प्रकरण इतके पराकोटीला जाईल असे वसंताला मुळीच वाटले नव्हते. राजूदादाची प्रकर्षाने गरज भासत असतानाच त्याचेही पत्र असे काही आले की बोलायला वावच उरला नाही.
राजू आणि गीता कानपूरला निघून गेल्याला आता चार महिने झालेले होते. बिगुलची अनुपस्थिती पदोपदी जाणवत असल्यामुळे मुळातच एक सुनसानपणा आलेला होता. त्यातच अंजली आणि तारकावर सगळ्या घराची जबाबदारी पडल्यामुळे त्या दोघी वैतागलेल्या होत्या. ते त्यांच्या सुस्कार्यांमधून, आठ्यांमधून आणि नाक उडवण्यातून सहज समजत होते सगळ्यांना! पण उगाच भांडणे नकोत म्हणून आई काही बोलत नव्हत्या.
किती विचित्र असते माणसाचे मन! जेव्हा राजूचे लग्नही झालेले नव्हते तेव्हा याच दोघी घरातले सगळे करायच्याच! पण गीता आली आणि काही वर्षांनी कानपूरला गेली तसे मात्र यांना जाणवू लागले. की ते दोघे राजा राणी जबाबदारी न घेता कानपूरला मस्त राहणार आणि आपले संसार हे असेच सदाशिव पेठेत राब राब राबण्यात जाणार!
या भावनेचा आणि एकमेकांमध्ये केलेल्या गॉसिपिंगचा परिणाम स्पष्ट-अस्पष्टपणे त्यांच्या देहबोलीत दिसू लागलेला सगळ्यांना जाणवत होता. काही वेळा तर उमेश आणि वेदालाही! पण आत्ता या दोघींना दुखावणे किंवा समजावून सांगणे म्हणजे नवीन भांडणे निर्माण करणे हे सगळ्यांना समजत होते.
सामान्य माणसांच्या वैवाहिक आयुष्यातील 'भावनिक टप्पे' फार गहन आणि अभ्यास करण्यासारखे असतात.
नवीन लग्न होते तेव्हा सून आपले माहेर, आपले सर्व काही सोडून एका पूर्णपणे नवीन घरात प्रवेश करून आलेली असते. प्रेमविवाह असेल किंवा लग्न जमल्यापासून दोघे बाहेर काही वेळा फिरलेले वगैरे असतील तर निदान नवर्याशी तरी व्यवस्थित ओळख असते. पण तेही नसले तर नवर्यासकट सगळेच नवीन आणि अनोळखी!
त्यात पुन्हा एकत्र कुटुंबात येताना अनेक प्रश्न! जावा, दीर हे सासू सासर्यांइतकेच महत्वाचे असतात. त्यांच्या अपेक्षा, त्यांनी आजवर केलेल्या गोष्टी आणि नवीन सुनेने काय करावे याबाबत त्यांचे आधीच ठरलेले हेतू!
बायकांचे एक अजब रसायन असलेले मन असावे बहुधा! जी सासू काही दशकांपुर्वी स्वतः याच भूमिकेतून गेलेली असते तिला सून आली की मात्र तिची मानसिकता पूर्णतः बदलू शकतेही! बदलतेच असे नसेलही, पण बहुतांशी बदलते. हे असे का याला उत्तर नसावे. त्यात एक अहं असतो. मी आजवर या घरात तीस चाळीस वर्षे काढलेली आहेत आणि आता हा माझा संसार आहे. तू आज आली आहेस तेव्हा मी जसे सांगते तसे वागणे हेच तुझे काम आहे अशी काहीशी मानसिकता!
सून हा जणू एखादा ऑब्जेक्ट असावा अशा पद्धतीने तिच्याकडून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. नवर्याच्या दृष्टीने ती सतत हसतमुख, जी परिस्थिती असेल ती सोसणारी, 'हे जसे मला माझे घर वाटते' तसे तिलाही वाटायलाच पाहिजे अशा अपेक्षेची बळी ठरण्यास सर्वाधिक पात्र असणारी अशी असते. त्याचवेळेस सासूला ती अधिकाधिक ताब्यात असावी असे वाटते. तिची कामे करण्याची पद्धत, साध्या साध्या गोष्टींमधल्या सवयी या सर्व चर्चेचा विषय बनतात.
'ही आपल्यासारखी नाही' हे दाखवण्याच्या संधी शोधल्या जातात. मुळातच त्या घरात कित्येक वर्षे असल्याने तसे असणार्यांना नवीन सुनेची 'सुरुवातीला गोड गोड' व 'नंतर काहीश्या तीव्र व बोचर्या' भाषेत थट्टा करण्याची इच्छा असते.
