घर - १२

Submitted by बेफ़िकीर on 8 February, 2011 - 01:50

"हिमालय देखा नही? तो आपने किया क्या जिंदगीभर?"

सटासट्ट कांदा चिरताना गगनने एका नव्वद पावसाळे पाहिलेल्या माणसाच्या आविर्भावात वसंताला हा प्रश्न विचारला आणि गौरी खो खो हसायला लागली. नेपाळचा विषय चाललेला होता. हे बाळ वयाच्या सातव्या वर्षापर्यंत हिमालय रोज बघायचे. त्यात त्याला काहीही वाटायचे नाही. पण तीन वर्षापुर्वी इतर अनेक नेपाळ्यांबरोबर त्याचेही तीर्थरूप भारतात आले आणि त्यातही पुण्यात आले तेव्हापासून हिमालय दिसेनासा झाला.

आणि आत्ता वसंताने त्याला विचारले की नेपाळमधून हिमालय दिसतो का? मुळात हा प्रश्नच बावळटासारखा होता. त्यावर गगनने 'इस्पितळातून एखादा वेडा नुकताच सुटला असावा' असे वसंताकडे पाहिले आणि तिथेच वसंताला आपली चूक लक्षात आली.

अत्यंत सात्विक संतापाने गगगने उत्तर दिले.

"नेपालमे हिमालयके अलावा कुछ दिखताही नही"

त्यावर गौरीने आणखीन बावळटपणा केला.

"बरफ दिखता है?"

"सालमे ग्यारा महिने बरफ होता है.. पुरा सफेद पहाड.. आप लोगोने आजतक हिमालय नही देखा क्या?"

आणि त्यावर वसंताने नकारार्थी मान हालवल्यावर गगनने वरील प्रश्न विचारला.

वसंता - मैने क्या किया जिंदगी मे.. सही बात कर रहे हो बेटा..

गगन - आदमीने जिंदगीमे चार चीजे करनीही चाहिये...

गौरी - कुठली चीजे रे?

गौरीचे हिंदी अगाध होते.

गगन - इश्क, प्यार, मुहोब्बत और हिमालय देखना

वसंता - कान के नीचे बजाऊ क्या?

गगन - आपने उसमेसे तीन चीजे तो करही दी है आजतक..

वसंता - मतलब?

गगन - इश्क, प्यार और मुहोब्बत तो आप दोनोने कीही होगी..

वसंता - थोबाड फोडीन आता... नाहीतर हाकलून देईन..

गगन - देखा चाची? मै कहता नही आपसे बारबार? भलाईका जमाना नही रहा अब..

गौरीने हासत हासत फोडणी टाकली आणि पाने घ्यायला लागली.

गौरी - काय झालं रे? घराचं??

वसंताचा चेहरा गंभीर झाला. दोन महिने झाले होते इथे येऊन! या दोन महिन्यात वसंता रोज दोन वेळा तर गौरी रोज दुपारी तीन तास असे घरी जात होते. आईंचे करता येईल तितके करत होते दोघे! पण एक मात्र होतं! वेगळं राहायला लागल्यापासून जरी राजा राणी असण्याचा आनंद मिळत असला तरी जेवताना वसंताला घास घशाखाली उतरवता यायचा नाही. खरा आनंद मागेच सोडून इकडे खोट्या आनंदासाठी आल्यासारखे वाटायचे. गौरी वसंताचे मन जाणून त्याला खुलवण्यासाठी सतत प्रयत्नरत असायची. पण शेवटी ती भावना प्रबळ ठरायची आणि वसंता मग मुखवटा धारण करून हासरा बनायचा. कारण गौरीला असे वाटायला नको की तिच्यासाठी त्याने वेगळा थाटलेला संसार त्याला रमवण्यास अपयशी ठरत आहे.

पण घटना वेगळ्याच घडत होत्या. अंजली आणि तारका यांच्यामध्ये कधी नव्हे इतकी धुसफूस वाढलेली आहे हे रोज जाऊन येऊन वसंता आणि गौरीला समजू लागलेले होते. इतकेच काय तर उमेशही वेदापासून काहीसा लांब होत आहे हेही जाणवत होते.

आणि एक दिवस वसंता अण्णाला भेटायला सरळ कॉसमॉस बॅन्केतच गेला.

अण्णा - काय रे? इथे कसा काय?

वसंता - तुलाच भेटायला आलो..

अण्णाला वाटले काहीतरी अडचण आलेली असणार आणि दादाकडे जायला तोंड नाही म्हणून इथे आलेला असेल बहुधा! अण्णा आणि तो दोघेही चहा घ्यायला अंबा भुवनमध्ये आले.

वसंता - घरात... काय चाललंय सध्या?

अण्णा - ... काय?

वसंता - अंजली वहिनी अन ... तारका वहिनींचे..

अण्णाने मान खाली घातली. लहान भावाला त्याचा काही संबंध नसताना काही सांगावे की नाही याचा अण्णा विचार करत होता. पण बाजू मांडायला काही हरकत नव्हती. पुढे मागे वाद झाले तर वसंताला निदान आपली बाजू माहीत असावी असाही विचार त्याच्या मनात आला.

अण्णा - बोलत नाहीत एकमेकींशी...

वसंता - का?

अण्णा - वसंता... बायकांचे घरगुती वाद म्हणून सोडूनच देतो मीही... पण...

वसंता - ??

अण्णा - गोष्टी पराकोटीलाही पोचू शकतात..

वसंता - झालं काय?

