माझे वडील विश्वनाथ खैरे सिविल इंजीनियर आहेत. वैतरणा धरणाला गेल्यावर, नदीवर माणसांनी धरण बांधले तेव्हा नदीबाईला काय वाटले असेल याबद्दल त्यांच्यामधील कवीला भोंडल्याचं गाणं सुचलं:
नदीबाईचा भोंडला
--------------
काळ्या दगडातून बाई । काळ्या दगडातून
हिरव्या रानातून बाई। सावळ्या झाडातून
खोल दर्यातून बाई। सपाट खोर्यातून
पाणी नेत होते बाई। गाणी गात होते
पाऊस धो-धो यायचा बाई | भुईला न्हाऊ घालायचा
ओहळ त्याचा व्हायचा बाई | फुगवून मला जायचा
झुळ-झुळ झरे यायचे बाई। मुरण आणून द्यायचे
हे सारं मी घ्यायचे बाई | दर्याला नेऊन द्यायचे
एकदा काय झालं बाई | कोणी-कोणी आलं
"पाणी हिचं नेऊ | पोट भरून पिऊ"
असलं काही बोलले | मी स्वत्ता ते ऐकले
दगड फोडले-तोडले | ढीग ओढले-जोडले
पोहोरे केवढे लावले | तारेचे खांबे रोवले
हिरवस भेले ओतले बाई | नवल मोठे वाटले
तळाशी भक्कम जाडी | टोकाशी निरुंद थोडी
भिंत पक्की चढवली | वाट माझी अडवली
अंगानं मी बळावले बाई | रंगानं मी निळावले
पल्याड काही दिसेचना | भिताड जाऊ देईचना
पावसाळी मी चिडले | भिंतीवरती चढले
धो-धो धप्-धप पडले बाई | त्यांचे काही नाही अडले
जुनाट तट ते फोडले | नवीन पाट हे काढले
दर्याला जायचं पाणी | गेलं गावी-रानी
लेकरांची अन् कोकरांची | माणसांची अन् कणसांची
तहान दूर-दूर गेली ग बाई नदी घरोघर आली
नदी घरोघर आली ग बाई नदी घरोघर आली
काळ्या दगडातून बाई काळ्या दगडातून | हिरव्या रानातून खोल दर्यातून
नदी घरोघर आली ग बाई नदी घरोघर आली
---------------------------------------------
"हिरवस भेले ओतले" : ओले काँक्रीट हिरवट रंगाचे दिसते त्याला उद्देशून म्हटले आहे
---------------------------------------------