हेच सगळे होत असताना त्या सुनेची घालमेल ती फक्त तिच्या नवर्याला सांगत असते. नवरा त्याच घरातील संस्कृतीत लहानाचा मोठा झालेला असल्याने त्याच्या दृष्टीने घरातल्यांचे वागणे अत्यंत समर्थनीय असू शकते.
सुरुवातीच्या टप्यात नवरा बायकोच्या तक्रारींकडे दुर्लक्ष तरी करतो किंवा तिला समजावण्यात, तिने कसे बदलायला हवे हे सांगण्यात एनर्जी व बुद्धी खर्च करतो.
मूल होणे हा एक महत्वाचा टप्पा! सुरुवातीला त्या बातमीने सर्वांना आनंद होणे, मग बाळंतपण कोण करणार यावरून मतप्रदर्शन, म्हणजे माहेरी की सासरीच, बाळंतपणातही आम्हाला घरकामात काही सवलती नव्हत्या हे ज्येष्ठ स्त्रियांनी कुजुबुजत किंवा स्पष्टपणे सांगणे, त्यानंतर मुलाचा जन्म झाल्यावरचा आनंदीआनंद, नंतर मुलाचे लाड, मुलगा / मुलगी थोडा मोठा / मोठी झाल्यानंतर प्रसंगाप्रसंगातून घरातील इतरांच्या मुलांबरोबर मनात आपोआप केली जाणारी तुलना, 'त्याला घेतले - याला घेतले नाही' स्वरुपाचे संवाद वगैरेमधून नवर्याच्या कानावर पुढील गोष्टी जातात. तोपर्यंत नवराही काहीसा वेगळा विचार करायला लागलेला असू शकतो.
अजून एखाद दोन वर्षांनी मात्र अशी परिस्थिती होते की ती सून घरात बर्यापैकी जुनी झालेली असते व इतर काही ज्येष्ठ हे काहीसे 'आउटडेटेड' जरी नाही म्हंटले तरी काहीसे कमी महत्वाचे झालेले असतात. अशा वेळेस नाही म्हंटले तरी नवरा बराचसा बायकोच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतो. प्रसंगाप्रसंगात त्यालाही जाणवते की आपल्याच पत्नीला अधिक पडत आहे, इतर जण मुद्दाम तिच्याशी वाकडे घेत आहेत वगैरे!
या टप्यावर नवरा व बायको यांच्यात जरी गोडवा असला तरी घरात एक भिंत तयार व्हायला लागते. आणि याचा परिणाम म्हणजे शेवटी घर दुभंगणे! एकत्र कुटुंब पद्धती दुभंगणे!
हे होणे अथवा न होणे हे कित्येक घटकांवर अवलंबून असते. घरातील लोकांचे परस्परांवर असलेले प्रेम जर अती सशक्त असले तर हे होत नाही. अशक्त असले तर सहज होऊ शकते.
आणि दादा आणि अण्णा यांच्याबाबतीत नेमके हेच घडत होते आत्ता!
प्रत्यक्ष खटके उडत नसले तरीही दोघांनाही आईचा काहीसा राग येऊ लागला होता. वेदा आता चौथीत गेली असली तरी तशी लहानच म्हणायला पाहिजे. कालच तो प्रसंग घडला.
उग्र वास येतो या कारणास्तव वेदा कोबीची भाजी खायची नाही. पण ते लक्षातच नसल्यामुळे अंजलीने पटकन तिच्या पानात कोबीची भाजी वाढली. वेदा एकदम ओरडली..
"ए काय गं काकू?? मला नाही आवडत ही भाजी... माहीत नाही का??"
वास्तविक एरवी सगळेच सगळ्यांशी मोकळेपणाने वागायचे. पण आत्ताचा संदर्भ निराळा होता. अंजली ही सगळ्यात मोठी काकू होती. लहान असली तरी वेदाने आता मोठ्या काकूला असे एकदम बोलायचे नाही हा एरवी मनात येऊ शकणारा विचार तारकाच्या मनात आज नाही आला. तिने वेदाच्या पानातील भाजी स्वतःच्या हाताने काढून घ्यायला सुरुवात करतानाच आई, म्हणजे वेदाची आजी म्हणाली..
"सगळं खायला शिकायचं.. आणि ओरडायचं नाही मोठ्या माणसांवर.."
झालं! इतकं कारण पुरेसं होतं!
तारकाच्या मनातील अनेक रागांचा स्फोट नेमका आत्ताच झाला.
तारका - लहान मुलांना काय शिकवायचंय आता.. मोठ्यांनाच शिकवायची वेळ आलीय..
