वाहवा 'मभा' वाहवा - कवितेचा परिचय भाग २

Submitted by बेफ़िकीर on 23 February, 2011 - 03:17

मायबोलीवरील कवी श्री. गंगाधर मुटे यांच्या कवितेच्या परिचयानंतर...

http://www.maayboli.com/node/21810

आज आपण महाराष्ट्रातील एका ख्यातनाम मराठी 'शायरा'च्या शायरीचा, 'वाहवा' या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत.

लेख आवडल्यास जरूर कळवावेत.

============================================

वेळ रात्री साडे दहाची!

स्थान, पुण्यातील गांधीभवनमधील म भा चव्हाणांच्या घराबाहेरील अंगण

जमाव, तीस पस्तीसचा

प्रसंग , माझ्या 'सारे आई तुझ्यामुळे' या कवितेचे पहिलेवहिले जाहीर सादरीकरण

परिणाम, डोळे बर्‍यापैकी ओलावलेले.. आपापल्या आईच्या आठवणीने भारावलेले...

माझे मन भरून आलेले.. मी मला महान कवी समजू लागलेलो..

एका कोपर्‍यात यमुना वहिनींनी चक्क चाळीस जणांसाठी पिठले, भाकरी, ठेचा, कांदा, दही आणि भात इतका सरंजाम मांडलेला..

आणि कवितेचा गंभीर परिणाम पाहून म भा म्हणाले..

"आईवरची अशी कविता ऐकली नव्हती... असो... चला मित्रांनो.. जेवायला चला.."

मीही भारावलेलाच! मभांनी असे म्हणावे आपल्याबद्दल??

तेवढ्यात यमुनावहिनी मभांना घेऊन माझ्या आईपाशी आल्या. आईच्या हातात एक कापड दिले.

"हे काय आता??"

आईने हासत हासत विचारले..

"हे हिच्या डोक्यातले खूळ, पण यावेळेसचे खू़ळ चांगले आहे"

मभांनी नेहमीच्या शैलीत उत्तर दिले.. तोवर माझ्या तोंडातून आपसूकच मभांचा शेर बाहेर पडला..

सार्‍या जगात जर का, काही विशेष आहे
माझी मिसेस आहे, माझी मिसेस आहे

आई म्हणाली..

"भूषण.. हे त्यांनी म्हणायला पाहिजे.. तू काय म्हणतोयस??"

"अगं त्यांचाच शेर आहे..."

तोवर मभांनी यमुनावहिनींना आणखीनच चिडवले. माझ्या आईला म्हणाले..

"तुमची सून खरच चांगली आहे, त्यामुळे भूषणची कविताही चांगलीय... आम्हाला मात्र हे असे शेर रचून घरातील वातावरण सुखद ठेवावे लागते..."

=======================================

मच्छिंद्र भागाजी.... उर्फ.. म भा चव्हाण!

ग्रामीण विभागातील हे व्यक्तीमत्व एकाच वेळेस अती मिश्कील आणि अती बेदरकार आहे. कोणत्या व्यासपीठावर ते कुणाचा नक्षा उतरवतील ते सांगता यायचं नाही. तमाम पुणेकर साहित्यक्षेत्र या माणसाला वचकून असते. गावोगावी हजारो कार्यक्रम, अनेक व्यासपीठांचे अध्यक्षपद, पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय, गांधीझमची शिकवण, कवीवर्य सुरेश भटसाहेबांचा परीसस्पर्श आणि वाचताना धुंद व्हावे अशी निखालस रसरशीत आणि जोमदार शायरी!

त्यांचे केवळ धर्मशाळा हे एकच पुस्तक वाचले तरी सलाम ठोकावासा वाटतो.

कैफ उसना मागते
माझ्याकडे मधुशाला
पिणारेही म्हणतात
मभा आला, मभा आला

(दारू पिणारे साधारणतः 'मजा आला, मजा आला' असे म्हणतात, पण मभांची झिंग इतकी आहे की पिणारे आता 'मभा आला, मभा आला' असे म्हणतात)

कुणीतरी एकदा एका व्यासपीठावर भटसाहेब निवर्तल्यानंतर भटसाहेबांबाबत काहीतरी टीकात्म बोलले. मभा व्यासपीठावर होतेच! त्यांनी त्यांच्या भाषणात त्याची खबर घेतली.

"भट असताना बोलून दाखवायची हिम्मत होती का? ते गेल्यावर कशाला बोलताय? आणि तुम्हाला काय माहीत ते काय होते ते?"

