कविता एक प्रवास (४)-
डायरी क्र. २ 'रोबा' (सौ. सुहास यशवंत जोशी) ने दिली. डायरीवर लिहिले होते,
"काव्य म्हणजे व्यक्तिमत्वाचा अविष्कार नव्हे
तर व्यक्तिमत्वापासून झालेली सुटका"
कवीची प्रगती म्हणजे,
"सातत्याने झालेले आत्मसमर्पण
व्यक्तिमत्वाचे सातत्याने झालेले विसर्जन"
"आठवण म्हणजे एकाकी करणारी सोबत"
काव्य प्रतिभेस मनःपूर्वक शुभेच्छा !!
संस्कार-प्रेरणा-संवेदना ह्या हातात हात घालून चालतांना कवी आणि कविता दोघांनाही समृद्ध करतात. सृजनत्व असमाधानातून निर्माण होतं. कुठल्याही 'तृप्त' संदर्भांचं लिखाण हे 'अतृप्त' भावनांमधूनच होतं असा माझा माझ्यापुरतातरी अनुभव आहे. मनाची चलबिचल स्थिर होण्यासाठी कायम आधार शोधत असते. त्यावेळी आपल्याल्या हवं तेंव्हा, हवं तितकं, फक्त आपणच आपल्यासाठी उपलब्ध असू शकतो. कांहीतरी सतत सुचंत असतं. येता-जाता खाता-पिता चित्त अखंड झुरत असतं. भूक लागल्यावर पूर्णाहुतीपेक्षा फराळपाणी जसं पटकन रुचतं तसंच मनाची क्षुधा भागवतांना निबंधा-प्रहसनापेक्षा कवितेचं स्फुरण कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडून जातं. ती ठेक्यात येते, झोक्यात जाते, क्षणात सारे व्यक्त होते.
कांहीतरी सुचंत असतं
शाईमधून रेखत जातं
जे कुठे बोलू नये
कागदावरती उतरत रहातं
दाटलेलं उसळून येतं
भावनांचा उद्रेक होतो
लिखाणाच्या आधाराने
ढळता तोल सावरत जातो
सुचलं तसं लिहिता लिहिता
मन मोकळं होत जातं
हलकं फुलकं होऊन मग
जीवनरस पीत रहातं
मागे मी 'एस एस वाय' म्हणजे 'सिद्ध समाधी योग' हा उपक्रम अनुभवला. मेडिटेशन करतांना डोळे मिटून शांतपणे श्वासांवर लक्ष केंद्रित करून विचारविरहित अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला विचार विसरायचे याच विचारांचे काहूर माजते. नुसता गोंधळ उडतो. प्रचंड गर्दी होते आणि भरकटल्यासारखं होतं. त्यावेळी गुरुजींनी सांगितलेली प्रक्रिया आठवली. अशा वेळी विचारांना थांबवायचं नसतं. धरायचं तर नसतंच नसतं. ते येतात तसे येऊ द्यायचे आणि जातात तसे जाऊ द्यायचे. काही काळाने गर्दी आपोआप कमी होते, गुदमर हलका होतो आणि स्वस्थ वाटायला लागतं. मग गाळीव विचार यायला लागतात. आपण आपल्याला समजून येतो. स्वतः स्वता:शी बोलू शकतो.
तसं पचायला जरा जडच आहे परंतु खर आहे. थोडी सबुरी आणि सातत्य हवे. असो.
तर असेच अगणित विचार सरकत असतांना त्यातले कांही घरंगळून पडले ते मी वेळोवेळी वेचून ठेवले. चांगलं वाईट समजलं नाही तरी कांहितरी वेगळं वाटलं म्हणून ! जे दिसलं, बघितलं त्यापेक्षा कितितरी जास्त अजून आहे असं वाटत राहिलं आणि प्रवास चालू झाला.
व्यक्ताचा हिमनग वरती झाकून राहिले अव्यक्त
वायुफळाचे शब्दच्छल शरिरात उसळते रक्त
जरा मरण व्याधी भवती पिंगा घाली स्वामित्व
सागरतळ रत्नांचा खजिना प्रेमाचा अभिषिक्त
मिळो कितिहि अतृप्त सदाही झोळी कधीही रिक्त
शरिर चोचले मन-हृदयाचे आत्मा कसा विरक्त ?
