गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग १४

Submitted by बेफ़िकीर on 19 November, 2010 - 05:38

अफाट पैसा असणे हे जसे अनेकांचे स्वप्न असते त्याप्रमाणे अफाट पैसा असणे हे काहींचे दु:खही असू शकते.

हेलिक्सचा एक्कावन्न टक्के पैसा गुप्तांच्या बंगल्यात किंवा त्यांच्या नावावर होता हा मोनालिसाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होऊन बसला होता. कारण याच पैशासाठी जीवावर उठणारी माणसे सतत आजूबाजूला होती आणि त्यांच्याशी, 'सगळे माहीत असूनही' अत्यंत व्यवस्थित वागावे लागत होते.

वयाच्या सव्वीसाव्या वर्षी माणसाने किती आघाड्यांवर लढणे किंवा टिकून राहणे अपेक्षित असायला हवे खरे तर?

हेलिक्स चालवणे, तेही व्यवस्थित चालवणे! डॅनलाईन ही एक नवीन आघाडी स्वतःच उघडलेली असल्याने त्यावर फोकस करणे! रेजिनाबरोबरची, मोहात पडल्याने निर्माण झालेली फिजिकल रिलेशन्स नक्की कोणत्या दिशेला जात आहेत व जायला हवीत या ताणामध्ये राहणे, त्या नात्याची बदनामी होणार नाही हे पाहणे, सिवा ही एक वेगळीच आघाडी असणे ज्यातून बझटसारखी भीतीदायक माहिती मिळणे, डॅड आणि आईचा खून झालेला असल्याची खात्री पटण्याची परिस्थिती निर्माण होणे व त्या ताणात राहणे, लोहिया - अर्देशीर - जतीन - सुबोध - शर्वरी - नाना सावंत या संयुक्त किंवा त्या त्या स्वतंत्र आघाडीवर अ‍ॅलर्ट राहणे, स्वतःमधील एक ऐन तारुण्यात असलेली मुलगी / स्त्री जोपासणे व फुलवणे, पराग आणि शामासारखे तृतीय श्रेणीतील कामगारही विरुद्ध असल्याची जाणीव पोखरत राहणे, अन्न खाताना आपण आपल्याच घरात हकनाक मरू शकतो ही जाणीव सतत होत राहणे आणि.... त्यात हा सायराचा मृत्यू!

आणि हे सगळे सोसताना, अनुभवताना, एक म्हणजे एकही माणूस असा नसणे ज्याच्या मांडीवर डोके ठेवून निदान हमसून हमसून रडता तरी येईल! आई नाही, वडील नाहीत, सख्खा भाऊ नाही, सख्खी बहीण नाही, नवरा नाही किंवा अपत्यही नाही.

एकटेपणा! एक भयाण, भकास एकटेपणा!

आणि हेही सगळे एकवेळ सोसले असते... पण... यातील एकही आघाडी दुसर्‍याला समजता कामा नये हा ताण सर्वात मोठा... रेजिनाला माहीत होता कामा नये की लोहिया हे आपले शत्रू आहेत... अर्देशीरांना समजता कामा नये की रेजिना जवळचा आहे... शामाला समजता कामा नये की सिवा तिचे फोन टॅप करतो आणि सुबोधला समजता कामा नये की बझटबद्दल खात्रीलायक माहिती आपल्याला समजली आहे... आणि असेच सगळे...

मिस. एम. एम. गुप्ता!

जणू एका टॉवरच्या टेरेसवरील कठड्यावर कशाबशा उभ्या होत्या आणि त्या टॉवरचा प्रत्येक मजला हा लोहियांसारख्या विटेने बांधलेला होता.

आणि हे सगळे करताना चेहरा असा ठेवायचा जणू मीच सगळ्यांना स्फुर्ती आणि धीर देतीय!

रक्तात लागते ते रक्तात! काही काही गोष्टी विकसित करण्यासारख्या नसतातच! एखादा विद्यार्थी एम बी ए होऊन इंडस्ट्रीत जॉईन होऊन प्रमोट होत राहणे आणि मारवाड्याच्य मुलाने वयाच्या सहाव्या वर्षी स्वतःच्या दुकानातील चिक्की गिर्‍हाईकाला विकणे यात फरक आहे.

मोहन गुप्तांचे सळसळते रक्त शरीरात नसते तर मोनालिसा तुमच्या-आमच्यासारखी आम मुलगी बनून राहिली असती.

आत्ताही ती आत्मपरीक्षणच करत होती. बेडवर पडून थंडगार बीअर घेताना तिचे मन अनेक विचारांनी भरलेले होते. समोर बसून पेडिक्युअर करणार्‍या मधुमतीला मोनालिसाच्या मनातील वादळांची कल्पनाच नव्हती. ती आपली तिच्या वयाप्रमाणे गुणगुणत होती. आजवर मोना तिच्यावर एकदाही आवाज चढवून बोललेली नव्हती. काय इन्व्हेस्टमेन्ट आहे ही! आपणच कामावर ठेवलेल्या माणसावर आपण ओरडायचे नाही याची सतत जाणीव ठेवायची कारण निदान हा माणूस तरी असावा की जो आपल्यावर शुद्ध प्रेमच करतो!

दहा वर्षे बंगला पोखरणारी आणि नंतर मोनासाठी पुढचे आयुष्य लिहून टाकणारी सायरा एका क्षुल्लक धडकेमध्ये गतप्राण झाली होती. आणि मोना पुण्यात पोचून एक तास होत नाही तोवर लोहियांनी फोनवर ते वाक्य टाकले होते जे ऐकून तिच्या तळपायची आग मस्तकात पोचूनही ती शांतच असल्याचे भासवत होती.

"अ‍ॅन्ड द शॉकिंग थिंग इज दॅट शी वॉज प्रेग्नंट... आय मीन... डू यू नो हू इट वॉज..???"

मोनाने चक्क नाही म्हणून सांगीतले. म्हणजे, सायरा गर्भवती होती हेच माहीत नाही म्हणून सांगीतले आणि आश्चर्य व्यक्त केले. यात एक हेतू होता. ब्ल्यू डायमंडमध्ये सायराच्या पर्समध्ये सापडलेला रेकॉर्डर मोनाने ठेवलेला नव्हता हे लोहियांना समजावे!

सिवाच्या माणसाने अजिबात फॉलो केलेले नसल्याने सायरा नेमकी कशी मेली हेच समजत नव्हते. काही बघ्यांनी सांगीतलेल्या कथेनुसार नगरकरांच्या क्लिनीकमधून बाहेर पडताना सायराला एका प्रायव्हेट बसने उडवले आणि ती उडून कंपाऊंडवर पडली. त्यात तिचे डोके आपटून प्रचंड आघात झाला मेंदूवर आणि ती गेली. शरीरावर इतरत्र फक्त दोनच जखमा! कंपाऊंडवर खांदा आदळल्याने एक फ्रॅक्चर आणि कंबरेचे एक हाड डिसलोकेटेड! रक्त फक्त डोक्यातूनच आलेले! पोस्ट मॉर्टेममध्ये स्पष्ट लिहीले होते. पाच महिन्यांचा गर्भ होता.

मुंबईला बदली करण्यात आलेला जुना ड्रायव्हर पराग, गोरे, शर्वरी कुंभार, पिंजोरचे सायराकडचे दोन लोक आणि चक्क जतीन! इतके लोक आले दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी मिळून!

जतीन खन्ना! तेच सिल्की केस, डोळ्यांमधील सदाबहार मिश्कील भाव, सणसणीत शरीरयष्टी आणि जिभेवर कायम असलेली साखर! कित्येक दिवसांनी मोना जतीनला बघत होती. स्वतःच्या सख्ख्या मामेभावाला! पण एक शब्द बोलले नाहीत दोघे! जतीनच्या त्या प्लेझंट व्यक्तीमत्वाच्या आड एक काळेकुट्ट मन आहे हे तिला कळलेले होते.

आणि सगळे निघून गेल्याला आता पाच दिवस लोटले होते आणि या पाच दिवसात मोना ऑफीसमध्ये केवळ चार चार तास फक्त बसत होती.

मूडच नव्हता कशाचा! घरातील एक माणूस इतक्या सहज मरते? आणि आपण ते विसरून कामाला लागायचे? असे कसे? लोहियांच्या रक्तात व्हाईट आणि रेड ब्लड सेल्स ऐवजी दगडाचे कण वाहतात की काय? ज्या स्त्रीचे इतके शोषण करून वर ती ब्लॅकमेल करू नये म्हणून तिला अपघातात मारले तिच्याबद्दल इतकीशीही कणव वाटू नये त्यांना?? माणूस आहे का कोण?? पण... पण त्यांनीच मारले असेल का?? की मेली असेल खरच अपघातात? बसवाला तर सापडलाच नाही. बसही नाही. अज्ञात वाहनाच्या धडकेने गर्भवती महिल मृत्यूमुखी! संपला विषय! कोण महिला, ती कुणाची कोण होती, काय करायची.. काहीही नाही!

मधुमतीला मोनाच्या शेजारचीच एक छोटेखानी खोली देण्यात आली होती. मोनाने तिला विचारून पाहिले. सायराच्या प्रशस्त खोलीत शिफ्ट व्हायचे आहे का? अर्थातच मधुमती नाही म्हणाली. तिला भीती वाटत होती. पण मोनाच्या सान्निध्यात असताना तिला खूप धीर वाटायचा. त्यामुळेच ती जास्तीतकास्त काळ गेल्या सहा दिवसात मोनासमोरच असायची. आत्ताही ती गुणगुणत होती ते केवळ मनावरचे सावट घालवण्याचा निष्फळ प्रयत्न म्हणून! स्वतःच्या खोलीत झोपायला जाताना मात्र तिला पुन्हा भीती वाटू लागायची.

मधुमती खरे तर आयाच्या स्वरुपाचे काम करण्यासाठी एका संस्थेत दाखल झालेली होती. पण चुणचुणीत होती आणी अकराव्वी पर्यंत शिकलेलीही होती. मोनामॅडमच्या प्रशस्त बंगल्यातील वैभव ती अवाक होऊन पाहात राहिली होती आणि हो म्हणाली होती इथे राहायला! पेशंट कुणीच नाही. फक्त मॅडमबरोबर राहायचे आणि त्या सांगतील ते करायचे! तिला मिळालेली खोली छोटी असली तरी तुलनेनेच छोटी होती. तशी चांगली बारा बाय चौदाची होती. वेल फर्निष्ड होती. मात्र मधुमतीला अजून हे समजत नव्हते की तिचे इतर सर्व्हंट्सच्या तुलनेत नेमके स्थान काय आहे. हा प्रॉब्लेम तिच्या वयामुळे होत होता. ती होती केवळ वीस वर्षांची! शामा वगैरे पार मोहन गुप्तांच्या काळापासून इथे होत्या. त्यामुळे त्यांचा वरचष्मा होताच! त्यामुळे मधुमती आपली सतत मोना मॅडमच्या बरोबरच राहायची. कुणाशी जास्त बोलणे नाही की हासणे नाही. त्यामुळे हळूहळू गैरसमजही वाढू लागले होते. ती जादा शहाणी आहे, भाव खाते अशी मते तयार झालेली होती. पण स्वतः मोनामॅडम सतत तिलाच हाका मारत असल्यामुळे कुणाला तिच्या चहाड्या करणे शक्य वाटत नव्हते.

