बाबासाहेब

Submitted by मारुतीकांबळे on 6 December, 2010 - 23:02

डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

काल दि.६ डिसेंबर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी.लाखो अनुयायांनी चैत्यभूमी येथे भेट देवून बाबांना श्रद्धांजली वाहीली.संविधानाचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणार्‍या ह्या द्रष्ट्या नेत्यास विनम्र अभिवादन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारे महामानव!

कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार , कार्य मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व
स्फूर्तिदायी ठरते.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ मध्ये महू (मध्यप्रदेश) येथे झाला. तत्कालीन प्रखर अशा सामाजिक विषमतेमुळे बालपणीच त्यांच्या मनावर वाईट अनुभव कोरले गेले. पुढे १९१३ ला ते जेव्हा बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेला गेले, तेव्हा त्यांना अस्पृश्यतेचा काहीच त्रास झाला नाही.पण या परस्परविरोधी अनुभवांचा विचार करून त्यांनी आपल्या देशाला व समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचे मनोमन ठरवले. परदेशात असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली.

भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी, त्यांनी ‘मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०) आणि ‘प्रबुध्द भारत’ (१९५६) अशी वृत्तपत्रे चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही. स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्टय होय. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’, ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरले नाही. उत्तम समाजसमीक्षक असण्याबरोबरच स्वत: एक वाङ् मय-समीक्षक असणार्‍या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राम्हण’, यशवंत टिपणीस यांच्या ‘दख्खनचा दिवा’ या नाटकांवरदेखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बटर्‌रान्ड रसेल यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ या नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. ‘रिडल्स इन हिंदुइझम’, ‘महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट’, ‘स्टेट्स अँड मायनॉरिटिज’, ‘भारतातील जाती’ या ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली.

डॉ. आंबेडकर यांच्यावर संत कबीर, महात्मा जोतिराव फुले व राजर्षी शाहू महाराज या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा प्रभाव होता.

डॉ. आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. ते जेव्हा लंडनहून भारतात परत आले, तेव्हा परिचित लोकांनी, बाबासाहेबांनी मोटारीने घरी जावे असा आग्रह धरला. पण त्यास बाबासाहेबांनी नकार दिला. मग लोकल रेल्वेच्या प्रथम वर्गातून तरी बाबासाहेबांनी प्रवास करावा असा आग्रह लोकांनी धरला. पण तोही आग्रह मोडत त्यांनी आपल्या रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून प्रवास केला. जेव्हा ते घरी गेले, तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू केली. पण इथेही बाबासाहेबांनी घरातील घोंगडीवर बसणेच पसंत केले. या कृतीतून त्यांनी समानतेचे तत्त्व बिंबवले. त्यांनी या कृतीतून स्पष्ट केले की शिक्षण घेऊन ते ‘सुशिक्षित’ झाले असले, तरी समाजबांधवांना ते विसरलेले नाहीत, त्यांची दु:खे त्यांच्या स्मरणात आहेत.

डॉ.आंबेडकरांनी १९२७ ला महाडच्या (जि. रायगड) चवदार तळयावर अस्पृश्यांनादेखील पाणी भरता यावे यासाठी सत्याग्रह केला. स्वत: डॉ.आंबेडकर जरी हिंदू देव देवतांना मानत नव्हते, तरीही त्यांनी १९३० ला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू केला. कारण जर मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला, तर त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्र्न सुटण्यास हातभार लागेल, असे त्यांचे मत होते. हे सत्याग्रह केवळ त्या तळ्यापुरते किंवा मंदिरापुरते मर्यादित नव्हते, तर तो लढा सन्मानाने जगण्याच्या हक्कांसाठी होता. तो लढा तत्कालीन अस्पृश्यांमधील आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी आणि मानवी हक्कांसाठी होता. याचसाठी त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणार्‍या ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे जाहीर दहनही केले. १९१७ ते १९३५ या काळात हिंदू धर्मात राहूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत, कमी पडत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. तसेच तथाकथित उच्चवर्णीय लोक आपल्या वर्तनात व मानसिकतेत बदल करत नाहीत हेही त्यांच्या लक्षात आले म्हणूनच... १९३५ मध्ये त्यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा येवला येथे केली. १९५६ मध्ये सुमारे पाच लाख अस्पृश्य बांधवांसह बौध्द धर्माची दीक्षा घेऊन डॉ. आंबेडकरांनी धर्म-परिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली. (दिनांक १४ ऑक्टोबर, १९५६., नागपूर.)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही त्यांचे अवधान होते.

एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क, घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घेतले.१९३० सालच्या गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असा सल्ला दिला होता. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते. विभक्त मतदारसंघांच्या प्रश्नावरून जेव्हा महात्मा गांधींनी आमरण उपोषण सुरू केले, तेव्हा डॉ.आंबेडकर यांच्यासमोर महात्मा गांधींचे प्राण महत्त्वाचे की आपल्या जातिबांधवांचे हित महत्त्वाचे असा प्रश्न उभा राहिला. शेवटी त्यांनी तडजोड स्वीकारून महात्मा गांधीजींना आमरण उपोषण मागे घ्यायला लावले व त्याच वेळी अस्पृश्यांसाठी वेगळया रीतीने राखीव मतदारसंघ निर्माण करून आपल्या जातिबांधवांचे हितदेखील पाहिले (पुणे करार). जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचे ठरवले, तेव्हा सखोल अभ्यास व चिंतन करून त्यांनी अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौध्द धर्म निवडला. धर्म परिवर्तनाच्या या कृतीतूनही त्यांचे देशप्रेम लक्षात येते.

आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात रोज १८- १८ तास अभ्यास करणारे डॉ. आंबेडकर शिक्षणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे ओळखून होते. शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे १९४६ मध्ये सिध्दार्थ महाविद्यालयाची, तर औरंगाबाद येथे १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी’ या शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केली. शिक्षणाबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही १९२४ मध्ये ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली.१९२७ ला सवर्णांच्या अन्याय व अत्याचारापासून पददलितांचे संरक्षण करावे या हेतूने शिस्तबध्द असे ‘समता सैनिक दल’ स्थापन केले. १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, तर १९४२ साली ‘अखिल भारतीय शेडयूल्ड कास्ट फे डरेशन’ ची स्थापना केली. पुढे अखिल भारतीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले होते, परंतु दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

डॉ.आंबेडकरांना भारतीय कृषी व्यवस्थेची देखील चांगली जाण होती. सामूहीक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात पाणी आणि वीज यांचा समानरीत्या पुरवठा झाला, तर भारत एक समृद्ध देश होण्यास वेळ लागणार नाही असे त्यांचे मत होते. पूर्वीच्या काळी खोती पध्दत अस्तित्वात होती. या खोती पध्दतीमुळे शेतकरी वर्गावर खूप अन्याय होत असे. ती एक प्रकारची आर्थिक शोषण करणारी व्यवस्थाच होती. ही खोती पध्दत नष्ट करणारे कायदे डॉ.आंबेडकरांनी केले. ज्याप्रमाणे रेल्वेमार्गावर पूर्णपणे केंद्र शासनाची मालकी असते, त्याप्रमाणे जलमार्गावरदेखील केंद्र शासनाचीच मालकी असावी असे मत त्यांनी मांडले. पण हे मत कोणी फारसे विचारात घेतले नाही. त्यामुळे त्याचे आज काय परिणाम झालेले आहेत ते सर्वश्रुत आहे. आज भारतात जी नदीजोड प्रकल्पाविषयी चर्चा चालू आहे, त्या नदीजोड प्रकल्पाची एक योजनादेखील त्यांनी फार आधीच मांडली होती.

१९४७ मध्ये डॉ.आंबेडकरांचा स्वतंत्र भारताचे कायदामंत्री म्हणून पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला व त्याच वर्षी त्यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी व घटना समितीचे सभासद म्हणून निवड झाली.राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये दिलेल्या योगदानाबददल भारतीय जनता डॉ.आंबेडकरांना कदापिही विसरणार नाही.विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात सक्षम संघराज्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. आजच्या काळात गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीतही घटना मार्गदर्शक ठरते, यावरून डॉ. आंबेडकरांच्या द्रष्टेपणाची, बुद्धिमत्तेची कल्पना आपल्याला येते. इतर पाश्चात्य देशात स्त्रियांना व गरीबांना मतदानाचा अधिकार फार उशिरा मिळाला. पण डॉ.आंबेडकरांनी प्रौढ मतदान पध्दतीचा स्वीकार देशाला स्वतंत्र झाल्यापासूनच करायला लावला व भारतीय लोकशाहीचा पायाच त्यांनी या प्रकारे भक्कम केला. प्रशासकीय अधिकार्‍यांना त्यांचे कार्य नीट करता यावे यासाठी त्यांच्या सेवाशर्ती, नेमणूक या बाबत राज्यघटनेतच तरतूद करून त्यांना डॉ.आंबेडकरांनी निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य दिले.

‘राज्यघटनेचे शिल्पकार,’ ‘अस्पृश्योध्दारक’ असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले.

आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. आजुबाजूची परिस्थिती पाहिली तर असे वाटते, की भारतीय लोकशाहीला भारतीय जनताच तर नाकारणार नाही ना? स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, ‘जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.’

अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण; जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य; शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा; वक्तृत्व; इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व; प्रचंड वाचन; संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांसह ‘भीमजी रामजी आंबेडकर’ यांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ येथपर्यंत झाला.

गुलमोहर: 

मारुती कालच बाबासाहेबांचा पुण्यतिथी दिन साजरा झाला. आमच्या इथे दिक्षाभुमीवर खुप सुंदर सजावट केलेली असते
काल खुप गर्दी होती...

तुमचा लेख अप्रतिम .

राजे, मराठा महासंघ काय म्हणतो ते मायबोलीला का सांगता. लेखाला मिळालेल्या प्रतिसादावरुन तुम्हाला लक्षात आले असेलच की महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व कळकळ याबाबत मायबोलीकरांना काय वाटते.

मराठा महासंघाच्या भुमीकेविषयी मतप्रदर्शनाचे काय औचित्य आहे ?

अभ्यासपुर्ण लेख. आवडला.
मतदानाच्या हक्काबाबत जगभर अनेक लढे दिले गेले, आपल्याला मात्र तो या द्रष्ट्या नेत्यामूळे सहजच मिळाला.

मधुकर गेले, राजे आले (१ वर्ष जुना आयडी दिसतोय)
राजे, मराठी माणसात फूट पाडण्याचे प्रकार इथे चालणार नाहीत. तेव्हा "लवकर बरे व्हा" (Get well soon).

मारूतीकांबळे, तुमची भूमिका आवडली Happy

मला या विषयावर प्रतिक्रिया मुळीच द्यायची नव्हती..... परंतु एका चांगल्या विषयास वेगळे वळण लागून पुन्हा वितंडवाद होवून माबोवरील सेक्युलर वातावरण ढवळून निघू नये यास्तव ही प्रतिक्रिया देत आहे.

राजे, आपण ज्या रंगाचा चष्मा लावतो,त्याच रंगाचं जग दिसतं..... आपण मनातच ब्राम्हणद्वेष बाळगून असलात ,तर ब्राम्हण समाजाच्या सत्कृत्यातही दुष्कृत्येच दिसतील. आपण युट्युबवरील दिलेला व्हिडिओ हा ब्राम्हण्द्वेषाचा ढळढळीत पुरावा आहे. शक्य आहे की आपले काही व्यक्तींशी वाईट अनुभव आले असतील व योगायोगाने ते ब्राम्हण असतील्,पण म्हणजे सरसकट ब्राम्हण वाईट हा निष्कर्श म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. उडदामाजि काळे-गोरे या न्यायाने बौद्ध समाजातही वाईट / गुन्हेगार आहेतच की.

आणि बाबासाहेबांनी दीक्षा घेतली व धर्मपरिवर्तन केले तो काळ आणि आताच्या काळात जमीन - अस्मानाचा फरक आहे. आजोबांनी केलेल्या गुन्ह्यासाठी नातवाला शिक्षा द्यायची असते का?

कर्म-कांडे,अंधश्रद्धा/रुढी-निती ह्या च्या पलिकडे जावून बौद्ध समाजाने विचार करायचा आहे. हे विसरुन केवळ हिंदूद्वेष करण्यात जो पुढे,तोच खरा बौद्ध अशी एक नवीनच व्याख्या जन्माला येत आहे.

मी माझेच उदाहरण देतो...... माझ्या घरी देव्हारा आहे..,माझी आई व बहीणी देव-धर्म्,उपास-तापास्,व्रत-वैकल्ये सारं काही करतात.यावर माझ्या समाजातील लोकांनी बर्‍याचदा नाके मुरडली आहेत व नापसंती दर्शवली आहे.... मी त्यांना विचारतो...... कुणाचे नुकसान न होणार्‍या कर्म कांडे पाळली तर काय बिघडलं? मी दैववादी मुळीच नाही.... पण मला पूज्य असणार्‍या आईला ''हे थोतांड आहे'' असं म्हणून मी का दुखवू?

हेच प्रकार दिवाळीला होतात..... आपण दिवाळी पाळायची नाही...रांगोळ्या काढायच्या नाहीत... आकाश कंदिल लावायचे नाहीत इ.इ..... सांगीतले जाते.... मी हे सारे करतो. तर.. असं करणार्‍याला वाळीत टाकावे असे सांगीतले जाते.... ( माझ्या बाबतीत हे नाही घडले )........ यावर मला म्हणावेसे वाटते की..... वाळीत टाकणे.उच्च-नीच्,आदि प्रकार नष्ट व्हावे म्हणून बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि तेच पुन्हा करुन आपण त्यांचा अपमान नाही का करत?

आपलं वेगळेपण दिसावं, म्हणून पांढर्‍या रंगाचं मंगळसूत्र घालण्याची सक्ती केली जाते... कशाला हे?

माबोवरील माझे बहुसंख्य मित्र ब्राम्हण समाजाचे आहेत...... माझे शिक्षक्,माझे कलिग्ज्,माझे सहाध्यायी हे बहुसंख्य याच समाजाचे होते/आहेत.... यांच्यातला तुम्हाला दिसला,तो दुश्मन मला कधीच दिसला/जाणवला नाही...असे का? कारण त्यांच्यात तो नाहीच आहे.

मी अगदी लेटेस्ट उदाहरण देतो...... बाबासाहेब म्हणाले होते की, १९३५ मध्ये त्यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा येवला येथे केली........
त्याकाळी असलेल्या परिस्थितीमुळे व्यथित होवून ते हे म्हणाले असावेत्/होते... परंतु आज ते असते तर खचितच चित्र उलटं असतं कारण ब्राम्हण समाजासहित सार्‍यांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल झालाय..... माझे मित्र श्री अजय अनंत जोशी यांच्या गझलेतला एक शेर मी देवू इच्छितो....

भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'

ही नवी विचारसरणी काय सांगते..... http://www.maayboli.com/node/20489

त्यामुळे माझी आपणांस विनंती आहे,की हा द्वेषाचा चष्मा उतरवा.... जग हे फार सुंदर आहे..व संघर्ष हा फक्त बौद्ध धर्मीयांस नाही,तर सार्‍यांनाच आहे.

-डॉ.कैलास गायकवाड.

मराठासेवा संघ काय म्हणतो ईथे ऐका.

ईथे ऐका. यांच्या

मताप्रमाणे मारुती कांबळे साहेब, तुम्हाला सोन्याच्या बेडयांची ऑफर मिळाली.

राजे,

कुणी काय बोलतो?यावरुन मी माझी भूमिका ठरवत नाही. कुणी माझ्याशी कसा वागतो?यावरुन ठरवतो.
तुम्ही म्हणता तसे अजिबात नाही आहे. आपली भूमिका न पटण्याजोगी आहे.

डॉ.कैलास गायकवाड,
मी आपल्या गजला आवर्जून वाचतो.आपण फार चांगले व्यक्तीमत्व आहात हे त्यातून दिसत असतंच्,पण आपण फार चांगले माणूस आहात हे आपल्या वरील प्रतिसादाने दिसलं. आपण लिहीलेल्या शब्द न शब्दाशी मी सहमत आहे.

लेख सुंदर.

डॉ कैलासजी..

आपण जी विचारसरणी स्विकारली आहे तिच्याशी प्रामाणिक राहीलं तर व्यक्तिमत्व स्पष्ट होत जातं. समोरच्या कुठल्या विचारांचा आहे यावर प्रतिक्रियावादी म्हणून विचारसरणी ठरू नये. तुम्ही आहात तसे स्विकारले जाऊ शकता. दोन भिन्न विचारसरणी असलेल्यांमधे मैत्री होउ शकत नाही असं नाही. तसंच मतभेदाचे जे मुद्दे आहेत ते राहणारच आहेत हे भान ठेवून मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारेच पुढं जाऊ शकतात असा अनुभव आहे. मतभेदाशिवाय माणसं कशी असू शकतील ?

एक गोष्ट मात्र आहे. द्वेषावर आधारीत कुठलीच चळवळ दीर्घकाळ चालू शकत नाही. विद्रोह आणि द्वेष यातली पुसटशी सीमा समजून घेण्यासाठी तारतम्य असायला हवं. तसं तर तारतम्य सगळीकडंच हवं आणि ते फक्त माणसात वावरल्यानेच येऊ शकतं.. असो.

काल आयबीएन लोकमत वर निखील वागळे यांनी सुंदर चर्चा घडवून आणली. रिपब्लिकन चळवळ दिशाहीन झाली आहे का ?
एका बीएसपीच्या पुढा-याने ( माने का काहीतरी नाव होतं) केलेलं विश्लेषण इतकं मर्मभेदी होतं कि अर्जुन डांगळेसारख्या माणसाला काय बोलावं तेच सुचेना. गंगाधर पाणतावणे देखील मिळमिळीत वाटले..
या अशा चर्चा समाजात घेण्याची गरज आहे. डिक्की सारखे उपक्रम पुढं नेण्याची गरज आहे.

