दुपारी दोन ते संध्याकाळी सात!
इतका वेळ एकाच जागी बसणे परवडत तर नव्हतेच, पण वसंताचा स्वभाव लक्षात घेता ते शक्यही नव्हते. सतत काही ना काहीतरी करत असणारा वसंता आज एकाचजागी पाच तास नुसता बसून होता. एखादा असता तर दारू प्यायला गेला असता, एखादा असता तर मित्रांबरोबर टाईमपास करत बसला असता. कारण संसारात न रमू शकणार्या मनाला रमवण्याचे हेच सर्वश्रुत उपाय होते पुरुषांसाठी!
पण वसंता कोथरुडजवळील मृत्यूंजयेश्वर मदिराच्या ओसरीवर बसून होता. अनेक भाविक येऊन शिवाचे दर्शन घेऊन जात होते. सगळ्यांना तो दिसत होता, पण त्याला सगळे दिसूनही दिसत नव्हते.
डोक्यात विचारांचा इतका गुंता झालेला होता की त्यातून बाहेर कसे पडायचे हेच समजत नव्हते. झाले असे की आज वाटेत गोखले गुरुजी भेटले आणि ते म्हणाले 'उद्या सात वाजता या हं? पूजा सात वाजताच सुरू करायची आहे'! त्यावर वसंताने विचारले की कसली पूजा? तर गुरुजींनी सांगितले की 'घरावरची सर्व संकटे टळावीत म्हणून तुमचे थोरले बंधू लघुरुद्र करतायत उद्या, तुम्हाला माहीतच नाही?????' वेदा आणि उमेष आता बरे होऊन घरी आलेले होते. शांतीसाठी उद्या लघुरुद्र करायचे ठरवलेले दिसत होते.
या माहितीमुळे अत्यंत उद्विग्न होऊन वसंता आत्ता शंकर मंदिराच्या ओसरीवर बसलेला होता. आणि पहिल्यापासून विचार करत होता.
काय केले आपण आपल्या आयुष्यात? नेमके केले काय? भावांनी आणि वडिलानी शिक्षण सोडायला लावले या गोष्टीचा आजही बाऊ करतो आपण! काय सांगायचे असते आपल्याला? हेच, की मला जर त्यावेळेस शिकू दिले असते तर आज मी एखाद्या मोठ्या पदावर असतो आणि आज मी जे काही आहे त्याला जबाबदार तुम्ही आहात. हे सांगण्यातून, हे वारंवार बिंबवण्याच्या प्रयत्नातून आपल्याला नक्की काय मिळवायचे असते? सहानुभुती? होय! सहानुभुती! त्याशिवाय हेही मिळवायचे असते की घरातील सर्वांनी वसंताबाबत अन्याय झालेला आहे ही बाब मान्य केलेली असावी. याचे कारण उद्या कोणतीही गरज भासली तरी आपल्याला आधार देणे हे या सर्वांचे कर्तव्यच आहे हे यांना पटत राहावे. म्हणून त्यांनी ती बाब मान्य केलेली असावी ही आपली गरज!
वास्तविक पाहता आज आपले उत्पन्न जेवढे आहे तेवढे आपल्या वयाचे असताना कुमारदादा, अण्णा आणि राजूदादाचेही नव्हतेच! उलट त्यांच्यावर सगळ्या घराची जबाबदारी विभागून होती. आपण? आपण फक्त आपला संसारच पाहतो.
पण असे का? आपल्याला हाकलून दिले होते? नाही! कुणीही असे म्हणाले नाही की वसंता भावजी तुम्ही आपला संसार वेगळा थाटा! उलट सगळे जण त्या प्रस्तावाचा विरोधच करत होते. आपण वेगळे राहणार यामुळे अंजलीवहिनींसकट प्रत्येकाला दु:ख झालेले होते.
आपण पहिले हॉटेल काढले तेव्हा याच सर्वांनी सर्व प्रकारची जरूर ती मदत आपल्याला केली. अगदी मिसळीचा कटही अनेकदा तारकावहिनींनी बनवला. ते हॉटेल त्या दुर्घटनेमुळे चालू शकले नाही तेव्हा आपण पुन्हा एकदा आपल्या खुंटलेल्या शिक्षणाचा आणि त्यामुळे येत असलेल्या सांसारिक अडचणींचा उल्लेख करून सर्वांना ही जाणीव करून दिली की यानंतरही माझ्या उभे राहण्यात तुमचा वाटा असायला हवाच! मोरे इन्स्पेक्टरला चितळ्यांनी शांत केले आणि आपल्याला ही शाखाही चालवायला सांगितली स्वतंत्रपणे! त्या माणसाचे उपकारच! खरोखरीच उपकार! केवळ आपला प्रामाणिकपणा आणि कामाचा उरक या दोनच गोष्टी विचारात घेऊन त्यांनी ही जबाबदारी आपल्यावर टाकली. तेव्हाही मूळ दुकानात अएस अनेकजण होते ज्यांची ही जबाबदारी स्वीकारण्याची पात्रता आपल्याहीपेक्षा जास्त होती. मात्र सर्वांना चितळ्यांनीच सांगितले! पटवर्धनांवर आज वेळ आहे. आज आपण त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. पुढे याच शाखेचे ते सोने करून दाखवतील. पुण्यातील वस्ती आता डेक्कन परिसरात वाढत आहे. शाखा नक्की जोरात चालेल. अशा वेळेस तेथे पटवर्धनच का, मी का नाही अशी भूमिका कुणीही घेऊ नये. प्रत्येकाचे ठीकठाक आहे. पुढेमागे आपण पटवर्धनांना पुन्हा त्यांचा आधीचा व्यवसाय उभारायला मदत करू. तोवर सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायलाच हवे.