सायरा गेल्यापासून मधुमती मोनाच्या खोलीत रात्री दोन दोन वाजेपर्यंत नुसतीच बसून राहू लागली. शहारे आले होते तिच्या अंगावर सायराचे गुंडाळलेली डेड बॉडी घरात आली तेव्हा! आणि मॅडम नेमक्या नाशिकला! ती भीती बसलेली असल्यामुळे मोना ' जा आता, झोप' असे म्हणाली तरी ती नुसतिच बसून राहायची. अगदिच झोप अनावर झाली की मग जाऊन झोपायची.

मोनाला बरे वाटत होते. पावलांवर क्रीम अ‍ॅप्लाय करताना मधुमतीचे गुणगुणणे छान वाटत होते. तिच्या गुंगलेल्या चेहर्‍याकडे पाहताना मोनाच्या मनात मात्र तिसरेच विचार होते.

अ‍ॅन्यूअल डे!

उद्या!

उद्या कंपनीचा वर्षिक दिन होता. गुप्ता वारले त्या आधी तो जस्ट झालेला होता. त्यानंतर मोना स्थानापन्न झाल्यानंतरचा पहिलाच वार्षिक दिन!

एका प्रचंड मोठ्या लॉनवर हा साजरा व्हायचा! यात सर्व कर्मचार्‍यांच्या खान्यासाठी वेगळा विभाग, सप्लायर्ससाठी वेगळा विभाग, कस्टमर्ससाठी वेगळा विभाग आणि पुण्यातील आणि मुंबईतील क्रीम लेयरमधील काही जणांसाठी वेगळा विभग असे वर्गीकरण असायचे! कर्मचार्‍यांबरोबर अर्धा तास, सप्लायर्सबरोबर अर्धा तास, कस्टमर्सबरोबर एक तास आणि उरलेले दोन तास अतीविशिष्ट लोकांबरोबर, अशी वेळाची विभागणी करायची असते हे लोहियांनी मोनाला आजच सांगीतले होते.

कर्मचारीच साडे तीनशे होते. त्यातील किमान सव्वा दोनशे तरी यायचेच! भसीन आणि बिंद्रा मुख्यत: कर्मचार्‍यांच्या विभागाची जबाबदारी घ्यायचे. सप्लायर्स सत्तरच्या आसपास होते. तेथे मेहरा स्वतः असायचे. कस्टमर्सबरोबर मागच्या वर्षीपर्यंत जतीन, सुबोध आणि मग जोशी असे तिघे असायचे. व्ही आय पी लोकांबरोबर मागच्या वर्षीपर्यंत गुप्ता, अर्देशीर आणि लोहिया स्वतः असायचे. या वर्षी फक्त लोहिया... आणि मोनालिसा!

कस्टमर्स फारचे येऊ शकायचे नाहीत! कारण बरेचसे कस्ट्मर्स लांबलांबचेच होते. पण तरी पंचवीस एक जण असायचेच! त्यामुळे जतीन आणि सुबोध अनेकदा व्ही आय पींबरोबरही असायचे! पण या वर्षी दोघांनाही अर्धचंद्र मिळालेला होता.

आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सात वाजता मधुमती मोनालिसाने नेसलेली बावीस हजार रुपयांची डिझाईनर सारी अ‍ॅडज्स्ट करत होती.

सायराच्या मृत्यूचे सावट चेहर्‍यावर न दाखवता आज सर्वांना प्रसन्न चेहर्‍याने सामोरे जायचे होते मोनाला!

मीलन लॉन्सबाहेर आज पार्क झालेल्या गाड्या पाहूनच येणार्‍या जाणार्‍यांनी तोंडे बोटात घातली होती. बी एम डब्ल्यू आणि मर्सिडीझ याच किमान वीस होत्या. आणि तेही केवळ आठ वाजता! क्रीम लेयर यायला अजून निदान एक तास तरी असणारच होता. मधुमतीही आलेली होती पार्टीला! एका कोपर्‍यात उभी राहून मॅडमकडे लक्ष ठेवत होती. त्यांना काहीही हवे असले तरी पटकन स्वतः आणून देत होती.

शामा वगैरे श्रेणीतल्या कामगारांचे इथे काहीच काम नव्हते. मधुमती केवळ एक सहाय्यिका म्हणून आली होती आणि कुणाच्याही नजरेत येणार नाही अशा पद्धतीने लांब कोपर्‍यात उभी होती.

आणि पिवळे आणि काळ्या रंगाचे डिझाईन असलेल्या साडीत... कुणी काही म्हणाले तरी... मोनालिसा आज खरच सौंदर्यवती वाटत होती... आणि मुख्य म्हणजे.... मोहन गुप्तांची वारसदार म्हणून शोभत होती...

लोहियांना सोडून लोक मॅडमशीच जास्त बोलत होते.

कर्मचार्‍यांमध्ये एक जान निर्माण झाली जेव्हा लोहिया आणि मोना त्य विभागात प्रवेशले. सगळ्यांनी येऊन घोळके केले! आपापल्या पदाप्रमाणे अंतर राखून प्रत्येक जण हासून बोलत होता. मोना सगळ्यांना मराठीत 'भरपूर आणि सावकाश जेवा' असे सांगत होती सुहास्यमुद्रेने! शी वॉज लुकिंग किलिंग टूडे! खरे तर फारशी सुंदर नसूनही!

लोहियांवरही तिच्या तडफदार व्यक्तीमत्वाचा भलताच प्रभाव पडलेला होता. त्यातच त्यांना सोडून लोक तिच्याशी बोलत असल्यामुळे त्यांच्या मनात किंचित द्वेषही निर्माण झालेला होता. मोनाशी बोलण्याची संधी आम कर्मचार्‍यांना कधीच मिळायची नाही. त्यामुळे ते सगळे तिला पाहून उत्साहात होते. लोहिया निदान पुण्यात आले की शॉपवर तरी जायचे! ही तिथेच बसूनही जायची नाही. अजब वल्ली होती मोना! स्वतःचा दरारा आणि शान कशी टिकवून ठेवायची याबाबत तिचे आडाखे परफेक्ट होते.

भसीन आणि बिंद्रांना शुभेच्छा देऊन मोना आणि लोहिया दुसर्‍या विभागात आले. कर्मचार्‍यांपेक्षा अधिक महत्वाचा विभाग! सप्लायर्स!

मेहरांना विश करून दोघे एकेका सप्लायर्ला भेटायला लागले. कामाविषयी एक शब्दही बोलत नव्हते कुणी! कारण आज ते सगळे हेलिक्सचे निमंत्रीत होते. कामाबद्दल बोलून त्यांचा अपमान करायचाच नव्हता आज! ती सर्व भांडणे उद्यापासून पुन्हा सुरू करता येणारच होती. स्टीलच्या सप्लायर्सबरोबर बहुतांशी वेळ घालवून मोना कस्टमर्सच्या विभागाकडे जायला निघाली तर समोर रेजिना! ग्रे कलरच्या सूटमध्ये तो एखाद्या नटासारखा दिसत होता. मान तुकवून त्याने मोनाला अभिवादन केले. बिझिनेस इज बिझिनेस! आत्ता ती त्याची बॉस होती. तिला रेजिनाला पाहून फार फार आनंद झाला होता. पण आत्ता तो ती चेहर्‍यावर दर्शवत नव्हती. ती फक्त त्याला एका चांगल्या सहकार्‍याचीच वागणूक देत होती. पण तिने एक गोष्ट नोटीस केली. मेहरा आणि रेजिना एकमेकांशी विशेष बोलले नाहीत. व्हेअरअ‍ॅज लोहिया आणि रेजिना मात्र एकमेकांशी बरेच बोलले.

आता हा रेजिना कोणत्याच विभागात बसत नव्हता. कारण डॅनलाईनचे अजून एकही मशीन भारतात सप्लाय झालेले नसल्यामुळे त्या मशीन्सच्या कस्टमर्सना बोलावलेलेच नव्हते. तसेही सगळे लांबचेच होते. आणि ती मशीन फक्त ट्रेडिंग करायची असल्यामुळे त्यातील कर्मचारी वगैरे फारसे नव्हतेच! सप्लायर्स, म्हणजे स्वतः डॅनियल बॅरेट स्पेनहून येणे शक्यच नव्हते. त्यामुळे आपोआपच रेजिना आता या दोघाबरोबर फिरायला लागला.

कस्टमर्स!

आत्तापर्यंतचा सर्वात महत्वाचा विभाग!

चक्क वैझाग प्लॅन्टचे 'महाप्रबंधक संकर्म' म्हणजे जनरल मॅनेजर ऑफ द वर्क्स या सर्वात मोठ्या कार्यकारी पोस्टवरचे मोहंतीसाहेब आलेले होते कारण आज ते काही कारणाने पुण्यातच होते.

त्यांच्याबरोबरचे बोलणेच संपेना! एकदम मस्त माणूस! त्यांच्या अनुभवांचा साठा आणि बोलण्याची मिश्कील शैली दोन्ही मोनाला आवडले. लोहिया आणि मोहंती तर सरळ सरळ मित्रच असल्याचे दिसत होते. लोहियांचे अफाट कॉन्टॅक्ट्स हा हेलिक्सचा एक अ‍ॅसेटच आहे हे मोनाला पुन्हा जाणवले. केवळ लोहियांमुळे आज चवथ्या नंबरला आपण आहोत ही जाणीव तिचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत करून गेली. मोहंतींची बदली आता 'सेल' ला होणार होती! अर्थातच, हा माणूस 'सेल' ला गेला तर आज आहे त्याच्या दसपट महत्वाचा होणार होता. मोनाने कुजबुजत लोहियांच्या कानात सांगीतले. आजची परफॉरमन्स अ‍ॅवॉर्ड्स मोहंती साहेबांच्या हस्ते देऊयात! अर्थातच, लोहियांना ती कल्पना आवडली.

