क्लिक क्लिक... क्लिक क्लिक... टिण्ण...
पोटावर चित्रविचित्र आवाज झाल्यामुळे दचकलेल्या गोपने पाहिले तर 'दुसर्याच्या मनातील वेव्ह्जचा अर्थ सांगणारी' चीप जोरात आवाज करत होती. त्याचक्षणी गोपच्या मनात आपोआप तो विचारही आला.
'विश्वाच्या अंतापर्यंत ४६३४४ ची साथ मला मिळाली तर????"
दचकून गोपने १६९९ कडे पाहिले.
"ओ... ओ १६९९... वाट्टेल ते विचार करू नका.. कालपासून मला काही खायलाही मिळालेले नाहीये... इथे काही खायला मिळेल का??"
"यू मीन... यू आर हन्ग्री??? "
"अं??... येस हन्ग्री मी"
"काय खाणाSSSSSSSSर???"
"ओ.. अहो अश्या लाडात नका ना बोलू... "
"आणि बोल्लेत्तर???"
स्वतःच्याच डाव्या तळहातावर उजव्या हाताची मूठ आपटत आणि त्याचवेळेस उजवा पाय स्पेस प्लॅटफॉर्मच्या जमीनीवर आपटत कंबर घुसळून व मान तिरकी करून पारध्याच्या नजरेने गोपकडे पाहात १६९९ म्हणाली. काही झाले तरी तिची ती अदा फारच मराठमोळी असल्याने क्षणभर गोपही मोहीतच झाला पण लगेच दचकला. आपण अंतराळात असून आपले उगाचच लांबलेले आयुष्य आता या १६९९ च्या हातात आहे याची जाणीव झाल्यावर!
१६९९ ला तिसराच आनंद झालेला होता. सध्या हयात असलेल्या मानवांपैकी सर्वात शुद्ध चारित्र्याचा व ८०-११ चा अनुयायी असलेला व त्याचमुळे सर्वांसाठी देवतुल्य असलेला ४६३४४ आत्ता तिच्या सोबतीत होता आणि त्याची तांत्रिक प्रगती मात्र खूपच कमी झालेली असल्यामुळे निदान पृथ्वीवर पोचेपर्यंत तरी तो तिच्या हातातील एक बाहुले होता. अनेकदा प्रयत्न करूनही 'सिंगापोर विथ आमीर' किंवा 'थायलंड विथ शाहरुख' अशा योजनेत काहीही न मिळणार्या आत्ताच्या एखाद्या मुलीला एकदम 'मॉरिशस विथ जॉन अॅन्ड शाहिद कंबाइन्ड' अशी ट्रीप मिळाल्यावर व्हावा तसा तिला आनंद झाला होता. 'स्पेस विथ ४६३४४'!
१६९९ ने अत्यंत त्वरेने हालचाल करून पहिल्यांदा गोपकडची ती 'दुसर्याचे मन समजणारी' चीप हस्तगत करायचा प्रयत्न केला. गोपने तो हाणून पाडला.
"हे कॉSSSSSय"
"ओ.. लांब थांबा... तुम्ही पाच वर्षाच्या मुलीसारख्या बागडताय भर अवकाशात.. इथे काही खायला आहे का??"
"भरपूर आहे खायला.. प्रोटीन्स, सॅलड्स, सिरिअल्स, क्षार... काय हवंय??"
"हे कसले पदार्थ??"
"आत या ना..."
गोप बुजगावणं हालावं तसा आत गेला तिच्यामागून! आतली खोली प्रचंड होती. त्यात अनेक वायर्स आणि चीप्स होत्या. अनेक लाल, हिरवे दिवे आणि अनेक प्रकारचे 'इलेक्ट्रॉनिक आवाज' त्या खोलीत होते. ही बहुधा १६२२ ची प्रयोगशाळा असावी. दुसरी खोली हे शयनगृह होते. त्यात एका भिंतीवर एक टीव्ही होता आणि त्याचा रिमोट वगैरे नव्हताच. नुसतेच १६९९ म्हणाली:
"अर्थ"
गोपला काही समजायच्या आत स्क्रीनवर पृथ्वीवरील चॉईस दिसू लागले. समुद्र, जमीन, गोलार्ध, अक्षांश आणि रेखांश! १६९९ ने काही अगम्य उच्चार केल्यानंतर अचानक गोपला स्क्रीनवर एक अतीप्रचंड जनसमुदाय दिसू लागला. इतका वेळ शांत असलेला तो प्रचंड समुदाय अचानक चीत्कारल्यासारखे आवाज करू लागला. १६९९ तर आनंदाने वेडी व्हायची वेळ आली होती. तिने दोन्ही ओठ कायमस्वरुपी विलगच असावेत अशा पद्धतीने हासायला सुरुवात केली आणि हात हालवून त्या समुदायाला आपला आनंद व्यक्त करून दाखवला. त्याचक्षणी तो समुदाय अतीव आनंदाने हात हालवून नंतर गुडघ्यांवर बसला. हजारो माणसे गुडघ्यांवर बसलेली पाहून 'हे शुटिंग बहुधा मक्केचे असावे' असे गोपला वाटले. मात्र त्या समुदायाने काही हातवारे केले.
