माझे आजोबा मी फक्त पाच वर्षांचा असताना हे जग सोडून गेले. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू, ज्यांना आम्ही काकाआजोबा म्हणायचो, ते आणि काकूआजी, यांनी स्वतःच्या नातवंडांवर कुणी करणार नाही इतकं प्रेम आमच्यावर केलं. त्यामुळे माझ्या आजोबांबरोबर जे नातं फुलण्याआधीच संपलं ते मात्र काकाआजोबांबरोबर बर्यापैकी बहरलं. त्यांचा सहवास मला मी आठवीत असेपर्यंत लाभला.
हे आजोबा-आजी दक्षिण मुंबईतील पंडित पलुस्कर चौकातल्या हंसराज दामोदर ट्रस्ट बिल्डींगमधे राहत. हा भाग म्हणजे ऑपेरा हाऊस जिथे आहे तो परिसर. काकूआजीची एक दातार आडनावाची मैत्रीण होती. तिचे यजमान एम.टी.एन.एल. मधे मोठे अधिकारी होते. मी बघितलेला पहिला व्हीडिओ कॅसेट रेकॉर्डर (व्ही.सी.आर.) हा त्यांच्याकडेच. सिनेमा बघायची हुक्की आली की आम्ही काकूआजीला मस्का लावायचो. आजीचा दातारांकडे फोन जायचा. मग आजी फर्मान काढायची, "चला रे योगेशदादाकडे" (मैत्रिणीच्या मुलाचं नाव). पडत्या फळाची आज्ञा घेऊन आमची चिमुकली पाऊले आजीचा हात धरून लिफ्ट नसलेल्या त्या इमारतीचे चार मजले उतरून केनडी ब्रीज खालून जाणार्या रेल्वेगाड्या बघत बघत एम.टी.एन.एल. क्वार्टर्स च्या दिशेने चालायला लागायची.
त्या व्ही.सी.आर.वर मी बघितलेला पहिला सिनेमा म्हणजे खूबसूरत. हा चित्रपट बघायला जाताना मी अर्धवट झोपेतच होतो. पण त्यातल्या अशोक कुमार उर्फ दादामुनींना बघून मी खडबडून जागा झालो. एक हनुवटीचा भाग सोडला तर त्यांची चेहरेपट्टी तंतोतंत काकाआजोबांशी मिळतीजुळती होती. अगदी केशरचनेसकट. घरी परत आल्यावर उत्साहात सगळ्यांसमोर सिनेमाचं आणि अर्थातच सिनेमातल्या प्रेमळ आजोबांच तपशीलवार वर्णन झालं.
तेव्हापासून आजोबा म्हटलं की अशोक कुमार अशी एक विशिष्ठ प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. पण इतर नायक, नायिका, खलनायक, दिग्दर्शक वगैरे लोकांसारखं मुद्दामून नाव पाहून सिनेमा बघावा असं मात्र त्यांच्या बाबतीत कधीच झालं नाही. कारण आमच्या पिढीला ते नायकाच्या रूपात फारसे आठवतच नाहीत; आठवतात ते कर्तबगार जेष्ठ बंधू, संवेदनशील मनाचे वडील, प्रेमळ सासरे, लाघवी आजोबा या रुपांत - थोडक्यात, दादामुनी म्हणूनच.
कालांतराने अशोक कुमार नायक असलेले काही मोजके पण त्याकाळी गाजलेले चित्रपट दूरदर्शन आणि नंतर स्टार गोल्डच्या कृपेने बघायला मिळाले. अर्थात अशोक कुमार हे काही चित्रपटसृष्टीत नायक व्हायला आलेच नव्हते. त्यांना अधिक रस होता तो कॅमेर्यामागे चालणार्या तांत्रिक बाबींमध्ये. म्हणूनच जेव्हा बॉम्बे टॉकीजचे हिमांशु राय यांनी 'जीवन नैया'चा नायक नजमल हुसेनच्या हातात अचानक नारळ ठेऊन निरंजन पाल यांच्या सांगण्यावरून लॅब विभागात काम करणार्या कुमुदलाल कुंजीलाल गांगुली या तरुणाला नायक बनवायचा घाट घातला, तेव्हा त्याने तडक पाल यांच्या घरी जाऊन "कशाला माझ्या आयुष्याची वाट लावताय?" असा मिश्किल प्रश्न टाकला. या सिनेमाचा जर्मन दिग्दर्शक फ्रॉन्ज ऑस्टेन हा वेगळ्या कारणाने त्याच्याशी सहमत होता. त्याने चक्क त्या तरुणाला त्याच्या अवाढव्य जबड्यामुळे पडद्यावर हीरो म्हणून अजिबात भवितव्य नसल्याचं तोंडावर सांगितलं ("You will never make it in films because of your tremendous jaws").
