घर - भाग ४

Submitted by बेफ़िकीर on 17 January, 2011 - 01:04

तिसरा महिना आणखीनच उदास उजाडला होता. गौरीच्या सासरी सगळेच जाऊन आलेले होते. सगळ्यांना पाहून हंबरडे फोडत असलेली गौरी पाहून वसंताच्या मनात कालवाकालव झाली होती. आज तीन महिने झाले तरी तो विषय चर्चेतून जातच नव्हता. सगळेच हळहळत होते. पण हा नवीन महिना सुरू झाला आणि राजूने आणखीनच उदास करणारी बातमी सांगीतली..

बाबा - राजू... पुढच्या आठवड्यात पुलगावला जाऊन येऊयात का? बर्‍याच वर्षात दर्शन झाले नाही देवीचे!

पुलगाव हे विदर्भात होते. वर्ध्याच्या जवळपास कुठेतरी!

राजू - बाबा... एक... एक सांगायचं होतं...

राजूचा तो स्वर ऐकून सगळेच काहीसे चपापले. नेहमीचा स्वर नव्हता तो!

बाबा - काय रे??

राजू - मला... माझी ट्रान्स्फर झालीय... तीन दिवसात निघायचंय..

घर!

घर या वास्तूमध्ये पहिला चिरा पडत होता. होता चांगल्यासाठीच! राजूला एक पोस्ट वरची मिळालेली होती. आणि मिळू शकणार्‍या वाढीव पगाराचा आणि जेथे बदली झाली आहे तेथील पुण्यापेक्षा स्वस्त असलेल्या राहणीमानाचा मोह राजूला पडणे यात काहीच विशेष नव्हते.

ट्रान्स्फर झाली आहे याचा अर्थ राजूने ती स्वीकारलेली आहे हे सगळ्यांनाच समजलेले होते.

दादा - कुठे रे??

राजूने मान खाली घातली. शहर ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटणार हे त्याला माहीत होते.

राजू - कानपूर...

'कानपूर?????' म्हणून आई एकदम ओरडल्याच! साहजिकच होते! उत्तर प्रदेशातील इतक्या लांब गावी जाऊन एकदम हिंदी भाषिकांमध्ये सेटल व्हायचे म्हणजे अत्यंत अवघड प्रकार होता. बिगुलचा तर मोठा प्रश्न होता.

दादा - कानपूर?? ...........अ‍ॅक्सेप्ट केलंस??

राजू - ... .... हो..

सगळेच जेवता जेवता थांबले.

दादा - का?

या प्रश्नाला काहीही अर्थ नव्हता. राजूचा जॉब सरकारी आहे, त्यात बदल्या होतात हे आधीपासूनच सगळ्यांना माहीत होते. पण आजवरचे बाबांचे संस्कार होते.

कितीही आर्थिक प्रगती करा, पण जेथे आपण जन्माला आलो, ज्यांच्यात आपण जन्माला आलो आणि ज्या परिस्थितीत आपण कधीकाळी होतो, त्या तीनही गोष्टी कधीही सोडू नका.

वास्तविक बदलत्या जमान्यात या संस्कारांना काही अर्थ नव्हता. राहणीमान, आजूबाजूची परिस्थिती, इन्डस्ट्रियलायझेशन सगळेच वाढत होते आणि बदलत होते. त्यात टिकून राहणे, इतरांच्या बरोबरीने राहणे यासाठी हे सगळे आवश्यकच होते. पण पटवर्धनांचे घर अजूनही जुन्याच जमान्यात वावरत होते. त्याचे कारण म्हणजे त्यांना सगळ्यांना एकत्र राहण्याचे महत्व नुसते पटलेलेच नव्हते तर ते त्यांनी प्रत्येकाने अनुभवलेलेही होते. नुकताच घडलेला प्रसंग म्हणजे 'दुकान वाचवणे'! सगळ्यांनी मिळून ते दुकान वाचवलेले होते. दादाची परिस्थिती आता बर्‍यापैकी होती कारण त्याला खरच राजूच्या ऑफीसमधून स्टेशनरीचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले होते. पण या सगळ्यात 'आपण सगळे एकत्र आहोत हेच चांगले' ही भावना पदोपदी निर्माण होत स्थिरावत होती.

