बना आणि कला या कथांमध्ये मी इन्व्हॉल्व्हच होत नाही आहे. त्या कथा बाजूला ठेवून ही कथा लिहायला घेत आहे. याबद्दल क्षमस्व!
एका घराची कहाणी मांडता मांडताच वसंत पटवर्धन या सामान्य माणसाचा जीवनपटही बोलका करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या कथेशी कदाचित मी रिलेट होऊ शकेन!
एका एकत्र कुटुंबातील नातेसंबंध आणि त्याचा जीवनावर पडणारा प्रभाव असे काहीसे स्वरूप असलेली ही कथा आपल्याला काही प्रमाणात भावेल असे वाटते.
पात्र परिचयः
------------------------------------------
बाबा - रामकृष्ण पटवर्धन, वय साठ! हल्ली अध्यात्मिक झाले आहेत.
आई - सौ. अरुणा पटवर्धन, वय छप्पन्न! 'सासूपणा' करणे हा आवडता आणि एकमेव छंद!
------------------------------------------
दादा - कुमार पटवर्धन, वय पस्तीस, वडिलांचे स्टेशनरीचे दुकान चालवणे हा व्यवसाय!
अंजली वहिनी - अंजली पटवर्धन, कुमार पटवर्धनांची पत्नी, वय एकतीस, गृहिणी!
उमेश - वय ११, इयत्ता सहावी, कुमार आणि अंजली यांचा मुलगा!
-----------------------------------------------------
अण्णा - शरद पटवर्धन, द्वितीय चिरंजीव, वय तेहतीस, कॉसमॉस बॅन्केत मॅनेजर!
तारका वहिनी - शरद पटवर्धनांच्या पत्नी, वय अठ्ठावीस, गृहिणी!
वेदा - शरद व तारका यांची कन्या, वय आठ, इयत्ता तिसरी!
-------------------------------------------------
राजू - राजेश पटवर्धन, वय तीस, सरकारी नोकरी आणि शाखेत जाणे हे दोनच छंद!
गीता वहिनी - राजेशची पत्नी, वय पंचवीस, एका फर्ममध्ये रिसेप्शनीस्ट कम ऑपरेटर अशी नोकरी!
बिगुल - हे लाडाचे नांव, खरे नांव धवल, वय तीन वर्षे, राजेश व गीता यांचे अपत्य!
--------------------------------------------------------------------
वसंत पटवर्धन - वय सत्तावीस, शिक्षण बारावी, चितळ्यांच्या दुकानात कॅशियर!
--------------------------------------------------------------------
सर्वांचा पत्ता एकच - ७३६ सदाशिव पेठ, हौदासमोर, पुणे ४११ ०३०. आठ खोल्याचे जुने घर!
वरील सर्वांची दिलेली वये ही १९८० सालची आहेत.
-'बेफिकीर'!
================================================
================================================
गीता - लग्न करा आता भावजी...
चमकून वसंतने तोंड वळवून खिडकीबाहेर नजर टाकली. लाजच वाटली त्याला! सहज आपला घरात बसला होता. आज सकाळी दुकानात जायचे नव्हते त्याला! उगाचच आपली रजा काढली होती. दादा, अण्णा आणि राजेश कामावर निघून गेले होते. आई पोथी वाचत सुनांवर लक्ष देण्याचे काम मनापासून करत होती. बाबा देवासमोर बसून आजवर चुकून माकून झालेल्या पापांचे क्षालन व्हावे यासाठी मनापासून प्रार्थना करत होते. उमेश आणि वेदा शाळेत गेलेले होते. अंजली वहिनी स्वयंपाकघरात काहीतरी करत होत्या. तारकावहिनी भाजी आणायला गेल्या होत्या. आणि गीतावहिनी आता आवरून ऑफीसला चाललेली होती. गीता ही एकच वहिनी अशी होती जिला वसंत 'ए वहिनी' म्हणायचा! बाकीच्या मोठ्या होत्या, त्यामुळे त्यांना 'अहो वहिनी'! सर्व वहिन्या मात्र लहान असो वा मोठा, दिरांना 'अहो'च म्हणत होत्या. सौ अरुणा पटवर्धन, म्हणजे सासूबाईंची ती आज्ञा सर्वांनी प्रमाण मानलेली होती.
गीता ऑफीसला जायच्या आधी कॉमन आरश्यासमोर उभी राहून मोगर्याचा गजरा केसात माळत होती आणि मनात काहीही नसूनही आपोआपच वसंत बसून तिच्या हालचाली निरखत होता. अचानक तिने त्याच्याकडे हासत बघत ते वाक्य उच्चारल्यामुळे तो बावचळून खिडकीबाहेर पाहू लागला.
गीता - मी बघू का एखादी सुबक ठेंगणी?? की मनात भरलीय कुणी आधीच??
वसंताची नजर समोरच्या घराच्या त्या खिडकीकडे गेली. गौरी! गौरी केव्हाच लग्न होऊन सासरी गेलेली होती. आता कोण मनात भरणार? तिच्यापुढे तर मन मोकळे करणेही शक्य झाले नव्हते. तिच्या डोळ्यात मात्र कधी कधी दिसायचे ते! 'वसंत कुठे आहे' या प्रश्नाने उत्सुक असलेले तिचे मन!
गीता - काय हो??
वसंत - मी एकदा सांगीतलंय ना?? मी लग्न नाही करणार...
गीता - वेळच्या वेळी लग्न झालेले चांगले असते..
वसंत - मी तुझ्याहून दोन पावसाळे जास्त पाहिलेत.. मला समजते सगळे..
गीता हासली.
गीता - पण मी मानाने मोठी वहिनी आहे... त्यामुळे माझे ऐकायचे..
वसंत - इतर बाबतीत ऐकेन... लग्नबिग्न कोण करणार??
गीता - बिग्न नका करू... लग्न करा...
वसंत - बिगुल उठला नाही अजून??
