वेगवेगळे परीघ, व्यास एक आपला

Submitted by बेफ़िकीर on 12 July, 2010 - 03:36

वेगवेगळे परीघ, व्यास एक आपला
एवढाच दैवदुर्विलास एक आपला

वाटते अनंतकाळ जो जिवंत ठेवतो
अंत आणतो असाच श्वास एक आपला

साहसे खरे लिहायची इथेच आटली
कागदात आखला समास एक आपला

मी मला सहाय्य द्यायला पुढे न धावलो
हाच वाटला मला विकास एक आपला

रागवू नकोस तू... नसेनही मनात मी
मांडला असाच मी कयास एक आपला

मी तुला न शोधणे नि तू मला न भेटणे
छंद वेगळे असून त्रास एक आपला

भोवतालच्या परिस्थितीस नांव ठेवणे
विस्मरायचा तुला प्रयास एक आपला

खोल खोल जात मी तुझाच भाग होउदे
रोज लागुदे मला तपास एक आपला

त्यास काळजी असेलही म्हणून राहतो
हा तुझा सुवास आसपास एक आपला

पोहचेल तोवरी घडेल खूप कायसे
पोचला मुखात तोच घास एक आपला

चालतो मधेमधे नि थांबतो मधेमधे
राहतो जगात मी उदास एक आपला

हा कुठे सरावलो विषण्णतेस मी जरा
लागला तुला वसंतमास एक आपला

काय पाहिले तुझ्यात हे कुणास माहिती?
तू हवीस तू हवीस ध्यास एक आपला

मन रमायला तुझे बदल करून बघ जरा
टाक ना कटाक्ष दिलखुलास एक आपला

'बेफिकीर' जीवनात जान आणलीस तू
अंत कर असाच तू झकास एक आपला

गुलमोहर: 

मी तुला न शोधणे नि तू मला न भेटणे
छंद वेगळे असून त्रास एक आपला >>> क्या बात!

भोवतालच्या परिस्थितीस नांव ठेवणे
विस्मरायचा तुला प्रयास एक आपला >>> ओह्ह!

खोल खोल जात मी तुझाच भाग होउदे
रोज लागुदे मला तपास एक आपला >>> व्वा!

अप्रतीम शेर आणि अप्रतीम रचना... धन्यवाद! Happy

बेफिकीरजी! सुंदर गोटीबंद व भन्नाट गझल आहे ही.पण डोक्याला मुंग्या आणणारी, झिणझिण्या आणणारी आहे. (चांगल्या अर्थाने म्हणतो आहे.)

तुमचा मतला मी किती वेळा मनात घोळवला म्हणून सांगू? उठता बसता तोच विचार! मतला जबरदस्तच आहे. अत्यंत तरल, प्रतिभावान व अलौकीक सौंदर्याने भारलेला विचार! पण, माझ्या आत्म्याला सारखे काही तरी डाचत होते. शोध घेतल्यावर पत्ता लागला की, पहिली ओळ शास्त्राला/गणिताला धरून वाटत नाही. कारण गणितात त्रिज्या वा व्यास सारखा असेल तर वर्तुळांचे परीघही (परिघांची लांबी) सारखेच असावे लागतात. असो.

पण, व्यास सारखे, पण परीघ वेगवेगळे ही कल्पना वरवर जरी अशास्त्रीय वाटली तरी, त्यातले काव्य हे काळीज हेलावणारे होते. कारण काव्यात गणिताची सूत्रे जशीच्या तशीच असावीत की नसावीत?

मग माझ्या गुरूंचे वाक्य आठवले की, कोणतेही असत्य किंवा अशास्त्रीय विधान शेरात असू नये. मग मी विचार करायला लागलो की, पहिल्या ओळीतील अशास्त्रीयता, काव्यास धक्का न लावता कशी काढता येईल? तेव्हा मला ओळ सुचली...............
“का न सारखे परीघ? व्यास एक आपला!
एवढाच दैवदुर्विलास एक आपला!!”

इथे का न सारखे असे केल्याने ओळीतील अशास्त्रीयता गायब झाली व तुम्हाला जे म्हणायचे ते काव्यही कायम राहिले.

आता व्यास, परीघ, (वर्तुळे) यांचा मी घेतलेला अर्थ असा..............

तू आणि मी, आपले पिंड, व्यक्तीमत्वे, स्वभाव इत्यादी सारखेच आहेत. म्हणजेच आपल्यात ब-याच गोष्टी तुल्यबळ आहेत. म्हणजेच आपल्या जीवनरूपी वर्तुळाचा व्यास जवळजवळ सारखाच आहे. पण तरीही आपले परीघ वेगवेगळे कसे? म्हणजे, जरी आपला व्यास म्हणजे वर उल्लेख केलेल्या सर्व बाबी जरी सारख्या असल्या तरी माझे व तुझे जीवनरूपी वर्तुळ हे गणिताच्या भाषेत एकरूप, किंवा त्यापुढेही जावून काव्याच्या भाषेत बोलायचे झाल्यास एकजीव कसे होत नाहीत? का बरे इतके साम्य असूनही तुझे माझे वर्तुळ/वर्तुळाचा परीघ एकसारखा होत नाही? म्हणजे जीवनात दोन व्यक्ती, कितीही पारखून मग नात्यात गोवल्या गेल्या तरी, त्यांच्यात १००% एकवाक्यता कधीच होवू शकत नाही. कारण गणितात १००% एकरूप असले तरी, मानवी जीवनात, काव्यात ते असेलच असे नाही. कारण प्रत्येक व्यक्ती, तिचे वर्तुळ, व्यास कोणताही असू द्या, हे दुस-या व्यक्तीपेक्षा जरासे भिन्न असतेच, कारण ते दोन वेगळे जीव आहेत. They are two different individuals! हे अंतीम सत्त्य जे वरकरणी जरी शास्त्रास वा गणितास छेद देणारे असले तरी, या शेरात ठसकेबाजपणे व अगदी सहज मांडले आहे.

भूषणजी! मी जो विचार केला तो इथे मांडला आहे. माझ्या विचारात काही चूक असेल तर माफ करावे. आपली मते कृपया कळवावीत.

अवांतर: तुमच्या या गझलेवर मी सखोल चिंतन केले.पण सर्व गोष्टी इथे लिहीत नाही. कारण ब-याच इतर जणांना(आपणास नव्हे) त्या गोष्टी पचणार नाहीत. मी आपणाशी फोनवर समक्ष बोलू इच्छितो, आपली इच्छा व परवानगी असेल तर!

माझ्या बोलण्याचा मूळ उद्देश मला माझ्या चिंतनातले दोष, जर काही असतील तर, ते दूर करायचे हा आहे. तुमच्याशी बोलल्याने मला बरेच काही शिकता येईल असा मला विश्वास वाटतो, म्हणून हा सर्व खुलासा केला.

