सुधागडावरील विषारी थरार

Submitted by आशुचँप on 14 May, 2010 - 14:38

गेल्या महिन्यात सुधागडला जाण्याचा योग आला. सुधागड हा अष्टविनायकायतील पालीजवळ असलेला एक बलदंड किल्ला. असे म्हणतात की शिवप्रभूंची राजधानीसाठी या किल्ल्याचे नाव यादीत होते पण स्थानमहात्म्यामुळे रायगडाने नंबर पटकावला. नंतर हा किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. असो.

sudhagad.jpgसुधागड, पाच्छापुर गावातून

मी आणि माझ्या धाकट्या भावाचे काही मित्र असा लवाजमा शनिवारी रात्री दहाच्या सुमारास पुण्यातून निघाला. वाटेत दोन-तिन ठिकाणी चुकत माकत मध्यरात्रीच्या सुमारास पाली गावात दाखल झालो. तिथल्या धर्मशाळेत पथारी पसरली आणि सकाळी गणरायाला एक नमस्कार ठोकून पाच्छापूरच्या दिशेने सुटलो.
माझ्याबरोबरची सगळीच मंडळी कॉलेजवयाची आणि भयंकर उत्साही. त्यामुळे ते टणाटण उड्या मारत गड चढून जायला लागले. त्यांच्या वेगाने मला जाता येईना. त्या ग्रुपमध्ये मी बराच ट्रेकिंग करत असल्याने एकदम भारी असल्याचा गैरसमज होता. आता त्याला बट्टा लागणार असे जाणवले आणि जिवाच्या कराराने किल्ला चढून गेलो.
हातात वेळ भरपूर होता तेव्हा दुपारचे खाणे पिणे उरकून खास पुणेरी वामकुक्षीचा बेत केला आणि तो तडीला न्यायचा या उद्देशाने आडवेही झालो. पण त्या दिवशीची दुपार काहीतरी विलक्षणच घेऊन येणार होती ज्याची कल्पनाही आम्ही केली नव्हती.
मी मस्त सॅक डोक्याशी घेऊन वारा अनुभवत वाड्याच्या बाजूला सावलीत पहुडलो होतो तोच एक दुसरा भटक्यांचा गट बाजून गेला. आणि त्यांच्यातली चर्चा ऐकून एकदम ताडकन उठून बसलो.
त्यांना गडावरच्या शंकराच्या मंदिरात एक कुठलातरी साप दिसला होता म्हणे. तोही शंकराच्या पिंडीपाशी आणि तो दिसणे किती भाग्याचे आहे अशा आशयाचे काहीतरी.
मी तातडीने सगळ्यांना हलवले आणि ही गम्मत सांगितली. आधीच ते उत्साही आणि त्यातून साप पहायला मिळतोय हे कळताच दुपारची विश्रांती घेण्याचा बेत केव्हाच मागे पडला आणि आम्ही त्या मंदिराकडे धावलो. दरम्यान, तिथल्या वाड्याचा व्यवस्थापक कम पुजारी होता त्यालाही कळले. तोही आमच्याबरोबर निघाला.
temple.jpgशंकराचे मंदिर

मंदिराबाहेर बूट काढून अनवाणी पायांनी आत गेलो. बाहेरच्या उजेडातून एकदम आत गेल्यामुळे एकदम अंधारी आल्यासारखे झाले. पण डोळे थोडे सरावल्यानंतर इकडे तिकडे पहायला सुरूवात केली. साप कुठे दिसेना, बर मोठा साप आहे की बारके पिल्लू, विषारी-बिनविषारी काहीच माहिती नव्हते त्यामुळे जरा बिचकत पहात होतो.
तेवढ्यात त्या पुजार्‍यालाच दिसला. पिंडीच्या शेजारी एक शेंदूर फासलेला दगड होता त्याच्या आणि भिंतीमधल्या सांदटीत त्या सापाने स्वतांला कोंबून घेतले होते. मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्या उजेडात जवळ जाऊन पाहिले तर एकदम धसकाच बसला. अंगावरच्या गडद हिरव्या आणि पिवळ्या पट्ट्या आणि त्रिकोणी डोके..शंकाच नाही.. हा तर बांबू पीट व्हायपर आहे..मराठी नाव चापडा..अत्यंत जहाल विषारी.
मला अशा ठिकाणी अशा जागी पीट व्हायपर सापडेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. मला वाटले होते जास्तीत जास्त धामण सापडेल पण हे प्रकरण भयानक होते.