१६९९ - पाहिलंत?? कित्ती कित्ती आनंद झालाय सगळ्यांना??
गोप - हे सगळं कुठे चाललंय??
१६९९ - एजंट ऑफीसच्या बाहेर.. ते बघा.. सहा एजंट्सही आहेत...
गोप - मला खायला देता का काहीतरी??
१६९९ मात्र हरखून टीव्हीच बघत होती. ४६३४४ मुळे आपणही जगद्विख्यात झालो हा आनंद अजून तिला झेपतच नव्हता.
गोप - ओ.. ते बंद करा ना.. खायला द्या..
१६९९ ने दचकून टीव्ही बंद केला आणि आत धावली. बाहेर आली तेव्हा तिच्या हातात चार हॉल्ससारख्या गोळ्या होत्या.
१६९९ - घ्या..
गोप - भूक लागलीय भूक.. मुखशुद्धी नकोय..
१६९९ - घ्या ना मग हे?
गोप - हे काय आहे?
१६९९ - ही मल्टिव्हिटॅमिन टॅब्लेट.. ही क्षारांची... ही प्रोटीन्सची..
गोप - बाई.. मला वरण भात पोळी भाजी असं काही मिळेल का?
१६९९ - म्हणजे??
गोप - राईस राईस... चावल..
१६९९ ने ताबडतोब एका उपकरणाद्वारे कुठेतरी संपर्क साधला. वेगळ्याच भाषेत बोलून तिने तिथली अडचण सांगीतली. साधारण सहा ते सात मिनिटे बोलणे झाल्यानंतर तिने ते उपकरण बंद केले आणि गोपकडे आली.
१६९९ - असं काहीच नाही मिळत ...
गोप - मग खाता काय तुम्ही??
१६९९ - हेच..
गोप - पोटं कशी भरतात पण??
१६९९ - या प्रोसेस्ड टॅब्लेट्स असतात. पचनसंस्थेला अशी जाणीव होते की खूप मॅटर आतमध्ये आलेले आहे. यातून शरीराला आवश्यक ते सगळे मिळते. तुमची तब्येत खूप सुधारेल. घ्या ना..
गोप - तुम्ही सगळे.. नक्की हे खाता ना??
१६९९ - मी खाऊन दाखवू?? विश्वास नाही ना?? हे बघा..
तिने एक गोळी खाल्ली. लगेच बेडवर बसली अन म्हणाली..
१६९९ - बापरे.. काय खाणं होतंय मगाचपासून...
गोप - मगाचपासून?? दोन दिवस एक घास खाल्लेला नाहीये आपण..
१६९९ - ३४ SSSSS ४.. असं काय करता... तुम्हाला शुद्धीवर येऊन फक्त बारा तास झालेले आहेत आणि तेही पृथ्वीवरचे..
आपले नांव ४६३४४ असे असून त्यातील '३४४' हा भाग तिने लाडीकपणे उच्चारला हे समजायलाच वेळ लागला गोपला!
१६९९ - मी जरा पडते.. चालेल ना??
गोप - वाट्टेल ते करा.. मला 'विचारच करता येणार नाही' अशी एखादी चीप आहे का??
१६९९ - होSSSSS....... हे घ्या.. हे लावा पोटावर...
गोपने आधी तीन उरलेल्या गोळ्या खाल्या. त्याला 'तीन गोळ्या म्हणजे किस झाडकी पत्ती' वाटत होते. पण तिसरी गोळी घशात ढकलतानाच जाणीव झाली की ढेकर येत आहे. इतक्या सुंदर तरुणीसमोर ढेकर आली तर काय होईल असा विचार करून त्याने कशीबशी ढेकर म्युटमध्ये दिली. तिसरी गोळी खाल्यावर मात्र त्यालाही सुस्तीच आली.
गोप - ओ.. मी कुठे झोपू??
१६९९ - थांबा..
१६९९ ने एका भिंतीपाशी जाऊन एक स्विच ऑफ केले. खोलीतील यच्चयावत चीप्सचे आवाज बंद झाले. मात्र एक कर्कश्श आवाज तेवढा झाला. १६९९ ने धावत जाऊन एक उपकरण हातात घेतले आणि तीव्रपणे काही सेकंद बोलली. त्यानंतर उपकरण ठेवून ती गोपपाशी आली. मादक हासत म्हणाली..
