अविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१०

Submitted by अनिकेत आमटे on 20 August, 2010 - 07:57

अविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१०
समीक्षा (माझी पत्नी) आमच्या ११ दिवसांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन ४ ऑगस्ट रोजी २ महिने आराम करण्यासाठी माहेरी पुण्याला गेली. नागपूरला डॉ.मंगला केतकर यांच्या दवाखान्यात २४ जुलै २०१० ला तिने बाळाला जन्म दिला. तिला व मुलाला ४ तारखेला ला संध्याकाळी नागपूरला रेल्वे स्टेशनवर सोडले. सोबत तिची आई होती.
५ तारखेला सकाळी १० वाजता नागपूरहून परत घरी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे जाण्यास निघालो. नागपूर ते हेमलकसा जवळपास ३५० किलोमीटर अंतर आहे. वाटेत बाबा आमटेंची मुख्य कर्मभूमी आनंदवन लागत. ते नागपूरहून १०० किलोमीटर आहे. १२ वाजता तिथे पोहोचलो. आजीची (साधनाताई आमटे) भेट घेतली. काका-काकूंना भेटलो आणि सुमारे १ वाजता पुढील प्रवासासाठी निघालो. टाटा सुमो गाडी होती. मी आणि चालक दोघच. सोबतीला दवाखान्याची औषधे आणि शाळेतील मुलांच्या सामानाची खरेदी (प्रकल्पात लागणाऱ्या सर्व सामानाची खरेदी नागपुरातून केल्या जाते). गाडी खचाखच भरली होती. दोन समोरच्या सीट्स फक्त मोकळ्या होत्या चालक आणि माझ्यासाठी. २ वाजता चंद्रपुरात पोहोचलो. नुकतीच पावसाला सुरवात झाली होती. हळूहळू गाडीचा आणि पावसाचा वेग वाढू लागला. सुमारे ४ वाजताच्या सुमारास आम्ही आमच्या लोक बिरादरी नागेपल्ली या प्रकल्पात पोहोचलो. अजून पुढे ६० किलोमीटर हेमलकसा होते.
नागेपल्ली प्रकल्प हा शेती प्रकल्प आहे. तिथे जगन मचकले नावाचे आमचे कार्यकर्ते राहतात. २५ एकर जमीन आहे. तिथे येणारे थोडेफार भाजीपाल्याचे उत्पन्न हेमलकसा च्या शाळेसाठी वापरले जाते. हेमलकसा प्रकल्पाच्या सुरवातीच्या काळात आनंदवन ते हेमलकसा एका दिवसात पोहोचणे केवळ अशक्य होते, कारण नागेपल्ली नंतर रस्ताच नव्हता. हे ६० किलोमीटर अंतर जाण्यासाठी प्रचंड घनदाट जंगल, नद्या, अनेक ओढे तुडवत चालत किंवा सायकलने जावे लागायचे. २ दिवस त्यात जायचे. म्हणून आनंदवन येथून येणारा माणूस किंवा बाबा-आजी पहिल्यांदा नागेपल्ली ला मुक्काम करायचे. आनंदवन ते नागेपल्ली छोटा रस्ता होता. त्यामुळे तिथ पर्यंत गाडी येऊ शकत होती. सुमारे १२ वर्ष हा त्रास झाला. सुरवातीचे १२ वर्ष पावसाळ्यानंतरचे ६ महिने जगाशी कसलाही संपर्क नसायचा. जगन मचकले त्या काळात आनंदवनातील निरोप घेऊन चालत किंवा सायकलने हेमलकसाला यायचा. तसेच इकडचा निरोप तिकडे पोहोचवायचा. खूप पाऊस असलाकी ते पण शक्य होत नसे. असो.
नागेपल्ली प्रकल्पात चहा कॉफी घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. पावसाचा वेग प्रचंड वाढला होता. गाडीचे वायपर सुरु होते पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. त्यामुळे चालकाला गाडी अगदी हळू चालवावी लागत होती. तसाही रस्ता अतिशय फुटला असल्याने गाडी काही ५० च्यावर नेता येत नाहीच. ही सार्वजनिक बांधकाम विभागाची कृपा भारतात अनेक ठिकाणी आढळून येईल. नागेपल्लीहून सुमारे ४० किलोमीटर दूर एक कुडकेली नावाचे गाव आहे. त्या गावाच्या