आता मोहंतींना एकटे सोडणे शक्यच नव्हते. आश्चर्य म्हणजे मोहंतींच्या बोलण्यात एकदाही अर्देशीर यांचा विषयही निघाला नाही हे पाहून मोनाला जरा विचित्रच वाटले. मोना, लोहिया, रेजिना आणि मोहंती, आता व्ही आय पी विभागात वळणार तेवढ्यात मोनाने विचारले...

"जडेजा नाही आले???"

लोहियांनी हासून मोनाकडे पाहिले.

"तिकडे असतील... चल बेटा..."

फारुख ऑटॉचे जडेजा व्ही आय पी मध्ये कासे काय हे मोनाला काही समजेना! पण 'ठीक आहे' असे मनातच म्हणून ती त्या विभागाकडे वळली.

मोहंती कस्टमर्सच्या विभागात आणि जडेजा व्ही आय पी मध्ये हा विनोदच होता.

व्ही आय पी....

जिकडे पाहावे तिकडे श्रीमंती नदीसारखी वाहात होती.

एकापेक्षा एक नटलेल्या अद्भुत श्रीमंत बायका हास्यविनोद करत होत्या. त्यांच्या नुसत्या गप्पाच चकीत करणार्‍या होत्या! त्यांची मुले एकीकडे बागडत होती. त्यांचा गोंगाट कर्कश असला तरीही जाणवणार नाही इतका लांब होता.

कस्टमर्स आणि हा विभाग वेगळा करण्याचे कारण असे होते की कस्टमर्सपैकी काही अगदीच छोटेखानी असू शकत होते. जे मोहंतींसारखे लोक होते ते भारतात लांब असल्याने यायचेच नाहीत. आणि व्ही आय पी मधील लोक हे खरोखर एकापेक्षा एक गाजलेले असे लोक होते. त्यांच्यात आलतू फालतू ने असावे हे त्यांना चालण्यासारखे नव्हते.

लोहिया - मोना.. मिस्टर जॅकी श्रॉफ...

मोना - ऑफ कोर्स आय नो हिम... मी यांची फॅन आहे...

जॅकी श्रॉफला खरोखरच दारू प्रचंड चढलेली असल्याने त्याचा चेहरा अत्यंत भयंकर दिसत होता. त्यातही त्याने कसेबसे हसत हस्तांदोलन केले. मोना त्याच्याशी काही शब्द बोलली. त्याला नीटसे बोलता येत नसावे. मात्र तो स्वभावाने अत्यंत दिलदार व हसतमुख माणूस आहे हे मोनाला माहीत होते. त्याला विश करून ती इतरत्र वळली. त्याच्याशीच बोलत बसणे शोभूनही दिसणार नव्हते आणि तो बोलूही शकत नव्हता.

लोहिया - मीट डॉक्टर सप्रे... न्युरॉलॉजिस्ट...

मोना - डॅड नेहमी सांगायचे तुमच्याबद्दल...

सप्रे - आय अ‍ॅम सॉरी... वुई लॉस्ट अ ग्रेट मॅन...

मोना - थॅन्क्स... हॅव अ नाईस टाईम अंकल...

सप्रे - शुअर.. थॅन्क्स...

लोहिया - मोनालिसा... हे कमिशनर पटेल....

मोना - हॅलो सर... हाऊ डू यू डू...

पटेल - व्हेरी फाईन बेटा... इट्स अ ग्रेट पार्टी... लाईक मोहन युझ्ड टू ऑर्गनाईझ...

मोना - थॅन्क्यू अंकल... या काकू का??

मिसेस पटेल - होय... गुन्हेगारीच्या विश्वातून काहीशी सुटका मिळावी म्हणून आले..

सगळेच हासले.

मोना - ऑफकोर्स.. आले म्हणजे काय?? आग्रहाने बोलावले होते... घरी पण या....

मिसेस पटेल - तूच ये आता घरी...

त्यांना विश करून मोना पुढे गेली.

लोहिया - बेटा... या मनोरमा सौमित्र....

मोना - ओह वॉव्ह... मी फक्त तुमची गाणीच ऐकायचे आजवर... तुम्ही इतक्या सुंदर आहात हे माहीत नव्हते...

मनोरमा - तू आज सर्वात सुंदर दिसत आहेस... मला या पार्टीला बोलावून सन्मान केलास माझा...

मोना - इट इज अवर हॉनर मॅम...

मनोरमा - धिस इज फॉ यू...

मोना - ओह.. हे कशाला... काहीतरीच करता...

मोनाच्या हातातील पार्सल मधुमतीने पटकन येऊन हातात घेतले आणि पुन्हा लांब गेली.

काहीतरी खटकत होते मोनाला! काय ते नीटसे लक्षात येत नव्हते. कारण एक तर गर्दी इतकी होती आणि इतक्या वेगात भेटी होत होत्या सगळ्यांशी.. की काही वेळच मिळत नव्हता विचार करायला.. पण.. आपण काहीतरी पाहिले आहे हे तिला निश्चीतपणे जाणवत होते...

लोहिया - मोना... हे प्रतापराव सुर्वे... साहेब.. या मिस मोनालिसा... एम डी ऑफ हेलिक्स...

मोनाने माजी आमदारांना अभिवादन केले. मोहंती मात्र इथे थांबले. आमदारांशीच बोलत! मोना, रेजिना आणि लोहिया पुढे गेले. तेवढ्यात परत जाणवले ते मोनाला! आता मात्र चांगलेच जाणवले. पण खूपच लांबवर होते ते! इतक्यात तिथे पोचणे शक्य नव्हते. मध्ये कितीतरी जण होते.

अचानक एक स्त्री आली आणि चीत्कारत मोनाच्या गळ्यात पडली. मोनाच्या गालाचे किसेस घेऊन म्हणाली...

"यू आर लुकिंग सो चार्मिंग माय डिअर... "

रावी???????????

हेलिक्सची एम डी झाल्यापासून आलेल्या संकटांच्या मालिकांमध्ये एकही विरंगुळ्याचा क्षण न लाभलेल्या मोनासाठी हा सुखद आणि अत्यंत तीव्र सुखद धक्का म्हणजे कमालच होती.

रावी!

होस्टेलवर ज्या चौघी तीन वर्षे एकत्र राहायच्या त्यातील एक होती मोनालिसा... आणि दुसरी रावी...

मिठीच मारली मोनाने! अत्यानंद झाला होता तिला! तिच्या माहितीप्रमाणे रावी चार वर्षांपुर्वीच लग्न होऊन कायमची अमेरिकेला गेलेली होती.

मोना - तू इथे आहेस नालायक??? सांगीतलेस तरी का मला...

रावी - फोन तरी करतेस का माझ्या घरी???

मोना - तू तरी करतेस का??

रावी - मी गेल्याच महिन्यात आले....

मोना - अच्छा.. म्हणजे अमेरिकेतून फोन नाही वाटतं करता येत...

रावी - मला वाटले तू रागावली असशील... म्हणून नाही केला...

मोना - मी का रागावू???

रावी - कारण मी तुला न भेटताच अमेरिकेला गेले...

मोना - रावी... डॅड गेले गं....

"माहितीय" असे म्हणून रावीने पुन्हा मोनाला जवळ घेतले.

रावी - मी त्यावेळेस टेलिग्राम केला होता.. मला आईचा फोन आला होता तिकडे...

मोना - मला खूप पत्रे अन तारा आल्या गं.. काही कळतच नव्हतं कुणी कुणी काय लिहिलंय...

रावी - असूदेत...

मोना - इथे कुठे राहतेस???

रावी - प्रभात रोड...

मोना - ए??? अगं पण तू आज इथे कशी काय आलीस???

आत्ता खरा प्रश्न विचारला मोनाने!

रावी - अच्छा.. म्हणजे नको होतं यायला???

मोना - मूर्ख मुली... कोण आहे तुझा नवरा???

रावी - माझा नवरा साधा सॅपचा कोर्स केलेला माणूस आहे..

मोना - मग??? कुठे आहेत तो??

रावी - तो कसा येईल?? त्याला काय बोलावणे होते???

मोना - ए नीट सांग ना...

रावी - बावळट.... तुझ्या कंपनीचा अ‍ॅन्यूअल डे आहे हे समजले म्हणून स्वतःच न विचारता निघून आले...

मोनाला अत्यानंद झाला! आहे... एक माणूस आहे जे खर्‍याखुर्‍या प्रेमाचे आहे. त्या माणसाची काहीही म्हणजे काहीही अपेक्षा नाही आपल्याकडून... केवळ मैत्रीशिवाय!

लोहिया ही डेव्हलपमेन्ट पाहातच राहिले.

मोना - अंकल.. माय क्लासमेट.. रावी...

लोहिया - माहितीय मला... हॅलो मिसेस रावी जडेजा... द ज्युनियर....

घामच फुटला मोनाला! रावी ही जडेजांची सून आहे???

तेवढ्यात मिस्टर जडेजा पुढे आले... मिसेस जडेजा सिनियर अर्थातच आलेल्या नव्हत्या...

जडेजा - तुम्हाला... वर्गमैत्रिणीला भेटून आनंद झाला ना???

पटकन चेहरा बदलणे अत्यावश्यक होते.

मोना - अर्थातच... प्रश्न आहे का हा??

सगळेच हसू लागले.

जडेजा! खरच की? या बावळट मुलीची आपल्याला तेव्हा पत्रिका आली होती... आपण लक्षच दिले नव्हते... होस्टेलवर झालेल्या भांडणांपासून बोलतच नव्हतो आपण दोघी... अरे??? ही... ही या जडेजांची सून आहे???

अचानक गेटपाशी गडबड उडाली... सगळ्यांनीच तिकडे पाहायला सुरुवात केली... एक मोठा घोळका तिथे असल्यामुळे कोण आले आहे हेच समजत नव्हते.. तो घोळका त्या माणसाला अभिवादन करत करत व्ही आय पी विभागाकडेच आणत होता... संपूर्ण व्ही आय पी विभाग डेड सायलेन्ट होऊन त्या घोळक्याकडे बघत होता... मोनासकट...

धक्का... धक्के कधी संपणार हेच मोनाला समजत नव्हते तिच्या आयुष्यातील....

अर्देशीर इंजीनीयर...

काय करावे??? काय करावे काय आपण आत्ता???

संपूर्ण हेलिक्सच्या दृष्टीने आजही लोहियांपेक्षाही अर्देशीर जास्त पॉप्युलर होते हे सरळ दिसतच होते समोर!

एक माणूस नव्हता जो त्यांना अभिवादन केल्याशिवायच पुढे जाऊ देत होता.

जॅकी श्रॉफकडे अन मनोरमाकडे कुणी पाहात नव्हते पण अर्देशीरांना सगळेच भेटायला धावत होते.

