यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक
यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग दोन
आतापर्यंतचा युजींचा प्रवास रेखाटून झाल्यानंतर आणि या लेखमालेत “त्या स्फोटाचा” ओझरता का होईना पण संदर्भ आल्यानंतर युजी ज्याला कॅलॅमिटी:चक्रीवादळ म्हणतात ते नेमके काय हे पाहाणे मनोरंजक आहे. सुदैवाने युजींच्या या प्रवासाबद्दल मिनीट-टू-मिनीट नोंदी उपलब्ध आहेत, खुद्द युजींच्याच तोंडून नेमके काय आणि कसे घडले त्याचा वृत्तांत उपलब्ध आहे आणि आजही जिज्ञासूंना तो ऐकायला, वाचायला मिळतो. “मला कसे कळणार हीच ती स्थिती म्हणुन?” हा प्रश्न काही काळ शरीराच्या रोमरोमात भिनला, पेटून उठला आणि तो प्रश्नच युजींचे अस्तित्व बनून गरगरत राहिला, गरगरत राहिला आणि अचानक गायब झाला. युजींमध्ये निर्माण झालेल्या या मूलभूत प्रश्नाला कोणतेच उत्तर नव्हते किंवा ज्या स्थितीत ते खेचले गेले ती स्थितीच त्या प्रश्नाचे उत्तर आहे असे म्हणावे वाटते. उत्तरच नाहीय असे दिसल्यानंतर तो मूलभूत प्रश्न गायब होण्याची परिणिती शरीराच्या आत, बाहेर आणि एकूणच युजी म्हणून जी कुणी व्यक्ती होती तिचा मानवी इतिहासात कधीही कुणाचा झाला नाही अशा कायापालटात झाली. याबद्दल बोलताना म्हणतात युजी म्हणतात, “तो आत अचानक झालेला एक “स्फोट” होता ज्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक धमणी आणि प्रत्येक ग्रंथी त्या स्फोटात भाजून निघाली, भडकून उठली. या स्फोटासोबतच विचार सतत टिकून असतो, आत कुठेतरी केंद्र असते हा भ्रम नाहीसा झाला आणि विचारांची जोडाजोड करणारा “मी” त्यानंतर तिथे राहिला नाही.” युजी पुढे सांगतात:
त्यानंतर विचार टिकून राहून त्याची जुळणी होऊन तो उभा राहू शकत नव्हता. विचाराची जुळवाजुळव खंडीत होते, आणि एकदा ती तशी खंडीत झाली की खेळ, खलास! या एकाच वेळी विचाराचा स्फोट होतो असे नव्हे, तर त्यानंतर ज्या-ज्या वेळी विचार उमटतो, त्याचा स्फोट होऊन तो नाहीसा होतो. त्यामुळे हे सातत्य संपून जाते आणि विचार त्याच्या नैसर्गिक तालात पडतो.
तेव्हापासून, या घटनेपासून मला कसलेही प्रश्न पडत नाहीत, कारण प्रश्न तिथे राहूच शकत नाहीत. मला पडणारे सर्वसाधारण प्रश्न उदाहरणार्थ “हैदराबादला कसे जायला लागेल?” असल्या प्रकारचे साधेसुधे प्रश्न असतात जे जगात चालण्याबोलण्यासाठी, साध्यासुध्या कामासाठी आवश्यक असतात. आणि असल्या प्रश्नांना लोकांकडे उत्तरे असतात. पण त्या तसल्या प्रश्नांना (“आध्यात्मिक” किंवा “आधिभौतिक” ) कुणाकडेच, कुठलीही उत्तरे नसतात. त्यामुळे आता प्रश्न शिल्लक राहिले नाहीत.
डोक्यात असणारी प्रत्येक गोष्ट भयानकपणे ताणली गेली होती – दुसर्या कुठल्याच गोष्टीला तसूभरही वाव राहिला नव्हता. आयुष्यात पहिल्यांदाच मला सर्वकाही “खचाखच” भरून घट्ट झालेल्या माझ्या डोक्याची जाणीव झाली होती. या वासना (पूर्व संस्कार) किंवा तुम्हाला जे संबोधन योग्य वाटते ते घ्या, त्या काहीवेळा डोके वर काढू पाहातात, पण मेंदूतील पेशी एवढ्या “घट्ट” होतात की वासनांमध्ये गुंतण्याची संधीच मिळत नाही. दुभागणी (पूर्व संस्कार आणि विचारांच्या रूपातून झालेली) तिथे राहू शकत नाही. ते शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यासाठी काहीही करावे लागत नाही. त्यामुळेच मी नेहमी म्हणत असतो की, हा “स्फोट” घडून येतो तेव्हा (मी हा शब्द वापरतो कारण ते अणुस्फोटासारखे असते), त्यातून प्रतिक्रियांची साखळी मागे सुटते. शरीरातील प्रत्येक पेशी, हाडाच्या कोषांची प्रत्येक पेशीला या “बदलातून” जावे लागते – मला ते शब्द वापरायचे नाहीत – पण हा एक कधीही न पुसला जाणारा बदल आहे, कसलीतरी अल्केमी आहे.
ते आण्विक स्फोटासारखेच असते. त्यातून संपूर्ण शरीर विखरून जाते. ती साधी गोष्ट नाही; तो माणसाचा शेवट असतो. त्या क्षणांतून जाताना मला भयंकर शारीरिक यातना झाल्या आहेत. तुम्ही तो स्फोट अनुभवू शकता असे नव्हे, तर फक्त त्याचे नंतरचे परिणाम भयानकपणे जाणवतात. या “कायापालटातून” शरीराचे पूर्ण रसायनशास्त्रच बदलते.
त्या (स्फोटा) नंतरचा परिणाम म्हणजे, आता इंद्रिये कोणत्याही समन्वयकाशिवाय किंवा केंद्राशिवाय संचालित होत आहेत – एवढेच मी सांगू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे: शरीराचे रसायनशास्त्र बदललेय – मी सांगू शकतो की रसायनशास्त्रात या बदल घडल्याशिवाय, विचारापासून, विचाराच्या सातत्यापासून ही घडण मुक्त होण्याचा कोणताच मार्ग नाही. त्यामुळे, त्यावेळपासून विचाराचे सातत्य नसल्याने, काहीतरी घडलेय असे तुम्ही सहज सांगू शकता, पण खरंच, तंतोतंत काय घडलेय, ते अनुभवण्याचा मला कोणताच वाव नाही.
ही गोष्ट मला अपेक्षित होते, मी कल्पना रंगवल्या होत्या, मला बदलायचे होते त्या क्षेत्राबाहेर घडाली आहे. त्यामुळे मी याला “बदल” म्हणत नाही. माझ्यासोबत काय घडलय ते मला खरंच माहीत नाही. मी आता जे तुम्हाला सांगत आहे ते फक्त माझे कार्य कसे चालतेय त्याबद्दलचे बोलणे आहे. तुम्ही ज्या पध्दतीने कार्य करताय आणि मी ज्या पध्दतीने करतोय त्यात काहीसा फरक वाटू शकतो, पण मूलत: त्यात कसलाही फरक असू शकत नाही. तुमच्यात आणि माझ्यात कसला फरक असू शकतो? कसलाही नाही. पण आपण ज्या पध्दतीने स्वत:ला व्यक्त करतोय, त्यात काहीसा फरक दिसतो. काहीतरी फरक आहे असे मला जाणवतेय आणि तो काय आहे ते मी समजून घेतोय.
या “स्फोटा”दरम्यानच्या आठवड्यात युजींना त्यांच्या इंद्रियांच्या कार्यात काही मूलभूत बदल आढळून आले. शेवटच्या, सातव्या दिवशी त्यांचे शरीर “शारीरिक मृत्यूच्या” प्रक्रियेतून बाहेर पडले आणि त्यानंतरचे बदल ही कायम टिकून राहाणारी वैशिष्ट्ये बनली.