१६९९ - झालं..
गोप - काय झालं??
१६९९ - तुटला संपर्क पृथ्वीशी...
गोप - आं?? अहो काय सांगताय??? आता काय करायचं??
१६९९ - काही नाही... आराम..
गोप - हो पण संपर्क तुटल्यावर आता आपण कायम इथेच की काय??
१६९९ - हाऊ रोमॅन्टिक..
गोप - रोमॅन्टिक?? माझं अजून आयुष्य जायचंय हो.. करा ना संपर्क पृथ्वीशी..
१६९९ पलंगावर आडवी झाली. स्वतःच्याच गालांमध्ये जीभ घोळवत गोपकडे मिश्कीलपणे पाहात म्हणाली..
१६९९ - अजून आयुष्य जायचंSSSSय?? किती??? बारा हजार वर्षे??
गोप - अहो.. प्लीज करा हो संपर्क स्थापित त्यांच्याशी...
१६९९ - तुम्हाला शांत झोप लागावी म्हणून मीच तोडलाय.. तुमची झोप झाली की करेन पुन्हा मी संपर्क त्यांच्याशी..
गोप - तुम्हीच तोडलात??
१६९९ - हो..
गोप - मग.. मग तो आवाज कसला झाला?? कुणाशी काय बोललात तुम्ही??
१६९९ - त्यांनी विचारले... संपर्क का तोडलास म्हणून.. मी म्हणाले आम्हाला प्रायव्हसी हवीय..
गोप - प्राय.. कुणाला प्रायव्हसी हवीय??
स्वतःच्या दोन्ही हातांची पहिली बोटे स्वतःच्याच गालावर गोलाकार फिरवत १६९९ म्हणाली..
१६९९ - आपल्याला...
गोप - ही अशी बोटे का फिरवलीत??
१६९९ - मुली अश्याच लाजतात..
गोप - काय??
१६९९ ने पुन्हा बोटे फिरवली.
गोप - ओ.. लाजूबिजू नका तुम्ही.. कसल्या भयाण चालीरीती आहेत राव इथे..
१६९९ - जाऊ मी??
गोप - कुठे??
१६९९ - झोपायला??
गोप - नाही नाही.. तुम्ही पडा इथेच.. मला कुठे झोपायचं ते सांगा फक्त..
१६९९ - ही मेन बेडरूम आहे.. मी तिकडे झोपणार आहे..
गोप - जा मग लवकर..
१६९९ - कित्ती इनोसन्ट...
१६९९ मिश्कील हासत निघून गेली. बेडवर पडून गोप आढ्याकडे बघत विचारात हारवला.
' हे काय चाललंय काय? आपण आहोत की नाहीच आहोत?? आहोत असं तर वाटतंय... ते बटण दाबून पुन्हा संपर्क चालू करता येतो का ते पाहायचं का? ही बाई झोपेत आपल्याला मारेलही एखादवेळेस... काय सांगता येतंय.. आपण आणि ती एकटीच.. तेही मंगळ आणि गुरू या ग्रहांच्या मध्ये! कुठे जायचं म्हंटलं तरी शक्य नाही.. अवकाशात गेलो की विश्वाच्या अंतापर्यंत असेच फिरत राहणार.. हा स्पेस प्लॅटफॉर्म की काय ते सरकवत सरकवत पृथ्वीपर्यंत जातही असेल एखादवेळेस.. काय सांगता येतंय.. त्या दोन गोळ्यांनी पोट कसं काय भरलं कुणास ठाऊक.. अरे?? आपण बारा तासात एकदाही... बाथरूमला कसे काय गेलो नाहीत?? की इसविसन १०००० मध्ये युरिन महिन्यातून एकदा वगैरे होते?? शक्य आहे म्हणा.. दोन गोळ्या म्हणजे जेवण असलं तर एक थेंब पाणी आंघोळीलाही पुरत असेल.. आणि नुसती जीभ ओली करणे म्हणजे तहान भागणेही असू शकेल.. सम्या जाधवाचा फोन यायची नाही का रोज?? गोप्या.. चल चहा मारू... की गेले दोन तास.. आशा काय भडकायची... सम्या जाधव.. बिचारा.. कधीच नोकरी नाही मिळाली त्याला.. कसाबसा मिळेल ते काम करून जगायचा.. पण जिगरी होता आपला.. आपल्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असायचा.. गेले ते दिवस म्हणा... आता आठ हजार वर्षे झाली त्या सगळ्याला.. या १६९९ चं काहीतरी करायला पाहिजे.. एकदा पृथ्वीवर गेलो की तिच्या साहेबाला सांगून टाकू.. ही बाई नको माझ्याबरोबर.. ओठ वर खाली करून हासते ही.. पण तोही तसाच हासत असायचा.. म्हणजे बोंबललो आपण.. हे खांद्याची चीप काय प्रकरण आहे कुणास ठाऊक... अचानक आपण किंग झालेलो दिसतोय.. पण या नालायकांवर विश्वास ठेवणे योग्य नाही.. उद्या आपल्याला किंगपदावरून खाली खेचतील आणि तुडवतीलही.. या चीपा काढून टाकतो राव आधी.. धड झोप लागत नाही.. वाजलेत किती कुणास ठाऊक... अर्थात.. 'कुठले किती वाजलेत' हा प्रश्न आहेच म्हणा.. पुथ्वीवरची वेळ वेगळी, मंगळावरची वेगळी आणि इथली तिसरीच.. अँ??? ही आली पुन्हा???'