IMG_6163.jpgसांदटीमध्ये बसलेला चापडा

मी पटकन सगळ्यांना मागे जायला सांगितले. साप अजिबात हालचाल करत नव्हता त्यामुळे मी जरा जवळ जाऊन निरिक्षण केले. त्या ट्रेकला मी माझ्या भावाचा एसएलआर कॅमेरा घेऊन गेलो होतो त्यामुळे फोटोग्राफीचे वेड संचारले होते. मनात आले एवढ्या दिवसा ढवळ्या इतक्या उघड्यावर इतक्या जवळ पीट व्हायपर दिसतोय तर त्याचा फोटो काढण्याची संधी का बरे दवडावी. धावतपळत बॅगेपाशी जाऊन कॅमेरा घेऊन आलो. सुदैवाने साप आहे त्याच जागी होता. मी दोन तिन फोटो काढले पण त्या सांदटीमुळे त्याचा पुर्ण आकार येत नव्हता. मी तसे त्या पुजार्‍याला सागितले. बाकिचे सगळे माझे ऐकून बाहेर गेले होते पण पुजारी माझ्या शेजारीच उभा होता.
तो म्हणाला "एवढेच ना, थांबा"
असे म्हणत त्या महान माणसाने चक्क हाताने तो शेंदरी दगड सरकावला.एकदम सहजपणे.
मी ओरडलोच, "अहो काय माहितीये का तो विषारी साप आहे. एवढ्या जवळ नका जाऊ."
पण त्या माणसावर त्याचा ढिम्म परिणाम झाला नाही. पण तो साप थोडा हलायला लागला होता. तो दुसर्‍या आडोश्यामागे जाण्यापुर्वी चान्स घ्यावा म्हणून मी कॅमेरा सज्ज करून पुढे गेलो आणि अजून काही फोटो घेतले. तरीही माझ्या मनासारखा काही फोटो येईना. गाभार्‍यात अंधार असल्याने फ्लॅश टाकावा लागत होता आणि त्यामुळे फोटोची गंम्मत जात होती.

_MG_6174.jpg

"हा बाहेर असता तर जास्त मज्जा आली असती." अस्मादिक.
"मग काढूया की त्याला बाहेर,"
मग बाहेर गेलो, दोन मस्त काटक्या तोडून आणल्या आणि त्याला हुसकावून बाहेर काढायला सुरूवात केली. आणि एवढावेळ शांतपणे आमचे औद्धत्य सहन करणाऱया त्या विषधराने एकदम आक्रमक पवित्रा घेतला. त्याने त्याची जागा सोडून एकदम चपळपणे त्या गाभार्‍यात इकडे तिकडे पळायला सुरूवात केली.
आता मात्र माझे धाबे दणाणले. आम्ही दोघेही अनवाणी आणि पायात एक अत्यंत विषारी साप, तोही चवताळलेला अशा अवस्थेत काय वाटते ते एकदा अनुभवावाचे.
तो साप इतक्या जलद हालचाली करत होता की त्याला काटकीने दाबून ठेवणे पण शक्य नव्हते. अपेक्षेप्रमाणे त्या पुजाऱयाला प्रसंगाचे गांभिर्य अजिबात लक्षात आले नव्हते. तो नाग किंवा फुरसे नाहीये एवढे त्याच्या दृष्टीने पुरेसे होते.
"मी असे करतो मी त्याला आतून बाहेर ढकलतो आणि तुम्ही बाहेर थांबून त्याला पकडा. "
मी ......?????
आम्ही जिवंत सापाची विटी-दांडू करून खेळतोय आणि त्याने कोललेल्या सापाला मी पकडतोय असे काहीबाही चित्र माझ्या डोळ्यासमोर सरकले.
अर्थात त्या दाटीवाटीच्या जागेत दोघांनी उभे राहून हालचाल करणेही अवघड होते त्यामुळे मी पटकन बाहेर येऊन सज्ज झालो. पुजारीबुवा खरेच महान होते. त्यांनी सापाची पळापळ शांतपणे पाहीली आणि तो दाराच्या जवळून जाताच पटकन काठीने त्याला बाहेर ढकलला. त्यांचे टायमिंग अफलातून होते.
सापाला काही कळायच्या आत तो एकदम उघड्यावर आला होता आणि काठीने मी त्याला दाबण्यात यशस्वी झालो होतो.
_MG_6182.jpg_MG_6190.jpgसापाची चिडखोर मुद्रा