अण्णा - सांगण्यासारखं काही महत्वाचं नाहीच.. ही असं म्हणाली अन ती तसं म्हणाली असलंच सगळं.. पण आता बोलतच नाहीयेत..

वसंता - पण तू अन दादा का मधे पडत नाही?

अण्णा - मला काय बोलल्यात परवा वहिनी.. माहितीय का तुला?

वसंता - का?

अण्णा - एकदम वाक्य गेलं रे.. म्हंटलं तारकाने काही कमी सोसलं नाहीये..

वसंता - मग?

अण्णा - पार त्यांच्या लग्नापासून सगळं काढलं .. आता आपण काय तेव्हाचा खर्च आता परत करणार का दादाला?

वसंता - पण.. आईचं आजारपण चालू असताना.. हे सगळं काय चाललंय..

अण्णा - वसंता.. या सगळ्याच्या मागे.. अ‍ॅक्च्युअली.. एक मोठे कारण आहे..

वसंता - काय?

अण्णा - कॉर्पोरेशनची नोटीस नव्हती का आली मागे? रस्तारुंदीची..

वसंता - हं..??

अण्णा - ती... पुन्हा आली.. यावेळेस मुदत दिलीय तीन महिन्यांची..

वसंता - मला... मला का नाही सांगत हे सगळं..??

अण्णा - तुला सांगण्यावरूनही वाद झाले.. वहिनी म्हणाल्या त्या दोघांना काय पडलंय.. त्यांना कशाला मध्ये घ्यायला हवंय..

वसंता - म्हणजे काय?

अण्णा - अरे त्या बाबांनाही बोलायला लागल्यात आता..

वसंता - पण.. ऐकून कसं घेतो दादा? काय बोलतात बाबांना?

अण्णा - म्हणे.. आमच्या उमेदीच्या काळात आमचा सगळा खर्च झाला घरातल्यांच्यावर... आणि आज नोटीस आल्यानंतर आमच्याकडे घर घ्यायलाही पैसे नाहीयेत.. बाकीच्यांची झाली घरे...

वसंता - पण.. नोटीस.. म्हणजे स्थगिती नाही मिळणार का?

अण्णा - यावेळेस नाही मिळणार..

वसंता - का?

अण्णा - यावेळेस प्रकरण गंभीर आहे.. नागनाथ पार ते उंबर्‍या गणपती चौक हा रस्ता तर मोठा करायचाच आहे.. पण पार खुन्या मुरलीधरावरून टिळक रोडपर्यंत नेणार आहेत.. सगळ्यांनाच आल्यात नोटिसा..

वसंता - मग करणार काय आपण?

अण्णा - काय करणार? ज्याला जे शक्य आहे ते तो करणार...

वसंता - कॉम्पेन्सेशन?

अण्णा - चाळीस हजार..

वसंता - पण.. किती भाग जाणार घराचा?

अण्णा - फक्त स्वैपाकघर अन त्याच्या वरची.. म्हणजे तुझी खोली राहणार..

वसंता - चाळीस हजारात काय होणार?

अण्णा - ते जाउदेत.. ते चाळीस हजार वहिनी मागतायत बाबांकडे..

वसंता - पण... म्हणजे.. ते मागूदेत त्यांना... पण.. मुळात करणार काय आपण सगळे?

अण्णा - वसंता.. तूही काय बोलतोस?? तुझी भाड्याची का होईना जागा झालेलीच आहे.. मलाही कर्ज काढून बॅन्केच्या कॉलनीत फ्लॅट घेता येईल.. राजूही एखादी जागा घेऊ शकेल.. प्रश्न दादाचाच आहे..

वसंता - दादाही जागा घेऊ शकेल की? ... आणि... दादा तिथेच नाही का राहू शकणार?

अण्णा - नाही म्हणतायत वहिनी..

वसंता - म्हणजे?

अण्णा - त्या म्हणतायत प्रत्येक भावाने तीस तीस हजार द्यावेत आणि मग दादा एक फ्लॅट घेईल... आजवर त्यांचे पैसे खर्च झाले त्याचे काय असे विचारतायत त्या..

वसंता - पण मग या घरी कोण राहणार?

अण्णा - कुणीच नाही..

वसंता - अन आई बाबा?

अण्णा - आई बाबांना दादा अन वहिनी स्वतःकडेच ठेवणार म्हणतायत.. ती जबाबदारी आमचीच आहे म्हणतात त्या... थोरले म्हणून..

वसंता - पण.. जुन्याच घरी राहायला प्रॉब्लेम काय आहे?

अण्णा - दोनच खोल्या.... कुणी आलं गेलं तर कुठे बसणार? आई बाबा काय स्वैपाकघरात राहणार?

वसंताने मान खाली घातली. मुद्दा बरोबर होताच!

वसंता - पण मग... म्हणजे आता ठरलंय काय?

अण्णा - काहीच नाही.. रोज वाद होतात.. वाद घालण्यापुरत्या दोघी एकमेकींशी बोलतात तेवढेच.. नंतर अबोला अन सुतकी वातावरण.. आईचे मात्र मन लावून करतात दोघी..

वसंता - तुझं म्हणणं काय आहे?

आत्ता जरा अण्णाला उत्साह आला.

अण्णा - माझं म्हणणं काय आहे माहितीय का? की दुकान आजपर्यंत...

