त्याला पहिल्यांदा बाहेर घालव....(विशेष माहितीसह)

Submitted by पुरंदरे शशांक on 25 March, 2011 - 09:32

त्याला पहिल्यांदा बाहेर घालव.. (विशेष माहितीसह)

आमच्या घरात मी सोडता बाकी सगळे स्त्री सदस्यच - आई, बायको व दोन मुली म्हणजे लेडिज होस्टेलच ! या सर्व मंडळींना अनेक कामांसाठी मला ऑर्डर सोडायची जन्मजात सवय आहे. पण देवाने माझी नेमणूक या घरात विशेष करुन का केली आहे त्याची जाणीव घरात पाल, झुरळ, अनेक प्रकारचे किडे वगैरे आले तर ही मंडळी आवर्जून करुन देतात. ईईईईईईईई........पाल (झुरळ, किडा काहीही टाकावे ) असे मोठ्याने चित्कारणे / ओरडणे / किंचाळणे असा मुख्य समारंभ असतो. सर्व शक्तीनीशी तो करुन झाला की मग सगळे समेवर येतात....
त्याला पहिल्यांदा बाहेर घालव....

आमच्या या लेडिज होस्टेलच्या "बारक्या"चे (सुज्ञ वाचकांना हा कोण हे सांगणे नकोच) मुख्य काम - हे असले किळसवाणे / विचित्र / भयानक / अजस्त्र - ( इथे त्यावेळेस जे सुचेल ते विशेषण वापरणे, ) प्राणी ताबडतोब घराबाहेर घालवणे हेच आहे अशी सर्वांची पूर्ण खात्रीच आहे. अजिबात अतिशयोक्ति करत नाही - पण मॉथ; म्हणजेच साधं मोठं फुलपाखरु जरी आलं तरी - या "पक्ष्याला" पहिले घराबाहेर काढ असेही उदगार येतात म्हणजे पहा !

काही दोस्त मंडळींनी शिकवल्यामुळे मी सर्व किडे पकडू शकतो, साप, उंदीर, सरडे, पाली हाताळतो याची जाहिरात मीच (वेड्यासारखी) या मंडळींसमोर का करुन ठेवली याचा मला आता पश्चात्ताप होऊन उपयोग तरी काय ?

तर एकदा असेच आम्ही सर्व निवांत टी. व्ही. पहात बसलो असताना माझ्या चतुर बायकोच्या अतिसंवेदनाक्षम कानांनी वेध घेतला तो एका किड्याच्या उडण्याच्या आवाजाचा (तशी ती शब्दवेधीच आहे याबाबतीत - कोण तो अर्जुन का कर्ण वगैरेंसारखी)....झाले....तिने ईईईईईईईईईईई चा सूर लावायचा अवकाश...मी सोडून सर्व सदस्य जिकडे दिसेल तिकडे पळू लागले. मला काही लक्षात यायच्या आत बाजूच्या दोन्ही बेडरुम्सची दारे लागलीदेखील होती व नेहेमीचे ब्रह्मवाक्य माझ्या कानावर आदळले .........

"त्याला पहिल्यांदा बाहेर घालव... "

मी पाहिले तर बिचारा "प्रेइंग मँटिस" माझ्या शेजारीच येऊन बसला होता. मी उत्साहाने बायकोला सांगू लागलो - अगं, तो साधा "प्रेइंग मँटिस", ते चितमपल्लींनी वर्णन केलेला - खंडोबाचा घोडा.

"शशांक, ते कोणीही असूदे...त्याला पहिला बाहेर घालव....."

"अगं, मस्त चान्स आलाय फोटो काढायचा तर ओरडतीएस का ?"

"अरे, XXXX, तुला फोटो काढायचं काय सुचतंय त्याला बाहेर काढायचे सोडून ?"

"तूच परवा मला ते वर्णन वाचून दाखवत होतीस ना एवढ्या कौतुकाने !"

"शशांSSSSक......"

इथे तिचा एकदम वरच्याचा वरचा "सा" लागल्यानं मी पुढे काही बोलू धजलो नाही.

सुदैवाने कॅमेरा जवळच असल्याने मला निवांत फोटो काढायला मिळाले. दोन्ही बंद खोल्यातून अनेक वेगवेगळे उदगार माझ्या कानावर येत होतेच पण नेहेमीसारखे त्याकडे दुर्लक्ष करुन मी प्रेइंग मँटिसचा फोटोसेशन पार पाडला.