शेजारून एक ओढा वाहतो. त्याला कुडकेली चा नाला म्हणतात. तिथ पर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. ४० किलोमीटरचे अंतर आम्ही ९० मिनटात कापले. ओढ्यावर अगदीच लहान पूल होता. इकडे आम्ही त्याला रपटा म्हणतो. नागेपल्ली प्रकल्पातून निघतांना मनात धाक-धुक होतीच. इतका पाऊस पडतो आहे तर कदाचित आपण १० रपटे असलेल्या या रस्त्यावर कुठेतरी अडकू. आणि झालेही तसेच. कुडकेलीचा नाला प्रचंड वेगात रपटयाच्या सुमारे ३ फूट वरून वाहत होता. आमच्या आधी २ सरकारी बसेस तिथे येऊन थांबल्या होत्या. संध्याकाळचे ६ वाजले होते. पावसाचा जोर कमी झाला होता. सुमारे ६.३० वाजता पुलावरील पाणी १ फुटाने खाली गेले. मग एका बस चालकाने त्या २ फूट पाण्यातून बस काढली. माझ्या सोबत असलेला चालक थोडा घाबरत होता गाडी काढायला. आमची गाडी तशी छोटी होती. त्याला भीती वाटणे स्वाभाविक होते. मग मी त्याला बाजूला बसविले आणि गाडी चालू केली. पाणी जरी कमी झाले होते तरी जोर खूप होता प्रवाहाचा. गाडी बंद पडणे धोकादायक ठरू शकते हे माहित होते. लहानपणी अश्या अनेक प्रसंगातून बाबाने (प्रकाश आमटे) रस्ता, पूल नसतांनाही गाडी काढलेली आम्ही पहिले होते. जर अजून आपण इथे जास्त वेळ घालवला तर पुढील सर्वच ओढे आपल्याला अडवतील आणि इथेच अडकून पडावे लागेल. आधी २ वेळा चालत जाऊन मी तो पूल व्यवस्थित आहे का? की वाहून गेलाय याची नीट खात्री करून घेतली. मग संपूर्ण विचार करून मी गाडी पुढे न्यायला सुरवात केली. गाडीचा वेग वाढविला. माझी गाडी २ फूट उंच पाण्याची धार कापत दुसऱ्या तीरावर सुखरूप पोहोचली. ७०-८० फुटाचे ते अंतर होते. मध्ये एके ठिकाणी प्रवाहामुळे गाडी थोडी जास्त हलल्याचे जाणविले एवढेच. गाडी जोरात नेल्याने ओढ्याचे पाणी जोरात समोरील काचेवर आपटत होते. गाडी सुखरूप निघाल्याचा आम्हा दोघानाही आनंद झाला. पण धाक-धुक होतीच. पलीकडच्या तीरावर पोहोचल्या बरोब्बर पावसाने परत कोसळण्यास सुरवात केली. तसेच आम्ही पुढे निघालो. पुढे १० किलोमीटर वर ताडगाव नावाचे छोटे खेडे लागते. तिथून २ किलोमीटर अंतरावर पुन्हा एक छोटा ओढ वाहतो. त्या ओढ्याचे नाव ताडगाव नाला. ताडगाव पार करून आम्ही हेमलकसाच्या दिशेने पुढे निघालो. तेव्हा संध्याकाळचे ७ वाजले होते. आता १० किलोमीटर दूर होते घर. २० मिनिटांचा वेळ लागणार होता. दोघानाही चांगलीच भूक लागली होती. कधी घरी पोहोचतोय असे झाले होते. पण ताडगाव नाल्याजवळ येताच गाडी थांबवावी लागली. हा ओढाही फुगला होता. अंधार पडला होता म्हणून नेमके त्या पुलावरून किती फुट पाणी वाहतंय याचा अंदाज घेता येत नव्हता. पावसाचा वेग काही केल्या कमी होईना. तो वाढतच होता. अंधारात गाडी पुलावरून पाणी असतांना नेणे धोकादायक होते. म्हणून आम्ही दोघे गाडीत बसून पाऊस कमी होण्याची वाट पाहायला लागलो. पाऊस पडत असल्याने पुलावरील पाण्याची पातळी चांगलीच वाढल्याचे आम्हाला गाडीच्या दिव्याच्या प्रकाशात दिसले. आणि आज घरी काहीही केले तरी पोहोचता येणार नाही याची खात्री झाली. रात्रीचे ८ वाजले होते. पोटात कावळे बोंबलत होते. मग विचार केला की ताडगाव गावात जाऊन एखादे दुकान किंवा छोटे हॉटेल सुरु असेल तर काहीतरी खाऊन यावे. म्हणून