चरकन थांबला अण्णा! तोच तोच मुद्दा प्रत्येकाच्या मनात येत असायचा. दुकान फक्त दादाला मिळाले. ते वडिलोपार्जीत आहे. आणि ते फक्त दादाच बघतो. आज नाही म्हंटले तरी दुकान म्हणजे भरपूर कमाई असणार हे सगळ्यांचेच मत होते. पण आपण हे मत वसंतासमोर मांडून अपराधी ठरावे की नाही हे अण्णाचे ठरत नव्हते. त्यामुळे तो थांबला.

वसंता - दुकान हा भागच वेगळा आहे... हा प्रश्न घराचा आहे..

अण्णा - असं कसं म्हणतोस?? आता मी अन हिने काय कमी केलंय घरासाठी? तेव्हा काय पगार होता माझा? आणि मुख्य म्हणजे पुर्वीच्या खर्चांचाच विषय काढायचा असेल तर माझं म्हणणं हे आहे की आई वडिलांचे दुकान आज तुम्ही चालवताय ना? मला आधी तारकाचे म्हणणे पटायचे नाही. पण आत्ता लक्षात येऊ लागलंय.. काय चुकीचे बोलते ती? तू सांग ना? आम्ही वेगळे होऊ शकत असून, वेगळे होण्याची सर्वाधिक क्षमता असूनही वेगळे झालो नाहीत. कायम हे दोघे थोरले म्हणून यांचंच ऐकलं! आज हे मागच्या खर्चाचा विषय काढतात. मग माझं लग्न झालं तेव्हा मला काय पगार मिळायचा? तरीही दादाइतकेच मीही घरात द्यायचो ना? त्यात परत राजूचा अन तुझा खर्च विभागून घ्यायचो.. ती जबाबदारी काही बाबांवर ठेवलेली नव्हती.. आज घरखर्च सगळा मी बघतो.. हप्ते आणि बिलं तो बघतो.. आम्ही आज इतकी वर्षे संसार केला... राजू गीतावहिनींना घेऊन बदली झाली म्हणून निघून गेला.. तू गौरीला घेऊन डेक्कनला राहायला गेलास.. दादा आणि वहिनी घरातच थांबले हे मान्य आहे.. आपलं सगळ्यांच केलं हेही मान्य आहे.. पण मी आणि हिने काय कमी केलं का? खर्चानेही केलं अन करण्यानेही... तूच सांग... तुझं अन तारकाचं एकमेकांवर किती प्रेम आहे.. आहे की नाही??.. तिला तू गेल्यापासून घास उतरत नाहीये घशाखाली... आणि इतकं प्रेमाने करून आज पुन्हा हेच ऐकायचं.. आम्ही केलं त्याचं काय आम्ही केलं त्याचं काय.. आता दुकान वेगळा विषय आहे म्हणतोस तू.. मला सांग... दादाला काय कष्ट पडले आयुष्यात? सरळ शिक्षण झाल्यावर त्याने दुकानात बसायला सुरुवात केली.. आधीचे रेप्युटेशन आणि खप होताच.. तो जसाच्या तसा मिळायला लागला त्याला.. म्हणजे डे वन पासून त्याचे उत्पन्न हे बाबांनी दुकान सोडले तय दिवसाइतकेच होते... सुरुवातच इतकी स्ट्रॉन्ग... मला काय किंवा तुला काय.. स्ट्रगल करावे लागलेच ना? आधीच्या नोकर्‍या काय.. पगार काय.. अशात आपण संसार उभे करतो.. यांना आजवर जागेसाठीही आणि नोकरीसाठीही... कधीच झगडावे लागले नाही.. मी आज फ्लॅट घेणार म्हणजे नाही म्हंटले तरी बॅन्केचा हप्ता भरपूर असणार... प्लस मला माझ्याजवळचे जवळपास पंचेचाळीस हजार घालावे लागणार.. फर्निचर वेगळेच... ही स्ट्रगल आहे.. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची.. कुमारदादाला आजवर स्ट्रगल काय पडली सांग ना तू? यांच लग्न झालं त्याच्या आधीपासूनच दुकान त्याच्याकडे... उत्पन्न भरपूर... पुन्हा ती जागा तो मालक विकणार तेव्हाही आपण सगळ्यांनी पैसे दिले.. ते भाऊ काका येऊन लपवलेल्या दागिन्यांचे सांगून गेले आणि त्या दागिन्यांचेही समान वाटे झाले.. असं नाही की तू किंवा राजू अजून उभे राहायचात म्हणून तुमच्या नावाने जास्त दागिने ठेवले किंवा काही.. एवढं असल्यावर लहान भावांचं केलं... हे कर्तव्य नाही का?... आणि मी म्हणतो असं केलं केलं म्हणजे तरी काय? ह्यांच लग्न झाल्यावर चार वर्षात माझंही लग्न झालं.. म्हणजे चारच वर्ष यांना माझं करावं लागलं.. बरं.. जे आहे ते आहे.. मी नाही म्हणतच नाही.. वहिनींनी आणि दादाने प्रेमाने केलंच... पण आम्ही कमी केलं का??हा माझा मुद्दा आहे... तुम्ही पदोपदी जर तारकाला बोलणार असाल.. तर मग... आज राजू गेला गीतावहिनीना घेऊन.. तू गेलास गौरीला घेऊन.. आणि मी माझ्या बायकोला त्या घरात शिव्या खायला ठेवायचे.. हा कुठला न्याय? दादा कधीच अंजली वहिनींना ओरडणार नाही..

वसंताने चहाचा दुसराही कप संपवलेला होता. अण्णाचा पहिलाच चहा गार झालेला होता.