का असे वागतात लोक? इतके चांगले वागायची त्यांची जबाबदारी असते? कर्तव्य असते? का इतके चांगले वागतात? मुळात आपल्या ज्या 'प्रामाणिकपणा आणि कामाचा उरक' या गुणांवर चितळे खुष झाले ते तरी आपल्यात कसे आले? आपल्यावर आई वडिलांनी आणि थोरल्या भावांनी संस्कारच तसे केले म्हणून आले. तो काही आपला मूळ स्वभाव असू शकत नाही. जन्माला आलेल्या गोळ्याला काय समजते? आई तयला वाढवताना गोष्टी सांगते, संस्कार करते, मोठ्या भावांच्या वागण्याचे अनुकरण करताना आपणही हळूहळू तसे बनत जातो. याच सगळ्यातून आपल्यात ते गुण आले ना?
म्हणजे खरे पाहायला गेले तर आज आपल्याला जे काही मिळत आहे त्याचे सर्व श्रेय आई बाबा आणि आपले भाऊ यांचेच आहे. आपण एक व्यक्ती म्हणजे काय आहोत? एक विविध प्रकारच्या उपभोगांची लालसा असलेले शरीर आणि आई वडील आणि भावांनी दिलेले विचार यांचे मिश्रण!
सगळे तसेच असतात. आपणही तसेच आहोत.
आणि आपण त्यांन काय दिले? सतत या गोष्टीची जाणीव की तुमच्यामुळे आज मी एक अयशस्वी माणूस राहिलेलो आहे, जे आपण वास्तविक पाहता नाहीच आहोत. चांगले यशस्वी आहोत. या वयात आपला कुठलाही भाऊ स्वत:चा संसार थाटून वेगळा झालेला नव्हता. सर्वांच्या मिळून मिळकतीवरच आपापला समसमान भाग घेत जगत होता. आणि आपण?
आपण वेगळे झालो. गौरीला घेऊन!
का? कारण गौरीला त्या घरात मनःशांती नव्हती. कुणाला होती? अंजलीवहिनींना आईने काय कमी छळले? कमी शिव्या दिल्या? कित्येकदा तर आपणच वहिनींना त्या रडत असताना सांगायचो, आईकडे कसले लक्ष देताय? मी आहे ना? लक्षच देऊ नका आईकडे! तिचा स्वभावच तसला आहे. वहिनींना आपला आधार वाटायचा, आपण लहान असलो तरीही! तारका वहिनींचा प्रवेश झाल्यावर जरा कुठे मोठ्या वहिनींना असे वाटू लागले की त्यांच्याहीपेक्षा नवीन, लहान आणि ज्युनियर अशी एक व्यक्ती घरात आली आहे आणि आता त्यांचे स्थान त्यामुळे वर गेलेले आहे. पण आईने तारकावहिनींनाही छळले. कमी छळले नाही. आईच्या स्वभावातच ते होते! सून ही अशी व्यक्ती आहे जिचा काही प्रमाणात छळ झाल्याशिवाय तिच्या 'बाईपणाला' अर्थच प्राप्त होत नाही असे आईचे मत! तारकावहिनींचे तर आपल्याशिवाय पानही हालायचे नाही.
आणि मग गीतावहिनी आली. तिला दोन दोन थोरल्या जावा होत्या. त्यांचे 'मोठेपण' व 'मोठेपण जाणवून देण्याचा हेतू' या दोन्ही गोष्टी वारंवार सहन करतही गीतावहिनीने आपल्या हासर्या स्वभावाने सगळ्यांना जिंकून घेतले. ती कानपूरला निघून गेली तेव्हा नाही म्हंटले तरी आता तिची उणीव भासणार हे सगळ्यांनाच जाणवत होते. याचाच अर्थ तिने स्वतःचे असे एक स्थान निर्माण केलेले होते घरात! अगदी नोकरी करूनसुद्धा!
आपले घर तेव्हा खरोखरीचे घर होते. खरोखरीचे घर! आता तर ते घरही राहिलेले नाही आणि घरातील वातावरण तर नाहीच नाही!
कारण काय? तर आपले लग्न! आपण गौरीशी लग्न करण्याचा विचार मांडल्यापासून जो असंतोष घरात निर्माण झाला तो आजही टिकूनच आहे.
गौरी लग्न करून आल्यापासून काय काय झाले?
