पंच फोडण वापरून पनीर-बटाटा-टोमॅटो भाजी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 October, 2010 - 14:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम आकाराचे बटाटे उकडून, साली काढून व फोडी करून
२ कांदे बारीक चिरून
२ टोमॅटो बारीक फोडी करून
१०० ग्रॅम पनीर बारीक तुकडे करून
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून

मसाला

पंच फोडण : मोहरी, जिरे, मेथ्या (मेथी दाणे), बडिशेप, कलौंजी ह्यांचे मिश्रण : १ टीस्पून
गरम मसाला : अर्धा ते एक टी स्पून

अन्य घटक

१ तमालपत्र
गरज वाटल्यास लाल तिखट
चिमूटभर हिंग
पाव ते अर्धा टीस्पून हळद
मीठ
२-३ टेबलस्पून दही

फोडणीसाठी तेल/ तूप

क्रमवार पाककृती: 

मध्यंतरी इथे मायबोलीवर पंच फोडण वापरून बटाटा-टोमॅटोची भाजी (बेडवी पुरी साग) करण्याची कृती वाचल्यावर मी लगेच तशी भाजी घरी करून पाहिली. पंच फोडणचा स्वाद बेहद्द आवडला! मग हाच मसाला वापरून इतर कोणत्या भाज्या करता येतात याचा आंतरजालावर शोध घेतला असता मला एक कृती मिळाली. त्यात माझ्या सोयीनुसार फेरफार करून भाजी केली. अप्रतिम चव आली होती! शिवाय झटपट होणारी व सोप्पी कृती असल्याने हा आचारी एकदम खुश! Happy

तर ती कृती अशी :

पंच फोडण नुसतेच कोरडे भाजून घ्यावे. कलौंजी व मोहरी - जिरे तडतडू लागले की मस्त खमंग दरवळ सुटेल. गॅस बंद करावा. एका पॅनमध्ये तेल/ तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात हे भाजलेले पंचफोडण घालावे. आता ते तडतडणार नाही हे गृहित धरून त्यात तमालपत्र, हिंग, हळद, मिरच्या घालून व्यवस्थित परतावे. ह्या मिश्रणात कांदा घालून तो गुलाबीसर परतल्यावर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून परताव्यात. त्यानंतर पनीरचे तुकडे घालून परतावेत. टोमॅटो फोडी घालून परतावे. टोमॅटो शिजत आला की दोन वाट्या (किमान) पाणी घालून जरा बटाटा व्यवस्थित मऊ होऊ द्यावा. बटाटा ठेचला गेला पाहिजे. अशा पध्दतीने काही बटाटा फोडी ठेचाव्यात. चवीप्रमाणे गरम मसाला, लाल तिखट, मीठ घालावे. सर्वात शेवटी दोन ते तीन टेबलस्पून फेटलेले दही घालावे व जरा उकळी आली की लगेच गॅस बंद करावा.

ह्या भाजीत मी पाणी बेताचेच घातले आहे. ज्यांना भाजीला थोडा जास्त रस हवा असेल त्यांनी जरा जास्त पाणी घालावे.

वाढणी/प्रमाण: 
चार माणसांसाठी
अधिक टिपा: 

ह्या भाजीचा मसाला जेवढा मुरतो तेवढा तिचा स्वाद अधिक खुलतो. ताजी गरम भाजी स्वादिष्ट लागतेच, पण सकाळी केलेली भाजी सायंकाळी अधिक लज्जतदार लागते. (तेवढ्याचसाठी मी सकाळी जरा जास्तच भाजी केली!!;-)) फक्त भाजीत दही घातले असल्यामुळे तिला सारखे सारखे गरम करु नये. फुलका/ भाकरी/ पोळी/ ब्रेड/ भाताचे प्रकार / नान/ पुरी/ पराठा यांबरोबर खायला मस्त! Happy

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल व स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी अरुंधती.
आत्तापर्यंत बटाटा आणि पनीरची एकत्र भाजी कधीच केली नव्हती. आता करुन बघेन Happy

अकु, पंच पोरण नाही ग..... त्याचं नाव पांच फोडण असं आहे. त्याचा तो खास बंगाली उच्चार त्यांच्या पद्धतीने इंग्लिशमधे लिहिल्याने तुझा घोळ झालेला दिसतोय! Proud
एक फूल, हे पांच फोडण तयार मिश्रण मिळतं. जरा ओळखीचे कुणी बंगाली असतील आसपास तर त्यांना विचार..

कलौंजी घालून मी एक-दोनदा भाजी बनवली आहे.... पण त्याचा फ्लेवर खुप स्ट्राँग असतो. थोडेसे घातले तरी त्याचे अस्तित्व जाणवते.

मी पण हेच लिहिणार होते की ते फोडण पाहिजे म्हणून. असो. Happy
सुलेखा ह्यांनी सांगितलेली बटाट्याची भाजी देखील पंचफोडण घालून मस्तच झालेली.

