गोकर्ण महाबळेश्वर-मुरूडेश्वर

Submitted by डॅफोडिल्स on 29 January, 2011 - 02:11

मुरुडेश्वरची भव्य दिव्य शंकराची मूर्ती

प्रत्येक ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काहिनाकाही इतीहास असतो त्या मागे काहीतरी कथा दंतकथा असते. मुरूडेश्वरच्या मोठ्या शंकराच्या पुढे रावण एका गुराख्याच्या छोट्या पोराला शंकराची पिंड धरायला सांगताना बघुनच ह्या मुरुडेश्वर विषयी, गोकर्ण विषयी कुतुहल होते. ही मोठ्ठ्या शंकराची मूर्ती कंडुकागिरी नावाच्या डोंगरावर आहे तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहेत तिथे असलेल्या कृत्रीम मानवनिर्मीत गुहेत ही कथा चित्ररुपात साकारलीये.

अमरत्व मिळवण्यासाठी अनेक देवांनी आत्मलिंगाची पूजा केली होती. ते आत्मलिंग शंकरांकडे होते. लंकाधीश रावण हा निस्सिम शिवभक्त होता. नेहमी तो कैलासावर जाउन तप:श्चर्या करीत असे. आपल्याला हवे ते मिळावण्यासाठी त्याने कित्येकदा घनघोर तपस्या करुन शिवशंभूंना प्रसन्न करुन घेतले होते. एकदा रावणाने अमरत्व मिळविण्याकरीता शंकरांचे आत्मलिंग मिळाअवे म्हणून खूप खूप कठोर तपःश्चर्या केली. "ओम नमः शिवाय !" चा अहोरात्र जप केला. एका पायावर उभे राहून त्याची तपःश्चर्या सुरु होती.

रावण एका पायावर तपःश्चर्या करताना

लंकाधिश रावण हा महाबली होता. त्याने कैलासालाच उचलून धरले. शिवशंभूंच्या नावाचा जप चालूच होता.

रावण कैलास उचलताना

वर्षोनुवर्षे लोटली. शिवशंभू काही प्रसन्न झाले नाहीत. मग त्या दशाननाने आपले एकेक मस्तक शिवचरणी अर्पण करावयास सुरुवात केली.

रावण मस्तक अर्पण करताना

शिवशंभू भोळे सांब त्याच्या ह्या मायावी आहूतीला भुलले आणि रावणाला प्रसन्न झाले.
म्हणाले, "सांग रावणा काय हवे आहे ? कशासाठी एवढी धनघोर तपःश्चर्या ?"

त्यावर रावणाने त्यांना सांगितले, "हे प्रभु तुम्ही मला तुमचे आत्मलिंग द्या ! मी ते आत्मलिंग माझ्या लंकेत स्थापित करुन मंदिर बांधेन, आणि असा वर द्या की जेव्हा केव्हा महाप्रलय येईल, सर्व जग पाण्यात बुडून जगाचा अंत होईल, तेव्हा हे लिंग माझे आणि माझ्या राज्ज्याचे रक्षण करेल. जिथे ह्याचे वास्तव्य असेल ती धरा जलमय होणार नाही. "

शंकरांनी त्याला आत्मलिंग दिले. म्हणाले, "तथास्तु ! पण सांभाळून जा, हे महाबली आत्मलिंग आहे तु जिथे हे आत्मलिंग ठेवशिल तिथेच हे घट्ट चिकटून राहील. दोन्ही हातांनी निट धर.. लंकेशिवाय कुठेही मध्ये ठेउ नकोस ! जर ठेवलेस तर मी काहीही करू शकणार नाही."

शंकर आत्मलिंग देताना

रावण आत्मलिंग घेउन लंकेला जायला निघाला. आधीच रावणाने आपल्या शक्तिने सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते. रावणाने आत्मलिंग मिळवले, हे जेव्हा सर्व देवांना समजले तेव्हा सगळ्या देवांनी त्राही त्राही म्हणत जगत्पित्या ब्रह्मदेवांकडे मदतीसाठी धाव घेतली. ब्रह्मदेवाने सांगितले,"निश्चींत रहा ! विघ्नहर्ता गणेशच तुम्हाला मदत करेल."

रावण पश्चीमी समुद्रावरून लंकेकडे मार्गस्थ होत असताना. मध्यान्हपूर्वच ब्रह्मदेवांनी ब्रह्मास्त्र टाकून सूर्य झाकला. रावणाला वाटले संध्याकाळ झाली. आता संध्येची वेळ झाली. पूजा करायला हवी. आत्मलिंग कुठे ठेवायचे नाही. मग आता काय करु ? ह्या विचारात रावण असताना अचानक गणपती एक गुराख्याचा पोराच्या रुपात तिथे प्रकटले.