१६९९ आळस देत येत होती.
गोप - ओ.. झोपा की जरा.. मलाही पडूदेत की??
१६९९ - म्हणजे?? झोपलाच नाहीत तुम्ही??
गोप - अहो पाच मिनिटं झाली नाहीत मला आडवं होऊन.. जेवण कसलं झालंय...
१६९९ - मी एवढीच झोपते.. पण मी इतरांचा हेवा नाही करत.. तीस मिनिटे झोप चिक्कार झाली दिवसातून..
गोप - म्हणजे?? तुम्ही दिवसातले साडे तेवीस तास उंडारता???
१६९९ - उंडारता म्हणजे???
गोप - म्हणजे.. जाग्याच असता??
१६९९ - होSSSSS
गोप - का? झोपेचे तास ठरलेले असतात का??
१६९९ - नाही.. पण तेवढी झोप चिक्कार झाली की??
गोप - मी.. मला आठ तास झोपायचंय..
१६९९ ने स्वतःचा तळहात स्वतःच्या तोंडावर ठेवून आश्चर्य व्यक्त केले.
१६९९ - आठ तासात जग कितीतरी पुढे जाईल..
गोप - मग जाऊदेत की?? आठ हजार वर्षे जिथे पुढे गेलंय तिथे आठ तासांचं काय??
१६९९ - खरच इतका वेळ झोपणार???
गोप - हो...
१६९९ - मग मी काय करू एकटीच??
गोप - काय करू म्हणजे?? फिरून या एखाद्या ग्रहावर वगैरे..
१६९९ - इथे फक्त एक गुरूचा चंद्र जवळ आहे..
गोप - मग या की जाऊन??
१६९९ - हो पण जायला शटल कुठे आहे??
गोप - ते बघा बुवा.. मी आपलं सांगीतलं.. सांगणं माझं काम आहे..
१६९९ - आणि तिथे मायनस एकशे ऐंशी टेंपरेचर असतं...
गोप - स्वेटर बिटर घाला...
१६९९ - तुम्हाला थट्टाच सुचते...
गोप - अहो माझी थट्टाच झालीय... दुसरं काय सुचणार??
१६९९ - तुम्ही येता?? इथे एक आणखीन प्लॅटफॉर्म आहे..
गोप - कुणाचा??
१६९९ - एका एजंटचा..
गोप - जवळ आहे का??
१६९९ - हो... पन्नास एक हजार किलोमीटर असेल..
गोप - अगदीच जवळ म्हणायचा.. या या.. जाऊन या तुम्हीच.. मी जरा पडतो..
गोपला शेवटचे आठवले ते इतकेच की त्याचा डोळा लागत होता तेव्हा १६९९ च्या चेहर्यावर लबाड हास्य होते.
==========================================
गोप दचकून उठला. कारण डोळे उघडले तर समोर १६९९! तिथेच बसलेली. गोप उठला हे पाहून तिच्या चेहर्यावरची उदासी जाऊन तेथे आनंद आला असावा. कारण ती मंद हासत होती. गोपने इकडे तिकडे पाहात विचारले..
गोप - बराच वेळ डोळा लागला का माझा?? अंधार पडलेला दिसतोय बाहेर...
१६९९ - बाहेर अंधारच असतो.. डोळा लागला काय अन नाही लागला काय..
गोप - तुम्ही इथे का बसलायत??
१६९९ - मग कुठे बसू??
गोप - तुम्ही अशा कचकड्याच्या बाहुलीसारख्या पराधीन का वागता हो?? कुठेही बसा की??
१६९९ - शनीवरून संदेश आलाय...
गोप दचकून उठला.
गोप - शनी?? शनीवर माणूस आहे??
१६९९ - काहीही काय?? माणूस मंगळाच्या पुढे तरी पोचलाय का?? आपण हा प्लॅटफॉर्म आहे म्हणून इथे राहू शकतोय..
गोप - मग... संदेश कुणी पाठवला??