आणि राजू निघून गेल्यावर बाकीचे सगळे असले तरी त्याची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवणार होतीच! मुख्य म्हणजे बिगुलचा सगळ्यांनाच लळा लागलेला होता. गीतावहिनी घरकामातील बराचसा कार्यभाग सांभाळत होती. ती निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा अंजली आणि तारकाला खर्‍या अर्थाने कंबर कसून घरात उभे राहावे लागणार होते.

राजू - प्रमोशन आहे... डेप्युटी अकाउंटंट..

सगळेच चुपचाप झाले!

आई - पण कानपूर ऐवजी इतरत्र नाही का होऊ शकत जवळपास??

नकारार्थी मान हालवली राजूने!

आत्ता मुलांना जाणवले. राजूकाका जाणार! बिगुलही जाणार!

उमेश - कधी जायचंय??

दादाने उमेशकडे पाहिल्यावर उमेशने जीभ चावून मान खाली घातली. मोठ्यांमध्ये बोलायचे नाही असा दंडक होता.

दादा - इतक्या लगेच का रे जायचंय??

राजू - तिथली पोस्ट रिकामी झाली काल! दुसरे अनेक लोक तयार आहेत जायला! पण जो आधी जाऊ शकेल त्यालाच मिळणार आहे.. मी तयारी दाखवली..

दादा - का?... तू का तयार झालास??

राजू - इथे ती पोस्ट मिळायला सहा वर्षे नियमाप्रमाणे लागतील. त्यात परत ओबीसी आणि इतर सिनियर रांगेत आहेत ते गृहीत धरून कदाचित दहा वर्षेही! आणि ... तसाही जॉब ट्रान्स्फरचा आहेच...

दादा - आणि जागा??

राजू - क्वार्टर मिळणार आहे..

दादा - पण याला आता शाळेत घालावे लागेल ना?

राजू - आता हिंदी मिडियममध्येच घालावे लागणार...

दादा - पण... कानपूरला फार.. दंगली बिंगली होतात असं ऐकलंय...

राजू - ते लखनौ विभागात.. कानपूर शांत आहे..

दादा - पण.. तिकीट वगैरे झालंय का??

राजू - आजच झालं..

दादा - आजच?? पण ठरलं कधी तुझं?? बोलला नाहीस ते??

राजू - अरे परवा दिवशी ऑफर आली..

दादा - मग?? काही बोललाच नाहीस काल परवा..

राजू - हिच्याशी बोललो मी..

एवढा मोठा विषय फक्त गीताशी कसा काय बोलतोस हा प्रश्न विचारणे दादाला संयुक्तिक वाटले नाही. पण तो प्रश्न निदान बाबांनी तरी विचारावा असे सगळ्यांनाच वाटत होते. प्रत्येकाला वाटत होते.

कधी नव्हे ते वसंताने मधे तोंड घातले.

वसंता - तू लगेच जाणार.. आणि कुणालाच माहीत नाही?? वहिनी?? तू पण बोलली नाहीस कुणाशी घरात?

गीतावहिनीशी वसंताचे काहीसे क्लोज नाते असल्यामुळे त्याने मात्र हक्काने तो प्रश्न विचारला. आणि वसंता म्हणजे लहान मुलगा नव्हता ज्याला दादाने गप्प बसायला सांगावे. त्याने या घरासाठी स्वतःही खस्ता काढलेल्या होत्या. गीतावहिनीला उत्तर द्यावेच लागले.

गीता - परवा हे म्हणाले... काल आमची चर्चा झाली नुसती...

वसंता - आणि आज तिकीटही काढलं..

राजू - तुला काय म्हणायचंय??

राजूदादाचा काहीसा तीव्र स्वर वसंताला अपेक्षित नव्हता.

वसंता - काही नाही... निदान आई बाबांना तरी सांगायला हवं होतस...

राजू - मग त्यांना सांगतोच आहे ना??

वसंता - अरे पण आज सांगतोयस आणि परवा निघणार तू...

राजू - त्याने काय फरक पडतो?? समजा पुढच्या महिन्यात निघालो.. जे व्हायचे तेच होणार ना??

