वेगवेगळी फुले उमलली . . .

Submitted by जिप्सी on 3 January, 2011 - 00:37

मराठी गाणी – माझ्या आवडत्या छंदांपैकी एक (नाही नाही तुम्ही "धन्य ते गायनीकळा विभागात नसुन प्रकाशचित्र विभागातच आहात :-)). मराठी भावगीत, चित्रपटगीत, भक्तीगीत, लोकगीत, नाट्यगीत न आवडणारा मराठी माणूस विरळाच. मी तानसेन नाही, पण कानसेन मात्र नक्कीच आहे. त्यामुळेच आजही आवडीचे गाणे लागले कि अगदी तल्लीन होऊन ऐकत राहतो. कधी कधी तर हिच मनातली गाणे आपल्या नकळतच ओठांवर येतात. संगीतात हिच तर जादू आहे.
कधी जर उदास वाटत असेल तर एखादे आवडीचे गाणे ऐका नक्कीच मन पुन्हा ताजेतवाने होऊन जाईल. एकदा प्रयत्न करून पहाच. Happy
-
फुले – निसर्गदेवतेची अद्भुत कलाकुसर. पाहताक्षणी मन प्रसन्न करण्याचे सामर्थ्य असलेला निसर्गाचा सुंदर अविष्कार. जन्मापासुन मृत्युपर्यंत सुखदु:खाच्या क्षणात सोबत करणारे. अगदी पहिल्या प्रेमाची कबुली देतानाही याची साथ हवीच. कोणत्याही रसिक व्यक्तिला आपल्याकडे खेचण्याची एक अजब जादू फुलांमध्ये आहे. नवकवींची प्रतिभाही यांना पाहताच मोहरते आणि म्हणुनच मराठी गाण्यातही गीतकारांना आपल्या गीतात यांना गुंफण्याचा मोह आवरला नाही.
एखाद्या दिवशी जर कंटाळवाणे/उदास वाटत असेल तर एखाद्या बागेत जा आणि काही क्षण फुलांसोबत घालवा नक्कीच मन पुन्हा ताजेतवाने होऊन जाईल. एकदा प्रयत्न करून पहाच. Happy
-
फोटोग्राफी – भटकंती करता करता हा छंद केंव्हा लागला ते माझे मलाच कळले नाही. निसटुन गेलेल्या क्षणांना फोटोद्वारे बंदिस्त करण्याचे सामर्थ्य कॅमेर्‍यात आहे आणि हेच क्षण पुन्हा पुन्हा फक्त कॅमेर्‍यामुळेच अनुभवता येतात. पूर्वी ३६ रोल असलेला कॅमेरा असायचा त्यामुळे फोटो काढण्यावर थोडे बंधन असायचे. आज डिजीकॅम्/डीएसएलआर ने हवे तेव्हढे फोटो काढता यायचे. अर्थात दोन्ही कॅमेर्‍यातुन डेव्हलप केलेले फोटो पाहण्यात मजा येते. मला आजही डेव्हलप केलेले फोटो संगणकावर पाहण्यापेक्षा जास्त आवडतात.
जर कधी प्रियजनांची आठवण आली आणि भेटणे शक्य नसेल तर असेल तर जुना अल्बम काढा/संगणकावरची फोटोंची फाईल ओपन करून बघत रहा नक्कीच मन पुन्हा ताजेतवाने होऊन जाईल. एकदा प्रयत्न करून पहाच. Happy
-

आज मी "मराठी संगीत", "फुले" आणि माझी "फोटोग्राफी" असा हा सुगंधी "गजरा" मायबोलीकरांच्या प्रेमळ प्रतिसादाच्या धाग्यात गुंफुन नविन वर्षाची भेट म्हणुन तुमच्यासमोर आणत आहे. माझ्या इतर थीम प्रमाणे हे हि तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. यात प्रत्येक फुलांची ओळख हि मराठी गीतांमधुन करून देणार आहे.

काही फुलांची ओळख करून दिल्याबद्दल मायबोलीकर दिनेशदा, जागू आणि साधना यांचे विशेष आभार. Happy

=================================================

प्रचि १
हासता मी हाससी का, सांग चंद्रा सांग रे
अंतरीच्या अंगणी या रातराणी मोहरे

पुष्पपडदा पापणीचा सरसरा मी ओढुनी
नेत्र माझे राजसाचे चित्र घेता काढुनी
पाहिले ते का कधी तू भाव माझे लाजरे
(स्वरः लता मंगेशकर)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि २

अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते
अजून अपुल्या आठवणींनी, शेवंती लजवंती होते

तसे पहाया तुला मला ग, अजून दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव अजून ताठर चंपक झुरतो
(स्वरः दशरथ पुजारी)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि ३
चंद्रावरती दोन गुलाब
सहज दृष्टिला घडला लाभ

उंच इमारत संगमरवरी
उभी गवाक्षी यवन सुंदरी
पडदा सारुन बघे बावरी
गोल चेहरा नयनि शराब
(स्वरः गजानन वाटवे)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि ४
भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी,
हळदी साठी आसुरलेले हळवे मन अन कांती
आयुष्य हे चुलीवारल्या, कढईतले कांदेपोहे

नात्यांच्या ह्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी,
आणि म्हणे तो वरचा जुळावी शतजन्माच्या गाठी,
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी,
पाने मिटुनी लाजाळू परी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवारल्या, कढईतले कांदेपोहे
(स्वरः सुनिधी चौहान)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि ५
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
(स्वरः जयवंत कुळकर्णी)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि ६
ये अबोली लाज गाली, रंग माझा वेगळा
ऐक राणी गुजकानी, हा सुखाचा सोहळा
(स्वर: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि ७
जाईन विचारित रानफुला
भेटेल तिथे ग सजण मला !

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करतिल गर्द झुला
(स्वर: किशोरी अमोणकर)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि ८
तो एक राजपुत्र नि मी एक रानफुल
घालीन मी, मी त्याला सहजीच रानभुल

केसात पानजाळी, कंठात रानवेल
तुझी रे तुझी नटुन ताई, घालीन त्यास माळ
तो एक राजपुत्र नि मी एक रानफुल
(स्वरः लता मंगेशकर)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि ९
नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली

नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून
तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून
(स्वर: पुष्पा पागधरे)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि १०
अंगणी गुलमोहर फुलला
लाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला

गतसाली हा असाच फुलता
तुम्ही पाहुणे आला होता
याच तरुतळी अनोळखीचा परिचय ना घडला
(स्वरः माणिक वर्मा)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि ११
रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
मनमीत आला, तिच्या पाऊली

फुलल्या मनाच्या मुक्या पाकळ्या
झुलल्या लता आज प्रीतीतल्या
अशी आली, प्रीती ल्याली, नवी ही कळी
(स्वरः अनुराधा पौडवाल)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि १२
या सुखांनो या
एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या, साथ द्या

अंगणी प्राजक्त व्हा, सौधावरी व्हा चांदणे
जोडप्याचे गूज जुईचे, चिमुकल्यांचे रांगणे
यौवनी सहजीवनी, दोन्ही मनांचे गीत व्हा, प्रीत व्हा
(स्वर: आशा भोसले)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि १३
गुलजार नार ही मधुबाला
तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला

गोड गोड बोलूनी खोडकर ओढ लावि हृदयाला
भ्रुधनुवरती सज्ज करोनी नयनांची शरमाला
चंचल नयना सहज विंधिते चंचल हृदयाला
(स्वर: पं. वसंतराव देशपांडे)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि १४
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी, सोडला ग धीर

पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया, मनामनात धुंदले
ओठावरी भिजला ग, आसावला सूर
(स्वर: सुमन कल्याणपूर)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि १५
बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
शिंपण घातले चाफ्याचे शिंपण घातले

उन्हाचे पाटव नेसले टाकले
वा-याचे पैंजण घातले फेकले
डोळ्यात काजळ, केवडा, अत्तर
लावले, पुसले
(स्वर: आशा भोसले)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि १६
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
(स्वर: लता मंगेशकर)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि १७
धुंद आज डोळे हवा धुंद झाली
गाली तुझ्या ग कशी लाज आली ?

जसा सोनचाफा तुझी गौर कांती
नको सावरू ग तुझे केस हाती
डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली
बंडखोर वारा तुला शीळ घाली !
(स्वरः मन्ना डे)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि १८
बरसात चांदण्याची, वारा कसा हलेना
का मोगरा फुलेना
डोळ्यातल्या जळानी मी रूप थोर केले
वाढीस लागला हा आले वसंत, गेले
हिरवा दिसे पिसारा, परि का कळी धरेना
का मोगरा फुलेना
(स्वर: सुमन कल्याणपूर)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि १९
शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगे सोयरे मी सांडीले पाठी

वार्‍यात लहर मंद, फुलांचा मादक गंध
मोगरा चमेली कुंद, जीवाला करीती धूंद
माझ्या देही पूनव चांदणे साजे, प्राणामध्ये प्रीतीची पावरी वाजे
आज राया, धूंद काया, मोह माया
(स्वर: आशा भोसले)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि २०
मधु मागसी माझ्या सख्या, परी
मधुघटचि रिकामे पडती घरी !

नैवेद्याची एकच वाटी,
अता दुधाची माझ्या गाठी
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशी तरी
(स्वर: लता मंगेशकर)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि २१
आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू !

हिरवी श्यामल भवती शेती
पाउलवाटा अंगणि मिळती
लव फुलवंती, जुइ शेवंती
शेंदरि आंबा सजे मोहरू !
(स्वर: आशा भोसले)
=================================================
=================================================

=================================================
=================================================
प्रचि २२
काठी न्‌ घोंगडी घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
कांदा न्‌ भाकरी खाऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
(स्वर: शाहिर निवृत्ती पवार)
=================================================
=================================================

=================================================
=================================================

गुलमोहर: 

वा!! छान थीम आणि फोटो.
विशेषतः केवडा आणि चाफ्यांचे सगळेच फोटो भारी आहेत. अगदी इथे सुगंध जाणवला!!