कृपया आपली हरकत नसल्यास आपला मोबईल नंबर मला sms करावा.माझा मोबाईल नंबर माझ्या गझलेखाली आहेच. दोघांना Suitable वेळ बघून निवांतपणे बोलू!
इथेच थांबतो.
आपल्या गझलांचा चाहता...........
...............प्रा.सतीश देवपूरकर

काय सुंदर गझल लिहिली आहे...
एकच वाटले...पहिल्यांदाच मला देवपूरकर सरांचा पर्यायी शेर तुमच्या मतल्यासाठी चांगला वाटला.
कारण त्यांनी सांगितले आहेच.
गझल खरोखर अप्रतिम..

पण, माझ्या आत्म्याला सारखे काही तरी डाचत होते. शोध घेतल्यावर पत्ता लागला की, पहिली ओळ शास्त्राला/गणिताला धरून वाटत नाही. कारण गणितात त्रिज्या वा व्यास सारखा असेल तर वर्तुळांचे परीघही (परिघांची लांबी) सारखेच असावे लागतात. असो.
>>>

काहीतरी घोळ आहे प्रोफेसर साहेब, या मतल्यात हेच म्हणायचे आहे की व्यास समान असूनही परीघ वेगवेगळे आहेत. Happy तेच त्यातील काव्य आहे. गणित व शास्त्रानुसार आपले (आपल्या दोघांचे - हे मी मला व कोणाला तरी, असे उद्देशून म्हणत आहे) आयुष्य नाहीच आहे हेच सांगितले गेले आहे. Happy

====================

पण, व्यास सारखे, पण परीघ वेगवेगळे ही कल्पना वरवर जरी अशास्त्रीय वाटली तरी, त्यातले काव्य हे काळीज हेलावणारे होते. कारण काव्यात गणिताची सूत्रे जशीच्या तशीच असावीत की नसावीत?>>>

गणिताची सूत्रे जशीच्यातशी असावीत की नसावीत हा प्रश्न रोचक आहे. याचे कारण अनेकदा गणिताप्रमाणे शेर अचूक केला जातो व केला जावा असा आग्रहही धरला जातो. पण जाणीवपूर्वक जेव्हा वेगळे लिहायचे असते तेव्हा हा आग्रह निरर्थक ठरतो. जे शेर 'दो और दो पाँच' या हेतूनेच लिहिले जातात त्यांना हे सूत्र लागू करणे गैर ठरेल.

हा शेर पहा:

बरेच झाले लिहून माझे कुणास काही दिसेचना
खडूच काळा असेल तर मग हवाच ना पांढरा फळा

यात काळा खडू ही कल्पना विचित्र आहे, पण तेच त्यातले काव्य आहे Happy

(अर्थात, हे प्राथमिक शाळेत असायचे त्या फळा खडूंबाबत आहे. आज कंपन्यांत प्रेझेन्टेशनला व्हाईट स्क्रीन आणि रंगीत मार्कर्स वापरतात त्या काळाशी निगडीत हा शेर असू शकत नाही) Happy

================================

मग माझ्या गुरूंचे वाक्य आठवले की, कोणतेही असत्य किंवा अशास्त्रीय विधान शेरात असू नये.>>>

चहाचे चांदणे, ओठांनी विजांशी झिम्मा खेळणे, 'या नवा सूर्य आणू चला यार हो', नभाचे स्वच्छंदी शब्द, मध्यरात्री हिंडणारा सूर्य, राजवर्खी व मोरपंखी दु:खे अशा अनेक अशास्त्रीय पण काव्यमय कल्पना भटांनी योजिलेल्या दिसतात.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी! आपला प्रतिसाद वाचला. धन्यवाद!
आपण नमूद केलेल्या कविवर्य सुरेश भटांच्या काव्यमय कल्पनेबाबत मी नम्रपणे काही स्पष्टीकरण करू इच्छितो.....................
अशास्त्रीय किंवा गणिताच्या दृष्टीने असत्त्य विधान गझलेत नसावे, असे मला शिकवण्यात आले; व मला ते पूर्णपणे मान्य आहे.

प्रतिभावान व प्रद्न्यावान शायराची प्रतिमासृष्टी ही अत्यंत व्यामिश्र (complex) असते. कल्पनाविलासही अत्यंत विलोभनीय असतो. त्यांच्या प्रतिमा, प्रतिके ही इतकी बहुअर्थी असतात की, शेराचा अमुक एक अर्थ असे कधी कधी मांडताच येत नाही. कारण कितीही लिहिले तरी मूळ शेर त्यापलीकडचे काही तरी ध्वनीत करत असतो. हे अत्यंत अलौकिक काव्याचे लक्षण समजले जाते.
साधारणपणे आपण आयुष्य ज्या काव्याच्या उंचीवर जगतो, त्यावर आपली प्रतिमासृष्टी व कल्पनाविलास अवलंबून असतात. म्हणूनच अलौकिक प्रतिभेच्या व प्रद्न्येच्या शायराच्या प्रतिमा व प्रतिकेही अलौकिकच असतात.

भटांच्या ज्या काव्यमय कल्पना आपण नमूद केल्या आहेत, त्यांचे संलग्न शेर मला आता आठवत नाहीत. पण ते शेर जर आपण पाठविलेत तर मी नक्कीच त्यावर खुलासे करेन. तूर्तास चहाचे चांदणे, विजांशी ओठांनी झिम्मा खेळणे, नवा सूर्य आणू, नभाचे स्वच्छंदी शब्द, मध्यरात्री हिंडणारा सूर्य, राजवर्खी व मोरपंखी दु:खे या प्रतिमासृष्टीत मला तरी कोणतीही अशास्त्रीय गोष्ट जाणवत वा डाचत नाही. मूळ शेर जर आपण घेतले तर, त्यावर निश्चीतच जास्त भाष्य करता येईल. कृपया आपल्यास ते शेर सापडले तर मला पाठवाल का? त्यावर खुलासेवार चर्चा करता येईल.

टीप: काव्यात सूर्य, चंद्र, तारे, इत्यादी प्रतिके येतातच. शेवटी स्थूल शब्दांतूनच कवी सूक्ष्म अंतीम सत्त्याचे दर्शन घडवीत असतो. तिथे सूर्याचे तापमान किती? मी कसा बुवा सूर्य होवू शकतो? असे म्हणून त्यावर अशास्त्रीयतेचा आरोप करता येत नाही. मात्र गणितीय कल्पना जर वापरली असेल, तर कवितेतील शब्दयोजना ही noncomitable असायला हवी, असे मला वाटते. असो.
मूळ शेर हाती लागल्यावर अधिक सुस्पष्ट लिहिता येईल.
तूर्तास इथेच थांबतो.
मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद!
............प्रा.सतीश देवपूरकर

बेफिकीर , बहुप्रतलीय भूमितीचा विचार केल्यास एक व्यास असणारी अगणित वर्तुळे असु शकतात. त्यामुळे हि द्विपदी योग्यच आहे. उलट मला तर वेगवेगळ्या प्रतलात असणारी एक व्यासशिवाय काहिच सामयिक नसलेली दोन वर्तुळे आली आणि ही द्विपदी आवडली. Happy

<<<भटांच्या ज्या काव्यमय कल्पना आपण नमूद केल्या आहेत, त्यांचे संलग्न शेर मला आता आठवत नाहीत.>>>

प्रोफेसर साहेब, गुरूचे शेर न आठवणे हा काव्यमय गुन्हा ठरू शकेल Happy

=========

<<<चहाचे चांदणे, विजांशी ओठांनी झिम्मा खेळणे, नवा सूर्य आणू, नभाचे स्वच्छंदी शब्द, मध्यरात्री हिंडणारा सूर्य, राजवर्खी व मोरपंखी दु:खे या प्रतिमासृष्टीत मला तरी कोणतीही अशास्त्रीय गोष्ट जाणवत वा डाचत नाही>>>

डाचत नाहीत ही गुरूप्रतीची श्रद्धा झाली.

शेर असे:

(खरे तर मलाही पाठ नाहीयेत, जमेल तसे लिहितोय)

१.

हे गर्जती तेव्हा पडे न्हाणीघरांना काळजी
हे कुंथती तेव्हा बने यांच्या चहाचे चांदणे

(चहाचे चांदणे ही संकल्पना शास्त्रीय कशी आहे हे मला समजलेले नाही)

२.

विजांनी / विजांशी ओठांनी झिम्मा खेळणे / न खेळणे हा एक शेर आहे. आठवत नाही. पण तुम्हाला (माझ्यामते) आठवायला हवा.

३.

सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या नवा सूर्य आणू चला यार हो

(नवा सूर्य कोणीही आणू शकत नाही. 'नवा सूर्य' म्हणजे मानवसृष्टीसाठी नवा मार्गदर्शक असे अभिप्रेत असल्यास 'वेगवेगळे परीघ व्यास एक आपला' हे समजण्यात अडचण येऊ नये)

४.

जरी ओठांवरी येती नभाचे शब्द स्वच्छंदी
मला बोलायची बंदी तुला ऐकायची बंदी

यात नभ, म्हणजे आकाश काही स्वच्छंदीपणे शब्द बोलते ही माझ्यातरीमते 'अशास्त्रीय' कल्पना असून वेळीच त्याबाबत हरकत घेतली जायल हवी होती. त्यावेळी हरकत न घेऊन आज इतरांच्या 'बर्‍यापैकी समजणीय' कल्पनांवर हरकती घेतल्या जाणे हे पळपुटेपणाचे लक्षण आहे

५.

हाही शेर तुम्हाला आठवत नाही आणि तुम्ही इतके काय काय लिहिता म्हणजे काय बोलायचे ते समजत नाही.

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

मानवसृष्टीपुरता, कोणताही 'सूर्य' मध्यरात्री 'हिंडताना' दिसत नाही. तो हिंडत असतो हे खरे, पण जेथे हिंडत असतो तेथील माणसांची 'मध्यरात्र' नसते

६.

हे दु:ख राजवर्खी ते दु:ख मोरपंखी

पुढे काय आहे ते आठवत नाही. पण कोणत्याही दु:खाला रंग किंवा आकार उकार नसतो. त्यातून 'प्रतिमाच' अभिप्रेत आहेत, ज्या 'वेगवेगळे परीघ' मध्ये नाही आहेत असे म्हणता येणार नाही

बहुधा हा शेरः

'मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही'

या गझलेतील असावा

बोला

-'बेफिकीर'!

<<<साती | 1 June, 2012 - 00:04
बेफिकीर , बहुप्रतलीय भूमितीचा विचार केल्यास एक व्यास असणारी अगणित वर्तुळे असु शकतात. त्यामुळे हि द्विपदी योग्यच आहे. उलट मला तर वेगवेगळ्या प्रतलात असणारी एक व्यासशिवाय काहिच सामयिक नसलेली दोन वर्तुळे आली आणि ही द्विपदी आवडली. >>>

साती,

घंट्याची बहुप्रतलीय भूमिती

आज दिवसभर डोक्यात ह्या गझलेचा मतला घोळतोय... झिंग चढ्ल्या सारखा!

प्रत्येक वेळी तोंडून "क्या बात है" अस बाह्ररे पडतय! हॅट्झ ऑफ बेफीजी!

माझ्या आवडत्या दहात टाकण्या शिवाय गत्यंतर नाही! Happy

घंट्याची बहुप्रतलीय भूमिती >>>> Rofl

सतीश देवपूरकर,

>> अशास्त्रीय किंवा गणिताच्या दृष्टीने असत्त्य विधान गझलेत नसावे

व्यास केवळ वर्तुळालाच असतो असे नाही. लंबवर्तुळास अनेक व्यास असतात. त्यातले न्यूनतम आणि महत्तम हे दोन महत्त्वाचे असतात.

त्यामुळे एक व्यास असलेली अनेक लंबवर्तुळे संभवतात! Happy

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : 'घंट्याची लंबवर्तुळे' असे कोणी म्हणाले तर त्या व्यक्तीलाच घंट्याच्या लंबवर्तुळांवर एक गझल रचावी लागेल! बोला कोण घेतंय च्यालेंज? Wink

बेफिकीरजी! आपला प्रतिसाद वाचला. त्यावर मी नम्रपणे काही स्पष्टीकरण करू इच्छितो.................

प्रथम मी दोन गोष्टी नमूद करतो, म्हणजे तुमच्या मनातील समज/गैरसमज स्पष्ट होतील.
पहिली गोष्ट म्हणजे तुमचा मतला हा काळीज हेलावणारा आहे, हे मी प्रथमच कबूल केले आहे. मी फक्त पहिल्या ओळीतली अभिव्यक्ती (तुमच्या अर्थाला इजा न पोचवता) बदलली, कारण त्यातील गणितीय सूत्राचा मान राखला जावा म्हणून. गणितीय वा शास्त्रीय प्रतिमा वा प्रतिके वापरू नयेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. गणित वा शास्त्र हे देखिल मानवी जीवनाचे भाग आहेत. ते काव्यात निश्चितच येवू शकतात. पण आपण त्या प्रतिमांचा वापर किती कलात्मकरित्या करतो हा खरा प्रश्न आहे!

