Submitted by अ. अ. जोशी on 16 March, 2011 - 14:06
एवढेच ठरले, होणे न तुमचे
हृदयीं पुरावे उरले न तुमचे
मी उगाच होतो बाजूस तुमच्या
ते उगाच होते 'पटणे न तुमचे'
फार लागले नाही काळजाला
आसपास असुनी दिसणे न तुमचे
बोलले कुणी की संताप इतका
म्हण कधीतरी 'मी ऐकेन तुमचे..'
वेळ एकदा ती येईल तेंव्हा...
शब्द ओकलेले कळवेन तुमचे
आणखी हवी तर धाडेन साखर...
का अजून पाणी गोडे न तुमचे ?
खूप ऐकले मी अन सोसले ते
बोलणे पडावे खोटे न तुमचे
हाल जे तुम्ही केले आज माझे
एवढीच इच्छा; व्हावे न तुमचे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
व्वा!! छानच गझल, आवडली.. 'न
व्वा!! छानच गझल, आवडली..
'न तुमचे' ही रदीफ वेगळ्या पद्धतीने वापरली आहे काही शेरांत, आणि स्वरकाफियाही आवडला
छान गझल.
छान गझल.
न तुमचे न
न तुमचे
न तुमचे
---------
ऐकेन तुमचे
---------
कळवेन तुमचे
=================
असे चालते?
मागे एकदा बेफिकिर यांनी
केव्हा रडू नये
सहसा पडू नये
ह्या कवाफींनंतर
त्यांच्याकडून ये
हा काफिया चालत नाही
असे स्वत:च्या गझलेबाबत म्हटले होते.
आणि हो मी या गझलेचा संदर्भ फक्त व्याकरण कळावे यासाठी देत आहे
अन्यथा बेफिकीर यांनी 'माझ्या गझलांचे संदर्भ देऊ नयेत'
असे मागे लिहिले होते ते लक्षात आहे.
व्याकरणापुरताच त्यांच्या गझलेचा संदर्भ!
रामकुमार
एवढेच ठरले, होणे न
एवढेच ठरले, होणे न तुमचे
हृदयीं पुरावे उरले न तुमचे
मी उगाच होतो बाजूस तुमच्या
ते उगाच होते 'पटणे न तुमचे'
फार लागले नाही काळजाला
आसपास असुनी दिसणे न तुमचे> या सर्व शेरांमध्ये 'न तुमचे' ही रदीफ होत असून ''ए' हा स्वरकाफिया आहे.
बोलले कुणी की संताप इतका
म्हण कधीतरी 'मी ऐकेन तुमचे..'>>> या शेरात अर्धी रदीफ काफियात गेलेली आहे.
हे मराठी गझलेत स्वीकारले जात नाही. अगदीच अपवाद म्हणून एखाद दुसरा शेर रचला तर तो श्रेष्ठ शेर असावा असे एक मत आहे. रामकुमार यांच्याशी सहमत आहे. बाकी या रचनेबाबत काही लिहिण्याचा सध्या मानस नाही.
-'बेफिकीर'!
मी वापरलेला 'न तुमचे' हा रदीफ
मी वापरलेला 'न तुमचे' हा रदीफ सर्व ठिकाणी योग्य पद्धतीनेच वापरला आहे. काही खर्या अभ्यासकांबरोबर चर्चाही झाली. कोणालाच विचित्र वाटले नाही.
तरी,
एकंदर चर्चेसे सूर पाहता नावे देऊन त्यांना अडचणीत आणण्याची माझी इच्छा नाही.
बाकी कोणाला काय म्हणायचे आहे ते म्हणू देत.
खरेतर संकेतस्थळांवरचे एकंदर वातावरण पाहता मला इथे लिहावेसेही वाटत नाही आता! कारण काहीतरी अर्धवट अभ्यास करून अट्टाहासाने तोच खरा आणि तितकाच असल्याचे भासवणारे खूपच झाले आहेत.
त्यामुळे मी रजा घेतो आहे.