पहिले म्हणजे अर्थातच ती स्वतःचा पहिला संसार कधीही विसरू शकली नाही. आपला गौरीशी लग्न करण्यामागचा जो हेतू होता, की गौरी आता फक्त आपली असावी, तो प्रत्यक्षात आलाच नाही. कारण तिच्या मनातून तिचे पहिले विश्व कधी गेलेच नाही. एक स्त्री अशी वावरू शकेल? की नांदायचे एकाबरोबर आणि मनात स्मृती दुसर्याच्याच? गौरी नांदतीय, आजही नांदतीय! तिच्या मनातून पहिले विश्व व त्याच्या आठवणी कमी व्हाव्यात, नष्ट व्हाव्यात यासाठी आपण काय करू शकलो असतो? काय करायला हवे होते? खरे तर काळ हे एकच औषध आहे. अजून कदाचित दहा वर्षांनी गौरीच्या मनात 'आपला संसार' हाच विषय शंभर टक्के जागा व्यापून असेल. पण आज? आज अजून त्या जखमा नाही म्हंटले तरी तशा ताज्याच आहेत. त्यांना फुंकर मारत काळ मागे टाकत पुढे जाणे या व्यतिरिक्त आपण काहीही करू शकत नाही. म्हणायला ती आपलेही सगळे करते! हॉटेल चालवतीय, आपल्याला खुष ठेवतीय, अजूनही आपल्या घरातील सर्वांबाबत प्रेमाने आणि आदराने बोलतीय, ते तिच्याशी एक शब्दही बोलत नसूनही!
दुसरे म्हणजे गौरीबाबत मुळात आपुलकी हा भावच निर्माण होऊ शकला नाही कुणाच्या मनात! यात आई, बाबा आणि दोन्ही वहिन्या आल्या. दादा शांत असतो. पण अण्णा आणि राजूदादालाही ते फारसे आवडलेले नव्हतेच! याचे कारण काय्? तर जी मुलगी आजवर समोर राहणारी आणि आपल्या घरात केव्हाही येऊन मोकळेपणी वावरणारी मुलगी म्हणून परिचित होती तिने आपल्याच घरातील एका माणसावर भुरळ पाडावी! खरे तर न आवडण्यासारखे काहीच नाही. पण या मुलीचे आधीच एक लग्न झालेले होते. तिला दोन मुलेही होती. तो तिचा संसार नष्ट झाल्यानंतर तिने हा पर्याय स्वीकारला. स्वीकारला हे तरी खरे आहे की तिनेच हा पर्याय निर्माण केला स्वतःसाठी, वसंताला वश करत करत, असेच सगळ्यांना वाटत असे!
तिसरी गोष्ट म्हणजे गौरीच्या अशुभ पत्रिकेमुळे सर्वांनीच हे गृहीत धरले की ती जेथे जाईल त्या संसाराचा सत्यानाशच होईल!
हे कुणीही मान्य करू शकणार नाही. कारण याला काही बेसच नाही. केवळ एक ज्योतिषी म्हणतो म्हणून एका माणसाला असे वाळीत टाकल्यासारखे जिणे जगायला लावणे हा मूर्खपणा आहे, जो आपल्या घरातल्यांनी केला. परंपरावादी आणि अंधश्रद्धाळू असलेल्या आपल्या घरातल्या लोकांनी गौरीला अशुभ, अपशकुनी ठरवून टाकलेच!
आणि आश्चर्य म्हणजे घटनाही तश्याच घडल्या. प्रथम आईला कॅन्सर, पाठोपाठ आपली घरातल्यांशी भांडणे, त्यानंतर आपण हॉटेल काढणे, ते अत्यंत दुर्दैवी प्रकारे बंद पडून आपल्यासमोर उदरनिर्वाहाचाच प्रश्न उभा ठाकणे, पाठोपाठ लगेचच आपण स्वतंत्र होणे, घर पाडण्याची फायनल नोटीस येणे, आपल्याशी सगळ्यांनीच संबंध कमी करणे, घर पडणे, दादाच्या घरात गौरीने परसात लिंबू मिरची टाकून सर्वांचा आधीच ओढवून घेतलेला रोष तिप्पट करणे आणि शेवटी वेदा आणि उमेषला अपघात! त्या अपघातानंतर त्यांच्या उपचारांसाठी आणि पुनर्वसनासाठी लागलेल्या दिड लाखांच्या अवाढव्य रकमेपैकी आपल्याकडून एक पैसाही घ्यायला सर्वांनी नकार देणे! सणासुदीला, धार्मिक विधींना आपण अजिबात जाऊ नये असे फर्मान आईने काढणे आणि सर्वांना ते ऐकायलाच लागणे!
गौरीशी लग्न करून आपण काय मिळवले आणि गौरीने काय मिळवले? गौरीला मिळाले एक आडनाव, जे तिच्या आईवडिलांनी तिला दिलेले नव्हते. हे आडनाव लावून आणि कपाळावर कुंकवाची टिकली लावून ती समाजात सुरक्षित राहू शकेल असे समाजाला आणि सगळ्यांनाच वाटते. तिचे पांढरे कपाळ आणि एकाकीपण हे तिला लाभलेले शाप आता राहिले नाहीत आपल्यामुळे! तिला आता मूल होऊ शकत नाही. केवळ आपल्याबरोबर आयुष्यभर राहणे हेच तिचे जीवितकार्य उरलेले आहे. तिला आता स्वतंत्रपणे उभे राहण्याचीही गरज नाही. कारण आपण जे मिळवतो त्यात दोघांचे सहज चालते, उलट चांगलेच चालते! ती दुकान चालवतीय गेल्या काही दिवसांपासून! जे असेल त्यात रस घेत आहे. जगत आहे. जगताना आनंद मिळवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत आहे. आपले किंवा कुणाचेतरी आडनाव लावलेले नसते तर हे सगळे करण्यात तिला आनंद मिळाला नसता. ते जिणे तिच्यासाठी शापच ठरले असते. आपल्यामुळे गौरीच्या आयुष्याला एक स्थान आहे जगात!
