आलू बंजारा

Submitted by Vega on 30 September, 2010 - 14:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

७-८ गोल, छोटे-छोटे बटाटे (आधीच सालं काढून, टोचून, मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे),
१ वाटी बारीक चिरलेला शेपू, १ वाटी रात्रभर भिजवलेले अख्खे मसूर, १ कांदा उभा चिरलेला,
२-३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबिर, ठेचलेले आले+लसूण १ चमचा, २ सुक्या लाल बेडगी मिर्च्या,
१ चमचा लाल तिखट (काश्मिरी मिर्चीचे तिखट...रंग छान येतो भाजीला), अर्धा चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे+जिरे पूड, चिमूटभर हिंग, आवश्यकतेनुसार मीठ, चिरलेला अर्धा टोमॅटो आणि छोट्या लिंबा एवढा गूळ.

क्रमवार पाककृती: 

ही भाजी मातीच्या भांड्यात करायची आहे. तेव्हा, बाजारातून (जिथे माठ, मातीच्या कुंड्या मिळतात त्यांच्याकडून) आधीच एक कॅसेरॉलच्या आकाराचे मातीचे भाजलेले भांडे (तुळतुळीत पॉलिश्ड दिसते हे भांडे) आणि त्यावर मातीचेच झाकण असा सेट आणून ठेवावा.

मातीचे भांडे स्वच्छ धुवून कोरडे करून गॅसवर ठेवावे. त्यात अर्धी पळी तेल घालून मंद आचेवर ठेवावे.
तेल गरम झाल्यावर त्यात आले+लसूण ठेचा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा.

नंतर चिमूटभर हिंग टाकून त्यात लाल मिर्च्यांचे तुकडे, लाल तिखट, हळद, धणे+जिरे पूड आणि गरम मसाला वगैरे जिन्नस टाकावे.

त्यावर चिरलेला कांदा टाकावा (कांदा गुलाबी होईपर्यंत परतण्याची गरज नाही).
नंतर चिरलेला शेपू, सोललेले बटाटे आणि भिजवलेले मसूर टाकून एकदा सगळे मिश्रण परतून घ्यावे.

नंतर सगळे मिश्रण बुडून वर एक इंच राहील इतके पाणी टाकावे.
चवीनुसार मीठ टाकावे. चिरलेली कोथिंबिर टाकावी.

मिश्रण व्यवस्थित ढवळून त्या भांड्यावर मातीचे झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवावे.

बटाटे आणि मसूर ब-यापैकी शिजल्यावर, चिरलेला टोमॅटो आणि गूळ घालावा.
पुन्हा एक वाफ येऊ द्यावी.

आलू बंजारा तयार!

वाढणी/प्रमाण: 
मिताहारी २-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

मातीचे भांडे वापरल्याने शिजलेल्या अन्नब्रह्माला एक वेगळाच खमंग परिमळ येतो. त्यासाठी मातीच्या भांड्यावर मातीचेच झाकण वापरणे गरजेचे आहे! झाकणावरून परावर्तीत होणारी वाफ पुन्हा पदार्थात मिसळते. खमंगपणा द्विगुणित होतो तो त्यामुळेच!

ही भाजी गरमागरम पोळी, किंवा नुसत्या गरम भाताबरोबर एकदम खास; म्हणजे पॉश लागते!

मूळ पाकृ मध्ये टोमॅटो, गूळ, कोथिंबिर, आले हे जिन्नस नव्हते. ते मी प्रयोगाखातर घातले. तसेच मूळ पाकृमध्ये त्यांनी बटाटा चिरून फोडी वापरल्या. मी छोटे गोल बटाटे वापरले एवढाच बदल!

बटाटे, कांदा, मसूर आणि शेपू हे प्रमुख घटक पदार्थ!

सतत फिरतीवर असणा-या बंजारा (लमाणी) लोकांना नॉन-स्टिक पॅन्स, प्रेशर कुकर वगैरे घेऊन फिरणे कसे जमणार? त्यामुळे, एखादे मातीचे भांडे घेऊन त्यात जिन्नस फक्त कोंबायचे आणि शिजवून खायचे अशी सोप्पी, सोयीस्कर पद्धत असावी लमाण्यांची...असा माझा अंदाज!

ज्यांना मातीचे भांडे मिळवणे शक्य नाही, त्यांनी आपल्या नेहमीच्या कढईत आलू बंजारा करून पहावा! शेपूचा नेहमीचा उग्र वास ह्या भाजीत अजिबात जाणवत नाही.
बेमिसाल चव लागते!