१६९९ - ६४१ ने.. ६४२ आणि ६४१ चे संदेशांचे वहन शनीवरून होते..
गोप - हो पण करते कोण??
१६९९ - उपग्रह नाहीयेत का सोडलेले आपण??
गोप - शनीवर??
१६९९ - शनीवरच काय.. पार नेपच्यूनपर्यंत उपग्रह आहेत..
गोप - आमच्याकाळी पेशवे पार्कात जायचं तर सतरा अडचणी असायच्या.. पैसे, रजा, वेळ...
१६९९ - पेशवे पार्क म्हणजे??
गोप - तिथे प्राणी होते.. हत्ती.. सिंह वगैरे..
१६९९ - ते तिथे काय करायचे??
गोप - जगायचे नुसते...
'काय बेअक्कल बाई आहे' हा विचार गोपच्या मनात येताच १६९९ च्या पोटावरची चीप वाजली आणि तिने दु:खाने गोपला विचारले..
१६९९ - मी वेडी वाटते ना तुम्हाला???
गोप - ओ.. तुम्ही माझी चीप घेतलीत झोपेत..
१६९९ - ती माझीच आहे.. तुम्हाला दिलेली होती.. आणि तुम्हालाच द्यावी लागणार आहे.. मी फक्त चार्ज केली..
गोप - अशी?? पोटाला लावून??
१६९९ - मग?? बॉडी हीटनेच चार्ज होतात चीप्स!
गोप - ऐकाल ते नवल... द्या आता ती चीप...
१६९९ ने चीप गोपच्या हवाली केली.
१६९९ - चला ना... तुम्हाला गुरूचा चंद्र दाखवते..
गोप - तुम्ही अधूनमधून एखादं साधंसुधं वाक्य बोलाल का प्लीज??
एवढे विचारेपर्यंत १६९९ ने त्याचा हात धरून त्याला एका टेरेससारख्या जागेवर नेलेही. तेथे एक अॅडिशनल मास्क धारण करावा लागला. त्याचा उपयोग 'प्लॅटफॉर्मच्या आतील प्राणवायू अधिक जोरात खेचणे' असा होता.
विलक्षण!
अक्षरशः विलक्षण दृष्य होते ते!
खिळलाच गोप! आणि १६९९ ही! तिला कोण अभिमान वाटला स्वतःचा... की ८०-११ च्या अनुयायाला कधी नव्हे इतके सुंदर दृष्य आपण दाखवले याचा!
कित्येक सेकंद गोप नुसता पाहातच राहिला होता अवकाशाकडे!
लख्ख चांदणे! चांदण्याचा प्रकाश म्हणजे काय ते आज खर्या अर्थाने समजले त्याला!
विविध रंगांचे गोल अवकाशात तरंगत होते. काही काही तर चक्क खूप जवळ वगैरेही वाटत होते. त्यातलाच एक गुरूचा चंद्र होता. काही पिवळे गोल तर काही निळसर, काही हिरवे तर काही लालसर!
अशी रंगांची उधळण आणि इतके दुधाळ लख्ख चांदणे! आह!
पृथ्वीच्या इतक्या जवळ काहीच नाही आहे हे गोपला जाणवले. १६२२ या १६९९ च्या साहेबाने हा प्लॅटफॉर्म फारच स्ट्रॅटेजिक लोकेशनला घेतलेला दिसत होता. अनेक ग्रह जवळ होते. मुख्य म्हणजे गुरू जवळ होता. इथले टेंपरेचरही प्रचंड कमी आहे हे १६९९ ने त्याला दिलेल्या युनिफॉर्मवरूनच त्याला लक्षात येत होते.
गोप - तो... तो कुठला ग्रह आहे??? इतक्या जवळ... आणि छोटासा???
१६९९ - अंहं.. तो एजंटचा प्लॅटफॉर्म आहे.. पॅलेशियल..
गोप - आणि तो???
१६९९ - तो ६४२ मधला नाहीये.. दुसर्या गॅलक्सीचा मेलेला तारा आहे तो.. म्हणजे आता मरतोय.. त्यामुळे प्रकाशमानता खूप वाढलीय त्याची...
गोप - आणि.. तो?? तो लांब दिसतोय तो????
१६९९ - ओळखा पाहू???
गोप - आता मला काय माहीत असणार???
१६९९ - तरी???
गोप - अंहं..
१६९९ - एक चान्स...
गोप - मी कधीच अवकाशात आलेलो नव्हतो हो.. मला काय कळणार त्यातलं??
१६९९ - नावं तर घ्या विविध ग्रहांची??
गोप - शनी आहे का तो??
१६९९ - ती ...... ती तुमची पृथ्वी आहे..