आणि आपल्याला? आपल्याला काय मिळाले गौरीशी लग्न करून? गौरीशीच असे नाही, कुणाशीही लग्न केले असते आपण, तरी आपल्याला काय मिळाले असते? अंहं! ही तुलना अयोग्य आहे. इतर कुणाशी लग्न केले असते तर आपल्याला एखादे गोंडस मूल झाले असते. आपले स्वतःचे! ज्याच्याकडे पाहण्यात आणि ज्याची स्वप्ने खरी होण्यासाठी धडपडण्यात आपण आपेल आयुष्य व्यतीत केले असते. निर्वंश असणे हा गौरीमुळे झालेला मोठा तोटा! त्याशिवाय काय मिळाले? घर तुटले तिच्यामुळे! सगळे सख्खे, रक्ताचे नातेवाईक, ज्यांच्या एकत्र राहण्याचे उदाहरण सदाशिव पेठेतील प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना द्यायचे, ते नातेवाईक तुटले! गौरीमुळे? हो, गौरीमुळेच की! त्यात तिचा दोष नाही असे तर नाहीच, उलट बहुतांशी दोष तिचाच आहे. हा दोष नाही की तिची पत्रिका अशुभ आहे. दोष हा आहे की तिने आपल्याशी प्रामाणिक राहण्यासाठी आपल्या नातेवाईकांना सोडले. म्हणजे काय? तर आपण घरातून वेगळे होत असताना तिने असा स्टॅन्ड नाही घेतला, की घरातून वेगळे व्हायचे नाही, सगळ्यांबरोबरच राहायचे, आपण लहान आहोत, चार शब्द ऐकावे लागले तरी बिघडत नाही. तिने असा स्टॅन्ड घेतला की 'वसंता म्हणतोय ना वेगळं व्हायचं, तर वेगळं व्हायचं'! वसंता म्हणतोय ना आई बाबा आपल्याकडे राहतील, मग आपल्याचकडे राहतील. ती घरात कायम 'आपली प्रतिनिधी' याच भूमिकेतून वावरली. स्वतंत्र व्यक्ती म्हणून अंजली वहिनी किंवा तारका वहिनींशी बोलून तिने स्वतःची भूमिका कधीही मांडली नाही, कधीही स्वतःचे एक 'वसंताची पत्नी या व्यतिरिक्त' असलेले असे स्थान निर्माणच केले नाही.
हा दोष आहे? आपलीच प्रतिनिधी म्हणून कायम वावरणे हा दोष आहे? होय, दोषच म्हणावा लागेल. आपण एखाद्या मुलाशी लग्न करून जेव्हा सासरी जातो तेव्हा तेथील सर्वच माणसांशी आपला संबंध, नाते प्रस्थापित झालेले असते. त्या माणसांच्या दृष्टिकोनातून आपण 'त्या मुलाची पत्नी' या व्यतिरिक्तही काही आहोत हे सिद्ध करत राहणे व सिद्ध झाल्यावर ते स्थान टिकवणे हे मुलीचे कर्तव्य नाही का? म्हणजे उद्या मी जर म्हणालो असतो की वेदा शाळेतून आल्यावर तू काही तिला जेवायला वाढायची गरज नाही आहे, तर गौरीने तेच ऐकायचे का? अर्थात, हे गौरीने ऐकले नसतेच, पण महत्वाच्या निर्णयप्रक्रियेत तिने कधीही अशी भूमिका घेतली नाही की तिला आपले म्हणणे पटत नसून ती आईबाबा सांगतील तेच ऐकण्याच्या विचारात आहे. 'वसंता भावजींना नसले तरी हिला आहे आपल्याबद्दल' ही भावनाच जावांच्या मनात तिने कधी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. असे का? याचे कारण हे तर नाही ना? की तिचा जो मूळ संसार होता तो आता राहिलेला नाही, मग या संसारात फक्त नवर्याच्या मनाप्रमाणे वागले तरी काय बिघडते? नाहीतरी आयुष्य कसेतरी त्याच्या संगतीत काढायचेच आहे. मग फक्त त्याचेच मन जिंकले तरी बास झाले. बाकीच्यांचे कशाला महत्व वाढवायचे? हा काही आपला खरा संसार नव्हे, ही फक्त एक तडजोड आहे. मग निदान आपला आपला संसार झाला तर चांगलेच नाही का? अशी भूमिका गौरीने घ्यावी? की अशी भूमिका घ्यावी की काही झाले तरी मी अपशकुनी नाही हे मी सिद्ध करेनच, माझ्यावरचा ठपका घालवेन, सगळ्यांची मने जिंकेन!
पण..एका दृष्टिने पाहिले तर...हा काही दोष वाटत नाही.. म्हणजे आपण हवे निर्णय घेणार! आणि आपल्या त्या निर्णयांमध्ये तिने बिचारीने आपली साथ दिली तर आपण म्हणणार की 'माझी बायको' या शिवाय तुझी काही भूमिका असू शकत नाही का, जिच्यामुळे तुझ्याबाबत स्वतंत्ररीत्या सर्वांच्या मनात चांगले विचार यावेत व त्यामुळे घर तुटू नये? वा! वा रे वा! म्हणजे आपण त्या घरातलेच असूनही कुणीही काही म्हणाले नसताना संतापात घर सोडणार आणि तेव्हा गौरीने मात्र असे वागावे अन तसे वागावे अशी अपेक्षा ठेवणार! ह्याला काय अर्थ आहे? अंहं! गौरीची चूक नाहीच ती! उलट आई बाबा आपल्याकडे राहात असताना आईचे किती केले तिने! दादालाही ते पाहून खूप आनंद होत होता.
