माझी १/२ मॅरेथॉन यात्रा!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कालचा रविवार मी पाठींबा देत असलेल्या संघांना जरी वाईट गेला (कोल्ट्स सुपरबोल हरले Sad आणि भारताच्या क्रिकेट संघाने अर्ध्या कसोटीतच 'हे राम' म्हटलं) तरी वैयक्तिकदृष्ट्या माझे लक्ष्य मी पूर्ण करू शकलो.

गेल्या १० महिन्यतली ही तिसरी अर्ध मॅरेथॉन रेस पूर्ण केली. खरं तर मी यात भाग घेतोय ह्याचं मलाच आश्चर्य वाटतंय. कारण शाळेत असताना क्रिकेट सोडून इतर कशात कधी भाग घेतला नाही. वार्षीक क्रीडादिनाला एक लांब उडी किंवा गोळाफेक या स्पर्धांच्या पहिल्या फेरीत बाद झालो की मग दिवसभर आईसफ्रूट खात इकडे तिकडे भटकत बसणे, इतर मित्रांबरोबर गल्लीत क्रिकेट खेळणे आणि शेवटच्या दिवशी 'मार्च पास्ट' मध्ये आमच्या 'ब्ल्यू हाउस'चा झेंडा घेउन सर्वात पुढे संचलन करणे एवढाच काय तो सहभाग.

तसंच मॅरेथॉन म्ह्टलं की पळावंच लागतं हा जो बर्‍याच जणांचा गैरसमज असतो तसा माझाही होता. पण गेल्या वर्षी माझ्या एक मित्राने (देवाशीश भाटे) तो दूर केला. त्याने आतापर्यंत २० half आणि full मॅरेथॉन चालत पूर्ण केल्या आहेत. बरेच जण यांत चालत देखील भाग घेतात हे जेव्हा कळलं तेव्हा या स्पर्धेत भाग घ्यायला हरकत नाही असं वाटलं. आधी महिनाभर चालण्याचा सराव केला. जेव्हा एकदा सरावाच्या वेळी ८ मैल चाललो तेव्हा वाटलं हे जमु शकेल. आणि ३ मे २००९ ला "ऑरेंज काऊंटी" १/२ मॅरेथॉन ३ तास ५५ मिनिटात पूर्ण केली. त्यानंतर ११ ऑक्टोबरला सुप्रिया आणि मी दोघांनी मिळून "लाँग बीच" १/२ मॅरेथॉन पूर्ण केली आणि काल हंटीन्गटन बीच (सर्फ सिटी) १/२ मॅरेथॉन ३ तास ४५ मिनिटात पूर्ण केली.

१/२ मॅरेथॉन म्हणजे १३.१ मैल (२१ किलोमिटर).

त्यातली ही काही प्रकाशचित्रं.

१. सुरूवात - अमेरिकेच्या ५० राज्यांतून आणि १६ इतर देशांतून मिळून २०००० (विस हजार) स्पर्धक होते. त्यातल्या ६४% स्त्रिया होत्या.
startline.jpg

२. संबंध मार्ग पॅसीफिक कोस्ट हायवे वरून होता.
Course1.jpg

३. हे फक्त दक्षीण कॅलीफोर्नीयातच (So. Cal.) शक्य आहे. एका बाजूला बर्फाच्छादीत डोंगर
course2.jpg

४. आणि एका बाजूला पॅसीफीक समुद्राच्या लाटा.
course3.jpg

५. रेस एकदाची संपली. हुश्श!!
Finishline.jpg

६. सर्फ बोर्डच्या आकाराचं सुरेख मेडल मिळालं.
medal.jpg

या स्पर्धांमध्ये भाग घेताना जाणवतं की आपण बर्‍याचवेळा उगाच बाऊ करत असतो. इथे ५ वर्षांपासून ते ८५ वर्षांच्या आजीबाईंपर्यंत सर्वजण उत्साहात भाग घेत असतात. विविध आकारमानाचे स्पर्धक आपल्या परीने रेस पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. आपण टीव्हीवर जे जिंकणारे स्पर्धक पहात असतो ती elite category वेगळी, पण इतरांचं लक्ष्य असतं आपल्या आधिच्या रेसचं टायमींग सुधारणं.

आशा आहे की हे वाचून (जर मीदेखील ह्या रेस पूर्ण करू शकत असेन तर) तुम्हालाअ देखील स्फूर्ती मिळेल आणि तुमच्या शहरातल्या पुढल्या स्पर्धेत भाग घ्याल.

आता माझं पुढचं लक्ष्य आहे सॅन फ्रान्सिस्कोची १/२ मॅरेथॉन पूर्ण करून "कॅलीफोर्नीया ड्रिमींग" मालिका पूर्ण करणे. Happy

विषय: 
प्रकार: 

२०१० मध्ये "पुढचं लक्ष्य आहे सॅन फ्रान्सिस्कोची १/२ मॅरेथॉन पूर्ण करून" लिहिलं असलं तरी अनेक कारणांमुळे (आळस मुख्य Happy ) गेली ६ वर्षं याकडे दुर्लक्ष झालं होतं. कालच्या रविवारी ९ ऑक्टोबरला लाँग बीच हाफ मॅरेथॉन पूर्ण करून पुन्हा सुरुवात केली. आतापर्यंत ३ तास ४५ लागत होती. काल ३ तास १२ मिनीटात पूर्ण केली. आता लक्ष्य आहे ३ तासाखाली वेळ आणणे.

LBMArathon1.jpg

मी आधी लिहिल्याप्रमाणे विविध वयोगटातील सहभागी मंडळी दिसली की अजून हुरुप येतो. हा लहान मुलगा आपल्या आईबरोबर पळून , त्यानेही ही हाफ मॅरेथॉन पूर्ण केली.
LBMArathon2.jpg

ह्या बाईला तर सलाम!! ब्लेडरनर!!!
LBMArathon3.jpg

पुर्ण कोर्स सुंदर होता. समुद्राच्या कडेने जात असलेला भाग.
LBMArathon4.jpg

कालचा रविवार मी पाठींबा देत असलेल्या संघांना जरी वाईट गेला (कोल्ट्स सुपरबोल हरले अरेरे आणि भारताच्या क्रिकेट संघाने अर्ध्या कसोटीतच 'हे राम' म्हटलं) >>

कालचा रविवार भारतीय क्रिकेट संघाला खरेतर खूप चांगला गेला. Happy

अभिनंदन !

६ वर्षांत बरेच बदल झाले केदार Happy भारतीय कसोटी संघ पण सुधारला आहे, आणि कोल्ट्स जरी जिंकले असले तरी आता माझा पाठींबा डेनवर ब्राँकोजला आहे (आणि ते हरले Sad ).

Pages