तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

Submitted by ह.बा. on 26 July, 2010 - 04:53

तुझ्याहून मोठा गुन्हेगार आहे
तुला लोकशाही नमस्कार आहे

जरी देश दिसला कफल्लक तुला हा
तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

किती मर्द झिंगून मेले तरीही
बुळ्याचीच बाईल गरवार आहे

कसे लोकसंख्या नियंत्रण करावे
घरी लोड शेडींग... अंधार आहे!!!

अशी टाळते का मला भेटणे ती?
(तिला मी असे काय करणार आहे?)

तिला मारले अन हिचा रेप झाला
तिलाही मलाही भिती फार आहे

कसा माग काढू खर्‍या माणसांचा
कुणाच्या घराचे खुले दार आहे?

-ह. बा.

गुलमोहर: 

अगदी खरे! भटसाहेबांनी बाराखडी लिहीली नसती तर आजही आपण पाडगावकरी तुपटपणाला गझल म्हणत बसलो असतो आणि त्यांचे 'मीच खरा, मीच खरा' वाले अनुयायी तयार झाले असते.

ज्ञानेश यांनी म्हंटल्याप्रमाणे ही रचना हझल अजिबात नाही, ती गझल मात्र नाही हे खरे!

सामुहिक नियमावली - ही होणे शक्य नाही याचे कारण 'सुरेश भट' या नावापुढे जायची भीती वाटते सगळ्यांना! वैयक्तीक नियमावली होऊ शकते. भटसाहेबांनी जे सांगीतले नाही ते 'नाहीच' किंवा 'ते असलेच पाहिजे असे नाहीच' अशी भूमिका घाबरलेले निष्ठावान घेत राहतात.

मात्र, अशी नियमावली निश्चीत तयार होईल.

-'बेफिकीर'!

सामुहिक नियमावली - ही होणे शक्य नाही.

मग एखाद्या रचनेला ती हझल आहे, असे सुप्रिम कोर्टाच्या निवाडा दिल्याच्या आवेशात भाष्य कसे काय केल्या जाऊ शकते.....???????????

ज्याची नियमावली नाही त्यावर अधिकारात्मक भाषेत भाष्य केले जाऊ शकत नाही.
(माझ्याशी असहमत असलेल्यांनी कायदेतज्ज्ञांना विचारून पहावे.)

फक्त मतप्रदर्शित केले जाऊ शकते.सुचना केल्या जाऊ शकतात. फार तर शंका उपस्थित केल्या जाऊ शकतात.

अधिकारवाणीचा वापर केला जाऊ शकत नाही.

एखाद्याला उद्देशून लिहिण्याएवढा मी खुजा नाही.

गेल्या सहा महिण्यात गझलेच्या क्षेत्रात मी जे पाहतो आहे त्याआधारे मी हे लिहितो आहे.

संपुर्ण गझल जगतात जे या तर्‍हेने वागलेत/वागतात/वागतील त्या सर्वांना उद्देशून आहे.

त्यात लहान-मोठा,श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव अजिबात नाही. Happy

मूळ गझलेपेक्षा ईथले प्रतिसाद अधिक "हजल (जबाबी)" वाटतात..
ह.बा:
गझल, हजल, वगैरे गोष्टींन्पेक्षा मला तुमच्या गझल्/कवितेतील आशय अधिक महत्वपूर्ण वाटला, आवडला. विशेषतः या ओळींतील विरोधाभास, ऊपहास, मर्म छानः
>>तिला मारले अन हिचा रेप झाला
तिलाही मलाही भिती फार आहे

माझ्या मते या रचनेचे नाव "लोकशाही" असेही अधिक समर्पक ठरेल.

>>सामुहिक नियमावली - ही होणे शक्य नाही याचे कारण 'सुरेश भट' या नावापुढे जायची भीती वाटते सगळ्यांना! वैयक्तीक नियमावली होऊ शकते. भटसाहेबांनी जे सांगीतले नाही ते 'नाहीच' किंवा 'ते असलेच पाहिजे असे नाहीच' अशी भूमिका घाबरलेले निष्ठावान घेत राहतात.