मग घर तुटण्यास... ती जबाबदार आहे की आपण?? आपण म्हणू ती पुर्व दिशा ही भूमिका गेहून तिने आपल्याबरोबर घर सोडले. आपल्याला तिचा अपमान झालेला चालत नव्हता म्हणून आपण रागाच्या भरात घर सोडण्याचा निर्णय घेतला. मग... मग आपले घर तुटले... यात दोष आहे कुणाचा???
खरच की! आपण अंधपणे पाहात आहोत सर्व बाबींकडे म्हणून असे होत आहे. या सगळ्यात दोष आहे आई, अंजलीवहिनी आणि तारका वहिनींचा! हॉटेल बंद पडणे, आईचा कर्करोग आणि मुलांना झालेला अपघात हे काय गौरीच्या पत्रिकेमुळे झाले?? सदाशिव पेठेतील घर रस्तारुंदीत गेले हे काय गौरीच्या पत्रिकेमुळे? ती नोटीस तर लग्नाआधीपासूनच येत होती.
आपण वेगळे होणे आणि आपले कुणाशीही संबंध न उरणे यात सर्वस्वी या तिघींचाच दोष आहे. आपलाही नाही आणि गौरीचाही नाही!
मग? मग हे सगळे कुमारदादाने कसे काय होऊ दिले? त्याला सुनावणार कोण हे सगळे? थोरला थोरला म्हणून आयुष्यभर सगळ्यांना शहाणपण शिकवणार्या कुमारदादाला मनाचा मोठेपणा दाखवून एकदाही आपल्याला असे सांगावेसे वाटले नाही?? की वसंता.. अंजली आणि तारका वहिनींमुळे हे सगळे झाले हो? तुझा किवा गौरीचा दोष नाही यात! नाही सांगावेसे वाटले? इतकाही मोठेपणा नाही? आणि या दोघी जगात सांगायला मोकळ्या की अपशकुनी गौरी घरात आल्यापासून पटवर्धनांवर इतकी संकटे कोसळली की मोजदाद नाही. अरे वा? मी आणि राजूदादा लहान असताना यांनी आमचे केले, आमचे केले हा पाढा आजही वाचून दाखवला जातो वाट्टेल तेव्हा आणि वाट्टेल त्यांच्यासमोर! आणि घर तुटले ते मात वसंता भावजी आणि त्यांच्या अपशकुनी बायकोमुळे?? वा वा!
मी सांगणार दादाला हे सगळे! सांगणार कसले? मी तर जाबच विचारणार! की कोणत्या शास्त्राच्या आधारावर तुझी बायको अन या तारका वहिनी असे म्हणतात की माझ्या बायकोमुळे आपल्यावर हे दिवस आले?? कोणत्या शास्त्राच्या आधारावर तिला बदनाम करता? तिचा संबंध नसलेल्या गोष्टींमधील दुर्दैवी घटनाक्रम आणि अपयशे यांचे खापर तिच्या माथी फोडता??
आणि हे सगळे मी आजच करणार! गौरीला न सांगता! तिला संगितले तर ती विरोध करेल. आपल्याला बोलू देणार नाही. पण मी बोलणारच! आई आजारी असली तरी आपल्याला हाकलून देण्याइतकी शक्ती तिच्यात आहेच ना? नाहीतरी एवीतेवी घर सुटलेले आहेच ना? मग मी का ऐकवू नये? सगळ्यात लहान म्हणून? जो माणूस आज तीन माणसांचा स्वतंत्र संसा यशस्वीपणे सांभाळून एका विधवेशी लग्न करून तिच्या आयुष्याला अर्थ बहाल करून पुन्हा उमेष आणि वेदासाठी धावाधाव करतोय, तो केवळ वयाने सात आठ वर्षांनी लहान आहे म्हणून त्याने आयुष्यभर गप्प बसायचे? फक्त दुसर्यांचे ऐकायचे?
अण्णा! अण्णा आणि वहिनींना निरोप देऊन मी त्यांनाही आज दादाच्या घरी बोलावतोच! एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू!
लघुरुद्र करतायत! आपल्याला न सांगता! '
वसंता ताडकन उठला आणि चालत चालतच पार कोथरुडमधून कसबा पेठेत निघाला. मध्ये वाटेत स्वतःचे घर असूनही तिथे जाणार नव्हता तो! कारण मनात होता राग!
तब्बल पंचवीस मिनिटे ताडताड चालल्यावर दादाचे घर आले तरीही राग शांत तर झालाच नव्हता, उलट वाढलाच होता. पण दादाला कसे बोलायचे या विचाराने मात्र आता प्रेशर आले. आजवर आई, बाबा, दादा आणि अण्णाच काय, राजूदादालाही उलटून बोलायचे नाही असे संस्कार वर्षानुवर्षे मनावर थर जमवून होते. त्याच वहिन्या, ज्यांनी जीवाचे रान करून आपल्याला अनेकदा आजारातून बरे केले, त्यांच्यासमोर जीभ चालेल?? तेही उद्या घरात कार्य असताना??
