घरी आणल्या क्षणापासून वानूची त्यानं अहोरात्र सेवा केली. महिनाभर त्याला उचलून बाहेर न्यावे लागे. वानूही शहाणा. घरात कधी घाण केली नाही. रात्री कुं कुं करे. हा लगेच उठून त्याला बाहेर नेइ. वानू तसा खूप जड आहे. दमछाक होते उचलून. सरकारी हॉस्पिटलमधले डॉ.डोके, इन्टर्नी मुलं, सहाय्यक कर्मचारी इरकर सगळ्यांनी मनापासून छान उपचार केले वानूवर. इरकर रोज वानूच ड्रेसिंग करत. वानूची ऑपरेशनची जखम बरी झाली होती. पण तेथेच शेजारी त्याला या नव्या अपघातामुळे खोल जखम झाली. ती लवकर बरी होइना. वानू चाटून चाटून पुन्हा पुन्हा खपल्या काढी. बर तोंड तरी किती बांधणार. शिवाय त्या जखमेवर मासाची गाठीसारखी वाढ होत होती. इरकर रोज त्या जखमेचं ड्रेसिंग करत. शिवाय हा ही घरी ड्रेसिंग करायला शिकला होत. मला तर त्या जखमेची खोलवर पुसुन घेऊन स्वच्छता करायला भिती वाटे.
एक दिवस हॉस्पिटलमधे डॉक्टर नव्हते. इरकरांनी ड्रेसिंग करताना एक मोरचूदचा खडा दिला. म्हणाले हा घासून लावा जखमेवर, म्हणजे ती गाठीसारखी वाढ आहे ना ती जळून जाइल आणि जखम बरी होइल. त्या मोरचूदने ती गाठ काळपट पडून तेथील नवीन ग्रोथ थांबली. ती जखमही हळूहळू पूर्णपणे भरून गेली. पोळ्या करणारी जयाबाइ त्याला रोज स़काळी गरम पोळ्या, थोड दूध, कधी आमटी, चमचाभर कॅलशियम, टॉनिक घाली. वानूची जखम बरी झाल्यावर त्याला खूप भूक लागायला लागली. जाम खायचा दिवसभर. एकदम लडदू झाला. फोटोत दिसतोय ना लडदू तो त्यामुळच. हा म्हणाला आता खाणं कमी करा त्याचं. शिवाय वान्याचा व्यायामही कमी झाला होता. कारण चालताना, पळ्ताना, लडखडे. कंबरेत हलायचा. वानू चांगला तरणा होता तेंव्हा नियमित व्यायाम करी. गच्चीत जाऊन पळणं, धिंगाणा घालणं, नख ओरबाडून ती वाढू न देणं, हे सर्व तो रोज सकाळी सात वाजता व संध्याकाळी पाचच्या सुमारास करायचा. कुणी शिकवलं असेल त्याला हे सगळं? आता वानू म्हातारा झाला. उगाउगा गप्प बसून असतो. उगीचच तावातावाने कुणावर भुंकत नाही. पण अजूनही राखण जबरदस्त. दिसतोही देखणा.
आत्ताआत्तापर्यंत दुसरी कुत्री, पिल्लं यांच्यावर रागावणारा वानू परवा बघितलं तर मागच्या कंपाउंडपाशी जाळीला नाक लावून मागच्या प्लॉटमधल्या कुत्र्याची पिलावळ, त्यांच खेळणं प्रेमाने बघत उभा होता. बघून गम्मत वाटली. अगदी प्रेमळ आजोबा झाला आता हा.
समोर आवटींकडे नवीन लॅब्रेडॉर कुत्री आणली. त्या छोट्याश्या पिल्लाचं चाललेलं कौतुक वान्या गेटमधे बसून डोळेभरून पहात राहतो. एकदा तिला आत आणलं तर तिला हुंगून तिच्याशी प्रेमाने वागला. थकला आता वान्या. आंघोळ घातली तर दमला. एरवी थंडीत सोफ्यावर किंवा दिवाणावर चोरून बसे. पण आमची चाहूल लागली की पटकन उतरून जाइ. आज आंघोळीनंतर इतका दमला की सोफ्यात मुटकुळ करून बसलेला वानू आम्ही समोर आलो तरीही हलला नाही. करूण नजरेनं आमच्याकडे पाहिलं. यानेही बस बस हं वानू, म्हणून हलकेच थोपटून गोधडी पांघरूण घातली. दोन मोठे अपघात आणि आयुष्याची एवढी वर्ष याने वानू थकला होता.
आम्ही बाहेर जाण्याच्या गडबडीत असतो ना तर खरच म्हातार्या माणसांसारखं करतो. आम्हाला जायला पाहिजे हे ही समजतं पण जाऊ नये असंही वाटतं त्याला. गेटपाशी, घराच्या दारात, हॉलमधे येण्याच्या जागा अडवून पसरून झोपतो. गेट, दार उघडायला पण येत नाही. आता पटकन उठताही येत नाही त्याला. वाइट वाटतं उठ म्हणायला. त्याला न चुकता आत कोंडून बाहेर पडावं लागतं. बाहेर ठेवायची सोय नाही. कधी पळून जाइल नेम नाही. अजूनही बाहेर सटकला तर जोरात पळतो. पण आता सापडतो लगेच. वाट अडवून बसला की गडबडीत असताना हा वानूला ओरडतो. फटकावतो. मी म्हणते किती म्हातारा झालाय. अस रागावून बोलू नको त्याला. पण प्रेमही तोच करतो मनापासून वान्यावर. वानूच्यापण मनात एक खास जागा आहे याच्यासाठी.
वानूला आंघोळही सोसत नाही आजकाल. परवा आंघोळ घातली तर दोन दिवसांनी त्याला दम्याचा ऍटॅक आला. दोन दिवस घरातच ब्राँकोडायलेटर्स, कफ सिरप, पॅरासिटामॉल वगैरे घातलं पण त्याला बरं वाटेना. दोन दिवसांनी पाणी पण पिईना. मग हॉस्पीटलमधे नेलं. गुडफ्रायडेची सुट्टी असूनही तिथल्या लोकांनी उपचार केले.
घरी आणल्यावर वानू लॉनवर निपचित पडून होता. रंगपंचमीच्या पिचकारीने त्याला पाणी व इलेक्ट्रॉल पाजत होतो. एकदोनदा मान उचलून तरतरीही दाखवली त्यानं. दुपारी एक वाजता याचा फोन आला कामावरून. वानू झोपला होता तिथे उन आले असेल आता, त्याला उचलून ठेव दुसरीकडे म्हणून. मला अगदी लाज वाटली, की घरात असून माझ्या लक्षात आल नाही म्हणून. बाहेर गेले तर वानू स्वतःच सरकून बाजूला झाला होता. बारा वर्षांपूर्वी ज्या झाडाखाली अत्यवस्थ होऊन पडला होता, त्याच ठिकाणी आज इतक्या काळानंतर प्रथमच जाऊन झोपला होता. माझ्या काळजात हललं. मला एकटीला त्याला पाणी पाजायला जमेना. शालिनीलाही हाक मारली. तीही म्हणाली नाक सुकलयं वानूचं. काय होतयं कुणास ठाऊक. पाणी पाजल्यावर जरा तरतरीत होइ.
रात्री डॉ. डोकेंचा फोन आला. दुपारी ते भेटले नव्हते. त्यांना निरोप ठेवून आलो होतो. त्यांना म्हटलं जरा बरा आहे वानू. म्हणाले, उद्या सकाळी येतो घरी.
रात्री वानूला खूप धाप लागली. व्हरांड्यात आणून ठेवलं. उंचावर कासवछाप लावली. डास जावेत म्हणून. काल रात्री
वानूसाठी तीनचार वेळा हा उठला होता. नीट झोपही झाली नव्हती. म्हटलं आज व्हरांड्यातच ठेवू त्याला. साडेबारापर्यंत त्याच्याजवळ बसलो. आत जाऊन झोपलो. परत उठून हा रडायला लागला. म्हणाला रात्री उठेन मी वानूसाठी. त्याला बाहेर नको ठेवायला आज. मुटकुळ उचलून आत आणलं. वानू क्षीण कण्हला. त्याच्या अंगावर हात फिरवून आम्ही झोपलो. सकाळी सहा वाजता याने मला उठवले. म्हणाला वानू गेला. उठून हाताने हलवलं तर हलला नाही. एरवी जरा हलवला तर सगळं अंग हलायचं त्याचं. दोघ सुन्न होऊन रडत राहिलो. मरताना आवाजपण केला नाही वानूनं. कान तर अगदी उभे होते अजून.
वानू गेला तर जीवाभावाची शेजारपाजारची माणसं येऊन भेटून गेली. एखादं घरचं माणूस जाव तसं. मी वीणाला- माझी मैत्रिण-फोन केला तर म्हणाली थांब. मी येऊन जाते. येताना फुलं पण घेऊन आली. वानू गेला. दिवसभर सतत वाटे एक जीवाची अखंड धडपड संपली.
दोन दिवसांनी कराडला जायचं होतं. शेजारी शालिनीकडे घराकडे लक्ष ठेव म्हणून सांगायला निघाले, तर एकदम वानूला जमिनीत विश्रांती दिली होती तिथे लक्ष गेलं. वाटलं कुणी आलं गेटपाशी तर जमीन फोडून बाहेर येइल हा.
सातव्या दिवशी अचानक वानूला ज्या झाडाखाली ठेवलं होतं त्या झाडावर खूप कावळे आले. कालवा करू लागले. जयाबाई म्हणाली पटकन भाकरी ठेवूया. एक भाकरी मिक्सरमधून काढून दोन टोस्ट व थोडं दूध घालून जयाबाई झाडाखाली ठेवून आली. पायापण पडली भाबडेपणानं. कावळ्यांनी सगळं फस्त केलं. भाविक भाबडी नाही मी, पण खरच सांगते, आधी किंवा नंतरही पुन्हा इतके कावळे आले नाहीत. भाभी म्हणाल्या सगळं मानसासारखं झालं बघा वानूचं.
अगदी नुकताच,गुडफ्रायडेच्या रात्री कधीतरी वानू गेला. लिहायला घेतलं तेंव्हा अजून ताजं होतं सगळं. वर्तमानकाळात जमेना लिहायला. मनात वानू भूतकाळातूनच वर येतो. भाभी दुपारी कामाला येतात. बरेचदा माझ्या लिखाणाचा पहिला श्रोता त्याच असतात. डोळ्याच पाणी पुसत म्हणाल्या, लै म्हाग असल हा कॉम्प्युटर आनि त्यावरून वानूच लिवताय, लै लांबची लोकं वाचत्यात म्हटलं तर लै भाग्यवान वानू. पुढारीबी गेलं तर येक दिवस लिवतात मग कुनी इचारत नाही. कोन कुठला वानू तुमच्या घरी आला तर लय कौतुक झालं त्याचं.
तर वानूची ही सत्यकथा.
सत्य..? हे तर माझं सत्य.
वानूसाठी काय असेल सत्य?
बोलून प्रतिकार करणार्या माणसांवरही अन्याय करतो आपण.
मग या मूक जीवावर कितीदा झाला असेल. त्याच्यासाठी सत्य काय असेल?
तो मूक होता म्हणून लिहिताना 'ऑल कॅरॅक्टर्स.. वगैरे सावधानता नाही लागली.