समीक्षकांच्या बाबतीत त्यांचे आणि माझे मत इतके जुळते की मला मुठभर मांस चढते. मध्यंतरी ते एकदा मला बोलता बोलता म्हणाले...

"अरे मी त्याला म्हणालो.. तू ज्ञानेश्वरीची समिक्षा केलीस म्हणून हल्लीच्या कवितेत जीवनाचे आरस्पानी दर्शन घडत नाही म्हणतोस, तुला स्वतःला एक ओळ तरी लिहीता येते का??"

हे समीक्षक महाराष्ट्रातील फार गाजलेले समीक्षक आहेत. अर्थातच, त्यांचा चेहरा कसा झाला असेल हे डोळ्यासमोर येतेच!

सुरेश भट आणि व पू या दोघांचा नियमीत व निकटचा सहवास लाभलेले म भा कवितेत जितके हळवे दिसतात तितके आक्रमकही!

मभांचा पेहरावही भारीच! उर्दू शायराप्रमाणे कायम झब्बा, पांढरे शुभ्र केस आणि पांढरी दाढी, शार्प डोळे, ओठ कायम मिश्कील शब्द उच्चारायला तयार, भुवया मुद्यावर येण्यासाठी ताणलेल्या आणि वाणीत सुश्राव्य ओळींच्या नद्या!

ते म्हणतात की ते म्हातार्‍याचा वेष करून जगाची लफडी पाहतात.

माझे मध्यंतरी ( म्हणजे दोन वर्षांपुर्वी वगैरे) प्रमोशन झाले तेव्हा यश:श्रीने दिलेल्या सरप्राईझ पार्टीत ( ते माझ्यासाठी सरप्राईझ होते) मित्र व नातेवाईक यांच्याच बरोबर मभा आणि आणखीनही काही कवींनाही बोलावले होते. त्यात एक आगाऊ कवयित्री मभांना म्हणाली..

"काय म भा.. ड्रिन्क वगैरे नाही??"

अर्थात, पार्टीत ड्रिन्क्स नव्हतीच! पण ती जास्त शहाणी!

म भा म्हणाले..

"मला पाणीही चढते.. तुमचं बघा कसं काय होणार ते..."

नुकत्याच अमरावतीला झालेल्या गझलोत्सवात त्यांनी अध्यक्षपद भूषवले.

मभांची काही काही मते फार स्पष्ट आणि प्रामाणिक आहेत. त्यातलेच एक!

"गझल ना? वाट्टेल तशी करा, हवी तर तीन ओळींचा शेर करा, पण आम्हाला त्यात गझलीयत मिळायला हवी.. उगाच तंत्र तंत्र करू नका.. आधी गझलियत आणा.."

अर्थात, ते स्वतः गझल रचतात तेव्हा मात्र तंत्रशुद्धच रचतात.

आणखीन एक मत असेच!

"तुम्ही म्हणता रुबायांची ५४ वृत्ते आहेत ना? मग मी म्हणतो त्रेपन्नावे वृत्त निर्माण झाल्यानंतर चोपन्नावे झालेच कसे?? कुणीतरी काढले म्हणूनच ना? मग आम्ही पंचावन्नावे काढले तर तुमचे काय बिघडले??"

मभांची धर्मशाळा ही अष्टाक्षरीतील अनेक चारोळ्यांनी युक्त असलेली धर्मशाळा आहे. जगाला ते धर्मशाळा मानतात! त्यामुळे जगात मानवी मनाला भिडणारे सर्व विषय त्यात दिसतात. अत्यंत स्पष्ट आणि प्रामाणिक असे विचार आहेत त्यांचे!

धर्मशाळा हे पुस्तक खूप जुने! तसेच वपू आणि भट यांच्यावर ते एक कार्यक्रमही करतात.

मात्र त्यांचे अनेक वर्षे मागे राहिलेले 'वाहवा' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. आज आपण त्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत.

वाहवा!

मभांचा तरुणपणीचा दिलखुलास हासणारा बोलका चेहरा या पुस्तकाचे मुखपृष्ठ व्यापतो. मळपृष्ठावर अर्थातच यमुनावहिनी व त्यांचे प्रथम चिरंजीव आहेत. या पुस्तकात मभांच्या गझला, रुबाया, कत्तात व शायरी आहे. सुरेश भटांनी संपादीत केलेल्या गझला या पुस्तकात आहेत. भटसाहेबांचे ओरिजिनल पत्रही यात आहे.