जास्त बोलणे शक्य नव्हते वसंताला! काही झाले तरी राजू मोठा होता त्याच्यापेक्षा!

पण अण्णाने मात्र त्या विषयाला धरून ठेवले.

अण्णा - राजू... हा एवढा मोठा निर्णय आहे.. काहीच बोलावेसे वाटले नाही तुला?? काही जबाबदार्‍या असतात, काही अपेक्षा असू शकतात...

राजू - म्हणजे??

अण्णा - आता दादा दुकानात बसत नाही... त्याला इकडे तिकडे फिरावे लागते... मला ओव्हरटाईम करावा लागतो.. तू घरात असायचास वेळच्यावेळी.. गीतावहिनी असायची.. त्यामुळे हे शक्य होत होतं आम्हाला..

राजू - मान्य आहे मला.. पण हा निर्णय तर मला घ्यायचाच होता ना? प्रश्न फक्त घरात किती आधी बोलायचं की अगदी शेवटच्या क्षणी बोलायचं याचाच आहे... पण तेवढा वेळच मिळाला नाही.. असं तर नाही ना की मी बदली स्वीकारायचीच नाही??

दादा - नाही रे.. असं कसं म्हणतोस?? असं कुणी म्हणेल का? जरूर स्वीकार बदली.. असो... आता हा विषय थांबवा बरं सगळे.. राजू.. तुला फर्निचर काय काय लागेल??

दादाच्य बोलण्यावर सगळे अबोल होऊन जेवायला लागले. घास गोड लागत नव्हताच! एक आपलं कर्तव्य म्हणून ताटातलं संपवायचं इतकाच उद्देश होता सगळ्यांचा!

पण तारकावहिनी 'जशास तसे' स्वभावाच्या होत्या. काही क्षण तसेच गेल्यानंतर त्या म्हणाल्याच...

तारका - आलं आता परत... तुमच्यावर आणि माझ्यावर..

अंजलीवहिनींकडे बघत तारकावहिनींनी उच्चारलेलं हे वाक्य गीताला न झोंबते तरच नवल! त्या दोघी थोरल्या असल्याने आजवर त्यांचा गीतावर काहीसा हक्क होता. पण तो हक्क आता उरणार नव्हता. पुन्हा एकदा घरकामाला पूर्णपणे जुंपून घ्यावे लागणार होते दोघींना! आणि अंजलीवहिनींना तारकाचे हे वाक्य पूर्णपणे पटलेले होते. राजूच्या लग्नानंतर घरात आलेली नवीन सून नाही म्हंटले तरी त्या दोघींच्या काहीशी कह्यात होतीच! वाईट कुणीच वागत नव्हते तिच्याशी! पण तिचे अस्तित्व त्यांना 'थोरल्या सुना' हे महत्वाचे पद अलिखितपणे देऊ करत होते. आता ती निघून गेल्यानंतर त्या पुन्हा 'ऑर्डिनरी' सुनाच राहणार होत्या. येता जाता आई जे काय बोलायचे ते यांनाच बोलणार होत्या.

अण्णाने तारकाला हाताने 'गप्प' केले खरे... पण अंजली वहिनींनी मोठा सुस्कारा टाकून वाक्य उच्चारलेच..!

अंजली - ते काय गं! ते आपण करत होतोच... आपण काही नोकरी करत नाही.. पण आपण कधी घरची जबाबदारी टाळलेली नाही आजवर...

हे मात्र स्फोटक वाक्य होतं! आणि अंजलीवहिनीच ते बोलत असल्यामुळे आई, बाबा किंवा दादाच त्यांना गप्प करू शकत होते. अण्णाने मान खाली घातली. त्याला आत्ता मोठ्या वहिनींकडून अशी भूमिका अजिबात अपेक्षित नव्हती. हे कलहास मूळ ठरू शकणारं वाक्य होतं! तेवढ्यात सगळ्यांनाच दिसलं! राजूने गीताच्या मांडीवर हात दाबून तिला गप्प राहायला सुचवलं होतं! गीताच्या चेहर्‍यावर कडवटपणा स्पष्ट दिसत होता. आत्ता तिला 'बोल' अशी परवानगी दिली तर ती काय बोलेल याचा पूर्ण अंदाज सगळ्यांना आलेला होता.