लोकांना काही माहीतच नव्हते झालेल्या घटनांबद्दल! माहीत असणारे काहीच जण होते. स्वतः मोना, अर्देशीर, लोहिया, जतीन, सुबोध, शर्वरी, गोरे आणि सायरा! कदाचित सिवा...

सर्वांच्या मते अर्देशीरांनी वयानुसार काम करणे बंद केले होते आणि त्यांचे शेअर्स त्यांनी मोनाला विकून टाकलेले होते.

एकंदर लोकांचा मूड पाहून पुडे व्हायलाच हवे होते. आपण एम डी असलो तरी आपल्यापेक्षा मोठे स्वागत उत्स्फुर्तपणे अर्देशीरांना मिळत आहे ही बाब मोनाला अत्यंत जाचत होती. पण पर्याय नव्हता. अर्देशीरांचे आयुष्य शॉपवर गेलेले होते. शॉप आणि इतर ऑपरेशन्स या सर्व क्रॉस सेक्शनमध्ये त्यांचा ठसा सर्वत्र होता आजही!

लोहिया पुढे झालेही! याचा तर मोनाला आणखीनच राग आला! पण आत्ता चेहरा वेगळा ठेवायला हवा होता.

रावीला 'आलेच' असे सांगून मोना तिकडे निघाली. जडेजांना 'आलेच' असे सांगायची गरजच नव्हती कारण ते लोहियांच्या पुढे एक पाऊल चालत होते अर्देशीरांना भेटण्यासाठी!

आणि तो प्रसंग येऊन ठेपला! ती नजरानजर! विष सौम्य वाटेल अशी! पण साखरेच्या पाकात गुंडाळलेली! निर्मळ स्मितहास्याआड दडवलेली नजरानजर!

अर्देशीरांनी मोनाला जवळ घेतले. फक्त मोनालाच ऐकू जाईल अशा आवाजात विचारले..

अर्देशीर - मला... मला नाही बोलावलंस बेटा???

तो स्पर्श! तो आवाज... तो प्रश्न....

तो एकच क्षण जिंकायला हवा होता मोनाने... पण... मोनालिसा... शेवटी एक स्त्री होती.. पुरुषापेक्षा कितीतरी भावनिक... वयाने लहान... अर्देशीरांच्या तुलनेत कितीतरी अननुभवी.. हारलीच ती...

त्या क्षणी सगळं विसरली मोना... लहानपणी याच काकांच्या मांडीत बसून खेळायची... त्यांच्याशी बोबड्या गप्पा मारायची... खाऊ मागायची... रुसायची अन हसायची...

पटकन खाली वाकली मोना... संस्कार... दुसरं काय?? वाकून नमस्कार केला...

अर्देशीरांनी पुन्हा तिला उठवून उभे केले आणि कुजबुजल्यासारखे म्हणाले...

अर्देशीर - बेटा... मी थांबणार नाहीये हां... लगेच निघणार आहे... फक्त.. एक सांगतो तुला... कितीही वादविवाद झाले असते तरी मोहनने हेलिक्सच्या अ‍ॅन्युअल डे ला मला बोलावले नाही असे झाले नसते कधीही.... माझ्या, मोहनच्या आणि लोहियाच्या रक्तातून उभी राहिली आहे बेटा हेलिक्स... मोनी.... तुला लोकांनी नावे ठेवू नयेत... इतक्याचसाठी मी इथे आलो आहे हं??... सॉरी... आता तुला त्रास देणार नाही मी...

केवळ दहा मिनिटात सर्व व्ही आय पी लोकांना ब्रिफली भेटून अर्देशीर निघून गेलेही! एक भक्क रिकामेपण आले होते मोनाच्या मनामध्ये!

आपण हारलो आहोत हे तिला समजले. हेलिक्सची एम डी अशी वाकायला नको होती त्यांच्यासमोर! आपण अपरिपक्वपणे वागतो हेच खरे! दुसरे काही नाही. अगदी भावनिक वगैरे केले आपल्याला! नालायक म्हातारा!

लोहिया, जडेजा आणि रेजिना तिच्याबरोबर उभे राहून एकमेकांशी बोलत होते.

तेवढ्यात मोनाला ते फार फार जवळून दिसले.. जे मगाचपासून मध्येच दिसून छळत होते....

जडेजांनी मधेच एक प्रश्न विचारला...

जडेजा - या आठवड्यात आपल्याला भेटायला यायचे होते.... वेळ आहे का??

मोना - अं?? . हंहं.. अ‍ॅक्च्युअली.. मी... पंधरा दिवस सुट्टीवर चाललीय...

हा लोहिया आणि रेजिनासाठी धक्काच होता. हे काय मधेच???

लोहिया - बेटा?? .. रजेवर आहेस तू???

मोना - हं... सिंगापोर... पंधरा दिवस....

ही बातमी लोहिया आणि जडेजांना अत्यंत आनंददायी वाटत होती तर रेजिनाला दु:खद....

... आणि मोनाला काहीच वाटत नव्हते... कारण.. केवळ पंधरा फुटावर असलेल्या त्या काळ्या सुटमधील माणसाच्या खिशावर नेमके..... तेच चिन्ह होते....

.... जे पाचगणीला.... सिवाच्या शर्टच्या खिशावर होते....

================================================

मधुमतीच्या दृष्टीने ही नोकरी म्हणजे एक पर्वणीच होती. विमान प्रवास काय, अत्यंत महागड्या होटेलमध्ये राहणे काय! बदल्यात फक्त मोना मॅडमच्या बरोबर राहायचे आणि त्यांना सांभाळायचे! त्या तिच्यावर कधी रागवायच्याही नाहीत आणि जास्त जवळीक करून बोलायच्याही नाहीत! खरे तर त्यांचे तिच्याकडे लक्षच नसायचे! त्यामुळे मधुमती स्वच्छंदपणे वावरू शकायची.

हिमाचल! पुन्हा एकदा! पण यावेळेस सिमला नाही. मनाली! सिमल्यापेक्षा समुद्रसपाटीला खरे तर अधिक जवळचे... पण... दहा महिने हिमाच्छादीत असल्यामुळे अधिक थंड!

मधुमती बघतच बसली होती हिमालय! हा असा समोर! आणि मोना पाहात होती शुन्यात!

इथल्या रूमला ए सी का आहे हेच मधुमतीला समजत नव्हते. हीटर लावावा लागत होता चोवीस तास! आणि तरीही दोन दोन स्वेटर्स घालून रूममध्ये बसावे लागत होते. बाहेर भयंकर वातावरण होते. सतत बर्फाळलेला पाउस भुरभुरतोय आणि हिमालयावरचे बर्फ वितळूच शकत नाही आहे.

आपण इथे का आलो आहोत याचा विचार तिच्या मनात सतत येत होता. कारण काल रात्री इथे आलो आणि झोपलो. आज उठलो, नाश्ता वगैरे मस्त आला होता रूममध्ये, वाफाळलेला चहा... मस्तपैकी हादडले पराठे... आणि बसलो टी व्ही बघत.. बाहेरही पडता येत नाही... कालचा पुणे ते दिल्ली विमानप्रवास मात्र भारीच... आणि नंतर हा लांबलचक प्रवास गाडीने... मॅडम काही बोलतही नाहीत... काय विचार करतात काय माहीत.... आता संध्याकाळ होत आली आहे... दुपारच्या जेवणानंतर आपल्याला तर सुस्तीच आली.... मॅडम स्वतःच म्हणाल्या... तू पड जरा... आणि आपण चक्क अडीच तास झोपलो??? नोकरी गेली असती आपली... उठून पाहतोय तर मॅडम आपल्या नुसत्या शुन्यात बघत चहा घेत बसल्या आहेत...

यडचाप बाई आहे की काय ही? चांगले कुठेतरी बर्‍या ठिकाणी जायचे तर इथे बर्फात येऊन बसलीय! काही करताही येत नाही. बाहेर टेरेसमधून हिमालय पाहावा म्हंटले तर इतके कुडकुडते की एक मिनिटही उभे राहता येत नाही. आत आले तर या नुसत्या बसलेल्या! टीव्ही तरी किती बघायचा!

नुसता आराम करायला आल्या असाव्यात बहुधा मॅडम इथे! बाकी काही नाही. चला! आपणही 'नुसता' आरामच करूयात मग!

खुदकन हसूच आले मधुमतीला! मोनाने तिच्याकडे पाहिले तशी ती चपापली.

मोना - हसायला काय झाले?

तो धारदार प्रश्न ऐकून घाबरून मधुमतीने नकारार्थी मान हालवली.

मोना - मग हासतेस काय??

मधुमती - हसले नाही....

मोनाने तिच्याकडे दुर्लक्ष केले तशी मधुमती बाथरुममध्ये गेली. खरे तर तिला बाथरूममध्ये जायचेच नव्हते. पण हसूच इतके येत होते की भरपूर हासण्यासाठी ती आत गेली. आरश्यात पाहून वेड्यासारखी हासतच बसली.

आणि काही मिनिटांनी परत आली.

आता तिला पुन्हा हसू यायला लागले. कारण मॅडम नुसत्याच भिंतीकडे बघत बसल्या होत्या. हेच करायचे होते तर पुण्यात नसते का करता आले?? मधुमतीला इंग्लीश फारसे येत नव्हते. त्यामुळे सकाळपासून झालेल्या दोन फोन कॉल्सवर नक्की काय बोलणे झाले हे तिला समजलेले नव्हते. इथे पंधरा दिवस राहायचे आहे हे ऐकून मात्र तिला वेड लागायची वेळ आली होती. या विचित्र बयेच्या सान्निध्यात आपण पंधरा दिवस नुसता टी व्ही बघायचा?? आणि आज पहिलाच दिवस!

खायची प्यायची मात्र चंगळ होती!

आठ वाजले तशी मात्र मधुमती खरच कंटाळली. सरळ ब्लॅन्केट अंगावर घेऊन टेरेस्मध्ये गेली अन धावत पुन्हा आत आली. बाहेर पाऊस होता! असला कसला पाऊस? एक थेंब चेहयावर पडला तर बर्फाळला चेहरा!

आता मोना तिच्याकडे पाहून खुदकन हासली. त्यांना कसे विचारणार 'हासता काय' म्हणून! त्यामुळे मधुमती नुसतीच हासली. तिला बरे इतकेच वाटले की बया निदान हासली तरी!

आणि रात्री नऊ वाजता रिसेप्शनमधून इंटरकॉमवर काहीतरी मेसेज आला. चटकन मोनाने आवरायला घेतले तशी मात्र मधुमती उठली.

आणि अर्ध्या तासाने आवरून मोना खाली जायला निघाली तेव्हा दारातून मागे वळून मधुमतीला म्हणाली...

मोना - एक तास तरी लागेल.. फोन वाजला तरी घेऊ नकोस... काय???

मधुमतीने मान हालवली... पण बहुधा मोनाचे समाधान झालेले नसावे...

मोना - नाहीतर तूही चल माझ्याबरोबर खाली.. चल लवकर.... नाहीतर... नकोच...

एका प्रशस्त हॉलच्या मागे थोडी मोकळी जागा होती. त्यात हट्स होत्या प्रत्येक हटमध्ये एक शेकोटी अन एक हीटर होता. हॉलमधून हटपर्यंत पोचेपर्यंतही हाडांपर्यंत थंडी पोचत होती.

मोना मात्र शांत चालीने एका हटपाशी पोचली. एका वेटरने त्या हटकडे निर्देध केलेला होता.

वॉव्ह!

हट काय होती ती!

बाहेरच्या पावसाची अन थंडीची आत कल्पनाही येणार नाही अशी!

फक्त... एक गोष्ट जरा खटकत होती... तो माणूस... त्या टेबलवरचा...

लालसा... त्याच्या नजरेत फक्त हवस होती हवस! अत्यंत घाणेरड्या नजरेने तो मोनाकडे पाहात होता.

"हाय... आय अ‍ॅम रणजीत..."

त्याने पुढे केलेल्या हाताला जेमतेम स्वतःच्या हातांनी स्पर्श करून मोनालिसा एका खुर्चीवर बसली. रणजीत अजूनही तिच्याकडे उत्सुकतेने पाहात होता.

मोना - आय अ‍ॅम मिस गुप्ता...

रणजीत - ओख्खे....

वेटरने रणजीतचा पुढचा पेग भरला. मोनाने पाहिले. रॉयल स्टॅग होती ती! एक स्वस्त व्हिस्की! इतक्या मोठ्या हॉटेलमध्येही त्या मूर्खाने हीच व्हिस्की मागवली हे पाहून मोनाला समजले. पैशाला अत्यंत हपापलेला असणार आणि याला दारू चढत असणार!

संपूर्ण जाड जाड कपड्यांनी शरीर गुंडाळणारा तो माणूस चाळिशीचा असावा! दाढीचे खुंट वाढलेले, लाल डोळे आणि चेहर्‍यावर एक बेरकी अन संधीसाधू हसू

इंग्लीश मात्र अस्खलीत बोलत होता.

रणजीत - व्हॉट यू विल हॅव...

मोना - नथिंग...

रणजीत - ये क्या बात हुई?? सूप तो लीजिये??

पुढचा काहीतरी विचार करून मोनाने मेन्यू पाहिला. सर्वात उच्च प्रतीची स्कॉच म्हणजे टीचर्स होती. तीच मागवली. पाच मिनिटांनी ती बाटली आल्यावर रणजीत एखाद्या साठ वर्षाच्या सांडाने कुमारिकेकडे पाहावे तसा घाणेरड्या नजरेने त्या बाटलीकडे पाहू लागला. मोनाची शक्कल कामी येणार असे दिसत होते.

रणजीतने पटकन स्वतःसमोरची रॉयल स्टॅगची निप जर्कीनच्या खिशात टाकली अन लाचारपणे हासत म्हणाला..

रणजीत - ये बादमे लेलुंगा.. आपके सामने रॉयल स्टॅग लेना ठीक नाही...

मोनाचा चेहरा दगडासारखा निर्जीव होता आत्ता! रणजीतला चढलेली असल्याने ते जाणवत नव्हते इतकेच!

या पुढील संवाद काहीसा इंग्लीशमशे तर बराचसा हिंदीमध्ये झाला.

मोना - इन्स्पेक्टर जगमोहन यांनी मला तुमचा नंबर दिला... सिमल्याचे...

रणजीत - हं... हरामी स्साला...

मोना - तुम्ही मुळचे कुठले??

रणजीत - मी?? ... बरेली...

शॉक! हा मोनाला शॉकच होता! मोहन गुप्ता बरेलीचे होते मुळचे! पण मोठा भाऊ आणि ते शिमल्याला स्थायिक झाले आणि का झाले ते समजत नव्हते. आणि तिथे श्रीवास्तवांचे हॉटेल होते म्हणून रणजीतला भेटली तर तो म्हणतो तो मुळचा बरेलीचा आहे.

जगमोहनने मोनाला सांगीतले होते. पैशाच्या बदल्यात तो सगळी माहिती सांगेल! आमच्या लिस्टवर त्याचे नाव आहे. इम्मॉरल ट्रॅफिकिंग या गुन्ह्यात! तीन वेळा पकडला गेलेला आहे. पण एका स्थनिक नेत्याच्या वशिल्याने तीनही वेळा सुटलेला आहे. अत्यंत नालायक माणूस आहे. आदेश असते तर एन्काउंटरही केले असते. कुणाला तरी बरोबर ठेवून भेटा! दारूच्या नशेत काहीही बरळतो. मात्र एक आहे... मी त्याला ऑर्डर केल्यानंतर तो तुम्हाला भेटला नाही असे होणारच नाही... कारण मला अतिशय घाबरतो... एकदा त्याला धडा शिकवलेला आहे मी....

मोना - तुम्हीही बरेलीचे आहात??

रणजीत - होय... तुम्ही मला का बोलावलं आहेत??

टीचरच्या बाटलीकडे हपापल्यासारखे पाहात त्याने मोनाला विचारले.

मोना - माहिती हवी आहे....

रणजीत - मी घेऊ का?? थोडी घेतो... टीचर्स.. वा वा... चांगली व्हिस्की असते ही....

मोना - जरूर... जाताना हवे तर उरलेली बाटलीही घेऊन जा...

रणजीत - अरे?? अरे वा वा... मग ठीक आहे...आत्ता रॉयल स्टॅगच पितो.. टीचर्स घरी घेऊन जाईन..

मोना - तुमच्या कुटुंबात कोण कोण होते??

रणजीत - मी.. आई वडील... भाऊ आणि बहीण.. एक कुत्रा...

मोना - बहीण???????

रणजीत - हं... मेली...

मोना - मेली???

रणजीत - हं.. लहानपणीच... कुणाला सांगीतलंत तर मी म्हणेन तुम्ही खोटे बोलताय... पण मी तिला खलास केले...

मोना हादरलेली होती.

मोना - क.... का????

रणजीत - राघवबरोबर पकडले एकदा तिला मी... भांडणे झाली... मला राग आला होता.. पाळत ठेवून एका अंधार्‍या रस्त्यातून ती एकदा जात असताना मी गज घातला डोक्यात....

मोना - तुम्हाला... पकडले नाही????

रणजीत - छ्या! ... अजूनही सांगतो.. कुणाला सांगीतलेत तर मी म्हणेन खोटे बोललात... टेप रेकॉर्डर नाही आहे ना बरोबर??

मोना - नाही... .. पण राघव कोण??

रणजीत - तुमचा चुलत भाऊ...

आपले डोळे इतके विस्फारले जाऊ शकतात हे मोनाला त्याच दिवशी समजले.

मोना - माझा चुलत भाऊ????? ... म्हणजे सुबोध??

रणजीत - मला पिऊन चढत नाही... अन तुम्ही न पिता बरळता....

मोना - म्हणजे??

रणजीत - सुबोध माझा सख्खा भाऊ.... राघव तुमचा चुलत भाऊ...

मोना - तो कुठे असतो????

रणजीत - सध्याचा पत्ता... नरक...

मोना - ... मेला???

रणजीत - केव्हाच.... त्याला विरह सहन झाला नाही.. त्यामुळे त्याने मला त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून काडी टाकायला सांगीतली...

मोना आत्ता खरे तर रूमवर निघून जायच्या मूडमध्ये आली होती. समोर बसलेले प्रकरण सरळ सरळ भयंकर होते. त्याने दोन खून केलेले होते. बाकीचे गुन्हे करतच होता. आणि वाचतही होता त्यातून!

मोना - त्याला का मारलेत???

रणजीत - असभ्य होता तो.... बहिणीच्या बाबतीत... माझ्या...

मोना - अन तुमचे वडील???

रणजीत - काय माझे वडील??

मोना - ते कुठे होते??

रणजीत - ते चोवीस तास लॅबमध्ये असायचे... आम्हाला तिघांना जन्माला घालण्यापुरतेच ते आईला भेटायचे... बाकी लॅबमध्ये...

मोना - नेमके काय झाले होते त्या काळात??

रणजीत - त्या काळात महत्वाची अशी एकच गोष्ट झाली होती...

मोना - कुठली???

बहुतेक आता 'बझट' हे नाव ऐकायला मिळणार या अपेक्षेत मोनालिसा होती.

रणजीत - तुझा जन्म...

बोलता बोलता 'तुम्ही' वरून तो 'तू' वर आलेला आहे हेही मोनाला समजले नाही... आजचा दिवसच धक्क्यांचा होता...

मोना - ... म्हणजे काय??

रणजीत - म्हणजे असे... की तुम्ही मला जर पैसे देणार असाल... तर पुढच्या दहा प्रश्नांची उत्तरे मिळतील.. अकराव्या प्रश्नाला पुन्हा पैसे...

मोना - ... पै... किती पैसे???

रणजीत - एक प्रश्न... एक हजार रुपये...

मोना -का??

रणजीत - का म्हणजे?? निघ तू... नसले प्रश्न विचारायचे तर...

मोना - देईन पैसे...

रणजीत - अंहं... शब्दावर विश्वास ठेवणार्‍यातला मी नाही... आत्ता अ‍ॅडव्हान्स टाकायचा...

मोना - मी काय बरोबर घेऊन फिरते पैसे??

रणजीत - घेऊन ये वरून.. मी बसलोय पीत...

मोना खरच उठली. रणजीत नालायकासारखा तिच्याकडे बघत हासत पेग रिचवत होता.

सात आठ मिनिटांनी मोना परत आली तेव्हा तिच्या हातात पर्स होती.

रणजीत - अरे वा?? दहापेक्षा जास्त प्रश्न दिसतायत मनात....

खो खो हासला रणजीत! डोळे मिटून! आणि डोळे उघडले तेव्हा हजाराच्य वीस नोटा टेबलावर दिसल्या त्याला.. मोजल्या त्याने!

रणजीत - वीस प्रश्न विचार... पुढचे तीन प्रश्न फुकट तुला...

मोना - मला प्रश्न विचारायचे नाही आहेत...

रणजीत - मग?? दानधर्म करायचाय का?? बरं झालं आपण भेटलो...

मोना - मला संपूर्ण कथा ऐकायचीय...

रणजीत - वीस हजारात?? मग परत मला कशाला भेटशील?? अर्थात, माझा उपयोग आयुष्यभर होणार आहे म्हणा तुला...