त्याचे वारस बदनामी म्हणून भांडतील अशी भिती नाही वाटली.
माझी चोरी, माझी हिंसा, माझी पॅशन अशी कुणी मांडली तर आवडेल मला?
वानू गेला...
गेल्यावरही भेटत राहिला तुम्हा आम्हाला.
किती आनंद दिला त्या जीवाने--
तो गेल्यावर हा म्हणाला नीट ठेव त्याचे सामान..
दूरवरून शंतनूनेही तेच सांगितले.
काय होतं त्याचं?
एक आनंदमय अस्तित्व. एक दु:खद अनस्तित्व.
ताटली, गंज, साखळी, घुंगुर, पट्टा..
जणू संन्याशाच्या पाच वस्तू. उचलून ठेवल्या.
आणि गुलजारच्या कवितेतलं वान्याचं सामान, जे पडलं होतं आमच्यापाशी
ते तुम्ही आम्ही वाटून घेतलं.
या घरात आला. इथे राहिला. घरातच झाडाखाली झोपून गेला.
आम्हीच परके. एक एक करून कितीदा घर सोडून गेलो.
खरचं कोण कुठला वानू? काय ॠण घेऊन आला आमच्या घरात?
बालपणीची अल्लड धडपड, तरुणाईतील जोश मस्ती, म्हातारपणातलं समजूतदार विद्ड्रॉवल.
सारे तीन अंकांचे दर्शन मांडून गेला आमच्यासमोर.
जन्माला येताना प्रत्येक जीव, प्रत्येक पेशीवर
ऋणाघनांचे हिशेब मांडून येतो.
दोन डोळे, कान, नाक, हात, पाय आणि साडेतीन हातांच्या देहावर सार्याचे ओझे पेलत राहतो.
या एवढ्याश्या भांडवलावर ऋण फेडता फेडता
नवीन ऋण डोक्यावर घेतो.
नवीन ऋण कुणाच्या नावावर टाकतो.
प्रत्येक पेशी मरताना तिचे अनंत हिशेब नोंदून जाते.
कोट्यावधी पेशींचे हे देण्याघेण्याचे जमाखर्च करायला
महासंगणकही अपुरा पडतो. आयुष्याच्या उतारावर गोंधळतो.
समजत नाही ...समजत नाही... म्हणतो.
सर्वस्वी आपलीच असणारी, कुशीत घेऊन वाढवणारी सुद्धा निघून जातात दूर.
आयुष्याच्या वळणांवर नव्यानं भेटणारी, आपली होत राहतात.
पुन्हा ऋणघनांचे नवे हिशेब, नव्या मांडण्या.नवी उधारी. नवी उसनवारी.
मग पुनः पुनः, पुन्हा नव्याने, नव्या जन्मात आपण सारे भेटत राहतो.
याला समाप्ती नाही, क्रमशः चालूच राहते सारे.
खूपच छान
खूपच छान लिहीले आहे. मनात घर करून रहाणरं..
रडवलं हं
रडवलं हं तुमच्या वान्याने .. खरंच खूप प्रेमाची माणसं मिळाली त्याला ..
तुम्ही तुमचं वानूबरोबरचं नातं आमच्यापाशी share केलंत त्याबद्दल आभार ..
शब्द अपुरे
शब्द अपुरे आहेत.... आनिक काय लिहिणार....
विकि अहिरे
अशी पाखरे
अशी पाखरे येती आणिक ....
तुमच्या वानूनं खरच जीव लावला. सुरेखच लिहीले आहेत सर्व भाग.
माझे वडील
माझे वडील तरुन असताना आमच्या कडे राजा होता म्हणे. तो गेल्यावर माझे वडिल बेशुध्द झाले होते व झोपेत ओरडायचे हे त्यांनी सांगेतल्यावर मला तेव्हा हसु आले होते पण वान्याचे वाचुन आता खरे वाटतेय.
आज घरी फोन करुन सांगेन की तुमचा राजा मला थोडाफार भेटला.
काय
काय लिहिणार???
(No subject)
...
...
तुमच्या
तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. माझ्याकडे एक 'चिकी' नावाची मांजर होती तिच्या बाळंतपणानंतर अतिरक्तस्त्रावाने ती माझ्या समोरच गेली. काही उपाय नसल्याने असहाय्यपणे तिचा मृत्यू बघत राहिले. तिची ती केविलवाणी नजर कधीही विसरू शकणार नाही. पाळीव प्राणी खूप आनंदाचे क्षण देतात, पण त्यांचा मृत्यू फार जिव्हारी लागतो.
'आज
'आज वान्याचा पुढचा भाग आला का?' हे प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला न चुकता बघणं, ही सवयच होऊन बसली होती. खूप आवडली ही लेखमाला.
नेमस्तक, या लेखमालेतील प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला आणि शेवटी अनुक्रमे 'आधीचा भाग' आणि 'पुढचा भाग' असे दुवे देता येतील का?
वान्याचे
वान्याचे नाव वाचुन लेख वाचायला सुरुवात केली. पण आजच्या लेखात 'असं काही' वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं. वाचल्यावर एकदम ह्रदयात 'लक्क...' झाले. खुपच छान लिहिली आहे लेखमाला... अगदी 'आतुन' लिहिल्याचे जाणवते.
.... काय
....
काय लिहायचे? आयुष्यभर जपाल ना आठवणी....
सुंदर......
सुंदर...... काही आठवणी ताज्या झाल्या.... खरेच हे मुके जीव ॠण ठेवुन जातात.
तुमच्या
तुमच्या भावना/वेदना तीव्रतेने पोहोचल्या...
आम्ही एक कुतू आणला आहे २००६ पासुन! त्याचे पिल्लू असल्यापासून घरात असणे, वावरणे, त्याच्या खोड्या, मस्ती मी वान्याबरोबर पुन्हा इथे अनुभवली.
आपले लागेबांधे असतात हो कुठल्यातरी मागच्या जन्मीचे या मुक्या प्राण्यांबरोबर, जीव गुंतून जातो अगदी!
वान्याची
वान्याची सगळी कहाणी जास्त आवडली की शेवटचं तुमचं चिंतन जास्त आवडलं ठरत नाहीये अजून. कुठलंही वाक्य, किंवा विचार अजिबात ओढून ताणून आणलेला वाटत नाहीये. अगदी सहज, मनातले विचार नोंदवले आहेत. डोळे भरून आलेच वाचताना!
अजून लिहीत रहा - तीच वानूला श्रद्धांजली.
चटक लावून
चटक लावून गेले मागचे दोन्ही लेख.
Thanks वानूशी आमची ओळख करून दिल्याबद्दल.
वा! वा!
वा! वा!
मागच्या
मागच्या भागापासून थोडा अंदाज आला होता की पुढल्या भागात कायतरी गडबड होणारय... ठरवून वाचायचा टाळला तब्बल दोन दिवस... किती कठीण आहे... माहितीये का?
पण वाचलाच शेवटी.... माणसाला आशाही असतेच
वान्या तर जात नाही कुठे आपल्या दिलातून ते सोडा तुम्ही....
पण...
शेवटलं चिंतन.... ऋणाघनांचे हिशेब? ते एक आता बरोबर घेऊन हिंडावं असलं करून ठेवलत
मीनाताई, हे लिहून जे ॠण ठेवताय.... त्याचं काय? :)... काही नाही एक प्रांजळ प्रश्नं हो.
माझ्याकडे त्याला उत्तर एकच... काही ऋणं प्रसाद म्हणून बिनदिक्कत स्वीकारावी बघा... त्यांचं नाही ओझं होत
इतक्या
इतक्या जणांनी दिली आहे त्यापेक्षा काय वेगळी प्रतिक्रिया देणार?