गीता - अंहं... त्याचंही तेच म्हणणं आहे.. काकाची काकू आल्याशिवाय माझी झोप कमी होणार नाही...
वसंत - का? माझी बायको काय कर्णा घेऊन बोलणार आहे घरात??
हासत हासत गीता म्हणाली..
गीता - आणा तर आधी... मग बघू...
वसंत - तुला सोडायचंय का??
गीता - नाही... अजून वेळ आहे... चालतच जाते...
घरात तीन वाहने होती. एक ऑल्विन पुष्पक स्कूटर दादा वापरायचा, अण्णाची बॅन्क जवळ असल्यामुळे तो चालतच जायचा, राजेशने एक टीव्हीस ५० घेतलेली होती कारण ते दोघेही नोकरी करायचे आणि एक लॅंब्रेटा होती जी तीन वेळा वाकडी केल्याशिवाय आणि किमान पंचवीस किका घातल्याशिवाय चालू व्हायची नाही. पण ती मात्र सगळ्यांमध्ये कॉमन होती. फारच एनर्जी असली तर वसंत ती स्कूटर चालू करायचा कधीकधी! आणि वेदाला फिरवून आणायचा!
घरात एक गीता वहिनीच अशी होती जिच्याशी थट्टेत बोलता यायचं! बाकी सगळे प्रकार एकदम कडक!
गीता वहिनी निघून गेली तशी आई बाहेर आली.
आई - रिकामा का बसलायस??
वसंत - रजा आहे...
आई - का??
वसंत - मित्राचं लग्न आहे..
आई - गेली वाटतं महाराणी...
वसंत - महाराणी गेली का आली ते माहीत नाही... गीतावहिनी आत्ताच गेली...
आई - आणि नातू उठला की धावाधाव कोणी करायची??
वसंत - रोज करतात तेच करतील...
आई - यांच्या नोकर्या म्हणजे बाकीच्यांना त्रास...
वसंत - अर्धा पगार देतीय ना तुझ्याकडे??
आई - तीन माणसं घरात राहतायत... अर्धा पगार देते म्हणजे काय??
वसंत - राजूदादाही देतो की त्याचा अर्धा पगार..
आई - घर चालवून बघ एकदा... म्हणजे कळेल पगार किती असतो अन पैसे किती लागतात...
वसंत - झालं.. उजाडलं एकदाचं घरात... चला... मी जरा जाऊन येतो...
आई - बिड्या फुंकायच्या असतील..
वसंत - देवाला चाललोय...
आई - पारोसा??
वसंत वैतागून चपला घालून बाहेर निघून गेला. आई तशीच देवघरापाशी गेली...
आई - वसंतासाठी स्थळ बघणारात का अध्यात्मातच रमणारात??
बाबा - कमी पाहिली का स्थळं??
अंजली - आमच्या रत्नागिरीला एक आपटे म्हणून आहेत... त्यांची मुलगी आहे...
आई - काही नको... कोकणातले एक स्थळ घेऊन आधीच पस्तावलोयत...
अंजली वहिनींनी मान खाली घातली आणि कुणाचे लक्ष नाही असे पाहून नाक उडवले. इतकी वर्षे झाली तरी माहेरचा उद्धार होतच होता घरात! आणि फक्त त्यांच्याच नाही, तिघींच्याही!
आई - काय करतात ते आपटे??
अंजली - जाउदेत...
आई - अगं बोल ना??
अंजली - आमराई आहे..
आई - मुलगी काय करते??
अंजली - चांगली शिकलीय..
आई - वय??
अंजली - असेल पंचवीस...
आई - पंचवीस?? अन वसंताचं सत्तावीस... का?? इतका वेळ का थांबली लग्नाची ती???
अंजली - जरा... डोळ्यात दोष आहे...
आई - पाहिलतं का हो?? कशी स्थळं सुचवतीय ते..
अंजली - आता वसंतभावजींचं तरी शिक्षण विशेष आहे का?? नोकरी पण बेताचीच आहे ना??
आई - माझा मुलगा आहे तो.. कर्तृत्ववान निघेलच... तू काम कर... असली स्थळं सुचवण्यापेक्षा..
अंजली - उठला वाटतं बिगुल...
धावाधाव झाली. बिगुल महाराज उठले आणि टकामका बघू लागले. अंजली वहिनींनी त्याला उचलले. पाठोपाठ आई आणि बाबाही पोचले. आता सगळी कामे सोडून तिघेही बिगुलच्या मागे लागले.
इकडे वसंता चालत चालत चित्रशाळेपाशी आला आणि लक्ष्मी रोडला वळून अंबादासमध्ये जाऊन बसला. पनामा पेटवून एक कटिंग ढोसल्यावर नेहमीचेच विचार सुरू झाले.
आयुष्य! काय आहे आयुष्य आपले! आहोत म्हणून आहोत! नसतो तरी चालले असते. तसे तर काय, कुणीच नसते तरी चाललेच असते की! हे बाबा, चोवीस तास देवासमोर बसतात! निर्जीव मूर्ती अन फोटो सगळे! बाबांना कुठे असामान्य केलं देवाने? सामान्यच ठेवलंय! सगळेच सामान्य आहेत साले!
मीच का चितळ्यांच्या दुकानात नोकरी करायची?? सगळ्यात कमी शिकलेलो आहे म्हणून खरे तर मला दुकान चालवायला द्यायला पाहिजे ना? पण दादा?? तो मोठा! त्याचा अधिकार आधी! मोठा आहे म्हणून जबाबदारीही घ्यायला हवी ना... ती कुठे घेतोय?? काय पैसा कमवतोय! रोजची विक्रीच हजारभर रुपयांची असेल! दिवसाचे दिड दोनशे तर नक्कीच सुटत असतील! पुन्हा हिशोब कुठे द्यावा लागतो घरी? ठरलेले तीन हजार दिले की मोकळे! कदाचित दहा हजारही कमवत असेल तो! आणि मी?? बाराशे रुपये!