पण इतर नायकांच्या बाबतीत अनेकांनी वर्तवलेल्या अशा प्रकारच्या भाकितांप्रमाणेच ह्या भाकितालाही खोटं ठरवत मारुन मुटकून 'हुकुमावरून' नायक बनलेल्या अशोक कुमारने नंतर मात्र अभिनयक्षेत्रात मागे वळून पाहिलंच नाही. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त तो इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकला. गंमत म्हणजे कॅमेर्यासमोरील अशोक कुमारच्या भवितव्याचं अंधःकारमय वर्णन करणार्या याच फ्रॉन्ज ऑस्टेनने नंतर तो नायक असलेले अनेक चित्रपट दिग्दर्शित केले.
बॉम्बे टॉकीजने त्याकाळी धाडसी आणि वादग्रस्त सामाजिक विषयांना हात घालणारे अनेक चित्रपट काढले. त्यातलाच एक म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मण तरूण आणि अस्पृश्य समजल्या जाणार्या समाजातली तरूणी यांच्यातली प्रेमकथा सादर करणारा १९३६ सालचा 'अछुत कन्या' हा सिनेमा. याही सिनेमात अनुभवी देविका राणी समोर नायक म्हणून समर्थपणे उभं राहत अशोक कुमारने आपला दर्जा दाखवून दिला.
१९४३ साली आलेला 'किस्मत' हा फक्त चित्रपटसृष्टीच नव्हे तर संपूर्ण सामाजिक वातावरण ढवळून काढणारा ठरला. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी खलनायकाच्याही वरताण दुष्कृत्ये आणि क्रूरकर्मे करणारे नायक किंवा आपल्या हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी अगदी वाट्टेल ते थराला जाणार्या अॅन्टी हीरोंचे सिनेमे बघत मोठे झालेल्या आमच्या पिढीला या सिनेमाने त्यावेळी केवढी खळबळ माजवली होती ते सांगितलं तर आश्चर्य वाटेल. तोपर्यंत अगदी सरळमार्गी (की भोळसट?), निर्व्यसनी, आणि सभ्य नायक बघायची सवय असलेल्या तत्कालीन समाजाला चक्क ओठांत सिगारेट घेऊन वावरणारा पाकीटमार हीरो बघून एक प्रकारचा मोठा संस्कृतिक धक्काच बसला. 'किस्मत'ने मात्र प्रचंड लोकप्रिय होत तीन वर्षांहून अधिक काळ सिनेमागृहांत हाऊस फुल्लचा बोर्ड मिरवत ठाण मांडलं. त्यानंतर अशा प्रकारचे हीरो असलेल्या सिनेमांची लाट जरी आली नाही तरी साधनशुचितेला फारसे महत्व न देता इप्सित 'साध्य' करण्याकडे अधिक कल असलेले नायक मात्र प्रेक्षकांनी स्वीकारले ते कायमचेच.
अशोक कुमार यांनी निर्माता म्हणून बनवलेल्या तीन चित्रपटांपैकी पहिला म्हणजे १९४९ साली बॉम्बे टॉकीजसाठी बनवलेला गूढपट 'महल'. तो प्रचंड सुपरहीट ठरला. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाने नायिका मधुबाला आणि प्रामुख्याने 'आएगा आनेवाला' या गाण्याच्या तूफान लोकप्रियतेमुळे पार्श्वगायिका लता मंगेशकर या दोघींनाही प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं.
लाजर्या हावभावांनी अछुत कन्या मधे 'मै बन का पंछी बन के संग संग डोलूं रे..." असं म्हणणार्या अशोक कुमारने (पार्श्वगायनही त्याचंच) मग 'हावडा ब्रिज' मधे सिगारेटचे झुरके घेत "आईये मेहेरबाँ, बैठीये जानेजाँ" असा पुकारा करणार्या सौदर्यस्म्राज्ञी मधुबालाचं मादक आव्हान चेहर्यावर कमालीचं सूचक हास्य बाळगत स्वीकारलं आणि "ये क्या कर डाला तूने.." अशी तिची कबुलीही ऐकली. अशोक कुमारचा या चित्रपटातला वावर हा म्हणजे संयत आणि प्रगल्भ अभिनय कसा असावा याचा उत्तम नमूना.
वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्या या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमारने वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमारने अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.
या प्रवासात अशोक कुमारला ज्या दोन गोष्टींनी साथ दिली ती म्हणजे त्याच त्या अजस्त्र जबड्यामुळे चेहर्याला लाभलेलं नैसर्गिक प्रौढत्व आणि कृत्रीमतेचा लवलेशही नसलेलं प्रसन्न हास्य. अशोक कुमारच्या चरित्र भूमिकांची सुरवात खरं तर १९५८ सालच्याच 'चलती का नाम गाडी' मधे मनमोहन (किशोर कुमार) आणि जगमोहन (अनुप कुमार) या दोन धाकट्या भावांचा सांभाळ करणार्या ब्रिजमोहनची भूमिका करतानाच झाली होती, पण त्यावर शिक्कामोर्तब केलं ते राजेंद्रकुमारची प्रमुख भूमिका असलेल्या १९६० साली आलेल्या 'मेरे मेहबूब'ने. यात त्यांनी नायिका साधनाचा मोठा भाऊ साकारला होता. मुस्लिम-सोशल म्हणुन ओळखले जाणारे अनेक सिनेमे एकेकाळी आले. अशा सिनेमात कुणीही सोम्यागोम्या नवाब वगैरेंच्या भूमिका करत असे, पण खर्या नवाबासारखं रुबाबदार दिसणं आणि त्याच थाटात वावरणं म्हणजे काय ते या सिनेमात अशोक कुमारला बघितल्यावर कळतं.
राज-देव-दिलीपच नव्हे, तर अमिताभ, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांसारखे अनेक लहानथोर सिनेस्टार आले आणि गेले, पण दादामुनींना त्यांच्या अढळपदावरून कुणीच हलवू शकलं नाही. आधी हीरो म्हणून राज्य केलेल्या अनेक अभिनेत्यांनी नंतर चरित्र भूमिका केल्या, पण कथानकाची गरज वगैरे बाबी आणि काही सन्माननीय अपवाद वगळता त्यांची सहज प्रवृत्ती ही नेहमीच इतर कलाकारांवर कुरघोडी करण्याची असल्याने एकूणच आयुष्याच्या उतरार्धात त्यांच्या कारकीर्दीला मर्यादा आल्या. याउलट दादामुनींनी मात्र कुठेही आपली भूमिका वरचढ न होऊ देता इतर कलाकारांना आपापली भूमिका फुलवायला संपूर्ण वाव देत स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यश मिळवलं. अगदी त्यांची प्रमुख किंवा अत्यंत महत्वाची भूमिका असलेल्या चित्रपटात सुद्धा त्यांनी याला अपवाद केला नाही. मग तो १९७८ सालचा राकेश रोशन बरोबरच्या 'खट्टा मीठा' मधला होमी मिस्त्री हा पारशी विधुर असो किंवा 'छोटीसी बात' मधल्या अरुण प्रदीपचा (अमोल पालेकर) 'गुरूजी' कर्नल ज्युलीअस नगेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग असो.
चरित्र भूमिका करत हिंदी चित्रपटात जम बसवू पाहणार्या श्रीराम लागूंना आपल्याला मनाजोगत्या भूमिका मिळत नाहीत अशी नेहमी तक्रार असे. त्यांना एकदा दादामुनींनी त्यांच्या यशाचे रहस्य सांगताना समजावलं होतं की चित्रपटसृष्टीत सतत लोकांच्या डोळ्यांसमोर राहणं महत्वाचं आहे, त्यामुळे फार चिकित्सा न करता ज्या भूमिका मिळतील त्या स्वीकारत जावं. हव्या तशा भूमिका त्यातूनच मिळतात.
दादामुनींना आपल्या कारकिर्दीत अनेक सटरफटर भूमिका जरी कराव्या लागल्या तरी अशा सकारात्मक वृत्तीमुळे साहजिकच त्यांना असंख्य वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिकाही मिळाल्या. याचा आणखी एक फायदा असा झाला की त्यांच्यावर कधी ज्याला साचेबद्ध (टाईपकास्ट) म्हणतात तसं होण्याची वेळ आली नाही.
वर उल्लेख केलेल्या 'खूबसूरत' मध्ये प्रेमळ, सज्जन, सुनेवर मुलीसारखं प्रेम करणारा आणि शेवटी शिस्तीचा अतिरेक होतोय हे जाणवल्यावर बायकोला सुनावून भावी सुनेचीच बाजू घेणारा सासरा त्यांनी अगदी उत्तमरित्या उभा केला होता. 'मिली' मधे मुलीच्या जवळजवळ असाध्य असलेल्या आजाराने आतून व्यथित झालेला तरीही इतरांना धीर देणारा बाप साकारताना दादामुनी अमिताभइतकाच भाव खाऊन जातात. आशीर्वाद मधल्या जोगी ठाकूरची तडफड त्यांनी इतक्या ताकदीने उभी केली आहे, की हा सिनेमा पाहिल्यावर आपल्या पोटच्या पोरीचं लग्न लपुनछपून पाहण्याची वेळ आपल्या शत्रूवरही येऊ नये असं वाटल्यावाचून राहत नाही. त्याच सिनेमातलं त्यांच्याच आवाजातलं "रेलगाडी, रेलगाडी" कोण विसरू शकेल? हे गाणं आज भारतातलं पहिलं रॅप गाणं म्हणून ओळखलं जातं. पाकीजा मधला शहाबुद्दीन (आधी प्रियकर आणि मग बाप) आणि शौकीन मधला 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' या गाण्याची आठवण करुन देणारा चावट म्हातारा अशा दोन टोकं असलेल्या व्यक्तिरेखा त्यांनी जीव ओतून साकार केल्या.
अगदीच साधारण असला, तरी व्हिक्टोरिया नंबर २०३ हा चित्रपट केवळ प्राण (राणा) आणि अशोक कुमार (राजा) या दोन कसलेल्या अभिनेत्यांच्या धमाल जोडीमुळेच हीट झाला. आजही ह्या चित्रपटाचा विषय निघाला की नायक-नायिके आधी हेच दोघे आठवतात. प्राण आणि अशोक कुमार या दोघांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेते म्हणून मिळालेले नामांकन हाच काय तो या सिनेमाचा फिल्मफेअर पुरस्कारांमधला सहभाग.
अष्टपैलू अभिनेता हे विशेषण आजकाल सरसकट कुणालाही लावलं जातं. पण ज्यांनी गोल्डीचा 'ज्वेल थीफ' पाहिलाय त्यांना हे विशेषण अशोक कुमारला कसं शोभून दिसतं हे वेगळं सांगायची गरज भासणार नाही. हीरोगिरीवरुन 'दादा'गिरीकडे वळलेल्या अशोक कुमारने आपल्या नेहमीच्या 'इमेज'च्या विरोधात जात या चित्रपटात चक्क खलनायक साकारला. एवढंच नव्हे, तर त्या भूमिकेचं सोनं केलं, इतकं की हिंदी चित्रपटसृष्टी एका उत्कृष्ठ खलनायकाला मुकली असं तो चित्रपट पाहिल्यानंतर वाटू शकतं. चित्रपटाच्या शेवटी एक मजेशीर दृश्य आहे. नायक विनय (देव आनंद) मेला आहे असं समजून ज्वेल थीफ उर्फ प्रिन्स अमर (अशोक कुमार) हा आपला गाशा गुंडाळून कायमचा पळून जायच्या तयारीत असतो. त्याच वेळी विनय तिथे पोहोचतो आणि त्याच्यावर पिस्तुल रोखतो. आता हीरोने व्हिलनवर पिस्तुल रोखणे यात मजेशीर काय असं आपल्याला वाटू शकतं. पण खरी गंमत यानंतर आहे. विनयला जिवंत बघून धक्का बसलेल्या प्रिन्स अमर वर पिस्तुल रोखलेला विनय म्हणतो "....और फिर ऐसे बढिया बढिया अॅक्टरों की सोहबत मे रह कर थोडी बहुत अॅक्टींग तो आदमी सीख ही जाता है." पुन्हा सिनेमा बघितलात तर हा सीन जरा बारकाईने बघा. हे दोघं अभिनय करत नसून एकमेकांशी खरंच बोलताहेत असा भास होतो. देव आनंदला जिद्दी मधे चमकवणार्या अशोक कुमारला ज्वेल थीफ मधे केलेला हा मानाचा मुजरा वाटतो. अर्थात, सदैव 'एव्हरग्रीन' रहाण्याच्या अट्टाहासामुळे देव आनंद दादामुनींकडून थोडीफार अॅक्टींग वगळता फारसं काही शिकला नसावा हे उघडच आहे.
दादामुनींच्या उत्कृष्ठ अभिनयाची उदाहरणं देताना जवळ जवळ दोनशे ते अडीचशे सिनेमांपैकी कुठल्या सिनेमांचं नाव घ्यावं आणि कुठल्याचं वगळावं याचा निर्णय करणे केवळ अशक्य आहे. अशोक कुमार यांच्या बाबतचं माझं वैयत्तिक मत बाजूला ठेवून तटस्थपणे पाहिलं, तरी संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत इतकं मायाळू आणि प्रसन्न असं एकही व्यक्तिमत्व माझ्या तरी डोळ्यांसमोर येत नाही. अशोक कुमारला दादामुनी (बंगालीत मोठा भाऊ) हे गोड टोपणनाव मात्र त्यांच्याच एका बहिणीने (निर्माते शशिधर मुखर्जी यांची पत्नी) त्यांना दिलं. सिनेमाच्या क्षेत्रात सज्जन म्हणून ओळखल्या जाणार्या मोजक्याच व्यक्तींमधे ते मोडत, त्यामुळे हे टोपणनाव अल्पावधीत सर्वांनीच स्वीकारलं.
इतक्या सज्जन माणसाच्या वाट्याला काही कटू अनुभव आले नसते तरच नवल होतं. पण एक प्रसंग मात्र त्यांच्या कायम लक्षात राहिला. अशोक कुमारसाठी परिणीता बनवण्याची जबाबदारी असलेल्या बिमल रॉयनी चित्रपटाचं थोडं चित्रिकरण कलकत्त्यात करण्याच्या बहाण्याने चक्क 'परिणीता'च्या निर्मितीत गुंतलेल्या कलाकारांचा संच वापरून स्वत: निर्मिती आणि दिग्दर्शन करत असलेल्या 'दो बिघा जमीन' हा चित्रपट सगळाच्या सगळा चित्रित केला. त्याबद्दल जाब विचारल्यावर 'परिणीता' न भूतो न भविष्यती असा लोकप्रिय सिनेमा होणार असल्याचं बिमल रॉयनी रंगवून सांगितलं आणि स्वत:चा 'दो बिघा जमीन' हा त्या आधी प्रदर्शित न करण्याचं आश्वासनही दिलं, पण नंतर सोयीस्कररित्या ते पाळायला विसरले. या घटनाक्रमाचा धक्का बसलेल्या अशोक कुमारने त्या नंतर त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले. सुंदर कलाकृती (दो बिघा जमीन, परिणीता, मधुमती, बंदिनी, वगैरे) निर्माण करणारे प्रत्यक्षात किती कोत्या मनाचे असू शकतात याचा हा उत्तम नमूना म्हणायला हवा.
दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केल्याखेरीज दादामुनींच्या बाबतीतलं कुठलही लिखाण अपूर्ण आहे. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'हम हिंदूस्तानी' मधला साकारलेला डॉक्टर आणि बहादुरसहा जफर मलिकेत खूप काही करण्याची इच्छा असलेला पण प्राप्त परिस्थितीकडे हताशपणे बघणे सोडून काही करू शकत नसलेला बहादूरशहा या भूमिका आपल्या अभिनयाने त्यांनी अविस्मरणीय केल्या. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. या आधी कधीही अशोक कुमारबरोबर कॅमेर्यासमोर यायची संधी न मिळालेला शम्मी कपूर या जाहिरातीत त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं म्हणून प्रचंड हरखून गेला होता.
लग्नाआधी एकमेकांचा चेहराही न बघितलेले दादामुनी आणि त्यांची पत्नी शोभा यांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं आणि त्यांचं लग्न पत्नी शोभाचा मृत्यू होईपर्यंत टिकलं. असं असलं, तरी त्यांचे वैवाहिक जीवन मात्र संपूर्णपणे सुखाचं झाले नाही. त्याबद्दल बोलताना दादामुनींनी अनुराधा चौधरींना दिलेल्या एका मुलाखतीत आपलं मन मोकळं केलं होतं. शोभाला काही काळाने दारूचं व्यसन लागलं. इतकं, की दिवसभराच्या कामाने थकून घरी आलेल्या त्यांना पाणी, चहा वगैरे हातात घेऊन सुहास्यवदनाने बायकोला समोर बघण्याची इच्छा सतत मारावी लागली. त्याऐवजी त्यांना दिसे ती तर्र होऊन पडलेली शोभा. बराच काळ सहन केल्यावर शेवटी त्यांनी वेगळं रहायला सुरवात केली, पण तरी शोभाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. दादामुनींची माफी मागून तिने त्यांच्याबरोबर पुन्हा रहायला सुरवात केली. मात्र तिचं पिणं काही सुटलं नाही. अखेर अनेक दिवस इस्पितळात काढल्यानंतर दादामुनींसोबत लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा मनातच ठेऊन तिने बरोबर दोन दिवस आधी या जगाचा निरोप घेतला.