मटकन खाली बसून लहान मुलासारखा घळाघळा रडला गोप! लांब अवकाशात एक ठिपका दिसत होता. त्यावर सूर्यप्रकाश असल्यामुळे दिसत होता इतकेच! ती आपली पृथ्वी?? आपली धरित्री.. आपली धरणीमाता.. आणि आपण हे कुठे आहोत?? स्वतःच्या जीवावर आणि बुद्धीवर आपण हजार जन्मात तरी पोहोचू का तिथपर्यंत??
मातृभूमीचे, स्वतःच्या आईचे असे अचानक आणि असे विलक्षण दर्शन झाल्यामुळे गोपच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या पाण्याच्या! नजर हटतच नव्हती पृथ्वीवरून! पृथ्वीवरून मंगळावर निघताना आणि मंगळावरून या प्लॅटफॉर्मवर निघताना झालेले पृथ्वीचे दर्शन फार फार वेगळे होते. बरेचसे जवळून होते. जणू पृथ्वीवरून पृथ्वीच्याच चंद्राकडे पाहावे तसे! आणि मुख्य म्हणजे नुकतेच पृथ्वीवरून आल्यामुळे गोपला त्यात काही विशेष वाटत नव्हते. अर्थात कुतुहल अफाट होतेच त्याच्या मनात! तरी नुकताच पृथ्वी मंगळ असा प्रवास केल्यामुळे त्याला 'इथेच तर आहे पृथ्वी' असे काहीसे वाटत होते. पण आत्ता जे पृथ्वीचे दर्शन झाले ते केवळ अफाट दर्शन होते. लाखो तारे आणि ग्रहगोल तरंगत असलेल्या आणि पसरलेल्या त्या लख्ख चांदण्याच्या अवकाशात असाच एक छोटासा गोल होता जो थोडासा निळसर होता इतकेच! खूप खूप लांब! खूपच दूर! असे वाटावे की तिथे आपण कधी असूच शकत नाही. वास्तविक तिथेच गोपने आठ हजार वर्षे व्यतीत केलेली होती.
आई! आपली आई! मातृभूमी! जिथे प्राणवायू विकावा लागत नाही, जिथे तहान भागवायला मुबलक पाणी आहे, जिथे पिकलेल्या धान्यातून अन्नाची, भुकेची गरज भागते.
आशा आणि आपण उन्हाळ्यात वर पत्र्यावर झोपायचो तेव्हा असेच आकाशात चांदण्या बघत बघत झोपून जायचो. तेव्हा हाच प्लॅटफॉर्म किंवा मंगळ किंवा गुरू आपल्याला असाच दिसत असणार!
पृथ्वी!
इतक्या लांब आपली पृथ्वी आहे या भावनेने गोपच्या डोळ्यातील पाणी खळत नव्हते.
१६९९ - आ... आनंद... झाला की हासतात ... ना????
गोपने १६९९ कडे पाहिले. भावनाहीन जगताची प्रतिनिधी १६९९! हिला काय उत्तर द्यायचे या प्रश्नाचे? तिच्यामते आपल्याला आनंद व्हायला हवा आहे. आनंद तर झालाच आहे की पुथ्वी निदान दिसली तरी! पण अमाप दु:ख झाले आहे की ती इतक्या लांब आहे की नुसते बघावेच लागत आहे. तेही ती या बाजूला असतानाच, काही तासांनी ती प्लॅटफॉर्मच्या उलट्या बाजूला असेल! या दु:खाने आपण रडत आहोत तर ही विचारतीय की आनंद झाला की हासतात ना??
गोप - हो... पण खूप... खूप आनंद झाला तर... रडूही येते...
१६९९ - म्हणजे.. हे तुम्ही केलेत तेच रडणे का??
गोप - ... हं!
१६९९ - तो बघा... आपण सोडलेला एक उपग्रह एनर्जी संपल्यामुळे नुसताच ताटकळतो... तो या प्लॅटफॉर्मवरून दिसतो.. तो पहा...
गोप - मला आता काहीही पाहायचे नाही...
१६९९ - का?? ... आनंद नाही झाला??
गोप - झाला... पृथ्वी बघून खूप खूप आनंद झाला.. माझी पृथ्वी... आपण जायचं का हो इथून??
१६९९ एकदम गंभीर झाली. तिला अजून जायचंच नव्हतं! खरे तर तिला आता कधीच जाऊ नये असं वाटू लागलं होतं. तमाम मानवजातीला आदरणीय ठरेल असा माणूस तिच्या एकटीवर अवलंबून होता इतकेच नाही तर तो अप्रगतही होता. हा मोठेपणा सोडावासा वाटत नव्हता १६९९ ला!