वसंता - भांडता कसले रे घरात??...

अण्णा - ती नोटीस आली नसती तर हे वाद झालेच नसते...

वसंता - कॉर्पोरेशनमध्ये जायचं का?

अण्णा - सगळं करून झालंय.. यावेळेस काही होणार नाही..

वसंता - अण्णा.. तुम्ही मला यातलं काहीच का सांगत नाही रे?

अण्णा - वसंता.. तुझ्यावर सगळ्यांचा राग आहे... तू घर सोडलंस म्हणून...

वसंता - मी... मी... घर सोडलं म्हणून राग आहे... आणि.. तुम्ही सगळे घरात असूनही भांडताच..

अण्णा - ......

वसंता - तुझाही राग आहे का माझ्यावर??

अण्णा - ................. होय...

वसंता - आणि तू फ्लॅट घेऊन शिफ्ट झाला असतास तर?

अण्णा - झालो नाही हेच बघायला पाहिजे ना? ... उलटून काय बोलतोस मला??

वसंता - सॉरी... मी... दादाला भेटू का?

अण्णा - बघ बाबा... तू लहान आहेस... तो तुझं काय ऐकणार?

वसंता घरी आलाच नाही. तिथून तो तडक दुकानावरच गेला. दहा पंधरा मिनिटे दादाशी बोलून मात्र त्याला जाणवले. आपण या माणसाशी हा विषयही काढू शकणार नाही. हा जर म्हणाला की तू यात पडू नकोस तर आपल्याला मुकाट बसावे लागेल.

इकडचे तिकडचे बोलून वसंता निघाला तसा मात्र दादा स्वतःच म्हणाला..

दादा - थांब... चहा मागवू... काय बोलायला आला होतास?

वसंता - मला कळलं.. नोटीस आलीय...

दादा - हं! कोण म्हणालं?? शरद?

वसंता - नाही... बाहेरून समजलं..

दादा - ...अच्छा.. म्हणजे तू हे विचारायला आला आहेस की तुला का सांगीतलं नाही आम्ही..

वसंता - .. अं??... नाही नाही..

दादा - ... मग??

वसंता - आता काय करायचं ठरलंय??

दादा - काही नाही.. घर सोडायचं...

वसंता - अन तू??

दादा - मी एक भाड्याने जागा बघितलीय.. बघू...

वसंता - कुठे?

दादा - कसब्यातच आहे...दुकानही जवळ..

वसंता - अन अण्णा?

दादा - त्याचा फ्लॅट होतच आला आहे ना?

वसंता - अन राजू दादा?

दादा - तो काय अजून दोन वर्षे तर तिकडेच आहे.. नंतर बघता येईल..

वसंता - आई बाबांना तू नेणार आहेस का?

दादा - हो मग काय?

वसंता - दादा... घरात... सगळं शांत आहे ना रे??

दादा - .... का???

वसंता - अंहं... त्रासलेला दिसतोयस..

दादा - तू काळजी करण्याइतकं काही झालेलं नाहीये...

वसंता - परका झालो मी?

दादा - वेडायस का? ... आत्ताशिक तुमचा संसार उभा राहतोय.. त्यात हे विषय नकोत...

वसंता - काय... झालंय काय पण??

दादा - स्वैपाकघरातले वाद असतात ते... लांब राहिले की आपोआप नष्ट होतात...

वसंता - आणि मला म्हणत होतास की एकत्र राहायला हवे..

दादा - तो विषय वेगळ्या पार्श्वभूमीवर होता.. तू वाद नसताना उगाचच वेगळा होत होतास.. झालास..

वसंता - हे... हे सगळं असं कशामुळे होतंय पण??

दादा - वसंता... खरं सांग... तुला शरद भेटला??

कुमारदादाशी खोटे बोलणे आजतागायत वसंताला जमलेले नव्हते.

वसंता - ... होय..

दादा - काय म्हणाला??

वसंता - घरात या दोघींचे खूप वाद होतात.. किंवा मग बोलतच नाहीत...

दादा - त्याच्या मते चूक कुणाची आहे??

वसंता - ... दोघींची...

दादा - हो ना? .. मग.. तारका वहिनींना तो... काहीच का बोलत नाही??

वसंता - ... तो... म्हणजे... काय झालं काय??

दादा - तारका वहिनी म्हणाल्या मी आणि अंजलीने आजवर सगळं घशात घातलंय.. हे बोलणं योग्यंय??

हबकलाच वसंता! दुसरी बाजू अशी होती तर!

वसंता - असं कसं म्हणाल्या?

दादा - समजा म्हणाल्या.. शरद कदाचित त्यांना बोललाही असेल.. पण आमच्यासमोर बोलायला नको??

वसंता - पण... त्या असं म्हणाल्या??

दादा - तुला काय सांगीतले त्याने?

वसंता - वाद होतात एवढंच म्हणाला..

दादा - अंजलीबद्दल काय म्हणाला??

वसंता - विशेष असं काही नाही..

दादा - म्हणजे काय? घरात वाद होतात म्हणाला... आणि अंजलीबाबत काही बोलला नाही??

वसंता - वहिनी पण खूप बोलतात का रे?

दादा - तू काय हिला ओळखत नाहीस? तोंड सुटले की सुटले...

वसंता - पण दादा... अण्णा अन वहिनींनीही केलंच आहे की घरात आजवर..

दादा - कोण नाही म्हणतंय??.. पण असं म्हणायचं का की आमच्यामुळे त्यांचं नुकसान झालं कायम??