पण... पण मग... मग याच तर त्या वहिन्या ना?? ज्यांनी घर मोडण्याचा आरोप मात्र आपल्यावर आणि गौरीवर केला, पण घर मोडले स्वतःच! स्वतःच्या तिखट बोलण्याने!
दाराबाहेरच थबकलेल्या वसंताला कुमारदादाने पाहिले आणि कुमारदादाच्या चेहर्यावरचा आनंद लपला नाही.
"वसंता??? ... ये... ये आत.. असा काय उभायस???... आई... आईगं.. वसंता आलाय..."
लंगडत बाहेर आलेल्या आईने वसंताला हसून आत बोलावले. बाबाहीबाहेर आले. उमेशनेही लंगडतच येऊन पहिल्यांदा वसंताला नमस्कार केला आणि मग त्याला लगडला. आता पुर्वीइतका लहान नसला तरी उमेषचा जीव होताच लाडक्या काकावर!
तेवढ्यात अण्णाही बाहेरून आला. त्याच्या हातात काही पिशव्या होत्या. वसंताने आई, बाबा, दादा आणि अण्णाला नमस्कार केला आणि एका खुर्चीवर बसला.
दादा - बरं झालं आलास.. आता लघुरुद्र आहे उद्या... शरद एकटाच धावाधाव करतोय.. तूही त्याची मदत कर...
वसंता - का?? मी आलो म्हणून देखल्या देवाला दंडवत???
आई - वसंता ... काय बोलतोयस???
वसंता - तू गप्प बस...
प्रत्यक्ष आईलाच वसंता 'गप्प बस' म्हणतोय हे पाहून कुमारदादा ताडकन उभाच राहिला.
दादा - वसंता.. काय बोलतोयस??? आई आहे ती आपली..
वसंता - तुमची आई आहे ती... तुमची तिघांची..
दादा - वसंता.. तुला झालंय काय?? उद्या कार्य आहे घरात..
एकंदर रागरंग पाहून उमेशने तेथून काढता पाय घेतला.
वसंता - तेच म्हणतोय.. उद्या घरात कार्य आहे हे मला गोखले गुरुजी सांगतात... तेही रस्त्यात सहज भेटल्यावर... तुम्ही सगळ्यांनी ठरवलंयत काय?? काय करायचं ठरवलं आहेत आमच्याबाबत? तू मोठा आहेस... आजवर मी तुला एक शब्द उलट बोललेलो नाही.. पण हे काय हे?.. उद्या लघुरुद्र आहे आणि मला रस्त्यात गुरुजी सांगतायत... आई म्हणते आम्ही इथे यायचं नाही.. संबंध ठेवायचे नाहीत.. वहिनी आणि तारका वहिनी सत्तत बोलतात हिला... अपशकुनी अपशकुनी म्हणजे काय हेच मला समजत नाही.. ही सरळ अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा! बाकी काही नाही.. मी म्हणतो अंजली वहिनी आणि तारका वहिनींच्या विघसंतोषी स्वभावामुळे हे सगळं घडतंय... आपलं घर पाडलं.. आईला रोग झाला.. मुलांना अपघात झाला.. हे सगळं या दोघींमुळे झालं असं माझं म्हणणं आहे.. काय म्हणणंय तुझं याच्यावर?? येतोय ना राग?? वहिनींना तेच बोलल्यावर राग येतो ना?? मग गौरी आल्याच्या पहिल्या दिवसापासून तिला अपशकुनी म्हणताना तुमच्या मोठ्यांपैकी एकाच्या मनात आले नाही की तिच्या मनावर आणि वसंताच्या मनावर काय परिणाम होत असेल हे ऐकून?? तुला कसं वाटेल ऐकून मी जर म्हणालो की तूच अपशकुनी आहेस??... तू झालास तेव्हा म्हणे आजी आजोबा दोघेही दोन महिन्यात गेले.. बाबांचे दुकान बंद पडले होते सहा महिने.. तूच अपशकुनी आहेस... तुला दुकान चालवता यावे आणि घराची दुरुस्ती व्हावी म्हणून मी बारावीला शिक्षण सोडले.. आज माझे सगळे मित्र मोठाल्ले जॉब्ज करतायत... मी रोज उठून चक्का आणि श्रीखंडच विकायचं... कुणामुळे?? तुमच्या सगळ्यांमुळे.. गौरी अपशकुनी आहे, गौरी अपशकुनी आहे, गौरी अपशकुनी आहे.. आई बाबा घरी होते तेव्हा तोंडातून शब्द बाहेर पडायच्या आधी त्यांच्या मनासारखे होत होते ... गौरीच करत होती ना?? आणि मी म्हणतो जे जे चांगलं झालं त्याचं श्रेय कुणाचं?? ठीक आहे माझं हॉटेल बंद झालं.. पण चितळ्यांकडे आधीपेक्षाही चांगली नोकरी मिळाली.. हे कुणामुळे??? ... तुझे स्वतंत्र घर कसबा पेठेत झाले.. हे इतके छान घर तू घेतलेस... ते कोण शुभशकुनी असल्यामुळे म्हणे?? अंजली वहिनी?? अंजली वहिनी स्वतःच अपशकुनी आहेत असे मी म्हणालो तर??? त्यांचंच लग्न झाल्यावर माझं शिक्षण खुंटलं... राजूदादाची ट्रान्स्फर झाली... जग कुठल्याकुठे चाललंय अन या आईचे विचार किती बुरसटलेले... म्हणे