शेवटी: बदलांना सुरूवात झाली. सात दिवसांपर्यंत, प्रत्येक दिवशी बदल घडत गेला. युजींना आढळले की त्यांची त्वचा अत्यंत मुलायम झालीय, डोळ्यांची उघडझाप थांबलीय आणि स्वाद, गंध आणि ऐकण्याच्या संवेदनांत बदल घडलाय.
पहिल्या दिवशी त्यांना आढळून आले, त्वचा की मलमली वस्रासारखी मऊ झालीय आणि त्यावर विचित्र चमक, सोनेरी चमक आलीय. “मी दाढी करत होतो, आणि प्रत्येक वेळी रेझर फिरवताना, ते घसरू लागले. मी ब्लेडस बदलल्या, पण काही उपयोग झाला नाही. मी माझ्या चेहेर्याला स्पर्श केला. माझी स्पर्शाची संवेदना वेगळी होती.” युजींनी या गोष्टीला कोणतेही अवास्तव महत्व चिकटवेले नाही. त्यांनी फक्त ही निरिक्षणे केली आहेत.
दुसर्या दिवशी त्यांना सर्वप्रथमच आढळून आले की त्यांचे मन, ते नेहमी जो शब्द वापरतात त्याप्रमाणे “पकडमुक्त स्थितीत” आहे. युजी वर असलेल्या किचनमध्ये होते आणि आणि व्हॅलेण्टाईनने काहीतरी टोमॅटो सूप बनवले होते. त्यांनी ते पाहिले आणि ते काय आहे ते त्यांना कळेना. ते सूप आहे असे व्हॅलेण्टाईनेने सांगितले. त्यांनी त्याची चव घेतली आणि मग ते समजले, “टोमॅटो सूपची चव अशी असते तर!.” त्यांनी सूप चाखले आणि परत ते मनाच्या त्या विचित्र चौकटीत शिरले, नव्हे तर ती “मनोमुक्त” स्थिती होती. त्यांनी व्हॅलेण्टाईनला पुन्हा विचारले “हे काय आहे?” पुन्हा व्हॅलेण्टाईन म्हणाली ते सूप आहे. पुन्हा युजींनी चव घेतली, ते गिळले आणि पुन्हा एकदा ते काय होते ते विसरून गेले. माझी काहीकाळ अशी मजा झाली. मजेशीरच होते ते सगळे – ती “पकडमुक्त स्थिती.”
आता युजींसाठी ती स्थिती सामान्य झाली होती. ते म्हणतात आता ते बिलकुल कल्पनारंजन, काळजी, संकल्पना मांडणे किंवा इतर लोक एकटे असताना करतात तसे कोणतेही विचार करीत नाहीत. फक्त गरज असेल तेव्हाच त्यांचे मन उभे राहाते, उदाहरणार्थ, कुणीतरी प्रश्न विचारला किंवा त्यांना टेपरेकॉर्डर दुरुस्त करायचा असेल तेव्हा. अशी गरज संपते तेव्हा, तिथे मन राहात नाही, विचारही राहात नाही. फक्त जीवन राहाते.
तिसर्या दिवशी, युजींच्या काही मित्रांना त्यांनी जेवणासाठी बोलावले होते. स्वत: स्वयंपाक करायला ते कबूल झालेले होते. पण त्यांना नेहेमीसारखा गंधही घेता येईना आणि चवही घेता येईना. “या दोन संवेदना रूपांतरीत झाल्या आहेत याबद्दल मला जाणीव झाली. प्रत्येकवेळी माझ्या नाकपुड्यांत कोणताही गंध शिरला तेव्हा त्यामुळे गंध घेण्याच्या केंद्राला त्रास होऊ लागला – मग तो गंध महागड्या अत्तराचा असो की गायीच्या शेणाचा असो. आणि त्यानंतर मी कधीही कशाची चव घेतली तेव्हा, मला फक्त त्यात जास्त प्रमाणात असलेला घटकच जाणवत असे – इतर घटकांची चव थोडीशी उशीरा जाणवू लागली. त्या क्षणापासून पुढे मला कसल्याही परफ्युमचे काही वाटेना आणि चमचमीत जेवणाबद्दलही काही वाटेना. मला त्यात जास्त प्रमाणात असलेल्या घटकाचीच चव जाणवू लागली – तिखट किंवा जे काही टाकले असेल ते.”
चौथ्या दिवशी, त्यांच्या डोळ्यांबाबत काहीतरी झाले. युजी आणि त्यांचे मित्र गेस्टाड मधील रियाल्टो रेस्टॉरंटमध्ये बसले होते. याच ठिकाणी त्यांना बर्हिवक्र भिंगासारख्या प्रचंड “दृष्टी केंद्रणाची” जाणीव झाली. “माझ्या दिशेने येत असलेल्या गोष्टी, माझ्या आत शिरत असल्यासारखे दिसत होते. आणि माझ्या जवळून दूर जाणार्या गोष्टी माझ्या आतून बाहेर पडत असल्यासारखे वाटत होते. मी एवढा कोड्यात सापडलो होतो – माझे डोळे महाप्रचंड कॅमेर्याप्रमाणे झाल्यासारखे वाटत होते, आणि मी काही न करता ते त्यांचा अवधान बिंदू बदलत होते. आता मला या विचित्रपणाची सवय झालीय. आजकाल मी असाच पाहात असतो. तुम्ही मला तुमच्या कारमध्ये बसवून घेऊन जाता, तेव्हा माझी कॅमेरा सरसावून हिंडत असलेल्या कॅमेरामन सारखी स्थिती असते. समोरून येणार्या कार माझ्या आत शिरत असतात, आणि आपल्याला मागे टाकून पुढे जाणार्या कार माझ्यातून बाहेर पडत असतात. माझे डोळे कशावर तरी रोखले जातात, तेव्हा पूर्ण अवधानासह ते तिथे चिकटतात, कॅमेर्यासारखे.”
रेस्टॉरंटमधून युजी परत आल्यानंतर त्यादिवशी आरशात पाहात असताना त्यांच्या डोळ्याबाबत त्यांना आढळले की ते “स्थिर” झाले आहेत. ते खूपवेळ आरशासमोर थांबून राहिले आणि निरिक्षण केले तर त्यांच्या पापण्यांची उघडझापच होत नव्हती. जवळपास पंचेचाळीस मिनिटे ते आरशात पाहात राहिले – पण एकदाही पापण्यांची उघडझाप दिसली नाही! “उपजतपणे होणारी माझी पापण्यांची उघडझाप कायमची संपली होती. ”
पाचव्या दिवशी युजींना त्यांच्या श्रवणेंद्रियात झालेला बदल जाणवला. कुत्रा भुंकत असताना त्यांना ऐकू आले तेव्हा, कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.
पाच दिवसांत पाच इंद्रिये बदलली. सहाव्या दिवशी युजी सोफ्यावर निवांत पडून होते. व्हॅलेण्टाईन किचनमध्ये होती.
“आणि अचानक माझे शरीर अदृश्य झाले. माझ्यासाठी, तिथे शरीर नव्हते. मी माझा हात पाहिला.. “हा हात माझा आहे?” असा प्रश्न नव्हता, पण ती पूर्ण स्थितीच काहीशी तशी होती. स्पर्श वगळता, संपर्काचा बिंदू सोडता इतर काही तिथे आहे असे मला जाणवेना. मी व्हॅलेण्टाईनला बोलावले आणि तिला विचारले “तुला माझे शरीर सोफ्यावर दिसतेय का? ” माझ्या आतून मला काहीच जाणवत नाही की हे शरीर माझे आहे म्हणून. तिने माझ्या शरीराला स्पर्श केला आणि म्हणाली, “हे तुझे शरीर आहे.” आणि तिच्याकडून खात्री करून घेतली तरीही मला बरे वाटेना, माझे समाधान झाले नाही. मी स्वत:ला म्हणालो, “काय गंमत चाललीय ही? माझे शरीर हरवलेय. माझे शरीर सोडून गेले होते, आणि ते कधीही परत आलेले नाही.”
आता त्यांच्या शरीराच्या बाबतीत, युजींकडे फक्त स्पर्श होणारे बिंदूच तेवढे शिल्लक आहेत, कारण, ते म्हणतात दृष्टीची संवेदना ही स्पर्शाच्या संवेदनेपासून विभक्त आहे. त्यांच्या स्वत:च्या शरीराची संपूर्ण प्रतिमा तयार करणे त्यांना शक्य नाही, कारण स्पर्शाच्या संवेदनेच्या अनुपस्थितीत, त्यांच्या अवधानात संबंधीत बिंदू हरवलेले असतात.
आणि सर्वात शेवटी सातव्या दिवशी, युजी त्याच सोफ्यावर पडून होते, आराम करीत होते, “पकडमुक्त स्थिती”ची मजा घेत होते. व्हॅलेण्टाईन आत यायची, तेव्हा ती व्हॅलेण्टाईन आहे हे ते ओळखायचे. ती खोलीबाहेर जायची. त्यानंतर, फिनीश, कोरेपणा – कसलीही व्हॅलेण्टाईन कुठेच नाही. “हे काय आहे नेमके?” व्हॅलेण्टाईन कशी दिसते ती कल्पनाही मी करू शकत नाहीय”, त्यांना वाटायचे. ते किचनमधून येणारे आवाज ऐकत आणि स्वत:ला विचारत, “माझ्या आतून हे कसले आवाज येत आहेत?” पण मला त्या आवाजांशी संबंध काही जोडता येत नसे.” त्यांना आढळून आले की त्यांची सर्व इंद्रिये त्यांच्या आतल्या समन्वय साधणार्या यंत्रणेशिवाय काम करीत आहेत: समन्वयक हरवला होता. आणि तेव्हाच...
माझ्या शरीरात काहीतरी घडत असल्याचे जाणवले: शरीराच्या विविध भागांतून जीवन ऊर्जा एका दृश्य केंद्राकडे जात होती. मी स्वत:ला म्हणालो, “आता तुझे आयुष्य संपले. तु मरणार आहेस.” तेव्हा मी व्हॅलेण्टाईनला बोलावले आणि म्हणालो, “मी मरतोय व्हॅलेण्टाईन आणि तुला या शरीराचे नंतर काहीतरी करावे लागणार आहे. हे डॉक्टरांना देऊन टाक, कदाचित त्यांना त्याचा वापर होईल. माझा दहन किंवा दफन क्रियेवर विश्वास नाही. तुला हवी तशी या शरीराची विल्हेवाट लावावी लागेलच. एकदिवस यातून दुर्गंध येऊ लागेल. त्यामुळे, ते देऊन टाक कुणाला तरी, व्हॅलेण्टाईन म्हणाली, “युजी, तुम्ही एक परदेशी माणूस आहात. स्वीस सरकार तुमचे शरीर स्वीकारणार नाही. विसरा त्याबद्दल.”
त्यांचे जीवन बल भयानकपणे एका दृश्य बिंदूवर येऊन पोचले होते. व्हॅलेण्टाईनचे बेड रिकामेच होते. ते त्या बेडवर जाऊन पडले, मरायला तयार होऊन. ते जे बोलत होते त्याकडे व्हॅलेण्टाईनने, निश्चितच दुर्लक्ष केले होते. पण तिथून जाण्यापूर्वी ती म्हणाली होती, “एक दिवस तुम्ही म्हणता ही गोष्ट बदललीय, दुसर्या दिवशी म्हणता आणखी दुसरंच काही बदललंय, तर तिसर्या दिवशी आणखी तिसरंच काहीतरी बदलतं. काय चालु आहे नेमकं? आता तर तुम्ही म्हणताय तुम्ही मरणार आहात. तुम्ही काही मरणार वगैरे नाही. तुम्ही ठिकठाक आहात, एकदम ठणठणीत” असं म्हणून ती खोलीबाहेर पडली. युजी त्यांची आपबिती पुढे सांगतात:
नंतर एक असा बिंदू आला जसे एखाद्या कॅमेर्याच्या अपार्चरचा पडदा स्वत:ला बंद करून घेत असावा. ही एकच उपमा मला सुचते. मी आता जे वर्णन करीत आहे ते आणि वास्तविक जसे घडले त्यात फरक आहे कारण त्यावेळी याप्रकारे विचार करायला तिथे कुणीच नव्हते. हा सर्व माझ्या अनुभवाचा भाग असला पाहिजे, नाहीतर मला त्याबद्दल बोलता आले नसते. तर, अपार्चर स्वत:ला बंद करून घेत होते, आणि आणखी काहीतरी होते जे तो पडदा उघडा ठेऊ पाहात होते. त्यानंतर थोड्यावेळाने काहीही करण्याची इच्छा राहिली नाही, ते अपार्चर बंद होणे रोखावेही वाटत नव्हते. अचानक, जसे झाले त्याप्रमाणे, ते बंद झाले. त्यानंतर काय झाले ते मला माहित नाही.