दादामुनी पुढे म्हणतात, "तिची इच्छा अपूर्ण राहिल्याचा परिणाम म्हणून की काय, जाताना तिचे डोळे अर्धवट उघडे होते. मला कुणीतरी सांगितलं इच्छा अपूर्ण राहिल्यावर असं होतं म्हणे. मला माहीत होतं ती माझ्या प्रेमाला आसुसलेली होती. पण मी पूर्ण प्रयत्न करूनही तिचं व्यसन सोडवू शकलो नाही. विचित्र गोष्ट अशी, की मी तिच्या चेहर्याचं चुंबन घेतल्यावर तिचे डोळे पूर्णपणे मिटले. जणू आता कसलीच इच्छा राहिली नसावी." यानंतर दादामुनींनी चित्रपटात काम करणं जवळ जवळ बंद केलं.
माणसाने किती दुर्दैवी असावं? ज्यांनी त्यांना खांदा द्यायचा त्याच दोन्ही धाकट्या भावांचा मृत्यु त्यांना बघावा लागला. १३ ऑक्टोबर १९८७ या दिवशी दादामुनींचा वाढदिवशीच किशोर कुमारचं निधन झाल्यापासून त्यांनी आपला वाढदिवस साजरा करणंही सोडून दिलं. मग १९९७ साली २० सप्टेंबर रोजी अनुपही हे जग सोडून गेला.
काकाआजोबा मी आठवीत असताना, म्हणजे १९९१ साली वयाच्या ६४व्या वर्षी हे जग सोडून गेले. काकाआजोबा गेल्यानंतर मी जेव्हा जेव्हा मी दादामुनींना सिनेमात बघत असे तेव्हा तेव्हा मला आजोबांची जास्तच आठवण येत असे आणि मग दादामुनींचा सहभाग असलेली दृश्ये अधिकच समरस होऊन बघितली जात. माणूस कशात आणि कोणात नात्यांची पोकळी भरून काढायला भावनिक आधार शोधेल सांगता येत नाही. कदाचित फ्रॉइडकडे याची उत्तरं असू शकतील.
मला तीन लोकांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा होती. पुलंना मी भेटलो. सचिन तेंडुलकरला कधीतरी भेटेन, फक्त हात लाऊन बघता आला तरी चालेल. पण दादामुनींना भेटण्याचं स्वप्न मात्र स्वप्नच राहिलं. स्वतः होमिओपथीचे तज्ञ असलेले दादामुनी मात्र अनेक वर्ष दम्याशी झुंज दिल्यावर थकले होते. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानंतर दोनच महिन्यांनी त्यांनी १० डिसेंबर २००१ रोजी ह्या जगाचा निरोप घेतला. मी फक्त दोनदा भरपूर रडल्याचं मला आठवतंय. एकदा काकाआजोबा गेल्यावर आणि दुसर्यांदा माझे हे सिनेमातले काकाआजोबा देवबाप्पाला भेटायला निघून गेले तेव्हा.[
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भः चित्रपट बघणे, दूरदर्शन मुलाखती, व आंतरजालावरील अनेक.
लेखातील छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पहिला लेखः मनोरंजनाचे घेतले व्रत - १: ऋषिकेश मुखर्जी
दुसरा लेख: मनोरंजनाचे घेतले व्रत - २: विजय आनंद उर्फ गोल्डी
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
लेखन स्पर्धेसाठी मी मराठी व माझ्या ब्लॉगवर पुर्वप्रकाशित.
मनोरंजनाचे घेतले व्रत
मनोरंजनाचे घेतले व्रत मालिकेतील हा तिसरा लेख
छान लेख आहे! दादामुनींच्या
छान लेख आहे! दादामुनींच्या कारकीर्दीचं विश्लेषण तर चांगलं आहेच, पण केनेडी ब्रिज आणि गिरगांवचा ऑपेरा हाउस परिसर यांचे उल्लेख वाचूनही मी मनाने त्या परिसरात फिरून आले. अजून येऊद्या हो नवे ...नवीन वर्षात!
सुंदर लेख. मी देखील त्यांना
सुंदर लेख. मी देखील त्यांना त्यांच्या उमेदीत बघितले नाही. पण उंचे लोग मात्र तूम्ही लोकांनी बघायलाच हवा. अशोककुमार, राजकुमार, फिरोझ खान आणि विजया चौधरी होते त्यात.
बंदीनी, चित्रलेखा, मेरी सूरत तेरी आँखे मधल्या दुय्यम नायकाच्या भुमिका पण त्यांनी सहज सुंदर साकारल्या होत्या.