दादा - अंजली.. हे काहीतरी बोलू नकोस.. त्याचे करीअर आहे.. आपण सगळे आहोतच जबाबदारी घ्यायला... उद्या आपली बदली झाली असती तर???.. राजू.. तू बिनदिक्कत जा रे.. इथली काही काळजी करू नकोस.. आणि अंजली.. बदली झालीय म्हणूनच जातायत ना?? नाहीतर आजवर सगळी जबाबदारी घेतच होते की दोघे..

अंजलीवहिनीनी फणकार्‍याने सौम्यपणे मान हालवलेली पाहून अचानक तारकावहिनी म्हणाल्या..

तारका - दोन वर्षांपुर्वी यांची पण बदली होणार होती मुंबईला.. आम्ही नाही घेतली.. मॅनेजर झाले असते..

अण्णा - तारका.. तो प्रश्न आत्ता कशाला?? आणि आपण बदली घेतली नाही ती वेदाच्या शाळेच्या कारणाने..

आपल्याच नवर्‍याने आपल्यालाच उघडे पाडल्याचा राग तारकावहिनींच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत असतानाच अचानक घरातले सगळे अलिखित कोड ऑफ कन्डक्ट फेकून देत गीता म्हणाली...

गीता - चार वर्षं झाली की लग्न होऊन.. आम्ही आमचे काही बघायचेच नाही का? .. आणि काय करत नाहीये मी घरात?? यांची बदली झाली नसती तर मी काय इथे राहिले नसते??

गीताचे मधे बोलणे कुणालाच पसंत नव्हते. आईंनी मोठे डोळे करून तिला गप्प केले. पण अंजलीवहिनी म्हणाल्याच..

अंजली - सासू सासर्‍यांसमोर आमची तर नाही बाई जीभ उचलत..

राजूही गीताला ओरडला. मुलांसमोर अपमान होऊ नये म्हणून दादाने पहिल्यांदा उमेश, वेदा या दोघांना बिगुलला वर घेऊन जायला सांगीतले. पण व्हायचे ते झालेच होते. गीता पानावर तशीच बसली होती. पण तिच्या डोळ्यांमधून आता पाणी वाहात होते.

दादा - गीतावहिनी... तू रडू नकोस.. तुला कुणी काही बोलणार नाही.. आणि तुम्ही दोघी आता गप्प बसा..

पहिल्यांदाच दादांचा आवाज चढल्याने अंजली आणि तारका चुपचाप झाल्या. पण क्षणभराने अंजलीवहिनींना जाणवले. 'आपणही रडू शकतोच की?'

आता त्यांनी मुसमुसत वाक्य टाकले.

अंजली - तुम्ही मलाच बोला.. लग्न करून आल्यापासून आहे त्या परिस्थितीत मी घर सांभाळतीय.. तीन तीन दीर... प्रत्येकाची तर्‍हा वेगळी.. याला सात वाजता डबा पाहिजे तर त्याला अकरा वाजता जेवण.. सगळ्यांचे सगळे केले मी.. ही तारका आली चार वर्षांनी... आणि आज तुम्ही मलाच गप्प बसा म्हणताय..

अंजलीच्या या बोलण्यावर तारकाही काही बोलू शकत नव्हती. तिने जरी घरात सगळे काही केलेले असले तरी अंजली वहिनींनी घर चार वर्षे एकहाती सांभाळलेले होते हे सगळ्यांनाच माहीत होते.

दादा - तुला काय झालंय रडायला?? भरल्या घरात पानावर बसून रडता कसल्या तुम्ही बायका? काय वाईट निर्णय आहे त्याचा? दोन दोन पोस्ट पुढचे प्रमोशन मिळतंय.. लांब चाललाय ठीक आहे.. पण चार पाच वर्षांनी येईलच की इथे? आणि घरातले काम घरातले काम म्हणजे काय? तूच म्हणतीयस एकटी करायचीस ना? मग आता दोघी आहात की तुम्ही??