हे वाक्य तर फारच होतं!

मोना - कसा काय??

रणजीत - ते कथा ऐकल्यावरच समजेल...

मोना - एकदाच आकडा सांग...

रणजीत - अजून दहा नोटा दे...

मोनाने नोटा अक्षरशः फेकल्या!

रणजीतने तीसच्या तीस नोटा तीन तीन वेळा मोजल्या अन जर्कीन आणि पँटच्या वेगवेगळ्या खिशांमध्ये ठेवल्या.

समोरच्या ग्लासमधला उरलेला पेग नरड्यात ओतून त्याने नवीन पारशी स्टाईलचा पेग भरला आणि तोही अर्धा ढोसल्यावर मग त्याची नजर अंधारलेल्या आकाशाकडे लागली. खूप खूप मागे गेल्यासारखा त्याचा आवाज झाला! आता त्या पिक्चरमध्ये त्याच्यादृष्टिने मोनाही नव्हती! केवळ तो... आणि त्याचा तो जमाना! रणजीत बोलू लागला!

"खूपच छान दिवस होते ते! अफलातून दिवस! सकाळी उठायचे... चूळ वगैरे भरून मस्तपैकी लोणी लावलेले पराठे आणि दोन ग्लास ताक प्यायचे.... आणि शाळेला जायचे... दुपारी शाळेतून आले की दोन तास अभ्यास... भरपूर जेवण... संध्याकाळी शेतावर खेळायला जायचे...भरपूर दोस्त... कणसे खायची.. फळे खायची...गाजरे खायची... मस्त तिन्हीसांजेला घरी आले की सानियाशी खेळायचे..त्यात भांडणे, रुसवे, चिडकेपणा, हासणे, जल्लोष आणि प्रेम... इतकेच असायचे त्या खेळात.. माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होती ती... बाबांची आवडती... मी आईचा आवडता... कारण पहिलाच मुलगा... तोही मोठा सगळ्यांमध्ये... रणजीत शामताप्रसाद श्रीवास्तव!

ती संध्याकाळ आठवते मला अजूनही.. मी असा नव्हतोच... खूप चांगला होतो मी.. हुषार.. नीट वागणारा.. अंहं.. काहीच राहिले नाही त्यातले.. हुषार अजूनही आहे.. पण ती हुषारी आता... भलत्याच गोष्टींसाठी वापरतो... तू नव्हतीसच तेव्हा म्हणा... तुला काय माहिती असणार आहे?? नाही का???

विहीरीत पडलो मी शेतातल्या.. जगतोय की मरतोय अशी अवस्था... वडील डॉक्टर असले तरी पी एच डी डॉक्टर... उपचारांसाठी शेवटी कानपूरला गेलो सगळे.. डोक्याला मार लागल्यामुळे परिणाम झाला माझ्या डोक्यावर... मेलो नाही मी.. पण.. माझ्यातला तो रणजीत मेला... गोरा पान... गुलाबी गालांचा... हट्टाकट्टा... हट्टाकट्टा अजूनही आहे म्हणा.. पण.. सगळ्यांचा लाडका रणजीत मेला...

... जो जगला तो एक राक्षस होता... तो राक्षस होता हे कुणाला इतरांनाच काय.. त्याला स्वतःलाही माहीत नव्हते... मी नुसता ओसरीवर बसायचो... सुरुवातीला मी आजारी आहे असे समजून मला शाळेत जाण्याचा आग्रह करायचे नाहीत... पण... मी नुसताच बसतो.. काही बोलत नाही आणि राक्षसासारखा आहार होता माझा हे पाहून.. मग... विचार सुरू झले घरात.... आपला मुलगा हातातून गेला की काय?? पुन्हा नवे उपचार... नवी औषधे... जिवंत राहिलेल्या माझ्यातल्या मेलेल्या जुन्या रणजीतला पुन्हा जिवंत करण्यासाठी सुचतील ते उपचार.. नवस... काय काय चाललेले होते... अर्थात... मला ते सर्व नंतर समजले..

आणि त्या दिवशी... शेजारी गोलीचाचा राहायला आले... सानिया आता खूप लहान नसली तरीही ते तिला गोळी खायला द्यायचे... तिने लाडाने त्यांचे नांव गोलीचाचा ठेवले होते.... खरे नाव... रोहन गुप्ता... तुझ्या वडिलांचे मोठे भाऊ... बरेलीतच असायचे...पण आता आमच्या शेजारी राहायला आलेले होते...

घरोबा वाढायला किती वेळ लागणार आहे?? दोन चार महिन्यातच एकमेकांच्या घरी एकमेकांकडे केलेले पदार्थ येऊ जाऊ लागले... सणासुदीला एकत्र जल्लोष सुरू झाला.. मी आपला ओसरीवरच बसायचो... राघव आणि सानिया फटाके उडवायचे ओसरीत.. ते पाहूनही मी नुसताच बसायचो... माधुरीचाची स्वभावाने तापट होती... मात्र माझ्यावर उपचार करायला म्हणून कसलेतरी औषध आणून द्यायची.. मग माझे वडील ते औषध तपासायचे... त्यांची घरातच लॅब होती... काय करायचे काय माहीत... पण पैसे मात्र बर्‍यापैकी मिळत राहायचे त्यांना...

.... आता अशी परिस्थिती आली होती की दोन घरे एकच झाली होती.. आमच्याकडे नातेवाईक आले तर त्यांना तुमच्या घरातले लोक आमच्याचकडे बसलेले दिसायचे... तुमच्याकडे नातेवाईक आले तर सानिया आणि माझी आई त्यांना तुमच्याचकडे दिसायची...

आता तर इतकी परिस्थिती आलेली होती की फक्त आडनाचे वेगळी... बाकी सगळे एक... मला शर्ट घेतला तर राघवलाही घ्यायचा...

... मी एकदा ऐकले... रोहन गुप्तांनी ... म्हणजे तुझ्या काकांनी आणि तुझ्या काकूंनी... माझ्या आई वडिलांशी चर्चा केली... माझ्यासमोरच... ते मात्र मला आठवते... मी त्यांच्यादृष्टीने वेडसर झालेलो होतो... ते सांगत होते... सानियाला आता लहान भाऊ यायला हवा... हळूहळू आमच्याकडेही त्यांचे म्हणणे पटले...

वर्षभरात सुबोधचा जन्म झाला... मुलगा हवा होता आणि मुलगाच झाला... सुबोध लहान असताना मलाही आवडायचा.. माझी शाळा बंद झाली होती.. पण काय झाले कुणास ठाऊक... सुबोध माझ्याकडे यायला लागला खेळायला.. त्याला खेळवताना मी... मी अचानक पुर्वीसारखा वागायला शिकलो... हळूहळू माणसात यायला लागलो... दोन वर्षे शाळा बंद होती... आता पुन्हा शाळेत जाऊन बसायला लागलो... गंमत म्हणजे... सानियाला एक वर्ष आधीच शाळेत घातल्यामुळे.. आता मी अन ती एकाच वर्गात होतो.... आणि... राघवही... तिघेही एकत्र शाळेत जायचो आणि यायचो... फक्त.. शाळेत मात्र सानिया मुलीमध्ये बसायची आणि शाळा होईपर्यंत आमच्याशी बोलायचीही नाही...

मी बारा वर्षांचा.. सानिया आणि राघव नऊ वर्षांचे आणि सुबोध दोन वर्षाचा!

सुबोध हे आता दोन्ही घरांचे खेळणेच झालेले होते... माधुरीचाची तर सुबोधला कित्येकवेळा तिकडेच झोपवायची रात्रीची... दिवस हळूहळू पुढे पुढे जात होते... पाच वर्षे पूर्ण झाली तेव्हा मी सतरा वर्षांचा असूनही केवळ दहावी झालेलो होतो... आता शेतात मला जायलाच हवे होते... पण बाबांच्या लॅबमध्ये हल्ली बरेच लोक येऊन जायला लागले होते... मिळकतही वाढलेली होती... काय चाललेले होते काय माहीत... पण.. शेताकडे दुर्लक्ष केले तरी चालण्यासारखी परिस्थिती आलेली होती....

....त्याचवेळेस इंजीनियरिंग पूर्ण करून मोहन चाचा भावाकडे राहायला आले.. कायमचे.. माधुरीचाचीला ही परिस्थिती अमान्य होती... तिला तिचे घर फक्त तिचे स्वतःचे असायला हवे होते... त्यामुळे ती मोहनचाचांना घालून पाडून बोलायला लागली.. पण चाचा सभ्य आणि स्वभावाने चांगले होते...

... त्यांची नोकरी करण्याची इच्छाच नव्हती... त्यांनी सुरुवातीला एक लेथ मशीन घेतले.. त्यासाठीचा पैसा रोहनचाचांनीच दिला..कडाक्याची भांडणे झालेली आठवतात मला.. माझ्याच आई वडिलांनी सोडवली ती... भांडणात मोहनचाचा नव्हतेच... माधुरीचाची आणि रोहनचाचांची भांडणे झालेली होती...

... पण काय झाले कळले नाही... काही महिन्यातच त्यांच्या घरी अचानक शांतता आणि समाधान नांदू लागले.. मोहनचाचांचे युनिट जोरात चालत होते बरेलीत... ते पैसे ते चाचीच्या हातात द्यायचे... हा फार मोठा आनंद होता चाचीचा... जो केवळ दोन वर्षे टिकला... जयाचाची आली घरी.... लग्न करून...

... जयाचाची आणि माधुरीचाची यांच्या वयात खूपच अंतर होते... माधुरीचाचीने तिचा छळ सुरू केला... कारण जयाचाचीने मोहनचाचांच्या मिळकतीला फुटणारी माधुरीचाचीकडची वाट बंद केलेली होती...

... सुबोधही शाळेत हुषार होता... मी, राघव आणि सानिया एकाच कॉलेजला कॉमर्स शिकत होतो.. तिघांमध्ये मीच हुषार होतो...

.... त्या दिवशी तो प्रसंग घडला.. शेतावरून मी लवकर परत आलो... आई तुमच्याकडे गेलेली होती... बाबा लॅबमध्ये होते... आणि सानियाच्या खोलीत... राघव आणि ती... मी अचानक किंचाळलो.. पण बाबांना ऐकूच गेले नाही.. राघव पळून गेला.. सानिया रडायला लागली...

... मला तो प्रकार सहन झाला नव्हता... माझ्यातला राक्षस जागा झालेला होता.. मला ती शुद्ध फसवणूक वाटत होती...

