दुधी भोपळा - स्पेशल

Submitted by साज on 22 September, 2009 - 07:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

"दुधी भोपळ्याची भाजी खुप आवडते" अस म्हणणारी खुप कमी जण असतील ना!
मला वाटत की जगातल्या ८०% लोकांना ,१००% हा दुधी भोपळा आवडत नसणार. मी सुद्धा दुधी भोपळा अजिबात न आवडणार्‍यांन पैकी एक (होते).
पण खर तर दुधी भोपळा अतिशय गुणकारी असतो. मी आणि माझी बहिण नेहमिची दुधी भोपळ्याची भाजी कही केल्या खात नाही, हे समजल्यावर माझ्या आईने आम्हाला न जाणो किती वेगवेगळ्या रुपात ह्या दुधी भोपळ्याचे पदार्थ खायला घातले.
असेच काही पदार्थ आज इथे पोस्टत आहे.

दुधी भोपळा - हा कॉमन जिन्नस.

क्रमवार पाककृती: 

१) दुधी भोपळ्याची भाजी (खिसुन, बेसन घालुन)
जिरे- धने खमंग भाजुन घ्या आणि त्याची मिक्सर मधे बारीक पुड करा. दुधी भोपळा सालं काढुन खिसुन घ्यावा.
पाच-सहा लसुण पाकळ्या ठेचा.
थोड तेल (फोडणी पुरतच) कडकडित तापवुन,मोहरी -जिरे आणि हिन्ग घालुन फोडणी करावि.
मग फोडणीत लाल मिरच्या घाला. मिरच्या मस्त तडतडल्या पाईजेत. त्यात ठेचलेल्या लसुण पाकळ्या घालुन चांगल परतुन घ्या.
आता भोपळ्याचा खिस घालुन भरपुर परतुन घ्या. त्यात जिरे- धने पुड घालुन एक वाफ काढावी. भोपळा शिजला की चवीनुसार
मिठ घाला.चिमुटभर साखर घाला. खुप तिखट हव असेल तर तिखट घाला.
आता डाळीचे पिठ (बेसन) घालुन एक वाफ काढावी.बेसन नीट शिजायला हव. भाजी तयार.

२) दुधी भोपळ्याचे पराठे.
जिरे, धने, थोडी बडिशोप आणि दोन्-तीन वेलच्या खमंग भाजुन घ्या आणि त्याची मिक्सर मधे बारीक पुड करा.
हिरव्या मिरच्या, आलं, लसुण आणि कोथंबिर एकत्र करुन, पेस्ट तयार करा.
भोपळ्याची सालं काढुन भोपळा खिसा आणि त्यात गव्हाच पिठ, पेस्ट आणि पुड, मीठ घालुन पिठ मळा. मुळात भोपळ्याला पाणी
सुटत, शिवाय जरुर तेवढेच पाणी घालुन पिठ घट्ट मळा.
पराठे लाटा आणि थोड बटर/तुप लाऊन भाजुन घ्या. टोमॅटो सॉस/लोणच/चीझ स्प्रेड/चटणी सोबत गरम पराठा खाउ शकता

३) भोपळ्याचे कोफ्ते
कांद भजी साठी पीठ भिजवतो, तस करायच.
दुधी भोपळा सालं काढुन खिसुन घ्या. त्यात चविनुसार मीठ, हळद घाला. पाच - दहा मिनिटे तसच राहुदे.
भोपळ्याला भरपुर पाणी सुटेल. आता त्यात जिरं, तिखट, ओवा, कसुरी मेथी, थोडा गरम मसाला घाला.
भोपळ्याला जेवढ पाणी सुटल असेल, त्यामधे मावेल इतपत बेसन मिसळा. कांदे पकोडे साठी पीठ भिजवतो, तस करायच.
सगळ एकत्र मिसळुन थोड गरम तेल (मोहन) घाला. कोफ्ते तळा.
हे तयार कोफ्ते, वेगवेगळ्या ग्रेव्हिमधे (टोमॅटो-कांद्याची ग्रेव्हि/कोकोनट ग्रेव्हि/कढी/ग्रीन ग्रेव्हि) घालयचे. कोफ्ता करी झाली ना!

४) भोपळ्याच्या रिन्ग्ज्.
दुधी भोपळ्याची सालं काढुन घ्या.
भोपळ्याच्या गोल चकत्या करुन घ्या साधारण अर्धा CENTIMETER (आता हे मराठीत कस लिहु?) जाडीच्या. भोपळ्यात खुप
जास्त बीया असतिल तर त्या काढा. ह्या चकत्या थोडस मीठ आणि ऑरिगेनो घालुन वाफवाव्यात.
तांदुळा ची पिठी, चिली फ्लेक्स, थोड मीठ , काळी मिरी पाउडर,ऑरिगेनो आणि थोडसा लेमन जूस( ऐच्छिक) हे सगळ निट एकत्र
मिसळुन घ्या.
वाफवलेल्या चकत्या, तयार केलेल्या तांदुळा च्या पिठी च्या मिश्रणात घोळुन तव्यावर थोड तेल्/बटर टाकुन मस्त shallow fry करा.
टोमॅटो सॉस/ मेयोनीझ सोबत खा.

