सोयीस्कर असत्ये
लोकसत्तेमध्ये काही महिन्यांपूर्वी मुग्धा कर्णिक यांचा “गैरसोयीची असत्ये” हा लेख प्रकाशित झाला. त्यामध्ये त्यांनी जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदल हे नैसर्गिकच असून त्याला कार्बन डाय ऑक्साईड व इतर हरितगृह वायू जबाबदार नाहीत अशा प्रकारचा दावा केला आहे. त्याकरिता त्यांनी काही शास्त्रज्ञांचे दाखलेसुद्धा दिले आहेत. तथापि, त्यांच्या लेखातील अनेक मुद्दे हे सोयीस्कररित्या अपुऱ्या व अवैज्ञानिक माहितीवर आधारित आणि हास्यास्पद आहेत. कर्णिक यांचा मूळ लेख इथे वाचता येईल. लोकसत्तेमधेच त्याला उत्तर म्हणून माझाही लेख प्रसिद्ध झाला; काही गोष्टी गाळून तो इथे देत आहे.
कर्णिक म्हणतात की, वातावरणातील हरितगृह वायूंमध्ये पाण्याच्या वाफेचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण अत्यल्प आहे; म्हणून, पाण्याची वाफ वा इतर वायूच तापमानवाढीत अधिक भूमिका बजावतात. परंतु, तापमानवाढीच्या “भंपक” अशा मॉडेल्समध्ये यांचा विचारच केलेला नसतो! त्या असाही दावा करतात की, कार्बन डाय ऑक्साइडमुळे जर तापमानवृद्धी होत असेल तर ती वरच्या ट्रोपोस्फिअरमध्ये तीव्रतेने जाणवायला हवी; परंतु तीन दशकांमध्ये त्यात बदल झालेला नाही.
हे सर्व दावे पूर्णतः (किंवा सोयीस्कर) चुकीच्या माहितीवर आधारीत आहेत. तापमानवृद्धीच्या सर्व मॉडेल्समध्ये पाण्याच्या वाफेसकट सर्व वायूंचा विचार केलेला असतो. खरं म्हणजे, वातावरणाच्या सर्वात जुन्या (१८९६ पासून!) मॉडेल पासून पाण्याच्या वाफेचा आणि त्यानंतरच्या मॉडेल्स मध्ये इतर वायूंचा प्रभाव देखील लक्षात घेतला आहे. खरं म्हणजे, पाण्याच्या वाफेमुळेच कार्बन डाय ऑक्साईडच्या परिणामांची तीव्रता दुपटीने वाढते असे खुद्द आयपीसीसीच्याच अहवालात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे, वातावरणाच्या वरच्या पट्ट्यातील (अपर ट्रोपोस्फीअरमधील) वाफेच्या प्रमाणाची (म्हणजेच हवेच्या सापेक्ष आर्द्रतेची) सरासरी गेल्या अनेक वर्षात कमी अधिक प्रमाणात समान राहिली आहे पण मानवनिर्मित उत्सर्जनामुळे कार्बन डाय ऑक्साईड व इतर वायूंची पातळी सतत वाढते आहे. कार्बन डाय ऑक्साईड चे वातावरणातील प्रमाण केवळ ०.०४% आहे हे जरी खरे असले, तरी कमी प्रमाणामुळे त्याचा वातावरण बदलाशी कमी संबंध आहे असे म्हणणे पूर्णपणे अशास्त्रीय आहे. उदा. एखाद्या निरोगी शरीरामधील क्लोरेस्टरॉलचे प्रमाण एकूण रक्ताच्या ०.२०% पेक्षाही कमी असते. ते वाढून ०.२५% जरी झाले तरी हृदयविकाराची शक्यता बळावते. तसेच कार्बन डाय ऑक्साईड चे देखील आहे. पाण्याची वाफ ज्या वेव्लेन्थ चे इन्फ्रारेड रेडीएशन शोषू शकत नाही ते देखील हा वायू शोषू शकतो आणि म्हणूनच तो हरितगृह परिणामासाठी महत्वाचा आहे.
२००८ साली येल विद्यापीठाचे रॉबर्ट अॅलन आणि स्टीवन शेरवूड यांनी एक संशोधन प्रसिद्ध केलं. त्यामध्ये त्यांनी वरच्या ट्रोपोस्फिअर मधील वाऱ्याच्या दिशा आणि वेग यांच्यावरून तेथील तापमानवाढीचा अंदाज बांधला तर ती जवळजवळ पृथ्वीच्या पृष्ठभागाएवढीच आढळून आली. याच्यामुळे हरितगृह वायूंमुळे (मुख्यतः कार्बन डाय ऑक्साईड) होणाऱ्या वातावरणबदलाच्या सिद्धांताला पुष्टी मिळाली आहे.
एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की, तापमान वाढीचा संबंध कार्बन डाय ऑक्साइडच्या (वा इतर हरितगृह वायूंच्या) उत्सार्जनाशी नसून त्यांच्या वातावरणातील साठ्याशी असतो. पृथ्वीहून होणाऱ्या एकूण कार्बन उत्सर्जनापैकी जवळजवळ ९५% उत्सर्जन हे नैसर्गिक असते आणि केवळ ५% मानवनिर्मित असते. परंतु, कार्बनचा वातावरणात नैसर्गिकरित्या जाणारा प्रत्येक कण हा प्रामुख्याने वनस्पतीद्वारे आणि समुद्राद्वारे शोषूनही घेतला जात असतो. म्हणूनच वातावरणामधल्या नैसर्गिक कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण समतोल राहते. यालाच कार्बन सायकल असे म्हणतात. औद्योगिक क्रांतीपर्यंत गेली दहा हजार वर्ष पृथ्वीचा कार्बन समतोल बऱ्याच प्रमाणात शाबूत होता. त्यामुळे, ‘ज्या काळात मिथेन, कार्बन डाय ऑक्साइड इत्यादी हरितगृह वायू वातावरणात अधिक जात होते, त्या कालखंडांतील जागतिक तापमान कमी होते’ या कर्णिकांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही. जेव्हा हे वायू वातावरणात अधिक प्रमाणात जात होते त्यावेळी ते तितक्याच प्रमाणात शोषूनही घेतले जात होते. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर मात्र मानवनिर्मित उत्सार्जानाद्वारे हा समतोल बिघडत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या शोषून घेण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्बन डाय ऑक्साईड व इतर वायू वातावरणामध्ये साठून राहतात आणि हरीतगृह परिणामास व पर्यायाने तापमानवाढीस कारणीभूत ठरतात. प्रामुख्याने विकसित देशांच्या उत्सर्जनामुळे गेल्या १७० वर्षात वातावरणात साठलेला कार्बन डाय ऑक्साईड ३५% ने वाढला आहे.
कार्बन डाय ऑक्साईड हा वनस्पतींच्या वाढीकरीता उपकारक वायू आहे. असे जरी असले तरी, वनस्पतींची वाढ ही केवळ कार्बन डाय ऑक्साईड च्या प्रमाणावर अवलंबून नसते तर ती तापमान, मातीचे आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे गुणधर्म, मातीमधील पाण्याचे प्रमाण (पर्जन्य अथवा सिंचन) या घटकांवर देखील अवलंबून असते. तापमानवृद्धी आणि पर्जन्यमानातील लहरीपणा (जो आपण कमी-अधिक प्रमाणात आजही अनुभवू लागलो आहोत) या घटकांचा विचार केला तर वातावरणबदलामुळे शेतीचे उत्पादन घटणारच आहे.
कर्णिक पुढे म्हणतात की आयपीसीसी मधील शास्त्रज्ञांनी सनस्पॉट आणि सौरचक्रामुळे होणाऱ्या वातावरणबदलांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. त्या असेही म्हणतात की, १९४० ते १९८० च्या दरम्यान हरित वायू उत्सर्जन वाढून देखील पृथ्वीचे तापमान कमीच राहिले होते. परंतु १९८० नंतर काय झाले हे सांगणे मात्र त्यांनी सोयीस्करपणे टाळले आहे. गेल्या ३०-३५ वर्षात (साधारण १९७५ पासून) सनस्पॉटस् मध्ये विशेष काहीही बदल झालेला नाही पण पृथ्वीचे तापमान मात्र सतत वाढते आहे. किंबहुना गेल्या दहा वर्षांमध्ये तापमानाचे अनेक उच्चांक नोंदविले गेलेले आहेत. गेल्या १२० वर्षांतील सौरचक्रांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की अकरा वर्षांच्या पूर्ण सौराचक्राच्या कालावधीत सूर्याच्या रेडिएशन मध्ये ०.१% पेक्षा जास्त फरक पडलेला नाही. म्हणजेच तापमानबदल जर सूर्यामुळे होत असतील, तर तापमानवाढ ही ०.१ सें पेक्षा जास्त असणार नाही. परंतु, गेल्या ३० वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान ०.५ सें ने वाढले आहे! तीच गत कर्णिक यांच्या ओझोन संदर्भातील दाव्याबाद्दल. त्या म्हणतात की ओझोन थर कमी होणे हे नैसर्गिकच आहे! ते जर खरच नैसर्गिक असते तर १९५६ पासून वातावरणावर लक्ष ठेवणाऱ्या एकाही शास्त्रज्ञाला आणि उपग्रहाला हे भोक १९७६ पर्यंत सापडले कसे नाही ? १९८७ साली सर्व विकसित देशांनी मॉंट्रीअल प्रोटोकॉल मान्य केला आणि ओझोन थराला घातक ठरणाऱ्या क्लोरोफ्लूरोकार्बनचा वापर १९९६ पर्यंत पूर्णपणे थांबविला; त्यामुळे ओझोन थराचा ऱ्हास कमी झाला व त्याला पडलेले भोक बुजायला मदत झाली.
पृथ्वीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत तापमानवाढ आणि वातावरणबदल यापूर्वीही घडून गेले आहे. उदा. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी युरोपमधील तापमान वाढले होते तर २००-३०० वर्षांपूर्वी ते कमी झाले होते. अशी प्रत्येक घटना कशामुळे घडली याचे स्पष्टीकरणही शास्त्रज्ञांनी दिलेले आहे. परंतु, त्या कुठल्याच स्पष्टीकरणाने सध्याच्या तापमानवाढीची उकल होऊ शकलेली नाही – ती होते फक्त हरितगृह परिणामाच्या सिद्धांतामुळे.
पर्यावरणवाद्यांना ‘मागे घेऊन जाणारे’ अशी उपमा देणाऱ्या कर्णिक यांना पर्यावरणवाद्यांच्या लेखनाचे नीट आकलन झालेले दिसत नाही. IPCC पासून सर्व अहवालांमध्ये शाश्वत उपायांमुळे जगाचे एकूण आर्थिक उत्पन्न वाढणारच कसे आहे अशा तंत्रज्ञानाचा पाढाच वाचण्यात आलेला आहे. पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास करणाऱ्या आणि नैसर्गिक संसाधनांना ओरबाडणाऱ्या सध्याच्या विकासाच्या प्रतिमानाबद्दल (development model) एकही शब्द न लिहिता, इतर ग्रहांवर जाऊन मानवी वस्ती करण्याची कर्णिक यांची दर्पोक्ती हास्यास्पद आहे ! अर्थात, प्रयत्नपूर्वक आपला विकास शाश्वत कसा होईल हे न बघता, मानवनिर्मित तापमानवाढीचं शास्त्रच कसं भंपक आहे असे म्हटले की त्यासंबधी काही करण्याची जबाबदारीदेखील संपते आणि म्हणूनच ते सोयीस्कर देखील असते. शास्त्राच्या प्रगतीच्या आड असे अडथळे अनेकदा आले आहेत – पण त्या सर्वांवर मात करून मानवाने सत्याचा शोध घेतला आहे. वातावरणबदल व तापमानवाढीच्या सत्याबद्दल आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल देखील असेच होणार यात काहीच शंका नाही.
-- निकीत अभ्यंकर
छान , माहीती पुर्ण लेख.
छान , माहीती पुर्ण लेख.
निकीत, पु.ल. देशपांडे यांनी
निकीत,
पु.ल. देशपांडे यांनी वर्णन केल्याप्रमाणे असतो कुणा कुणाला "जाज्वल्य अभिमान." मुग्धा कर्णिक या पुण्याच्या नागरिक नसतील तर आमच्या पुण्याचे सन्माननीय नागरिक व्हावे हि विनंती समस्त पुणेकरांतर्फे आहे.
त.टी. : फ्लॅट स्वतःच्या पैशाने विकत घ्यावा.
सुंदर माहितीपुर्ण लेख. (आधी
सुंदर माहितीपुर्ण लेख. (आधी वाचला होता !)
चान्गला लेख, चान्गला
चान्गला लेख, चान्गला विषय!
[(केतकरान्च्या) लोकसत्तातल्या लेखान्वर इथे माबोवर चर्चा होणे, ही चान्गल्या बदलाची नान्दी आहे असे वाटते]
@ सूर्यकिरण, नितीन, दिनेशदा
@ सूर्यकिरण, नितीन, दिनेशदा आणि लिंबूटिंबू: प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
निकित - छान लेख आहे - हिमगौरी
निकित - छान लेख आहे
- हिमगौरी
@ हिमु: किती दिवसांनी
@ हिमु: किती दिवसांनी (वर्षांनी) !!
धन्यवाद !
मस्त आहे लेख.
मस्त आहे लेख.
पन्नास/शंभर वर्षांपूर्वीचे
पन्नास/शंभर वर्षांपूर्वीचे हवामानाचा अनुभव नसला, आठवत नसले, तरी गेल्या पाच वर्षांत परिस्थिती सुधारली आहे कि बिघडली आहे हे ज्याचे त्याला नक्किच ठरवता येईल... .....
मग मुद्दा उरतो की हे इतक्या वेगात कशामुळे होतय...
हे नैसर्गिकच आहे? की अनैसर्गिक... मानवि हस्तक्षेपामुळे होतय? कोणते मानवी हस्तक्षेप?
'मर्चंट्स ऑफ डाऊट'ची आठवण
'मर्चंट्स ऑफ डाऊट'ची आठवण झाली!
जगातील सर्व राईटविंग पक्ष आणि नेते एकजात क्लायमेट चेंज डीनायल मधे मग्न आहेत.
लेख मस्त आहे. भरपूर माहिती
लेख मस्त आहे. भरपूर माहिती मिळाली. अवांतर: भरपूरदा जेव्हा पेपरमध्ये ५० वर्षांनी येवढ तापमान वाढलं, किंवा १०० वर्षांनी हिवाळ्यात इतकी कमी थंडी पडली अश्या बातम्या येतात. मग प्रश्न पडतो की तेव्हा मानवनिर्मित हरितगृह वायू उत्सर्जन कमी असूनही तापमान का वाढायच? स्थानिक हवामानबदल आणि जागतिक हवामानबदल ह्यातली नेमकी कारणं जाणून घायला आवडतील.