अर्थातच त्या बिचार्‍याला फोटोसेशननंतर अगदी सांभाळून घराबाहेर सोडून दिले ! ( सर्व कीटकांचे पाय नाजुक असल्याने पटकन तुटू शकतात व असा जायबंदी कीटक कोणाचेही लगेच भक्ष्य होऊ शकतो निसर्गात )

बंद खोल्यातून तार व संतप्त स्वरात विचारणा झालीच. खात्री करुन घेण्यासाठी प्रथम दारे किलकिली करुन शत्रू (?) घराबाहेर गेला आहे हे पहाण्यात आले. मला दोन्ही हात पुढे करुन उघडून दाखवायची आज्ञा झाली. पूर्वी हे पकडलेले कीटक मी हातातच अथवा शर्टच्या खिशात अलगद ठेवायचो व सर्व आलबेल आहे झाले अशा समजुतीत मंडळी रीलॅक्स झाली की हळूच कोणाच्यातरी समोर पुन्हा धरायचो - मग पुन्हा किंचाळ्या वगैरे सर्व सीन होऊन मला शिव्याशाप मिळाले की मग मलाही एक प्रकारचा दचकावल्याचा आनंद (बाकी मंडळींना तो आसुरी वाटला तर माझा काय दोष) मिळायचा. तेव्हापासून माझी झाडाझडती हा नाट्याचा शेवटचा अंक असतो. असो, तर हे झाडाझडतीचे सगळे सोपस्कार पार पडल्यावर मग सर्व दोस्त (?) पक्षांनी सुटकेचा नि:श्चास टाकला व मी हे नवीन प्रकाशचित्रे (फोटो) संगणकावर उतरवण्याच्या मागे लागलो.

विशेष माहिती - याला प्रार्थना कीटक म्हणतात - पुढचे दोन पाय उचलून प्रार्थनेच्या पोजमधे दिसतात म्हणून. हा कीटक जबरदस्त भक्ष्यक (शिकारी / प्रिडेटर) असा असल्याने पाल याला खाणार नाही, हाच कदाचित पालीला खाईल. छोटे किडे, छोटे बेडूक, छोटे साप अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांची हा कीटक पद्धतशीर शिकार करतो. डिस्कव्हरी चॅनेलवर हा चक्क हमिंग बर्ड व अगदी छोट्या उंदरांची शिकार करताना दाखवला आहे.

हा, टोळ व इतर किडे (गांधीलमाशी, मधमाशी सोडल्यास) माणसाला इजा पोहचवत नाही. झुरळे, किडे वगैरे सर्वांच्या पायाला थोडेसे काट्यासारखे असल्याने आपल्या अंगावर बसल्यावर थोडे टोचल्यासारखे होते. आपल्या अंगावर बसलेल्या किड्याला ओढून काढण्याऐवजी इतर काही कागद वगैरे सपोर्टसारखे पुढे केले तर तो त्यावर चढतो व आपल्याला किंचीत ओरखडल्यासारखे जे फिलींग येते तेही येणार नाही.

कोळी, सुरवंट अंगावर चिरडले गेल्यास शरीरावर रॅश किंवा गांधी येउ शकते. या परिस्थितीत घरगुती उपचार न करता ताबडतोब डॉ. कडे जाणे.

कुठलाही छोटा प्राणी माणसासारखा "अजस्त्र" प्राणी समोर आला की घाबरतोच. त्यात आपण पळापळ केली की त्याला भिती वाटून तो पळापळ करतो. आपण शांत (९०-९९% लोकांना हे शक्य नाही याची जाणीव आहे) राहिलो तर तो (सापदेखील) काही करत नाही. डॉ. प्रकाश आमट्यांचा नातू देखील विषारी साप, बिबळ्या, घोरपडी हाताळताना आपण पहातो की ! त्यामानाने "पाल", "किडे" हे तर किती किरकोळ !; यांना आपण न मारता, इजा न करता हाकलवू जरुर शकतो की - तेदेखील निसर्गाचे घटकच आहेत ना ? झुरळ, डास, ढेकूण्,पिसवा हे फार उपद्रवी व आजार फैलावणारे असल्याने त्यांचा बंदोबस्त करणे फार जरुरीचे आहे.

पाल तर किडे, झुरळे खाते म्हणजे उपयोगीच म्हणायची, ती कधीही आपल्याला त्रास देउ इच्छित नाही. भारतात सापडणारी एकही पाल विषारी नाही. पालीला एकवेळ हाकला, मारु मात्र नका.