अण्णा आणि राजूदादालाही काही प्रॉब्लेम नाही आहे दादाने दुकान हातात घेतले याचा! कुणालाच कसा प्रॉब्लेम नाही?? फक्त मलाच हा प्रॉब्लेम आहे म्हणजे मी वाईट असणार बहुधा विचारांनी!
पनामा! फिल्टर नसलेल्या या सिगारेटी दोन्ही बाजूंनी तशाच दिसतात. इकडून ओढली काय अन तिकडून पेटवली काय! आपल्या आयुष्यासारखी! असले काय अन नसले काय! वन अॅन्ड द सेम!
हं! बी कॉम करणार होतो म्हणे! कसलं बी कॉम अन कसलं बी ए! घराच्या दुरुस्तीसाठी झालेला खर्च प्रमाणाबाहेर वाढला. सगळ्यांचे ठरले, वसंताला पुढच्या वर्षी घालू कॉलेजला, आत्ता त्याला नोकरी मिळवून देऊ! मग अण्णाचा एक जण ओळखीचा होता त्याच्या वशिल्याने चितळ्यांनी काउंटरवर घेतले. दहा वर्षं झाली आज आपण बाजीराव रोडच्या त्याच दुकानात सकाळी आणि संध्याकाळी नोटा मोजत बसतो. चार वर्षं झाल्यानंतर आधीचा कॅशियर काम सोडून गेला तेव्हा 'त्यातल्या त्यात प्रामाणिक' वाटल्यामुळे आपल्याला ते काम दिले आणि पगारही वाढवला.
रोजचा गल्ला टॅली करताना असं वाटतं.. साला एक दिवसाची कॅश घेऊन पळून गेलो तर दोन वर्षे कामही करावे लागणार नाही आपल्याला..
पण हे भोसडीचे ब्राह्मणी संस्कार! कष्टाने मिळेल ते आपले, अधिक मोह नको, लोभ नको, साहसे करू नयेत, रुपाया खिशात असला तर दहाच पैसे खर्च करावेत आणि नव्वद पैसे शिलकीत टाकावेत!
नोकरीची अन पैशांची चटक काय लागली, शिक्षण सोडलंच आपण! हा दोष तरी आपला आहे का??
नाही, पूर्णतः तरी नाहीच! पुढच्या वर्षी अॅडमिशनचे पैसे देताना फेरविचार केला साला सगळ्यांनी!
म्हणे पार्टटाईम नाही का करता येणार? दिवसातले दहा तास नोकरी, किमान सात तास झोप आणि घरकामांना देत असलेले तीन तास सोडले तर उरलेले चार तास फक्त अभ्यास करायचा का?
मग जगायचे कधी??
कॉलेज लाईफ! किरण्या नेहमी सांगायचा, 'वश्या, लेका कॉलेज लाईफ पाहिजेच लाईफमधे'!
लाईफ पाहिजे ना पण लाईफमध्ये आधी! मग बाकीचे!
निकाल लावला सगळ्यांनी! वसंत पार्टटाईम बी कॉम करेल!
पण आपण तरी काय आहोत?? आपल्याकडे पुरेसा पैसा आल्यावर आपण का नाही नोकरी सोडून शिक्षण पूर्ण केलं??
पैसा! त्यावेळेसचा अर्धा पगार म्हणजे जेमतेम तीनशे रुपयेही काय होते आपल्यासाठी! आपल्यासारखे कुणीच नव्हते आळीत तेव्हा!
मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू
आयी ऋत मस्तानी कब आयेगी तू
बीती जाये जिंदगानी कब आयेगी तू
चली आSSSS आ तू चली आSSS
काय शिट्टी वाजवायचो आपण त्यावेळेस! सहा वेळा आराधना पाहिला भानुविलासला! राजेश खन्नावर पोरीच काय, पोरंही भाळली होती त्यावेळेला! तो मध्या साला अगदी मान वगैरे वाकडी करून हलके स्मितहास्य करायचा! पुढचे तीन दात किडलेले आणि चालला राजेश खन्ना व्हायला आळीचा!
शर्मिला टागोरचं ते निळी साडी नेसून रेल्वेच्या खिडकीतून बाहेरच्या राजेश खन्नाकडे बघत नाजूक हासणं! गौरीही तशीच हासते असे वाटायचे आपल्याला! परवा दोन मुलांना घेऊन आली तर कसली जाड झालेली दिसली. हल्ली अगदी आरामात गप्पा होतात आपल्या तिच्याशी, तेव्हा साला एक शब्द फुटायचा नाही तोंडातून!
राजूदादाचं बरंय, सरकारी नोकरी करा कॉंग्रेसची आणि आले की शाखेत जा! संघ दक्ष, पोरींकडे लक्ष! सकाळी फुलपँट, संध्याकाळी हाफपँट! रात्री... जाउदेत... सख्खा भाऊ आहे आपला!
पेपरात काय आलंय??
"ओ... एक कटिंग द्या अजून..."
तिच्यायला??? गावसकर अन वेंगसरकर लागोपाठ कॉट बिहाईंड?? माल्कम मार्शल म्हणजे राक्षस आहे साला! पण आपली टीमच बेकार आहे. वर्षानुवर्षं रेकॉर्ड करत बसतात नुसते!
देशपांड्यांकडच्या टीव्हीवर सगळे मॅच बघायचो तेव्हा बाबा काय म्हणायचे?? अभ्यासात लक्ष द्या! मग जेव्हा अभ्यासात लक्ष घातलं तेव्हा कशाला नोकरी करायला सांगीतली??
स्वतःला आयुष्यात एक टीव्ही नाही घेता आला! आता देवासमोर बसतात! त्यांना तरी काय दोष द्यायचा म्हणा? बापच आहे आपला! बिगुल उठला असेल!
