सुझन आणि चिनी बाजार
रविवारी सकाळी साडेआठलाच सुझनचा फोन आला की आपण शॉपिंगला जाऊया कां? मी एका पायावर तयार. शॉपिंगच्या निमित्ताने शहरात भटकता आले असते.
सुझन विशीतली हसरी, खेळकर चिनी मुलगी आहे. इथे जॉब करते आणि एक लहान अपार्टमेन्ट भाड्याने घेउन दोन मैत्रिणींसोबत शेअर करुन रहाते. सुझनची आणि माझी ओळख जॉगर्सपार्कमधे झाली. माझ्या नवर्याच्या ऑफिसात ती बरेचदा इंटरप्रिटर म्हणून यायची त्यामुळे त्याची आणि तिची ओळखही होती.
सुझनला बर्यापैकी इंग्रजी येतं. पण तिला शांघायला जॉब करायचाय आणि आत्ता येतय तितकं इंग्रजी तिथे पुरेसं नाही म्हणून तिला शक्यतो जास्तीतजास्त इंग्रजी बोलण्याचा सराव हवाय. प्रोफेशनल क्लासेसची फी परवडत नाही. म्हणूनही ती माझ्याशी मैत्री करत आहे असं तिने बर्यापैकी स्पष्टपणे सांगून टाकलं. माझी काहीच हरकत नव्हती.
होंगियान औद्योगिक शहर असल्याने इथे नोकरीच्या निमित्ताने एकट्या रहाणार्या खूप मुली आहेत. त्यांची एक वेगळीच दुनिया आहे. कामांचे प्रचंड तास आणि फक्त रविवारी सुट्टी असल्याने सुझनला मला भेटायला जास्त वेळ येता येत नाही पण तिचे सारखे फोन आणि एसेमेस सुरु असतात.
सुझन बरोबर वेळेवर आली. तिच्यासोबत एक मित्र होता. ज्यो. तिने ओळख करुन दिली. त्याला इंग्रजी काही बोलता येत नव्हते त्यामुळे तो फक्त सारखा डोळे अजून बारीक करत हसत होता. कॉफी पिऊन तो गेला. ज्यो आपल्याबरोबर शॉपिंगला का नाही येणार असं मी सहज सुझनला म्हणाले तर ती लगेच उत्तरली. कशाला येईल? तो काही माझा बॉयफ्रेन्ड नाही. आता यामागे काय लॉजिक मला कळलं नाही. म्हटल मित्र तर आहे ना? तर म्हणाली नाही. त्याचं लग्न झालय आणि त्याची मुलगी आणि बायको दुसर्या शहरात असतात. जेमतेम विशीच्या दिसणार्या ज्योला मुलं वगैरे आहे हा धक्काच होता.
चीनमधे असे धक्के सारखे बसतात. तिथल्या लोकांची वयच कळत नाहीत. एकतर सगळे एकजात स्लीम आणि त्वचा कमालीची नितळ. शिवाय तलम, काळ्याभोर, चमकदार केसांचं वरदानच सगळ्यांना. चिनी मुलींचे ते मोकळे ठेवलेले, सळसळीत सुंदर केस हेवा वाटायला लावणारे असतात. काही वेळा बीड्सचे रबरबॅन्ड्स किंवा पिना लावून त्या ते अनोख्या पद्धतीने मागे वळवून बांधतात. मात्र कसेही बांधले तरी कपाळावर रुळणार्या बटा हव्यातच. चिनी मुलींची ही लेटेस्ट फॅशन. सुझनच्या कपाळावरच्या बटाही अगदी डोळ्यांवर झुकलेल्या.
टॅक्सी न घेता आम्ही चालतच रस्त्यावरुन निघालो. आम्ही रात्री ज्या कॉफीहाऊसच्या रस्त्यावरुन फिरायचो त्याच रस्त्यावरुन थोडच पुढे जाउन सुझन एका लहानशा गल्लीतून आत वळली. चीनच्या भव्य रस्त्यांवरुन पटकन आत वळणार्या ह्या गल्ल्या खूप डिस्क्रिट असतात. आपल्याला तर दिसतच नाहीत. कुठल्या तरी दुकानाच्या शोकेसच्या बाजूने ही गल्ली आत वळली होती.
आत वळलो आणि एकदम बाजाराची गजबजच अंगावर आली. पाश्चात्य संस्कृतीतून एकदम पौर्वात्य संस्कृतीत पाय ठेवल्यासारखं झालं. गोंधळ, गजबजाट आणि गडबड. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने दुकाने. सेलचे कपडे बाहेर टांगलेले. रस्त्यांवरही कपड्यांचे ढीग. आपल्या फॅशनस्ट्रीट किंवा लिंकिंग रोडसारखाच प्रकार. काही चिनी वयस्कार बायका कडेला बसून घट्ट भिजवलेल्या डोशासारख्या पिठाचे तापलेल्या मोठ्या तव्यावरुन पातळ, पापुद्र्यासारखे डोसे काढत होत्या. घट्ट गोळा डायरेक्ट तव्यावरच फिरवायच्या. मग ते पातळ डोसे एकावर एक ठेवून, चार-पाच डोशांची गुंडाळी करुन विकायच्या. काही बायका खुर्च्यांवर बसून शर्टांवर नाहीतर जीन्सवर बारीक भरतकाम करत होत्या. काही कडधान्य निवडत गप्पा मारत होत्या. हातगाडीवर उकडलेली मक्याची कणसं, रताळी, बटाटे, शिंगाडे विकत होते. यामे, चेरी, सफरचंदाचे ढीग होते.
आम्ही दुकानांमागून दुकानं बघत जात होतो. सुझनला काहीच पसंत पडत नव्हतं. तिला एक छान पार्टीफ्रॉक हवा होता. आणि मॅचिंग शूज आणि बॅग. होंगझो नावाच्या दुसर्या शहरात त्यांच्या कॉलेजातल्या मित्रमैत्रिणींच गेटटुगेदर होतं पुढच्या वीकेन्डला. तिच्या बजेटमधे बसणारा फ्रॉक शेवटी एकदाचा मिळाला. माझ्याकडे खूप छान कपडे नाहीयेत. फक्त जीन्स आहेत. त्यामुळे मला एकही बॉयफ्रेन्ड अजून मिळालेला नाही असं नंतर ज्यूस पिताना सुझन म्हणाली तेव्हा मला मजाच वाटली.
पण सुझन गंभीर होती. कॉलेजात असताना एकही बॉयफ्रेन्ड नसणं म्हणजे आमच्याकडे खूप हसतात सगळे. एकटं पडायला होतं. कुठे जाताना जोडीदार कोणीतरी लागतोच सोबत. म्हणून मग मी ज्यो बरोबर मैत्री ठेवलीय. सुझन सांगत होती.
म्हटल कसा हवाय तुला बॉयफ्रेन्ड? तर म्हणाली मला चीनी दिसणारी मुलं आवडत नाहीत. भारतीय सुद्धा नाही. मला लिओनार्दो डिकॅप्रियो किंवा ब्रॅड पिट सारखा दिसणारा बॉयफ्रेन्ड हवा आहे. म्हणूनच मला शांघायला जायचय. तिकडे खूप वेस्टर्नर्स असतात. मी पुन्हा थक्क. मला आपलं वाटलेलं सुझनला शांघायला जॉब करायचाय म्हणजे करिअर पुढे न्यायच्या दृष्टीने तिला ते महत्वाचं वाटत असणार. तर हे वेगळंच.
सुझनच्या इतर मित्रमैत्रिणींशीही नंतरच्या काळात बर्यापैकी ओळख झाली. सगळ्या वीस ते तेवीस वयोगटातल्या. वेगवेगळ्या लहान गावांहून होंगियानमधे नोकरीसाठी आलेल्या. स्वतंत्र, अनिर्बंध आयुष्य. पाश्चात्य संस्कृतिची कमालीची ओढ. फॅशन्स, कपडे, मेकप, ब्यूटी ट्रीटमेन्ट्स यात बराचसा पगार खर्च होतो. घरी जेवण कोणीच बनवत नव्हत्या. वेळच नसतो आणि येतही नाही. दुपारचे जेवण फॅक्टरीमधे मिळते. सकाळी इथे सगळीकडे रस्त्यावर कुठेही सहज मऊ, पेजेसारखा चिकट भात आणि त्यात भाज्या, बीफ घातलेले, किंवा सूपसारख्या पातळ पदार्थात राईसनूडल्स घालून वाडगे तयार ठेवलेले असतात. जॉबला जाताना बहुतेक तेच खाऊन जातात. बाकी इतरवेळी सूर्यफुलाच्या, कलिंगडाच्या भाजलेल्या बिया सोलून किंवा सोयाबिनचे भाजलेले दाणे खात रहायचे. स्मोकिंगचं प्रमाण प्रचंड. मुलगे-मुली दोन्हींमधे. सुझनची मैत्रिण म्हणाली स्मोकिंगमुळे वजन वाढत नाही. कमी वजन असण्याचं इतकं कमालीच ऑब्सेशन चीनी तरुणींना आहे. अक्षरश: वीतभर कंबर आणि पेन्सिलसारखी फिगर असली तरी मी जाडी दिसतेय असं म्हणणार्या चिनी मुली बघितल्यावर मला आपल्याकडच्या झिरो फिगर क्रेझचं आश्चर्य वाटेनासं झालं. जेवताना स्टरफ्राईड भाज्या समोर आल्या की, त्यातली फरसबीची शेंग किंवा कोबीचा तुकडा चॉपस्टिकमधे धरुन सुझन तो बाजूला ठेवलेल्या गरम पाण्याच्या ग्लासमधे बुचकळायची आणि मग तोंडात टाकायची. असं कां विचारलं तर म्हणाली. खूप तेलकट आहे. गरम पाण्यात बुडवलं की तेल निघून जातं. धन्य!.