वसंता - असं काहीच नाहीये..

दादा - जाउदेत वसंता.. तू काही यात पडू नकोस.. हे असले वाद होणारच..

वसंता - मी... मी आज रात्री येईन तेव्हा बोलू का दोघींशी??

दादा - छे छे.. अजिबात नाही..

वसंता - दादा.. तू एकदा... अण्णाला भेट की?

दादा - आधी तेच वाटत होतं मलाही वसंता... पण आता... आता नाही तसं वाटत.. तो परवा हिला म्हणाला.. जितका खर्च केलात आजवर तो सगळा एकरकमी देऊन टाकतो.. पुन्हा ऐकवू नका तुम्ही आमचं केलंत म्हणून.. वसंता... करणं म्हणजे फक्त पैशाचीच मदत असते का?

वसंताला अत्यंत सखेद आश्चर्य वाटलेले होते. अण्णाने हे आपल्याला काहीही सांगीतले नाही. आणि हे त्याचे बोलणे तर उद्दामपणाच होता. इतका कसा तो तारकावहिनींच्या विचारांचा झाला? अण्णाचे म्हणणे ऐकावे तर अण्णाचे पटते, दादाचे ऐकावे तर दादाचे!

भण्ण मनस्थितीत घरी आला वसंता आणि गौरीला सगळे सांगून टाकले. तर गौरीने आणखीन एक बॉम्ब फोडला.

"मी आत्ता घरी जाऊन आले आणि समोर आईलाही भेटून आले. तिलाही नोटीस आलीय... पण... तुझी आई माझ्या आईला बोलताना काय म्हणाली माहीत आहे का? ... बाबा हे घर अण्णाभावजींच्या नावाने करणार आहेत... त्या उरलेल्या दोन खोल्या..."

हे ऐकून तर हादरलाच वसंता! आता अंजली वहिनी घर डोक्यावर घेणार हे त्याला लक्षात आले. आणि दोनच दिवसात घरात स्फोटही झाला, जो गौरी आणि वसंता तिथे असतानाच झाला.

अंजली वहिनी आणि तारका वहिनींचे जोरदार भांडण झाले. बाबांचे म्हणणे होते की दुकान जसे कुमारला दिले तसे घर शरदला देणार! राजू आणि वसंता या दोघांना अंबरनाथला असलेला एक जुना प्लॉट, जो नुसताच पडून होता आणि त्याला बाजारभाव कधीतरी दहा वर्षांनी आला असता, तो विभागून देणार!

हे सगळे करण्याचे कारण त्यांनी असे सांगीतले की एक तर आई आजारी आहेच. त्यात पुन्हा घरात वाद होऊ लागलेले आहेत. राजू आणि वसंता वेगळे राहातच आहेत. माझेही वय झालेले आहे. आता विभागणी करून टाकलेली बरी! म्हणजे आम्ही दोघे आहोत तोवर सगळे काही शांत झाले आहे हे बघता येईल आणि नंतर प्रॉब्लेम नको!

यावर अंजली वहिनींचे म्हणणे होते की दुकान 'ह्यांना' चालवायला सांगणे ही त्या काळाची गरज होती. तसेच, दुकान हे काही विशेष चालतही नाही. स्टेशनरी विकणारी कित्येक दुकाने जवळपास आहेत. ह्यांना अनेक ठिकाणी मालाच्या विक्रीसाठी फिरत बसावे लागते. तारका यायच्या आधी आम्ही दोघांनी सर्व भावांचे केलेले आहे. असे असताना घर अण्णाभावजींच्या एकट्याच्या नावाने होणे हे योग्य नाही.

दादा अंजली वहिनींना समजावून सांगत असला तरीही 'मोठा भाऊ असताना दोन नंबरच्या भावाच्या नावाने घर व्हावे' हे त्यालाही मनातून पटलेले नव्हते. उरणार असलेल्या दोन खोल्यांमध्ये राहणार कुणीच नव्हते. त्या दोन खोल्या एखाद्या गरीब कुटुंबाला भाड्यानेच दिल्या गेल्या असत्या. पण तरीही त्या खोल्या कायमच्या शरदच्या नावाने झाल्या की तारका वहिनींनी नंतर चांगलाच हक्क दाखवला असता हे त्याला माहित होते. आणि दुकान आणि घर यात मूलभूत फरक आहे असे त्याचे मत होते. दुकान हे फक्त एक उत्पन्नाचे साधन होते. आज काही कारणाने दुकान बंद झाले तरी आपण नोकरी करू शकू हे कुमारदादाला माहीत होते. पण घरावरच आपला काही हक्क उरला नाही तर आजवर या घरासाठी जो जो त्याग केला त्याला अर्थ काय? अर्थात, एकट्याच्या स्वतःच्या नावाने घर व्हावे असे त्याचे मुळीच म्हणणे नव्हते. तो तर म्हणत होता की वसंताच्या नावाने या दोन खोल्या करा कारण त्याला सर्वाधिक गरज आहे. वसंताच्या नावावर घर करण्यात सगळ्यांनाच एका गोष्टीची खात्री होती की या घरात सगळ्यांनाच त्यानंतरही हक्काने येता येईल कारण एक तर वसंता सगळ्यात लहान, त्यात त्याला कायम आर्थिक मदतीची गरज असणार आणि मुख्य म्हणजे थोरल्यांनी त्याग केल्यामुळे हे घर मिळालेले असण्याची भावना त्याच्या मनात राहणार!

