बेसिक बटर केक आणि बेसिक बटर आयसिंग

Submitted by लाजो on 19 July, 2010 - 21:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसिक बटर केक:

१२५ ग्रॅम सॉफ्ट (रुमटेंपरेचर) बटर (शक्यतो अनसॉल्टेड),
३/४ कप बारीक साखर,
२ अंडी (हलकी फेटुन),
२ कप सेल्फ रेसिंग फ्लार,
१/२ कप दुध

बेसिक बटर आयसिंग:

१२५ ग्रॅम सॉफ्ट अनसॉल्टेड बटर,
१+१/२ कप आयसिंग शुगर,
१ चमचा दुध/पाणी

क्रमवार पाककृती: 

बेसिक बटर केक:

- सर्वप्रथम केक टीनला बटर लावुन त्यामधे आणि साइड्सना बेकिंग पेपर लावा.
- ओव्हन १८० डिग्री सेंटीग्रेड ला तापत ठेवा.

१. रुम टेंपरेचरला मऊ झालेले बटर एका मोठ्या भांड्यात घेऊन इलेक्ट्रिक बिटर ने लो स्पिड वर फिरवा. यात हळुहळु साखर घाला व क्रिमी होईस्तोवर फेटा,
२. या मिश्रणात दुध आणि फेटलेल्या अंड्यातले अर्धे मिक्श्चर घाला ते नीट एकजीव होईपर्यंत हलकेच फेटा.
३. आता उरलेले अंड्याचे मिक्श्चर घालुन ते नीट एकजीव होईपर्यंत परत हलकेच फेटा.
४. सेल्फ रेसिंग फ्लार बरीक चाळणीने २-३ वेळा चाळुन घ्या.
४. आता हे फ्लार हलके हलके वरच्या बटर-अंडे मिश्रणात 'फोल्ड' करा.
५. एकजीव झालेले मिश्रण तयार केक भांड्यात ओतुन ३०-३५ मिनीटे बेक करा.

केक जाळीवर थंड होण्यासाठी काढुन ठेवा.

बेसिक बटर आयसिंग:

१. सॉफ्ट बटर इलेक्ट्रिक हँड मिक्सर ने क्रिमी होईपर्यंत फेटा.
२. त्यात हलके हलके आयसिंग शुगर मिसळा (एका वेळेस पाव कप).
३. त्यात थोडे थोडे दुध घालुन आयसिंग स्प्रेडेबल (पसरण्याच्या) कन्सिस्टंसी चे करा.

बटर केक थंड झाला की त्यावर बटर आयसिंग पसरा आणि खा Happy

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे :)
अधिक टिपा: 

ह्या अगदी बेसिक रेसिपीज आहेत.
- या केकमधे आवडीप्रमाणे चॉकलेट, ड्रायफ्रुट्स वगैरे घालुन वेरिएशन्स करता येतिल.
- केक मधे काही लोक चवीला चिमुटभर मीठ घालतात.
- बेसिक आयसिंगमधे आवडी प्रमाणे रंग व इसेन्स घालु शकता.
- http://www.maayboli.com/node/17974 धाग्यावर इथे वापरलेल्या काही खास बेकिंग मधे वापरल्या जाणार्‍या शब्दांचे विश्लेषण आणि टीप्स पहा :

- अगदी घाई गडबडीत हा केक करायचा असेल, तर सगळे साहित्य एका बोल मधे मिक्स करा आणि हँड मिक्सर - बिटर ने लो स्पीड वर १ मिनीट आणि मग हाय स्पीडवर ३ मिनीट बीट करा.सगळे साहित्य नीट मिक्स झाले आणि केक चे बॅटर फुगलेले दिसले की मिश्रण केक टीन मधे काढुन नेहमी प्रमाणे बेक करावे.

माहितीचा स्रोत: 
ही मी नेहमी वापरणारी रेसिपी साखरेच्या एका पाकिटावर छापली होती :)
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स गं लाजो! मला केक करणे महाकठीण काम वाटते (पुरण, लाडु, श्रीखंड, पाकातले चिरोटे वगैरे प्रकार सोपे वाटतात) पण आता नक्की नक्की करते. अवन प्रीहीट किती वेळ करायचा असतो?

लाजो...पण केक मध्ये बेकींग पावडर/सोडा घातली नाही तरी चालेल का? सेल्फ रेसींग फ्लार कसं असतं मला माहित नाही पण मैदा वापरला तर लागेल ना बेकींग पावडर/सोडा ?

मी केकच्या बाबतीत फार "ढ" आहे. त्यामुळे एकदम बेसिक प्रश्न.. Sad
१) सेल्फ रेसींग फ्लार काय असत?
२) हे मला मुंबईत कुठे मिळेल?
३) ओवन ऐवजी कुकरमध्ये केक होईल का?
४) एग बिटर ऐवजी, हँन्ड मिक्सर चालेल का?
पाचवा आणि सगळ्यात मह्त्वाचा प्रश्न, मला हे तुमच्या हातचे केक कधी खायला मिळतील? Proud

सुमे,

नुसता मैदा नाही गं चालणार. बेपा किंवा तत्सम केक फुलायला घालावच लागेल.

@रुपाली,

१) से रे फ्लार = मैदा + बेकिंग पावडर
२) माहित नाही
३) हो कुकर मधे करतात केक. वाळु तळाला घालुन. मी कधी नाही ट्राय केला.
४) चालेल.

http://www.maayboli.com/node/17974 इथे चक्कर मार.. इथे बरीच माहिती आहे Happy प्रश्न पण विचार लगेच उत्तर मिळेल Happy

५) माझ्या हातचे केक खायला ऑस्ट्रेलियात याव लागेल Happy नक्की खिलवेन Happy

२) हे मला मुंबईत कुठे मिळेल?

मुंबईत मैदा आणि बेकींग पावडर वेगवेगळी सगळीकडे मिळते. किराणामालाच्या दुकानात/डिमार्ट्/रिलायन्स फ्रेश/मोर/अपना बाजार इ. ठिकाणी दोन्ही मिळतील, केचप्/सॉस वगैरे ठेवणा-या जनरल स्टोर मध्ये बेपा मिळेल. दोन्ही एकत्र मिक्स केलेले से.रे.फ्ल. कदाचित सापडणार नाही. पण मला वाटते मैदा+बेपा (कुठेतरी लाजोने प्रमाणही दिलेय बहुतेक) एकत्र मिक्स केले की झाले.

लाजो ते से.रा.फ्ला. फोल्ड करताना गुठळ्या होत नाही का? मागे ईथे मला वाट्त प्राची यांनी मायक्रोवेव्ह केकची कृती दिली होती.त्यातही मैदा आणि बे.पा. फोल्ड करायचे असे सांगितले होते. मी परवा तो प्रयोग केला तेव्हा गुठळया झाल्या. काही केल्या मिश्रण एकजीव होईना. केक फेल गेला. अजिबात फुगला नाही. मी ते ईंग्लिश ८ प्रमाणे फोल्ड केला होता. मा.का.चु.?

ऑर्किड,

मैदा फोल्ड करताना, सगळा मैदा एकदम अंड्याच्या मिश्रणात घालायचा नाही, त्यामुळे नीट मिक्स होत नाही आणि गुठळ्या होतात.

मैदा+बेपा चाळुन घेतले की थोड्या थोड्या प्रमाणात (एका वेळेस साधारण २-३ टे स्पून) घालुन हळु हळु फोल्ड करायचे. फोल्ड करताना देखिल अगदी ह्लके हलकेच इंग्रजी 8 प्रमाणे फोल्ड करायचे. असे केल्याने मैदा नीट मिक्स होतो आणि आधी क्रिम केलेले अंड्+बटर चे मिश्रणातील एअर बबल्स डिस्टर्ब (जास्त) होत नाहीत आणि मग केक नीट फुगतो.

थॅन्क्यु लाजो.
रच्याकने, ते क्रीम मी कुल्फी करुन संपवले. तुमची कुल्फीची रेसिपी पण बेफाट आहे. नेहमी मुंबईची कुल्फी मिस करायचे, आता छान रेसिपी मिळाली.