लेखन सुरेख. नऊही भाग अप्रतिम.
वान्याला प्रत्यक्ष भेटल्यासारखा अनुभव देणारी ताकद आहे तुमच्या लिखाणात.
अतिसुंदर.....
अतिसुंदर..... मिनाताई तुमचे हे वान्याबद्दलचे लिखाण व वानु सर्व मायबोलिकरांच्या ह्रुदयात कायमचे घर करुन जाइल यात शंकाच नाही.... माझ्या भावाकडे इथे अमेरिकेत पिडी म्हणुन एक शिट्सू जातीचा कुत्रा १८ वर्षे होता. त्यामुळे प्रत्यक्षात असे प्रेम मी डोळ्याने पाहीले आहे पण अश्या प्रेमाला व त्या नात्याला असे शब्दात अचुक व समर्थपणे पकडलेले माझ्यातरी वाचनात कधीच आले नव्हते.... अश्या या तुमच्या समर्थ लेखनशैलीला खरच मानल पाहीजे....
लेखमाला
लेखमाला आवडली. तुम्ही तुमचा अनुभव अगदी मनाला भिडेल असा मांडला आहे.
डोळ्यात
डोळ्यात पाणी आले हा लेख वाचताना.
काय लिहावे
काय लिहावे हेच सुचत नव्हते. तुमचे लेख मनात घर करुन रहिले आहेत. वानू नाही, आणि आता त्याच्याबद्द्ल वाचता येणार नाही हे सहन होत नाही. हि आमची अवस्था, तर तुम्हासर्वाचे दु:ख अतुल्य आहे.
हल्ली जिथे माणसात माणूसकी दिसत नाही, तिथे वानू आणि तुमच्या नात्याने एक अनोखे बन्ध जोडले.
तुमचा वानू आता आमच्या आठवणीतही सदैव दरवळणार.......................
दाद, अगदी
दाद, अगदी अगदी, मला ही हे वाचायच नव्हतं
आमचा डिंगो ही असाच होता. पॉमेरीअन ब्रँड. जाउन ३ वर्ष झाली
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
़खरच रडवल
़खरच रडवल वान्याने ...... तुम्ही खुप सुन्दर आणी सहज लीहीता ..... तुमचा वान्या माझ्याही आठवनीत नेहमीच राहील ....
सौरभ
फारच छान!
फारच छान! माझ्या सगळ्या कुत्र्या-मान्जराची आठवण झाली.
रडवल
रडवल वान्याने.
आज जुईला आमच्या चिनुच्या बर्याच गोष्टी सांगितल्या. खरच खुप माया लावतात हे प्राणी.
वानू
वानू आवडला..वानूची अगदी जवळून ओळख झाल्यागत वाटल.. आणि अर्थातच तो गेल्याच दु:ख ही..
पण गोड आठवणी जतन करून ठेवण्यापलिकडे माणसाच्या तरी हातात काय असत? त्या एका बाबतीत आपणही मूक प्राण्याइतकेच लाचार असतो. मात्र दोघान्च्यात फरक तेव्हडा तुमच्या शेवटच्या परिछेदातून उतरलाय.. वानू गेला एखाद्या सन्यासासारखा, चार गोष्टि जेमेतेम मागे ठेवून, मनुष्य मात्र बरीच लक्तर मागे सोडून जातो.
असो. लिहीत रहा..
अप्रतिम अत
अप्रतिम
अतिशय सुन्दर
काकू, खरचं
काकू, खरचं खूप छान !! वान्याला मी तुमच्या घरी मिरजेत भेटल्याचे आठवते मला. त्याचे ते वेगळे नावही आठवते आणि काकानी त्याचे नाव वान्या का ठेवले ते ही सांगितल्याचे आठवते. कदाचित मी ही आमच्या घरी एखादा वानू दोस्त ठेवू शकलो असतो ...
Pages