वसंता जेवून उठला आणि हात धुवून पुन्हा येऊन पानावरच बसला. बाहेर जाऊन सिगारेट ओढावी असे त्याला आज वाटत नव्हते. सगळ्यांच्या समोर मोठा प्रश्न होता तो हा की राजू जाताना काय काय फर्निचर नेणार? अर्थात, प्रेम हा पाया होता सर्व नात्यांचा! पण अंजली अन तारकावहिनी कधी काय बोलतील याचा आता कुणालाच भरवसा राहिलेला नव्हता.

बाबा - राजू... तुला काय काय लागणार आहे घरातलं??

राजू - काही विशेष नाही... आमचा बेड, कपाट... स्वैपाकघरासाठी मात्र सगळंच लागेल...

अंजली आणि तारकाने एकमेकांकडे पाहिले. कधी नव्हे ते दादाच्या थाटात अण्णा म्हणाला..

अण्णा - जे पाहिजे त्याची एक लिस्ट करा आत्ताच.. उद्याच्या उद्या सगळं सामान बांधून तयार ठेवू.. घरात सगळं आहे आपल्या.. उगाच विकत आणत बसू नका..

पुन्हा दोन वहिन्यांनी एकमेकांकडे पाहिले.

वसंता - कितीची गाडी आहे परवा?

राजू - झेलम.. सव्वा पाच..

वसंता - झेलम कानपूरला जाते??

राजू - नाही.. मधे बदलावी लागते..

वसंता - मी... मी येऊ का बरोबर??

आत्तापर्यंतच्या संभाषणामधील सर्वात सेन्सिबल वाक्य होतं ते!

राजूदादाने अगदी उपकृत नजरेने वसंताकडे पाहिले. गीतानेही!

वसंता - येतो मी....

आई - पण तुझं तिकीट??

वसंता - उद्या काढतो..

राजू - नाही वसंता.. नाही मिळणार तिकीट.. खूप रश आहे.. एक काम कर.. आठवड्याभरानंतरचे तिकीट काढ.. तोवर सामानही ट्रकने पोचेल... तेव्हा ये.. मग तिघे मिळून सामान लावू...

आई - पण तोवर कुठे राहणार??

राजू - गेस्ट हाऊस आहे..

मुक्यानेच तिघी सुना आवराआवरी करत होत्या. सगळे तिथेच बसलेले होते. मुक्यानेच!

वर मुले आता झोपलेली असावीत. कारण त्यांचा आवाज येत नव्हता. अचानक आईंनी विचारले..

आई - गीता?? बेटा तुला भावाकडे जायचंय का आज?? वसंता सोडून येईल..

गीताचा सख्खा भाऊ कसबा पेठेत राहात होता. पण तो फारसे संबंध ठेवून नव्हता.

ते वाक्य ऐकून मात्र गीताच्या डोळ्यात पाणी आले. तशीच भांडी घासताना आईंकडे पाठ करूनच रडक्या स्वरात म्हणाली....

गीता - त्यापेक्षा... त्यापेक्षा आज आम्ही तिघी वरच्या खोलीत झोपतो..

खट्टकन हात थांबले तारका आणि अंजलीचे!

गीताच्या लग्नानंतर तिघींचे जमलेली गट्टी, त्यात गीता सगळ्यात लहान असल्यामुळे तिची केलेली थट्टा, बिगुलच्या वेळेस ती प्रेग्नंट असताना दोघींनी घेतलेली काळजी, लहान सहान प्रसंगांमधून तिघींची तीन शरीरे आणि एक मन असल्यासारखे प्रत्यय सतत येणे.. सर्वासर्वाच्या आठवणी दोघींच्या मनात भरून आल्या...

तारकाने गीताला बेसीनपासून लांब केले.

तारका - आज नको... आज मी घासते भांडी..

गीता 'नाही नाही' म्हणत असतानाच अंजलीने तिला आईंशेजारी नेऊन बसवले. अंजली आणि तारकाने सगळे आवरले आणि झोपाझोप झाली.. आज तिघी जावा एकाच खोलीत झोपल्या होत्या.. बिगुल आजीआजोबांकडे...

आणि.... वसंता... राजूदादाबरोबर...

कारण दादा आणि अण्णाप्रमाणेच... या दोघांची लहानपणापासून जोडी होती....