कधि एकांत, कधि निसर्ग, कधि बाळकळी कधि स्वप्नपरी, कधि समाज कधि खमाज, सालस-गोंडस-अहं-व्यथित-हूल चाहूल्-स्पर्श आसक्ति-वेदना संवेदना-स्पंदने जिव्हाळे उमाळे-दंव थेंब अश्रू ओलावा- सयी आठवणी- संत महंत पुनर्जन्म- तोल समतोल्-जखम खपली-भान प्रमेये- भ्रम संभ्रम-भास आभास्-सण पारणे- वाट वहिवाट्-गाणे बहाणे मेणे परगाणे- द्वैत आद्वैत्-शोध अवरोध्-रंग गंध स्वर आकार विकार किमया- प्रारब्ध- कर्म वर्म मर्म्-भरती ओहटी-घात अपघात-ओढ सोबत- हळहळ सार्थक्-नाथ अनाथ्-वेड पिसे-दान समाधान-काहूर हुरहुर-वाळे डोहाळे-पाऊस वारा वादळ पळस पिंपळ गुलमोहर- भोवरा झरोका पागोळ्या आशा निराशा-वाद आशीर्वाद्-बिंब प्रतिबिंब- आणि अशी बरीच स्टेशने घेत बघता बघता ९ फेब्रु २००५ रोजी दुसरी डायरी संपली.
या साधारण सव्वा दोन वर्षांच्या काळात, शब्दांचा वापर नेमकेपणाकडे वळला. लिखाणाचा आकार लहान झाला. अधून मधून भावनांचा उफाळ छंदाला फाटा देत मुक्तछंदात स्थिरावला.
अजूनही चांगलं काय ते नक्की कळलं नाही.
नाही म्हणायला एकदा नाशिक आकाशवाणीच्या दहाव्या वर्धापन दिनाचं कविसंम्मेलन थोडा वेळ ऐकलं(माझं ऐकलेलं पहिलंच म्हटलं तर अतिशयोक्ति नाही) छान वटलं. तसंच ७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनातील पहिल्या दिवशीचं (२८ जाने २००५) सन्माननीय निमंत्रितांचं कविसंम्मेलन आवर्जून ऐकलं. ठीक वाटलं.
विशेष म्हणजे साहित्य संम्मेलनाच्या दुसर्या दिवशीच्या निमंत्रित कवींच्या "शब्दरंग" ह्या कविसंम्मेलनात (२९ जाने २००५) माझी कविता निवडली गेली आणि ती, कवी व काव्यरसिकांनी गच्च भरलेल्या म.वि.प्र्.स.च्या थोरात सभागृहात मी प्रथमच जाहीरपणे वाचली. (उपस्थिती ५००० ते ६०००)
सुरुवातच अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनात निमंत्रित म्हणून व्हावी, त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असावी आणि निवड झालेली कविता माझी जन्मदाती असावी ( क.क्र. ११२ 'माय') हा परमभाग्याचा क्षण होता.
शब्द अधरले कुंद मन पाखरू बेधुंद
लेखणीस भारे माया ऋतू कागदात बंद
आंतराचे पक्षी थवे दूर आकाशात दंग
अक्षरांचे हे कुंचले सय भरे त्यात रंग
सोनियाचा स्पर्श माझ्या जावळात फिरे जुना
नीज माझी झोळीतून डोकावते आज पुन्हा
माय मांडीच्या कुशीत झोपी गेला बघे तान्हा
मऊ ओठ गालावर सोडीत प्रेमाचा पान्हा
गोकुळात लाडे लाडे संस्कारत लेक वाढे
जाई दूर शिकाया तर माय काळजात रडे
मनी ध्यास एक लेक व्हावा मुखी परीघत
पूजे गुरु सदानंद अंगी कष्ट जिरवत
लेकी सुना लेकुरल्या झाले संसार आनंद
डोळे सुखावती आता माय मुकी आत बंद
कधी ऐकून हंबर वसु वासरू बघून
जीव शरिरात होई बाळ तान्हा सुखावून
अशी एक सांज वेळ मन करिते उदास
वय माझे कासावीस माय कुशीत जायास
कवी विठ्ठल वाघ 'शब्दरंग'चे अध्यक्ष होते. जाता जाता सहजपणे कवी आणि कविता यांची वैशिष्ठ्ये उलगडून दाखवत होते.
अनेक व्यापक विषय आणि सादरीकरणाचे ढंग बघायला मिळाले. "सादरीकरणाची कविता वेगळीच असते आणि सादरीकरण ही पण एक कला आहे" हे उमगले. बघू काय परिणाम होतो पुढच्या प्रवासावर ............
पुढे डायरी क्र. ३........................ क्रमशः
छान
छान लिहिलय. मस्तच...