Submitted by आनंदयात्री on 3 May, 2008 - 05:50
(गझल पूर्ण झाल्यावर दुसरा मतला सुचला, तो ही सध्या लिहिलाय इथे)
एकमेकांचाच दोघा भार होता
दाखवाया तो सुखी संसार होता
यौवनाचा मांडला बाजार होता
पाहणार्याचा म्हणे व्यभिचार होता!
घास माझा पाहुण्यासाठी दिलेला
जीवनाचा हाच पाहुणचार होता
दु:ख अवघे मोजणे जमणार कैसे?
आसवांना का कधी आकार होता?
अर्थ इतके का भिनावे जीवघेणे?
शब्द सुटलेला जरी हळुवार होता!
क्षत्रियांनी हक्क सारे मिरवलेले
सूतपुत्रच संगरी लाचार होता
मोकळे बोलून माझी पाठ फिरली
"हुश्श! गेला!" - हा तुझा उद्गार होता!
आज बहुधा सूर्य इकडे वाट चुकला
कालपावेतो इथे अंधार होता
मी अपेक्षा ठेवली ही चूक झाली
तेवढा माझा कुठे अधिकार होता?
ऐनवेळी हात अलगद सोडला तू
तोच उरलेला खुळा आधार होता
गुलमोहर:
शेअर करा
क्या बात
क्या बात है!
आनंदयात्री, खूप सुंदर लिहिलं आहे. 'हळुवार शब्द', 'आसवांचा आकार', 'सूर्य', हे शेर विशेष आवडले. 'उद्गार' तर फारच!
खूप छान!
-सतीश
मस्त
मस्त ....
खुपच छान, सगळेच शेर आणि दोन्ही मतले आवडले.
आसवांना , शब्द सुटलेला , "हुश्श! गेला!", आज बहुधा सूर्य हे जास्त आवडले.
सुधीर
भार,
भार, उद्गार हे शेर फार आवडले! शेवटचे २ शेरही सहज आले आहेत. अभिनंदन आनंदयात्री!
मी_आनंदयात
मी_आनंदयात्री, (ह्या तुमच्या आयडीला कायतरी शॉर्टफॉर्म शोधतेय....) जबरदस्त गजल आहे. सुरूवातीपासूनच जोरदार आहे.
एकमेकांचाच दोघा भार होता
दाखवाया तो सुखी संसार होता
दु:ख, शब्द, हुश्श आवडलेच... कालपावेतो- मस्तच शब्दप्रयोग... समोर बसून ऐकवल्यासारखा.
खरच खूप आवडली.
अर्थ इतके
अर्थ इतके का भिनावे जीवघेणे?
शब्द सुटलेला जरी हळुवार होता!
आज बहुधा सूर्य इकडे वाट चुकला
कालपावेतो इथे अंधार होता
दु:ख अवघे मोजणे जमणार कैसे?
आसवांना का कधी आकार होता?
मी अपेक्षा ठेवली ही चूक झाली
तेवढा माझा कुठे अधिकार होता?
हे आवडले
----------------------------------------------------------------------
गझल म्हणावी तितकी सफाईदार वाटत नाही आनंदयात्री...
तुमच्या इतर गझलांइतकी ही तितकीशी आवडली नाही.
मुळात 'आर' हा गुळगुळीत काफिया असणे हे त्यामागचे एक कारण असावे.
एकमेकांचाच दोघा भार होता
दाखवाया तो सुखी संसार होता
अजून चांगल्या रितीने पेश करता येईल का?
'दोघांना' मुळे प्राप्त होणारा सफाईदारपणा 'दोघा' मध्ये नाही. शब्दांचे संक्षिप्त रूप (दोघा, दाखवाया) गझलेला थोडेबहुत तडजोड करण्यास लावतेच.
दुस-या शेराची अजिबातच गरज नाहीये. नेमके काय म्हणायचे आहे आणि का म्हणायचे आहे हे कळले नाही.
ऐनवेळी हात अलगद सोडला तू
तोच उरलेला खुळा आधार होता
'खुळा' हा शब्द भरीचा वाटतोय.
घास माझा पाहुण्यासाठी दिलेला
जीवनाचा हाच पाहुणचार होता
अश्या आशयाचे बरेचसे शेर मराठी आणि उर्दूही गझलेत लिहून लिहून अर्थहीन झाले आहेत.
क्षत्रियांनी हक्क सारे मिरवलेले
सूतपुत्रच संगरी लाचार होता
दावा आणि दलील ह्यांच्यामधले रिलेशन इथे तितकेसे न्यायोचित होत नाही. किंबहुना पटत नाही. 'सुतपुत्र' लाचार होता हे काही पटले नाही.
नशिबासमोर दोन हात करून उभे राहायची हिंमत करणा-याला 'लाचार' नाही म्हणता येणार.
मोकळे बोलून माझी पाठ फिरली
"हुश्श! गेला!" - हा तुझा उद्गार होता!
"हुश्श! गेला!" हे काही भावले नाही मनाला. शेर बोलका करण्याच्या प्रयत्नात फसल्यासारखा वाटतो. त्याच्याऐवजी दुसरा काही 'उद्गार' वापरता येईल
का? 'हुश्श!' , 'उफ!' , 'आह!' असे शब्द गझलेच्या प्रकृतीला तितकेसे मानवत नाहीत. किंबहुना अशी 'मेकअप' टाळता आल्यास उत्तम.
अर्थात वरील सर्व मते माझी वैयक्तीक मते आहेत. चूकही असू शकतील. तुमच्या ह्यापूर्वीच्या ब-याचश्या गझला मनात ठाण मांडून बसल्या आहेत. त्यामानाने ही गझल जराशी कमजोर वाटली इतकेच. म्हणूनच सविस्तर लिहावेसे वाटले.
चू.भू.दे.घे.
शुभेच्छा!!!
व्वा..........
व्वा.......... आति उत्तम सर्व शेर बढीया यॉवनाचतिल मतितार्थ आवडला.
गझल आवडली
गझल आवडली ...
सतीश,
सतीश, सुधीर, पुलस्ती. दाद, मयूर, आरती, संदीप...
सर्वांना धन्यवाद....
काळ्जाला
काळ्जाला भिडली.
नरेन्द्र