छळतात माणसे ही

Submitted by रामकुमार on 2 April, 2011 - 12:08

तरही गझल : कैलासजींनी दिलेल्या नवीन ओळीवर माझाही सहभाग
वेळ नसल्यामुळे उशीर झाला,क्षमस्व!
=================================================

निज पाप आठवूनी रडतात माणसे ही
अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही

कळपामधील दुस-या सलतात माणसे ही
हिटलर जिवंत आहे म्हणतात माणसे ही

इमले मनोरथांचे रचतात माणसे ही
(होता भुकंप अवचित खचतात माणसे ही)

दिसती निवांत तरिही नसतात माणसे ही
अस्वस्थ अंतरंगी असतात माणसे ही

डोळ्यांत आसवांना धरतात माणसे ही
ओठी हसून पोटी कण्हतात माणसे ही

स्वप्नी, भ्रमात लटके रमतात माणसे ही
झाकून आत जखमा हसतात माणसे ही

कसली भिकार शेती कसतात माणसे ही?
लेंढार एवढाले फळतात माणसे ही

मृत्यो, तुझ्या गळाला फसतात माणसे ही
आयुष्य ओघळूनी गळतात माणसे ही
-----------------------------------------
रामकुमार

गुलमोहर: