नेतागिरी एक बिनाभांडवली धंदा : माझा उद्योग.

Submitted by अभय आर्वीकर on 20 February, 2010 - 08:48

चला नेता बनुया....! : माझा उद्योग.

मला कोणी जर “उद्योग-व्यवसाय” कोणता करावा असा प्रश्न विचारला तर मी बिनदिक्कतपणे आमच्यासारखे राजकारणात या असे ठामपणे उत्तर देत असतो. आणि का देवू नये? राजकारणात घुसून नेता बनण्याएवढा सहज सोपा बिनभांडवली धंदा दुसरा कोणता असेल तर या भारतवर्षातील कोणत्याही मनुष्यप्राण्याने मला सप्रमाण सिद्ध करून दाखवावे. कोणी सप्रमाण सिद्ध करून दाखवल्यास मी त्यांची जाहीरपणे वांगेतुला किंवा कांदेतुला करून त्यांचा यथोचित सत्कार करायला केव्हाही तयार आहे.
मी “राजकारणात या” असा सल्ला देतो त्यामागे ठोस कारणे आहेत. अन्य कोणताही व्यवसाय करायचा म्हटले की भांडवल लागते, कला-कौशल्य लागते, मोक्याच्या ठीकाणी जागा लागते, नोकरी करायची तर तत्सम शिक्षण लागते, डोनेशनसाठी पैसा लागतो.शेती करायची तर जमीनजुमला लागते, कष्ट उपसायची तयारी लागते. वगैरे-वगैरे........
आमच्या व्यवसायात उलट आहे. इथे काय लागते यापेक्षा काय नको हीच यादी फ़ार मोठ्ठी लांबलचक असते. अगदी मारूतीच्या शेपटीपेक्षाही लांब.
पण आपण मात्र येथे किमान काय लागते फ़क्त याचीच यादी करू.

१) पाच मीटर खादीचे कापड खरेदी करण्याएवढे एवढे भांडवल पुरेसे ठरते. (ती सुद्धा विकत न घेता अवांतर मार्गाने हडपून मिळविली असेल तर फ़ारच उत्तम.) पण तेवढेही भांडवल नसेल तरी नाउमेद होण्याचे कारण नाही. आजकाल बिनाखादीने सुद्धा हा व्यवसाय करता येतो. फ़क्त यशाचा मार्ग जरा लांब पडतो एवढेच.
२) कातडी किमान गेंड्यासारखी तरी जाड असावी.
३) आंधळ्या भिकार्‍याच्या ताटात एक रुपया टाकल्याचा आभास निर्माण करुन चार आणे टाकून बारा आणे उचलून घेता यायला हवे.
४) प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाता यायला हवे.
५) निगरगट्टपणा असावा.
६) सरड्यासारखे रंग बदलता यायला हवेत.
७) जेथे तेथे आपलेच घोडे दामटता यायला हवे.
वगैरे वगैरे....
आता मुख्य प्रश्न राहिला शैक्षणिक पात्रतेचा.
शैक्षणिक पात्रता काय असावी हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो.
मी आणि माझा जिवलग मित्र श्याम, आम्ही दोघेही मॅट्रीकमध्ये असतानाची गोष्ट. पहिल्याच वार्षीक परिक्षेत श्याम मेरिट मध्ये पास झाला आणि पुढील शिक्षणासाठी शहरात निघून गेला.
मी मात्र मराठी हा एकमेव विषय कसाबसा काढू शकलो.पुढे अनेक वर्ष मी आणि मॅट्रीक दोघेही कट्टर जिवलग मित्र बनलो. आम्हाला एकामेकावाचून करमेचना. मग मी चक्क पंचवार्षिक योजना राबविली मॅट्रीक मध्ये. पाच वर्षानी मात्र कसाबसा पास झालो एकदाचा.
वडीलांनी माझ्यातल्या गुणवत्तेविषयी निदान करून पुढारी/नेता बनण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले “तू व्यापारी बनेगा ना किसान बनेगा, पुढारी की संतान है तू इस देशका भविष्य बनेगा.”
मला त्यांचा सल्ला आवडला आणि घुसलो एकदाचा राजकारणात. चढत्या क्रमाने घवघवीत यश मिळत गेले. शिक्षणसंस्था काढल्यात, सहकारी कारखाने काढलेत.
आता पाच वर्षाच्या काळात माझा मानमरातब खूपच वाढत गेला. आता मला कोणी रावसाहेब म्हणतात, कोणी बापुसाहेब म्हणतात तर कोणी दादासाहेब.
आणि हो मुख्य गोष्ट राहूनच गेली.
श्याम आला होता. हातात एम. एससी,बी.एड,पी.एच.डी अशा पदव्यांची पुंगळी घेऊन माझ्या शाळेत नोकरी मागायला. म्हटले जागा निघेल तेव्हा रितसर अर्ज कर. सध्या शाळेचे बांधकाम सूरू आहे. खुप खर्चिक काम आहे ते. त्या कामाला निधी लागतो. शाळेतील मुले ही देशाचे भविष्य आहेत.त्यांच्यासाठी सुखसोई उपलब्ध करून देणे माझे परमकर्तव्य आहे त्यासाठी निधी लागतोच. त्याविषयी तू माझ्या पी.ए सोबत बोलून घे. काम कसे रितसर, कायदेशीर व्हायला नको का?
आणि
मुलाखतीच्या दिवशी आला होता श्याम इंटरव्ह्यू द्यायला आणि मी होतो इंटरव्ह्यू घ्यायला .......!
.
. गंगाधर मुटे.
/////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
(लेख काल्पनिकः लेखातील व्यक्तीरेखेशी कुणाची जीवनरेखा जुळतांना दिसली तर तो निव्वळ योगायोग मानावा.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

