्यात टाकले, त्याच व्यक्तीकडून आपली फसवणूक केली गेली अशी भावना त्यांची झाली आहे का?
हे मला जाणून घ्यायला आवडेल.

आण्णा मोहरा नव्हते , त्याना माहीत होते , आपण कुणासाठी अन् काय करतोय. आण्णा आण्णा नाचत जी आम जनता त्यांच्यामागे फिरली ते मात्र् बिच्चारे सुनिल शेट्टी ठरले .. माशूका भी गयी , जिंदगी भी गयी , उमर भी गयी ... हाथ मे रही गन !

ही सुरूवात आहे पंत....
काँग्रेसचा काही भरवसा देता येत नाही. तोंडाला पाने पुसण्यात पटाईत आहेत सगळे

आणि आत्ताच्या सरकारने काय केले ?

Proud

असे धागे व् एकेक प्रतिसाद आता विनोदी वाटू लागतील

Pages