आई - म्हणजे काय??
तारका - वहिनींना काय माहीत नाही ही कोबीची भाजी खात नाही ते?? मुद्दाम...
'मुद्दाम करतात' मधील 'करतात' हा शब्द मात्र तारकाच्या तोंडून बाहेर पडला नाही. नाही म्हंटले तरी तिला हेही जाणवलेच की ती असे म्हणाल्यास तो पराचा कावळा होईल. पण 'मुद्दाम' या शब्दाने व्हायचे ते झालेच!
एक तर अण्णा एकदम 'तारकाSSSSS' म्हणून ओरडला....
... त्यातच अंजली वहिनीला कसे गप्प बसवेल??
अंजली - मी मुद्दाम करतीय?? भाजी आणतेस तूच.. इतकं मर मर मरतीय... जरा चुकून भाजी काय वाढली गेली लगेच पार मुद्दाम बिद्दाम बोलून मोकळी...
दादा - अंजली.. तू शांत राहा...
अंजली - का म्हणून?? तुम्ही मोठे म्हणून दुकान तुम्हीच सांभाळायचेत.. हे करणार मोठ्या मोठ्या नोकर्या.. याम्च्या होणार बदल्या अन प्रमोशन्स.. आणि मी घरातच राबणार कारण तुम्ही थोरले... कारण दुकान ही तुमची जबाबदारी..
दादा - अंजलीSSSS .. शांत राहा.. बोलू नकोस..
अंजली - किती वर्षं अजून बोलायचं नाहीये मी?? एकदाच सांगा...
तारका - दुकान दुकान दुकान.. दुकान ही जबाबदारी कधीपासून झाली??? दुकानाचं उत्पन्न खरे तर..
अंजली - काय?? काय खरे तर?? आं?? खरे तर वडिलोपार्जित... हेच म्हणायचंय ना??
तारका - चूक काय आहे त्यात??
अण्णा - तारकाSSS... एक शब्द बोलायचा नाही आता..
बाबा - उमेश.. तू अन वेदा तुमचे पान घेऊन बाहेरच्या खोलीत जा...
आजोबांचे वाक्य ऐकताच दोघे पटकन बाहेर निघून गेले.
बाबा - अंजली... तारका.. हे काय चाललंय तुमचं दोघींचं काही दिवसापासून.. ?? मी बघतोय.. मला काही कळत नाही असे समजू नका.. लहान मुलांसमोर सरळ वाद घालता तुम्ही? काही परिपक्वता आहे की नाही?
खुद्द सासरेच तापलेले दिसल्यावर दोघी चूपचाप झलेल्या असल्या तरी आई कशाला गप्प बसतील??
आई - कुमारकडे दुकान आहे कारण शरद आणि राजू शिकत होते तेव्हा शिक्षणाला पैसा उरलेला नव्हता.. ह्यांनी बाहेरची कामे घेतली अन कुमार दुकान पाहू लागला.. तुम्ही दोघी आलात तेव्हा सगळे स्थिरसावर झालेले होते म्हणून आज तुम्ही म्हणता दादाकडे दुकान का म्हणून?? पण शरदचे तर शिक्षणही झाले नसते कुमारने दुकान पाहिले नसते तर... पुन्हा मला घरात हा वाद नकोय...
तारका - इथे कुणाला वाद हवाय??
एकंदर रागरंग पाहून वसंताही आपले पान घेऊन मधल्या खोलीत निघून गेला.
आई - बोलू नकोस एक शब्द.. हल्ली काही राहिलंच नाही आहे मोठं लहान...
तारका - आता काय लहान मोठं बघायचंय... तुम्ही थांबा हो.. मला बोलू द्यात... काय चुकीचंय माझं?? गीता गेली निघून नवर्याबरोबर... ह्या थोरल्या म्हणून मला सूचना करणार.. आणि मी आपली आहेच राबायला...
अंजली - तू राबायला?? आणि मी घोरते की काय?? वेदा शाळेतून येते तेव्हा यांची वामकुक्षी चालू असते.. चहा आणि पोळी मी करून घालायची..
दादा - अंजली.. तू आता आणखीन बोललीस तर मी पानावरून उठेन..
अंजली - तुम्ही नेहमी मलाच बोलता..
अंजली वहिनींच्या डोळ्यांना धार लागलेली पाहून दादाला वाईट वाटले खरे, पण इतर कुणालाही त्याचे काहीही वाटले नाही. 'इगो'मुळे निर्माण होणारे प्रॉब्लेम्स फार मोठे असतात हे पुन्हा एकदा सिद्ध होत राहीले. त्या दिवशी जेवताना झालेल्या वादाचे दोन मोठे परिणाम म्हणजे...
