रसिया मुठिया

Submitted by मितान on 15 September, 2010 - 15:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सामग्री -
शिजवलेला भात - २ कप ( दुपारचा उरलेला असेल तर अजून उत्तम )
बेसन - अर्धा ते पाऊण कप
ताक - ५ ते ६ कप
आले लसूण पेस्ट - २ चमचे
लाल तिखट - १ चमचा ( आवडीनुसार कमीजास्त करा)
हळद - अर्धा चमचा
हिंग , मोहरी, जिरे, कढिपत्ता, तेल फोडणीसाठी
अर्धा चमचा साखर, एक चमचा तूप

क्रमवार पाककृती: 

कृती -
एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर एक चमचा आलं लसूण पेस्ट व कढिपत्ता घाला. थोडी हळद आणि लाल तिखट घाला.वरून चमचाभर बेसन ताकात मिसळून ते फोडणीत घाला. गॅस बंद करून टाका.
आता मुटक्यांसाठी भात घ्या. त्यात उरलेलं बेसन, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि चिमुटभर हिंग घाला. हाताला थोडे तेल लावून हे मिश्रण चांगले मळून घ्या. त्याचे मुटके वळता यावे एवढे मऊ मळून घ्या. प्रत्येक वेळी हात पाण्यात बुडवून मुटके वळून घ्या.
कढई ठेवलेला गॅस चालू करा. फोडणी घातलेले मिश्रण चांगले उकळू लागले की त्यात हळू हळू एकेक मुटका सोडा. मुटके सोडल्यावर न हलवता कढईवर झाकण ठेवा.
जेवणाची तयारी करा. ५ मिनिटात मुटके शिजून वर आलेले दिसतिल. त्यात अर्धा चमचा साखर आणि चमचाभर तूप घाला.असेल तर कोथिंबिर पेरा. एका वाडग्यात तयार रसिया मुठिया घ्या. वर अजून एक चमचाभर तूप घ्या आणि खा.

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी प्रत्येकी ४ मुटके
अधिक टिपा: 

सध्या एका गुजराती मैत्रिणीच्या सासूबाई बेल्जियम भेटीला आल्या आहेत. या गुजराती सुगरणीच्या हातचा एक पदार्थ परवा खाल्ला. चटकन होणारा , रुचिपालट म्हणून चविष्ट आणि रसदार असा हा पदार्थ माझ्या सर्व खवैय्या मित्रमैत्रिणींसाठी

ज्यांना कढीभात आवडतो त्यांना हा पदार्थ नक्की आवडेल. तुमच्या प्रतिक्रीया भलानी मावशींना कळवतेच Happy

माहितीचा स्रोत: 
गुजराथी मैत्रिणीच्या सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतोय फोटो .. पण त्यावर बीटरूटाचे काप आहेत का? रंग नाही का उतरणार (उतरलेला दिसत तरी नाहीये ..)

आणि ताक फोडणीला घातलं तर कढी फुटते असा माझा अनुभव आहे (वरच्या फोटोत पण झालंय का?) .. त्यावर उपाय म्हणून बेसन घालून ताक ढवळत उकळी आणायची आणि वरून फोडणी घालायची ..:)

सशल , मी खाल्लेली कढी पण फुटलेलीच होती ! म्हणुन मला वाटले की अशीच असते.
ताकात बेसन थोडे जास्त घतले तरी कढी फुटत नाही. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे वरून फोडणी घालून बघेन.

आता पुढचा प्रयोग या भातात ताजी मेथी घालून करून बघेन Happy

मी नेहमी फोडणीत ताक घालते. कधी फाटले नाही. खूप जास्त वेळ खळखळ उकळले तर फाटते.

बाकी ताकात करायचा पदार्थ असल्याने मी करणार नाही. पण बहिणीला सांगते. फोटो जबरी आलाय.

छान आहे पदार्थ. फोटो छान आलाय.
मी पण सशल सारखंच करते. ताकात बेसन घालुन ते कोमट करुन मग त्यात फोडणी देते.

हं, मलाही आंबूसघार्‍याच वाटल्या Happy वेगळा प्रकार आहे.. फोटो मस्त आलाय.. नाव फारच भारी आहे हां..

बेसन न घाल्ता रोजची मराठी पद्ध्तीने आई कढी करते. कधीच फुटत नाही. गुज्जु नी पंज्जु मधे बेसन घालून कढी करतात.

थोडंसं बेसन पीठ घालून कढी फोडणीला टाकल्यावर सतत ढवळत राहिलं तर कढी आजिबात फुटत नाही. मंद गॅसवर सतत ढवळत राहिल्यावर उकळी फुटू द्यायचीच नाही हा मंत्र कटाक्षाने पाळला तर कढी आजिबात फुटत नाही असा माझा अनुभव आहे. नाही म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कढी कधी फुटू द्यायचीच नसते... Bw

डिजे, परदेशात आपल्या सारखे हरबरा / चणा डाळीचे पीठ मिळत नाही. ते काबुली चणा म्हणजे छोल्याचे पीठ ( बेसन ) असते. ते अजीबात चांगले लागत नाही कढीत. हरबरा डाळ ती हरभरा डाळच. म्हणून कढी फुटते.काही जण म्हणतात की साखर घातल्याने कढी फुटते. पण अजूनपर्यंत आमची कढी फुटलेली नाही.

परदेश म्हणजे युरोप / अमेरीका वगैरे. कारण आशिया खंडात अजून तरी भारतीय पदार्थ आपले मिळतातच. तुमचा अरब देशातला भारतीय वस्तु मिळण्याचा अनूभव वेगळा असेल.

पण.. हे नक्की कशाशी खायचे..? कारण नुसतेच खायचे म्हटले तर बरेच करावे लगतील ना..?

कमी लोक (म्हणजे दोनच जण) असतील तर करायचा पदार्थ आहे हा रात्री च्या जेवणाला........