अधिक टिपा: 

लहान असताना, आई - बाबा मला ओरडायचे, कि अग जरा शुद्ध लेखन कर, किती अशुद्ध लिहितेस.
मी लेखन करायचे , हेच पुश्कळ होत(माझ्यासाठी).लेखन शुद्ध /अशुद्ध हा माझा प्रांतच नव्हता.
तर हे इथ लिहायच कारण अस की या पाककृती ची खात्री देते, पण शुद्ध लेखनाची नाही.
काही चुकल असेल तर मज पामराला माफ करा.

माहितीचा स्रोत: 
आम्ही भाज्या खाव्यात यासाठी आईने केलेले प्रयोग!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई दुधीची खीर करते...एकदम सुंदर लागते....त्यात ते मिल्कमेड वगैरे घालून...ती फ्रीज मध्ये एकदम थंडगार केली कि आईस्क्रीम सारखी लागते.....

आणि दुधीच्या कोवळ्या सालीची चटणी एकदम कैरीच्या गोड आंबट चटणी सारखी चविष्ट होते......आंबे नसणाऱ्या सीजन मध्ये आई करते अधून मधून....माझ्या ऑफिस मध्ये सगळ्यांना खूप आवडायची....

दुधीच्या सालीची चटणी.......दुधीची कोवळी सालं, एखादी मिरची,पुदिन्याची पान चविनुसार, जिरं, कोथिंबीर, दोन तीन लसून पाकळ्या , छोटा गुळाचा खडा, हे सगळ मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं त्यानंतर त्यात मीठ घालून मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची आणि शेवटी लिंबू पिळायच......करूनच बघा एकदा.....एकदम मस्त होते

आणखी एक पदार्थ आता आईने सांगितलाय.....दुधी किसून घेऊन दाब देऊन पाणी काढून घ्यायचे....त्यात ओवा, थोडे तीळ, जीर, गोडलींब (कडीपत्ता) मिरची आणि कोथिम्बिर यांची पेस्ट करून घालायची मीठ आणि तांदुळाची पिठी घालून हाथावर थापता येईल असे भिजवायचे.....१५mnt तसेच ठेऊन नंतर हातावर थापून हे वाडे मस्त खरपूस ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे.....सुपर्ब होतात एकदम

शूम्पी, तुला हलव्याची रेसिपी हवी आहे का?
दुधी हलवा- दुधी किसून घ्यावा. हलवा काळपट पडायला नको असेल तर कीस उकळत्या पाण्यात दोन तीन मिनिटं ठेवून निथळून, पिळून घ्यावा. एकीकडे खवा किसून घ्यावा आणि थोड्या तुपावर परतून घेऊन बाजूला काढून ठेवावा. त्याच तुपात दुधीचा कीस परतून त्यात साखर घालून शिजवत ठेवावं. शिजतानाच त्यात केशर, ड्रायफ्रूट्स, वेलदोड्याची पूड, चारोळी वगैरे घालून टाकावी. एवरेस्टचा दुधाचा मसालाही चालेल. पाणी आळायला लागल्यावर तुपात परतलेला खवाही घालावा. शिजल्यावर घट्ट वाटल्यास थोडं दूध घालूनही चालेल.

दुघी प्रचंड आवडणार्‍यांत मी. साधी कांदा, ओलं खोबर्ण, कढीपत्ता, हळद-तिखट-मीठ (हवी तर साखर), धण्याजीर्‍याची पूड घालून केलेली अंगालगत रस्सा असलेली भाजी आणि चपात्या एकदम चविष्ट लागतात.

माझी आई दुधीची गोड भाजीही करत असे. तुपावर काळे मीरे, लवंगा, वेलची घालून त्यावर सालं काढून फोडी केलेला दुधी शिजवून घेणे. मग त्यात दूध घालून अजून शिजवणे. मग साखर आणि चवीपुरतं मीठ घालून ही भाजी करतात. छान लागते.