मुले झोपी गेल्यानंतर सर्वांसमोर तारकावहिनी अण्णांना म्हणाल्या...
"आपण वेगळे राहायचेच आता"
हे म्हणणे अण्णानेही चक्क सर्वांसमोर मान्य केले.
आणि आई आणि बाबा कळवळीने वसंताला म्हणाले...
"तू लग्न कर रे बाबा.. उद्या असं नको व्हायला की लग्न न केलेल्या दिराचे आम्हाला करावे लागते म्हणून आमच्याच सुना आम्हालाच बोलतील..."
आणि सर्व गोष्टी पराकोटीला जातील असे वाक्य बोलला वसंता...
"गौरीकडच्यांना अपघात होऊन वर्ष होत आलं.. मी... मी... गौरीला विचारणार आहे... लग्न करतेस का म्हणून???"
निस्तब्ध! संपूर्ण घर निस्तब्ध झालेलं होतं.
गौरी हा फॅक्टरच कुणाच्या डोक्यात नव्हता.
कित्येक सेकंद त्या वाक्याचा अर्थच डोक्यात घुसू शकला नाही. त्या एका विषयावर मात्र सगळेच अचानक एक झाले. ही एकी आत्तापर्यंतच्या वादात का दिसत नव्हती ते वसंताला समजले नाही. आता गौरीचा विषय निघाल्यावर मात्र सगळे एकदम एक झाले.
तारका - गौरी???????? अहो काय बोलताय भावजी??
वसंता - का???
डोळे पुसत अत्यंत तीव्रपणे अंजली वहिनी म्हणाल्या..
अंजली - तुम्हाला कळतंय का काय बोलताय ते???
वसंता - काय झालं काय??
अंजली - काय झालं म्हणजे?? ती पांढर्या कपाळाची मुलगी?? अवलक्षणी???
आता मात्र वसंताही चिडला. काहीसा तीव्रपणे म्हणाला..
वसंता - काय बोलताय वहिनी?? ती अवलक्षणी?? तिच्या नवर्याला अॅक्सिडेन्ट झाला म्हणजे गौरी अवलक्षणी???
बाबा - वसंता.. हा विचार डोक्यातून काढून टाक..
वसंता - का??
आई - वसंता ... का काय का?? डोकं आहे की नाही तुला??? आणि तुमचं दोघांचं ठरलंय???
वसंता - तिला अजून विचारलं नाहीये मी...
आई - अजिबात विचारायचं नाही...
वसंता - का??
आई - आणि का म्हणून विचारायचं नाही..
वसंता - का पण??
आई - का पण काय का पण?? ती एक विधवा.. दोन मुलं झालीवती तिला.. सगळे गेले त्या अपघातात... अशी मुलगी करून आणायची घरी?? तिला कडक मंगळ आहे..
वसंता - माझा तसला काही विश्वास नाही.. आणि ते झाले ते झाले..
आई - अरे पण तुला हजार मुली मिळतील लग्न न झालेल्या.. कुमारी....
वसंता - मी केलं तर गौरीशी लग्न करणार नाही तर नाही करणार...
तारका - ती अवलक्षणी मुलगी या घरात आणायची नाही....
वसंता - वहिनी.. अवलक्षणी अवलक्षणी म्हणू नका पुन्हा.. आणि या घरात आणायची नाही म्हणजे काय?? माझ्या आई वडिलांचं घर आहे हे.... तुम्ही कोण बोलणार्या??
अण्णा - वसंताSSSSS
वसंता - का?? त्या बोललेल्या चालतात का? माझ्या बायकोबद्दल???
दादा - शरद तू थांब... वसंता.. अरे हे खुळ कधी घेतलंस तू डोक्यात तुझ्या??
वसंता - यात खूळ काय आहे?? मला ती आवडते...
दादा - अरे पण.. आवडते म्हणजे... तेव्हापासून आवडते की ... आत्ता??
वसंताने मान खाली घातली.
आई - काय रे?? काय विचारतोय कुमार...
वसंता - मला... तेव्हापासूनच आवडते गौरी... पण.. माझ्या लग्नाचा विषय निघणं तेव्हा शक्य नव्हतं.. घराच्या डागडुजीसाठी शिक्षण सोडावं लागलं मला.. मिळेल ती नोकरी घेतल्यावर माझं लग्न कसं होणार??
सगळेच अवाक होऊन वसंताकडे पाहात होते.