माहितीचा स्रोत: 
काही दिवसांपूर्वी टीव्ही वरील एका कार्यक्रमात ही पाकृ पाहिली होती. कोणी अमरजी नामक बल्लवाचार्य होते! पाकृ लिहून घेतली नाही, पण मुख्य घटक आणि कृती मी आठवणीत जपून ठेवली होती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा. वेगळी पाककृती आहे एकदम. करुन बघणार. मला ते मातीचे भांडे फार दिवसापासून घ्यायचेच होते. आता या भाजीमुळ निमित्त मिळाल.

छान आहे प्रकार. मातीचे भांडे न वापरता तो फ्लेवर येण्यासाठी, एखादा खापराचा तूकडा वापरता येतो. (पण तो कच्चा नसावा, म्हणजे पाण्यात घातल्यावरही त्याचे कपचे निघता कामा नयेत.)

मला आयकियात नाही दिसलं कधी. वल्ड मार्केटमध्ये बघेन.
कुठेच नाही मिळालं तर रुनीकडे ऑर्डरी देवु. हाकानाका Proud

कृती झक्कास. मातीच्या भांद्यातील पदार्थाचा स्वाद मस्त खमंग लागतो हे खरंय! आता पुन्हा कुंभारवाड्यातून आणायला हवं असं भांडं! Happy

नंदिनी, हे भांडे लिक्विड सोप व गरम पाण्याने धुवून पुन्हा वापरता येते. खास कुकिंगसाठी वेगळी भांडी मिळतात वर सीमाने लिंक दिल्याप्रमाणे. ती तडकत नाहीत. पण आपल्या कुंभारवाड्यातील पक्की भाजलेली भांडीही चालतात. मी ह्या अगोदर असेच एक भांडे आणले होते. फार किंमत नव्हती. मात्र ते तीन-चार महिन्यांच्या वापरानंतर तडकले.

कुंभाराकडचे मडके जेवण शिजवण्यासाठी वापरण्यापुर्वी ते कसे तयार करुन घ्यायचे, हे मी लिहिले होते.
कुंभाराला सांगितले तर तो खास भांडे देईल बनवून. गोव्यात अशी भांडी अजून आहेत, वापरात.

व्वा. वाचूनच तोंपासू. सगळे प्रमुख घटक माझ्या एकदम आवडीचे आहेत. सो करुन बघेन. मातीचे भांडे आणूनच करेन. माझ्या निवडक १० मध्ये.

मवा, रचु, स्वाती२...धन्यवाद!

हे आयकिया काय प्रकर्ण आहे ? दुकानाचे नाव आहे का?

मला तर आपल्या कडील कुंभारासारखी मातीची भांडी इथेच्(अमेरीकेतच) मद्रासी दुकानात मिळाली. एक मी मांडे करायला आणलेले खूप मोठे असे व दुसरे दोन मीन चाटी(मीन=मासा) प्रकार जो पसरट व खोलगट असतो त्यात मस्त माश्याची आमटी ,चिकन केलेले झकास होते. एकात खांडवी. ÿÿ

आत्ता हि भाजी केली पाहिजे भांड्यात.

ते वरती आयकीयात वगैरे मिळतात ते भांडी मला वाटते फक्त ओवन मध्येच ठेवू शकतो?

नाही, गॅस रेंज असेल तर डायरेक्ट वापरु शकतो. इलेक्ट्रिक किंवा सिरॅमिक असेल तर डिफ्युसर लागेल. मी अ‍ॅमेझॉनवर ऑर्डर केले एक मातीचे भांडे. त्याच्या बरोबर इंफो मॅनुअल आले त्यात ही माहिती आहे. ४५० फॅ पर्यंत अव्हन प्रूफ आहे.

माझ्या मैत्रीणीने असले भांडे घेतलेले , ते फक्त अवन मध्येच वापरु शकतो असे होते. ते पण तिने नीट अवन मध्ये घालायच्या आधी भिजवून वगैरे ठेवले नाही व फुटले एकदम अवन मध्ये नी लोकं बाहेर मातीच्या भांड्यात शिजलेली डाळ मिळणार म्हणून थांबलेलो. Happy

फुटले एकदम अवन मध्ये नी लोकं बाहेर मातीच्या भांड्यात शिजलेली डाळ मिळणार म्हणून थांबलेलो.

मातीच्या भांड्यातच काय, खुद्द मातीतच भिजलेली डाळ ओरपायला मिळाली असणार ना?? Proud

नंदिनी, मातीची भांडी नारळाच्या किशीने घासली तरी चांगली निघतात.

असो, रेसिपी एकदम मस्तच. माझ्याकडे सुदैवाने आहे मातीचे भांडे. करुन पाहते.

Pages