आज तुमचा लेख प्रथम वाचुन
आज तुमचा लेख प्रथम वाचुन प्रतिसाद द्यायचा विचार होता. पण नेमके पाहुणे आले त्यामुळे लेख वाचायला वेळ झाला.. पहिल्या दोन लेखांप्रमाणेच हा लेख सुद्धा अतिशय संयत, अभ्यासपुर्ण, विचारपुर्वक आणि अगदि नेटका झालाय. खुप आवडला. निवडक दहामध्ये नोंदवला.
छान लेख.
छान लेख.
छान लिहिलं आहेस मंदार. आत्ताच
छान लिहिलं आहेस मंदार. आत्ताच तुझा 'किशोर कुमारनी गायलेली मराठी गाणी' हा लेख वाचला. तो वाचुन किशोर कुमार बद्दल अजुन माहिती करुन घ्यायची उत्सुकता आहे. तुझ्या ह्या लेखमालिकेत त्याच्यावर पण एक लिहिशिल का?
(No subject)
@ प्रयोग, (नेहमीप्रमाणेच)
@ प्रयोग,
(नेहमीप्रमाणेच) अतिशय अभ्यासपूर्ण पोष्टीबद्दल धन्यवाद. तुम्ही म्हटल्याप्रमाणे महलचा उल्लेख केला आहे आता
अप्रतिम मंदार, अपेक्षेप्रमाणे
अप्रतिम मंदार,
अपेक्षेप्रमाणे सुंदर उतरलाय लेख!!
आता बलराज साहनींवर येऊ द्या एक लेख....
किस्मत आणि महल - खरोखरच
किस्मत आणि महल - खरोखरच सुपरडुपर हिट! किस्मतमधील त्यांचा अभिनय म्हणजे अभिनयाचे पुस्तकच!
पण एक तपशील मात्र माझ्याकडे वेगळाच आहे. किशोरला अभिनेता व्हायचे नव्हते व पार्श्वगायकच व्हायचे होते. पण अशोककुमार यांना मात्र तो अभिनेता व्हावा असे वाटत होते. त्यामुळे किशोरने काही गाणी त्यांना न सांगता हळूच गायली. नंतर त्यांनी शाबासकी दिली.
हमलोगमुळे मात्र सर्व घरात पोचले ते!
मंदार,
लेख आवडलाच! सर्व चित्रेही आवडली. अभिनंदन! आपली ही मालिका फार सुंदर होत आहे.
-'बेफिकीर'!
मस्तच रे ! <<माणूस कशात आणि
मस्तच रे !
<<माणूस कशात आणि कोणात नात्यांची पोकळी भरून काढायला भावनिक आधार शोधेल सांगता येत नाही.>>
हे वाक्य तर एकदम पटलं.
@प्रयोग, ते रेलगाडीचं गाणं खरोखर अफलातून आहे. आमच्या घरातलं लाडकं गाणं.
नितांतसुंदर लेख......
नितांतसुंदर लेख...... दादामुनींचा ''छोटी सी बात'' मधील कर्नल ज्युलिय्स विल्फ्रेड नगेंद्रदास सिंग'' अश्या अगम्य नावाचं कॅरॅक्टर आयुष्यभर आठवत रहावं असंच आहे.
असरानी ला त्यांचे कुची कुची करणं आठवून अजूनही हसू फुटतं.....
ह्या द्रष्ट्या अभिनेत्याला सलाम.
मंदार .....फार छान लेख.
एकदम मस्त लिहिले.
एकदम मस्त लिहिले.
अभ्यासपूर्ण लेख. अशोककुमार
अभ्यासपूर्ण लेख.
अशोककुमार यांच्या आवाजातली 'नीना के नानी की नाव चली रे' आणि खूबसूरतमधले 'पिया बावरी' ही दोन गाणी आठवली.
अशोककुमारना पार्श्वगायन असलेली गाणी खूप कमी आहेत का?
तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो(अनुरोध?)
आणि मेरी सूरत तेरी आंखे (यात अशोककुमार गायकाच्या भूमिकेत)- तेरे बिन सूने नैन हमारे, नाचे मन मोरा मगन तिकधाधिकीधिकी, ही आठवतात.
मीनाकुमारी-प्रदीपकुमारच्या बहु बेगम, चित्रलेखा, भीगी रात या चित्रपटांत तिसरा कोन म्हणून अशोककुमार होते.
>>असरानी ला त्यांचे कुची कुची
>>असरानी ला त्यांचे कुची कुची करणं आठवून अजूनही हसू फुटतं.....