"ओ... अहो कटिंग द्या ना एक??"
इंदिरा गांधी पुण्यात येणार!
"केसरी नाहीये का हो??"
हं! केसरीत पिक्चरच्या अॅड चांगल्या येतात जरा! गरम धरम आणि तारुण्याने मुसमुसलेल्या रेखाचा धसमुसळा प्रणय वगैरे! अलकाला कुठलाय?? बंडल! ह्योच नवरा पाहिजे.. हा दादा कोंडके द्वयर्थी लिहितो, लोक आयुष्यभर द्वयर्थी वागतात त्याचं काय! म्हणे 'वसंता म्हणजे शेंडेफळ'! सरळ का नाही सांगत बाबांचे माझ्यावर जास्ती प्रेम असल्यामुळे माझे कसेही वागणे खपवून घेतले जात आहे हे!
मिनर्व्हा! कटी पतंग! ना कोई उमंग है, ना कोई तरंग है! मेरी जिंदगी है क्या, बस इक कटी पतंग है! त्या आशा पारेखला पांढर्या साडीत कोरलेल्या भुवया ताणून या गाण्यावर नुसते ओठ हालवायला लाखो मिळाले असतील! आमचा 'कटी पतंग' कुणाच्या गच्चीवर पडणार की विजेच्या तारेत अडकून...
आर्यन ... सांगत्ये ऐका.. घंटा सांगत्ये ऐका.. तमाशामधून मराठी पिक्चर बाहेर पडेल त्या दिवशी मी सत्यनारायणच घालणार आहे... एकही न पाहिलेला पिक्चर कसा काय नाही?? उद्या शुक्रवार आहे... उद्या बदलतील सगळे...
अपोलो... शौकीन... म्हातारा अशोक कुमार लेकाचा आंबट शौकीनपणा करताना दाखवलाय..
अल्पना ... मै प्यासी तुम्हारी... एक लोकट ब्लाऊज घातलेली बाई झळकवायची पोस्टरवर... अन काढायचे पैसे... ब्लॅक अॅन्ड व्हाईट पोस्टर्स मुद्दाम देतात साले.. कारण त्यामुळे उत्सुकता अधिक वाटते म्हणे पब्लिकला.... कैकवेळा बघितले हे मल्याळम पिक्चर्स.. सव्वा दोन तास यंडुगुंडू आणि शेवटी एक मिठी... त्यानंतर काय झाले असेल याच्या कल्पना करत पब्लिक शिव्या देत बाहेर... आणि हे असले पिक्चर्स मॉर्निंगला का असतात काय माहीत?? रामप्रहरी पब्लिक कामावर चाललेलं असतं... ते सोडून हे प्यासी औरत अन तडपती जवानी कुठे बघणार?? यावेळेसचं मॉडेल नवीन दिसतंय.. जाऊदेत...
श्रीनाथ... जंजीर... एकवीसवेळा पाहिलाय... मै आज तुमसे वो बात कहना चाहता हूं.. जो आजसे पहले लाखो करोडो बार दोहरायी गयी है... आय लव्ह यू...
हा अमिताभ प्रेम व्यक्त करतानाही सूड घेतल्यासारखा का बोलतो काय माहीत??
रतन... पडोसन.. भंकस...
विजय ... सिंहासन... आणि मॅटिनीला शोले... ये हाथ मुझे दे दे गब्बर.. ये हाथ मुझे दे देSSSSS
डेक्कन... हां... असं काहीतरी पाहिजे... बॉSSSSSSSSSबीSSSSSSSS
'डॅड... कश्मीर का मौसम बहुत बढिया है....'
"कश्मीर का मौसम बढिया है... और यहां आSSSSSSग लगी हुवी है'
प्राण! प्रेमनाथ! ऋषी कपूर! अरुणा इराणी! आणि आईगं... डिम्पल... दिल यहीं होता है ना??
चला! बॉबीच बघू!
बिगुलसाठी गोळ्या घ्यायच्या का?? नको... गीतावहिनी रागवतात... पण... पण तरी... बिगुल तर आपलाच आहे ना?? घेऊच दोन गोळ्या...
वसंता गोळ्या घेऊन घरी पोचला.
आई - वसंता.. इकडे ये...... बस इथे...
वसंत - काय??
आई - एक मुलगी आहे... जरा तिरळी आहे.. पण घर मोठंय...
वसंत - प्लच... काय तोच तोच विषय...
आई - उठून जाऊ नकोस... आज मला सोक्षमोक्ष लावायचाच आहे...
वसंत - मी लग्न करणार नाही आहे..
आई - आम्हाला आमच्या पश्चात तू एकटा आहेस ही काळजी नकोय... लग्न केलंच पाहिजे..
वसंत - मी नाही करणार...
आता बाबा उठून आले.
बाबा - वसंता.. ऐकत जा... लग्न केल्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो... काहीतरी उद्देश राहतो ...
वसंत - बाबा... तुम्ही हे जे असलं काय काय बोलता ते मला काही पटत नाही...
अंजली वहिनी संवादात पडल्या.
अंजली - आमच्या रत्नागिरीची मुलगी आहे.. माझ्या माहितीतली आहे... चांगलं घर आहे... आणि मला सागा... आयुष्यभर काय एकटे राहणार आहात का??
वसंत - एकटा म्हणजे काय?? आपण आहोत की सगळे??
अंजली - माणसाला एक हक्काचं माणूस लागतंच आयुष्यात..
वसंत - वहिनी.. तुम्ही मोठ्या आहात.. मी काही बोलत नाही.. पण मला हे अजिबात पटत नाही..
आई - आता आम्ही जास्त ऐकणार नाही आहोत.. अंजली.. तू कळव त्यांना मुलगी दाखवायला यायला..
वसंत - मी मुलगी बघणार नाही..
बाबा - अरे पण का?
वसंत - मला लग्न करायचंच नाही आहे..