<< आमच्या व्यवसायात उलट आहे. इथे काय लागते यापेक्षा काय नको हीच यादी फ़ार मोठ्ठी लांबलचक असते.>>
लेखाचा पसारा कमी व्हावा म्हणुन ती यादी करायचे टाळले.

नाही मुटे साहेब , राजकारणाचा धंदा येवढा वाटतो तेव्ह्ढा सोपा नाहीये.
फुकट बिनभांडवली राजकारणात घुसायचं असेल तर आपलं खानदान आधीच राजकारणात मुरलेलं असायला पाहिजे नाहीतर तर तुमची लाखो करोडो रुपये खर्च करण्याची तयारी पाहीजे. लाखो रुपये मोजल्यावर कुठे नगरसेवक होण्याची स्वप्न बघता येतात , आमदारकी साठी करोडो रुपये आधी ओतावे लागतात. किंवा तुमची तेवढी दहशत असली पाहीजे की कोणीतरी फुकट तिकिट देईल .
इथे मरणंसुध्हा फुकट नाही तर राजकारण तरी कसं फुकट असेल .

<< आमदारकी साठी करोडो रुपये आधी ओतावे लागतात. >>
अगदी बरोबर.पण ही कमाई त्यांनी रोजगार हमी च्या कामावर जाऊन थोडीच केलेली असते?
राजकारणाच्या माध्यमातूनच आधी माया जमवितात.... हपापाचा माल म्हणतात याला. Happy

मुटेसाहेब , रोजगार हमी योजना तर शासनाने भ्रष्ट अधिकार्‍यांना आणि राजकारण्यांना पैसा खाण्यासाठी दिलेलं कुरण आहे. न बांधलेली शेततळी , गावतळी , बांध ह्यांच्याच खिशात जातात .

अगदी बरोबर बोललेत श्रीजी.
मलिंद्यावर जगणारी बुरशीच म्हणता येईल.

थोडक्यात पण मस्त जमवले आहे ..खूप आवडलं.. देशापासून दूर राहून ही नेट वर बातम्या ,खबरा न चुकता वाचत देशाशी जवळीक साधून आहो आणी खूप खूप वाईट वाटतं आपल्या डोळ्यासमोर नेत्यांनी केलेले देशाचे हाल पाहून.. चीड ही येते.. Sad

<< वा वा मुटे सहेब.......कुणावर डोळा ठेवला बरं..? ओळ्खु का? >>
मी कोणावर डोळा वगैरे ठेवून लिहिलेले नाही कारण जेथे संपुर्ण व्यवस्थाच किडलेली आहे तेथे कोणा एकाद-दुसर्‍याला टार्गेट करूनही उपयोगाचे नाही.
थोडे सजगतेने निरिक्षन केले तर संपुर्ण भारतभर अशी उदाहरणे जागोजागी घाऊक प्रमाणात पाहायला मिळतील. Happy

हसू नाही आलं वैतागच आला खरं तर सगळं किती सडलंय याचा विचार करुन. चांगलं लिहीलंत. Happy अगदी सत्यपरीस्थिती. पण कधी कोण आणि कशी बदलणार.. ह्याचं उत्तर अजूनही मिळत नाही हेच खरं.

मिनूजी,
पण कधी कोण आणि कशी बदलणार.. ह्याचं उत्तर फारच सोपे आहे. पण अंमल कठीन आहे.....:स्मित:

मुटे जी मस्त बरं का !

म्हणुनच तर कुणीतरी म्हंटलय ...
सज्जनांनो नेभळटपणा सोडा ..आणि राजकारणात या ..
त्याशिवाय ही गटारगंगा साफ होणार नाही ...!