ही प्रक्रिया – ही मरण्याची प्रक्रिया एकोणपन्नास मिनीटे चालू राहिली. तो शारीरिक मृत्यू होता. युजी म्हणतात की अजूनही त्यांना तसे होते:
माझे हात आणि पाय थंड पडतात, शरीर ताठते, हृदयाचे ठोके मंदावतात, श्वास मंद होतो आणि श्वास घ्यायची मारामार होते. एका बिंदूपर्यंत तुम्ही तिथे असता, तुम्ही तुमचा शेवटचा श्वास घेता आणि मग, फिनीश. त्यानंतर काय घडते ते कुणालाही माहीत नाही.
युजी त्या प्रक्रियेतून बाहेर आले तेव्हा व्हॅलेण्टाईनने त्यांच्यासाठी कुणाचा तरी कॉल आला असल्याचे सांगितले. गोंधळलेल्या स्थितीत ते फोन घेण्यासाठी खाली गेले. काय झाले होते त्यांना माहीत नव्हते. ते शारीरिक मृत्यूमधून बाहेर पडले होते. ते कशामुळे परत जगात आले, त्यांना माहित नाही. कितीकाळ तो मृत्यू टिकून राहिला, त्यांना माहित नाही. “मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही, कारण अनुभव घेणाराच समाप्त झाला होता: त्या मृत्यूचा अनुभव घेणाराच तिथे बिलकुल नव्हता...”
इथे, या “कॅलॅमिटी”चा एकमेव साक्षीदार डग्लस रोजस्टोन काय म्हणतो ते पाहाणे अगदी सुयोग्य होईल:
चोवीस उन्हाळे उलटले आहेत आता या गोष्टीला, जेव्हा सर्व रूपांतरणांत अत्यंत दुर्मिळ असणार्या, हे एकच खरे रूपांतरण आहे असे वाद ज्याबद्दल आहेत त्या रूपांतरणाचा – एका सामान्या माणसाच्या मृत्यूचा आणि पुनर्जन्माचा मला साक्षीदार होता आले. हा माणूस “देव माणूस”, “निवड झालेला” किंवा जगदगुरू असण्यापेक्षा एक सर्वसामान्य माणूस होता. जे. कृष्णमूर्तींची व्याख्याने ऐकण्यासाठी १९६६ च्या उन्हाळ्यात मी सानेनला गेलो होतो तेव्हा या सगळ्याची सुरूवात झाली. त्या दिवशी मी गेस्टाड येथील माझ्या अपार्टमेंटमध्ये होतो. सायंकाळची वेळ होती. चंद्र नुकताच क्षितीजावर आला होता. कशामुळे तरी मला युजींना, त्यांच्या चॅलेटमध्ये कॉल करावा वाटला. मी केला. घराच्या मालकिणीने फोन घेतला. तिने मारलेली “युजीऽऽऽ तुमच्यासाठी फोना आहेऽऽऽ” अशी हाक मला फोनमधून ऐकू आली. तिच्या आवाजावरून व्हॅलेण्टाईनचे काहीतरी बिनसले आहे असे वाटत होते. ती म्हणाली, “युजींना काहीतरी होतंय, त्यांचं शरीर हलू शकत नाहीय. कदाचित ते मरत असतील.” मी म्हणालो, “जा आणि युजीला बोलवा, मी त्यांना बोलतो.” व्हॅलेण्टाईन म्हणाली, “ते येतील असे मला वाटत नाही.” पण मी अडूनच बसलो. आणि तेव्हा युजी फोनवर आले. त्यांचा आवाज फार दूरून येत आहे असे वाटत होते, “डग्लस, तुच इकडे ये आणि