तिची पत्रिकाच तशी आहे... तिच्या आधीच्या नवर्याच्या बाबतीत ते करायला सागितले होते म्हणून बिचारीने ते लिंबू वगैरे टाकले.. लगेच काय आपल्या घरावर कुणी फुंकले की काय?? वेदा अन उमेश ज्या रिक्षेत होते तो रिक्षेवाला प्यायलेला होता... हा दोष गौरीच्या पत्रिकेचा आहे???? आणि आता मानभावीपणे म्हणतोयस की वसंता तूही जरा अण्णाला मदत कर... का?? सहज इकडे आपला आलो म्हणून?? सहज आपला समोर दिसलो म्हणून?? आलोच नसतो अन गुरुजी भेटलेच नसते तर फारच शांती लाभली असती आपल्या घराला.. लहान लहान म्हणून आपलं ऐकून घेतोय इतके दिवस... त्या गौरीवर काय काय प्रसंग गुदरले.. कुणी विचार तरी करतंय का?? सरळ आम्हाला सांगता की घरात येऊ नका, संबंध ठेवू नका.. मी आज जाब विचारायला आलेलोच नाहीये... मी आलोय ते हे सांगण्यासाठी.. की गौरी मनाने किती चांगली आहे हे समजण्याची कुवतही तुमच्यापैकी एकाच्याही जवळ नाहीये... त्यामुळे मीच आता संबंध सोडतोय तुमच्या सगळ्यांशी.... आजवर जमेल तसे करत होतो.. पण आता अपेक्षा ठेवू नका... मी गौरी आता तुमच्यासाठी कुणी नाही राहिलो... निघतो मी...
ताडताड पावले टाकत वसंता निघून गेला आणि आईने रडत रडत आपली मान बाबांच्या खांद्यावर टेकवली. बाबांच्याही डोळ्यात पाणी आलेले होते. अण्णाचा संताप संताप झालेला होता तर कुमारदादा निराश होऊन वसंता निघून गेला त्या दाराकडे बघत बसला होता..
लघुरुद्र करण्यातला सगळा उत्साहच संपला होता... कार्याच्या आदल्या दिवशीच घरात भांडणे झालेली होती... आणि त्यातही कधी नव्हे तो वसंता वाट्टेल तसा बोलला होता..
दादा त्याही परिस्थितीत पुढची तयारी करू लागला.. ते पाहून अण्णाने गुपचूप मदत करायला सुरुवात केली.. आई आणि बाबा खूप निराश होऊन आपल्या खोलीत निघून गेले..
इकडे वसंताने बालगंधर्व पुलावर एक सिगारेट घेतली आणि राग शांत करण्याचा प्रयत्न करत करत झुरके मारत ताडताड घरी चालत निघाला..
वसंताने मनातील प्रक्षोभ असा व्यक्त करायला हवा होता की नको... हा प्रश्नच खरे तर.. पण.. माणसाला कधीकधी असह्य होते सगळे.. त्याला पश्चात्तापही होत होता आणि बरेही वाटत होते... कुमारदादाला वाट्टेल तसे बोलल्यामुळे चालता चालता वसंताच्या डोळ्यात पाणीही येत होते आणि त्याच घरात आईने आपल्याशी संबंध सोडल्याचे आठवत असल्यामुळे संतापही होत होता... कन्फ्युज्ड... कन्फ्युज्ड मनस्थितीत होता तो... आपण केले ते बरे की वाईट?? पण जे केले ते आपल्या आणि गौरीच्या संसारासाठी केले हे त्याला निश्चीत माहीत होते..
विमनस्क अवस्थेत वसंता घरी आला.... दारातून आत आल्यावर त्याला दिसले.. गौरी ओट्यापाशी काहीतरी करत होती... गुणगुणतही होती..
"अय्या आलास?? कुठे होतास दिवसभर?? सगळीकडे पाहून आला गगन....."
वसंताने हात पाय धुतले आणि पलंगावर आडवा झाला. त्याच्या मनस्थितीची काहीही कल्पना नसलेल्या गौरीने ओट्यावरील बेसीनमध्ये हात धुतले आणि गगन बाहेर गेलेला आहे हे पाहून पटकन वसंतापाशी आली आणि त्याच्या शेजारी आडवी होत त्याच्या छातीवर डोके टेकवत अतीव आनंदाने म्हणाली...
"आज काय झालं माहितीय वसंता????"
वसंताचे डोळे आसवांनी आणि संतापाने लालभडक झालेले आहेत हे पाहिलेच नव्हते तिने...
"अंजलीवहिनी आणि तारका वहिनी आल्यावत्या आत्ता..."
ताडकन वसंता उठून बसला..
"काय झालं?? असा का दिसतोयस???"
"क.....कशाला आल्यावत्या???"
गौरीने अत्यानंदाने वसंताचा हात हातात घेतला..
"उद्या लघुरुद्रंय घरात.. म्हणाल्या.. आजवर झालं ते सगळं विसरा दोघे... हवे तर आम्ही दोघी तुझ्या पाया पडून तुझी माफी मागतो... पण आपलं घर आपलं घर आहे... आज रात्रीपासून राहायला यायचं ते सगळं कार्य आटोपल्यावरच इथे यायचं... "
"....... ????????"
"डोळ्यात पाणी आलवतं रे दोघींच्या...."