मात्र! या प्रस्तावाला सर्वांनीच कडाडून विरोध केला. वसंता आणि गौरीच्या समोरच! अण्णाचे म्हणणे होते की वसंताने धंदा काढला तरी आपण पाठीशी उभे राहिलो. गौरीशी लग्न करणार म्हणाला त्यावर आपण काहीही म्हणालो नाहीत. तो वेगळा झाला तरी त्याचे घर आपण उभे करून दिले. त्याच्यावर पोलिस केस झाली होती तेव्हाही आपणच त्याच्या मागे होतो. आता या स्टेजला आल्यावर नेहमी वसंताचाच विचार करणे, त्यालाच दाक्षिण्य दाखवणे हे कितपत योग्य आहे? तो कर्तृत्ववान आहे हे त्याने सिद्ध केलेले आहे. उलट आपल्या सगळ्यांना स्ट्रगल करावे लागले तसे त्याला करावेच लागलेले नाही.

आणि हे बोलताना अण्णाने भावनेच्या भरात दादाला उद्देशूनच आणखीन एक वाक्य टाकले.

'स्ट्रगल तर तुलाही करावे लागले नाही'!

झालं! अंजली वहिनींनी अक्षरशः तासली अण्णाची! त्यांचा तो अवतार पाहून तारकाही गप्प बसली. गौरी तर आधीपासूनच रडत होती. अंजली वहिनींनी त्यांचे लग्न झाल्यापासूनचा पाढा अक्षरशः एकेक उदाहरण देत देत वाचला. एरवी त्याच सगळ्या बाबी सगळ्या भावांना स्वतःलाही आठवायच्या. पण आज अंजली वहिनी त्या सर्व बाबींचा उल्लेख रागाने करत असल्यामुळे कुणालाच ते आवडत नव्हते. शेवटि तारकानेही तोंड सोडले.

पण यात एक वाईट बाब झाली. लंगडत लंगडत आई तेथवर येऊन पोचल्या. त्या आल्यावर सगळे गपचूप झाले असले तरीही आईंना सगळे ऐकू आलेलेच होते.

आईंनी त्या अवस्थेतही एकेकाला झापायला सुरुवात केली. आता कोण बोलणार? कुमारदादा आणि बाबा तिला बोलू नकोस बोलू नकोस, पडून राहा वगैरे सांगत होते. पण अपयशी ठरले.

आईंनी प्रत्येक सुनेच्या, अगदी गौरीच्याही माहेरचा उल्लेख करून पहिल्यांदाच गौरीला जाणवून दिले की तिला आजवर सासुरवास झाला नाही हे तिचे नशीब समजायला पाहिजे तिने! त्या आणखीन गौरीबाबत इतरही गोष्टी बोलल्या. त्यातच चुकून गौरीच्या अपशकुनीपणाचा नको तसा उल्लेख झाला. त्यावर मात्र अंजली वहिनी आणि तारका वहिनींनी अनुमोदन दिले. पण तोवर मोहरा त्यांच्याकडेच वळला. तारका वहिनींच्या लग्नात त्यांच्या माहेरच्यांनी केलेल्या चुका इथपासून ते अगदी कालपरवापर्यंतचे प्रसंग आईंनी शोधून शोधून अन निवडून निवडून सांगीतले. एकजात सगळे चुपचाप झालेले होते. तोफखाना संपेचना! आईंचे म्हणणे असे होते की त्यांच्या धाकामुळे आजवर सगळ्या सुना अन मुले एकत्र नांदत होती. एक त्या आजारी काय पडल्या सगळे विभक्त काय व्हायला लागले अन पैशांवरून भांडायला काय लागले. तसेच, अजूनही त्यांच्यात धमक आहे सगळ्यांना एकत्र ठेवायची. पण आता त्यांनाच रस राहिलेला नाही त्यात! त्यामुळे त्या सांगत आहेत ती काळ्या दगडावरची रेघ! आणि आईंनी अंतीम निर्णय घेतला.

'कुमार दुकान चालवेल आणि त्या विषयावर आयुष्यात कुणीही काहीही बोलायचे नाही. घर शरदलाच मिळेल. त्याने ते विकावे नाहीतर भाड्याने द्यावे नाहीतर स्वतः येथे राहावे, त्यात कुणीही हस्तक्षेप करायचा नाही. राजू आणि वसंता या दोघांनी मिळून अंबरनाथचा प्लॉट विकावा आणि पैसे निम्मे निम्मे घ्यावेत. जे काही सोनेनाणे आहे त्याचे समान चार भाग होतील. घरातील सर्व वस्तू ज्याने ज्याने आणलेल्या आहेत त्याच्या त्याने घेऊन टाकाव्यात! कुणीही दुसर्‍याची वस्तू घेऊ नये. भाऊ काका किंवा इतर कोणी कॉमन नातेवाईक आले तर त्यांना ठेवून घेण्याची जबाबदारी शरदची आहे कारण हे घर त्याला मिळत आहे. आणि मला आणि बाबांना आम्ही मरेपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी कुमारची आहे. कुमारने तातडीने दुसर्‍या जागेत राहायला जावे व आम्हालाही तेथे घेऊन जावे. घरातील देवाचे जे काही अएस्ल ते मोठा मुलगा म्हणून कुमारच करेल, जसे नवरात्र वगैरे, मात्र त्याचा आर्थिक भार सर्वांनी समान सोसावा, वसंताला मूलबाळ नसल्यामुळे वेदाच्या लग्नात शरदने वसंतालाही कन्यादानाचा अधिकार द्यावा आणि इतर भावांनी वसंताच्या कुटुंबाकडे लक्ष पुरवत राहावे'

फतवा निघाला. येथे दाद मागायची सोय नव्हती. आपापल्या नवर्‍यांशी भांडणे करणे शक्य होते. पण दस्तुरखुद्द सासूला काहीही बोलणे कुणालाच शक्य नव्हते. कारण नवरे सगळे आईच्या शब्दाला शेवटचा शब्द मानणारे होते. ही नवर्‍यांची भूमिका योग्य होती की अयोग्य हा प्रश्नच नव्हता. ती अशी होती इतकेच!