रु. १०० मूल्य असणारे हे पुस्तक मभांच्याच पृथ्वीराज प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे.

म भा हे एक जादूई व्यक्तीमत्व आहे. ते 'आवडलेच नाहीत' असे होऊच शकत नाही. ते जसे आहेत तसेच त्यांच्या कवितेतही भेटतात. त्यांची कविता स्पष्ट असली, बंडखोर वाटली तरीही मनात कुठेतरी पटते. ती कविता वाचकाला सडकून काढत नाही. ती कविता सडकून काढते समाजातील मूर्खपणाला आणि अंधश्रद्धेला! जातीयवादाला आणि खोटारड्या माणसांना!

त्याचवेळेस ती कविता हळुवार प्रेमही आणते. उपहास हा उर्दू शायरीचा एक रंग होता, आहे. मभांच्या शायरीत तो अनेक ठिकाणी दिसतो. धर्मशाळेप्रमाणेच हेही पुस्तक सगर्ही असावे असेच आहे.

तर.... बघू 'वाहवा' येते की नाही मुखातून.....

==========================================

एका आत्मविश्वासाने ओतप्रोत अशा द्विपदीने शायर्ला सुरुवात होते.

जिंदगी घनदाट आहे, नागमोडी वाट आहे
ती तशी आहे तरीपण, हा गडी बेफाट आहे

===========================================

मभांच्या वैयक्तीक आयुष्यात त्यांना खूप त्रास झाले. आर्थिक स्थिती, राहती जागा, प्रकृती आणि आणखीन काही पातळ्यांवर सतत लढाच द्यायला लागला. आता दोन्ही चिरंजीव मोठे होत आहेत. यमुनावहिनींची सुयोग्य साथ आहेच. पण काही जुने लोक मला म्हणतात की 'तुला खरा मभा दिसलाच नाही, तो तरूण असताना कसा होता हे सांगून आज पटणार नाही'! मभांचे राहते घर ही एक वादग्रस्त बाब होऊन राहिली. विविध गझलांमधील शेरांमधून ते म्हणतात...

या धरणीवरती नव्हते वारूळ कुठेही माझे
पण भाग्यवान मुंग्यांना मी रोज निहाळत होतो

वार्‍याने हालत होतो, हलताना फाटत होतो
मी दोरीवर स्वप्नांच्या भर उन्हात वाळत होतो

सरल्यावर आयुष्य.. उराशी उरली माझी एक आठवण
दोनचार कवितांचे कागद जळमटलेल्या घरात होते

===========================================

जीवनाच्या बासरीने टाळलेला सूर मी
गुंजतो आहे मनाच्या माळरानी दूर मी

भेटण्यासाठी तुला मी थांबलो नाही इथे
कालच्या माझ्या चितेचा पांगलेला धूर मी

मी कुठे रस्त्यास केली सावलीची याचना?
जे फिरे सूर्यासवे ते वादळी काहूर मी

==========================================

मभांमधील रोखठोक कवी दिसू लागतो...

ज्ञानदेवांना कसे हे ज्ञात नाही
कोणताही वेद रेडा गात नाही
जानवे घालू नका रे विठ्ठलाला
त्या बिचार्‍याला स्वतःची जात नाही

लोकहो वाचवा, तुमची जिंदगी लाख मोलाची
तीर्थाच्या पाण्यामध्ये रोगाची लागण आहे

पोरकी जाहली ममता अन वणवण फिरते समता
कोणत्या दिशेला सांगा नाथांचे पैठण आहे

ती काय माकडे माझे करतील वाकडे जगणे
ज्या भिकारड्या भडव्यांची अस्मिताच गाभण आहे

==========================================

मधेच तंद्रीत म्हणतात...

रस्त्यावरून गात्रे ओढीत चाललो
मी कर्ज जिंदगीचे फेडीत चाललो

पाहून भोवतीचा व्यापार चोरटा
माझ्या भलेपणाला मी भीत चाललो

=================================

मी तुडवीत गेलो राने आभासांची
मी वाट चाललो नसलेल्या गावांची
मी म्हटले ज्यांना केवळ 'माझे, माझे'
ती गर्दी होती माझ्या नि:श्वासांची

===============================

इंद्रायणीच काढी लाटा विकावयाला
सांगा, अभंग माझा येथे कसा तरावा

त्यांनी हळूच माझ्या प्रेतास प्रश्न केला
'मेलास तूच ह्याचा आहे कुठे पुरावा'

================================

तू भेटलीस केव्हा अन काय बोललो मी
अस्पष्ट होत आहे माझीतुझी कहाणी

हा उर्दू ढंगाचा शेर मनाला थबकवतोच!