किड्यांसंबंधात - भारतात सापडणार्‍या विषारी, घातक किड्यांची कोणाला विशेष माहिती असल्यास ती फोटोंसकट दिल्यास सर्वांनाच उपयोगी ठरेल.

सर्वात शेवटी टोळाचा फोटो टाकला आहे.

हाच तो बिचारा - घराबाहेर घालवायच्या आधीचा

Picture 271.jpgPicture 273.jpgPicture 267.jpgटोळ / नाकतोडा / ग्रासहॉपर
http://www.seamstressfortheband.org/wp-content/uploads/2010/09/grasshopp... या साईटवरुन साभार ...

grasshopper21.jpg

गुलमोहर: 

ईईईईईईईई...मला पण नाही आवडत असे किटक, पाल, झुरळ.. वॅगरे(हे मराठीत कस लिहायच) घरात आलेले.
मी पण हेच सांगते "आधी त्याला बाहेर घालव" Happy

मस्त लिहिलय .... Rofl

मला काही लक्षात यायच्या आत बाजूच्या दोन्ही बेडरुम्सची दारे लागलीदेखील होती व नेहेमीचे ब्रह्मवाक्य माझ्या कानावर आदळले .........
"त्याला पहिल्यांदा बाहेर घालव... " >>>> अगदी अगदी.

मस्त लिहीले आहे Happy आवडले. या सर्व किडे वगैरेंना त्यांना आणि अर्थात घरातील व्यक्तींना इजा न होता बाहेर कसे हाकलायचे याबद्दल माहिती मिळाली तर आवडेल. मारावेसे वाटत नाही आणि पटकन सापडत नाहीत Happy

वॅगरे>>> आधी मला वाटले हा ही एक किडा आहे Happy

मस्त ! एकटा दुकट्याच ठीक आहे पण जेव्हा हे टोळ हजारोंच्या संख्येने उडतात आणि पिकावर बसतात, खुप नुकसान करतात.

टोळ धाड हा मराठीतला शब्द पुढे "धाड" पडली असा आयकर खात्याच्या शासकीय तपासणीला का पडला हे काही कळत नाही.

माझ्या काही घरात अशा प्राण्यांचा मुक्त संचार असे. खरे तर घर त्यांचेच असायचे, मीच ऊपरा असायचो तिथे.

मस्त! घरोघरी....
Everybody Loves Raymond मधे वैतागलेला रेमंड त्याच्या बायकोला उद्देशुन म्हणतो, "The only reason she keeps me alive is to open jars and kill bugs.".... याची आठवण झाली!

> "The only reason she keeps me alive is to open jars and kill bugs." अगदी खरं. म्हणुन तर आम्ही लग्न करतो.

शशांक एक्दम मस्त लिहिलं आहे. आमच्या घरी पण सेम. मी तर पालीचा मुर्दा बघितल्याशिवाय नवर्‍याला सोडतच नाही. ती जिथे कुठे लपली असेल तिथुन तिला शोधुन, तिची हत्या करुन, मला दुरुनच प्रेत दाखवुन मगच त्याची सुटका होते.

अरे काय तुम्ही लोक्स ?
मी कित्ती कित्ती मनापासून, आवर्जून माझ्या आवडत्या "सुंदर", "देखण्या" प्रेइंग मँटिसचे फोटो इथे टाकले - त्यावर एकही प्रतिसाद नाही ? तुम्ही सर्व लोक्स माझ्या विरुद्ध पार्टीला सामील दिसताय !

छान फोटो

पालीचा मुर्दा बघितल्याशिवाय नवर्‍याला सोडतच नाही

त्यापेक्षा तुम्ही स्वतः पाल पकडून खात का नाही? ( तुम्ही मनिमाऊ आहात ना? Proud )

मस्त लिहिलयं. इथे पाल, झुरळे वगैरे नाहित पण थंडी संपली की कोळी, बिटल्स, मधमाशा येतात घरात. माझ्या ऐवजी 'त्यांना बाहेर काढ' म्हणुन माझा लेक आणि नवरा ओरडतात. आता नवरा लहान कोळी असेल तर व्हॅक्युम क्लिनरमधे पकडायला शिकलाय पण मोठा कोळी असेल तर आरडाओरडा ठरलेला. Happy
फोटो छान आलाय.