... तो प्रसंग घडल्याच्या केवळ चवथ्या दिवशी मी सानियाला खलास केले... अज्ञात इसमाच्या हल्यात युवती ठार... अशी बातमी आली होती... हल्लकल्लोळ माजला होता.. राघव घाबरून काहीच बोलत नव्हता.. कित्येक दिवस आमच्याकडे पोलीस येत होते... मी वेडसर असल्याचा समज पसरल्यामुळे माझी थोडीशीच चौकशी झाली.. बाबा बरेलीतील एक प्रतिष्ठित नागरीक असल्यामुळे ... शेवटी आईने पोलिसांना सांगीतले की मुलगी तर गेलेलीच आहे.. आता तुम्ही गुन्हेगार शोधा नाहीतर नका शोधू... आम्हाला त्रास देऊ नका.. सहा महिन्यांनी सर्व काही शांत झाले.. मला मी केलेले कृत्य लक्षात आले की मी रडून गोंधळ माजवायचो.. पण ते सगळ्यांना सानिया गेल्याचे दु:ख वाटायचे... मी त्या वेडाच्या भरातही कधी हे मात्र म्हणालो नाही की ते कृत्य मीच केले.... भीती वाटायची... तेवढा शहाणा नक्कीच होतो...

... आणि सानिया गेल्याच्या आठव्याच महिन्यात कॉलेजकडून घरी येण्याच्या एका सुनसान रस्त्यावर भर संध्याकाळी अंधुक प्रकाशात अचानक राघवला गाठले आणि काही कळायच्या आत पेट्रोल उपडे केले.. त्याला शिव्या देत देत आणि मारत मारत त्याच्या अंगावर पेटती काडी टाकली... हा प्रकार बहुधा कुणीतरी प्रत्यक्ष लांबून पाहिला... बरेलीत गाजलेला खटला होता तो... पण लांबून पाहणार्‍याला तो मीच होतो हे खात्रीलायकरित्या सांगता येत नाही असे सिद्ध झाले... मात्र माझी घरातली प्रतिमा खलास झालेली होती... बाबांनी मला काठीने मारून हाकलुन दिले... रोहन चाचांनी तर साखळीने मारले.. हे सगळे मी पुराव्याअभावी निर्दोष सुटल्यानंतर... तोवर मी कस्टडीतच होतो... आई आक्रोश करत होती.. सुबोध रडत होता.. माधुरीचाची अन तुझे आई वडील सर्व आक्रोश करत होते...

.. एक खुनी... संशयित खुनी... असा शिक्का कपाळावर घेऊन मी कानपूरला पळून गेलो... तिथून बिहार आणि तिथून कलकत्ता!

पाच वर्षात मी कसा जगलो, काय काय करून जगलो हे आत्ता महत्वाचे नाही...

... पण... पेपरमध्ये बातमी वाचली... शामताप्रसाद श्रीवास्तव यांचा पेपर एका मोठ्या संघटनेने नावाजला आहे मात्र भारतात त्याची दखल घेतली गेलेली नाही... त्यात लिहीले होते.. त्यांचे सध्याचे वास्तव्य सिमल्यात होते...

काय वाटले कुणास ठाऊक.. तडक सिमला गाठला आणि एका ठिकाणी राहिलो...

.... हॉटेल माधुरी..

... त्या हॉटेलचे अवशेष अजूनही आहेत तिथे... हळूहळू कथा समजली...

.... मी, राघव आणि सानिया गेल्यानंतर दोन्ही घरातले सुखच निघून गेले. सुबोध असला तरी एकटाच होता आणि तो श्रीवास्तव होता... गुप्ता नव्हता.. श्रीवास्तवांच्या मोठ्या मुलाने , म्हणजे मी, गुप्तांना निर्वंश बनवलेले होते...

.... दोन्ही घरांचे संबंध अजूनही होते... पण आता त्यांना एक विषारी झालर होती... केवळ माझे आई वडील चांगले आणि निर्दोष म्हणून रोहनचाचा आमच्याशी संबंध ठेवून होते... मात्र माधुरीचाचीने ते पूर्णपणे तोडले होते... ती कडाकडा शिव्या द्यायची आमच्याकडचे कुणी दिसले की... मोहनचाचा आणि जयाचाची सूज्ञ होते... ते आपल्या मोठ्या वहिनीला समजावयाचे.. पण ती ऐकायचीच नाही...

शेवटी कोणत्यातरी महत्वाच्या कामासाठी बाबांना शिमल्याला शिफ्ट व्हायची वेळ आली म्हणे... त्या वेळेस जुना इतिहास आठवून रोहनचाचा आणि बाबा एकमेकांच्या गळ्यात गळे घालून खूप वेळ रडले... मात्र चाची अजिबात आली नाही भेटायला...

त्यावेळेस बाबांनी तिच्या खोल्बाहेर उभे राहून तिला आश्वासन दिले... की यापुढे त्यांचे कुटुंब ते स्वतः चालवतील आणि त्यांची तहहयात काळजी घेतील.. सुबोध हा मुलगा ते त्यांना देतील...

बहुधा सुबोधला हा प्रकार अजिबात झेपला नसावा... पण खूप समजावून सांगीतल्यानंतर तो तयार झाला.. माझ्या आईच्याही काळजाचे लक्ष तुकडे झाले... माझे आई वडील संपूर्ण निर्वंश अवस्थेत सिमल्या शिफ्ट झाले... सुबोध लहानपणापासून माधुरीचाचीकडेच वाढलेला असल्यामुळे.. तिला त्याच्याबद्दल प्रेम होते ते खरेखुरे प्रेम होते... तिने त्याला मुलगा म्हणून स्वीकारले.. हे होऊ शकते की नाही याचा प्रश्नच नाही.. हे झाले..

आणि दोन महिन्यांनी बाबांनी रोहनचाचांना पत्र पाठवले... येथे मी माझ्या पैशांनी एक हॉटेल बांधत आहे व ते मी तुमच्या नावावर करणार आहे.... तुम्ही सगळे इकडेच राहायला या म्हणजे सुबोधचा सहवास आम्हालाही मिळेल...

हेही झाले... अक्षरशः संपूर्ण गुप्ता फॅमिली सिमल्याला शिफ्ट झाली... येताना मोहन गुप्ता काही महिने बरेलीतच राहणार हे ठरले.. इथले युनिट चालवायला एक विश्वासातील माणूस ठेवून सिमल्याला काहीतरी टुरिझमसंदर्भात आणखीन एखादा व्यवसाय काढायला असे ठरले त्यांचे...

काळ हे सर्व जखमांवरचे सर्वात प्रभावशाली औषध आहे याचे प्रत्यंतर आले.. नुसता आनंदीआनंद! आता सुबोध दोघांचाही मुलगा होता.. हॉटेल रोहनचाचा चालवू लागले.. एक पैसाही भांडवल न गुंतवता नुसताच प्रॉफिट मिळत आहे हे पाहून आणि सुबोध आपला मुलगा म्हणून नांदतो आहे हे पाहून माधुरीचाचीही पुर्वीचे कटू दिवस विसरली आणि दोन्ही कुटुंबे पुन्हा एक झाली... मात्र...

... मोहनचाचांना इथल्या माणसने फसवले आणि तेही सिमल्याला आता हॉटेलच पाहू लागले.. यामुळे मिळकतीत अर्धे वाटे झाले...

.... आणि आता श्रीवास्तव आणि गुप्ता ही भांडणे संपलेली असली तरी गुप्ता व्हर्सेस गुप्ता हे वाद पराकोटीला पोचायला लागले...

मोहनचाचांच्या युनिटमधून कानपूरला ज्या कंपनीला जॉब्ज सप्लाय व्हायचे तिचे एक यूनिट पुण्याला निघणार हे कळले...

मोहनचाचांच्या पुण्याला अव्याहत ट्रीप्स सुरू झाल्या.. इतक्या लांब नको जायला असे जयाचाची म्हणत होती... पण ऐकले नाही.. हळूहळू पुण्यातही युनिट निघाले...

आश्चर्य म्हणजे... पुण्यातील युनिटने प्रचंड प्रॉफिट द्यायला सुरुवात केली.. लगेच मोहनचाचांनी त्यातील काही भाग माधुरीचाचीला द्यायला सुरुवात केली...

इतकेच नाही तर मोहनचाचांना दोन मित्रही मिळाले... ते दोघे त्याच युनिटमध्ये कामाला होते... ते युनिट वेगात वाढू लागले..

... याच कालावधीत मी सिमल्याला येऊन थडकलो होतो.. त्यामुळे पुढचे सगळेच मला साद्यंत समजू लागले..

या कालावधीत आमच्या घरी मात्र गहजब उडाला... बाबांनी लॅबमध्ये काहीतरी चमत्कार करून दाखवला होता जो शासनाने फेटाळला... एका पेपरात आमचे बाबा व्हीलन म्हणून तर एका पेपरात हिरो म्हणून सादर केले गेले...

... बझट... त्यांनी बझट नावाची एक टॅब्लेट शोधलेली होती...

... ही प्राणघातक गोळी शत्रूसाठी आहे असे ते म्हणायचे... पण कोण कुणाचा शत्रू याबाबतच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात... त्यांना भारत चीन अभिप्रेय होते... माधुरीचाचीला काही वेगळेच!

... सुबोध आमच्याच घराचा वंशज असल्यामुळे साहजिकच आईचे त्याच्या प्रती असलेले प्रेम दिवसेंदिवस अधिक उत्कटतेने व्यक्त होऊ लागले... याचा माधुरीचाचीला प्रॉब्लेम होऊ लागला... पुन्हा वाद होऊ लागले.. भांडणे होऊ लागली.. कधीतरी एकदा आईने तडकून सुनावले.. काही झाले तरी माझ्या पोटचा गोळा आहे.. तुमचा एक मुलगा गेला तर आमची एक मुलगी आणि एक मुलगा त्या बदल्यात गेलेले आहेत आणि यांच्या पैशातून हॉटेल बांधून ते चालवून तुम्ही जगता आहात...

झाले... हा अपमान इव्हन रोहनचाचांनाही सहन झाला नाही... मोठी भांडणे झाली.. अजूनही मी सिमल्यात आहे हे त्यांना माहीत नव्हते...

... माधुरीचाचीला भीती वाटू लागली... सुबोधने जर आपल्याला पुढे सांभाळलेच नाही तर?? ती सुबोधला काय काय शिकवायला लागली तर तो तिलाच सुनवायला लागला... कारण लहानपणीच्या आठवणी त्याला व्यवस्थित होत्या... आपली खरी आई कोण आहे हे न माहीत असायला तो अजिबातच त्यावेळेस तितका लहान नव्हता...