इथे कोरड्या थंड हवेत ही फळं/फुलं सापडली तरी घमघमत नाहीत तशी. 'ओळखीच्या माणसाने' भेटावं पण 'ओळखीचे घाव' न देताच निरोप घ्यावा तसं वाटतं.

जबरदस्त फोटोज.... आणि तितकीच हटके गाणी...
मोग-यासाठी चटकन 'मोगरा फुलला' आठवेल पण इथे मात्र ते न देता वेगळे दिलेय हे खुप आवडले.

रच्याकने, शेवटी क्रमशः टाक आणि जसजसे बहर येतील तशी फुले टाकत जा.. आपल्याकडे फुले आणि गाणी दोघांचेही भरघोस पिक आलेले आहे Happy

योगेश तुम्हाला प्रतिसाद द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत. खुप, खूप खूपच छान! निवडक दहात आहे.

प्रतिसादांच्या पुष्पगुच्छांबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!! Happy

इथे कोरड्या थंड हवेत ही फळं/फुलं सापडली घमघमत नाहीत तशी. 'ओळखीच्या माणसाने' भेटावं पण 'ओळखीचे घाव' न देताच निरोप घ्यावा तसं वाटतं.>>>>>>स्वाती, मस्तच!!! Happy

आपल्याकडे फुले आणि गाणी दोघांचेही भरघोस पिक आलेले आहे>>>>>>साधना, Happy

कोरांटीचे खुप वेगवेगळे रंग असतात.
काटेकोरांटी खूप वर्षांनी बघितली.>>>>>>हि निळी कोरांटी Happy

नुसते अप्रतिम नाही तर अप्रतिईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईम
प्रत्येक फुलांची ओळख हि मराठी गीतांमधुन करून दिल्याबद्द्ल धन्यवाद

जिप्सी तुला _____/\_____ !! Happy

अक्षरशः शब्दच उरले नाहीत!!! अबोलीचं लाजरं फुल, निशिगंधाचं तरल देखणं रुप, प्रचि १६ मधली चाफ्याची मुकी कळी आणि त्याच्या जोडीला त्या ओळी! हरवुन गेले मी अगदी त्यात!!
माझ्या आवडत्या १०त!!

खुपच छान!!! अस वाटत कि, सगळ्या प्रचिंची फ्रेम करुन घरी आणि ऑफिस मधे लावावी म्हणजे उठता बसता, येता जाता बघता येइल. खरच खुप छान आहेत...
मला पण शिकायच आहे फोटो काढायला... शिकवशील ना???

तूला अंजन बघायचा होता ना, हा घे.
अंजनाच्या कळ्या आधी पोपटी, मग गुलाबी होत जातात. मग निळ्या पाकळ्यांची फूले उमलतात. फूलांच्या पाकळ्या गळाल्या कि आत लालभडक भाग आणि त्याभोवती गुलाबी कोंदण उरते, फूले गळाली हि छोटि हिरवी फळे लागतात, मग ती क्रमाने लाल, निळसर आणि मग काळी होतात.
अंजनाचा फूलोरा बघायला झाडाच्या आतच झावे लागते, बाहेरुन तो दिसत नाही.

निशिगंध जरा वेगळ्या अँगलने. हा फोटो नगरला घेतला होता.

योगेश, ग्रँड!!!!!!! एवढा सुंदर गजरा पेश केल्याबद्दल _____/\_____

कोरांटी केवळ अप्रतिम.

दिनेशदा, अंजन किती सुंदर आहे.

धन्यवाद Happy

तूला अंजन बघायचा होता ना, हा घे.>>>>हा फोटो बघितला आणि नकळतच "वॉव" असे उद्गार आले. सुंदर फुले आणि फोटो :-). धन्स, दा इथे शेअर केल्याबद्दल.
अंजन प्रत्यक्ष पहायला आवडेल. Happy

माय गॉड अंजन काय सुंदर दिसतेय.. मी आंबोलीला खुपदा पाहिलीत ही झाडे पण इतकी आहेत तिथे की अगदी अतिपरिचयादवज्ञा होते Sad

वा जिप्सी, काय अभिनव कल्पना आहे! प्रचि आणि त्याला अनुसरुन गीताच्या ओळी... मस्तच Happy
ते शेवटचे कांद्याचे फुल आहे? पहिल्यांदाच पाहिले मी... काय सुंदर दिसते ते!!!

जिप्सी,
वाह...खास...भन्नाट...अप्रतिम ....मस्त् फोटो !
इतके सारे फोटो,त्यांची नावे एकावेळी नाही पचणार !
Happy
यातला कवठीचाफा कोणता ? प्रचि १५ कि १६ ?

जिप्सी, धन्स. मी कालच दिनेशदाना कवठिचाफ्याचा फोटो टाकायला सांगितलाय. मला ते फुल झाडावर फुललेले असतानाचा फोटो हवाय.

मला ते फुल झाडावर फुललेले असतानाचा फोटो हवाय.>>>>ओह्ह, मग जागू टाकेल त्याचा फोटो तिच्याकडे सध्या कवठीचाफ्याच्या कळ्या आल्या आहेत.

Pages