मला व्हाईट सॉसमधला दुधी हा प्रकार अत्यंत आवडतो. फक्त कॅलरीजच्या अंगाने जरा अंमळ जास्त असा हा पदार्थ असल्यामुळे कधी कधीच खाते. Wink दुधीचे चौकोनी तुकडे शिजवून ते मैदा+लोणी+दूध यांच्या तयार केलेल्या व्हाईट सॉसमध्ये सोडायचे, चवीला मीठ-मिरपूड-मिक्स हर्ब्ज, हवी असल्यास एखादी मिरची. पोळी, ब्रेड, पाव, फुलका यांबरोबर खायला ही सौम्य चवीची भाजी मस्त लागते.

याशिवाय चक्क्यात मीठ, साखर, राईपूड घालून त्यात उकडलेला दुधी व सोबत हव्या असल्यास इतर वाफवलेल्या भाज्या (श्रावण घेवडा, बटाटा, मटार, गाजर, स्वीट कॉर्न इ.), डाळिंबाचे दाणे वगैरे घालून तयार होणारे रायतेही अफलातून लागते. चक्क्याऐवजी दहीपण चालते, फक्त चव वेगळी येते.

माझी मावशी दुधीची आणखी एका प्रकारे भाजी करते. तेल, हिंग, मिरची, हळद, मोहरीच्या फोडणीत साल काढलेल्या दुधीच्या फोडी व भिजवलेली मूगडाळ घालून शिजवायचे. सोबत ओले खोबरे, कोथिंबीर, गूळ, काळा मसाला, मीठ घालायचे. आणि भाजी शिजत आली की त्यात थोडे दूध घालायचे. ही भाजी चवीला छान लागते.

मी पण दूधी भोपळ्याची मोठ्ठी फॅन आहे. काळे वाटाणे घालून एक मस्त तिखट भाजी करतात. कुणाला माहीत असल्यास रेसिपी टाका ना.

आता इथेच विचारते. दुधीची भाजी करायला म्हणून दूधी चिरला. नंतर लक्षात आले की एव्हढी भाजी संपनार नाही. तर त्या भाजीसाठी चरलेल्या दधीची खीर किंवा हलवा करता येईल का? हलव्याच्या रेसीपीत दूधी किसुन घ्यायचा असतो ना?
खीरीची रेसिपी पण हवी आहे.
दुधीचे रायते पण करणार आहे पण तरी उरेलच!

अरे वा... माझ्या आवडीची भाजी...

वत्सला.... फोडी केल्या तरी हरकत नाही.... तो दुधी जरा भरड म्हणजे मिक्सर मधुन फक्त एकदा टर्र करुन काढा. तुपावर परता, दुधीचं आंगचं पाणी आटलं की त्यात जायफळ, वेलची, काजु घालुन मस्त वाफ काढा, मग त्यात मिल्क मेड किंवा साखर्+दुध घालुन छान दाट्सर खिर करा.

माझी आई, दुधी वरील प्रमाणे शिजवुन घेवुन मग तो थंड करायची. दुसर्‍या बाजुला दुध थोडे आटवुन थंड करुन, त्यात गुळ घालायची. मग सगळं एकत्र करुन थोडी साय फेटुन त्याला थंड करुन एक वेगळाच डेझर्ट चा प्रकार करायची. गुळा मुळे ख्मंग चव येते. आणि दुध थंड केल्याने फाटत नाही. साधारण संध्याकाळी खायचा तर सकाळीच सगळं शिजवुन्/आटवुन गार करायचे फ्रिजात. मग आयत्या वेळी दुध्+दुधी+गुळ घालायचा..... मस्त चव येते.

बाकी दुधी डाळ , कोफ्ते, परोठे, भरीत, दुधी बेसन, दुधीच्या किसाचे थालीपीठ, दुधीच्या किसाचे घावन हे मी नेहेमीच करते.

इकडे सांगितलेल्या रिंग्ज करुन पाहिल्या पाहिजेत.....

धन्यवाद मोकीमी! करून बघते!
निम्म्या दुधीची बेसन घालून भाजी केली. मुलींनीही आवडीने खाल्ली.

मी पन दुधि चि खूप मोथि फान आहे. माला दूध घालुन आनि मूगाचि किवा चन्याचि दाल घतलेलि भजि खूप आवद्द्ते.

मोकीमी, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने खीर केली. मस्त झाली होती. थोड़े मिल्कमेड आणि दुधाची पाउडर घातली. साखर अजिबात घातली नाही.

दुधी भोपळ्याचे गोल, पातळ काप करून त्याला मिरपूड, चाट मसाला, मीठ लावायचे आणि मावेमध्ये एक दोन मिनिटे शिजवायचे, छान लागतं. मधेच बाजू बदलायची. मी शक्यतो एक मिनिटंच करते. तीस सेकंद्स झाली कि बाजू उलटवते कापांची.

दुधी कोवळा बघूनच आणतो आपण शक्यतो, त्यामुळे सालासकट हे मी करते.

Pages