दिवाळीची सुट्टी लागली की लगेच फ्लॅट्मधून बंगल्यावर रहायला जायचे ठरले. सुट्टी लागायला अजून आठ दहा दिवस आहेत. आज रविवार. दुपारी दार वाजले. दारात ओंकार होता. ओंकारच्या हातात कुत्र्याचे पिल्लू होते. आत येऊन खाली वाकून त्याने पिल्लाला खाली सोडले. तंदूर रोटीच्या रंगाचे ते छोटे पिल्लू सोडल्याबरोबर घरभर धावत सुटले. त्याच्या मागून मुलही हुंदडायला लागली. मला समजले की मुलांनी बंगल्यावर गेल्यावर कुत्रा पाळ्ण्याची तजवीज मला न विचारता अगोदरच करुन ठेवली होती.
आई, आपल्याला बंगल्यावर गेल्यावर कुत्रा पाळायला पाहिजेच की. मी ओंकारला सांगितले होते. -शंतनूने निरागसपणे म्हटले. शंतनूच्या निरागसपणात नेहमीच बनेलपणा असे.
खर म्हणजे मला मुळीच कुत्रा वगैरे पाळायचा नाहीये. पण आता शंतनूने नाही म्हणायला सवडच ठेवली नाहीये. शिवाय मी विचार केला की आज नाही तर उद्या मुल घराबाहेर पडतील. मग त्यांना कुत्रा पाळायला मिळेल की नाही कोण जाणे. काहीही असो, कुत्र्याने घरात शिरकाव तर केलेला आहे.. आता त्याचे नाव ठेवणेही भागच आहे. त्याला ताइने जातिवाचक नाव म्हणजे 'श्वान' असे नाव दिले.
आता श्वान एवढे संस्कृत नाव कोण म्हणेल? यथावकाश श्वानचा श्वान्या, मग वान्या झाला. हे चमत्कारीक नाव ऐकून लोक विचारत की याचा अर्थ काय म्हणून. तर हा बिनधास्त सांगे की हे रशियन नाव आहे, आणि रशियन भाषेत वान्या म्हणजे स्वामिनिष्ठ. बंगल्यावर नव्याने कामाला येउ लागलेली भाभीने वान्याचा अर्थ वाणी असा लावला. तिला प्रश्न पडला की हे बामणाचे कुत्रे असून याला वाणी का म्हणतात? काहीही म्हणा आता सगळी त्याला वान्या म्हणूनच ओळखतात.
आपण भारतीय तेंव्हा नुसते नाव सांगून भागणार. लगेचच पुढचा प्रश्न येतो. याची जात कुठली? खर म्हणजे याची जात वगैरे काहीही माहीती नाहीये. ओंकारने धनगराच्या पालामधे हे देखणे कुत्रे बघितले, आणि मागितले. त्यांनी नाही म्हटल्यावर सरळ पळवून आणले. याची आई धनगर होती हे नक्की. पण बापाबाबत मात्र निश्चित माहिती उपलब्ध नव्हती. डिस्कव्हरीवर मी एक गोल्डन रिट्रीव्हर जातीच्या कुत्र्याची डाक्युमेन्टरी पाहीली होती. वान्याचे रंगरूप व गुण बघून मी वानू गोल्डन रीट्रीव्हर जातीचा असल्याचे सांगायचे ठरविले. हा मात्र वानू पश्मी हाउंड असल्याचे सांगतो. थोडक्यात काय तर जरा इन्ग्लीश नावे सांगितली म्हणजे वानूला प्रतिष्ठा प्राप्त होते.
दिवाळीच्या आधीच आम्ही बंगल्यावर रहायला आलो. दिवाळीच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या बरोबर आंघोळ करुन वान्याने ताटलीतले लाडू, चिवडा, शेव चकली सगळे चाटून पुसून खाल्ल्ले.
वान्याचा रंग तंदूर रोटीसारखा गव्हाळ पण पांढरा. डोळे एकदम घारे. नाक गुलाबी. वान्याची शेपूट मात्र सुतळीसारखी आहे. खर म्हणजे मला झुबकेदार शेपटीची कुत्री आवडतात. पण जाउ दे. आता हा आलाच आहे तर छानच आहे. नंतर मात्र वान्याची शेपूट झुबकेदार झाली.