पण कधीतरी तो सोडावाच लागणार होता. तिला आणि त्याला न्यायला १६२२ किंवा एजंट यांची माणसे येणारच होती. तोवर तरी मजा करू असे तिला वाटत होते. ४६३४४ चीच इच्छा म्हणून आम्ही इथला स्टे लांबवतोय असे सगळ्यांना सांगायचाही ती प्रयत्न करणार होती. मात्र त्यासाठी गोपची साथ मिळायला हवी होती. त्यालाही तिच्याबरोबर इथे राहावे असे वाटायला हवे होते.
आणि गोप नेमका पुथ्वी पाहून गहिवरला होता. त्याला पुन्हा पुथ्वीवर जायचे होते. त्याचे म्हणणे ऐकले नाही असा आरोप १६९९ ला कधीच चालला नसता. काही झाले तरी त्याच्या मनाप्रमाणेच होणे आवश्यक होते.
म्हणून ती आता त्याचे मन तिथेच रमवण्याचा प्रयत्न करू लागली.
"तुम्हाला... सध्याच्या मानवजातीची संपूर्ण कथा ऐकायचीय????"
खिन्न झालेला गोप अजूनही बसून आकाशात दिसत असलेल्या पृथ्वी नावाच्या एका नगण्य ठिपक्याकडे पाहात होता.
"ती पृथ्वीच आहे हे कशावरून हो??"
गोपला असे वाटत होते की तिने म्हणावे तिला नक्की माहीत नाही. तसेच, पृथ्वी इतकी लहानशी नसेल असा निष्कर्ष निघावा असेही वाटत होते.
"पृथ्वीच आहे ती... ऐकणार का कथा???"
"कसली कथा??"
"तुमच्यानंतर.. म्हणजे तुम्ही बेशुद्ध झाल्यानंतर काय काय झाले त्याची???"
खिन्न मनाने गोप उठला आणि आत आला. १६९९ ला त्याच्या मनस्थितीचा अंदाज येत नव्हता. आता सगळ्या चीप्स ऑन करणे आवश्यकही होते. पृथ्वीवासियांना निदान इथे काय चालले आहे हे मधूनमधून कळवणे भागच होते.
१६९९ ने काही बटन्स ऑन केली. पुन्हा चित्रविचित्र आवाजांनी खोली भरून गेली. गोपला आता काहीच इच्छा राहिलेली नव्हती.
"की तुम्ही सांगता मला तुमच्यावेळेसची कथा????"
"मला... मला आता कंटाळा आलाय... आपण जायचं का पृथ्वीवर???"
सेकंदभर १६९९ च्या चेहर्यावर खूप नैराश्य दाटून आलं. पण गोपचं ऐकायलाच लागणार होतं! तिने शेवटचा उपाय करून पाहिला...
"आत्ता शटल नाहीये.... शटल आले की जाऊ..."
लहान मुलांना सांगावे तसे तिने ते त्याला सांगीतले.
'तुम्ही इथे राहिलात तर माझ किती भलं होईल'
पटकन गोपच्या मनात विचार आला. त्याने पोटाजवळची चीप तपासली. हा विचार १६९९ च्या मनातील विचार होत जो गोपला जाणवलेला होता.
गोपने विचार केला. काही ना काही कारणासाठी या बाईला आपण इथेच राहावे असे वाटत आहे. याचाच अर्थ तिला आपली जरूर आहे. म्हणजेच आपण सुरक्षित आहोत. पृथ्वीवर गेलो तरी काय म्हणा? झाडे नाहीत, गायीगुरे नाहीत, वाहतुकीचा आवाज नाही, रस्त्यावर स्टॉल्स नाहीत... आणि... आपण केव्हा येणार याची वाट पाहणारी.... आशाही नाही.. मग...
... मग इथेच थांबलो तर??? पृथ्वीवर आहे कोण आपलं? इथे निदान ही तरी आहे जिला आपली जरूर आहे.
काही क्षण विचार करून गोपने विचारले...
"मी काय म्हणतो... खरं तर... पृथ्वीवर गेलंच पाहिजे असं काही नाहीच आहे.. आपण...."
१६९९ जीवाचे कान करून आणि प्राण डोळ्यात साठवून गोपकडे बघत होती....
"इथेच राहायचे का??? शांत वाटते इथे...."
खूप वेळ १६९९ आपली बोटे आपल्याच गालांवर वर्तुळाकार फिरवत होती.
वाटच पहात होते नवीन भागाची,
वाटच पहात होते नवीन भागाची, धन्यवाद..... १६९९ ची लाजण्याची पद्धत मस्तच वाटली, छान झाला हाही भाग...
१६९९ पण गोप सारखी होणार का त्याच्याबरोबर राहुन... मजा येतेय वाचायला....
पु. ले.शु.
मला वाटले गेल्या भागात संपली.
मला वाटले गेल्या भागात संपली. आता दोन्ही भाग वाचण्यासाठी वेळ काढावा लागेल.