बाबा - का पण?? कारण तर सांग ना??
वसंतने बाबांच्या डोळ्यात पाहिले.
वसंत - बाबा, तुम्हाला माहीत आहे, तरीही परत परत तेच का विचारता? माझं शिक्षण नाही, धड नोकरी नाही, उगाच जबाबदारी वाढवायची आणि कायमचे दु:खी व्हायचे... कशाला हवंय हे सगळं...
आई - झोपडपट्टीतले लोकही लग्न करतात... असे प्रत्येकजण परिस्थिती पाहून लग्न करायला लागला तर गरीबांची लग्नच व्हायची नाहीत...
अंजली - पण तुम्हाला दुसरी नोकरी मिळेल ना....
वसंत - कुठे मिळेल?? करता का प्रयत्न?? बारावी पासला लावता नोकरीला??
अंजली - न मिळायला काय झालं नोकरी?? प्रयत्न तरी करताय का??
वसंत - सगळे माझ्यामागे का लागताय??
आई - अंजली.. तू सांग त्यांना मुलीला आणायला..
वसंत - माझा नकार आहे म्हणून आधीच कळवा वहिनी...
अंजली - इतकं चांगलं स्थळ शोधून मिळणार नाही...
वसंत - स्थळ नकोच आहे...
अंजली - आमराई आहे, दुसरीही बहीणच आहे, आहे ते मुलींनाच मिळणार, किती सगळं चांगलंय..
वसंत - इतकं सगळं असेल तर तेच मला नकार देतील..
अंजली - काही नकार देत नाहीत... बोलवतेच मी त्यांना...
वसंत - जमणार नाही... मी मुलीला पाहायला घरात थांबणार नाही..
वाद बराच वेळ चालला. जेवताना वसंत अबोलच होता. बिगुलला फक्त खेळवत होता. आज रजा असल्यामुळे तो दुपारचा मस्तपैकी झोपून गेला. आपण किती वेळ झोपलो आहोत याचे भान त्याला उठताना राहिले नव्हते. जाग आली तीही बिगुल सरळ पोटावर बसल्यामुळे!
वसंत - अरे?? बिगलोबा?? भूर नाही का गेलात आज??
बिगुलचे निरागस हसणे बघताना होणारा आनंद काहीसा झाकोळला... कसलीतरी कुजबुज ऐकू आली पलीकडच्या खोलीतून! बिगुलच्या आवाजातून ती कुजबुज लक्षपुर्वक वेगळी काढून ऐकताना वसंतच्या कानावर पडलेली वाक्ये...
"तुम्हाला आज स्पष्ट बोलायलाच पाहिजे... हे काय हे??"
दादा आणि अंजली वहिनी बोलत असावेत.
"सगळ्यांसमोर काही नकोय बोलायला... बाबांशी बोलेन एक दोन दिवसात..."
"हे असंच चाललंय पहिल्यापासून... थोरले थोरले म्हणून कायम जबाबदार्या सारख्या आपल्याच"
"ठीक आहे... जरा वेळ पाहून बोलतो..."
"काही वेळ बिळ नाही... मीच काढते आज विषय जेवताना..."
"अंजली घोळ करू नकोस.. "
"घोळ झालेलाच आहे... तो निस्तरणार आहे मी.."
काय विषय असावा हे काही वसंताला समजत नव्हते. पण कुजबुज चाललेलीच होती. मात्र आज त्याने ठरवले. सगळ्यांबरोबर जेवायचेच! काय विषय निघतो बघायचे!
आणि जेवताना विषय निघालाच....
सगळे एकत्र जेवायला बसलेले होते. गीतावहिनी सगळ्यांना वाढत होती. ती आणि तारकावहिनी नंतर जेवणार होते. गीता सासरी आल्यापासून अंजली वहिनी सगळ्यांबरोबर जेवायला बसू लागल्य होत्या. आधी त्या आणि तारकावहिनी थांबायच्या!
अंजली - बाबा.. एक खूप चांगली संधी आलीय...
वसंताला जाणवले. विषय सुरू झालेला आहे. पहिला मुलामा चढवण्यात आलेला आहे.
बाबा - कसली गं??
अंजली - सांगा ना हो...
आता आई निरखून दादाकडे पाहू लागल्या.
दादा - ते... आपलं दुकान ज्या वाड्यात आहे त्याचे मालक आहेत ना???
बाबा - वाळिंबे ना??
दादा - हां..
बाबा - ....
दादा - ते वाडा पाडून बिल्डिंग बांधणार आहेत...
बाबा - जन्मभर तेच बोलतोय लेकाचा... त्याला म्हणाव पाडायला बुलडोझर आणलास की सांग..
बाबांनी दादाचा तो प्रस्ताव मांडला जाण्यापुर्वीच त्यातली हवा काढून घेतली.
त्यामुळे अजली वहिनींच्या चेहर्यावर वैताग स्पष्ट दिसला. दादाही वैतागला.
दादा - नाही नाही.. यावेळेस सगळ्यांची मीटिंगही झाली...
बाबा - मग??
दादा - दोन महिन्यात काम सुरू होईल.. बिल्डरही शोधलाय..
बाबा - कोण रे??
दादा - हिंदुजा म्हणून आहे... कॅम्पातला..
बाबा - मारवाडी का??
दादा - काय माहीत... तर... आपला गाळा...
बाबा - ....
दादा - दोन लाख दिले तर मालकीचा करतोय म्हणाला...
बाबा - तो काही करत नाही रे... आयुष्यात त्यानी काही केलं नाही.. नुसती बकबक...
दादा - नाही नाही अॅग्रीमेन्ट करतायत सगळे.. शेजारच्या वाण्याने तर दिलेही पैसे...
बाबा - ... दिले??
दादा - होय..
बाबा - पण दोन लाख म्हणजे फार मागतोय नाही??
दादा - असं कसं?? मार्केट पाहिलं तर त्या जागेचे सात लाख होतील..