===============================================

वसंताला तिकीट मिळू शकलेच नाही. थर्ड क्लासमधून 'चालू टिकट' वर प्रवास करणे त्याला शक्यही नव्हते आणि कुणी परवानगीही दिली नसती. दादा घरीच थांबणार होता दोन दिवस! अण्णानेही दोन दिवसांची रजा घेतलेली होती. त्या दोघांनी मिळून सहा हजार रुपये एकत्र करून अनेक लहानसहान वस्तू घरात आणून ठेवलेल्या होत्या. ते पैसे घ्यायला ते नकार देत होते. गहिवरलेल्या मनाने सगळी बांधाबांध चाललेली होती. वसंता तर घरात टिकूच शकत नव्हता. त्याच्या पायाला भिंगरी होती. हे आणा, ते राहिलं हे फक्त त्यालाच सांगण्यात येत होतं! मुले एकमेकांबरोबर खेळत होती. आई आणि बाबा मात्र हताशपणे सगळे पाहात होते.

आणि अचानक नको ते झाले!

नेमके काही लक्षात नसल्याने राजूने पूजेतले एक चांदीचे निरांजन तिकडे नेण्यासाठी बॅगेत टाकले. ते पाहून तारकावहिनी एकदम बोलल्या..

तारका - ते माझ्या बाबांनी दिलंय..

राजूला वाटायचे हे कॉमन आहे. त्याने ते पटकन काढून ठेवले. तेवढ्यात आई बोलल्या.

आई - तुझ्या भावाने दिलेलं हे नाही आहे.. ते वर कपाटात आहे.. हे मीच आणलेलं आहे..

तारका - छे?? हेच दिलंय दादाने.. बघा.. आठ पाकळ्यांचं आहे...

आई - नाही गं बाई... शरद.. ते वरून आणून दाखव बरं हिला... हिच्याच कपाटात असेल..

तारका - माझ्या कपाटात असतं तर मी कशाला म्हणाले असते??

राजू - अहो पण ठीक आहे.. मी दुसरं साधं घेईन.. मला काही हेच हवं आहे असं नाहीये...

तारका - हो पण विचारायचं नाही का??

भावनेच्या भरात अत्यंत चुकीचं वाक्य गेलं तोंडातून! हे ऐकून मात्र गीतावहिनी उसळलीच!

गीता - काही नेत नाही... एक वस्तू नेत नाही.. अहो... पहिल्यांदा ते सगळं सामान खोला.. जितकं तुम्ही आणि मी विकत घेतलेलं आहे तेवढं म्हणजे तेवढंच बॅगेत भरलं पाहिजे... एक वस्तू आणखीन आली तर मी कानपूरला येणार नाही आधीच सांगतीय..

अंजली - वा गं वा? उपकार आहेत का? आम्ही घरात राब राब राबायचं.. या नोकर्‍या करणार.. आणि बदली झाली की सरळ निघून जाणार... जाताना हवे ते घेऊन जाणार..

अंजलीवहिनी उगाचच मधे पडल्या.

गीताने फटाफटा सगळ्या बॅगा खोलल्या आणि उपड्या केल्या.

दादा आणि अण्णा सगळ्यांन गप्प बसवत होते. पण तो प्रकार राजूलाही आवडलेला नव्हता.

राजू - दादा... तू म्हणतोस.. पण मला सांग.. मी हे निरांजन चुकून घेतलं... यांच्या माहेरच आहे हे माहीत असतं तर घेतलंच नसतं.. पण वहिनींच हे बोलणंय का?? विचारायचं म्हणे?? आपल्या घरात सगळं सगळ्यांच आहे ना??

तारका - हो पण सगळे एकत्र राहिले तर सगळ्यांचं आहे.. वेगवेगळे राहायला लागले तर माझ्या माहेरचं हिच्याकडे कशी काय देईन मी??

दादा - तारका वहिनी... ते नेत नाहीयेत ना निरांजन.. आता कशाला बोलताय??

अंजली - अहो.. तुम्ही मधे पडू नका.. हे घरातलं सोनं आहे... म्हणून तारका बोलली...

गीता - नाही नाही.. मी घरातली एक वस्तूही नेत नाहीये आता...