मनातल्या मनात खजिलही झालेले होते. आजवर असेच चित्र उभे करण्यात येत होते की वसंताभावजी लग्न करायला तयार नाहीत. पण त्यांना मिळू शकणारी मुलगी ही त्यांच्या पगारामुळे व कमी शिक्षणामुळे सर्वसामान्य परिस्थितीतील असणार असे त्यांना वाटत आहे आणि तसे वाटण्यास 'घराच्या कामासाठी त्यांना शिक्षण सोडायला लावणारे' आपणच आहोत हे आज समजत होते.
वसंताला आपण कधी विचारलंच नाही की 'तुला आता शिकायचं आहे का'? कायम चितळ्यांकडे नोकरी करतो म्हणून थट्टा करायचो. पण त्याला शिकायचे असेल हे आपल्या मनातच आले नाही याचे आत्ता दादा आणि अण्णाला वाईट वाटत होते. हेही समजत होते की सर्वात कमी उत्पन्न वसंताचेच आहे आणि ते तसे असण्यासही आपण अप्रत्यक्षरीत्या जबाबदार आहोत. वसंता स्वतःच्या जीवावर संसार उभा करू शकेलही पण तो संसार अगदीच बेताच्या परिस्थितीचा असेल हेही आजच समजत होते.
आता शिक्षण सुरू करण्यात अर्थही राहिलेला नव्हता.
दादा - तू... तेव्हा बोलला असतास तर??
वसंताने खट्टकन दादाकडे तीव्रपणे पाहिले. कधी नव्हे ती आज दादाची मान खाली गेली, अपराधी भावनेमुळे!
दादानेच सर्वांसमोर शब्द दिलेला होता. घराचे काम होऊन वर्ष झाले की वसंताने नोकरी सोडावी आणि पुन्हा कॉलेज जॉईन करावे. तो मुद्दा सर्वांनी उचलून धरला होता. त्याही वेळेस एकटी गीतावहिनीच अशी होती जी म्हणत होती की शिक्षण थांबवू नका. आत्ता थोडासा आर्थिक भार जास्त पडेल बाकीच्यांवर, पण एकदा शिक्षण सोडले की नंतर पुन्हा उत्साह राहात नाही.
वसंता - मी कसा बोलणार दादा? मला तेव्हा मिळायचे आठशे रुपये..
वसंताच्या या वाक्यात काय उपरोध भरलेला आहे हे सर्वांना समजत होते. आणि हा उपरोध आपल्या नवर्याला उद्देशून आहे हे अंजलीवहिनींना सहन होणे शक्यही नव्हते.
अंजली - यांनी काही कमी सोसलेले नाहीये..
वसंता - कमी कुणीच सोसले नाहीये वहिनी.. पण आत्ता प्रश्न माझा चालला आहे.. माझ्या लग्नाचा.. आणि तोही प्रश्न इतक्या गंभीरपणे आत्ताच निघण्याचे कारण हे आहे की तुम्ही दोघी एकमेकींबरोबर भांडता.. तुम्ही आनंदाने राहिला असतात दोघी तर हा प्रश्नच आत्ता निघाला नसता..
वसंता आज अगदी वर्मावर बोट ठेवत होता. लहान म्हणून दुर्लक्ष करावे इतका तो लहान नव्हता. उलट शिक्षण सोडून त्याने घराच्या दुरुस्तीच्या कामात सहभाग घेतलेला होता. आयुष्यातील एका मोठ्या आघाडीवर त्याने स्वतःहून माघार घेतली होती इतरांसाठी! हा त्याग लहानसहान नव्हता.
पण पुन्हा इगो! वसंताभावजींच्या लग्नाचा प्रश्न आपल्या वागणुकीमुळे निघतो आहे हे पिक्चर तयार होणे अंजली आणि तारका वहिनींना कधीच मान्य होणे शक्य नव्हते.
तारका - आमच्या वादावादीमुळे नाही निघत आहे प्रश्न.. तुमच्याच भल्यासाठी म्हणतायत सगळे.. आणि इतकी वर्षे आम्ही दोघी बघतोच आहोत की घर??
वसंता - नक्कीच..
तारका - आणि आधी हा प्रश्न गंभीरपणे निघालेला नव्हता असे वाटत होते का तुम्हाला? तुम्हीच गंभीर नसायचात.. आज अगदी सांगताय गौरीचे नाव...
वसंता - मी गंभीर नव्हतो हे खरं आहे वहिनी... पण मी गंभीर झालो असतो तरी माझे लग्न गौरीशी होऊ शकले नसते... माझं शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती मधे आलीच असती..
दादा - एक मिनिट.. तू सारखं शिक्षण मधे काढू नकोस.... तुला शिकायचंय का? मी आणि शरद अजूनही शिकवू..