वेगवेगळे परीघ, व्यास एक आपला!
ऎवजी,
का न सारखे परीघ? व्यास एक आपला!! असा बदल मी सुचवला. वरील दोन्ही ओळीत अर्थ एकच आहे, जो आपणास अपेक्षित आहे. काव्य देखिल तितकेच दर्जेदार आहे. फक्त मी अभिव्यक्तीत बदल केला, अर्थ, काव्य तेच ठेवले! व गणितीय सूत्रांचा देखिल मान राखला! असे केल्याने चोखंदळ रसिकांनाही या शेरावर हरकत घेता येवू नये! असो.

अशास्त्रीय कल्पना म्हणजे चुकीच्या कल्पना. मूळ विचारातच चूक असते. शेवटी शास्त्र म्हणजे तरी काय, कुठल्याही गोष्टीचा systematic (व्यवस्थित) अभ्यास! काव्याचे पण शास्त्र असतेच ना? (काव्यशास्त्र).
शास्त्रीय संकल्पनेत विचारांचा अचूकपणा, व्यवस्थीतपणा, नीटनेटकेपणा इत्यादी गोष्टी येतात.

काव्यात प्रतिमा या कधीच शब्दश: घ्यायच्या नसतात. त्यांच्या अर्थांच्या छटा, ध्वन्यार्थ हा महत्वाचा असतो. त्या शब्दांची योजना किती कलात्मकरित्या केली आहे, यावर त्या प्रतिमांचे सौंद-य व सामर्थ्य स्पष्ट होते. अलौकिक काव्यात अलौकिक प्रतिमांचा कलात्मक वापर असतो व त्या काव्याची वीण घट्ट असते. अशा काव्याचा पोत देखिल अलौकिकच असतो...शब्दांच्या पलीकडचा. असो. जे उचंबळून आले, ते मी उतरवून काढत आहे. माझे काही चुकले असल्यास माफ करावे..........................

आता मी भटांचे जे शेर आपण नमूद केलेत, त्यांच्याकडे वळतो...............

प्रथम मी हे कबूल करतो की, हे सर्व शेर मला घाईगडबडीत आठवू शकले नाहीत, तेव्हा आपण म्हणता त्याप्रमाणे, गुरूंचे शेर लक्षात न ठेवण्याचा काव्यमय गुन्हा माझ्या हातून झाला आहे, हे कबूल करतो.त्याबद्दल क्षमस्व!
(अहो मी आहे मास्तर, काय काय लक्षात ठेवू? भूशास्त्राचा बराच बोजा डोक्यावर आहेच. सुदैवाने LCD सारखे तंत्र मदतीला असल्याने मेंदूवरचा माहितीचा ताण थोडा कमी करता येतो. असो.)

आता भटांचा एकेक शेर, तुम्ही नमूद केलेला, घेतो व त्यांचा मला उमगलेला अर्थ माझ्या परीने लिहितो...................

शेर नंबर१:
“हे गर्जती तेव्हा पडे न्हाणीघरांना काळजी;
हे कुंथती तेव्हा बने यांच्या चहाचे चांदणे!”

शेराचा अर्थ उलगडण्याआधी, एक गोष्ट स्पष्ट करतो, ती म्हणजे समग्र शेराचा ध्वन्यार्थ हा लक्षात घ्यायचा असतो.पहिल्या अर्ध्या ओळीचे, दुस-या अर्ध्या ओळीचे, दुस-या मिस-याचे contribution किती, हे गौण आहे, जे, ज्याच्या त्याच्या लेखनकसबावर अवलंबून असते. शेवटी समग्र शेर काय बोलतो, हे महत्वाचे! शेरातील काव्यमय कल्पनाच शेराला बोलके करतात. एका शेराचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या लोकांना उमगू शकतात. हा तर कामयाब शेराचा मुख्य गुणविशेष! या अर्थाने कामयाब शेर हे साधेसुधे विधान (statement) कधीच नसते. प्रतिके (शब्द) बाजूलाच राहतात, व अर्थांचे पदर प्रकट होतात. रसायनशास्त्रात catalyst असतात ना तसे.

आता या शेराचा अर्थ उलगडण्याआधी त्यातील भटांनी वापरलेले शब्द व त्यांच्या अर्थांच्या छटा पाहू, म्हणजे शेराची नेमकी पोच, उंची, सौंदर्य वगैरेंचा आपणास बोध होईल..........
“गर्जती” म्हणजे गर्जना करणे, मोठमोठ्याने ओरडून बोलणे, गाजावाजा करणे
“न्हाणीघरे” स्नानगृहे
“कुंथणे” संस्कृत शब्द आहे कुंथ म्हणजे शक्ती खर्चून एखादे काम करताना मोठ्याने कण्हणे, किंवा सुरू केलेल्या कार्यात विघ्न आल्यास खेद करणे.
“चांदणे” म्हणजे चंद्रप्रकाश किंवा ग्रहांचा प्रकाश.

आता मला उमगलेला शेराचा अर्थ सांगतो.............
श्री. सुरेश भटांना मी खूप जवळून पाहिले आहे. त्यांना येणा-या कटू, गोड अनुभवांचा मी साक्षीदार आहे. भट हे फार ऎसपैस होते. निर्भीड होते. रोखठोक होते. जे पोटात असायचे तेच त्यांच्या ओठांवर यायचे. या त्यांच्या पिंडामुळेच त्यांची शब्दकळा, लेखनशैली ही खास ठसकेबाज अशीच आहे. हा शेर त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

भटांच्या लहरी स्वभावामुळे काळाचे गणित त्यांच्या कधीच लक्षात यायचे नाही. त्यांचे चाहते सुद्धा, सुखाने, सर्व सोसायला तयार व्हायचे. पण सगळेच लोक काही असे नसतात. तेव्हा भटांनी, त्यांना, काही काही घरात आलेला अनुभव या शेरात मांडलेला आहे. समजा ते सकाळी सकाळीच एखाद्याच्या घरी गेले आहेत, जेथे सकाळच्या आंघोळ्या पांघोळ्या उरकायची लगबग चालू आहे. पहिल्या चहापाण्याची लगबग चालू आहे, व भट साहेब त्यांच्या नेहमीच्या काव्यकैफात आहेत. त्यांना वाटते चहा जर मिळाला, तर गप्पांना अजून रंगत येईल, आणि ते धाडधाड शायरी बोलू लागतात. पण इकडे घरातील लोकांची आंघोळीची गडबड चालू असते. जणू काही न्हाणीघरांना काळजी वाटत आहे की, या आंघोळ्या कधी उरकायच्या आता. अचानक आलेल्या भटरूपी विघ्नामुळे काही लोक मनातून खिन्न होतात व म्हणून शेवटी कुंथत, कुंथत, मनातून कण्हत का होईना, पण एकदाचा चहा करून तो भटांपुढे ठेवला जातो. म्हणजेच त्यांच्या चहाचे चांदणे एकदाचे (बनते) पडते! आपण म्हणतो ना कधी कधी की, “उजेड पडला एकदाचा!” तसे भट म्हणतात कुंथत कुंथत का होईना, पण चहा बनवण्याच्या चांदण्याचा उजेड एकदाचा पडला शेवटी!