आमचा आधीचा कुत्रा बाहेर काहीतरी खाल्ल्याने मेला होता. त्यामुळे वान्याला एकटे बाहेर सोडायचे नाही असे ठरले. आणि तिथेच त्याच्या व आमच्या मधे शीतयुद्धाची ठिणगी पडली. आम्ही खपून कंपाउंडचा बंदोबस्त करायचा आणि वान्याने नव्या नव्या वाटा शोधून पळून जायचे हा आता रोजचाच खेळ झाला आहे.
वानू खरतर शंतनूचा कुत्रा आहे. तो त्याचा खास दोस्तही आहे. 'वानू वानू, शाणा मुग्गा' अस लाडाने म्हणत शंतनू त्याच्याबरोबर जमीनीवरही लोळतो. त्याला फिरायला नेतो. त्याचे लाड करतो. वान्याही त्याच्यावर खूष असतो. पण घराचा मालक शंतनू नाही तर 'तो' आहे, हे वानूला नक्की कळलय. तेंव्हा काही बाका प्रसंग असेल तर वानू 'त्याची' बाजू घेतो. मग शंतनू खूप चिडतो. वानूची ही गम्मत लक्षात आल्यावर त्याने व शंतनूने खोटेखोटे भांडायचे ठरविले. दोघे जोराजोरात भांडत व मारामारी करत होते. वान्या त्याची बाजू घेऊन शंतनूशी भांडत होता. आम्ही दोघी हसत हसत त्या दंग्यात सामील झालो होतो. दुपारची वेळ होती. दारात पोस्टमन येऊन थांबला होता. वान्याच्या लक्षात आले. तो दाराशी जाऊन भुंकायला लागला. दार उघडले तर पोस्टमन गांगरून दारात उभा होता. आम्हाला हासताना बघून म्हणाला की मी विचारातच होतो की काय करावे म्हणून. मला वाटल की घरात भांडण चालू आहेत.
तो तर वानूशी कुस्तीपण खेळतो. शड्डू ठोकून दंगा करून जोरदार कुस्ती चालते. डाव पलट्या घालून वानूची पाठ जमीनीला लावून वानूला लांघे घोटे चीत करून आसमान दाखविले जाते. एका हाताने वानूला दाबून एक हात उंचावून वानूचे आव्हान संपुष्टात आल्याच्या घोषणा दिल्या जातात. त्याने मग हात सोडला की वानू उसळी मारून उठतो. पुन्हा कुस्तीसाठी आव्हान देतो. वानूचे आव्हान कधीच संपत नाही. वानू कधीही हरत नाही. तो फार आशावादी आहे.
रस्त्यावरून जाणार्या कुठल्याही प्राण्याशी वानूचे कधीच पटत नाही. शेळ्या, मेंढ्या, कुत्री, गायी म्हशी सगळ्यांवर वानू जीव खाउन भुंकतो. घरामागच्या वालेसरांची तरणी गाय फारच मस्तीची आहे. कुणाची पर्वा नसलेल्या तरूणीप्रमाणे ती रस्त्याने उद्दामपणाने हिंडत असते. साहजिकच वानूचे व तिचे पटणे शक्य नाही. आमच्या घराच्या गेटचे काम सुरु असल्याने, गेट उघडेच असते. ही गाय बेधडक आत शिरुन झाडे खात हुंदडते. तिच्यावर चिडून आणि भुंकुन वानूचा जीव कासावीस होतो. हा एवढासा पिल्लू आणि ती मात्र ताडमाड, ती कशाला दाद देणार. ती त्याच्याकडे तुच्छतेने व उपहासाने बघते. आणि मग निघून जाते. त्या दोघांचे हे रोजचे युद्ध आहे.
आज मात्र वानूला बर नाहीये. थोडा ताप आहे आणि अंगावर पुरळ उठले आहे. तो आणि शंतनू त्याला घेउन सरकारी हास्पिटल मधे घेउन गेले आहेत. घरी आल्यावर शंतनू गप्पगप्प आहे. वान्याच्या पाठीवरून हात फिरवीत जिन्यात बसला आहे. शंतनू मला म्हणाला, आई वानूला डिस्टेंपर नावाच्या व्हायरसने गाठले आहे. मागच्या महीन्यात त्याला हास्पिटल मधे नेले होते तेंव्हाच डाक्टरांनी त्याला हा आजार झाल्याचे सांगितले होते. महीन्यानंतर पुन्हा एकदा तो आजारी पडेल व त्यातून वाचण्याची शक्यता नसते. आई तुला वाईट वाटेल म्हणून गेल्या महीन्यात तुला आम्ही काही सांगितले नाही. आई जाउ दे. आपण रडायचे नाही. काय शिकविले आहे आपल्याला, की जे आहे ते ऍक्सेप्ट करायचे. शंतनू रडक्या चेहर्याने माझी समजूत काढीत होता.
तो आणि शंतनू वानूचे ओषधपाणी करत आहेत. पण वानूची तब्बेत बिघडतच चालली आहे. गेले दोन दिवस त्याने काहीही खाल्लेले नाही. पाणीपण प्यायले नाहीये. गेटजवळच्या जास्वंदीखाली वानू निपचित पडून राहिला आहे. मी व्हरांड्यात उभी राहून हताशपणाने त्याच्याकडे बघत उभी होते. एवढ्यात वालेसरांची गाय अश्वमेधाच्या घोड्याप्रमाणे बेलगाम हिंडत रस्त्यावरून निघाली. नेहमीच्याच तुच्छतेने तिने वानूकडे बघितले. पण वानू आज भुंकला नाही. त्याने क्षीणपणाने डोळे उघडले. गाय थांबली. हळूच वानूजवळ आली. तिने खाली वाकून वानूजवळ तोंड नेले. तिच्या डोळ्यात करुणा दाटली. डोळ्यात पाणी भरले. वानूजवळ ती थोडावेळ थांबली. मग ती हळूच निघून गेली.
सकाळी 'त्याने' मन घट्ट केले. वानूचे हाल आता बघवत नव्हते. त्याने वानूला उचलून घेतले. त्याला घरभर हिंडवले. दोघे वानूला घेऊन सरकारी इस्पितळात गेले. डॅक्टरांना म्हणाले, आता याचे हाल बघवत नाहीत. याला इंजक्शन देउन झोपवून टाका.
चौकोनी चेहर्याचा आणि बीडी ओढत स्टुडंट्सना शिकविणारा हा डोक्टर दिसायला व बोलायला रफ टफ पण फार चांगला होता. त्यांनी ह्या दोघांकडे खालीवर बघितले. मग म्हणाले, हा मुलगा आहे ना तुमचा. उद्या तुम्ही म्हातारे झाल्यावर असच म्हणायच का त्यानी? अस नाही करायच तुम्हाला बघवत नाही म्हणून याला नाही झोपवायच. मी औषध लिहून देतो. घेऊन या. प्रयत्न करून बघूया.
वानू परत घरी आला. तीन चार दिवस त्याला तोंड उघडून तासातासाने थोडे थोडे पाणी घालून मग उभे धरून, पाठीपोटावरून हात फिरवीत ते खाली पोटात गेल्याची खात्री करून मग खाली ठेवायचो. चार दिवसांनंतर वानूने स्वत: पाणी प्यायले. वानू बरा व्हायला लागला. पण या आजारपणात त्याची श्वसनसंस्था व प्रतिकारशक्ती मात्र नाजूकच राहून गेली. (क्रमशः)
वान्या - भाग १
Submitted by bedekarm on 2 April, 2008 - 16:07
गुलमोहर:
शेअर करा
उत्तम.... आवड
उत्तम....
आवडला तुमचा वान्या!
malapan avadala vanya......
malapan avadala vanya......
छान लिहिते
छान लिहिते आहेस वान्याबद्दल..
वानू.
वानू. वालेसरांची गाय व आजारी वानू यांची भेट छान लिहीली आहे. प्राण्यांची मूकभाषा. पटापट लिहा पुढचा भाग.
तुमच्या
तुमच्या वान्याबद्द्ल वाचून मला माझ्या श्वानसख्याची आठवण आली... खुपच नाजुक नातं असतं हे.. खुप छान लिहिता आहात.. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.
आशिष दामले
वरीष्ठ सल्लागार, मानवाधिकार आयोग, अफगाणिस्तान
वा छान!
वा छान!
मीना, किती
मीना, किती स्तुती करावी कळत नाही. तुझ्या लेखणीत जीव आहे.
देव ह्या वान्याला वाचवो!
- बी
मीनाताई,
मीनाताई, सहजसुंदर लिहीताय.
एक विनंती करू का? तुमच्या कथनात काही ओळी चालू वर्तमानकाळात तर काही भूतकाळात अश्या सरमिसळ होवून येत आहेत. ते टाळता आलं तर वाचताना निष्कारणच होणारा रसभंग टळेल. एक तर सगळाच वृत्तांत भूतकाळात देता येईल, किंवा 'डायरी' सारखं लिहीलं तर मग सगळेच प्रसंग चालू वर्तमानकाळात लिहीता येऊ शकतील.