पालीचा मुर्दा बघितल्याशिवाय नवर्‍याला सोडतच नाही>> "ईईईई त्याला आधी बाहेर घालव" हे उद्गार मला क्वचितच काढायची वेळ येते... Happy नवरा यायच्या आधीच मी असेल नसेल तेवढा जीव काढून केरसूणी गदेसारखी टाकून दात ओठ खात नी पालीच्या ५२ पिढ्यांचा उद्धार करत आधीच धावलेली असते...
Proud

भाड्याच्या घरात नवीन नवीन राहायला आलेलो तेव्हा एवढ्या पाली फिरत होत्या... त्यातल्या ३ नवर्‍याने आणि २ मी मारल्यानंतर आणखी ३ इकडून तिकडे पळताना दिसल्या आणि नवर्‍याच्या अगदी शेजारी सरड्याएवढाली मोठाली पाल धाप्पकन पडल्यावर "बास्स!! मी या घरात राहणं शक्यच नाही!!! असं डिक्लेअर करून तो सरळ चप्पल अडकवून बाहेर पडला घमा. ला सांगायला... (जाण्याआधी त्या ५ अर्धवट वळवळत्या मुडद्यांचं मोबाईलमध्ये चित्रण करून न्यायला विसरला नाही Happy ) आणि मी त्या ५ मुडद्यांच्या मध्ये झाडू खांद्यावर टाकून हताशपणे बघत होते... Sad आधीच्या बाईने पालसंगोपन केंद्र खोललं होतं बहुदा Sad

पहिल्या फोटोमध्ये काय शानमध्ये बघतोय तो कॅमेराकडे! मला एकदम 'बग्ज लाईफ' मधला मॅनी आठवला.

मस्त!

dreamgirl, मी तुझी fan आजपासुन कायम. तु जर पाल मारु शकतेस तर तु माझ्यासाठी सुपरवुमन. मी पाल बघितली तरी माझे ब्लड प्रेशर वाढते, ह्रुदयाचे ठोके अनियमित आणि पण बरच काय होतं. मी बेडवर किंवा त्यापेक्षा अजुन काही उंच असेल तर त्यावर उभी रहाते. जशी जशी पाल पळेल तशी तशी मी तिथे पळत किंवा उड्या मारत असते. नवर्‍याला टेन्शन कि ही पडते की काय तिथुन. तो जे काय वैतागायचा ना या सगळ्या प्रकाराला. नविन घरी एकही पाल नाही, म्हणुन सुखावला आहे बिचारा. पाल प्राणी पण. कारण त्यांची प्रजाती नष्ट व्हायला आली होती माझ्यामुळे.

माझ्या नवर्‍याला तर मी सांगितलं आहे कि बाबा रे तुला कधी पुढे मागे माझा खुन करायचा असेल तर हिन्दी सिनेमासारखा प्लॅन बनवण्यात जीवाला त्रास करुन घेउ नकोस. बस्स एक खेळण्यातली प्लास्टिक्ची पाल फेकली अंगावर कि गप्पकन जीव जाइल माझा. Happy

एमबीए करत असताना एके दिवशी रात्री जेवून रूमवर परत आले तेव्हा भिंतीवरच छोटं पालीचं पिल्लू दिसलं. रात्री झोप येणं शक्यच नव्हतं तेव्हा लगेच फोन करून हाऊसकिपिंग वाल्यांना बोलावलं. फोनवर माझा आरडाओरडा ऐकून बिचारे दोघे-तिघे एकदम धावत आले. त्यांची समजूत बहुधा साप शिरला असाव अशी झाली होती. कारण ते पालीचं पिल्लू पाहून त्यांनी हसू दाबल्याचं माझ्या (चाणाक्ष!) नजरेतून सुटलं नाही. मग बेड, टेबलं सरकावून त्याला पकडायचं काम सुरू झालं. अर्थात मी रूमच्या बाहेर. हा गोंधळ ऐकून माझी एक रूममेट आली. तिनेही उगाच कारण नसताना "अरे, क्या छिपकलीसे डरती है, मुझे लगा साप आया है" अशी मताची पिंक टाकली पण आपल्या रूममध्ये जाऊन घट्ट दरवाजाही लावून घेतला. इथे हाऊसकिपिंगवाले त्या पिल्लाला पकडायची शर्थ करत होते.