बाबा - ... पण.... एवढे आहेत का??? ... तुझ्याकडे????
सर्वच्या सर्व हातातील घास थांबलेले होते आणि कान दादाच्या बोलण्याकडे लागलेले होते. बाबांच्या प्रश्नाने दादा अधिकच वैतागला होता. पण शांतपणा ढळून देऊन उपयोग नव्हता.
दादा - आता तीन हजार तर घरातच देतोय..
तारका वहिनींनी अण्णांकडे पाहिले. गीताने राजेशकडे! वसंता मात्र ताटाकडेच पाहात होता.
बाबा - .. मग??
दादा - तुम्ही दिलेत तर तुमचे फेडून टाकीन...
मुद्दा सगळ्यांच्याच लक्षात आला होता. बाबांकडे असलेल्या तुटपुंज्या तीन लाखांच्या पुंजीपैकी दोन लाख दादा एकटाच मागत होता. परतफेड करणारच होता, पण ती हप्त्यात! तोवर कुणाला इतरांना एकरकमी रक्कम काही कारणासाठी लागली तर त्यावेळेस बाबा मदत करू शकणार नव्हते..
बाबा - .. तुझं... तुझं किती आहे सेव्हिंग...
अंजली - सेव्हिंग होतंय कुठे?? खर्च किती आहेत...
अंजलीचे हे विधान अत्यंत कर्ट स्वरात बाहेर पडलेले होते. आता मात्र आई मध्ये पडल्या.
आई - खर्च सगळ्यांचेच होतायत.. आम्ही तर यांच्या एकट्याच्या पगारावर चार मुलांचे संसार उभे केलेत..
हे विधान सरळ सरळ भांडणाची सुरुवात होण्याइतपत स्पष्ट विधान होते.
अंजली - आमचे खर्च वेगळे आहेत... उमेशची मुंज केली दोन वर्षापुर्वी... त्यातच तीस हजार गेले.... घरात तीन हजार देतोच आहोत महिना... त्यात ह्यांच्या ऑपरेशनला अठरा हजार लागले..
मोठा भाऊ आणि मोठ्या वहिनी बोलत असल्यामुळे अण्णा, राजेश आणि वसंता मधे बोलू शकत नव्हते. पण आईंना कुणाची भीती असणार? त्यांच्यासाठी गीताही सूनच आणि अंजलीही सूनच!
आई - आमच्याकडे असलेले सगळे पैसे आज त्या दुकानात घातले अन उद्या आम्हाला लागले तर??
हा मुद्दा बिनतोड होताच, पण त्यावर अंजलीवहिनींनी विचारही केलेलाच होता.
अंजली - पण तुमची सगळी जबाबदारी आमचीच आहे ना मोठा मुलगा अन सून म्हणून.. ती कुठे नाकारतोय आम्ही??
आई - अगं पण पैसा लागला तर काय करायचं??
अंजली - आणि आम्ही दर महिना हप्ता देणारच आहोत तुम्हाला... म्हणजे.. वेगळा.. या दोन लाखांचा..
आई - दोन लाखांचा म्हणजे??
अंजली - म्हणजे दोन लाख आम्ही महिना हप्त्यात फेडणार...
आई - असं कसं?? एकरकमी पैसा लागला तर काय करणार??
बाबा - पण तू लोन घे ना कुमार...
दादा - लोन कशाच्या बेसिसवर मिळणार? दुकान तुमच्या नावावर, घर तुमच्याच नावावर..
बाबा - शरदला कॉसमोसमधून मिळेल की लोन..
या विधानामुळे आत्तापर्यंत चूपचाप असलेल्यांपैकी शरद म्हणजे अण्णा त्यात ओढला गेला.
अण्णा - मला लोन मिळेल पण ते घरासाठी वगैरे...
बाबा - हो पण घरासाठी घेऊन आपण दुकान बांधू.. त्यांना काय प्रॉब्लेम??
अण्णा - असं कसं?? कोणते घर आहे ती सगळी कागदपत्रे दाखवावी लागतात..
इतका वेळ फक्त बाबांशीच बोलणारा दादा आता शरदशी बोलू लागला.
दादा - तू पर्सनल लोन घे की?? मी फेडतो हप्ते..
या विधानामुळे तारकावहिनींना मधे बोलायचा हक्क प्राप्त झाला.
तारका - आणि आम्हाला लोन लागलं तर??
दादा - तुम्हाला कशाला लागेल??
तारका - समजा लागलंच तर काय करणार??
दादा - आपण सगळे आहोतच ना एकत्र...
तारका - आणि एकदा पर्सनल लोन घेऊन ते फेडलं की पुढची पाच वर्षे दुसरे लोन घेता येत नाही...
दादा - मग??
तारका - तोवर वेदा लग्नाची नाही का होणार??
अंजली - तारका.. तू जरा थांब... भावाभावांना बोलूदेत..
अंजलीच्या या विधानामुळे तारका चरफडत गप्प बसली.
'वयाने मोठ्या असलेल्यासमोर गप्प बसणे' या तत्वावरच ते घर उभे होते आजवर! आणि सध्या बाबा हे कुटुंबाचे हेड होते, मात्र ते निवृत्त असल्यामुळे दादा आणि ते, हे दोघेही बाकी सगळ्यांना एकाच जागी होते. आई मात्र या सर्व तत्वांच्या पलीकडे होत्या. त्यांना वाटेल तेच त्या बोलायच्या!
अण्णा - दादा.. मला लोन लागलं तर काय करणार मी पुढच्या दहा वर्षात??
दादा - दहा वर्ष कशाला?? तीन चार वर्षातच लोन फेडू आपण..
अण्णा - हो पण त्यानंतर पाच वर्षाच्या गॅपनेच लोन मिळते..
दादा - हो पण मी आहे ना.. आणि आज आपण दुकानाचं भाडं भरतोय ते नाही का वाचणार??