अक्षरशः गीताने 'घरातील कॉमन' अशा सर्व वस्तू बाहेर काढून ठेवल्या. इतकंच काय दादा आणि अण्णांनी विकत आणलेल्या आणि भेट म्हणून दिलेल्या वस्तूही बाहेर काढायला सुरुवात केली.

अण्णा - गीतावहिनी.. हा पराचा कावळा होतोय.. हे आम्ही तुमच्या दोघांसाठी भेट म्हणून आणलेलं आहे सगळं..

अण्णांसमोर काही गीताची जीभ चालेना! त्यामुळे नुसतेच मुसमुसत तिने सगळे बाहेर काढायला सुरुवात केली. तेवढ्यात वसंता आला..

वसंता - काय झालं?? काय झालं काय??

तारका - तुमच्या लाडक्या वहिनी घरातलं काही नेत नाहीयेत... स्वाभिमानी आहेत ना??

वसंता - म्हणजे??

तारका - यांनी अन दादाभावजींनी कालचा दिवस घालवून इतक्या वस्तू आणल्या.. त्या सगळ्या इथेच ठेवून चाललीय..

वसंता - का??

तारका - विचारा की?? मी नुसतं म्हंटलं माझ्या माहेरचं निरांजन नेऊ नका.. तर राग बघा??

अंजली वहिनी उगाचच रागावल्यासारखे दाखवत वरच्या स्वतःच्या खोलीत निघून गेल्या. तसा दादाही वर गेला समजून काढण्यासाठी! बाबा मात्र ओरडले.

बाबा - तो लांब निघालाय.. कुणीही भांडू नका..तुम्हाला कुणाला काही वाटत नाही का रे भांडताना??

हे वाक्य तारकावहिनींकडे बघून बोलल्यामुळे त्याही निघून गेल्या वर त्यांच्या खोलीत!

एक अभद्र कळा प्राप्त झालेली होती घराला! चारही भाऊ, आई, बाबा आणि गीतावहिनी सामान बांधत होते. मुले नुसतीच खिळून उभी होती आणि होईल ते बघत होती. आपल्या घरात भांडणे होऊ शकतात हे मुलांना पहिल्यांदाच समजत होते.

निघयची वेळ झाल्यावर मात्र राजू आणि गीता दोन्ही मोठ्या वहिन्यांना नमस्कार करायला वर गेले. दोन्ही वहिन्या आपापल्या खोलीत रडत बसलेल्या होत्या. नमस्कार करताना मात्र गीताला दोघींनी जवळ घेतले. हमसून हमसून रडत निरोपानिरोपी झाली.

दादा आणि अण्णाला नमस्कार करताना मात्र राजूही रडला. अण्णा पटकन भिंतीच्या बाजूला जाऊन भिंतीवर तोंड दाबून रडू लागला. आई अन बाबा तर केव्हापासूनच हळवे झालेले होते. दादानेही डोळे पुसले. मुले तर रडतच होती. बिगुलला सगळ्यांनी जवळ घेतले.

बाहेर दोन रिक्षा आलेल्या होत्या. राजूला सोडायला दादा आणि वसंता जाणार होते.

निघायच्या वेळेला वरून तारका वहिनी धावत खाली आल्या आणि निरांजन गीताच्या हातात देत म्हणाल्या..

"हे माझ्या माहेरचं निरांजन आहे... हे मी तुला भेट म्हणून देतीय.. तुझ्याचजवळ ठेव... आणि काळजी घे.. लवकर परत या.. बिगुलला सांभाळा... हे घर आपलंच आहे... भांडणे झाली काय रुसवे फुगवे झाले काय... "

गीताच्या डोळ्यांचे पाणी खळत नव्हते. माहेरचा फारसा आधार नसलेल्या गीताला तारकावहिनींचे ते बोल मोठ्या बहिणीप्रमाणे भासले. तेवढ्यात अंजलीवहिनींनी एक पाकीट राजूच्या हातात दिले..

"भावजी... बिगुल झाल्यापासून त्याच्या शिक्षणासाठी म्हणून जमवत होते मी हे... साडे तीन हजार झालेत.. ठेवा... तिकडे उपयोगी पडतील..."

काय घर होते काय माहीत! क्षणात भांडणं अन क्षणात एकमेकांच्या गळ्यात पडणं!