बेफिकीरजी छान झाला हाही
बेफिकीरजी छान झाला हाही भाग.पु.भा.शुभेच्छा
लांब अवकाशात एक ठिपका दिसत
लांब अवकाशात एक ठिपका दिसत होता. त्यावर सूर्यप्रकाश असल्यामुळे दिसत होता इतकेच! ती आपली पृथ्वी?? आपली धरित्री.. आपली धरणीमाता.. आणि आपण हे कुठे आहोत?? स्वतःच्या जीवावर आणि बुद्धीवर आपण हजार जन्मात तरी पोहोचू का तिथपर्यंत?? >>>
ही कल्पना, ध्यान मन "सुन्न्" करुन गेली भुषणराव एक 'थरकाप' झाला आतल्या आत.
त्या पाठोपाठ..
.. माझी पृथ्वी... >>> या एका वाक्यावर तर एक संपुर्ण 'गॅलेग्सी' कुरबान..!
चातक तुम्हाला १०० मोदक,,,आज
चातक तुम्हाला १०० मोदक,,,आज संकष्टी पण आहे अनायसे....
मस्तच ...
मस्तच ...
ह्या भागाची वाट पहाणे चालु
ह्या भागाची वाट पहाणे चालु होते. हा असा पहिला भाग होता जिथे वैज्ञानिक कथेपेक्षा जास्त भावनिक कथानक होते. प्रुथ्वीचा इतिहास ऐकायला आवडेल आणि हे ८१ कोण ते आजुन कळले नाही.
खरंच मस्त.... खुप आवडला हा
खरंच मस्त....
खुप आवडला हा भाग पण!
नवीन भागाची वाट बघतोय!
सॉलीड...चातका माझ्याकडून पण
सॉलीड...चातका माझ्याकडून पण तुला १०० मोदक...
बेफी..काय सुरेख रंगत चाललीये कथा...
एका गोळीत पोट भरण्याची मज्जा भारी आहे..
काय पण दुर्दैवी लोक्स...
वाफाळत्या उकडीच्या मोदकावर तूप सोडून ते पोळत्या जिभेने खायची गंमत कशी येणार त्या गोळीत...
आवड्ली. मला पहिला भाग वाचला
आवड्ली. मला पहिला भाग वाचला तेव्हा असे वाट्ले होते की, बेफिकिर जी ना लिहायला सध्याच्या काळातील खुप विषय असताना, हे का अती काल्पनिक विषयावर लिहायचे निवड्ले ? आणी बाकी सगळ्या कथा खुप उत्कंठा लावणारया होत्या. तर ही कथा तशी सुरवातीला नाही वाट्ली, कारण कदचित अश्या कथा वाचल्या आहेत. पण आता कळले, की कथा पण वेगळी आहे. आता खुप interest आला आहे. आणी, अर्थातच खात्री आहे , की ही पण गाजणार.
हा भाग सुद्द्धा छानच झाला
हा भाग सुद्द्धा छानच झाला आहे..
अनेकदा प्रयत्न करूनही
अनेकदा प्रयत्न करूनही 'सिंगापोर विथ आमीर' किंवा 'थायलंड विथ शाहरुख' अशा योजनेत काहीही न मिळणार्या आत्ताच्या एखाद्या मुलीला एकदम 'मॉरिशस विथ जॉन अॅन्ड शाहिद कंबाइन्ड' अशी ट्रीप मिळाल्यावर व्हावा तसा तिला आनंद झाला होता. 'स्पेस विथ ४६३४४'! >>
भलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेले
भलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेलेले... भुषणराव भले......
राव काय लिहु आणि काय नाहि अस झालय बघा... संदर.....
प्रेमाचे रंग पहायला खुप ऊस्तक आहे मि. अस वाटल होत कि आज खुप मजा येईल, मजा आलि, पण थोडि. पण...... लास्ट लाईन सांगुन गेलि "कहानि अभि बाको हे मेरे दोस्त.................."
:आपल्याच गालांवर वर्तुळाकार बोटे फिरवणारा बाहुला :
इ.स. १०००० शृंगार वाचायला मजा येतेय आणि मजा येणार हे नक्कि.
हा भाग ही छान झाला. लवकरात
हा भाग ही छान झाला. लवकरात लवकर गोप चा कथा वाचायला आवडेल.
नविन भाग लवकर यावा.
मस्तच बेफिकीरजी!!!
मस्तच बेफिकीरजी!!!
पृथ्वीच्या ठिपक्याकडे बघणार्या गोपच्या मनोवस्थेच्या विचारानेच मनात कालवाकालव झाली... हे सगळे सत्य नसून गोपचे स्वप्न ठरो असे वाटायला लागलेय आता...
छान !~!
छान !~!