सुझनला माझ्या नावाचा उच्चार करणं फारच अवघड जायचं. तुझं दुसरं एखादं सोपं नाव नाहीये कां असं तिने मला दोनतीनदा विचारलं. म्हटलं माझं नाहीये दुसरं नाव. पण तुझं नक्कीच असणार. चिनी लोकांच स्वतःच नाव वेगळं आणि बाहेरच्या लोकांसाठी इंग्लिश नाव वेगळं असतं. तर म्हणाली आहे. पण तुला सांगितलं तर तु हसशील. बर्याच आग्रहानंतर तिने नाव सांगितलम. श्यू टिंग. खूपच क्यूट वाटलं मला हे. सुझनपेक्षा खूपच गोड. तिला म्हटलं आता मी तुला श्यू म्हणणार.
---------------------------------------------------------------
कंटीन्यूड...
पाच मिनटात दुसरा भाग वाचतेय!
पाच मिनटात दुसरा भाग वाचतेय! सही!
मला स्वतःला प्रवासवर्णनात माणसांबद्दल वाचायाला खूपच आवड्त. सुझनच्या व्यक्तिमत्वाच आणि जिवनशैलीच वर्णन एकल्यावर झपाट्यान पाश्चात्य होणारा चीन डोळ्यासमोर येतो. आमचे बरेच चायनीज सहकारी याबद्दल जाम निषेध नोदंवतात.
का कोण जाणे, पण शिक्षण वा नोकरीनिमित्त निमित्त भारतातल्या छोट्याश्या शहरातून पुण्या-मुंबईत आलेली मुलगी अश्याच व्यक्तिमत्वाची असेल वा अश्याच प्रकारे जिवन जगायला लागेल--अस मला आपल उगाच वाटल. असो. तुझ्यामुळे छान सफर घडतेय चिनची.
मस्तच!
मस्तच!
छान लिहिलं आहे. सुझनच वर्णन
छान लिहिलं आहे.
सुझनच वर्णन कुठल्याही जपानी मुलीला सुद्धा अगदी फिट्ट बसतं!! केस आणि फिगर पासुन, जेवण, बॉयफ्रेंड सगळ सगळ तेच त्यामुळे वाचताना जास्त मजा आली.
शर्मिला छान लिहिलयसं , मी
शर्मिला छान लिहिलयसं , मी स्वतः हे चायनात असताना अनुभवलं असल्यामुळे जास्तच भावलं. पेन्सील फिगरच त्यांना बर्याचदा दु:खही वाटतं. भारतीय मुलींचे अभिनेत्रींचे फोटोज बघुन बर्याच मुलींनी ते बोलुन दाखवलं होतं.
उत्तम लेख व माहिती. पहिला भाग
उत्तम लेख व माहिती. पहिला भाग कोठे आहे?
हाही भाग मस्त लिहिलाय.
हाही भाग मस्त लिहिलाय.
सुझनचं वर्णन वाचून ती
सुझनचं वर्णन वाचून ती डोळ्यांसमोरच आली, इतकं छान लिहिलं आहेस. वाचते आहे.
छान लिहिलं आहेस.
छान लिहिलं आहेस.
सुझनचं मूर्तीमंत वर्णन.
सुझनचं मूर्तीमंत वर्णन. चांगलं लीहीलंय...
एकतर सगळे एकजात स्लीम आणि
एकतर सगळे एकजात स्लीम आणि त्वचा कमालीची नितळ. शिवाय तलम, काळ्याभोर, चमकदार केसांचं वरदानच सगळ्यांना. चिनी मुलींचे ते मोकळे ठेवलेले, सळसळीत सुंदर केस हेवा वाटायला लावणारे असतात. >>> अगदी अगदी!!!
शर्मिला, हाच भाग आधी वाचनात आला... भाग १ आणि ३ नंतर वाचेन...खुप छान लिहिलेय... वर्षू नील च्या एका लेखात मी माझ्या एका चायनीज मैत्रिणीविषयी लिहिले होते.... तुझे हे वर्णन वाचून ती पुन्हा एकदा आठवली... ती पण डिट्टो चिनी... वरच्या वर्णनात अगदी फिट्ट बसणारी...
किती थेट, प्रामाणिक! तूही
किती थेट, प्रामाणिक! तूही तसंच ते मांडलंस. धन्यवाद.
नशीबवान आहात, मलाही खरतर ह्या
नशीबवान आहात, मलाही खरतर ह्या स्ट्रीट शॉपिंग करायची खूप ईच्छा होती, पण दिवसभर बरोबर असणार्या चिन्याला / चिनीणीला संध्याकाळही आमच्या बरोबर घालव म्हणून सांगायला जीवावर यायच.
शेवती एकेदिवशी त्यांना पार्टी द्यायच ठरवून हा प्रश्न निकालात काढला. पण हाय रे दैवा, आमच्या बरोबर आलेले दोन्ही चिनी हे फक्त मॉलमधली खरेददारीच जाणत होते.
नवीन पिढी, दुसर काय