वसंता - दादा... आता मीही स्वतः खर्च करून शिक्षण घेऊ शकेनच की.. पण आता काय शिकायचं??
दादा - प्रश्न पैशाचा नाही आहे.. तूही खर्च करशील हे माहीत आहे.. पण मी असं म्हणतोय की आम्ही अजूनही तुझ्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार आहोत..
आई - आधी ते गौरीचं काय डोक्यात खूळ घेतलंयस??
वसंताचा आवाज काहीसा चढला.
वसंता - खूळ खूळ काय चाललंय? सरळ लग्न करतोय मी.. आणि अजून तिला विचारलेलंही नाही..ती हो म्हणतीय की नाही याच्यावर अवलंबून आहे..
आई - अरे पण तिच्याच काय मागे लागलायस?? तिचं काय झालंय ते बघतोयस ना??
वसंता - काय झालंय?? नवरा अन दोन मुलं मेली.. एक दुर्दैवी अपघात होता तो.. आता ती सावरलीय जरा.. तिलाही पुढे आयुष्य आहेच.. मलाही आहे.. घरचे एकमेकांना चांगले ओळखतात.. दोन्ही घरे एकाच परिस्थितीतील आहेत... ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.. स्वभावाने चांगली आहे.. प्रॉब्लेम काय आहे तेच मला समजत नाही..
अंजली - प्रॉब्लेम असा आहे की ती कपाळकरंटी आहे... तिला कडक मंगळ आहे.. ती जिथे जाईल तिथे हीच परिस्थिती उद्भवू शकते असे तिची पत्रिका पाहिली तेव्हाच ज्योतिषाने अक्कांना सांगीतलेले होते.. तिचे लग्न ठरत नव्हते.. कसेतरी ठरले तर हे असे झाले.. आपल्याला माहीत असताना आपण हा धोका का म्हणून घ्यायचा??
वसंता - मला हे पटत नाही.. पत्रिका वगैरे सगळे सोयीप्रमाणे असते.. जन्माची वेळ नक्की कुणालाही सांगता येत नाही..
अण्णा - हा आता काहीही बोलायला लागला आहे...बाबा.. तुमचं काय म्हणणं आहे??
बाबा - वसंता .. हा विचार डोक्यातून काढून टाक.. ती मुलगी, तिच्या घरचे सगळे चांगले असले तरीही ती विधवा आहे... तुझे लग्न अजूनही एका लग्न न झालेल्या मुलीशी सहज होऊ शकते.. तू फक्त सत्तावीस वर्षाचा आहेस.. तुला अशीबायको करण्याचे कारण नाही आहे.. दिसायला व्यवस्थित आहेस, कमावता आहेस.. उगाच काहीतरी कशाला करायचे? हा विचार पहिला काढून टाक डोक्यातून..
वसंता - बाबा.. मला लग्न करायची इच्छा नाही... मुळीच नाही आहे.. जर लग्न केलं तर गौरीशी नाहीतर राहीन एकटा..
अंजली - एकटं राहून कुणाचं भलं होत नाही.. भाऊ काकांच बघताय ना? इथे, त्यांच्या स्वतःच्या घरी आले तरी त्यांना कसं परकं परकं वाटतं ते??
वसंता - परकं परकं वाटतं कारण ते स्वतःच घर सोडून दुसरीकडे जातात.. हे घर त्यांच आहे या गोष्टीला आता कित्येक वर्षे होऊन गेली.. आजोबा गेले... काका आजोबा गेले.. सगळेच गेले.. आता ते इथे आले की त्यांना परकं वाटणारच.. मी काही माझं घर सोडून जात नाही आहे..
तारका - माझं अन तिचं काही जमायचं नाही... नखरेल वागते ती...
वसंता - हे आधीच तुम्ही असे दृष्टिकोन कसे काय बनवू शकता?? अजून मी तिला विचारलेलंही नाही आहे..
आई - विचारायचंच नाही आहे.. परवाच अक्का म्हणत होत्या.. आता गौरी लग्न करणारच नाही आहे..
वसंता - ते मी बघतो.. न करायला काय झालं लग्न? समोर सासर आणि रस्ता ओलांडला की माहेर..
अण्णा - लोक काय म्हणतील???
वसंता - लोकांचा काय संबंध??
अण्णा - कुणाचाच काही संबंध वाटत नाही तुला... आपण एका घरात राहतो... एकमेकांच्या मताने चालतो.. मग मते विचारात घ्यायला नकोत??
वसंताने रोखून अण्णाकडे पाहिले. आता हा काय बोलणार असेच सगळ्यांना वाटू लागले.