त्याला या पराभवामुळे भयंकर संताप आला आणि त्याने आणखी आक्रमक होऊन आ वासला. तो आपल्या शत्रूला चावा घेण्यासाठी धडपडत होता आणि त्याचे विषारी दंत पाहून मी थरारलो.
bite.jpg

मनात आले आपण जरा जिवावरचेच धाडस करतोय. जर तो मला किंवा त्या पुजार्‍याला चावला असता तर उपचारासाठी आख्खा गड उतरून पाच्छापूर मग पाली. तिथे लस उपलब्ध नसेल तर थेट खोपोली. तोपर्यंत टिकाव धरला नाही तर???.
एकदम मनावर भितीचा पगडा बसला आणि हात सैल पडला. ती संधी साधून त्या सापाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा धावत जाऊन त्याला दाबला. दरम्यान मी माझा कॅमेरा हर्षवर्धनकडे दिला होता. त्याने त्याच्या परीने फोटो काढण्याचा सपाटा लावला होता. मध्येच माझ्याकडून परत एकदा ढिलाई झाली आणि साप फोटो काढणाऱया हर्षाकडे झेपावला. त्याची एकदम पळता भुई थोडी झाली. पण त्याने माझे समाधान होईना. शेवटी मी त्याच्याकडून कॅमेरा घेतला आणि अगदी ऑस्टीन स्टीव्हनच्या थाटात फोटोग्राफी केली.
एवढे झाल्यानंतर मग मात्र त्या सापाला जास्त त्रास दिला नाही. दोन काठ्यांनी उचलून त्याला झाडीत नेऊन सोडले. सळसळ करत ते हिरवे प्रकरण क्षणार्धात गायब झाले.

going.jpgpujari.jpgपुजारी आणि मंदिर

मग मागे येऊन बूट घालताना लक्षात आले अरे एवढा वेळ आपण अनवाणीच होतो. शांतपणे पाणी प्यायलो, घाम पुसला आणि म्हणालो.. "दुपारची झोप राहून गेली ना राव."

गुलमोहर: 

धन्यवाद मंडळी, तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल.
बापरे बरीच गरमागरम चर्चा झडलेली आहे या विषयाच्या अनुषंगाने.
दरम्यान थोडा खुलासा..
मी जीवावरचे धाडस केले हे खरे पण ते अगदीच वेडेपणाचे नव्हते असे मी म्हणेन.
१. मी जवळपास दोन वर्षे कात्रज स्नेक पार्कमध्ये व्हॉलेंटियर म्हणून काम केले आहे आणि विषारी आणि बिनविषारी साप ओळखता येतात चांगल्या पद्धतीने. मी बिनविषारी साप हाताळू शकतो पण एकदाही विषारी सापांना हाताळण्याचा अनुभव घेतला नाहीये. पण विषारी सांपाशी किती अंतर ठेवावे आणि कशा पद्धतीने धोका टाळता येतो याची फार नाही पण थोडीफार माहिती मला आहे. त्यामुळेच मी हे धाडस करण्याचा निर्णय घेतला.
२. बाकीचे सदस्य अगदीच नवशिके होते आणि त्यांना सांगितल्यावर ते मंदिराच्या बाहेर जाऊन कठड्यावरून गंम्मत पहात होते. आता दुसरी गोष्ट त्या पुजाऱयाची. आता तो अगदीच बिनधास्त होता आणि त्याच्या नुसार असे साप त्यांना बरेचदा दिसतात. त्याचे फोटो काढण्यात मला एवढा इंटरेस्ट का आहे हे मात्र त्याला कळाले नाही. तो विषय वेगळाच आहे.
३. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तर धोका फारच कमी होता कारण सगळ्या बाजूने पळायला भरपूर जागा होती आणि हातातल्या काठीने त्याला दाबता येणे शक्य होते. (सापाला दुखापत न करता)
४. आता गोष्ट त्याला निवांत दुपारी पहुडलेला असताना डिवचून बाहेर आणणे तेही फक्त फोटोग्राफीसाठी...
माझ्या दृष्टीने निसर्गात पीट व्हायपर दिसणे ही एक सहसा न घडणारी गोष्ट आहे. माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीत मी अनेक साप पाहिले आहेत पण पहिल्यांदा पीट व्हायपर एवढ्या जवळ मिळाला. आणि मला कोणच्याही परिस्थितीत ही संधी दवडायची नव्हती.
त्या सापाला डिवचला जरूर पण दुखापत कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली होती. आणि जिथे त्याला सोडला तिथे कोणचीही वस्ती नव्हती. त्यामुळे तो चिडलेला साप कोणाला चावेल अशी शक्यता नव्हती.
टाकाऊ - माहीतीपूर्ण पोस्टबद्दल धन्यवाद. तुमची माहिती बरोबर आहे. विषाच्या अल्प प्रमाणामुळे कदाचित प्राणावर बेतत नसेल कदाचित पण कशाला विषाची परिक्षा उगाच.