काय होतंय ते पाहा,” एका मेलेल्या माणसाला पाहायला येण्याचे ते आमंत्रण होते. मी पळालो. त्यावेळी रेल्वे चालू नव्हत्या. गेस्टाड आणि सानेनमधील अंतर तीन किलोमीटर आहे. मी चॅलेटमध्ये शिरलो आणि युजींच्या खोलीकडे गेलो. मला ते दृश्य अजूनही चांगलेच आठवते:व्हॅलेण्टाईन भीतीने पांढरीफटक पडली होती, आणि युजी कोचावर होते, शुध्दीवर नव्हते. त्यांचे शरीर धनुष्याकृती सारखे वाकले होते. नुकताच डोंगरावरून चंद्र वर आला होता. मी युजींना उठवू लागलो आणि खिडकीकडे घेऊन गेलो. त्यांनी चंद्राकडे ज्या पध्दतीने पाहिले ते माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्या खोलीत काहीतरी विचित्र प्रकार चालला होता. मी त्यांना विचारले, “काय होतंय?” ते म्हणाले, “हा शेवटचा मृत्यू आहे.”
महेश भट आणि मित्रांसमोर डग्लसने हे कथन केले आहे. युजींच्या मित्रांपैकीच एक, डग्लसचे आतापर्यंतचे ऐकणारे श्री. मूर्ती डग्लसला मध्येच थांबवत विचारतात, “म्हणजे ते मरणार आहेत असं ते सांगत होते असे तुला म्हणायचे आहे का?” डग्लस, “नाही, ते आधीच घडून गेले होते. युजी म्हणाले माझा फोन आल्याने ते परत येऊ शकले.” मूर्ती विचारतात, “तुझा काय प्रतिसाद होता डग्लस?” “मला खूप आनंद झाला होता; त्यांच्यामुळे मला खूपच आनंद झाला.”
त्यांच्यात काही उल्लेखनीय बदल दिसत होते काय?
“त्यांचे व्यक्तिमत्व बदलले नव्हते. ते नेहमीसारखेच हाताळायला विचित्र असणारा माणूस दिसत होते. पण त्यांच्यावर कसलाच तणाव जाणवत नव्हता. ”
पूर्वप्रकाशन: http://www.yekulkarni.blogspot.com आणि मिसळपाव डॉट कॉम
॥
ही लेखमालिका यु.जी. कृष्णमूर्ती यांच्या आध्यात्मिक शोधादरम्यान घडलेली कॅलामिटी आणि त्यानंतरचे त्यांचे आयुष्य, त्यांची मते आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांवरील प्रभाव आणि एकूणच यु.जी.कृष्णमूर्ती या व्यक्तीमत्वाचा फक्त परिचय करून देण्याच्या हेतूने लिहीली आहे. पुढचे भाग तयार आहेत आणि ते यथावकाश मायबोलीवर टाकण्यात येतील; जिज्ञासू वाचकांना एका बैठकीत वाचून काढण्यासाठी वर दुवा दिलेला ब्लॉग वाचता येईल
॥
युट्यूब वर बरेच व्हिडीओ आहेत
युट्यूब वर बरेच व्हिडीओ आहेत पण एकतर ते समजण्याची बौद्धिक पात्रता नाही शिवाय एखाद्याला पाहून मनात नापसंतीच निर्माण होते तसं झालं ... काही ऐकू नये असं वाटलं ..... उलट जे. कृष्णमूर्ती जे बोलतात ते पूर्ण पटत किंवा आवडत नसलं तरी त्यांचं बोलणं ऐकताना छान वाटतं ..