तिलापिया फ्राय

Submitted by Adm on 7 February, 2010 - 20:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-तिलापिया (किंवा कॅटफिश)चे ३ फिले
-१ चमचा हळद
-१ चमचा किंवा थोडे जास्त लाल तिखट
-१ चमचा मालवणी मसाला / बिअर बाटली मसाला/ गरम मसाला + धनेजिरे पावडर
-१ चमचा चिंचेचा कोळ/आमचुर पावडर्/लिंबाचा रस
-अर्धा इंच आलं
-२ मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या
-३-४ हिरव्या मिरच्या
-ओलं खोबरं
-रवा / तांदुळाची पिठी
-चवीप्रमाणे मिठ
-तेल

क्रमवार पाककृती: 

१. फिले घरी आणल्यावर धुऊन कोरडे करून त्याचे साधारण दीड ते दोन इंचाचे तुकडे करायचे.
२. हळद, तिखट, मिठ, लिंबाचा रस, मसाला हे एकत्र करून माश्याच्या तुकड्यांना चोळून बाहेर १५-२० मिनीटे किंवा फ्रिज मधे २४ तास पर्यंत ठेवायचं.
३. आलं, लसूण, मिरच्या, खोबरं ह्यांचं चॉपर मधे वाटण करून घ्यायचं.
४. माश्याच्या तुकड्यांना खोबर्‍यांचं वाटण लावून मग ते रवा किंवा तांदुळाच्या पिठीत घोळवून घ्यायचे.
५. सढळ हाताने तेल पॅन मधे घालून सोनेरी/ ब्राऊन रंगावर परतायचं की फ्रायफीश तयार !

वाढणी/प्रमाण: 
२-३ माणसांना माश्यांची साईड-डिश म्हणून पुरेसे होतात.
अधिक टिपा: 

१. शोनूने मागे ही कृती पार्ल्यात टाकली होती. करायला अतिशय सोपी. मासे आधी बनवले नसतील आणि सुरुवात करायची असेल तर अगदी योग्य !
२. खोबर्‍यांचं वाटण लावायचं नसेल तरी चालतं. फक्त मसाल्याचं मिश्रण चोळून रव्यात घोळून तळता येतात.
३. खोबर्‍याचं मिश्रण लावलं तर आपल्याला जो स्वाद आवडतो त्याप्रमाणे घटक कमी-जास्त करावे. मला आल्याचा स्वाद आवडतो त्यामुळे मी आलं जास्त घालतो.
४. तांदळाची पिठी वापरली तर फ्राय्-फिश मऊ होतात, रवा वापरला तर क्रिस्पी होतात. दोन्हीचं मिश्रण करून ही चांगले लागतात.
५. बिअर बाटली मसाला म्हणजे काय ते मला माहित नाही, शोनूला विचारा. Happy कुठलाही मसाला चालतो. प्रत्येक वेळी वेगळा वापरला तर वेगळी चव. Happy

माहितीचा स्रोत: 
शोनू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसिपी. मी सुद्धा रवा + तांदुळाचे पीठ असेच तळते. बीअर बाटली मसाला म्हणजे काय हे विचारायचे होते पण आता शोनूला विचारते Happy

वसई, विरार या भागात रहाणार्‍या इस्ट इंडियन ( उच्चारी कॅटलिक ) कॅथॉलिक लोकांचा हा एकदम टीपिकल मसाला ( ओगले आजींचा जसा काळा मसाला तसा फर्नांडिस, डिकोस्टा वगैरेंचा हा मसाला.

पावसाळ्याच्या आधी, सगळे जिन्नस उन्हात सुकवून , मोठाल्या उखळांमधून कुटून बीअरच्या गडद रंगाच्या बाटल्यांमधून भरून ठेवत असत. दोन चार कुटूंबांचा मसाला एकत्र बनत असे व असा मसाला बनवायचा मोठा प्रोग्रॅम चालायचा २-३ दिवस.

मुंबई मधे ओळखीच्या इस्ट इंडीयन लोकांकडुन नाहीतर मंगलोर स्टोअर्स किंवा बांद्रा/मालाड/ ओर्लेम पश्चिमेला वगैरे कॅटलिक भागातल्या दुकानात मिळतो.

त्यातल्या त्यात मालवणी मसाल्याच्या जवळ पास चव असते.
मसाला करुन पहायचीच हौस असेल तर इथे आहे एक कृती
http://www.bottlemasala.com/Bottle_Masala_Recipe.html

यम्म!!

मासे करताना मी नेहमी लसूण जरा जास्त घेते. तसंच, इंडीयन स्टोअर मधे मिळणारा फिश फ्राय मसाला (शानचा वापरलाय मी) सुध्दा चांगला आहे.

अडमा, कधीतरी तांदळाची पिठी किंवा रवा न लावता पण फ्राय करून बघ. खरपूस चव लागते एकदम!

मी हे अव्हनमध्ये करू का? तेल कमी वापरायचा मूड आहे आज म्हणून. किती वेल लागेल अव्हनमध्ये? मग २-३ मिनिटं ब्रॉइल वर ठेवलं खरपूसपणाला तर काम भागेल का?

असा तिलापिया मी नेहमी करते.
भारतीय प्रकारः
चवीनुसार हि मि + भरपूर कोथिंबीर + आलं + लसूण + जिरे + मीठ + लिंबू रस यांची थोडे पाणी घालून चटणीसारखी पेस्ट करायची. या मिश्रणात मासे तासभर बुडवून ठेवायचे. जास्त ठेवल्यास चव चांगली येते पण मग फ्रिजमधे ठेवा.
मग तांदुळाचे पीठ + बारीक रवा यांची थोडे मीठ घालून किंचीत आवरण येईल अशी पातळसर पेस्ट करून वरच्या कृतीने फ्राय/शॅलो फ्राय करा. मस्त लागते चव. पहिल्यांदा फिश खाणार्‍यांना खूप आवडते हा स्वानुभव. ब्रॉईल वर खरपूस होईल पण मी कधी केला नाहीये. पण नक्कीच कमी तेल लागेल.

इटालियन प्रकारः पद्धत सगळी हीच पण मसाले वेगळे. ताजी बेसिल + थोडा पुदिना + पार्सली + लसूण + मीठ + ऑ ऑईल + लिंबुरस असं मॅरिनेट करायचं. खूप छान चव येते जर सगळ्या ताज्या हर्ब्स असतील तर. बरोबर वाफवलेल्या भाज्या + गार्लिक ब्रेडची स्लाईस आणि रेड वाईन!! आहाहा!!

मी पाहिले होते करुन एकदोनदा अवनमध्ये पण ड्राय झाल्यासारखे वाटले. तव्यावरचे जितके मस्त लागतात तितके नाही लागले. कदाचित अवनमध्ये ठेवायची वेळ आणि तापमान चुकले असेल.

अवांतर : पुण्यात कँपातल्या शिवाजी मार्केटमध्ये बासा फिश फिले मिळतात. पाहिजे त्या आकारात तुकडे करुन मिळतात. किंमतही वाजवी असते. ज्यांना फिश खायला सुरुवात करायचीय त्यांच्यासाठी अगदी योग्य. मॉलमधून मिळणारे फिश फिले फ्रोझन असतात आणि किंमतही खूप जास्त असते.

व्हाईट आणि ऑरेंज ( थोडाफार सामन सारखा ) असे दोन प्रकारचे बासा मिळतात. ऑरेंज बासा जास्त मॉईस्ट लागतो त्यामुळे आम्ही तोच आणतो.