मुळ्याची झुणका-भाजी - mulyachi bhaji

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 7 February, 2016 - 01:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुळ्याची न किडलेली, स्वच्छ, ताजी पाने - १ गड्डी
आकाराने मोठे २ पांढरे मुळे - किसून
पाव ते अर्धी वाटी मूगडाळ - दहा ते पंधरा मिनिटे पाण्यात भिजवून
हिरव्या मिरचीचा ठेचा - पाव चमचा
थालिपीठाची भाजणी - २ टेबलस्पून
मीठ चवीनुसार.

फोडणीचे साहित्य :
तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट.

क्रमवार पाककृती: 

मुळ्याची पाने नीट बघून, कीड न लागल्याची किंवा खराब नसल्याची खात्री करून निवडून, धुवून चिरून घेणे. मुळ्याच्या दांडक्यांना किसून घेणे. कढईत फोडणीसाठी तेल तापत ठेवावे. गरम तेलात मोहरी घालून ती तडतडली की आंच मंद करून अनुक्रमे हिंग, हळद, तिखट घालून हिरव्या मिरचीचा ठेचा घालावा व लगेच भिजलेली मूगडाळ घालून परतावे. दोनेक मिनिटांनी मुळ्याचा पाला घालावा. नीट परतावा. पाला थोडा शिजला की किसलेला मुळा घालून परतावे व पाला आणि कीस मिसळून घ्यावा.

mulyacha zunka1.jpg

दोन तीन मिनिटांत मुळ्याचा कीस शिजेल. त्यानंतर भाजीला थोडे पाणी सुटते आहे असे वाटले की भाजणीचे पीठ भुरभुरून ते नीट मिसळून घ्यावे. गरज वाटल्यास एखादी वाफ आणावी. चवीनुसार मीठ घालावे. सामान्यतः या भाजीला जास्त मीठ लागतच नाही. अगदी कमी पुरते. भाजी शिजल्याची खात्री झाली की गॅस बंद करावा व कढई खाली उतरवावी. भाजीवर झाकण ठेवून भाजी जरा मुरू द्यावी. अशी ही मुळ्याची गार / गरम झुणका-भाजी भाकरी / पोळी / ब्रेड / भातासोबत तोंडीलावणे म्हणून खावी.

mulyacha zunka2_0.jpg
वाढणी/प्रमाण: 
एका गड्डीत किती पाने यावर अवलंबून. तरी दोन - तीन माणसांपुरती.
अधिक टिपा: 

~ ही भाजी चोरटी होत असल्यामुळे कितीजणांना पुरेल याचे प्रमाण तसे सांगता येत नाही.
~ थालिपिठाच्या भाजणीऐवजी तेलात जरा खमंग भाजलेले बेसन किंवा मूगडाळ पीठही वापरू शकता.
~ काहीजण फोडणीत हिरव्या मिरचीच्या ठेच्याऐवजी सुक्या लाल मिरच्या घालतात.
mulyachi bhaji

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा अकु! मस्त दिसतेय भाजी.

आई, आजी मुळ्याच्या पानांची भाजी मुगडाळ घालून करतात. मीही बहुतेकवेळेला तशीच करतो. क्वचित कधीतरी मुळ्याच्या पानांची चण्याच्या डाळीचं पीठ लावूनही भाजी होतेच.
मुळा, त्याची पानं + मुगाची डाळ + चण्याच्या डाळीचं पीठ/ भाजणी ही नवीन भर. विन्ट्रेंष्टिंग वाटतेय. करून पाहीन अश्या मिक्स पद्धतीने. Happy

वा! करुन बघेन बाजारात मुळ्याची पाने आढळली की. सुंदर आले फोटो आहेत.

मुळ्याच्या दांडक्यांना किसून घेणे. > दांडक्यांना म्हणजे मुळ्याचा पांढरा भाग का?

मस्तच!

थालीपीठाच्या भाजणी ऐवजी बेसन घातल्यास कशी होते काही कल्पना?
कारण ते आमच्याकडे मिळणे कठीण.

छान कृती.
मी ही मुळ्यांच्या पानांची भाजी नेहमी करते. फक्त पानं भरपूर आणि १ मुळा किसून टाकते. लसूण,हिंग ,मोहरी ची फोडणी आणि लाल तिखट. त्यात भाजी शिजत आल्यावर खमंग भाजलेले डाळीचे पीठ.खूप चवदार होते भाजी.
मूगडाळ घालून करुन पाहीन आता..

मस्त वेगळा प्रकार. फोटोपण छान.

पीठ पेरून करते मी पण बेसन किंवा तांदुळाचे पीठ वापरते. सासूबाई करतात माझ्या सर्व पीठ पेरून भाज्या भाजणी घालून. त्यात मुळ्याची पण करतात. मुग डाळ घालून प्लस भाजणी आयडिया मस्त.

बी, हो, मुळ्याचा पांढरा भागच.
मानव, चालेल की!
डिंपल, लसूण काँबो करायचा अद्याप धीर नाही झाला. आता करून बघेन. Happy

सर्व प्रतिसादकांचे आभार! Happy

धन्यवाद अरुंधती.

पाकृमधील तुझे शब्द खूप वेगळे असतात असे मला नेहमी जाणवते. वाचकांच्या शब्द्संपदेत भर घालतेस.

मुग / ह डाळ घालून मुळा किसून केली जाते
पाला असेल तर थोडा मुळा + पीठ अशी केली जाते
दोन्हीच कॉम्बी करून बघावे आता

मुळा आधीच उग्र चवीचा असल्याने लसून मी पण नाही कधी वापरला

आज हीच भाजी बेसन घालून केली ... आणि नंतर ही रेसिपी पाहीली... नाहीतर डाळ घालून केली असती ... पुढच्या वेळी नक्की ...