लबाड कोण?

Submitted by अरुण मनोहर on 31 May, 2010 - 05:49

लबाड कोण?

उंदीरमामा ईटुक मिटुक
पळत होता दुडूक दुडूक
कपाटात चिंटुची टोपी लहान
रेशमी गोंडा भरजरी छान

पाहीले हळूच मिचकून बिचकून
येतयं का कोणी चुकून माकून
रात्र होती, सारा वाडा थकला
चिंटु आईच्या कुशीत झोपला

उचलली टोपी चटकन पटकन
पळाला उंदीर फ़ुदकण टुणकन
चढवली टोपी डोक्यात तोऱ्यात
नाचला घरभर अंगणात सज्जात

माझी टोपी झक्क! ढुम ढुम ढुमाक्क
माझी टोपी मस्त! ढुम ढुम ढुमाक्क
ऐटीत बसला होता एक राजा
म्हणला कोण वाजवतो बेंडबाजा?

काढ टोपी बारकुड्या भिकारड्या
फ़ार करतोस खोटारड्या लबाड्या
राजाने हिसकाऊन घेतली टोपडी
उंदीरमामांची वळली बोबडी

राजा नाचला ढॅन्गची ढॅन्गची
उंदीर बोलला चींगच्ची मींगच्ची
राजा भिकारी माझी टोपी घेतली
चिडून राजाने लगेच टोपी फ़ेकली

उंदराचे ढोलके ढबाम्ब ढंम्ब
टोपी उचलली धढांग ढंग्ग
ढमढम ऐकून चिंटु उठला
छानछान टोपीत उंदीर दिसला

राजा म्हणला उंदीरमामा चोर
उंदीर म्हणे हाच चोरावर मोर
ढबाम्ब ढंम्ब वाजले ढोलके
खरे लबाड दोघेही एकसारखे

गुलमोहर: 

छान Happy