गाडी वळवली. ताडगाव ची हद्द जिथे संपते तिथलाही ओढा आता प्रचंड वेगाने पुलाच्या वरून वाहायला लागला होता. त्यामुळे गावात जाणे पण अशक्य झाले होते. २ किलोमीटरच्या अंतरा मध्ये आणि २ ओढ्यांच्या मध्ये आम्ही अडकलो होतो. परत गाडी वळवली आणि ताडगाव नाल्या जवळ येऊन थांबलो. अतिशय शांत जंगलात, निर्मनुष्य जागी आणि प्रचंड काळोखात माझी गाडी उभी होती. फक्त आवाज होता तो पावसाचा. गाडीच्या पत्र्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांचा. त्या घनदाट जंगलात मी आणि चालक नामदेव असे दोघच होतो अडकलेलो. सरकारी बस चालकाने बस आधीच ताडगाव मध्ये उभी केली होती. त्यात ७-८ प्रवासी होते. ते गावात अडकल्याने सुखी होते. आता आम्हाला गाडीतच बसल्या सीटवर झोपावे लागणार होते. ते ही उपाशी. तेवढ्यात मला आठवलेकी नागेपल्ली प्रकल्पातून मुक्ताकाकू (जगन मचकले यांची पत्नी) ने मला आवडतो म्हणून चिवडा दिला होता. मग त्या चिवड्यावर आम्ही ताव मारला आणि तो फस्त केला. त्याने काही पोट भरले नाही. पण पोटाला आधार मिळाला. आता अजून गाडीत काहीही खायला नव्हते. आणि तसेच झोपावे लागणार होते. मग आम्ही दोघेही झोपायचा प्रयत्न करू लागलो. प्रवासाचा थकवा असल्याने अधे-मध्ये झोप लागत होती. कशी बशी रात्र ओसरली. सकाळी ६ वाजता सुद्धा पाऊस सुरु होता. पण रात्रीपेक्षा थोडा जोर कमी झाला होता. ६ ऑगस्ट हा माझा वाढ दिवस असतो. अर्थात मी कधीही तो साजरा करत नाही. पण अनेकांचे फोन, ईमेल आणि मोबाईल वर संदेश येत असतात. संवाद साधण्याचे हे एक निमित्त मिळते एवढेच. आधीच पावसामुळे इकडील फोन आणि वीज गेले ७-८ दिवसांपासून बंदच होती. नागेपल्ली प्रकल्पा पर्यंत फोन आणि वीज नीट सुरु होती. मी परत आलो नाही म्हणजे मी कुठेही अडकलो नाही असे नागेपल्ली मध्ये राहणाऱ्या लोकांना वाटले आणि इकडे आई-बाबांना वाटले की मी नागेपल्ली येथे पाऊस असल्याने थांबलो असेन. दोन्ही कडील लोक असा विचार करून सुखी होती. फोन बंद होता हे बरेच झाले. नाहीतर नागेपल्ली येथून हेमलकसाला मी कुठे आहे हे कळले असते आणि इकडे आई-बाबा आणि इतरांना काळजी लागून राहिली असती. उठल्या बरोब्बर मी नाला चालत पार करून पाहून आलो. दरवर्षी प्रमाणे या वर्षीपण या ओढ्यावरील निकृष्ट दर्जाचा सिमेंट कॉन्क्रेट चा स्लाब वाहून गेला होता. पुलावर ८ फूट रुंद आणि सुमारे दीड फूट खोल असा मोठा खड्डा पडला होता. असे काही होईल याची खात्री होती म्हणूनच रात्री गाडी काढायचा मी प्रयत्न केला नाही. अजूनही त्या पुलावर ३ फूट पाणी होते. ते पाणी पूर्ण पणे उतरे पर्यंत गाडी काढणे शक्य नव्हते. सकाळी ६ ला कमी झालेल्या पावसाने ८ वाजता परत जोर धरण्यास सुरवात केली. म्हणून आम्ही लगेच गाडी वळवली आणि ताडगाव ला जावून काहीतरी खायला मिळतंय का ते पाहू असे ठरविले. ताडगाव जवळील नाला ओसरला होता. परत भरण्या आधी ताडगाव ला जाणे गरजेचे होते. गावात पोहोचलो. पण सर्व हॉटेल्स बंद होती. विचारले असता पावसात आम्ही काहीही करत नाही असे उत्तर मिळाले. तेवढ्यात माझा लोक बिरादरी शाळेतील जुना माडिया मित्र जुरू मला भेटला. तो सध्या शाळेत शिक्षक आहे. त्याने आम्हाला घरी जेवायला घातले. २४ तासाच्या उपासानंतर