अर्थात, हा जुजबी (minor) बदल आहे. तो मुद्दा वगळता मला तुमचा वान्या आवडला.
पुढच्या भागाची वाट पहात आहे.
स्वाती,
स्वाती, तुझ निरीक्षण आणि टिपणी अचूक आहे. खर म्हणजे मी प्रथम भूतकाळाचाच वापर करून लिहायला सुरुवात केली. मग मला हे सगळ आत्ता घडत आहे अस मांडाव अस वाटू लागल. त्यामुळे काळांची सरमिसळ झाली, ती तशीच राहू दिली. अजून हे तंत्र मला नीट जमत नाहीये. पण बघू पुढे कस जमत ते. सगळ्यांचेच उत्साहवर्धक अभिप्रायाबद्द्ल आभार.
मीना
नमस्कार, इथ
नमस्कार,
इथपर्यंत छान वाटले, पण पुढे वान्याचे काय झाले त्याची काळजी लागून राहीली आहे.
शंतनूच्या
शंतनूच्या निरागसपणात नेहमीच बनेलपणा असे.
>>>>
एकदम पटलं.
खूप छान लिहिलय. मला आमच्या काळ्याची आठवण झाली. त्याचे पण शेवटी हाल बघवत नव्हते. पण तुमचा वानू बरा होतोय हे व्हाचून बरे वाटतय.
खुप आवडले!!
खुप आवडले!!
मीना ताई, आज परत वान्या
मीना ताई,
आज परत वान्या वाचायला घेतला. तुमचा लेख १ वर्षापुर्वी वाचला आणी माझ्या लेकीचा कुत्रा पाळण्याचा हट्ट पुरवला. खरच आम्ही सगळे जाम खुश आहोत आमच्या पपी वर.
(No subject)
सगळ्यात पहिले सिंडरेलाचे
सगळ्यात पहिले सिंडरेलाचे मनापासून आभार .... (या लेखनाची लिंक दिल्याबद्दल)
बेडेकरांच्या लेखणीचे वैशिष्ट्य असे आहे की एकदा पहिला भाग वाचायला लागले की मग शेवटचा भाग येईपर्यंत थांबताच येत नाही...
"वान्या" हा केवळ तुमचाच न रहाता सार्या वाचकांचाच होऊन रहातो .....
केवळ ग्रेट लिखाण - कौतुकाला शब्द अपुरे पडताहेत हो ......
शशांक, तू तिथे मी >> वरच्या
शशांक, तू तिथे मी >> वरच्या शब्दा शब्दाला थेट अनुमोदन
नविन वाचकांसाठी पुन्हा वर
नविन वाचकांसाठी पुन्हा वर आणतोय .....
छान लिहिलंय वानुबद्दल. सगळे
छान लिहिलंय वानुबद्दल. सगळे भाग वाचते आता.
मधेमधे तो असा उल्लेख का केलाय?
तो म्हणजे?
तो म्हणजे? >>>
तो म्हणजे? >>>
<<<वानू खरतर शंतनूचा कुत्रा आहे. तो त्याचा खास दोस्तही आहे. 'वानू वानू, शाणा मुग्गा' अस लाडाने म्हणत शंतनू त्याच्याबरोबर जमीनीवरही लोळतो. त्याला फिरायला नेतो. त्याचे लाड करतो. वान्याही त्याच्यावर खूष असतो. पण घराचा मालक शंतनू नाही तर 'तो' आहे, हे वानूला नक्की कळलय. तेंव्हा काही बाका प्रसंग असेल तर वानू 'त्याची' बाजू घेतो. >>>
तो म्हणजे घराचा मालक, शंतनूचे बाबा, लेखिकेचा नवरा...
ज्यांनी वान्या वाचला आणि
ज्यांनी वान्या वाचला आणि अनुभवला नाहीये त्यांच्यासाठी
ओडीनची डायरी वाचून वान्याचीही
ओडीनची डायरी वाचून वान्याचीही आठवण आली
हर्पेन हा धागा वर आणण्याकरता
हर्पेन हा धागा वर आणण्याकरता धन्यवाद.
ओडीनची डायरी वाचून वान्याचीही
ओडीनची डायरी वाचून वान्याचीही आठवण आली >>
आणि मला वानू वाचून ओडिनची!