बेफिकीर- ईथे नुकतीच "कल्ट" या बा.फ. वर झालेली चर्चा आठवली. (एकदा कळळ की कल्ट!) Happy

फक्त मतप्रदर्शित केले जाऊ शकते.सुचना केल्या जाऊ शकतात. फार तर शंका उपस्थित केल्या जाऊ शकतात.

गंगाधरजी,
तुमच्या मताशी पुर्ण सहमत आहे. गेल्या दोन महिन्यात मलाही असेच अनुभव आले. काही स्वयंघोषीत अनुभवी (विघ्नसंतोषी) गझलकारांमध्ये आपल्याशिवाय कुणी लिहूच नये अशी धारणा आणि गझलकारांना नावे ठेवणारी गझल लिहीली किंवा त्यांची मापे काढली की आपण मोठे गझलकार होऊ असा भ्रम निर्माण झाला आहे. मुळात ग्राम्य शहरी असे काहीतरी बोलून, नवीन गझलकारांच्या गझलांवर पान पान भर समिक्षा देऊन त्याला नाऊमेद करून पात्रता नसताना मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे.
आपण घेतलेली भुमिका योग्य आहे ती घ्यायलाही हवी. तणावर वेळीच उपाय केला नाही तर पिकाला मार बसतो.

योगजी,
आपला आभारी आहे.

<<<सामुहिक नियमावली - ही होणे शक्य नाही याचे कारण 'सुरेश भट' या नावापुढे जायची भीती वाटते सगळ्यांना! वैयक्तीक नियमावली होऊ शकते. भटसाहेबांनी जे सांगीतले नाही ते 'नाहीच' किंवा 'ते असलेच पाहिजे असे नाहीच' अशी भूमिका घाबरलेले निष्ठावान घेत राहतात.>>>

'सुरेश भट' या नावापुढे जाण्याची भिती सर्वांना वाटते हे सत्य आहे. त्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. जो मनुष्य चार पाचशे रचना अक्षरगणवृत्तात तंतोतंत रचतो, ज्याने मराठी ग़ज़लेला आजचे स्वरूप दिले, मराठी गज़लेची पातळी अगदी उंचावर नेली, शेकडो अनुयायी तयार केले; त्या मनुष्याच्या पुढे कोणी कसे जाऊ शकेल?

पण तरीही मला वैयक्तिकरित्या त्यांची काही मते पटत नाहीत.

१. 'गझल' हा उच्चार.
२. मात्रावृत्तात रचलेल्या ग़ज़लेला कनिष्ट समजणे.
३. मक्ता न वापरणे.

माझा हिन्दी-उर्दू ग़ज़लांचा गाढा अभ्यास नाही व सध्या वेळेअभावी मी करू इच्छित नाही. पण इन्शाअल्ला! आठ-दहा महिन्यांनी नक्की करेन.

बाकी सामुहिक नियमावली शक्य आहे. मात्र त्यासाठी सगळ्या ग्रूप्सनी एकत्र येऊन - सुरेश भटांची बाराखडी अंतिम आहे असे न समजता - काम केले पाहिजे. मांजरांच्या गळ्यात या घंटा कोण बांधणार?

<<जो मनुष्य चार पाचशे रचना अक्षरगणवृत्तात तंतोतंत रचतो, ज्याने मराठी ग़ज़लेला आजचे स्वरूप दिले, मराठी गज़लेची पातळी अगदी उंचावर नेली, शेकडो अनुयायी तयार केले; त्या मनुष्याच्या पुढे कोणी कसे जाऊ शकेल?>>

शरदजी, अगदी बरोबर.
आणि त्यासोबतच गझलेचा विस्तार व्हावा, जास्तीत जास्त नवकविंना ती लिहिता यावी म्हनुन सोप्या भाषेत बाराखडी लिहून ती प्रसारीत करण्यासाठी मनाच्या मोठेपणाला उत्तुंग उंची लागते. ती सुरेश भटांकडे होती म्हणुन ते महान झालेत.
सुरेश भटांपेक्षाही सुंदर गझला इतरांनी लिहिल्या तर त्यांचा आत्मा आनंदी होईल. मी खात्रीपुर्वक सांगू शकतो की त्यांच्या आत्म्याचा जळफळाट होणार नाही.
महानता यात असते.