आता चाचीने रोहनचाचांचे कान भरले.. चौघे एकत्र बसले.. त्यात मोहनचाचांनी रोहनचाचांना शब्द दिला... तुझ्या मुलाला मी माझ्या युनिटमध्ये घेईन.. काळजी करू नकोस... जयाचाचीही हो म्हणाली.. आमच्या आई बाबांना बरे वाटले.. सुबोधला मोहनने कामावर घेतले की आपसूकच तो आपल्याकदे बघेल असे वाटले...

.... आणि त्यातच ते झाले... जयाचाची प्रेग्नंट!

तिला मुलगा झाला तर मोहनचाचा शब्द बदलू शकतील याबाबत खात्री झाली माधुरीचाची आणि रोहनचाचांची!

त्यांची खलबते चाललेली असावीत.... पण तुझा जन्म झाला.. सर्वत्र आनंदीआनंद झाला..

हे सुख साजरे करायला म्हणून मोहनचाचा, रोहनचाचा आमच्या घरी जमलेले होते...

... कुणालाही काहीही समजले नाही... पण माधुरीचाची आमच्याच घरात बसून सगळ्यांना असा काही आग्रह करत होती जणू काही आम्हीच तिच्या घरी आहोत...

बहुधा ती, रोहनचाचा आणि सुबोध काहीही खात नसावेत... नेमके मोहनचाचा काहीतरी कारणाने स्वतःच्या घरी गेले आणि आले तर...

... आक्रोश चाललेला होता... माझे आई, वडील, घरातला एक म्हातारा नोकर आणि जयाचाची..

अन्नातून विषबाधा होऊन मरण पावलेले होते... अख्खी वस्ती जमलेली होती...

.. वस्तीतल्या एका उस्ताद नावाच्या माणसाचे वडील घरकामाला होते.. तो माणूसही गेलेला असल्याने वस्तीच्या भावना तीव्र होत्या..

पोलीस केस झाली... प्रचंड गदारोळ चाललेला होता.. मी अदृष्य होतो तेच बरे झाले असे वाटू लागले.. कारण नाहीतर मीही अडकू शकलो असतो.. पण धुळ बसली.. वर्षभरातच सर्व काही मागे पडले..

मोहनचाचा तुला घेऊन पुण्याला गेले... पाठोपाठ सुबोध मुंबईला शिकायला निघून गेला..

... हॉटेल अजूनही चाललेलेच होते.. आमच्या घरावर मात्र शासनाचे कुलूप होते... आता वेळ आली होती मी मला प्रकट करण्याची...

मी प्रचंड सावधानतेने... वकील वगैरे ठेवून... सिद्ध केले की मी या घराचा वारसदार आहे...

.... माझ्यावरच्या पुर्वीच्या केसेस तपासून... सगळे काही तपासून.. शेवटी ते मान्य करण्यात आले...

आणि माझा त्या घरात प्रवेश झाला... मी संपूर्ण घर तपासले.... जे जे काही मौल्यवान होते ते कब्जात घेतले.. आणि मग घर विकून टाकले.. तिथून मनालीला येऊन राहिलो...

... मात्र.. येण्याआधी... वस्तीतल्य एका म्हातारीकडून.. म्हणजे उस्तादच्या आईकडून.. मला सर्व हकीगत व्यवस्थित समजली... मी ती सर्व मोहन गुप्तांना फोन करून कळवली... बहुधा त्यांनी ते पत्राने रोहनचाचांना कळवले असावे... कारण एकदा माधुरीचाची आणि त्या म्हातारीची जबरदस्त भांडणे झालेली त्या वस्तीने पाहिली... त्या भांडणांमध्ये पत्राचा उल्लेख होत होता...

.... मी सिमला कायमचे सोडले.. इकडे येऊन राहिलो.. माझे तसे मजेत चाललेले आहे...

... वाईट याचे वाटते की तुझ्या चाचा-चाचींना मी मारू शकलो नाही... ते त्यांची वेळ आल्यावर नैसर्गीक मृत्यू येऊन मेले दोघेही...

अशी कहाणी आहे... "

दगड जसा निर्जीव असतो तशी निर्जीव होऊन मोनालिसा समोरच्या त्या राक्षसाकडे पाहात होती...

.. त्याने आत्तापर्यंत स्वतःची क्वार्टर संपवून टीचर्सचेही दोन पेग्ज संपवलेले होते...

मोनाला काय बोलावे तेच कळत नव्हते...

तरी बोलायला हवेच होते... तिने अंदाजाने खडा मारला...

मोना - .. पण मग.....

रणजीतने लालभडक डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले...

मोना - पण.... मग.. माझे वडील... ???? ते.. ते कशाने गेले???

रणजीत - अरे हो.. ते सांगायचेच राहिले... मला मिळालेल्या माहितीनुसार... त्यांच्या त्या दोन जुन्या मित्रांनी... तेच केले जे तुझ्या काकूने तुझ्या आईला केले....

मोनाला अपेक्षित ते उत्तर मिळाले असले तरीही ते या माणसाला कसे माहीत हे तिला समजत नव्हते...

मोना - तुम्हाला... तुम्हाला कसे माहीत??

रणजीत - बाळ मोनालिसा... सुबोधला जरी बझटबद्दल थोडेसे माहीत असले तरीही जतीन..?? जतीनला काहीच माहीत नव्हते... आणि जतीन हा तुझा मामेभाऊ आहे हे मला माहीत होते... कारण जयाचाचीकडे तिचा सख्खा भाऊ जेव्हा यायचा तेव्हा तोही त्याच्याबरोबर यायचा... आमची ओळख होती... मागे तो मुंबईत मला अचानक भेटला तेव्हा जुन्या गप्पा झाल्या.. त्यात समजले... मोहनचाचांचा मृत्यू तसाच झाला होता... 'तसाच' म्हणजे कसा हे जतीनला समजले नसले तरीही.... रणजीत श्रीवास्तवला समजणार नाही का??????

हादरलेली मोना डोळे विस्फारून रणजीतकडे बघत होती. रणजीत तिच्याकडे रोखून बघत होता...

रणजीत - निघू का मी????

कहाणी संपलेली आहे हेच मोनाला समजायला काही क्षण लागले.

तिच्याकडे दुर्लक्ष करून रणजीत सरळ उठला आणि जायला निघला तेव्हा...

... अचानक मोनाने हाक मारली....

"भैय्या...."

तटकन थांबला रणजीत... काही क्षण तसाच थांबून त्या थंडीतही मागे वळून पाहात बसला...

रणजीत - .. बोल?????

मोना - फक्त... एकच समजले नाही...

रणजीत - ......... काय????

मोना - तुम्ही असे का म्हणालात??? की... मला तुमची यापुढेही गरज लागेल????

हासला रणजीत!

तिला तुच्छ लेखणारे हासला आणि थांबून म्हणाला...

रणजीत - नीट ऐकत नाहीस तू..... आमच्या घरात लपवलेल्या... सर्व बझटच्या गोळ्या... माझ्याकडेच आहेत ना????????

गुलमोहर: 

.

.

ओह... सॉलेट फोर्स आहे....
म्हणजे तीपण त्याच गोळीचा वापर करणार तर....
मला वाटत मोनाने तस विश्वासघाताने तरी त्यांना मारू नये, चांगला धडा शिकवूनच मग....

असो, पु.ले.शु.

ओ बापरे!!! ही फास्ट चाललेली कथा कधी संपूच नये असं वाटत राहातं आणी एकदम क्रमशः वर येऊन अडखळून गाडी उभी राहते

ओ बापरे!!! ही फास्ट चाललेली कथा कधी संपूच नये असं वाटत राहातं आणी एकदम क्रमशः वर येऊन अडखळून गाडी उभी राहते >> हो ना Sad

भन्नाट...... छान जमली आहे ही कथा ह्या वेळी.... शेवट सुद्धा असाच भन्नाट करा ह्या वेळी Happy

मला वाटत मोनाने तस विश्वासघाताने तरी त्यांना मारू नये, चांगला धडा शिकवूनच मग.... >>>>

१००% अनुमोदन Happy

अफलातून चाललीये कथा. हा भाग वाचुन झाल्यावर "ये हुई ना बात!! " असे वाट्ले , पण तरीही मोनाने धोक्याने न मारता बुद्धिने सुड उगवावा असे वाट्ते, तुम्ही कथेला योग्य तोच न्याय द्याल याची खात्री आहे.
पुलेशु.

सही! सही! सही!
पण मोनाने त्यांना असे मारु नये, बुद्धीने सुड उगवावा असे वाटते.
गुन्हा कबुल करायला लावले तर उत्तमच.
अर्थात गुन्हेगार कोण हे अजुनही कयासच आहेत. डुसराच कोणी असेल तर अजुन सही!

मस्त बेफिकीर..
आपण सध्याच्या मनः स्थीती मधे सुध्दा लिखान काम करत आहे.. हे कौतुकास्पद आहे..

पु.ले.शु.

वाट बघतोय पुढील भागाची.

श्रीनिवास, एक बापनंतर मनापासून आवडलेली तुमची दुसरी कादंबरी. मस्त लिहीताय बेफिकीर, keep it up. पुलेशु. Happy

बेफिकीरजी सगळ्यांना अनुमोदन आहेच...
फक्तं एक सजेशन देउ का?

"म्हणे" चा वापर टाळा...

means....तुम्ही लिहिलत ना...
"शेवटी कोणत्यातरी महत्वाच्या कामासाठी बाबांना शिमल्याला शिफ्ट व्हायची वेळ आली म्हणे..."

अश्या वाक्यांमध्ये...

उगाचच वाटलं मला...because ranjit is "beraki" character..त्याच्या तोंडी काही काही
शब्दं यायलाच नकोत..

पण्...छान लिहिताय..नि:संशय...

-परीक्षित

बेफिकीरजी धन्यवाद!
खुप छान का॑दबरी आहे. मला एक प्रश्न आहे की रेजिना तिला फसवत नाही ना? जर तो ही त्या॑च्यासारखा निघाला तर ती कोसळुन पडेल.

हल्ली काम वाढल्याने ही कादंबरी वाचत नाहीये, पण सगळे भाग एकत्र करून घरी वाचेन एकदा....

मला एक प्रश्न आहे की रेजिना तिला फसवत नाही ना?>>> बरेच दिवस लिहीन म्हणत होतो. पण मला ही तसच वाटु लागलं आहे. मोनाच्या सिमला ट्रीप्ची बातमी तर लिक झालीच होती. त्यामुळे तो एक ह्याच गँगचा मोठा ट्रॅप असायची शक्यता नाकारता येत नाही. पण एनीवे मोना सगळ्यांना पुरुन उरेल्च ... Happy

नहीतो मोनाका असली प्यार उसे अच्छा आदमी बना देगा... Happy

Pages