फुलपाखराचं गुपीत

Submitted by कविन on 7 January, 2011 - 02:47

आई बघ गं झाडावरती असे काय दिसते?
हिरवी हिरवी अळी बघ ना पान कसे खाते!
सांगना मला बसली कैसी, ती पानावरती,
पंखही नाही तरी कशी गं उडून आली ती?

'अशी कशी ले' उडून येईल ती पानावरती?
बस इथे मी तुला सांगते कुठून आली ती

गोड गोजिरे फुलपाखरु एक दिवस आले
पानावर त्या अंडे घालून भुर्र उडून गेले
अंड्यामधे छोटीशी ही अळीच बसलेली
एके दिवशी अंडे फोडून बाहेर ती आली

अशीच पाने खाऊन आता मोठी ती होईल,
मोठी होता कोष विणून ती आत बसून राहील
कोषामधल्या सुरवंटाचे रुप असे बदलेल,
सुंदरसे बघ फुलपाखरु बनुनी तेची उडेल

असे आहे का गुपीत आई फुलपाखराचे!
ऐटीत सांगेन सर्वांना मी मला समजले जे

गुलमोहर: