दही भेंडी

Submitted by मनःस्विनी on 12 November, 2010 - 02:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो कवळी लहान भेंडी,
२ मध्यम आकाराचे चमचे बेसन,
२-३ लाल सुक्या मिरच्या,
१-२ हिरवी मिरची
२-४ मेथी दाणे,
२-३ मिरी दाणे,
हिंग,
अर्धा वाटी घट्ट दही,
१-२ काड्या लसणाच्या व जरासे आले अगदी बारीक ठेचून,पेस्ट करु नका.

१/२ चमचा धणा पूड,
१/२ चमचा जीरा पूड,
पाव चमचा गरम मसाला
१ चमचा शुद्ध तूप/३ लहान चमचे तेल फोडणीला,
कोथींबीर,

क्रमवार पाककृती: 

१) आधी कोरडे बेसन मंद गॅस वर चांगले परतायचे. त्यात हिंग घालून मग त्यात शुद्ध तूप मिक्स करून ठेवायचे. सगळ्यात शेवटी हळद, ठेचलेले आलं व लसूण व दही मिक्स करायचे.
२) दही बेसनातच ताजी धणा पूड, जीरा पूड, गरम मसाला मिक्स करून ठेवायचा. पाव कपच गरम पाणी घालून गुठळी न होता मिक्स करून गॅस बंद करून बाजूला ठेवायचे.
३) भेंडी धूवून कोरडी करून लांब उभी दोनच काप करायचे.
४) १ चमचा तेल टाकून तापले की आधी अक्खे जीरे टाकले की भेंडी १० एक मिनीटे हलगद परतून घ्यायची. मग ती काढून, उरलेले तेल टोपात घालून आधी मेथी दाणे, सुक्या मिरच्या, हिरवी मिरची, मिरी दाणे, हिंग अशी फोडणी करायची आता भेंडी घालून पुन्हा परतून कुरकुरीत झाली की त्यातच दही+ बेसन घालायचे. ज्यास्त शिजवत बसायचे नाही, भेंडी नरम पडते. बेसन आधीच भाजले असल्याने शिजवत बसायची गरज नाही. वरून बारीक चिरलेली कोथींबीर.
गरम गरम भात, फुलके बरोबर मस्त लागते.

अधिक टिपा: 

१)दही ज्यास्त आंबट असु नये पण गोडही असु नये.
२)बेसन कच्चे ठेवु नये पण करपु नये असे भाजा.
३) पाणी तेवढेच टाका जितके करी सरसरीत ठेवायची आहे.
४) भेंडीत दही टाकल्यावर पाणी नका टाकू. भेंडी बुळबुळीत नरम लागेल.
५) कांदा आवडीनुसार घालायचा असेल तर बारीक चिरून भेंडी पुन्हा फोडणीत टाकायच्या आधी टाकून मग भेंडी टाका.

माहितीचा स्रोत: 
आईची सिंधी मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार. आमच्याकडे ब्राम्हणी पद्धतीचे दह्यातले भरीत करतात. भेंड्या आणि उभा चिरलेला कांदा तळून, घट्ट दह्यात घालायचा. (परत शिजवायचे नाही.)

मनस्विनी मस्तच आहेत तुझी दहीभेंडी.
आमच्या घरात दहीभेंडी म्हणजे आवडीचा पदार्थ. मी खालील प्रमाणे करते.
कोवळी भेंडी लांबट कापुन थोडी परतुन घ्यायची. मग ती दुसर्‍या भांड्यात काढून भांड्यात तेलावर जिरे व ओल्यामिरचीची फोडणी द्यायची. मग त्यात थोडे किसलेले आले घालायचे. त्यावर ती परतलेली भेंडी घालायची व वरुन दही घालुन त्यावर मिठ आणि थोडीशी साखर घालुन ढवळुन गॅस बंद करायचा.

करुन पाहिले.... चुकुन हळद घालायची राहून गेली.... Sad पण तरीही छान चव आली होती.. पाककृती आवडली....

छान रेसिपी. आता तुझ्या पद्धतीने करुन पाहीन एकदा. Happy
आमच्याकडे करताना एकदम सोप्प्या प्रकारे करतो.
चार पाच लसुण पाकळ्या ठेचुन, हिरव्या मिरच्या, थोडं आलं ठेचुन घेते.
मग तेलात मोहोरी टाकुन तडतडल्यावर मिरच्या , लसुण आणि आलं टाकते.
ते परतुन उभ्या चिरलेल्या भेंड्या टाकते. आणि भेंड्या शिजेपर्यंत परतुन घेते.
गॅस बंद करुन थंड होउ देते आणि मग त्यात मीठ घालुन घुसळलेलं दही घालते की झालं.

.

ही आमच्या कडची पद्धत. थोडी वेळकाढू आहे पण लागते छान. भेंड्या उभ्या चिरून बिया काढून टाकायच्या. उभेच सळी सारखे तुकडे करायचे आणी तेलावर मंद आचेवर परतत कुरकुरीत करून घ्यायचे. मग दह्यात मीठ, तिखट आणी चाट मसाला घालायचा. अगदी आयत्या वेळी भेंडी मिक्स करायची आणी भरपूर कोथिंबीर. छान चटपटीत लागते. मला वाटतं जुन्या माबो मधे पण दहीभेंडीची चर्चा झाली होती. दिनेशदांची पण एक छान रेसिपी होती. बघते मिळाली तर ईथे पोस्ट करते.