आणि वसंता आणि गौरी घरी निघून आले. ज्या आईने आजवर सर्व सुनांना धाक दाखवून आणि मुलांच्या विचारांना कॉमन दिशा देऊन आपले घर टिकवून ठेवले होते त्याच माउलीने आज स्वतःचे शेवटचे दिवस आल्यानंतर आणि घरातील विसंवाद लक्षात घेऊन घर विभागण्याचा निर्णय घेतलेला होता जो बाबांना पूर्णतः मान्य होता.

दोनच दिवसांनी राजू आणि गीतावहिनी चक्क आठ दिवसांसाठी पुण्यात आले. त्यांना धक्काच बसला होता हे सगळे प्रकार ऐकून!

पुन्हा झालेल्या चर्चेतही आईंनीच प्रवक्त्याची भूमिका बजावल्यामुळे तेही गप्पच बसले. मात्र आई आणि बाबा आपल्या खोलीत निघून गेल्यानंतर सगळे वसंताच्या आता रिकाम्या असलेल्या खोलीत जमले. येथील आवाज खाली पोचणार नव्हता.

आणि राजूने विषयाला पुन्हा तोंड फोडले.

त्यातही अंजली वहिनी आणि तारका वहिनींनी गीता आणि गौरीला नवीन ठरवून आणि 'आज आलेल्या' ठरवून त्यांनी कसे कसे काय काय केले याचे पाढे वाचले. मात्र शेवटी दादाने निर्णय सांगीतला. आई म्हणाली तेच होणार!

आणि.... नेमका त्यावरच वाद पेटला.

अंजली वहिनींनी कडक भूमिका घेतली. वसंताभावजींना मूलबाळ नाही आणी ते आर्थिकदृष्ट्या कमी म्हणून जर सर्व कुटुंबाने त्यांच्याकडे लक्ष पुरवायचे असेल आणि सर्व धार्मिक विधी जर आम्हीच बघायचे असतील तर आईबाबांची संपूर्ण जबाबदारी तरी फक्त आमच्यावरच का?

आयुष्यात पहिल्यांदाच कुमार इतका जोरात ओरडला असेल! स्वतःच्याच बायकोवर! अंजली वहिनींना जोरात रडू आले. त्या पळत पळत स्वतःच्या खोलीत निघून गेल्या. मागोमाग गीता आणि गौरी त्यांच्या सांत्वनासाठी धावल्या. आणि तारकाने कुमारला सांगीतले. 'तुम्ही आईबाबांचे केलेत हे त्या आम्हाला आयुष्यभर ऐकवतील.. त्यापेक्षा आईबाबांना सहा सहा महिने आपण दोघेही ठेवू'!

या विचारावर कुणी नाही तर वसंताच भडकला. तो म्हणाला विभागणी करायला आई बाबा म्हणजे काय एखादी दौलत आहे का?

आणि परिणाम तिसराच झाला. एरवी मिश्कील बोलणार्‍या पण मुळात भडक डोक्याच्या असलेल्या अण्णाने वसंताला धारेवर धरले. अण्णांचे बोलणे सुरू होईपर्यंत अंजली वहिनींना गौरी आणि गीता वर घेऊन आलेल्या होत्या. आणि अण्णाने वसंताला झापताना गौरीनेही पाहिले. पण ती एक शब्द बोलली नाही की वसंताही एक अक्षर काढत नव्हता.

आणि शेवटी आई बाबा कुणाकडे किती राहणार यावर चक्क गंभीर चर्चा सुरू झाली. आणि कुणालाच कल्पना नसेल असा प्रकार झाला.

अचानक बाबा वर आले आणि म्हणाले...

"तुमच्या चौघात आम्ही दोघांनी कधी प्रेमाची विभागणी केली नाही बर कुमार! आमची मात्र विभागणी होतीय... तेव्हा मी असे निक्षून सांगतो की.. मी आणि आई जुन्याच घरात राहणार आहोत.. आमच्या पश्चात हे घर शरदला मिळेल... "

आणि नेमके नको तेच घडले.

अजिबात अक्षर उच्चारायला नको होते, पण तारकावहिनींनी एक संपूर्ण वाक्य उच्चारले...

"मग हे घर आमच्या नावावर करून काय फायदाय???"

भडकलेल्या अण्णाने तारकालाही झापले. कुमारदादाही तारकाला खूप बोलला. पण बाबांचा चेहरा कधी नव्हे असा गंभीर झालेला होता. आणि त्यांना अण्णा समजावून सांगू लागला. प्रश्न तुमच्या विभागणीचा नाही. प्रश्न खर्चाचाही नाही. प्रत्येक मुलाला असे वाटणार नाही का की तुम्ही त्याच्याकडे राहावेत?