अगदी, अगदी डॉक, धन्स त्या सीनची आठवण करुन दिल्याबद्दल. जाम हसू येतंय
अभ्यासपुर्ण लेख. प्रयोग खुप
अभ्यासपुर्ण लेख.
प्रयोग खुप छान पोस्ट.
अशोककुमारांच्या कारकिर्दीची
अशोककुमारांच्या कारकिर्दीची माहीती छान दिलीएस. बाकी लेखही मस्त..
अप्रतिम.अस्सलिखीत
अप्रतिम.अस्सलिखीत लेख.......... महल सिनेमातील गाणी मला खुप आवडतात....म्हणुन महल सिनेमाचा उल्लेख का केला नाही असे म्हटले होते...धन्यवाद...
मंदार, फारंच सुरेख लेख
मंदार,
फारंच सुरेख लेख लिहिलायंस..
मंदार, लेख उत्तम जमलाय.
मंदार, लेख उत्तम जमलाय.
लिखाणाचा फ्लो छान आहे. वाचणार्याची पकड घेतं.
सर्वांनाच धन्यवाद शुभांगी
सर्वांनाच धन्यवाद
शुभांगी आणि निंबुडा, पेशल धन्स. असं कुणाला वाटलं म्हणजे लिहायला स्फूर्ती येते.
सुंदर........ नेहमी
सुंदर........ नेहमी प्रमाणे!
दादामुनींचे पिक्चर पहायचा मूड झालाय आज...
छान लेख...
छान लेख...
छान लेख. नॉसटॅलजिक
छान लेख. नॉसटॅलजिक वाटलं.
"आईये मेहेरबाँ" हे गाणं जेव्हढं मधुबाला साठी आवडतं , तेव्हढंच दादा मुनी नी मधुबाला बरोबर केलेलं डांस साठी आवडतं. दादा मुनी चं ते पाईप / सिगार ओढणं, किती स्टायलीश होतं ते, ईवन के एन सिंग सुध्दा स्टायलिश दिसत होते.
सॉलीडच रे, सुसाट
सॉलीडच रे, सुसाट सुटलायस....
एक प्रसन्न आजोबा...अगदी अगदी...अशोककुमार म्हणल्यावर हेच चित्र डोळ्यासमोर येते.
तुझ्या लिखाणाचा फ्लो मस्त आहे..कुठेही अनावश्यक माहीती नाही आणि त्रोटकही वाटत नाही. ही मालिका फार सुंदर चालली आहे...आणखी भाग येऊं दे
प्रयोग, तुम्ही पण छान माहिती
प्रयोग, तुम्ही पण छान माहिती दिलीत.
एक शंका आहे. निंबुडाने तीच
एक शंका आहे. निंबुडाने तीच शंका व्यक्त केली त्यामुळे इथे पोस्टत आहे.
"....और फिर ऐसे बढिया बढिया अॅक्टरों हे सोबत मे रह कर थोडी बहुत अॅक्टींग तो आदमी सीख ही जाता है."
या वाक्यातला 'सोबत' हा शब्द मला अनेक वेळा ऐकूनही तसाच ऐकू आला. हेडफोन लावून देखील काहीही फरक नाही.
मराठीत अनेक शब्द उर्दू, फारसी मधून आले आहेत (मुघल राज्यकर्त्यांच्या प्रभावामुळे).तसंच काहीसं असाव "सोबत" या शब्दाच्या बाबतीत झालं असावं असं माझं मत आहे.
बरोबर आहे का? जाणकार किंवा कानसेनांनी मार्गदर्शन करावे.
मंदार झकास लेख! प्रयोग, आणखी
मंदार झकास लेख! प्रयोग, आणखी माहिती दिल्याबद्दल आभार! लोकसत्ताच्या रविवारच्या अंकात नलिनी जयवंतवर एक लेख आला होता. त्यात शेवटी अशोककुमार ह्यांचा उल्लेख आहे. ‘जीवन के सफर में राही’
मंदार ते ''सोहबत'' आहे. सोहबत
मंदार ते ''सोहबत'' आहे. सोहबत म्हणजे सहवास.
प्रचंड धन्स डॉक माझा अंदाज
प्रचंड धन्स डॉक माझा अंदाज बर्यापैकी बरोबर निघाला "ह" ऐकू येत नाही नीटसा (किंवा ज्यांना सवय नाही त्यांच्याकडून अजाणतेपणाने सिलेक्टिव्ह हिअरिंग केलं जात असावं आणि म्हणून ऐकला जात नसावा नीट).
पुन्हा एकदा खूप खूप धन्स.
Pages