===============================================

राजूला सोडून परत आलेले दादा आणि वसंता कुणाशीही बोलत नव्हते. निरोप देताना आणि गाडी दिसेनाशी होईस्तोवर हात हालवताना दोघांच्या काळजाचे पाणी झाले होते. इतका वेळ धीर धरलेला वसंता गाडी हालल्यावर मात्र ओक्साबोक्शी रडला होता. त्याला रडताना पाहून लांब लांब जाणारा आणि दारात उभा राहिलेला राजू नव्याने रडू लागला होता.

आजची जेवणे कुणालाच गोड वाटली नाहीत. शक्यच नव्हते. पण आईने मात्र तिचे मत मांडलेच...

"वसंता.. राजू निघून गेला रे... आता किती सुनं सुनं वाटतंय... घरात.. घरात काहीतरी... वेगळं व्हायला पाहिजे आता... वसंता.. लग्न करतोस???"

सगळेच त्याच्याकडे पाहात असताना.. वसंता एक शब्द बोलला नसला तरीही...

"नाही" मुळीच म्हणाला नाही...

जेवणानंतर सिगारेट ओढून तो घरी परत आला तेव्हा सगळेच आपापल्या खोलीत झोपलेले होते...

... वसंतानेही पलंगावर आडवे पडून हवा यावी म्हणून खिडकी उघडली....

... आणि त्याची नजरच खिळली त्या दृष्यावर... कित्येक वर्षांनी ते पुन्हा घडले होते...

.. कालच माहेरी आलेली विधवा गौरी नेमकी त्याच वेळेस तिच्या घराची खिडकी लावताना... वसंताने उघडलेली खिडकी पाहून.. स्वतःची खिडकी न लावताच.. खिडकीत उभी राहिली होती...

मिसेस गौरी वसंत पटवर्धन... त्या घरातील सर्वात लहान व सर्वात महान सून म्हणून येणार होत्या.. लवकरच..

गुलमोहर: 

वसंता - म्हणजे??

अण्णा - आता दादा दुकानात बसत नाही... त्याला इकडे तिकडे फिरावे लागते... मला ओव्हरटाईम करावा लागतो.. तू घरात असायचास वेळच्यावेळी.. गीतावहिनी असायची.. त्यामुळे हे शक्य होत होतं आम्हाला..

वसंता - मान्य आहे मला.. पण हा निर्णय तर मला घ्यायचाच होता ना? प्रश्न फक्त घरात किती आधी बोलायचं की अगदी शेवटच्या क्षणी बोलायचं याचाच आहे... पण तेवढा वेळच मिळाला नाही.. असं तर नाही ना की मी बदली स्वीकारायचीच नाही??

ईथे राजु पाहीजे ना...

u have got tremendous command over emotions.
खरचं मानल तुम्हाला.

मस्त...

rrs, तिथे दादाच बरोबर आहे, वसंता नाही... भाग एक मधे पात्रपरिचय करुन दिला, त्यात लिहिलंय ना,
दादा - कुमार पटवर्धन, वय पस्तीस, वडिलांचे स्टेशनरीचे दुकान चालवणे हा व्यवसाय!

असो, चांगला जमलाय हा भाग... एका घराची तुटतांनाची प्रतिक्रिया अनुभवली... फारच वाईट Sad

कायच्या काय बेक्कार लिहिलं आहे! (हे चांगल्या अर्थाने घ्यावे Happy ) अगदी सोप्या सरळ भाषेत, मानवी मनाचे कंगोरे उत्कृष्ट पद्धतीने दाखवले आहेत. मी स्वतः एकत्र कुटुंबामधे राहीले आहे, खूप सुरेख लिहिलं आहे. हे सगळं ८० सालातलं असावं, (गाणी आणि एकंदरीत mention केलेली वर्षं बघता) त्यामुळे वेगळीच मजा येत आहे. पु.ले.शु. Happy

बेफिकीरजी जर स्पीड येऊ द्या ना.. आजकाल खुपच स्लो झलय आपल लिखान.. खूप वाट बघयला मज नाहि येत>>>>> अगदी हेच लिहायला आले होते. काय झालेय तुम्हाला बेफिकीरजी?

छान