माणसांची गर्जना, बोभाटा, गाजावाजा करत नित्याची कामे उरकण्याची सवय, नित्य कामाची देखिल अनाठायी काळजी, कामात छोटासा जरी अडथळा आला तरी खिन्न होण्याची प्रवृत्ती, जिवास त्रासून घेण्याची, कण्हण्याची म्हणजेच कुंथण्याची सवय, एखाद्या क्षुल्लक कामाचा (उदाहरणार्थ इथे चहा बनविण्याचा) शेवटी एकदाचा उजेड पडणे (चहाचे चांदणे पडणे) इत्यादी गोष्टींना अतिशय समर्थपणे भटांनी या शेरात अभिव्यक्त केले आहे.
आता इतके लिहिल्यावर, या शेरात काहीही अशास्त्रीय आहे,जे कुणास डाचेल असे मला तरी वाटत नाही. बाकी मी रसिकमायबापांवर सोडतो..............
.................................................................................................
शेर नंबर२:
शेर आठवला बर का भूषणजी......
“ हा कसा झिम्मा विजांशी ओठ माझे खेळती?
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले?”
वा, वा, वा! काय नखरा! काय डौल! काय नजाकत! काय ठसका! भटसाहेब,
हे फक्त तुम्हीच लिहू शकता! आम्ही सामान्य रसिक/कवी फक्त चकीत होणार,
अवाक् होणार!
हे सर्व लिहिताना भूषणजी, माझे अंत:करण भरून आले आहे. डोळे पाणावले आहेत. अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. धन्य ती शब्दकळा आणि धन्य आमचे गुरुवर्य!
आता माझ्या परीने अर्थ उलगडतो..........

इथे भट साहेबांनी वापरलेल्या प्रतिमा अशा आहेत.........
ओठ विजांशी झिम्मा खेळतात, अंतरंगात माझ्या कोणते आकाश पान्हावले?
आता शब्दांचे अर्थ पाहू..........
झिम्मा/झिंमा- हा एक मुलींचा खेळ आहे.किंवा त्याचा अर्थ असाही होतो की, एखाद्याच्या घरी भुतांनी खेळणे, किंवा भुतांनी घरात धिंगाणा मांडणे.
पान्हणे, पान्हवणे, पान्हविणे, पान्हेणे म्हणजे पान्हा सोडणे, पान्हा फुटणे.
पान्हवण म्हणजे पान्हा सोडावा म्हणून गाय, म्हैस इत्यादींना दिलेले आंबोण.
लाक्षणीक अर्थ- मन वळवण्याकरता दिलेले बक्षीस किंवा लाच.
पान्हवणकरीण म्हणजे आंबोण दाखविल्याशिवाय जी कधी पान्हा सोडत नाही अशी गाय किंवा म्हैस.
पान्हा म्हणजे मातृवात्सल्यामुळे जनावराच्या कासेतून दूध उतरणे, किंवा अपत्यप्रेमाने मातेच्या स्तनातून दूध जोराने वाहणे, किंवा दयेने अंत:करणास येणारा कळवळा.
पान्हा आणणे म्हणजे बळेच कळवळा उत्पन्न करणे.
पान्हा घालणे-धरणे-पळविणे-सोडणे म्हणजे गाईने पान्हा चोरणे.
पान्हा फुटणे म्हणजे स्तनातून दूध वाहू लागणे.
पान्हाचोर किंवा पान्हेचोर म्हणजे पान्हा चोरणारी गाय, म्हैस इत्यादी.
पान्हेरी म्हणजे पाणपोई.
(हे सर्व अर्थ अशाकरता दिले आहेत म्हणजे पान्हावले या शब्दाच्या अर्थांची प्रसरणशीलता लक्षात यावी!)

आता या समग्र शेराचा मला उलगडलेला अर्थ पाहू..........

भट साहेब एका ट्रान्समधे लगेच जायचे! अशाच अवस्थेत असताना ते म्हणतात की, माझे ओठ विजांशी झिम्मा कसा काय खेळू लागले? कोणते बरे आकाश माझ्या अंतरंगात/हृदयात पान्हावू लागले आहे?

इथे अलौकिक शयराचे अलौकिकत्व प्रचीत होते, कसे ते पहा..............
जेव्हा आकाश दाटून येते, पाऊस पडायचा असतो, तेव्हा विजा आकाशात लकाकतात. प्रत्येक वेळी क्षणभरच लकाकतात, जेव्हा संपूर्ण आकाश, धरणी, सगळा आसमंत क्षणभरच पण उजळून निघते!
वीज ही एक विद्युतशक्ती आहे, जिच्यामुळे प्रखर प्रकाश पडतो. भट म्हणत आहेत माझ्या अंतरंगात कोणत्या प्रतिभेचे, कल्पनाविलासाचे आकाश दाटून आले आहे? कोणते आकाश पान्हावले आहे? म्हणजेच माझ्या अंतरंगात प्रतिभारूपी आकाशाचा पान्हा दाटून आला आहे. म्हणूनच माझ्या ओठांवर अलौकिक शब्दांच्या विजा लकाकू लागल्या आहेत. आकाश, विजा ही अलौकिकतेची प्रतिके आहेत(divine). म्हणजे जणू माझे ओठ त्या क्षणभरच लकाकणा-या अलौकिक शब्दरूपी विजांबरोबर जणू (लहान निरागस मुलामुलींप्रमाणे) झिम्मा खेळू लागले आहेत.

इथे भटसाहेब, त्यांच्या चिंतनसमाधीचे वर्णन, त्यांच्या ठसक्यात सांगत आहेत, ज्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या तोंडून वर लिहिलेल्या ओळींचा/शेराचा जन्म झाला आहे.
इथे पान्हावणे शब्द फार महत्वाचा आहे, कारण पान्हा शब्दात वात्सल्यप्रेमामुळे दाटून येणारे दूध अशी शेड आहे. आकाश पान्हावणे म्हणजे प्रतिभारूपी आकाशाचे अलौकिक कल्पना, शब्दांनी दाटून येणे, कुणासाठी तर शायरासाठी, खुद्द भटांसाठी.
प्रतिभेच्या व कल्पनाविलासाच्या बाबतीत भट स्वत:ला लहान मुलांची भूमिका घेतात, ज्यांच्यासाठी आकाश पान्हावले आहे. जणू ते अलौकिक शब्दरूपी दूध त्यांच्यासाठीच अंतरंगात अवतरले आहे.
या शेरात कुठलीही अशास्त्रीय कल्पना मला तरी दिसत नाही.
...................................................................................................
शेर नंबर३:
“सूर्य केव्हाच अंधारला यार हो!
या, नवा सूर्य आणू, चला यार हो!!”

