बिनकैरीचं पन्हं

Submitted by मामी on 20 February, 2011 - 04:26
dudhi-panhe
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुधीभोपळा,
लिंबू,
केशर,
गूळ किंवा साखर,
मीठ,
वेलची

क्रमवार पाककृती: 

दुधी सोलून फोडी करून कुकरमधून चांगला उकडून घ्यावा. भांड्यात थोडे पाणी घातले तरी चालेल. मध्यम आचेवर कुकर ठेऊन साधारण ४/५ शिट्या घ्याव्यात.

गार झाल्यावर, मिक्सरमध्ये उकडलेला दुधी, साखर, जसे हवे तसे पाणी (लगेच सर्व्ह करायचे असेल तर बर्फ) घालून अगदी बारीक होईपर्यंत घुसळावे. मग त्यात लिंबू पिळावे. कैरीची आंबट चव लिंबामुळे येणार आहे त्यामुळे जरा जास्त लागेल. यात मग मीठ, वेलची पावडर, केशर वगैरे मिसळून थंडगार सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
प्रमाण असं काही नाही. आवडीनुसार आणि चवीनुसार.
अधिक टिपा: 

- दुधी उकडून ठेवता येतो. फ्रीजमध्ये २ दिवस राहू शकतो. नंतर त्याची ताजेपणाची चव जाऊ शकते.
- पन्हं म्हणून द्यायचे नसल्यास किंवा तसेही पुदिनाही घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
माझी मैत्रिण. तिने हे पन्हं देऊन कशाचं बनवलय हे ओळखायला सांगितले होते. कोणालाही ओळखता आले नाही.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी! करुन पाहीन. Happy
पण दुधी असल्याने आधी घरच्यांवर प्रयोग करेन, त्यांना आवडलं तर मी पिईन. Proud

सह्हीये! दुधीही त्या निमित्ताने पोटात जाईल. येस्स, हे करणारच! धन्स मामी Happy

छान

अरे वा. मला वाटलं अ‍ॅपल बटरचे आहे कि काय.
तसा कच्च्या दुधीचा रस पण वापरता येईल त्यात लिंबू आणि कच्ची कैरी इसेन्स घालता येईल.

धन्यवाद.

दिनेशदा, अ‍ॅपल बटर म्हणजे काय? कच्च्या दुधीचा रस काढताना, त्यातले फायबर निघून जाईल पण. कैरी इसेन्सची कल्पना मस्त आहे.

मालाडला पूर्वी डॉ निगम यांच्या आरोग्य सेंटरला, दुधीभोपळ्याचा ज्युस, खसच्या फ्लेवर मधे मिळायचा, हिरवा रंग वगैरे घालून. तोही फारच छान लागायचा. आता तिथे जाणे होत नाही. त्यांचं सेंटरही, मला वाटतं, अंधेरीला हलवलं आहे.

सही मामी, जिन्नस वाचेपर्यन्त धीर नव्हता, कैरीविना पन्हे कसे हे भेडसावत होते Happy मस्त. नवरोबावर प्रयोग मस्त होईल. वजन कंट्रोल करयला दुधीचा रस सुरु करायला हवा असे म्हणण्यापुरता त्याचा आणि दुधीचा संबंध आहे. पन्हॅच्या नावाखाली लगेच जाईल पोटात हे :). धन्स.

हल्ली कच्च्या दूधीचा रस प्यायचा फार आग्रह केला जातो. किसून वा मिक्सरमधे वाटून रस काढला आणि लगेच वापरला तर मला नाही वाटत काळा पडेल. लिंबूरस आहेच कि. पण ते पन्हे नाही हं, ते कच्ची कैरी सरबत.

मामी, साधारण आंबट सफरचंदाचा जॅम केला जातो, त्याला अ‍ॅपल बटर म्हणतात. तो साधारण कैरीच्या गरासारखाच लागतो.

मामी खुप खुप छान आयडीया दिली. दुधीचा रस चरबी घटवण्यासाठी तसेच ह्रुदयासाठी हितकारक असतो. मी दर आठवड्याला दोन दुधी आणते पण रस काढायला वेळ मिळत नाही म्हणून शेवटी त्याची भाजी, आमटी करते. तुमच्या टिप्स आता माझ्या खुप कामी येणार आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद.

सारखी सारखी दुधीची भाजी खाववत नाही आणि आरोग्याला तर दुधी चांगला ! ही आयडिया मस्त आहे. पन्हं म्हणून आनंदाने प्यायलं जाईल.

खरंच दुधी?>>> मलाही हाच प्रश्न पडला. रैना, मोनाली तुम्ही दोघी करताच आहात तर मग तुमच्या रिअ‍ॅक्शन बघून मी प्रयोग करेन म्हणते Proud

मामी ही आयडीया हिट गेली घरी अर १२ महिने पन्ह Happy

मामी, १दम हिट. जरा इकडचा मसाला तिकडे टाकला तरी लगेच वास येणार्या आमच्या घरीपण आधी खरच पन्हे वाटले. फक्त मी जरा आधी फिल्डींग लावली. सकाळी दुधी बरोबत खरच २ कैर्या आणल्या, आधी जरा पण संशयाला जागा नाही ठेवली. Happy
कवे कर ग तु पण.

अ‍ॅपल सॉस, लेमोनेड वापरून कैरी पन्हे बरेचदा केलं आहे, छान लागतं ते.
पण हि तर अजून भारी रेसिपी वाटतीये! सोपी पण, दुधी वापरून म्हणजे हेल्दी भी! नक्की करुन बघेन Happy

मी करून बघितलं कालच, छान लागलं पण कैरीच्या पन्ह्या सारखी टेस्ट नाही आली,आंबट गोड चव छान आली मात्र,
पण तरी पण माकाचु???
IMG_20210402_075418.jpg

ही रेसिपी वर आली का? मी अनेक वर्षांत केलं नाहीये. त्यामुळे आठवण धूसर झालीये.

दिसायला थेट पन्ह्यासारखं दिसतं. लिंबू, वेलची, केशरामुळे इफेक्ट येतो. अगदी कैरीच्या पन्ह्याची चव नाही येणार हे बरोबर.

फ्रीजमध्ये ठेवलं तर काळं नाही न पडणार?? >>> काही कल्पना नाही. लिंबू घातलं असेल तर काही काळापर्यंत तरी काळं न पडता फ्रीजमध्ये रहायला हवं.

सही ! मामी आता हे नक्कीच करुन पहायला हवे. लोकांनो काळजी फक्त एकच घ्या की दूधी हा नेहेमी ताजा ( चकचकीत पोपटी कलर ) आणी सरळ, घट्ट असा पाहुन घ्यावा. वाकडा , जून दूधी कडु निघतो आणी कडू दुधी मुळे काय होते ते सांगायची गरज नाही. बाकी हा प्रकार हेल्दी असल्याने आवडलाय.

Pages