"तू... तू... काय म्हणालीस...???"
"मी .. नमस्कार केला आणि... तिघी एकेमेकींना जवळ घेऊन पोटभर रडलो वसंता....."
"पण.... हे.. हे कसं काय झालं???"
"दादाभावजी आणि अण्णाभावजी खूप बोलले आज दोघींना.. खूप बोलले दोघे.. त्याच दोघी म्हणाल्या..."
".......!!!!!"
"चल... आवर... निघायचंय.. मी प्रसादाचा शिरा करतीय... मोठ्या घरी ताबडतोब जायला पाहिजे आपल्याला... उठ...."
आत्ता..... आत्ता जर इथे कुमारदादा असता... तर.....वसंताने...
... त्याच्या पायावर डोके ठेवून घळाघळा रडून माफी मागीतली असती...
सही ....
सही ....
छान जमलाय हा भाग, अखेरीस पाणी
छान जमलाय हा भाग, अखेरीस पाणी आले डोळ्यात.
धन्यवाद रोहित एक मावळा व
धन्यवाद रोहित एक मावळा व चंचल!
-'बेफिकीर'!
मस्त झालाय भाग. आवडला. कृपया
मस्त झालाय भाग. आवडला.
कृपया वि.पु. पहा.
मस्त भाग.
मस्त भाग.
बेफिकीर जी, खुप खुप
बेफिकीर जी,
खुप खुप धन्यवाद!!!!!!!
खुप छान जमलाय हा भाग,
कमाल आहे तुमची.
खुपच मस्त!!!
अमित
छान
छान
खुपच सुन्दर.
खुपच सुन्दर.
छान चालू आहे कादंबरी
छान चालू आहे कादंबरी
शेवट अपेक्शित होता पण भाग छान
शेवट अपेक्शित होता पण भाग छान जमलाय.
पुढच्या भागाच्या प्रतिक्शेत.
नवीन प्रतिसाददात्यांचा आभारी
नवीन प्रतिसाददात्यांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!
छान भाग! अवडेश
छान भाग! अवडेश
छान
छान
मस्त झालाय भाग. आवडला बेफिकीर
मस्त झालाय भाग. आवडला
बेफिकीर जी,
मी तुमच्या सगल्या कथा वाचल्या आहेत. खूप्प च आवडतात.
लीहिते रहा.
अप्रतिम.....खुप आवडला
अप्रतिम.....खुप आवडला भाग...!!!!
पु.ले.शु.
निलिमा, शुभांगी, दिपाली आणि
निलिमा, शुभांगी, दिपाली आणि श्वेता,
मनापासून आभारी आहे.
-'बेफिकीर'!
खुप छान चालली आहे कथा.
खुप छान चालली आहे कथा. सुरवातीचे वाचुन वाईट वाटले, पण न॑तरचे लिखान फारच छान.
All The Best!!!!!!!! मनापासुन शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!Keep It
खुपच जमली आहे भट्टी आता.
खुपच जमली आहे भट्टी आता. तुम्हाला लिहिताना पण खुप त्रास झाला आसेल ना?
झाला खरा मुग्धानंद, तुमच्या
झाला खरा मुग्धानंद,
तुमच्या या अंदाज क्षमतेला दाद देतो मी!
आता मी असे म्हणणे हे खोटेही ठरू शकेल कदाचित, पण हा भाग लिहीताना खरच त्रास झाला.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
मस्त झालाय भाग
मस्त झालाय भाग
नविन भाग प्लीज..........
नविन भाग प्लीज..........
मस्त चाललय. लवकर येउदेत
मस्त चाललय. लवकर येउदेत पुढेचे भाग.
सहि.... विमनस्क मनस्थितित
सहि....
विमनस्क मनस्थितित वसंता वाहवला नाहि ह्याला संस्कारच म्हणायचे.
वसंताच्या मनाच द्वंद्व.. खुपच छान.... पण कितिहि झाल तरि मोठ्या भावाला अस बोलायला नको होत, पण एक मन म्हनत वसंता बोलला म्हणुनच दोन्हि वहिन्या गौरीचि माफि मागुन गेल्या.
आता वसंता दादा ला आणि दादा वसंता ला कसा सामोरे जातिल, तो क्षण कल्पुन गलबलुन आलय.....
खुप सहि.
प्लिज पुढचा भाग लवकर टाका.
वसंताच्या मनाच द्वंद्व.. खुपच
वसंताच्या मनाच द्वंद्व.. खुपच छान आणि ते अक्षरशः अनुभवले ही लेखणीची कमाल
पु.ले.शु.
नविन भाग लवकर येउदेत
नविन भाग लवकर येउदेत
पुढचा भाग... लवकर प्लिज....
पुढचा भाग... लवकर प्लिज....
छान लिहिलेय... पण आता कथेत
छान लिहिलेय... पण आता कथेत खुप तोचतोचपणा आलाय...काहीतरी नवीन घडू दे.
मस्त चालु आहे कथा.नविन भाग
मस्त चालु आहे कथा.नविन भाग लवकर येउदेत.
पु. ले. शु.
हा भाग पण छान झाला आहे. पुढचा
हा भाग पण छान झाला आहे. पुढचा भाग लवकर येऊ देत.
:नविन भागाच्या प्रतिक्षेत
:नविन भागाच्या प्रतिक्षेत असणारा बाहुला:
प्लिज पुढचा भाग अप करा ना....
Pages