इथे “सूर्य” ही प्रतिमा प्रथम समजून घेवू...........
सूर्य एक तारा आहे. या सद्ध्याच्या विश्वात (8 to 10 billion years old) अनेक (billions) आकाशगंगा आहेत, ज्यातली एक म्हणजे आपली आकाशगंगा-(milyway galaxy), जिच्यात असंख्य (many billions) सूर्य व त्यांच्या सूर्यमाला आहेत. त्यातील एक सूर्य व त्याची सूर्यमाला म्हणजे आपली सूर्यमाला होय. या सर्व आकाशगंगा, सर्व सूर्य, सूर्यमाला या सतत गोल गोल विश्वाच्या केंद्राभोवती फिरत असतात. आपल्या सूर्याबाबत बोलायचे झाल्यास तो पृथ्वीवरील चराचर सृष्टीला बळ देणारा, जगवणारा आहे. (सूर्यालाही जन्म, मरण चुकले नाही) सूर्याचे काम प्रकाश देणे हे असते. पण सूर्याचा प्रकाश जेव्हा मंदावतो, म्हणजेच आपल्याला पृथ्वीवर अंधारल्यासारखे वाटते, तो सूर्यही बिनउपयोगाचा वाटू लागतो, तेव्हा अशा वेळी भट म्हणतात की आहो, सूर्य काय एकच आहे काय? अनंत सूर्य आहेत या विश्वात! तेव्हा मार्गदर्शनासाठी, या सूर्याचीच काय गरज? चला दुसरा सूर्य (दुस-या सूर्यमालेतला) घेवून येवू!

एखादी व्यक्ती ही सूर्यासारखी तेजस्वी असते. मार्गदर्शक असते. हितावह वाटते. पण काही काळानंतर हा सूर्यही स्वत:च निस्तेज होवू लागतो. अशावेळी दुसरा सूर्य आणण्याची गरज निर्माण होते. म्हणून भट म्हणतात, चला यारांनो, नवा सूर्य आणू या! इथे भटसाहेब “यार” शब्द वापरतात. यार म्हणजे जिवाभावाचे मित्र! इथे भटांचा जगाविषयीचा कळवळा व प्रेम दिसून येते.
आता या शेरातही मला काहीही अशास्त्रीय दिसत नाही.
..................................................................................................
शेर नंबर४:
“जरी ओठांवरी येती, नभाचे शब्द स्वच्छंदी;
मला बोलायला बंदी, तुला ऎकायला बंदी!”
स्वच्छंदी म्हणजे स्वत:ची इच्छा, लहर, हट्टी, लहरी, स्वैर, स्वतंत्र.
इथे भट स्वत:ची व त्यांच्या चाहत्यांची होणारी घुसमट व्यक्त करीत आहेत. नभाचे शब्द स्वच्छंदी म्हणजे नभासारखे अलौकिक, स्वतंत्र असे शब्द जरी मला सुचले तरी मला हे लोक ते बोलू देत नाहीत व माझ्या चाहत्यांनाही ते ऎकायची बंदी आहे, असे वातावरण भोवती आहे, असे भट म्हणत आहेत.
इथे आकाश काही स्वच्छंदी शब्द बोलते आहे अशी मुळी कल्पनाच नाही. नभाचे स्वच्छंदी शब्द म्हणजे नभासारखे (अलौकिकतेचे प्रतिक) दैवी, स्वत:चे, स्वतंत्र शब्द जरी ओठांवर आले तरी, ते मी बोलू शकत नाही व माझा चाहता म्हणून तुलाही ऎकायची बंदी आहे.
तेव्हा या शेरातही मला काहीही अशास्त्रीय वाटत नाही.
.....................................................................................................
शेर नंबर ५:

“माणसांच्या मध्यरात्री हिडणारा सूर्य मी!
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!!”
क्या बात है! भट साहेब! त्रिवार वंदन आपल्या प्रतिभेला! प्रद्न्येला! आपल्यातल्या गझलकाराला!
(अवांतर: सूर्य हे प्रतिक माझ्या गुरूंचे व माझेही आवडते आहे.)
इथे भट साहेब स्वत:ला सूर्याची उपमा अभिमानाने देत आहेत, जी सार्थच आहे. पण, ते म्हणतात की, मी कोणता सूर्य? तर, जो, माणसे जेव्हा मध्यरात्री निद्रिस्त असतात, तेव्हा पेटत रहातो. तो सूर्य म्हणजे मी.

मीरूपी सूर्याचे पेटणे हे मी किती प्रकाशमान, दैदिप्यमान आहे हे दाखविण्यासाठी नसून, ही जी जगातली निद्रिस्त माणसे आहेत, त्यांच्यासाठी आहे. मध्यरात्र झाल्यासारखी ती माणसे झोपली आहेत. पण त्यांना उठल्यावर उजेडासाठी मी रात्रभर पेटत आहे. हा पेटण्याचा सोहळा माझ्यासाठी मुळीच नाही.

आता येथे सूर्य, पृथ्वी, पृथ्वीचे स्वत:भोवतीचे व सूर्याभोवतीचे फिरणे, सूर्योदय, सूर्यास्त, त्यामुळे होणारे दिवस व रात्र या शारिरीक वा शास्त्रीय बाजू होत. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी या ओळीत कोणताही सूर्य मध्यरात्री हिंडताना दिसत नाही, किंवा तो हिंडत असतो तेथे माणसांची मध्यरात्र नसते, असा निम्नस्तरीय अर्थ काढून या शेरावर अशास्त्रीयतेचा शेरा मारणे गैर आहे.
मध्यरात्र हे निद्रिस्तपणाचे प्रतिक आहे. सूर्य, शुद्धीत, जागे असण्याचे प्रतिक आहे. सूर्याच्या अंतरंगातील ज्वलन, ज्यामुळे प्रकाश पडतो, त्याला पेटण्याचा सोहळा असे म्हटले आहे. ते म्हणतात मध्यरात्र झाल्यासारखे हे लोक झोपले आहेत पण त्यांना जाग आणण्यासाठी मी सूर्य होवून पेटत आहे. हा माझा पेटण्याचा सोहळा माझ्या स्वत:साठी नसून या निद्रिस्त जगासाठी आहे.
तेव्हा या शेरात देखिल मला कुठलीही अशास्त्रीयता दिसत नाही.
.....................................................................................................शेर नंबर६:
“हे दु:ख राजवर्खी.....ते दु:ख मोरपंखी!
जे जन्मजात दु:खी, त्यांचा निभाव नाही!”
निभाव (लागणे) म्हणजे तग धरणे, टिकून राहणे.
या शेरात भटांच्या लेखणीची धार दिसून येते. दु:ख व दु:खी माणसे यांवर ते बोलतात. दु:खांची वर्णने त्यांनी त्यांच्या विशेषणातून थोडक्यात केली आहेत.
काही दु:खांना ते राजवर्खी म्हणतात. राजवर्खी शब्दात राज+वर्खी असे दोन शब्द आहेत. वर्खी म्हणजे वरवर दिसणारे, वरवरचे, surfacial दर्शनी.
राज म्हणजे राजा. काही दु:खे ही राजबिंडी असतात, राजेशाही असतात. आता राजाला कोणते दु:ख असणार? तो तर सर्वात सुखात असणार. पण त्याला सुद्धा सुख बोचते व त्याला ते म्हणजे दु:ख वाटू लागते. त्याला भट साहेब म्हणतात राजवर्खी दु:ख!
काही दु:खे मोरपंखी असे ते म्हणतात. म्हणजे शोभिवंत दु:खे! रंगबिरंगी दु:खे! देखणी दु:खे! नाजूक दु:खे! हवी हवीशी वाटणारी दु:खे! इत्यादी. वरील दोन्ही प्रकारची दु:खे ही खरी दु:खे नव्हेतच, असे भट जणू म्हणतात. या दु:खांचे निवारण होवू शकते. परंतू जे लोक जन्मापासून दु:खी असतात अपंगत्वामुळे, गरिबीमुळे, जवळच्या माणसांच्या अकाली मृत्यूमुळे इत्यादी, त्यांच्या दु:खांवर उपाय करणे अवघड असते. अशा लोकांचा निभाव वा टिकाव लागणे मात्र अवघड असते असे भट म्हणतात. या शेरातही कुठलेही अशास्त्रीय विधान नाही.

