मासे १९) खुबे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 January, 2011 - 02:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खुबे
२ कांदे चिरुन
लसुण सात-आठ पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
मसाला १ ते दोन चमचे
अर्धा चमचा गरम मसाला
१ टोमॅटो चिरुन
थोडी कोथिंबीर
मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

चिखलात सापडल्यामुळे ह्याच्या कडांमध्ये थोडी माती असते म्हणून खुबे ६-७ पाण्यांतुन स्वच्छ धुवुन घ्यावेत व त्याच्या लेवलच्या थोड कमीच पाणी घेउन ते उकडून घ्यावेत. पाणी एवढ्यासाठी कमी टाकतात की उकळल्यावर भाताप्रमाणे ह्याचा फेस वरती येतो व पाणी जास्त झाले तर भांड्यातुन खाली जातो. आणि आपल्याला ओटा पुसण्याचे अजुन कष्ट ताबोडतोब करावे लागतात. खुबे उकडले की काही खुब्यांची तोंडे आपोआप उघडतात. हा गर असाचही खाता येतो. (लहानपणीचे स्वानुभव, अजुनही मी लहानच आहे. बर्‍याचदा उकडलेले तोंडात टाकते) आता उकडलेल्या खुब्यांमधिल पाणि काढुन टाकायचे व थोड्या वेळाने खुब्याचा गर काढुन घ्यायचा. जे मिटलेले असतात त्यांना दोन बोटांनी बाजुला सारुन त्यातील गर काढता येतो. थोडे कडकच असतात शिंपले. पण जे जोर लावुनही निघत नसतील असे खुबे खोलण्याचा प्रयत्न सोडून द्यायचा (नाहीतर उगाच वरवंट्याने फोडाल)कारण त्यात माती भरलेली असते. जर खुबे मोठे असतील तर ते विळीवर चिरुन घ्यावेत. कधी कधी ह्या खुब्यांमध्ये चिंबोर्‍याच पिल्लुही असत त्याच्या सोबतीला ते असेल तर काढुन टाकायच.

आता भांड्यात तेलावर लसुण फोडणीला घालायचा व त्यावर कांदा घालुन चांगला बदामी रंग येउ द्यायचा. मग त्यावर हिंग, हळद, मसाला घातुन थोड परतवुन टोमॅटो घालायचा. टोमॅटो परतवुन खेब्यांचे गर, गरम मसाला, मिठ, कोथिंबीर घालुन परतायचे. झाकण ठेउन टोमॅटो थोडा शिजु द्यायचा (खुबे आधी उकडतो तेंव्हाच शिजलेले असतात). मग परत एकदा परतुन गॅस बंद करायचा. अजुन तिखट हवे असल्यास टोमॅटो घालताना मिरची मोडून घालायची. वासही चांगला येतो. लहान मुलांना तर हे खुपच आवडतात.

वाढणी/प्रमाण: 
अपुरेच पडतात.
अधिक टिपा: 

खुबे हे खाडीच्या दलदलीत (चिखलात) सापडतात. खुबे पकडण्यासाठी खुबे पकडणारी माणस लाकडी फळी घेउन चिखलात उतरतात. फळीवर गुडगे ठेउन फळीचा आधार घेउन हे खुबे गोळा केले जातात. ह्या खुब्यांची शिंपली सारखी पांढरी शिंपली आपल्याला समुद्र किनारी सापडतात. कदाचीत ते समुद्रातील खुबे असतील. त्याच्या बाहुल्या, तोरणे बाजारात मिळतात. दलदलीच्या ह्या टाकलेल्या शिंपल्यांना आम्ही लहानपणी भातुकलीच्या खेळात चुल करण्यासाठी घ्यायचो. तसेच भांड म्हणूनही खेळ करायचो. तिन शिंपल्या तिन टोकांना एकत्र लावुन ह्याची चुल करायची व वरती एक शिंपलि भांड म्हणून ठेवायची.

खुब्यांमध्ये कॅल्शियम भरपुर असते. तसेच हे पचायलाही थोडे जडच असतात. खुब्यांचे कालवणही करतात. त्यात आलकोलही घालतात. पण सुकेच जास्त चांगले लागतात.

माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कडे सोललेले म्हणजे त्या शिम्पल्यातले गर एका प्लेट मधे पाण्यात ठेवलेले असतात विकायला. ते घ्यावेत का? ते उकडल्यवर त्याची चव जाणार नाही ना?

ह्या जागूमुळे मासे आणि त्यांच्या वेगवेगळ्या जातींची माहीती मिळते..
जागू मी उत्तमला खुप छळते, तुझ्यापेक्षा मला जास्ती मासे माहीती आहेत म्हणून.. Lol

Pages