आम्हाला जेवायला मिळाले होते. मी त्याचे आभार मानले. मला माहिती होते की जुरू इथे राहतो. पण उगाच कोणालाही आपल्यामुळे त्रास नको म्हणून मी त्याच्या घरी गेलो नाही. त्याने मला गाडीत बसलेला पाहिले. आणि घरी जेवायला येण्याचा खूप आग्रह केला. मला आणि मुख्य म्हणजे चालकाला जास्त भूक लागली होती. म्हणून का-कु न करता सरळ त्याच्या कडे आम्ही जेवायला गेलो. अतिशय साधी झोपडी होती त्याची. बायको २ मुलं असा परिवार. मी त्यांच्या कडे जेवतोय यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांना खूपच आनंद झाला आहे हे स्पष्टपणे त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होत. दुपारी सुमारे १२ वाजता आम्ही त्याच्या कडे जेवलो. पाऊस कमी होण्याचे नाव घेत नव्हता. आज अडकलात तर इकडे आमच्या कडेच रात्री जेवायला आणि झोपायला या असा जुरू सतत आग्रह करीत होता. आम्ही १ वाजता परत गाडीत जाऊन बसलो आणि ताडगाव नाल्याजवळ येऊन थांबलो. ओढ्यावर पाणी तेवढेच होते. पाणी ओसरल्यावर पुलावरील खड्डा भरावा लागणार होता. तेव्हाच कुठे आमची गाडी निघणार होती. पाऊस थांबायची वाट आणि नाल्यावरील पाणी ओसरायची वाट पाहण्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. ६ तारखेची रात्र पण इथेच घालवावी लागणार हे जवळ जवळ निश्चित झाले होते. जुरुने आग्रह केल्याने आम्ही रात्रीचे जेवण त्याच्या कडेच केले. भात आणि आता थोडे वरण असे साधे त्यांचे जेवण असते. त्यात कधी कधी मासोळी किंवा चिकन चे तुकडे असतात. मी खात नाही म्हणून त्याने साधे जेवण केले. कोंबडी कापुका म्हणून त्याने विचारले होतेच. रात्रीचे जेवल्यावर आम्ही गाडीतच झोपलो. त्याचे घर लहान. जागा कमी. म्हणून आम्ही गाडीतच झोपणे पसंत केले. ६ ची रात्र पण तशीच गाडीत झोपून काढली.
६ ला रात्री १२ नंतर पावसाने विश्रांती घेतली. सकाळी ६ वाजता नाल्याचे पाणी पुलाच्या खाली गेले होते. आता तो पुलावरील खड्डा स्पष्ट दिसत होता. लगेच आम्ही दोघं दगड गोळा करून तो खड्डा बुजवायला लागलो. ४५ मिनिटात गाडी जाईल एवढा खड्डा आम्ही बुजविला. आणि लगेच गाडी काढली. कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. हेमलकसाच्या आधी ४ किलोमीटर वर कुमार्गुड्याचा नाला आहे. त्या नाल्यावरचा पुलाच्या स्लाब चा एक भाग वाहून गेला होता. पण एका बाजूने आम्हाला गाडी काढता आली. हा पूल रपटा एक वर्षा पूर्वीच नवीन बांधला होता. असो.
शेवटी ७ तारखेला ७.१५ मिनिटांनी आम्ही हेमलकसात पोहोचलो. घरी आल्यावर ही कथा सर्वांना सांगितली. २ दिवसांची आंघोळ घरी आल्याबरोब्बर आटोपली. चालकाने पहिले जेवणे पसंत केले. ५-६ ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये २५ सेंटी मीटर पाऊस झाला या भागात. हेमलकासाचे स्वरूप ४ दिवस बेटा सारखे झाले होते. हेमलकसा पासुन ३ किलो मीटर असलेल्या ३ नद्यांना प्रचंड पूर आला होता. त्याचे पाणी हेमलकसाच्या कुंपणा पर्यंत आले होते. सर्व बाजूने लोक बिरादरी प्रकल्पाला पाण्याने वेढा दिला होता. ५-७ वर्षांनी एवढा पूर या भागात अनुभवायला मिळाला.
हे लिहायचे कारण: असा अविस्मरणीय अनुभव मला पहिल्यांदाच आला. तो तुमच्या बरोबर शेअर करावा असे वाटले.

अनिकेत प्रकाश आमटे
संचालक, लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा
मो. ९४२३२०८८०२
www.lbphemalkasa.org.in
www.lokbiradariprakalp.org
Email: aniketamte@gmail.com

गुलमोहर: 

निसर्ग आणि 'यंत्रणा' याविरुद्ध च्या लढाई साठी शुभेच्छा!

दरवर्षी प्रमाणे या वर्षीपण या ओढ्यावरील निकृष्ट दर्जाचा सिमेंट कॉन्क्रेट चा स्लाब वाहून गेला होता.>> यंत्रणेत बदल व्हावा यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का? याबद्दल चा अनुभव जरुर सांग.

>>>ही सार्वजनिक बांधकाम विभागाची कृपा भारतात अनेक ठिकाणी आढळून येईल.>>
अगदी खरं आहे..
खरोखरच अविस्मरणीय अनुभव.... सार्वजनिक बांधकाम विभागाची (अव)कृपा आपल्या वाट्याला आली याबद्दल वाईट वाटले, परंतु आपण सुखरुप घरी पोहोचलात यामुळे बरेही वाटले..
या निमित्ताने आपण जोडलेल्या माणसांच्या घरी पाहुणचार घेता आला... ही देखील एक चांगली बाब आहे...

अनिकेत, वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा.. Happy
कोकणातला पाऊस अनुभवला असल्याने भयंकर पावसात अडकल्यावर काय होत असेल ह्याची थोडीफार कल्पना आली. तुमचे हेमलकशाचे अनुभव वाचायला आवडतील.. !

फक्त,
अर्थात मी कधीही तो साजरा करत नाही. पण अनेकांचे फोन, ईमेल आणि मोबाईल वर संदेश येत असतात. संवाद साधण्याचे हे एक निमित्त मिळते एवढेच. >>>>
पण उगाच कोणालाही आपल्यामुळे त्रास नको म्हणून मी त्याच्या घरी गेलो नाही. >>>>>
मुख्य म्हणजे चालकाला जास्त भूक लागली होती. >>>>
२ दिवसांची आंघोळ घरी आल्याबरोब्बर आटोपली. चालकाने पहिले जेवणे पसंत केले. >>>>>
ही वाक्ये थोडीशी खटकली..