वसंता - एका घरात राहतो... काय म्हणून राहतो?? तर रक्ताचे नातेवाईक म्हणून... राहायचं असतं म्हणून राहतो असे नाही आहे..
अण्णा - काय बोलतोयस??
वसंता - अजून मी गौरीला विचारलं नाही तर तारका वहिनी म्हणतायत.. तिचं अन त्यांचं जमणार नाही म्हणून.. हे कसे काय? मग अंजली वहिनी जर यांना पाहून म्हणाल्या असत्या की या नव्या सुनेचं आणि माझं काही जमणार नाही तर तू लग्नाला नकार दिला असतास का??
मुद्दा तरी बिनतोड होता, पण उद्धटपणे विचारलेला!
दादा - वसंता... तू फार बोलतोयस..
वसंता - माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे दादा.. मला फार बोलायलाच लागणार आहे.. अण्णा म्हणतो की आपण एकमेकांच्या मताने राहतो... आजवर माझ्या मताने नेमकं घरात काय झालं आहे कुणी सांगेल का मला? एक तरी गोष्ट माझ्या मताने झाली आहे??
दादा - काय झालं नाही??
वसंता - काय झालं सांग की? तुझं शिक्षण झालेलं होतं.. तुझ्या शब्दावर अण्णा आणि राजूदादाला नोकर्या मिळालेल्या होत्या.. मग घराचे काम काढल्यावर मी म्हणालो की मी दुकान सांभाळत शिकतो.. माझा एक मित्रही दुपारचा बसेल... तर नाही म्हणालात सगळे..
दादा - तेच तेच बोलतोयस तू... शिक्षण राहिलं हाच मुद्दा आहे ना?
वसंता - नाही.. तेवढाच नाही... तुम्ही गेले चार वर्षे सगळे जण माझ्या मागे आहात की लग्न कर.. मुलीसुद्धा ठरवल्यात.. पण मला एक सांगा.. मी कशाच्या जीवावर लग्न करायचं?? तुम्ही सगळे आहात आणि तुमची आर्थिक ताकद आणि प्रेमाचा आधार माझ्या मागे या जीवावर?? आज जर मी एकटा म्हणून जगात उभा राहिलो तर मी त्या मुलीला कोणत्या प्रकारचे राहणीमान देऊ शकेन??
अंजली - एक मिनिट.. हा दोष तुम्ही सगळ्यांवर लादू शकत नाही.. हा तुमचा दोष आहे.. एक शिक्षण सोडलं तेवढंच.. बाकी तुम्हाला कुणी काय म्हंटलवतं का? तुम्ही नोकरी बदलायला हवी होतीत.. दुसरा एखादा व्यवसाय करायला पाहिजे होतात.. चितळ्यांची नोकरी झाली की घरात येऊन बसायचं आणि सकाळ झाली की तिथेच जायचं पुन्हा..
वसंता - वहिनी... काय बोलताय.. मी कशी दुसरी नोकरी मिळवणार...
तारका - आमचं शिक्षण खुंटलं ना तुमच्यामुळे... आता हेच ऐकावं लागणार आहे जन्मभर..
तारकावहिनींचा उपरोधिक स्वर फारच दुखावून गेला वसंताला! त्याचा पेशन्स संपला. तो ओरडला.
वसंता - तुमच्यावर भार नाहीये मी.. माझं माझं कमवतोय आणि माझे आई वडीलही आहेत समर्थ..
तारका - हो?? आमच्यावर भार नाही आहात? छान वाटलं हो ऐकून? धन्य वाटलं अगदी..
वसंता - म्हणजे??
तारका - मी बोलले तर बोलले असे वाटेल... आता काय काय सांगायचं??
वसंता - बोलूनच टाका ना एकदा...
तारका - प्रत्येक सणाला जे आम्हाला करू तेच तुम्हाला केलंय यांनी..
वसंता - अण्णा.. बघ या कशा बोलतायत...
अण्णा - तारका त गप्प बस...
अंजली - बोलूदेत की तिला?? तुम्हाला पटत नाही का हे?
अण्णा - वहिनी.. मला नाही पटत तारकाचं हे बोलणं..
तारका - कसं पटेल?? संसार नावाचा प्रकारच नाही... सगळं सगळ्यांचं एकत्रच.
वसंता - बाबा.. मला हा विषय जास्त ताणायचा नाही आहे.. पण अक्कांना गौरीबाबत तुम्ही दोघे विचारणार आहात की मी विचारू ते सांगा..
बाबा - गौरी हा विषय बास झाला..