टाकाऊ Proud , तु दिलेल्या माहितीवरुन तरी तुला टाकाऊ म्हणवत नाही , खुपच छान माहीती दिलीस .

चांगले आलेत फोटू....

नंदे, मार्लेश्वर हे ठिकाण एक नंबर आहे... परत जायचा गेली १० वर्षे विचार चालू आहे पण अजून योग काही येत नाहीये.. परत एकदा संगमेश्वर ट्रीप करायलाच पाहिजे मार्लेश्वर बघण्यासाठी... आणि त्या गुहेतले नाग तर जबरीच आहेत.. भारी बसलेले असतात एकदम...

वा !! चांगलाच रंगला तुमचा ट्रेक.
माझा आजुन राहिला आहे सुधागड चा ट्रेक, त्यामुळे मिळालेली माहीती उपयोगीच.
अश्या अंधारी जागेमधे टॉर्च नेणॅ किती जरूरीचे आहे ते ह्यामुळे लक्षात येते.

टाकावु उत्तम माहिती दिलीत. Happy
नंदिनी मार्लेश्वरबद्दल ऐकुन आहे.
तिथे भरपुर प्रमाणात नाग आहेत हे माझा भाउ पाहुन आलाय.
माझ मात्र राहुन गेल जायच.
आशुचॅम्प मध्ये उपक्रमावर ह्याच बांबु पीट व्हायपरचा फोटो पाहिला होता.
तो फणसाडच्या जंगलात (अभयारण्यात काढलेला) तो फोटोदेखील जबरी होता.
खालील लिन्क वर पहा. क्लोज अप आहे.

http://mr.upakram.org/node/2382

अरे बापरे.. मी नमुद केलेल्या मार्लेश्वरवरुन एवढा गदारोळ माजेल असे वाटले नव्हते. वैद्यबुवा.. नंदिनी सांगत आहे ते मी पण तिकडच्या स्थानिक लोकांकडुन ऐकले आहे.

नंदिनी , दिनेश व हिम्सकुल जे म्हणत आहेत की मार्लेश्वर हे ठिकाण केवळ स्वर्ग!..त्याला अनुमोदन! मी तिथे धो धो पावसात.. ऑगस्ट महिन्यात गेलो होतो.. काय तो निसर्ग-- काय ते धबधबे.. शब्दात वर्णन करणे अशक्य!वैद्यबुवा.. त्या नागांचे जाउ द्या.. पण जर का तुम्हाला अप्रतिम निसर्ग बघायचा असेल तर मार्लेश्वरला जरुर भेट द्या... देवरुख ते मार्लेश्वर रस्त्यावरचा निसर्गही मस्त आहे.हे साधारणपणे २०-२५ किलोमिटर अंतर असेल.. त्या रस्त्यावर पावसाळ्यात १-२ मस्त दुथडी भरुन वाहणार्‍या नद्याही दिसतात.

अरे हो.. दिनेश तुम्ही नमुद केलेली गंगा नदिवरची.. बी बी सी ने काढलेली डॉक्युमेंटरी ब्लु रे फॉर्मॅटमधे हाय डेफ टि व्ही वर बघताना एक निर्भेळ आनंद देउन जाते.. अहाहा.. काय ती सिनेमेटॉग्राफी! सुधा भुचरचे नरेशन व त्यातले बॅकग्राउंड म्युझिकही सही!

( जाउ दे.. सुधागडवरच्या सापावरचा बीबी अजुन भरकटवत नाही..:) )

आशुचँप, जरा जपूनच हे असले धाडस करत जा Happy

मार्लेश्वरला नाग हिंडत असतात आणि ते काहीच करत नाहीत हे आत्ताच माझ्या ऑफिसातील २-३ मैत्रिणींनी (ज्या तिथे जाऊन आल्या आहेत) सांगितले. छताच्या कपारीत वगैरे त्यांनी ते पाहिले होते. एकीने तर हरिहरेश्वरलाही पाहिले होते.