अण्णा - दुकानाचं भाडं दोनशे रुपये आहे.. त्यानी काय होणारे??
दादा - ते मला माहितीच आहे.... तू नाही म्हणणार.. म्हणून तर बाबांकडे मागत होतो मी..
अण्णा - अरे पण त्यांचा काही दवाखान्याचा वगैरे खर्च झाला तर त्यांनी कुठून करायचा??
दादा - ते त्यांना बोलूदेत.. तू सगळ्यांच्या वतीने बोलू नकोस..
बाबा - पण आपण नाही दिले दोन लाख तर काय होणार आहे??
दादा - काय होणार म्हणजे जागा जाईल नावची...
बाबा - पण अशी कशी जाईल?? त्याचे त्याने पैसे नकोत का द्यायला??
दादा - मग देतोय ना तो... तो म्हणतोय साठ हजार घ्या अन वेगळे व्हा.. नाहीतर दोन लाख द्या...
बाबा - साठ हजार कसे काय?? त्याला मार्केट रेट का नाही??
दादा - अहो पस्तीस वर्षं वापरलीय ती जागा आपण..
बाबा - याला काही अर्थ नाही...
अण्णा - पण मग ते साठ हजार...
परत सगळ्यांचे घास हातातच थांबले. आणि कान आता शरदकडे लागले.
दादा - .... काय??
अण्णा - ते साठ हजार घेतले तर ते बाबांना मिळायला पाहिजेत ना??
दादा - हो मग ते काय मी थोडीच घेणार आहे??
अण्णा - नाही नाही.. मी आपलं बोललो...
कडवटपणा निर्माण व्हायचा तो झालेलाच होता.
अंजलीवहिनींनी त्यात आणखी कारल्याचा रस ओतला.
अंजली - मी म्हणालेच होते तुम्हाला... काही उपयोग नाहीये बोलून.. काही नाही.. ते साठ हजार घेऊन बाबांना द्या अन तुम्ही काम शोधा...
बाबांचे वागणे भावनाप्रधान होते तर आई व्यवहारी!
बाबा - कुमार... एक पन्नास हजारापर्यंत देईन मी...
बाबांचा हिशोब सरळ होता. त्यांच्याकडे तीन लाख होते. चार मुलांना पन्नास पन्नास हजार द्यायचे अन एक लाख स्वतःसाठी आणि बायकोसाठी ठेवायचे. तेच पन्नास हजार ते आत्ता दादाला ऑफर करत होते.
दादा - नको... असुदेत... नाहीतरी दुकानही तेवढं चालत नाहीच..
'दुकान फारसं चालत नाही' या विधानावर तारकाच्या तोंडातून एक उपरोधिक नि:श्वास गेलेला सर्वांना ऐकू आला. अंजली डोळे रोखून तारकाकडे पाहू लागली. राजेश, गीतावहिनी आणि वसंता यांना अजून मधे पडण्याचे काही कारण निर्माण झालेले नव्हतेच!
तेवढ्यात थोडा बाजूला बसलेला बिगुल एका जुनाट तीनचाकी सायकलवर बसून तिथे आला. त्याला पाहून वेदा म्हणाली..
वेदा - पायडील मारता यायला लागलं आता याला... किती जुनी सायकल आहे ना??
विषयांतर झाल्यामुळे सगळ्यांनाच वैताग आला होता. तेवढ्यात बाबा म्हणाले..
बाबा - फार जुनी सायकल आहे ती... कुमारसाठी आणली होती... अजून चालतीय कशी काय माहीत.. पुर्वीच्या सगळ्या वस्तूच खणखणीत.. कुमार खेळला.. मग कुमार शरदला त्याच्यावर बसवून हौदापर्यंत फिरवून आणायचा.. पुढे मग शरदने राजेशला फिरवले कितीतरी वेळा..... अन मग राजेशने वसंताला...
यावेळेस मात्र प्रत्येकाच्या हातातला घास थांबला तो वेगळ्याच कारणाने...
... सायकलकडे प्रत्येकाचे डोळे लागलेले होते... पण सायकल नीटशी दिसत कुणालाच नव्हती... कारण डोळ्यांच्या पटलांवर पाणी साचू लागलेले होते...
खटकन शरदने कुमारकडे पाहिले.. कुमार बाबांकडे पाहात होता... राजेश शरदकडे... आणि वसंता एकटाच उद्गारला..
वसंता - दादा.. मी.. मधे बोलू का?? ... वीस हजारापर्यंत... मी पण देतो... दुकान तसंच ठेव..
ते ऐकून त्याचा अर्थ कुणाला नीटसा समजायच्या आधीच शरद तारकाकडे बघत म्हणाला..
शरद - आणि आपल्याला काही अडचण आली तर काय त्याच्यात?? ... सगळे आहेतच की?? दादा.. मी लोन काढतो... जमेल तितकं.. दुकान घालवायचं नाही आपलं..
राजेश - छे छे... जमेल तितक कशाला काढतोयस लोन अण्णा?? अरे मी नाही का देणार पस्तीस एक हजार???
त्या रात्री कुमारच्या कुशीत रडत रडत अंजलीवहिनी म्हणाल्या..
"मी चुकले... मला माफ करा... मी आज बोलायलाच नको होतं..."
कुमार तिला थोपटत होता..
पलीकडच्या खोलीत शरदला तारका म्हणत होती...
"दृष्ट लागावी असं घर आहे नाही आपलं??.. मी अंजलीवहिनींची उद्या माफी मागेन... चुकलंच माझं.."
त्यावर शरद प्रेमाने हासत तिच्या खांद्यावर थोपटत होता..
त्याही पलीकडच्या खोलीत आई बाबांना म्हणत होत्या...
"आपलं काय हो इतकं म्हातार्यांचं... देऊन टाका त्याला पैसे.. कशाला सगळ्यांना आपल्यामुळे त्रास??"