===============================

कोण लेकाचा कुणाची देशसेवा पाहतो
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो

==============================

ते जरी खातात पैसे, खाउद्या त्यांना
शेवटी त्यांचा इरादा चांगला आहे

गोड माझा शब्द व्हावा याचसाठी मी
साखरेचा कारखाना काढला आहे

का तुम्ही सत्कार माझा ठेवला आहे
मी कधी, कोठे दरोडा घातला आहे?

=============================

माझे गुमान ऐका ज्ञानेश्वरा तुम्ही
जागा नव्या पिढीची खाली करा तुम्ही

निर्जीव भिंत कैसी, तुमचीच चालते
मग दैन्य, दु:ख इथले हलवा जरा तुम्ही

तुमच्या विरुद्ध माझी आहेच शायरी
कुठलाच शब्द नाही लिहिला खरा तुम्ही

============================

आत्ताच गाढवांनी माझा निषेध केला
कोणास कोण जाणे मी 'गाढवा' म्हणालो

==========================

ओठात आज माझ्या स्वातंत्र्यगान आहे
माझ्या महान देशा मी बंदिवान आहे

मागू नकोस माझा संदर्भ मागचा तू
मागेच फाटलेले मी एक पान आहे

==========================

हासती मोजून ते अन बोलती मापून ते
प्रेमही करतात साले चेहरे पाहून ते

मी कसा जगतोच याची कोण त्यांना काळजी
चौकश्या करतात माझ्या रोज बाहेरून ते

=========================

सोडलेस केस तू उन्हात मोकळे
तू इथेच थांब, मी गुलाब आणतो

स्पर्श जाहल्यावरी तुझा अजाणता
पेन मी सहीविना खिशात ठेवतो

==========================

मी पुढे पाऊल माझे टाकले नाही तरीही
चालण्याआधीच माझी वाट गंधाळून जाते

==========================

फिरून एकदा तरी मला बघून हास तू
दिवंगतास दे पुन्हा तुझा गुलाबश्वास तू

विझावयास लागली चितेवरील लाकडे
खरेच शिंपलास का सुगंध आसपास तू

=========================

किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती
हवी तशीच ही हवा असेलही नसेलही

अजून रोज हिंडते नभात एक पाखरू
उदास तोच पारवा असेलही नसेलही

========================

कोणीच कुणाचा नाही
पाऊस नभाचा नाही

ह्या बागेमधला माळी
मोकळ्या मनाचा नाही

जो घाव घणाचा नाही
तो शब्द 'मभा'चा नाही

=========================

जो देव मानला आम्ही, तो चक्क निघाला गोटा
गोट्याला गाभार्‍याच्या बाहेर कसा काढावा

सीतेनेसुद्धा आहे मोडली खोड रामाची
पोटगी मिलावी म्हणुनी लावला तिनेही दावा

चोरांनी चोळ्या नेल्या, सोद्यांनी माद्या नेल्या
पण कृष्णकन्हैय्या तेव्हा वाजवीत होता पावा

=========================

माझ्या 'मुमताझ माझी कविता' या काव्यसंग्रहातील मनोगतात त्यांनी लिहिलेली रुबाई
या गझलसंग्रहातही आहे.

छोटा असो कि मोठा, आवाज वाढवा
पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा
स्वर्गास आग लागो, तिकडे बघू नका
दर्यात पोहणारा, माणूस वाचवा

============================

कत्तअ!

गाव खोटारडे, लोक घाणेरडे
ह्याच देशातले देवही नागडे
संत भित्रे किती, धीट कुत्रे किती
माणसांच्या पुढे चालती माकडे

==============================

शायरी!

मी म्हातार्‍याचा मेकअप घालुन जगतो
दुनियेचे लफडे चष्मा काढुन बघतो
ही अ‍ॅक्टिंग आहे तिला शोधण्यासाठी
जिंदगी हरवली माझी तरणीताठी

==============================

रुबाई!