मी दुसर्‍या मैत्रिणीच्या रूममध्ये जाऊन झोपायची मनाची तयारी केली होती. पण सकाळी परत आल्यावर ते पिल्लू कुठे असेल ही नवी काळजी. देवाची प्रार्थना करत राहिले. देव ह्या अश्या छोट्या प्रार्थना नेहमी ऐकतो. कारण शेवटी पिल्लू पकडल्याचं एका हाऊसकिपिंगवाल्याने जाहिर केलं. "मारना मत उसे, कही बाहर छोडके आयिये" माझी भूतदया एव्हढीच. "जी मॅडम" म्हणून तो बाहेर निघाला. "ठहरो, मुझे दिखाओ की आपने सचमुच उसे पकडा है". हाऊसकिपिंगवाल्याने मला मनातल्या मनात सॉल्लीड शिव्या घातल्या असणार. पण ते पिल्लू डोळ्याने पाहिल्याशिवाय माझं समाधान होणं अशक्य. मग त्याने टॉवेल थोडा उघडून मला दाखवलं. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला.

>>> "The only reason she keeps me alive is to open jars and kill bugs." अगदी खरं. म्हणुन तर आम्ही लग्न करतो.

अगदी प्रचंड अनुमोदन! Proud

शशांक, मस्त खुसखुशीत लिहीलं आहे... फोटोतला "तो" कित्तीही हिरवागार बिच्चारा वाटत असेल तरी... माझी रिअ‍ॅक्शन हीच..."त्याला पहिल्यांदा बाहेर घालव...." (नाहीतर त्याला बिच्चार्‍याला माझ्या हातून स्वतःचा जीव गमवावा लागेल!!! Happy )

मनिमाऊ, मीपण पाल घालवायची पण मारायची नाही कधी... पण इथे भाड्याच्या घराला उंबरा नव्हता... घालवलेल्या परत यायच्या... आणि त्यांचं पूर्ण गांव इथे वसलं होतं... त्यामुळे चिडून सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढण्यासाठी मी त्यांना एवढ्या जंगली रितीने मारलं की आता मलाच विश्वास बसत नाही. तेव्हापासून मला नवर्‍याला या कामासाठी बोलवायची गरजच नाही पडली... Happy

स्वप्ना.. पालीचं पिल्लू हा फार किळसवाणा प्रकार! धड घालवता येत नाही धड मारताही येत नाही आणि एवढ्या जलद इथून तिथे पळतात की किळसून शहारा येतो अंगावर बघूनही!!! यक्क!!!

@ड्रीम गर्ल :<<आधीच्या बाईने पालसंगोपन केंद्र उघडलं होतं बहुतेक>>
ग्रेटच!@शशांकः लेख अगदी 'वस्तुस्थितीनिदर्शक' आहे!

>>स्वप्ना.. पालीचं पिल्लू हा फार किळसवाणा प्रकार!

अगदी अगदी ग. मागल्या वर्षी आमच्या घरात कसा कोणास ठाऊक, पण सुळसुळाट झाला होता पालींचा अगदी. नाकी नऊ आले होते. तेव्हा आईने एका पालीला मारायचा प्रयत्न केला तेव्हा तिची शेपूट तुटली. मग आईने पालीला बाहेर नेउन टाकलं तरी तिची तुटलेली शेपूट कित्ती वेळ वळवळत होती. यॅक! मला दुसर्‍या दिवशी अजिब्बात जेवण गेलं नाही.

आणखी एक तापदायक प्रकार म्हणजे उडते झुरळ. ईईईईईईई!

पण तू पालींचं निर्दालन करतेस. तुला शि.सा.न. Happy

@हीरा, अरे हो छान शब्द आहे नै... मलापण आत्ता समजलं, पुन्हा वाचताना! मी असाच टाकलेला.. Proud

पालींचं निर्दालन>> हा हा छान शब्द! जास्त यक्क्स प्रतिक्रिया नाही पोस्टत आता... मी पाली मारू शकते.. पण त्यांची तुटलेली शेपटी नी बाहेर आलेल्या डोळ्यांच्या इवल्या गोट्या सुपलीत भरून नाही टाकू शकत... ईईईई... ते काम करण्यासाठी मात्र नवर्‍याला बोलावते.. Happy

पालीला घाबरण्यासारखं काय असतं मला कधी कळलं नाही. माझ्या अंगावर तर इतक्यांदा पाल पडते . नीट निरिक्षण केक्लं तर काही पाल या अर्धपारदर्शक असतात.

बाकी लेख मजेदार आणि फ़ोटो मस्तच!

Pages