म्हणुनच ज्यांना सुरेश भटांपेक्षाही मोठे व्हायचे असेल तर त्यांना प्रथम ही "उंची" गाठून ओलांडावी लागेल.

तरच ते जनमान्य होतील नाही तर स्वनामधन्यच....!!! Happy

रोचक चर्चा आहे ! Happy

एकदा आपली रचना प्रकाशित केल्यावर त्यावर येणारे बरेवाईट प्रतिसाद स्वीकारण्याची तयारी पाहिजे. अनुल्लेखाने मारले तरी राग, उल्लेखाने मारले तरी त्रागा.. हे चांगले नाही. सगळ्यांकडून कौतुकेच झेलायची असतील, तर आपल्या फॅन क्लबसमोर रचना सादर कराव्यात. ओपन फोरमवर कोणी कोणाला काय प्रतिसाद द्यावा हे तुम्ही ठरवू शकत नाही.

मी या रचनेला हजल म्हटले. याच्याशी मिल्या, आनंदयात्री, बेफिकीर आणि दस्तुरखुद्द कवी सहमत झाले. (दस्तुरखुद्द कवी आणि बेफिकीर यांनी विचारांती आपली सहमती मागे घेतली.) हबाने ही रचना हसवण्याच्या उद्देशाने लिहिलेली नाही, असे म्हटले आहे. पण मला एकंदर शेर विनोदी किंवा हास्योत्पादक वाटले, आणि आवडलेही ! काहींना ही हजल वाटत नाही. ही सर्व आपापली मते आहेत. यात "सुप्रीम कोर्टाचा निवाडा" कुठे आला?

'हजल' म्हणजे हसवणारी गझल. एवढे समजण्यासाठी नियमावलीचे पुस्तक कशाला पाहिजे? हजल ही हास्य्-व्यंगात्मक असली तरी शेवटी गझलच असते. आपल्या रचनेला मी हजल म्हटले म्हणजे काहीतरी गझलेपेक्षा हलके, दुय्यम म्हटले किंवा "अरे ही तर गझल नाहीच्चे" असे म्हटले असे समजू नये.

मुटे साहेब म्हणतात- "आदरनिय ज्ञानेशजींना फक्त नाउमेद करणारे किंवा अनुल्लेख करणे एवढेच जमते काय?"

मला काय जमते वा जमत नाही याच्याशी आपला संबंध नाही. तो या धाग्याचा विषयही नाही. यापेक्षा मूळ रचनेवर प्रतिसाद दिला असता तर जास्त बरे झाले असते. नाऊमेद करणार्‍या माणसाला उपहासनेही 'आदरणीय' म्हणायचे असेल, तर निदान तो शब्द तरी व्यवस्थित लिहावा.

बाकी आंतरजालीय गॉसिपिंग, ते आणि आपण, जुन्यांचा नव्यांवर अन्याय वगैरे जालीय चर्चांचे सदाबहार मुखशुद्धीछाप विषय आहेत. ते चालूद्या. आपण कल्टि.

आणि हो- नव्या नियमावलीसाठी सर्व संबंधितांना शुभेच्छा ! Wink

हजल ही हास्य्-व्यंगात्मक असली तरी शेवटी गझलच असते.
या माहितीबद्दल धन्यवाद!

बाकी आपणही वयक्तिक टीकेवरच लक्ष केंद्रीत केलेत. गझलेबाबत कशाही प्रतिक्रीया आल्या तरी चालतील हो. फक्त काही लोकांच्या प्रतिसादांनाच मी अशी उत्तरे देतो. तो त्यांचा अधिकारच आहे.
पण, मुळात वादसदृष्य चर्चेची सुरूवात किंवा मुद्दा ग्रामिण भाषेत लिहीलेली गझल म्हणजे हझल का? अशी होती. यावर बोलला असतात तर अधिक आनंद झाला असता.

चर्चा रोचक आहे तर मग पुन्हा थोडी पुढे वाढवू या. Happy

एकदा आपली रचना प्रकाशित केल्यावर त्यावर येणारे बरेवाईट प्रतिसाद स्वीकारण्याची तयारी पाहिजे.
हे वाक्य खालीलप्रमानेही लिहीता येते.

एकदा आपला प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यावर येणारे बरेवाईट प्रति-प्रतिसाद स्वीकारण्याची तयारी पाहिजे.

अनुल्लेखाने मारले तरी राग, उल्लेखाने मारले तरी त्रागा.. हे चांगले नाही.

प्रतिसादाची दखल घेतांना तो आहे तसा स्विकारला तर ठीक आणि पटत नसेल तर चिरफाड केली
तर त्रागा....... हे चांगले नाही.

सगळ्यांकडून कौतुकेच झेलायची असतील, तर आपल्या फॅन क्लबसमोर रचना सादर कराव्यात. ओपन फोरमवर कोणी कोणाला काय प्रतिसाद द्यावा हे तुम्ही ठरवू शकत नाही

कौतुके सोडून अन्य काही झेलायची तयारी नसेल, तर आपले प्रतिसाद आपल्या चार भिंतीच्या आडच बंदिस्त ठेवावेत. . ओपन फोरमवर कोणी कोणाच्या प्रतिसादावर काय प्रतिसाद द्यावा हे तुम्ही ठरवू शकत नाही.

मी भाषापण्डीत किंवा व्याकरणपंडीत नाही, हे मान्य करतांना मला अजिबात कमीपणा वाटत नाही. Happy

ज्ञानेशजी आदरणीय हा शब्द कसा लिहावा ते सांगितल्याबद्दल आभारी. (यातही तुम्हाला उपरोध शोधायचा असल्यास ती तुमची मर्जी. कृतज्ञता प्रकट केल्याचे समाधान माझ्यासाठी पुरेसे आहे.)

हजलेची व्याख्या माझ्या मते बरीचशी स्पष्ट झालेली आहे..... त्यामुळे ग्राम्य किंवा ग्रामीण भाषा वापरली म्हणजे ती हजलच असते असे नव्हे..... ही बाब खालील गझलेवरुन अजून स्पष्ट व्हावयास हरकत नाही.

श्रीकृष्ण राऊत यांनी ही गझल रचलेली आहे ....... गझल सागर प्रतिष्ठान ,मुंबई,संवेदना रायटर्स कंबाइन्स्,प्रभात किड्स्,दिशा कौटुंबिक सल्ला केंद्र अकोला,यांचे संयुक्त विद्यमाने अकोला येथे आयोजित फेब्रुवारी-२००४ मधील गझल कार्यशाळेत त्यांनी ती सादर केली होती.

तुह्या डोयात बसावं,माह्या जिवाले वाटते
नाही जगाले दिसावं,माह्या जिवाले वाटते

तोंड लपवण्यासाठी मले नाही कुठे जागा
तुह्या मनात लपावं,माह्या जिवाले वाटते

तुह्या मुचूक जगणं,वाटे जह्यराची पुडी
तुह्या संगंच मरावं,माह्या जिवाले वाटते

माह्या मनातलं गूज्,कसं मोठ्यानं मी बोलू?
तुह्या कानात सांगावं,माह्या जिवाले वाटते

माह्या नावापुढे मले,लावू वाटे तुहं नाव
तुहं नाव मिरवावं,माह्या जिवाले वाटते

- गझलकार श्रीकृष्ण राऊत.

ही गझल आपण http://mazigazalmarathi.blogspot.com/2010/01/blog-post_31.html इथे पाहू शकता.

डॉ.कैलास

राऊतांची ही रचना अक्षरछंदात आहे असे जाणवले. गझल अक्षरछंदात लिहीत नाहीत. मात्रा समान असल्या तरी!

(गझल म्हणजे व गझल व हझलही अक्षरछंदात लिहीत नाहीत.)

-'बेफिकीर'!

अनुल्लेखाने मारले???

हे वाचून खरच हसू आले. मला खरच हे माहीत नव्हते.

म्हणजे 'न मिळालेले प्रतिसाद' हे 'अनुल्लेखाने मारण्यासाठी असू शकतात' असे गृहीत धरता येईल का?

मग तर मी अनुल्लेखाने फारच वेळा मेलेलो आहे.

मला वाटायचे माझ्या रचना बर्‍यापैकी सामान्य असल्यामुळे त्यावर काही जण प्रतिसाद देत नसावेत. हा हा!

अर्थात, 'अनुल्लेखाने मारणे' हा विषय मी माझ्यावर ओढून घ्यायचे कारण नाही हे माहीत आहे, कारण चर्चा दुसर्‍या दोघांची चाललेली आहे.

बेफिकीरजी,

हरूनही हरतो मीच,जिंकूनही हरतो मीच
कधी कटाक्ष,कधी कानाडोळा, मरतो मीच.

कैसा लगा मतला? Happy

बेफिकिरजी,

गझल अक्षरछंदात लिहीत नाहीत हे जर खरे असेल........ पण समजा कुणी अक्षरछंदात अशी रचना केली तर ती गझल ठरणार नाही?

वरील कार्यशाळेचा किशोर बळी कृत वृत्तांत,''तिसरे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन विशेषांक्,फेब्रु-२००४ '' च्या ''गझल सागर'' या अंकात पृष्ठ क्र.४३ वर असून्,सदर रचना...... डॉ.राम पंडित्,गझलनवाझ भीमराव पांचाळे,गजानन डामरे,प्रा. श्रीकृष्ण राऊत्,अशोक पोहरे,नाना लोडम्,प्रा.देवेंद्र देशमुख्,संगीता जोशी,किशोर बळी,शिवाजी जवरे,महेश धर्माधिकारी,प्रमोद खराडे,अमोल शिरसाट्,संदिप हरणे,अमित वाघ्,प्रख्यात उर्दू गझलकार अ.महेबूब राही..... यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यशाळेत गझल म्हणून सादर झाली.....

माझं अल्प ज्ञान मला तरी ही रचना गझलच आहे असे सांगते आहे...... ... पण तरीही अनेक उत्त्मोत्तम गझल लिहिणारे आणी गझलेचा प्रसार व्हावा म्हणून नियमित मुशायरे आयोजित करणारे... व त्यात माझ्यासारख्या नवोदितांस गझल सादर करण्याची संधी देणारे बेफिकिरजी.. यांचं मतही मला सारखंच मोलाचं वाटतंय..

डॉ.कैलास

बदल करायला काय लागते? सहज करता येईल.

नाहीतरी आता कवीस उत्स्फुर्तपणे काव्य प्रसवण्यापेक्षा कलाकृती
घडवणार्‍या कारागीराचेच स्वरूप प्राप्त झाले आहे. Happy
(सहज विनोद म्हणुन बोललो. कारण सध्यातरी तसे माझे ठाम मत बनलेले नाही.)

कैलासजी,
मी मात्र (बेफिकीरजी यांचेबद्दलच्या व्यक्तिगत प्रेमाचा आदर राखून )
वरील रचना गझल आहे असे म्हणेन.
तोपर्यंत, जोपर्यंत कुणी ती गझल नाही हे सप्रमाण, पुराव्यानिशी सिद्ध करे पर्यंत.

यापुढे

हत्ती म्हणजे
कोणि म्हणे खांबासारिखा, कोणि म्हणे सुपासारिखा

अशी दोलायमान स्थिती उपयोगाची नाही. Happy

<<<गझल अक्षरछंदात लिहीत नाहीत हे जर खरे असेल........ पण समजा कुणी अक्षरछंदात अशी रचना केली तर ती गझल ठरणार नाही?>>>

राऊतांच्या रचनेविषयी बेफिकीर यांच्याशी सहमत. पण त्याचे कारण वेगळे आहे. मात्रांची संख्या जुळत नाही हे एकमेव कारण आहे. निव्वळ अक्षरछंदात असेल तर ती ग़ज़ल ठरणारच नाही. मात्र मात्रा जुळत असतील तर बाकीच्या बाबी बघाव्या लागतील.

माह्या नावापुढे मले,लावू वाटे तुहं नाव
तुहं नाव मिरवावं,माह्या जिवाले वाटते

वा कैलासजी मस्त गझल वाचायला दिलीत. आजची मॉर्निंग गुड केलीत.

हत्ती म्हणजे
कोणि म्हणे खांबासारिखा, कोणि म्हणे सुपासारिखा...
गंगाधरजी,
येथे परिस्थीती बिकट आहे. तुम्ही खांब म्हणाला की ते सुप म्हणणार तुम्ही सुप म्हणाला की ते डोंगरासारखा म्हणणार... ते म्हणतायत तसाच हत्ती असतो असे तुम्ही मान्य केले तर ते हत्ती नावाचा प्राणी अस्तीत्वातच नसतो म्हणणार.... तुमचा तो नागपुरी तडका बाकी भन्नाट हा!

भटांची बाराखडी, उपलब्ध वृत्त विषयक व्याकरण विषयक साहित्य, याचा आधार घेऊन निर्दोष रचना करावी... बाकी गझल कोणती नाही कोणती हे वाद थांबवून स्वयंघोषित गझलसम्राटांच्या मतांचा अनादर न करता त्यांचे रेडे *** असू द्यावेत. या मतापर्यंत मी पोहोचलो आहे. (हे माझे वयक्तिक मत आहे. मेंदू शिवशिवत असला तरी यावर चर्चा करू नये ही विनंती आहे. बाकी मी कुणाला बोलण्यापासून थांबवत नाही).

<<राऊतांच्या रचनेविषयी बेफिकीर यांच्याशी सहमत. पण त्याचे कारण वेगळे आहे. मात्रांची संख्या जुळत नाही हे एकमेव कारण आहे.>>

सहमत. कारण गझल ही वृत्तातच असावी असा स्पष्ट नियम/निकष सर्वांना वाचायला उपलब्ध आहे.

मात्र जे नियम/निकष वाचायला उपलब्ध नाहीत. असे कुठलेही नियम/निकष कोणत्याही रचनेला ती "गझल की हझल" "आहे की नाही" हे ठरवू शकत नाहीत. Happy

१. गझल अक्षरछंदात लिहीत नाहीत.

२. जर रचना अक्षरछंदात लिहीली व जाणीवपुर्वक सर्व ओळींच्या मात्रा समान ठेवल्या तर ते मात्रावृत्त होऊ शकेल. मात्र, ते अक्षरछंदासाठी असलेल्या लयीव्यतिरिक्त लयीत वाचता यायला हवे. उदा: अष्टाक्षरी व हिरण्यकेशी या दोघांच्याही मात्रा समान असू शकतात, जर अष्टाक्षरीतील सर्व अक्षरे दीर्घ घेतली तर! मात्र हिरण्यकेशी वेगळ्या लयीत वाचले जाणार व अष्टाक्षरी वेगळ्या लयीत! गझल अक्षरगणवृत्ते किंवा मात्रावृत्ते यातच लिहीली जाते हे गझलेचे सौंदर्य आहे.

३. अशा सौदर्यांना किंवा सौदर्य प्रदान करण्याच्या घटकांना जाणीवपुर्वक बाधा आणणे म्हणजे उगाचच गझल अक्षरछंदात लिहीणे, अकारान्त स्वरकाफिया वापरणे किंवा सरतेशेवटी काफियाच न वापरणे वगैरे! या सगळ्या गोष्टींमुळे आशयाला काहीच बाधा पोचत नाही, पण गझल विद्रूप होते. मग त्या रचनेला गझल म्हणण्याचा आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. कारण गझल कोणत्या वृत्तात लिहावी हे एका थोर पंडिताने बाराव्या शतकात नोंदवले होते व तेव्हापासून ती त्याच वृत्तांमधे लिहिली जाते. त्यात बदल करण्यापेक्षा त्या फ्रेमवर्कमधे अधिक बरे लिहिण्याचा प्रयत्न करणे हे मी माझ्यासाठी बंधनकारक केलेले आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहेच.

४. डॉ. कैलास, आपल्याला डॉ. राम पंडीत यांच्याशी संपर्क करून माझी मते तपासून घेता येतील. (यात उपरोध अभिप्रेत नाही, खरे सांगत आहे.)

५. 'जर अक्षरछंदात लिहीली तर गझल ठरणारच नाही?' - आपल्या या प्रश्नाबाबत मला तरी असे वाटते की तंत्र या दृष्टीकोनातून तरी ती गझल ठरू नये. राऊतांच्या रचनेचा आशयही 'मला' न आवडल्यामुळे मला ती आशयाच्या दृष्टीनेही गझल वाटत नाही आहे. मात्र, हे व्यक्तीगत मत आहे.

६. गंगाधर मुटे - राऊतांची वरील रचना गझल नाही हे मी सप्रमाण सिद्ध करत आहे. शेवटची द्विपदी बघा! 'तुहं' या शब्दात त्यांना 'हं'च्या दोन मात्रा अभिप्रेत असल्या तर पहिल्या ओळीत २८ व दुसर्‍या ओळीत सव्वीस मात्र होत आहेत. (मी इतर द्विपदी बघितल्याच नाहीत.) 'हं'ची त्यांना एकच मात्र अभिप्रेत असली तर पहिल्या ओळीत २७ व दुसर्‍यात २५ मात्रा होत आहेत. गझलेतील प्रत्येक ओळीच्या मात्रा समान असायला हव्यात. यामुळेच ही रचना 'गझल' म्हणून कार्यशाळेत सादर होणे, ही कैलास यांनी दिलेली मार्गदर्शकांची नामावली वाचूनही मला चुकीचेच वाटते. उलट ती दिशाभूल आहे किंवा 'गझल' अक्षरछंदात का नसावी हे सिद्ध करण्यासाठी सादर केलेली असावी अशी शक्यता आहे.

धन्यवाद!

बेफिकीरजी
आपल्या मुळ पोष्ट मधिल मुद्दे असे आहेत

राऊतांची ही रचना अक्षरछंदात आहे असे जाणवले.गझल अक्षरछंदात लिहीत नाहीत. मात्रा समान असल्या तरी!
.
(गझल म्हणजे व गझल व हझलही अक्षरछंदात लिहीत नाहीत.)

तुम्ही केलेला खुलासा तुमच्या वरील मुद्यांशी सुसंगत नाही.

माफ करा, मला आपले म्हणणे लक्षात आले नाही. गझल अक्षरछंदात लिहीत नाहीत हे खरे आहे. (मात्रा समान असल्यातरीही हेही खरे आहे.) हे माझ्या कोणत्या मुद्याशी सुसंगत नाही हे कृपया लक्षात आणून द्यावेत. ही चर्चा आहे. माझे काही चुकल्यास मी मान्य करेन. मला खरच लक्षात आलेले नाही.

धन्यवाद!

प्रत्येक ओळीत मात्रा समान असेल तर ते मात्रावृत्त होते. (ठोबळमानाने)

मग मात्रावृत्त असुनही ती अक्षरछंदात असेल तर ती गझल ठरत नाही असा मी तुमच्या वरील विधानाचा अर्थ काढलाय.

एकदा स्विकारायचेच नाही म्हटले तर मात्रा मोजण्याचे औचित्य काय?

सप्रमाण सिद्ध करायचे असेल तर मात्रावृत्त असुनही ती अक्षरछंदात असेल तर ती गझल ठरत नाही या विषयीची मार्गदर्शक तत्वे लिखित स्वरूपात उप्लब्ध असतील ते सादर करावे लागेल.

एकदा मात्रा समान असुनही केवळ अक्षरछंदात आहे एवढ्या कारणासाठी रचनेला गझलेचा दर्जा द्यायचा नाही म्हटल्यावर निष्कारण मात्रा मोजत बसणे ही विसंगती. Happy

ह.बा
एक विनंती.
तिजोरीत मोठा चमत्कार आहे!
या बाफचे हे शिर्षक बदलून

गझलेचा आराखडा-एक चर्चा

असे करावे.

त्यामुळे या विषयातील जाणकार मंडळी चर्चेत सहभागी होऊन
कदाचित एखाद्या निष्कर्षाप्रत पोचता येईल.

अहो! तसे नाही हो!

विकास आहे की अधोगती, काही समजत नाही
आता माझी एक ओळही मलाच भावत नाही

यात आपण 'गा' , 'ल' हे काढलेत तर ते जुळणार नाहीत. पण २८ मात्रा असाव्यात! किंवा, १४ वेळा 'गा' धरले तर बसावे! आता प्रत्येक ओळीच्या पुढे मी 'मित्रा" ही रदीफ लावली तर मात्रा ३२ होतील, पण ती अक्षरछंदाप्रमाणे 'वाचता' / 'उच्चारता' येणार नाही.

अ‍ॅम आय कमिंग अ‍ॅक्रॉस???

Pages