या मुलाम्याचा उपयोग होण्याची वेळ गेलेली होती. मनात अत्यंत अपराधी भावना घेऊन सगळे बाबांच्या अंतीम निर्णयाची वाट पाहात होते.

आणि कुणालाच कल्पना नसताना वसंता अचानक बोलला...

"बाबा.. तुम्ही दोघेही माझ्याकडे राहणार आहात... मला बाकी काहीही माहीत नाही... आत्ताच चला.."

गौरी थक्क होऊन आणि आदराने आपल्या नवर्‍याकडे बघत असतानाच अंजली वहिनी म्हणाल्या...

"इतकी वेळ आलेली नाहीये मोठ्या भावांवर.. की अगदी तुम्ही सांभाळायला हवे आहेत आई बाबांना.."

"बाSSSSSSSSSस.... बास करा आताSSSSSS"

वसंताचा भेसूर आणि बेसुमार चिडलेला चेहरा पाहून ते घरही आज अवाक झाले होते.

"तुम्ही दोघींनी एकमेकींशी वाद घातल्यामुळे ही वेळ आली आहे आज आपल्या घरावर...की आपल्याच आई बापांची विभागणी करावी लागतीय... आणि हा दादा... अन हा अण्णा.. तुमचे दोघींचे दिव्य विचार ऐकूनही शांत बसलेत.. मला ते जमणार नाही... तुमच्या फालतू वादांमुळे आई बाबांना मनस्ताप झालेला मी सहन करनार नाही.. आणि आता एक शब्द कुणी बोलायचा नाही... जे मी म्हणतो तेच होणार आहे... आई आणि बाबा माझ्याकडे राहणार म्हणजे राहणार... कायमस्वरुपी..."

ताडताड चालत बाहेर गेलेल्या वसंताचा तो आविर्भाव फार फार लहानपणी कधीतरी या तीन भावांनी पाहिलेला होता. त्याची आज आठवण झाली त्यांना! असेच खेळताना तो कशावरून तरी चिडुन खूप जोरात बोलला होता सगळ्यांना आणि सगळे अवाकच झालेले होते. तसाच तो आजही वागला होता. गौरीला हेच समजत नव्हते की तिने वसंताच्या मागे जावे की येथेच थांबावे. ती कुमारदादाकडे बघत बसली होती.

आणि हळूहळू सगळे मान खाली घालून खाली जायला निघणार तेवढ्यात...

... खालून वसंताची हाक ऐकू आली... जोरदार...

"बाबा... खाली या.. रिक्षा आलीय..."

पाचव्या मिनिटाला...

... जवळपास पासष्टीचे रामकृष्ण पटवर्धन आणि जवळपास साठीच्या कर्करोगग्रस्त अरुणा पटवर्धन... रिक्षेत बसून.. आपल्या सर्वात लहान चिरंजीवांच्या घरी निघालेले होते...

आणि मागे राहिलेल्या तीन जोडप्यांपैकी...

शरद पटवर्धन उर्फ अण्णा आपल्या थोरल्या भावाच्या खांद्यावर डोके ठेवून हमसाहमशी रडत म्हणत होते..

"दादा... आई बाबा वसंताकडे गेले रे... गेले घरातून..."

कुमारदादा मात्र जमीनीकडे पाहात जास्तीतजास्त किती अपराधी वाटू शकते याचा अनुभव घेत होता. गीता वहिनी राजूपाशी बसून नुसतीच बाकीच्यांकडे पाहात होती. राजू बोटांचा चाळा करत झालेल्या प्रकारात आपण काय चुकलो हे तपासत होता.

आणि अंजली वहिनी तारका वहिनींना म्हणत होत्या...

"तारका... मी सगळ्यात थोरली... पण आज... सगळ्यात लहान आहे असं वाटतंय गं...मीच.. मीच घरभेदी आहे.. "

तारका वहिनींना अंजली वहिनींच्या गळ्यात पडुन रडण्याशिवाय पर्यात काय उरला होता????

गुलमोहर: 

Sad

पुन्यामधे अंबरनाथ कुथुन आले???

अंबरनाथचा प्लॉट विकावा आणि पैसे निम्मे निम्मे घ्यावेत/.........................

yah baat kuch jami nahi... person living in pune .. buying flat in Ambernath... pure madeness. only do by MH12 people only

मस्तच.....
खुप कळवळुन आज... अस नको होत व्हायला...पण काय करणार हे अस होणारच आणि होतच असत घराघरात(अपवाद अस्तात नाहि अस नाहि).
Sad

कादंबरीपेक्षा प्रतिसाद मनोरंजक असण्याची ही पहिलीच वेळ आली.

सर्वांचा आभारी आहे.

-'बेफिकीर'!

vinayakparanjpe | 8 February, 2011 - 00:58
पुन्यामधे अंबरनाथ कुथुन आले???

अंबरनाथचा प्लॉट विकावा आणि पैसे निम्मे निम्मे घ्यावेत/.........................

>>>>
पुण्यात आले असे कुठे लिहिले आहे! प्लॉट कुठेही घेता येतो, लक्श ठेवावे लागते.
भाग छान!

छान भाग! घर तुटतांना बघून वाईट तर वाटलंच...पण सगळ्यात समजुतदार आणि संवेदनक्षम अशा मुलाकडे आणि सुनेकडे आईबाबा जातायत, हा टर्न खुपच छान ... आवडला हा भाग! Happy

लिहीत आहे.

वीस एक मिनिटे लागावीत असा अंदाज आहे.

धन्यवाद सर्व प्रतिसादकांचे!

-'बेफिकीर'!