गुराख्याच्या रुपातल्या गणेशाला आत्मलिंग धरायला सांगताना

त्या बाल गुराख्याला रावण म्हणाला, "ए मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे, मी माझी संध्या आटोपून लवकरच येतो, तो पर्यंत तू ही शंकरांची पिंड हातात घट्ट धर. अजिबात खाली ठेउ नकोस. "
गणेशाने ती पिंड हात धरत म्हटले, "ही शंकराची पिंड तर फारच जड आहे, मला जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ मी हातात धरेन. तुम्हाला मी तीन हाका मारेन तो पर्यंत तुम्ही या, नाहीच शक्य झाले तर मी खाली ठेवेन." रावणाला हे मान्य झाले. तो संध्येसाठी गेला.

पुढे ठरल्या प्रमाणे ब्रह्माने ब्रह्मास्त्र काढून घेतले. तिन्हीसांज झालीच नव्ह्ती. गणेशाने पटापट रावणाला तीन हाका मारल्या, रावण गुराख्याच्या रुपातल्या गणेशापर्यंत पोहोचायच्या आत गणपतींनी आत्मलिंग जमिनिवर ठेउन दिले.

रावण गुराख्याच्या रुपातल्या गणेशाला मारताना

गुराख्याच्या पोराला शंकराची पिंड खाली ठेवताना बघुन रावणाला शिवशंकरांचे बोल आठवले, आता ते आत्मलिंग इथेच चिकटून रहाणार म्हणून त्याचा क्रोधाग्नी भडकला. रावण त्या गुराख्याच्या पोराला मारू लागला. इतक्यात तो मुलगा गायब होउन गणपती तिथे मूर्तीरूपात प्रकट झाले.

रावण आत्मलिंग उचलताना गोकर्ण

रावण भयानक क्रोधीत झाला होता. शंकरांचे आत्मलिंग जरी बलशाली होते तरी रावणही महाबलवान होता. रावणाने ते जमिनिवर चिकटलेले आत्मलिंग उचलण्याचे महत्प्रयास केले. पण ते त्याच्या शक्तीपुढे फोल ठरले. परंतू त्याने केलेल्या ओढाओढीत त्या पिंडीचा.. आत्मलिंगाचा आकार बदलून ते लिंग गाईच्या कानाच्या आकारासारखे दिसू लागले. पुढे त्याला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव प्राप्त झाले. तेच सध्याचे गोकर्ण महाबळेश्वराचे मंदीर.

असंही सांगीतलं जातं की रावणाने खूप जोर लाउन ते आत्मलिंग ओढायचा प्रयत्न केला त्यात त्याचे काही तुकडे काही अंश त्याच्या हाती आले. ते काही ठिकाणी विखुरले व तिथेही कालांतराने शिवमंदिरे स्थापन झाली. पैकी त्या लिंगाचा शिरोभाग उडूपी जवळच्या सुरथकल भागात पडला तिथे सदाशिव मंदीर बनले. मग रावणाने ते लिंग ज्या पेटीतून आणले ती जिथे टाकली तो भाग.. म्हणजे सज्जेश्वर, त्या पेटीचे झाकण टाकले तिथे आहे .. गुणेश्वर आणखी दहा बारा मैलांवरचा धारेश्वर. आणि सर्वात शेवटी त्याने ज्या वस्त्रातून झाकून ते आत्मलिंग आणले ते वस्त्र ते कापड त्याने कंडुकागिरी टेकडिवर टाकले.. तिथला हा मुरुडेश्वर.

गुलमोहर: 

सही .. Happy मंदिराचे फोटो कुठे आहेत ? या मंदिराचे आवार तेथील स्वच्छतेमुळे मला खुप भावते .. येथिल सर्व परिसर कुणा शेट्टी नामक उद्योजकाने विकसित केला आहे .. पुणेस्थित प्रती बालाजी मंदिराप्रमाणे .. येथिल पाण्यात उभारलेला कॅफेटरिया देखिल मला आवडतो .. Happy

मस्त आहे. मी झारखंडमधल्या सुवर्णरेखा नदीविषयी आणि एका उत्तरेतल्या शंकर मंदीराविषयीही अशाच आशयाची एक कथा ऐकली होती.
डॅफो, फोटो सही आलेत. Happy