एक फूल, उर्मी, अमि.... प्रतिसादाबद्दल धन्स! Happy सुलेखा.... आता तुझ्या टिपेनुसारही करून बघेन. वरदा Proud करते दुरुस्त उच्चार.... मलाही पोरण पोरण वाचून काहीच अर्थबोध होत नव्हता! तयार मिश्रण मिळतं हेही माहित नव्हतं. वाण्याकडे कलौंजी मिळाली, बाकीचे पदार्थ घरी होतेच.... मग काय बल्लवाचार्य जोरात! धन्स गं!

लाल भोपळ्याची/बटरनट स्क्वाशची पण पंच-फोडण घालून केलेली भाजी छानच होते. लाल तिखट न घालता सुक्या लाल मिरच्या फोडणीत टाकायच्या.

पालक, शिजलेले छोले. लाल भोपळा किंवा बटाटा हे एकत्र करुन केलेली पंचफोडण घालून केलेली भाजी देखील मस्त होते.

अकु मस्त रेसिपी Happy

पंच फोरन घालुन कोबीची, कॉलिफ्लॉवरची भाजी पण मस्त होते.

एक फुल, देशी दुकानात पंच फोरन ची रेडी पाकिट मिळतात.

ताकाची" मराठी कढी" पेक्षा घट्ट्सर कढी उकळायला ठेवताना त्यात किसलेले आले,अर्धा चमचा मेथीदाणा,४ लवंगा,४-५ मिरे ,१ चक्री फुल,१ मोठा वेलदोडा घालायचा ,,वरुन तेल्/तुपाची सुक्या लाल्/हिरव्या मिरचीचे तुकडे ,हिंग,व पाच-फोडण घालुन फोडणी द्यावी..फोडणी दिल्यावर पाव चमचा लाल तिखट वरुन घालुन ढवळावे..वेगळ्या चवी ची कढी तयार होते..जिरा राईस्,खिचडी,मुग-डाळ ,शेंग-दाणे,मटर घालुन केलेला पातळ्सर दलिया बरोबर छान लागते..राजस्थान्,म.प्र..मधले थंडी -पावसाळ्याचे गरम खाणे जेवण आहे हे..
.

शिर्षक वाचल तेव्हा वाटलेल हा टोमॅटो-वॉर सारखा काही प्रकार असेल, टोमॅटोवर पंच मारून त्यानां फोडायचे. रेसेपी चांगली वाटली, रवीवारी घरी करून बघतो

छान आहे. मी करताना आधी कांद्यात टोमॅटो परतून घेईन. मग बटाटे आणि त्यानंतर पनीर..

अरे वा! मिनोती, सावली, सुलेखा, लाजो.... मला तर तुम्ही पंच फोडण घालून करता येण्याच्या रेसिपींचा मस्त साठा दिला आहे! थँक्स, मी शोधतच होते! Happy आता करणारच!
मितान, मनःस्विनी, प्रसिक, वर्षा, डेलिया.... धन्स! Happy
दिनेशदा..... तसेही मस्तच लागेल! भाज्या कोणत्या क्रमाने घालतो त्याप्रमाणे त्या भाजीच्या स्वादातही फरक पडतो हे मात्र खरे! Happy

आज हा पंच फोडण प्रकार वापरून कोबी - भिजवलेली हरभरा डाळ व ओले खोबरे अशा कॉम्बोची भाजी केली आहे. अ प्र ति म चव आली आहे. कोबीचा जो दर्प असतो तो ह्या प्रकारात अजिबात जाणवत नाही. धन्स सगळ्यांचे! Happy

हा पंच फोडण मसाला भेंडीच्या भाजीत छान लागतो. भेंडी फोडणीला घालून लगेच आमचुर घालायचे, म्हणजे तार येत नाहि. मग तुम्ही झाकण ठेउन पण भाजी शिजवू शकता. नंतर हा मसाला ,मीठ, तिखट घालावे.

अरुंधती, आज केली ही भाजी. खरंच अप्रतिम चव आहे Happy पंच-फोडण वापरुन आता इतरही भाज्या करेन.
दिनेशदांनी लिहिल्याप्रमाणे आधी कांदा-टोमॅटो परतून घेतला. सुलेखांनी सांगितल्याप्रमाणे गरम मसाला न घालता चक्रीफूल घातले एकच. तमालपत्रही एक घातले. मस्त चव आलीय त्याची ! ह्याशिवाय मसाला परतताना त्यात अर्धा चमचा ( जास्त स्वाद नकोच होता ) लसूण पेस्ट घातली.

ही भाजी केली नाही अजून पण इथलं वाचून पंच फोडन मागवलं आहे. मसुराची आमटी, कांदा-टोमॅटो कोशिंबीर, कढी, परतून मिक्स भाजी करतो त्यात अशा बर्‍याच प्रकारात जिरं किंवा मोहरी ऐवजी पंच फोडन घालून बघितलं. मस्त वेगळी चव येते पदार्थाला. धन्यवाद अकु Happy

समई, स्वाती, अगो, सिंडरेला, सुनिधी... धन्स! Happy

सध्या मी पंचफोडण वापरून तरी भाज्या करते किंवा नेहमीच्या फोडणीत बडिशेप घालते. बडिशेप घातली की गूळ/ साखर कमी घातली किंवा नाही घातली तरी चालते. शिवाय बडिशेपेचा सुमधुर स्वाद काय मस्त लागतो, अहाहा!!