व्हेजीटेबल हक्का नूडल्स

Submitted by अंजली on 11 January, 2011 - 16:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ गठ्ठे (?) बारीक (Thin) राईस नूडल्स
१ कप बारीक लांब चिरलेलं गाजर
१ कप बारीक लांब चिरलेला कोबी
१ कप पातळ 'स्लाईस' केलेले मश्रूम्स
१ कप बारीक लांब चिरलेली सिमला मिरची
१/२ कप कांद्याची बारीक चिरलेली पात
आवडत असल्यास थोडी कॉलीफ्लावरची छोटी केलेली फुलं
३ टे. स्पून सोया सॉस
१/२ टि. स्पू. किंवा आवडीप्रमाणे पांढरी मिरी पावडर. (काळी मिरी पावडर वापरल्यास चव बदलेल)
४-५ लाल सुक्या मिरच्या
१ टे. स्पू. बारीक चिरलेला लसूण
मीठ
२ टे. स्पू. तेल

क्रमवार पाककृती: 

मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घेऊन त्यात मीठ घालून उकळी आणावी. पाणी उकळल्यावर त्यात नूडल्स घालून हलवावे. साधारण चार पाच मिनीटांनी पाणी काढून टाकून नूडल्स, दुसर्‍या एका मोठ्या भांड्यात भरपूर थंड पाणी घेऊन त्यात टाकाव्यात. नूडल्स पाण्यात साधारण अर्धा तास तरी ठेवाव्यात. त्यामुळे स्टार्च निघून जाऊन अजिबात चिकटपणा रहात नाही आणि नूडल्सना तेल वगैरे लावायची गरज पडत नाही.
मोठ्या 'वॉक'मधे किंवा कढईमधे तेल घेऊन त्यात बारीक केलेला लसूण घाला. गॅसची आच मोठी असू दे.
मिरच्यांचे तुकडे करून घाला.
सगळ्या भाज्या घालून भराभर हलवून सोया सॉस, मिरपूड, मीठ घाला.
परत एकदा भराभर हलवून पाणी निथळलेल्या नूडल्स घाला. गॅस बंद करून नीट मिसळून घ्या. वरून बारीक चिरलेली कांद्याची पात घाला.

DSCN0955.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

१. कुठलाही चायनीज पदार्थ करताना गॅसची आच मोठी असावी.
२. पसरट कढई किंवा वॉक मधे पदार्थ करावा.
३. भराभर हलवून 'टॉस' करत भाज्या, नूडल्स मिसळावेत.
४. आवडत असल्यास ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस घालून करू शकता. चव थोडी वेगळी येईल.
५. हवा असल्यास चिमूटभर अजिनोमोटो घालून करू शकता. चव रेस्टॉरंटसारखी येईल.
६. यात शक्यतो आलं घालू नका.

माहितीचा स्रोत: 
मूळ कृती व १-३ टिपा: संजीव कपूर, स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कृती आहे अंजली. माझी कृतीही साधारण सेमच आहे.

माझ्या मैत्रिणीने मागे चायनीज कुकींगचा क्लास केलेला. तिच्या त्या क्लासमध्ये तिला सांगितलेली रेसिपी अशी होती. भाज्या-सगळ्या उभ्या चिरुन (पातीचा कांदा, गाजर, कोबी, भोपळी मिरची, फसरबी, मश्रूम्स).

पसरट कढईत तेलावर लसूण परतून घेऊन त्यावर किंचित लाल तिखट टाकावं. त्यावर पातीचा कांदा, गाजर, भो. मिरची, फसरबी, मश्रूम्स, कोबी- ह्याच क्रमाने परतून घ्यावेत. हाय फ्लेमवर. त्यावर मग थोडा सॉय सॉस, अजिनोमोटो घालावं. वरुन किंचित साखर, चवीपुरतं मीठ.
एकीकडे भरपूर पाण्यात मीठ घालून नूडल्स शिजवून घ्याव्यात. शिजल्यावर ड्रेन करुन त्याला सॉय सॉस चोळून घ्यावा. त्यावर किंचित तेलावर किंचित लाल तिखट घालून परतून घ्याव्यात व भाज्या मिसळून गरम वाढाव्यात.

ह्या पद्धतीने केल्यास जरा जास्तच तिखट होतात त्यामुळे नूड्ल्स तिखटावर परतायची स्टेप पूर्ण स्कीप केली तरी चालेल.

अंजली, नूडल्स कुठ्ल्या ब्रँडचे, कुठल्या दुकानातून आणायचे ?

सायोच्या पद्धतीने करुन बघितलेत. एकदम मस्त होतात. आता राइस नूडल्स करुन बघेन.

मी तरी इंग्रोमधून व्हेज नूडल्स आणते. (अंडं नसलेल्या) चिंगच्याच असतात बहुतेक. फक्त त्याचं शिजवायचं गणित जमायला हवं.

छान वाटतीये रेसिपी,अंजली
सायोचीपण तिखट टाकलेली आवडली Happy
आमच्याइथे हिरव्या मुगाचे ,होल व्हीट चे नूडल्स मिळतात. मी तेच वापरते.
आता राईस नूडल्स वापरून पाहीन

अंजली, झक्कास रेसिपी. येताना चिंगच्या हाक्का नुडल्स आणल्यात. आता करून बघेन.

मी नेहमी सायोने वर लिहिल्याप्रमाणेच करते.

मी आज ही रेसीपी करुन बघितली. अल्टीमेट झाली. मी चिंगच्या नुडल्स वापरल्या.पांढरी मिरीने आणि लाल सुक्या मिरचीने चवीत खरच खुप मोठा फरक पडतो.

मस्तच रेसिपी. अजिनोमोटो आणि किंचित साखर घातली तर रेस्टॉरंटसारखी चव येते का? कारण घरी केलेल्या नुडल्स काही केलं तरी 'घरी केलेल्या'च लागतात. ते secret ingredient काय असतं???

थंड पाण्यातुन काढल्याने noodles बनल्यावर थंड होतात. त्याला काय करता ? परत मावे मध्ये गरम करायचे का ?

चिरलेल्या भाज्या बर्फाळ पाण्यात 15 मिनिटे ठेवायच्या आणि मग पूण निथळून मग टॉस करायच्या अशीही एक टिप संजीव कपूरने खानाखजानामधे दिली होती. असं केल्यावर भाज्यांना स्मोक इफेक्ट चांगला येतो.

अंजू, आज करून पाहिले ग नूडल्स. मस्त झालेले. छान रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

मी पण ह्याच रेसिपीने करते. मागे एकदा रेस्टॉरंटमधे सिंगापूर नुडल्स खालेल्या तेव्हा त्यात लाल मिरची टाकलेली. तेव्हापासुन मी ही टाकते.

सोनाली,
झकास फोटो :).
बित्तु,
आपल्याकडे (भारतात) गव्हाच्या (?) जाडसर नूडल्स वापरतात बहुतेक. इथे इंडो चायनीज रेस्टॉरंट मधे राईस नूडल्स वापरलेल्या बघितल्या आहेत. राईस नूडल्स बारीक मिळतात इथे.