बाबा आईकडे आश्चर्यानेच पाहात होते..
पाचव्या खोलीत गीता राजेशला म्हणत होती...
"दादांना उद्याच आणून द्या पैसे... एकाच घरात राहतील.. तुमच्याकडे काय अन त्यांच्याकडे काय..."
राजेश होकारार्थी मान हालवत होता.
आणि 'गौरीला विचारले अन ती हो म्हणाली अन घरच्यांचा विरोध असला तर पळून जायला लागतील' म्हणून बचत सुरू केल्यापासून जो उघडलेलाच नव्हता तो डबा उघडून...
.... वसंता त्याच्या खोलीत पैसे मोजत बसलेला होता...
छान सुरवात...... पु. ले. शु.
छान सुरवात......
पु. ले. शु.
छान सुरवात......
छान सुरवात......
छान सुरवात आहे....
छान सुरवात आहे....
मस्त!
मस्त!
अप्रतिम नेहमीप्रमाणेच
अप्रतिम नेहमीप्रमाणेच
पुढचे भाग लवकर येऊ द्यात
पुढचे भाग लवकर येऊ द्यात बेफिकीरजी.
मस्त!! ही रंगणार
मस्त!! ही रंगणार दणक्यात....पहिला भाग आवडला.
ती कला आणि बना मला पहिल्या एक दोन परीच्छेदातच अपील नव्हती झाली भूषणजी...क्षमस्व!!
चांगला भाग. बाकी बोक्याला
चांगला भाग.
बाकी बोक्याला बाजुला ठेवू नका, येवु दे त्याला अधुन मधुन.
अरे वा नविन विषय... मस्त
अरे वा नविन विषय...
मस्त सुरुवात....
सर्वांचा आभारी आहे.
सर्वांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!
मस्तच !! अप्रतिम...... कहि
मस्तच !! अप्रतिम...... कहि शब्दचं नाहित.......आवडला , एकदम आवडला
मस्त! पण "संघ दक्ष, पोरींकडे
मस्त!
पण "संघ दक्ष, पोरींकडे लक्ष! सकाळी फुलपँट, संध्याकाळी हाफपँट............." असली तिरंदाजी टाळता आली तर बघा. ऊडदामाजी काळे गोरे हा न्याय सरसकट लागु होत नाही असे वाटते.
हा आला बेफिकीर टच कथेला.
हा आला बेफिकीर टच कथेला. Welcome
अप्रतिम........ हेच हव होत
अप्रतिम........ हेच हव होत कदाचित... मस्त वाटल वाचुनच......
भन्नाट सुरुवात
भन्नाट सुरुवात बेफिकीरजी!................ येउद्या..............................................
बरं वाटलं... येउ द्या पुढ्चे
बरं वाटलं... येउ द्या पुढ्चे भाग
ही कथा छान आहे.. पण बोका ला
ही कथा छान आहे..
पण बोका ला बाजुला ठेऊ नका प्लीज..
चला सुरुवात तर चांगली झाली
चला सुरुवात तर चांगली झाली आहे, तुमच्या मनाप्रमाणे लिखाण होऊ द्यात. तुम्हाला लिहायला त्रास होणार नाही आणि आम्हालाहि वाट बघायला लागणार नाही.
बोका मात्र येऊ द्यात अधून मधून प्लीज
हां हे जमल. ते कला आणि बना
हां हे जमल. ते कला आणि बना दोन्हि काहि जमत नव्हते.
बाकि बोका फारच मस्त.
बेफिकीरजी, तुमच्या बना आणि
बेफिकीरजी,
तुमच्या बना आणि कलाची लढाई या दोन्ही मी अजिबात वाचल्या नाहीत. याचे कारण तुम्ही स्वतःच त्यांच्यात गुंतत नव्हतात आणि माझ्या मताप्रमाणे जर लेखकच कथेशी एकरूप होऊ शकत नसेल तर चांगली कथा आकाराला येत नाही.
तुमची ही नवीन कथा मात्र चांगली रंगेल असे वाटते. सुरुवात खरेच छान झाली आहे. सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पुलेशु.
प्रिया
खुपच छान सुरवात.
खुपच छान सुरवात.
व्वा..छान सुरुवात या
व्वा..छान सुरुवात या कादंबरीची ही.. टू व्हीलर्सचे वर्णन.. नॉस्टेल्जिक.. ऑल्विन पुष्पक, लॅम्ब्रेटा ही नांवे ऐकूनही किती दशके लोटलीत
छान सुरवात आहे. पुढचे भाग
छान सुरवात आहे. पुढचे भाग लवकर येऊ द्यात बेफिकीरजी.
मस्तच बेफिकिरजी... आवडला
मस्तच बेफिकिरजी... आवडला पहिला भाग... पुढचा भाग लवकर येऊदेत...
चांगली सुरूवात आहे...
चांगली सुरूवात आहे...
अरे वा! ही कादंबरी खरंच मस्त
अरे वा! ही कादंबरी खरंच मस्त आहे! आवडली जॉईंट फॅमिली म्हणजे रंगवायला भरपूर स्कोप आहे. बरीच पात्रे आहेत ना...
रच्याकने, वसंत कादंबरीचा नायक आहे का? त्याचे पण पहिले प्रेम अयशस्वी...नेहमीप्रमाणेच...
सायकलचा भावनाप्रधान प्रसंग आवडला.
सहि................ हे
सहि................
हे वाच्ल्याबरोबर अस वाटल 'ये हुई ना बात...'
आता लवकर लवकर येऊद्यात पुढचे भाग........
सर्वांचा मनापासून आभारी आहे.
सर्वांचा मनापासून आभारी आहे.
-'बेफिकीर'!
मस्त ! कथा आवडली !
मस्त ! कथा आवडली !
सुरवात झकास! मस्त रंगणार.
सुरवात झकास! मस्त रंगणार.
Pages