झकासराव, फारच खत्री फोटो आला आहे. जबरदस्त. पण त्यांनी गवत्या साप का म्हणलय कळत नाही. तो वेगळा बिनविषारी साप आहे. असो. त्यामुळे फोटोची गम्मत कमी होती नाही.

पण जर का तुम्हाला अप्रतिम निसर्ग बघायचा असेल तर मार्लेश्वरला जरुर भेट द्या... देवरुख ते मार्लेश्वर रस्त्यावरचा निसर्गही मस्त आहे.
>> अगदी अगदी..

मी जाण्यापूर्वी साप/नाग सगळीकडे फिरत असतात असं ऐकलेलं.. पण प्रत्यक्षात फक्त एकच साप दिसल्यानं निराशा झालेली.. Happy

टाकाऊ, तुम्ही दिलेली माहिती टिकाऊ आहे!

गणपतिपुळ्याच्या अलीकडे जयगडला जाणारा रस्ता फुटतो तिथे रस्त्यावरच पहुडलेला अगदी असाच साप
आम्ही पाहीला होता . सरपटोळ म्हणून आम्ही जरी त्याला लेबल लावलं होतं, तरीही कुठेही हिरवळ नसलेल्या त्या कातळावर तो कां व कसा ही शंका होतीच. वरील सर्व माहिती वाचल्यावर तो साप "चापडा"च असावा असं आतां वाटतं.
माहितीबद्दल धन्यवाद.

जबरा !

थरारक होतं प्रकरण एकुणच सापाच्या फोटोग्राफीचं. टाकाऊ माहिती यथोचित आहे अगदी.

मार्लेश्वरचा निसर्ग अत्यंत सुंदर आहे पण मंदिराचा आणि पुढचा धबधब्याचा रस्ता चढताना आजूबाजूला प्रचंड बकाल दुकाने, ती आजकाल सर्वत्रच असतात तशी आरत्यांच्या आणि भलभल्त्या पायरेटेड सीडीजच्या टपर्‍या, त्यांचे कर्णकटू आवाज, नारळ-फुलांची, प्रसादांच्या वगैरे दुकानांनी दोन्ही बाजू भरुन गेलेल्या. मार्लेश्वरच्या धबधब्याच्या ठिकाणी सुद्धा पिकनिकला आलेल्या पब्लिकने इतका कचरा टाकला होता. प्लास्टिकच्या आणि इतरही बाटल्या आणि पिशव्या सगळीकडे. या सगळ्यात तो बिचारा निसर्ग गुदमरलेला होता. आणि तिथे 'सर्वत्र' वगैरे काही नाग साप नाही फिरत. वर देवळात पुजार्‍याने आम्हाला एक गुहेवजा जागा दाखवली आणि संगितले आत खूप नाग असतात. गुहेबाहेर भलीमोठी रांग. आम्ही कसंबसं आत गेलो तेव्हा कपारींभोवती काही साप दिसले. अतिशय मलूल अवस्थेत पडल्यासारखे होते. पूर्वी गारुडी टोपल्यांमधे भरुन नाग, साप फिरवायचे ते कसे असायचे तसं केविलवाणं वाटलं मला तरी ते दृष्य.

आणि तिथे 'सर्वत्र' वगैरे काही नाग साप नाही फिरत. वर देवळात पुजार्‍याने आम्हाला एक गुहेवजा जागा दाखवली आणि संगितले आत खूप नाग असतात. गुहेबाहेर भलीमोठी रांग. आम्ही कसंबसं आत गेलो तेव्हा कपारींभोवती काही साप दिसले. अतिशय मलूल अवस्थेत पडल्यासारखे होते. पूर्वी गारुडी टोपल्यांमधे भरुन नाग, साप फिरवायचे ते कसे असायचे तसं केविलवाणं वाटलं मला तरी ते दृष्य.>>>
सेम अनुभव.... त्या टॉर्च पण भाड्याने घेतल्या होत्या.