बघ हे शहर आमुचे पुणे
पुण्यातुन पुणेच झाले उणे
येथले लोक अती शाहणे
शोधती चहामधे चांदणे

पाहिला विद्वानांचा जथा
ऐकल्या पोटभरुंच्या कथा
सोसल्या आयुष्याच्या प्रथा
वेगळी याहुन माझी व्यथा

भेटले काही जंतू मला
म्हणाले, रोग कोणता तुला
दवा पी थोडा डबक्यातला
मग तू होशिल आमच्यातला

जगाच्या मध्यावर मी उभा
भोवती नक्षत्रांची सभा
मारतो हाका दुरच्या नभा
असा हा तुमचा अमुचा 'मभा'

------- असा हा तुमचा अमुचा 'मभा'

===========================

म भा चव्हाणांची शायरी 'आम' माणसाची आहे. त्यात गंड नाही, पोझिंग नाही, काहीतरी प्रचंड अलौकीक करावे असा सूर नाही.

ते तुमचे आमचे, सगळ्यांचे काव्य आहे.

लेखाची सांगता मभांच्याच 'टायटल शेराने' करतो.... ज्यात त्यांच्या आयुष्याचा परिपाक आहे...

एकाच कारणाने गेला न राग त्यांचा
ते घाव घालताना मी 'वाहवा' म्हणालो

==============================

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

अप्रतिम लेख. मभांना मी कधीच भेटलो नाही,पण या लेखातून अगदी त्यांना भेटल्यागत वाटले.

माझ्या निवडक दहात.

ओठात आज माझ्या स्वातंत्र्यगान आहे
माझ्या महान देशा मी बंदिवान आहे

हा शेर चंगेझखान या गझलेतील आहे ना?
माझ्या वाचनात
ओठी जरी कधीचे स्वातंत्र्यगान आहे
माझ्या महान देशा मी बंदिवान आहे
असे आले आहे.
या गझलेतला प्रत्येक शेर प्रचंड दारूगोळा ठासून भरल्यासारखा आहे.
आता रणांगणी या कोणीच पार्थ नाही
ऐकावयास गीता चंगेझखान आहे!

जबरदस्त लेख आहे! मभा विषयी कधीही ऐकलेही नव्हते. तुमच्यामुळे एका थोर व्यक्तिमत्वाची ओळख झाली. फार सुंदर लिहिता तुम्ही... मभांचे एक एक शेर मनाला एकदम भीडले!

म भा चव्हाणांची शायरी 'आम' माणसाची आहे. त्यात गंड नाही, पोझिंग नाही, काहीतरी प्रचंड अलौकीक करावे असा सूर नाही.

ते तुमचे आमचे, सगळ्यांचे काव्य आहे. >>> हे वाक्य फार आवडले! मलाही असेच लोक आणि त्यांचेच आवडते. Happy

अप्रतिम कविता परीचय.
अमरावती गझलोत्सवात मभांचे दर्शन झाले.
त्यांच्या रुबाया ऐकताना वेगळीच मजा आली.

आवडत्या दहात. Happy

म भां. ना एका कार्यक्रमात "लाईव्ह" पाहीले. त्याआधी त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. पण त्यांच्या कविता आणि गझलांचे सादरीकरण ऐकले मात्र ...त्यांची झिंग चढली. हा कवी लिमिटेड लोकांना माहीत असला तरीही महान(च) आहे याची साक्ष पटली.

भिब्ररा यांना अनुमोदन!!

प्रत्यक्ष भेटीत त्याचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मागच्या महिन्यात मिळाली, धन्य झालो.

ओह... मभा सदैव ठणठणीत राहोत. आम्हाला अजून त्यांना खूप ऐकायचंय... वाचायचंय.

मभा इज ग्रेट
नशिबाने मभांसोबत अनेकदा भेटण्याचा योग आला.
त्यांच्यातील गझलकार तर मोठा आहेच पण माणूस फारच मोठा.

भूषण, चांगला उपक्रम.
धन्यवाद.
तुला एव्हढी एनर्जी कुठून येते देवास ठाऊक.

वाह मस्तच

माणसांच्या पुढे चालती माकडे>>>>या वरून माझ्या दोन ओळी आठवल्या.....(मान्य ; इथे त्या देणे /डकवणे लायकी सोडून वागल्यासारखे दिसेल पण ........)

अजूनही माणुस पुरता माणुस का नाही झाला
माणुस होण्यामागे त्याच्या मधले माकड आहे

मभा इज ग्रेट !!
______________________________----

बेफीजी अश्याच प्रकारे मराठीतील इतरही थोरामोठ्या ....स्वतःचे स्थान निर्माण केलेल्या शायरांचा व त्यांच्या शयरीचा परिचय आम्हाला करून द्याल का