आता दु:खांना आकार, उकार, रंग नसतात, असे म्हणणे अकाव्यात्मक, सपाट व गद्य वाटते. सुख, दु:ख, वेदना, ठणका, बोच इत्यादी भावना आहेत, ज्यांना अनेकविध रंग असतात, ज्यांचा प्रत्यय सशक्त कवीस येतो. तेव्हाच भटांसारखी शैली जन्मास येते! या सर्व सूक्ष्म (abstract) गोष्टी आहेत. त्यांच्यावर स्थूलतेचा आरोप करून, कवी त्या भावना जिवंत करतात. फक्त त्यासाठी हवे प्रतिभावान शब्द व अलौकिक अभिव्यक्ती! असो.

बेफिकीरजी! माझ्या बालबुद्धीला जे जमले, तेवढे लिहिले! बाकी सर्व मी जाणकार रसिकमायबापांवर सोडतो. बेफिकीरजी, आपण एक श्रेष्ठ, ज्येष्ठ (वयनिरपेक्ष), दमदार व समंजस गझलकार आहात. म्हणून वरील लेखनप्रपंच!
काही चूक असल्यास आपण क्षमा करालच. आपली प्रांजळ मते कृपया कळवावीत!
.............प्रा.सतीश देवपूरकर

अवांतर: बहुप्रतलीय भूमिती, बहुप्रतलीय वर्तुळे इत्यादी आकर्षक गणितीय संकल्पनांबद्दल वाचले. पण इतक्या गणितीय खोलात जाण्याची आवश्यकता नाही. नवरा-बायको, मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी हे जेव्हा एका प्रतलात म्हणजेच एका plane मधे येतात, तेव्हाच ते नात्यांच्या बंधनात अडकतात. पण दोन वेगवेगळ्या व्यक्ती या मुळातच दोन वेगळे जीव असल्याने, कधीच सारखे, एकरूप वा एकजीव असूच शकत नाहीत हे अंतीम सत्त्य व वास्तव आहे, जे भूषणरावांच्या मतल्यात सुंदरपणे व समर्थपणे मांडले आहे. आपण जगतो, अनुभवतो, पहातो ते बहुप्रतलीयच असते. फक्त अंध, बहिरे व अपंग लोक मात्र बिचारे त्यास दुर्दैवाने अपवाद असतात.
इथेच थांबतो! आपण ज्या सोशिकतेने माझा प्रदीर्घ प्रतिसाद वाचलात त्याबद्दल धन्यवाद! असाच लोभ असू द्या!
..........प्रा.सतीश देवपूरकर

गझल असो किंवा कविता असो, शेवटी त्या कलाकृतीने रसिकांच्या काळजाचा ठाव घ्यावा असे अपेक्षित असते. त्यासाठी अत्यंत परिणामकारक अभिव्क्तीची आवश्यकता असते, अनुभवाची प्रामाणिकता लागते व थांबण्याची तयारी असावी लागते. भाषा सरळ, सोपी व थेट हृदयाला भिडणारी असावी लागते. मिस-यांवर सखोल चिंतन करावे लागते, म्हणजे शेरातील दोन्ही मिसरे एकजीव होतात व शेर कामयाब होतो!
या धरतीवरच, मी या तुमच्या गझलेचे बहुतेक उले मिसरे वेगळ्या त-हेने लिहिले आहेत. पहा कसे वाटतात ते..................................

का न सारखे परीघ? व्यास एक आपला!
एवढाच दैवदुर्विलास एक आपला!!

कापताच नाळ मी, असाच श्वास घेतला!
अंत आणतो असाच श्वास एक आपला!!

राहते चिमूट लेखनात कोणती तरी;
कागदात आखतो समास एक आपला!

माझियाच शायरीमुळे कसा अतृप्त मी?
हाच वाटला मला विकास एक आपला!

वेगळे असेलही मनामधे तुझ्या सखे;
मांडला असाच मी कयास एक आपला!

तू तुझ्याच वर्तुळात! माझियामधेच मी!
हाच एक प्रश्न, हाच त्रास एक आपला!!

याद यायला नको, म्हणून मद्य घ्यायचे;
विस्मरायचा तुला प्रयास एक आपला!!

रोज मी नवा तुला! नवीन रोज तू मला!
रोज लागतो नवा, तपास एक आपला!!

भेट आपली कशी दडून राहणार ही?
हा तुझा सुवास आसपास एक आपला!

ताट आपल्या समोर आपले हिरावते!
पोचला मुखात तोच घास एक आपला!

ध्यास राहिला न आस राहिली मनामधे;
राहतो जगात मी उदास एक आपला!

कोणता ऋतू कसा असेल कोण जाणतो?
मी कसे म्हणू? वसंतमास एक आपला!

कोणती नशा तुझ्यात, मोहिनी जिची मला;
तू हवीस! तू हवीस! ध्यास एक आपला!

मोहरेन मी! तुझा कृपाकटाक्ष पाहिजे!
टाक ना कटाक्ष दिलखुलास एक आपला!