वसंता ताडकन उठून हात धुवून बाहेर निघून गेला. घरात आता चर्चेला अक्षरश: ऊत आला. तारकावहिनी आणि अंजलीवहिनी तर 'आम्हाला वाटायचेच आधीपासून' याही निष्कर्षाप्रत पोचल्या. आई रडू लागल्या होत्या. दादा आणि अण्णा 'वसंताचे कसे चूकच आहे' हे आई बाबांना पटवून देत होते. तारका सतत म्हणत होती.. 'माझे आणि गौरीचे पटणे तर शक्यच नाही'
कधीतरी तासाभराने वसंता परत आला. कुणाशीही काहीही न बोलता झोपून गेला.
घरातील वातावरण बिघडलेले होते. बोलणी चालणी आणि हसणी बंद झालेली होती. मुलांना आश्चर्य वाटत होते. त्यातच तारका आणि अंजलीवहिनींनी ट्रंक कॉल लावून कानपूरला गीता आणि राजूलाही सगळे सांगीतलेले होते.
आणि हे झाल्याच्या पंधराव्या दिवशी..
..
जेवताना.... कुणालाच कसलाच अंदाज नसताना वसंता अचानक म्हणाला...
"गौरीचा होकार आहे... आम्ही रजिस्टर्ड लग्न करणार आहोत..."
या वाक्याचा धक्का ओसरतोय न ओसरतोय तोवरच दुसरा धक्काही बसला.. सगळेच खिळून अण्णा आणि तारकावहिनींकडे पाहातच राहिले....
तारका - आई... यांना बॅंकेतर्फे कर्मचार्यांसाठी बांधल्या जाणार्या कॉलनीत स्वस्तात एक अपार्टमेन्ट मिळतीय... आम्ही... आम्ही तिघं शिफ्ट होणार आहोत...
अरे व्वा आज पन पहिला.
अरे व्वा आज पन पहिला.
सही ...
सही ...
छान ! घर तुटतंय का ? का गौरी
छान !
घर तुटतंय का ? का गौरी येऊन पुन्हा जोडणार ते ?
जोडण्याचे प्रकार बादरायण वाटतात मलातरी.
जोडणार असेल तर तुम्ही सादर कसे करता ह्यावर कथेचे यश अवलंबून आहे.
वाट पाहतोय !
छानच चालु आहे.. म्हणजे, लिखाण
छानच चालु आहे.. म्हणजे, लिखाण छान आहे..
रटाळ झालीये कादंबरी आता. ओढुन
रटाळ झालीये कादंबरी आता. ओढुन ताणुन चालवल्याचे स्पष्ट जाणवतेय. थांबवलीय तरी हरकत नाहीये.
सर्वांचा आभारी
सर्वांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!
आजचा भाग इतका खास नाही झाला.
आजचा भाग इतका खास नाही झाला. वसंता चे आणि गौरी चे संभाषण वाचायला आवडले आसते. पुढील भाग लवकर येवुद्या.
पुढील भाग कधी येणार ? रोज
पुढील भाग कधी येणार ? रोज चेक करत आहे. मायबोली ची रोजची सवय तुमच्या कथा वाचुन च लागली आहे.
खुप आवडते तुमचे लि़खाण. कोणि काही का म्ह्णेना , तुम्ही लिहित रहा.
एक रसिक वाचक.
ही कथा झीवाल्यांना पाठवा
ही कथा झीवाल्यांना पाठवा निदान चाम्गली एक तरी सिरियल; पाहिल्याचे समाधान मिळेल
वा... स्वप्ना तुझी
वा... स्वप्ना तुझी प्रतिक्रिया आज पहिल्यांदाच.
तु त्या झि च्या झिपर्या का धरतेस सारखी?
र्.च्या. क . ने. ओ बेफिकिर ते तुरंग वगैरे नंतर. आधी घर पुर्ण करा. भाग ६ येउदे आधी.
माया(मुग्धानन्द) अगं मी झी
माया(मुग्धानन्द) अगं मी झी पहात नाही माझ्याकडे विदेशी चॅनल्स नाहियेत पण ...मा बो मुळे झी च्या टुकारपनाची कल्पना येते मग न राहवून लिहिलं जातं त्या बद्दल....
नवीन प्रतिसादकांचाही आभारी
नवीन प्रतिसादकांचाही आभारी आहे.
-'बेफिकीर'!
मस्तच...
मस्तच...
अरे वा.. जरा कामात होतो
अरे वा..
जरा कामात होतो म्हणजे आहे पण आज थोडा वेल मिळाला आणि 'घर' चि आठ्वण आलि...
खुप छान लिहिलात हा ट्प्पा... आवडला... आत्ता धाकटि सुन काय करतिय ते पहायच्य..
अप्रतिम.
अप्रतिम.