मी जाण्यापूर्वी साप/नाग सगळीकडे फिरत असतात असं ऐकलेलं.. पण प्रत्यक्षात फक्त एकच साप दिसल्यानं निराशा झालेली.. >>> प्रत्यक्षात नानकोंडा आल्यावर त्या सापांची काय मजाल बाहेर निघण्याची Proud Light 1

शर्मिला.. माझा मार्लेश्वरचा अनुभव एकदम वेगळा होता.. कदाचित तिथे गेलो तेव्हा कुठलाही सण नव्हता म्हणुनही असेल कदाचित.. अगदिच तुरळक माणसे होती.. तु म्हणतेस तशी दुकाने होती पण पायर्‍या चढता चढता आजुबाजुचा निसर्ग,माकडे व असंख्य धबधबे माझ्या कॅमकॉर्डरमधे चित्रित करण्यात मी पूर्ण मग्न असल्यामुळे त्या दुकानांच्या बकाल अवस्थेकडे माझे कदाचित लक्षच गेले नसावे. पण नक्कीच कचरा वगैरे नव्हता कुठेच. व धो धो पाउस असल्यामुळे मार्लेश्वरच्या मुख्य धबधब्याला जबरी पाणी होते व पाण्याच्या प्रवाहालाही प्रचंड वेग होता त्यामुळेही धबधब्याजवळही काहीच गर्दी नव्हती.नाग तर गुहेतही दिसले नाहीत.. कदाचित तिथे नाग असतात हे आधी माहीतच नव्हते.. त्यामुळे नाग आहेत की नाही याकडे लक्षच दिले नव्हते..:)

आशु,
तुझ्या सगळ्या कथा , धाडशी गड्या ! व्हायपर तसा जवळुन प्रथमच बघायला मिळाला
Happy

तसा साप हा कोणत्या जातीचा/किती विषारी आहे हे कळल्याशिवाय जवळ जाण्याच धाडस करु नये, हे तुझ अगदी खरंय !

अरेच्च्या हा धागा आत्ता बघितला, सगळा वाचून काढला Happy
छानेत रे फोटो Happy
मला बोवा भिती वाटते सापान्ची !
>>>> हातावर जर गरूड रेष असेल तर साप व नाग त्या व्यक्तीला वश असतात. हवा तसा साप ते लोक पकडू शकतात.एल टी किंवा अजून कुणी जाणकार याबद्दल अधिक सांगतील. <<< नन्दिनी, गरुडरेषे बद्दल हे मी पहिल्यान्दाच वाचतो आहे, माहिती मिळविन,
कुन्डलीमधे मात्र राहुकेतू व मन्गळाच्या विशिष्ट स्थानगत प्रभावामुळे वन्य प्राणी/पशु/पक्षी इत्यादिन्ची सन्गत समजु शकते. तरीही त्याबाबत "आकडेवारीनिशी" बोलायला तितक्या व्यक्तिच कधी बघायला मिळत नाहीत (मिळाल्या तरी आमच्या आयुष्यातिल दिनक्रमाप्रमाणे आम्हि तिथवर पोचू शकत नाही)
असो.
चान्गला लेख

आशुचॅम्प धन्य आहात तुम्ही. इथे साप म्हणले तरी तन्तरते, आणी तुम्ही फोटो काढुन मोकळे झालात.

मार्लेश्वर! अहाहा! याचे जुने फोटो होते माझ्याकडे नेटवरचे. पण उडाले ते.:अरेरे:
हा बघा.Marleshwar.jpg

आशुचँप .. धन्य आहात तुम्ही . खुप भिती वाटते सापांची पण न चुकता कुठ साप निघाला कि बघायला जाते . जिथ जिथ साप असा उल्लेख आढळला ते ते आवर्जुन वाचते आणि प्रोग्राम्स पन न चुकता पाहतेच पाहते ..
घरी असताना कोब्रा अ‍ॅडव्हेंचर ग्रुप जॉईन करणार होती पण शिक्षणासाठी बाहेरगावी जाव लागल्यानं बेत रद्द झाला Sad अजुनहि तीच गत.. बघु पुढे मागे Happy

प्रचि सुपर्ब .. टाकाऊ तुमची माहिती सुद्धा मस्तच .. आता मार्लेश्वर ला टाकलय वुड बी डेस्टिनेशन मधे . बहुतेक याच पावसाळा होईल ते पण पाहुन .. रश्मी प्रचिबद्दल आभार. आता त जरा जास्तच इच्छा प्रबळ झालीय ..

आणि निलुदा, धागा वर आणल्याबद्दल आभार तुमचेहि Happy

Pages