अनिकेत,
तिकडे राहायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टिना समोर जावेच लागते.
पण त्याचं काय ना! आपल्याला हे सगळं आता अंगवळणी पडलयं.

२ दिवसांची आंघोळ घरी आल्याबरोब्बर आटोपली. चालकाने पहिले जेवणे पसंत केले.>> हे सत्य आहे. आपल्याकडचं जगणचं निराळं आहे.

आमच्या कुडकेल्लीच्या नाल्यानी तुला अडवुन नाही धरलं याचं बरं वाटलं.

तिथे अडकला असतास तर तुझं काही खरं नव्हतं. (कारण मधे काहिच सोय नाहिये)

दोन दिवस असं अडकून रहाणं, भुकेल्या पोटानं तसंच गाडीत अंग खुरमडून झोपणं..... शहरी आयुष्यात अशा घटना फारच क्वचित अनुभवायला मिळतात.

हम्म!! खरंच अविस्मरणीय. वाचतानाच जाणवतय... अनुभवणं तर अजून अवघड असेल.
शहरात ज्या गोष्टी अगदी क्षुल्लक म्हणून गृहित धरल्या जातात त्याकरताही केवढा संघर्ष. >> अगदी बरोबरय!!

.

बरे झाले तुम्ही तुमचे अनुभव इथे मांडायला सुरुवात केली. सर्वसामान्य लोकांना त्यामुळे तुमची, तुमच्या कार्याची व पर्यायाने त्या भागाची अजून चांगली माहीती होईल. तुम्हाला शुभेच्छा. इथे लिहीत रहा.

ही सार्वजनिक बांधकाम विभागाची कृपा भारतात अनेक ठिकाणी आढळून येईल<<<<<<<:अरेरे:
सर्वसामान्य लोकांना त्यामुळे तुमची, तुमच्या कार्याची व पर्यायाने त्या भागाची अजून चांगली माहीती होईल.<<<<<<अनुमोदन.

बरे झाले तुम्ही तुमचे अनुभव इथे मांडायला सुरुवात केली. सर्वसामान्य लोकांना त्यामुळे तुमची, तुमच्या कार्याची व पर्यायाने त्या भागाची अजून चांगली माहीती होईल. तुम्हाला शुभेच्छा. इथे लिहीत रहा.>>>अनुमोदन Happy

आमटे परिवाराबद्दल नेहेमीच आदर वाटतो. नवीन जनरेशनपण वेगवेगळ्या गैरसोयी आणि संकटातून जाऊनसुध्दा आजीआजोबा, आईवडिल यांचा वारसा चालवत आहेत ह्याबद्द्ल कौतुक वाटलं.

लिखाणातून दोन दिवस अगदी डोळ्यासमोर उभे केलेत.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! बाबा झाल्याबद्दल तुमच अभिनंदन! बाळाला आशिर्वाद.

अनिकेत वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाबा झाल्याच्या पण शुभेच्छा. साधनाआजींच्या पुस्तकात वाचले होते कि त्या जाताना पिठले भाकरी बरोबर नेत असत. त्याची खूप आठवण झाली. यंत्रणेशी झगडा हा कायमच आहे त्याबद्दल काय बोलणार. काळजी घ्या.

<<आमटे परिवाराबद्दल नेहेमीच आदर वाटतो. नवीन जनरेशनपण वेगवेगळ्या गैरसोयी आणि संकटातून जाऊनसुध्दा आजीआजोबा, आईवडिल यांचा वारसा चालवत आहेत ह्याबद्द्ल कौतुक वाटलं. >>
अनुमोदन!!

अनिकेत, खरच असे प्रसंग आपल्याला अविस्मरणीय अनुभव देऊन जातात.. असेच अनुभव इथे मांडत रहा..

अनिकेत, खरच असे प्रसंग आपल्याला अविस्मरणीय अनुभव देऊन जातात.. असेच अनुभव इथे मांडत रहा..

अनिकेत एक थरारक अनुभव, आमटे कुटुंबाची पूण्याई बरोबर होती म्हणुन निभावलं पण त्याबरोबर तुमचं धाडसही आहेच...वाढ्दिवसाच्या शुभेच्छा आणि चाराचे सहा झाल्याबद्दल अभिनंदन.
एक सांगावंस वाटतं असेच बाबांचे (बाबा आमटे)काही मजेशीर....थरारक....प्रसंगावधान.......किंवा त्यांच्या कार्याचे ..... जे तुम्हाला माहिती आहेत पण सर्वानाच माहिती नाहित असे किस्सेही लिहिलेत तर आम्हाला आवडेल वाचायला (निर्णय तुमचा आहे) Happy

खरंच अविस्मरणीय प्रसंग... अनिकेत तुम्ही परीणामकारकरीत्या आमच्यासमोर मांडलाय.

वरच्या काही प्रतिक्रिया वाचून असं मनात आलं की अश्या प्रकारच्या दळणवळणाच्या समस्या आम्हा शहरींनाही अनुभवायला लागतातच की.. त्यासाठी २६ जुलैचं उदाहरण पुरेसं आहे. त्याआधीही आणि नंतरही पावसाळ्यात अश्या प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याची वेळ अनेकदा आली आहे. केवळ पावसाळ्यातच नाही तर एरवीही रस्ताबांधणी, पूलबांधणीची कामं चालू म्हणून प्रवासाची दैना असतेच. लोकलमधून प्रवास करणार्‍यांच्या समस्या आणि रस्त्यावरून खाजगी गाड्या, बस, टॅक्सी, रीक्शा इत्यादींमधून प्रवास करणार्‍यांच्या समस्या त्यांच्यासाठी मोठ्या आहेतच. पुण्यात वाहतुकीची समस्या कायमचीच आहे. हे सगळं अंगवळणी पडलंय असं म्हणणंही आमच्या अंगवळणी पडलंय. त्यामुळे वरचा प्रसंग 'एक अनुभव' म्हणून मांडलाय तो तसाच असू दे, त्यात पुन्हा शहरी-ग्रामीण तुलना नको हे माझं मत.

मंजुडी अनुमोदन. पुण्यात तर रोजच बसला लटकलेले लोक सगळीकडेच दिसतात. नेहमीच यंत्रणेचा दोष असतो असेही नाही. माणसांचे लोंढे येउन आदळतात आणि यंत्रणा कोलमडुन पडते. ओद्योगिक विकासाचे विकेंद्रीकरण,लोकसंख्या नियंत्रण यातुन प्रश्न सुटु शकतील. 'आम्ही आमच्या मुलांना दोन वेळचे खायला घाययला समर्थ आहोत, वाटेल तितकी मुले जन्माला घालु, कुटुंब नियोजन करा शिकवणारे तुम्ही कोण?' असा हेकेखोरपणा सामान्यमाणसानेपण सोडला पाहिजे.

बरे झाले तुम्ही तुमचे अनुभव इथे मांडायला सुरुवात केली. सर्वसामान्य लोकांना त्यामुळे तुमची, तुमच्या कार्याची व पर्यायाने त्या भागाची अजून चांगली माहीती होईल. तुम्हाला शुभेच्छा. इथे लिहीत रहा.>>>
मवा, कविता नवरे आणि वैभव आयरेंना अनुमोदन Happy

आमटे परिवाराबद्दल नेहेमीच आदर वाटतो. नवीन जनरेशनपण वेगवेगळ्या गैरसोयी आणि संकटातून जाऊनसुध्दा आजीआजोबा, आईवडिल यांचा वारसा चालवत आहेत ह्याबद्द्ल कौतुक वाटलं.>>> अनुमोदन...

पाणी जरी कमी झाले होते तरी जोर खूप होता प्रवाहाचा. गाडी बंद पडणे धोकादायक ठरू शकते हे माहित होते.>>> असा धोका पत्करणे खुपदा अंगाशी येते... आणि तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे त्यासाठी तरी अस पुन्हा करु नका... प्लिज...

शुभेच्छा....

http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=118385&boxid=12147421&pgno=1&u...