बेफिकीर, काय शान जीवनामधे तुझ्या!
अंत कर असाच तू झकास एक आपला!!
.........................................................................................................
टीप: दोन मिस-यांमधील नाते जेवढे अस्पष्ट, धूसर, तितका शेर, मिसरे सुंदर असूनही संदिग्ध व कमकुवत होतो. शेरातील दोन्ही मिसरे जितके एकजीव होतात तितका शेर सुंदर, स्पष्ट, बोलका व खणखणीत होतो! केवळ हीच एक बाब ध्यानात घेवून मी वरील शेर दिले आले आहेत. सर्व शेरात तुमचाच अर्थ असेल असे नाही!
केवळ अन्य अभिव्यक्तीतले independent शेर म्हणून ते वाचावेत. आपली मते मिस-यांच्या एकजीवतेबद्दलची जरूर कळवावीत. वाचायला आवडेल!
.............प्रा.सतीश देवपूरकर

बेफिकीर,

आपण अजूनही काही बोलू इच्छिता ह्यावर? माझ्या अंदाजाप्रमाणे प्रोफेसरांच्या वरील प्रवचनानंतरच आपण बाम चोळत बसला असावात. शुभेच्छा!

देवपूरकरांच्या संपूर्ण प्रतिसादात मला अतोनात कृत्रिमता दिसून आली.

<<<भटांच्या लहरी स्वभावामुळे काळाचे गणित त्यांच्या कधीच लक्षात यायचे नाही. त्यांचे चाहते सुद्धा, सुखाने, सर्व सोसायला तयार व्हायचे. पण सगळेच लोक काही असे नसतात. तेव्हा भटांनी, त्यांना, काही काही घरात आलेला अनुभव या शेरात मांडलेला आहे. समजा ते सकाळी सकाळीच एखाद्याच्या घरी गेले आहेत, जेथे सकाळच्या आंघोळ्या पांघोळ्या उरकायची लगबग चालू आहे. पहिल्या चहापाण्याची लगबग चालू आहे, व भट साहेब त्यांच्या नेहमीच्या काव्यकैफात आहेत. त्यांना वाटते चहा जर मिळाला, तर गप्पांना अजून रंगत येईल, आणि ते धाडधाड शायरी बोलू लागतात. पण इकडे घरातील लोकांची आंघोळीची गडबड चालू असते. जणू काही न्हाणीघरांना काळजी वाटत आहे की, या आंघोळ्या कधी उरकायच्या आता. अचानक आलेल्या भटरूपी विघ्नामुळे काही लोक मनातून खिन्न होतात व म्हणून शेवटी कुंथत, कुंथत, मनातून कण्हत का होईना, पण एकदाचा चहा करून तो भटांपुढे ठेवला जातो. म्हणजेच त्यांच्या चहाचे चांदणे एकदाचे (बनते) पडते! आपण म्हणतो ना कधी कधी की, “उजेड पडला एकदाचा!” तसे भट म्हणतात कुंथत कुंथत का होईना, पण चहा बनवण्याच्या चांदण्याचा उजेड एकदाचा पडला शेवटी!>>>

प्रोफेसर साहेब,

माफ करा, पण अतिशयच चुकीचा अर्थ आपण घेतलेला आहेत त्या शेराचा.

Sad

हे गर्जती तेव्हा पडे न्हाणीघरांना काळजी
हे कुंथती तेव्हा बने यांच्या चहाचे चांदणे

हा शेर असा आहे:

काही लोक असतात, जे प्रत्यक्षात पळपुटे असतात, मात्र सिंहाचा आविर्भाव त्यांच्या वागण्यात असतो. फसव्या व्यक्तिमत्वाचे हे लोक असतात. त्यांच्या पार्श्वभागात अजिबात दम नसतो. जेथे चालते तेथे चालवायचे अशी त्यांची प्रवृत्ती असते. पु लंच्या एका लेखात त्यांच्या वरच्या मजल्यावर राहणार्‍यांनी काहीतरी कुटायला घेतल्यावर सौ पु ल म्हणतात की वर जाऊन त्यांना जरा दम द्या. प्रत्यक्षात भांडण्याची हिम्मत नसलेले पुल नुसतेच वरच्या जिन्यात उभे राहून एक बिडी ओढतात आणि जणू काही खूप दम भरून आल्यासारखे पुन्हा घरी येऊन वरच्या मजल्यावरील माणसाच्या नावाने शिव्या देत बसतात. पुढे म्हणतात की 'हिला वाटले आपला नवरा भलताच पेटला होता, तिला काय माहीत, पेटली होती माझी बिडी'. पण हे प्रामाणिकपणे कबूल करायला पु लच असावे लागतात. जगात बरीचशी माणसे नुसतेच 'मी म्हणजे? साल्याला दाखवून देईन काय आहे ते' असे बोलणारी, पण शेपूटघाली असतात.

भट येथे (बहुधा) म्हणत असावेत की ह्यांचा पुरुषार्थ म्हणजे काय? तर हे जेव्हा ओरडतील तेव्हा फार तर घरातल्या बायका घाबरतील आणि ह्यांचा जगात थाट तर असा की जणू हे चहा पिऊन कुंथले तर यांच्या चहाचे चांदणेच होते असा.

आपल्या दोघांच्या या शेराच्या अर्थाबाबत असलेल्या भूमिका फारच वेगळ्या आहेत प्रोफेसर साहेब Happy

-'बेफिकीर'!

वाटते अनंतकाळ जो जिवंत ठेवतो
अंत आणतो असाच श्वास एक आपला >>>> या ओळींकरता दंडवतच.....

चर्चा छान चालू आहे, पण जरा आटोपशीर असावी असे वाटते - मला तरी सगळं सविस्तर वाचताना "दम" लागतोय... (कृपया हलके घेणे) - एकाच शेराचा आस्वाद वेगवेगळ्या पद्धतीने कसा घेता येतो असे वाटून गेले. सर्वांचा अभ्यास जबरदस्तच असल्याचे जाणवतेय......

हे गर्जती तेव्हा पडे न्हाणीघरांना काळजी
हे कुंथती तेव्हा बने यांच्या चहाचे चांदणे>>>>>>>>>>>>>>
बेफीजी मला न राहवून मी एकदा तुम्हाला या शेराचा मला झालेला सौन्दर्यबोध सान्गितला होता तो आठवला(*दणे -चांदणे यात झालेली गफलत वगैरे!!;))

असो गणित असो की भूमिति काहीका असेना ....(बहुप्रतलीय भूमिति वगैरे प्रतिसाद द्यायलाच आलो होतो मी पण कुणाचीतरी घन्टा आधीच वाजली आहे हे पाहून गप्प बसलो..........)......... मतला निर्विवादपणे निर्विवादास्पद आहे हे नक्की !!!

बाकी देवसर फार बोर करतायत .............. बेफीजी उगाच चिडताय्त इतकेच मला समजते आहे या सगळ्या चर्चेबिर्चेतून वगैरे वगैरे !!

Pages