भावनात्मक गोष्टींवर समाजकारण / राजकारण करण्याचे दिवस गेलेले आहेत हे समजून घेतलं पाहीजे.

द्वेषावर आधारीत कुठलीच चळवळ दीर्घकाळ चालू शकत नाही

अगदी खरं झंडू...... १० पैकी ८ मुद्द्यांवर माझे कुणाशी मतभेद असतील तर मी उरलेल्या दोन विषयांवर चर्चा करणं अधिक सयुक्तिक मानतो. डिक्की सारखे उपक्रम्,जलाशय सारखे उपक्रम पुढे येण्याची गरज आहे. धर्माधिष्ठीत राजकारण मागे पडण्याचे दिवस आले आहेत..... कालची चर्चा मी सुद्धा पाहिली.... यशवंत मनोहर ठीक वाटले बाकी आपण म्हणताय तसाच मिळलिळीत पणा.. असो.

.

झंडु, अप्रतिम पोस्ट. Happy
आम्ही लहानपणी प्लॅस्टीकचा पोकळ चेंडू पाण्यात धरून ठेवायचो. सोडला की झपकन वर यायचा चेंडू. तुमची पोस्ट वाचून का कोणास ठाऊक पण त्या चेंडूची आठवण झाली.

बाबासाहेबांच्या आयुष्यातील जवळपास सर्व ठळक घटनांची व उपलब्धींची नोंद घेतल्याबद्दल लेखकाचे कौतुक.

कोलंबिया विद्यापीठात व लंडनमध्ये त्यांनी जे काही प्रचंड कष्ट उपसले त्याला तोड नाही. अर्थशास्त्रावर डॉक्टरेट करणार्‍या ह्या विद्यार्थ्याने त्याचवेळी चालू असलेल्या मानववंशशात्रावरच्या परिषदेत आपला प्रबंध सादर केला होता व तो तेव्हाच्या अभ्यासकांनी विशेष उल्लेखला होता. लंडनमध्येदेखील मला वाटते त्यांनी वकिलीचा अभ्यास करता करता (व टेंपल इनचे मेंबर असताना) दुसरा प्रबंध लिहिला (The problem of Rupee).

मूकनायक व बहिष्कृत भारत - दोन्हीचे संकलित एकत्र पुस्तक उपलब्ध आहे. अनेक लेख वाचनीय.

घटना समितीपेक्षा खरेतर बाबासाहेबांचे अधिक उचित स्थान मंत्रिमंडळात वा त्यापेक्षाही नव्याने स्थापन झालेल्या प्लॅनिंगकमिशनमध्ये होते. हा माणुस हाडाचा अर्थतज्ज्ञ होता. पण तेव्हा कलकत्ता स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा भारतीय राज्यकर्त्यांवर पगडा होता व बाबासाहेब हे मुंबई स्कूलवाले. महालोनोबिस यांच्याऐवजी वा बरोबर जर योजनासमितीत बाबासाहेब असते तर चित्र वेगळेही दिसले असते कदाचित.

डॉक्टर, झंडू,
किरू म्हणतो त्याप्रमाणे अप्रतिम पोस्ट्स.

मला वाटतं आता यावर चर्चा करण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन कुणी कशी प्रगती केली आहे (बुद्धीच्या जोरावर) त्याची उदाहरणे द्यावीत (झंडूंनी दिली आहेत तशी).

लेख सुरेख झालाय. बाबासाहेबांना प्रणाम
>> मारुतीकांबळे, तुम्ही ह्या चिथवण्याला बधला नाहीत व निष्कारण वाद थांबवलात याबद्दल तुमचे अभिनंदन >>
सहमत. हा सयंम दाखवल्याबद्दल

लिहीत राहा. तुम्ही काहीही न पेटवता फार छाण लिहताय. लेख असा असावा..

मला खरतर त्यांच्या विचारांबद्दल अजून वाचायला आवडेल. विचार, शिकवण सगळंच.

नीधप्,आपल्या औत्सुक्याबद्दल आनंद वाटला. बाबासाहेबांनी लिहिलेले जवळ जवळ सर्वच ग्रंथ आपल्याला येथे वाचता येतील. ग्रंथ पीडीएफ मध्ये नाही आहेत.

http://www.ambedkar.org/writeNspeech.html

यातून त्यांचे विचार्,शिकवण हे जवळून समजेल.

अतिशय माहितीपूर्ण आणि कळकळीने लिहिलेल्या लेखाबद्दल मारुती कांबळे यांचे आभार. आणि संयंत चर्चेबद्दल माबोकरांचे अभिनंदन.
डॉक्टर आम्ही चाहते तर होतोच तुमचे, आज मुजराहि घ्या..

Pages